चायनिज वे टु हॅंडल रेसेशन..

Written by  on September 24, 2007

स्थळ :- चायना..

प्रोव्हिन्स :- ह्युबेई.. सेंट्रल चायना…!

smokeइथे एका सरकारी अधिकाऱ्याने  एक सरक्युलर इशु केलंय.. की प्रत्येकाने आपापला स्मोकींग चा कोटा कुठल्याही परिस्थितीत रोज पुर्ण केलाच पाहिजे. म्हणजे काय तर तुम्ही दररोज दोन पाकिटं सिगरेट्स ओढणे हे आवश्यक आहे .तुम्हाला काय वाटतंय मी चेष्टा करतोय ?? दुर्दैवाने तसं नाही. मी अगदी सिरियसली हे पोस्ट लिहितोय..

बरं आणि ब्रॅंड कुठला? तर त्या प्रोव्हिन्स मधे तयार झालेला. दुसऱ्या प्रोव्हिन्समधला ब्रॅंड जर कोणी स्मोक करताना आढळला तर , त्याला फाईन करण्यात येइल.. असंही डिक्लिअर केलंय.२३०००० पॅकेट्स ज्यांची किंमत ४ लाख पाउंड्स आहे ( लॅपटॉप च्या की बोर्ड वर   पाउंडाचं साइन नाही ) सिगारेट्स फुंकुन टाकण्याचे ’आदेश’देण्यात आलेले आहेत.बराच स्टॉक बिल्ड अप झालाय  सेल कमी झाल्या मुळे ,त्या फॅक्ट्री मधे. हा स्टॉक खपे पर्यंत नवीन प्रॉडक्शन बंद होईल म्हणून हा स्टॉक संपवणे अतिशय गरजेचे आहे..म्हणून ही ऍक्शन..

हे असं केल्यामुळे सिगारेट वरचा टॅक्स जमा होईल खजिन्यात.या व्यतिरिक्त सिगारेट्स ओढण्याचे इतर फायदे म्हणजे त्या फॅक्ट्रीतला सगळा स्टॉक संपेल आणि लोकांना पण काम मिळेल. म्हणजेच काय तुमच्या सिगरेट्स ओढण्याने एकॉनॉमी ला मदत मिळेल म्हणुन सिगरेट ओढणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे असे समजून सिगरेट्स ओढा असा फतवा काढला आहे.

सिगरेट ओढल्याने डॉक्टर्स ला काम मिळेल. औषधी खपतील,आणि त्यामुळे इतर बऱ्याच इंडस्ट्रिज चालतील म्हणून–(???)   😀 असे अनेक फायदे नजरेसमोर ठेवून हा निर्णय घेतला असावा असे मला माझ्या अल्प मती प्रमाणे वाटते.

शिक्षकाने लोक जागृती करणे अपेक्षित असते.  त्यासाठी त्या शिक्षकाला चांगल्या सवई असणे आवश्यक आहे. कल्पना करा एक बेवडा शिक्षक , दारु पिणे वाईट असे म्हणून त्यावर लेक्चर देईल तर त्याचं को ऐकेल कां? अर्थात नाही.चायना मधे लोकल शाळांमधे पण टीचर्सला स्मोकिंग कोटा देण्यात आलेला आहे. म्हणजे आता शिक्षक कॊटा पुर्ण करायचा म्हणून वर्गात पण शिकवतांना करंगळी आणि शेजारचं बोटं ह्यामधे सिगारेट धरुन खोल झुरका मारत खॉक खॉक करत शिकवणार तर…! कधी खोकला वगैरे झाला, आणि त्यामुळे सिगरेट स्मोकिंग करता आलं नाही तर मग वर्गातल्या मुलांना सिगरेट ओढायला देतील का शिक्षक?? काही कळत नाही..

बरं एवढं करुन सरकार थांबलं कां? नाही.. एका गावात त्यांनी  ४०० कार्टन सिगारेट्सचा कोटा विकत घेण्यास सांगण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्ही सिगारेट्स घ्या , ओढा, म्हणजे गावातील सिगरेट फॅक्टरी चालतील. असाच नियम जर दारुच्या फॅक्टरिला पण लागू केला तर काय होईल?? काय होईल म्हणजे काय.. सगळे चिंगु लोकं बेवडे…. ! रोज टल्ली होऊन घरी येतील, बायकोला मारहाण करतील, मग पोलिसांना पण काम मिळेल, एखादा माणुस आपल्या बायकोचं डॊकं फोडेल, म्हणून डॉक्टरला पण काम मिळेल, पोलीस येतील.. त्यांना पण काम मिळेल.. आणि एकॉनॉमी हेल्दी होईल चायनाची… हा हा हा!!  एड्स वरचं औषध खपाव आणि ती फॅक्टरी चालावी म्हणून चायना सरकार काय लोकांना बाहेरख्याली  पणा करायला सांगणार आहे का?

चायना गव्हर्नमेंटने भरपुर खर्च करा अशी ऑर्डर काढली आहेत, अशा ऑर्डर  मुळे एकॉनॉमी फ्लरिश होईल. हे जरी खरं असलं तरीही अशा विक एकॉनोमी मधे पैसा असायला हवा ना खर्चायला!

चायना मधल्या ३५० मिलियन स्मोकर्स  पैकी १० लाख  दर वर्षी मरतात. सरकारला त्याचं काही नाही.. मरताहेत तर मरु देत..सरकारला पण असं वाटत असणार.. की बरं आहे.. लोकसंख्या कमी होते.. इथे पण किती फायदा आहे बघा.. लोकं मेल्यामुळे अंत्येष्टी करणाऱ्यांना काम मिळते. आणि ऍकॉनॉमी स्ट्रॉंग होण्यास मदत होते.
बरं इतर प्रोव्हेन्स मधे तयार झालेल्या सिगारेट्स ओढणे हा पण एक गुन्हा समजला जातोय.एका शिक्षकाकडे  स्पेशल टास्क फोर्स ने रेड केली असता त्याच्या कडे ऍश ट्रे मधे  दुसऱ्या ब्रॅंडच्या सिगारेट्सचे बट्स सापडले, म्हणून त्याला फाइन करण्यात आला.

माझ्या लहान पणी एक विचित्र विश्व नावाचं मासिक यायचं त्यातल्या रम्य आणि चमत्कारिक कथा प्रमाणे ही कथा वाटते की नाही?? आणि हे जे वर लिहिलंय ते सगळं खरं आहे टेलिग्राफ मधे न्युज आर्टिकल होतं यावर!खरंच मी ही बातमी  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.telegraph.co.uk/news/newstopics/howaboutthat/5271376/Chinese-ordered-to-smoke-more-to-boost-economy.html)जेंव्हा वाचली तेंव्हा तर अगदी आवाक झालो होतो..  ह्या कम्युनिस्टांचं काही समजत नाही मला तरी…

मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?

Written by  on September 16, 2007

काय वाटेल ते, mahendra kulkarni, kayvatelte.comमाणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना? आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला कल असतो.

आपलं वृद्धावस्थेतलं जीवन सोपं होईल या पैशांमुळे असे वाटत असते आपल्याला. पण खरंच तसं असतं का?   हा जवळ असलेला पैसाच जिवाचा शत्रू बनल्याचे गेल्या पंधरा वीस दिवसातील सहा वृद्धांच्या दिसून येते.

चांगल्या मोठ्या हुद्द्यावर रिटायर झाल्यावर,पैसा गाठीशी असतो, भरपूर पेन्शन असते, आणि मग स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुठलीही बंधन नको  म्हणून स्वखुशीने एकटे रहाणारे   वृद्ध, किंवा दुसरा प्रकार म्हणजे मुलं परदेशी नोकरी निमित्त गेल्याने नाईलाजाने एकटे रहाणारे वृद्ध, किंवा तिसरे म्हणजे निराश्रित वृद्ध.

वृद्ध मंडळींनी एकटे रहाण्यात काही  वावगे आहे असे नाही,पण गेल्या पंधरा दिवसात सहा वृद्धांची  हत्या केल्याची बातमी वाचली,  आणि वृद्धांनी एकटं रहाणं किती अवघड आहे हे जाणवलं.   ” मॅन सपोझेस, ऍंड गॉड डिस्पोझेस” किती खरी आहे -नाही का? आयुष्यभर काट कसर करून जमवलेले पैसे, एक दिवस कोणीतरी कामवाला, कामवाली घेऊन पळून जातो, आणि जाताना  आपण सापडू नये म्हणून त्या वृद्धाचा खून पण करतो.

पोलीस नेहेमी ओरडून सांगत असतात, की घरगडी ठेवतांना त्याची माहिती पोलीस स्टेशनला पाठवून त्याचा शहानिशा करून घ्या, पण तसे कोणी करतांना दिसत नाही, आणि मग शेवटी त्याचा परिणाम असा झालेला दिसतो.

पूर्वीच्या काळी शेजारधर्म होता. शेजारच्या खोली मधे काय सुरु आहे हे चाळीतल्या सगळ्यांना माहिती असायचं. कोणाकडे कोणीही  नवीन माणूस आलेला दिसला   तरी ” तू कॊण रे बाबा? ” म्हणून आवर्जून चौकशी केली जायची. आजच्या फ्लॅट संस्कृती मधे शेजारच्या फ्लॅट मधे कोण रहातं हे पण कोणालाच माहिती नसते. एखाद्या वृद्धाचा खून झाल्यावर त्याच्या डिकम्पोझ्ड शरीराचा वास येणे सुरु झाल्याशिवाय शेजारचा माणूस चौकशी करत नाही.

हे असे लोकं आपल्या सोबतीला म्हणून नोकर ठेवतात. घरकाम करायला वेगळा, स्वयंपाकाला वेगळा आणि सोबतीला वेगळा असे काहीसे स्वरूप असते. कंपॅनियन म्हणतात या नोकरांना. यांच्या आवश्यकता पण वेगळ्या असतात, या नोकरांना टीव्ही, एसी, फ्रीज चा पूर्ण असेस हवा असतो.   आवडीचे प्रोग्राम टिव्हीवर पहाण्याचे स्वातंत्र्य, जे हवे ते खाण्याचे स्वातंत्र्य.. वगैरे वगैरे नोकरीच्या सुरुवातीलाच ठरवून घेतले जाते. हे नोकर दिवसभर कंपॅनियन म्हणून असल्याने सा्रखे घरमालक सोबतच असतात- त्यांना औषध देणं, घरातली फुटकळ कामं करणं एवढंच त्यांचं काम.  सारखे सोबतच असल्याने,   घरातले पैसे काढणे, दाग दागिने काढणे  वगैरे त्यांच्या समोरच केले जाते.  घरात कुठे काय आहे , हे सगळं त्यांना ठाऊक असतं. सुरुवात फुटकळ चोऱ्या पासून होते, आणि नंतर मग …..

सगळ्या फ्लॅट्सच्या सुरक्षेची जबाबदारी वॉचमन या प्राण्यावर असते. हे वॉचमन शक्यतो बिहार किंवा युपी मधले असतात, आणि जवळ पासच्या  कुठल्यातरी झोपडीत रहात असतात. सोसायटी एखाद्या वॉचमन पुरवणाऱ्या कंपनीशी संधान बांधून हे वॉचमन भाड्याने घेते.   ह्या  वॉचमन लोकांना सप्लाय करणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे.     सप्लाय कंपनी  जे वॉचमन सप्लाय करते, ते पण  सगळ्या वॉचमन बद्दल माहिती ठेवत असतील का? हा संशयच आहे .   बरेचदा तर  सोसायटी मधे  रहाणाऱ्या रहिवाशांना अडवण्यापासून तर एखाद्या भिकाऱ्याला/ सेल्स मॅनला  दारावरची घंटी वाजवून त्रास देण्यासाठी  आत सोडण्याचा  मूर्खपणा करतांना हे दिसतात.  याचे कारण म्हणजे जी कंपनी वॉचमन पुरवते ती दर पंधरा दिवसांनी वॉचमन बदलत असते, ज्या मुळे सोसायटीत रहाणारे कोण आणि चोर कोण हेच त्यांना ओळखता येत नाही.

या शिवाय घरात भांडी, धुणे, लादी कामासाठी येणारा नोकर वर्ग वेगळा. या लोकांची एक  स्वघोषितसंघटना असते. यांचे पण काही अलिखित नियम असतात. किती पैसे घ्यायचे, किती काम करायचे, वगैरे वगैरे.. एकमेकाच्या कामावर डल्ला मारायचा नाही वगैरे. चांगला नोकर मिळवणे हे पण हल्ली दुरापास्त झाले आहे. आजकाल घरातले सगळे लोकं काम करण्यासाठी बाहेर जातात. मग घराची किल्ली पण कामवाली कडे दिलेली असते. तिने यायचे आणि आपले काम करून जायचे.

घराची किल्ली एखाद्या नोकराच्या हाती देणं हे हल्ली काळाची गरज झालेली आहे असेही म्हणणारे लोकं दिसतात. पण त्यांनी घरात इकडे तिकडे पसरलेले पैसे, किमती वस्तू वगैरे समोर दिसल्यावर त्या नोकराचा स्वतःवर किती दिवस ताबा राहील? एखाद्याने चान्स नाही म्हणून चोरी न करणे वेगळे, आणि उघडी तिजोरी समोर दिसत असतांना चोरी न करणे वेगळे! घरातल्या वस्तू कुलुपात ठेवणे, घरातल्या नोकरा समोर आपल्या संपत्तीचे प्रदर्शन न करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर थोडा तरी आळा बसेल या गुन्हेगारीला. ..

हल्ली प्रत्येक गोष्टी साठी कॉंट्रॅक्ट लेबर  बोलावण्याची पद्धत  सुरु झालेले आहे. त्या मधे पाण्याचा नळ लिक होणे पासून तर लाईट स्विच बदलणे, सुतार या सगळ्या कामासाठी कॉंट्रॅक्ट लेबर्स सोसायटी मधे येत असतात. या लेबर्स ला कोणी आय कार्ड वगैरे विचारत नाही.   ह्या कामांच्या बुरख्याआड    कोणीही फ्लॅट  मधे येऊन चोऱ्या करू शकतो.

एक लक्षात येतंय, की हल्ली सगळे फ्लॅट मधे  एकेकटे रहाणारे वृद्ध  लोकंच या गुन्हेगारीचे बळी ठरत आहेत. ज्या वेगाने ह्या घटना दररोज पेपर मधे छापून येत आहेत, त्यावरून संशय येतो की हे लोकं एखाद्या संघटित गुन्हेगारीचे मोहोरे तर नाहीत?? सरकार प्रत्येक फ्लॅट स्क्मिला संरक्षण तर पुरवू शकत नाही हे जरी खरं असलं, तरीही सोसायटी मधे कामासाठी येणाऱ्यांचं पोलिस व्हेरीफिकेशन आवश्यक आहे असा कायदा सोसायटीने केला तरच याला आळा बसू शकेल.

मुंबई, वृद्धांनी रहाण्यासाठी सुरक्षित आहे का? याचं उत्तर मला तरी सापडत नाही.

मुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का?

Written by  on September 12, 2007

1065007मुंबई डान्स बार बंद झालेत? छेः अजिबात नाही. आबा पाटलांनी जेंव्हा डान्स बार बंद करण्याचे जाहीर केले होते, तेंव्हा त्यांच्या क्षमते बद्दल, किंवा त्यांच्या मनातल्या चांगल्या विचारा बद्दल अजिबात संशय नव्हता, पण ब्युरोक्रसी, आणि इतर विभाग ज्यांना या मधून मलिदा मिळतो ते सगळे  हे  डान्स बार बंद करणे यशस्वी खरंच होऊ देतील का? ही संशयाची पाल मनात चुकचुकत   होती. या डान्स बार मधल्या एका नर्तिकेच्या करोडॊ रुपयांच्या संपत्ती बद्दल जेंव्हा पेपर मधे सारखे छापून येणे सुरु झाले,, तेंव्हा शरीर विक्रीला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त करून देण्याचा प्रसार माध्यमांचा प्रयत्न वाटत होता तो.

डान्स बार च्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरु होणे, म्हणजे या पूर्वी असे काही नव्हतेच असे नाही. फार फार पूर्वी पासून आपल्या मुंबई मधे ही परंपरा चालत आलेली आहे. गोलपीठा, किंवा पिला हाऊस भागात सुशिक्षित , संभ्रांत लोकांना जायची लाज वाटायची, म्हणून अशा जागांचा शोध सुरू झाला की जिथे या ’सो कॉल्ड उच्चभ्रू लोकांना”पण तोंड चुकवत जावे लागणार  नाही .  एखादा संभावित व्यवसाय शोधायचा ,की त्या व्यवसायाच्या आड हे सगळे धंदे बिनबोभाट चालवता येतील – आणि असा व्यवसाय म्हणजे…..

लोकांच्या या गरजेचा व्यावसायिक उपयोग करून घेतला गेला तो  मुंबई मधे.  ताडदेवच्या एसी मार्केट मधे जवळपास २५ च्या वर डान्स स्कूल सुरु झाले, आणि ह्या संभ्रमित बुरख्याआड वेश्याव्यवसाय पण सुरु झाला. बरेच दिवस हा प्रकार सुरू होता, पण लवकरच या प्रकारा बाबत शिवसेनेने आवाज उठवला, आणि ह्यावर पोलिसांना ऍक्शन घ्यायला भाग पाडले गेले. आणि हे सगळे डान्स स्कूल एका रात्री मधे बंद करण्यात आले.

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात – ही गोष्ट इथे पण अगदी १०० टक्के लागू होते इथे. डिस्को ने याच काळात  बॉलिवूड च्या माध्यमातून प्रवेश केला, आणि मुंबईला पहिला डिस्को सुरू झाला तो ” बुलक कार्ट ” या जे जे स्कुल ऑफ आर्ट्स समोर असलेल्या ठिकाणी.  या ठिकाणी दिवसा कॉलेजेस च्या तरुण तरूणीचा राबता असायचा, तर रात्री……! या डिस्कोची लोकप्रियता इतकी वाढली की दोन तीन महिन्यात सिझर पॅलेस, मयुर पॅलेस, वरळीला ’ हेल’ वगैरे अनेक डिस्को  सुरु झाले. मुंबई मधले टोळी युद्ध त्या काळी तसे आजच्या तुलनेत मधे बाल्यावस्थेत होते, पण त्यांनी पण या डिस्को वर ताबा मिळवणे सुरु केले, आणि या प्रकाराला वेगळेच वळण लागले. मिटींग प्लेस, किंवा पिक अप जॉईंट अशी संभावना या डिस्कोची होऊ लागली.या विरोधात पण शिवसेनेनेच पुन्हा एकदा आवाज उठवला होता, आणि या डिस्को मधे चालणाऱ्या गैर प्रकाराबद्दल पोलिसांना ऍक्शन घ्यावी लागली होती.

डान्स स्कूल झाले, डिस्को झाले,   आता नवीन काय ? तर लेडीज सर्विस बार सुरु झाले. इथे तुम्ही दारू प्यायला गेलात, की तुम्हाला मुली वेटर म्हणून काम करतांना दिसायचा. परदेशात जरी हे अगदी सर्वसामान्य असले, तरी पण भारतात मात्र  ह्या सर्व्हिस चा उपयोग बार च्या वेळे नंतर ’ इतर सर्व्हिस” साठी पण होऊ लागला.पण हा प्रकार काही आपली मूळ  घट़्ट रोवू शकला नाही. कारण गिऱ्हाइके बार बंद होई पर्यंत थांबायला तयार नसायचे, आणि मग त्या मुळे इथे काही हा धंदा जम बसवू शकला नाही.

यावर उपाय? राजरोस पणे करता येणारा धंदा म्हणजे आयुर्वेदिक मसाज पार्लर.  मुंबईला पण बॅंकॉक च्या धरती वर, आयुर्वेदिक मसाज च्या नावाखाली  मसाज पार्लर सुरु  करण्याचे पवच फुटले. पूर्वाश्रमीच्या सगळ्या वेश्या या मसाज पार्लर मधे ’मसाजर’ म्हणून काम करू लागल्या. मसाज म्हंटले की अंगावरचे कपडे उतरवणे आलेच, मग त्या मुळे  या ’ आयुर्वेदिक मसाजच्या धंद्याच्या आड शरीर विक्रयाचा धंदा अगदी बेमालूम पणे चालायचा.

चांगल्या वस्ती मधे असलेले हे मसाज पार्लर्स म्हणजे वेश्यांचे अड्डे झाले होते.दिवस भरात केंव्हाही लोकांना येता यायचे, आणि हवी ती सर्व्हिस घेऊन अर्ध्या पाऊण तासात मोकळे होऊन बाहेर पडता यायचे.  त्यातही फुल सर्व्हिस (?) मसाज पार्लर्स  थोडे जास्त पॉप्युलर  आहेत. सगळेच मसाज पार्लर्स असे जरी नसले, तरी पण बहुसंख्य (९९ टक्के तरी) याच प्रकारात मोडणारे होते. हे असे मसाज पार्लर्स आजही जागोजागी दिसतात, फक्त वर नावं वेगळी असतात. जी गोष्ट तुम्हा आम्हा सारख्या सामान्य लोकांना उघडपणे दिसते, ती पोलिस विभागा पासून कशी काय लपून राहू शकते? हा प्रश्न आहेच.

हेच ते पार्लर. या बद्दल मोठी बातमी आली होती एनडी टिव्ही वर . फोटो एन्डीटिव्ही च्या साईट वरून घेतलायकाही ठिकाणी काळ्या काचा असलेले युनीसेक्स सलून पण सुरु झालेली आहेत. तिथे काय चालत असेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. हा व्यवसाय आजही मुंबई मध्ये अगदी उघड पणे सुरु आहे. अशा बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी छापे पण घातले होते. नुकताच कुलाब्याच्या एका  ब्युटीपार्लर (?) वर पण छापा घातला होता.

भारता मधे किंवा जगात कुठेही वेश्या व्यवसाय हा  बेकायदेशीर नाही. आपल्या कडे असा एक समज आहे, की पिला हाऊस भागात, ” त्या ” घरांवर असलेले नंबर्स हे लायसन्स नंबर्स आहेत. पण तसे नाही. या व्यवसायासाठी लायसन्सची गरज नाही. अगदी कोणीही हा व्यवसाय करू शकतो. जर असे आहे, तर मग अशा मुलींना बरेचदा पोलिसांनी अटक केली म्हणून आपण जे वाचतो ते काय असतं? तिला वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपाखाली नाही तर “सप्रेशन ऑफ इमॉरल ट्राफिक ऍक्ट ” च्या कलमाखाली अटक केली जाते.

या ऍक्ट मधे काय आहे?भारता मधे अल्पवयीन मुलींना या व्यवसायात आणणे हे कायद्याविरुद्ध आहे. तसेच , अशा काही मुलींना एकत्र ठेऊन त्यांचा वापर “धंद्यां” साठी करून पैसे कमावणे , स्त्री ची दलाली करून तिच्याकडून पैसे घेणे, किंवा एखादी मुलगी शरीर सुखासाठी विकत घेणे  हा  पण कायद्याने गुन्हा आहे.  आपण जे काही बातम्यांमधे वाचतो ते सगळे या आयपीसी कोड खाली बुक झालेले गुन्हे असतात. वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपा खाली   नाही.

मध्यंतरीच्या काळात,कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून  ’कॉल गर्ल’ची संकल्पना सुरु झाली. परदेशात असणार ही सर्व्हिस भारतात का नसावी?गिऱ्हाइकाने वेश्यांकडे जाण्या ऐवजी, तिलाच आपल्याला हव्या त्या ठिकाणी बोलवायचे, अशी ही पद्धत! तुम्ही फोन करायचा, आणि मग ती मुलगी तुम्हाला हव्या त्या ठिकाणी येईल. असे असंख्य फोन नंबर्स शेअर केले जायचे – अगदी खास प्रायव्हेट नेटवर्क द्वारा.

पूर्वीच्या काळी लपून छपून चालणारा हा कॉल गर्ल्स चा धंदा हल्ली अगदी उघडपणे सुरु झालेला आहे. मुंबईला तर जागो जागी जाहिराती लावलेल्या दिसतात ” घरी मसाज साठी बोलवा… हा फोन नंबर…. ” किंवा पेपर मधे पण अगदी उघडपणे जाहिराती दिसून येतात. फ्रेंडशिप क्लब च्या नावाने वेश्या व्यवसायाचे लोण पण सुरु झालेले आहेच. पेपर मधे जाहिरात दिलेली असते, की अमुक अमुक फ्रेंड्स क्लब चे सभासद व्हा म्हणून. नंतर कुठल्यातरी बॅंकेचा अकाउंट नंबर दिला जातो, तिथे तुम्ही पैसे भरले की तुम्ही सभासद होता, आणि मग त्या सगळ्या वेश्यांचे नंबर्स वगैरे तुम्हाला दिले जातात.

हा लेख मी का लिहायला घेतला असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल. परवाच आमचे ’आय एस ओ ’चे रिव्हॅलिडेशन ऑडिट पार पडले. मग सगळं काही व्यवस्थित झालं, म्हणून आम्ही सगळे सिलेब्रेशन साठी म्हणून चेंबुर मधल्या एका बार मधे गेलो. तिथे गेल्याबरोबर, जे काही दिसले,  ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. डान्स बार आबा पाटलांनी बंद केला म्हणून ऐकले होते , पण इथे तर राजरोस पणे सगळे सुरु होते! असो. तिथला प्रकार बघून तिथून सरळ बाहेर पडलो आणि दादरच्या प्रितम मधे गेलो, आणि सिलेब्रेट केले.

नंतर  नेट वर शोध घेतल्यावर या डान्स बार बंदी नंतरही हे बार सुरु आहेतच याचे प्रुफ म्हणजे शेकडॊ व्हिडिओ अपलोड केलेले सापडले..

हे असे अनेक व्हिडीओ आहेत. हा नुकताच म्हणजे २०१२ चा व्हिडिओ!
शेवटी जाता जाता एक विचार मनात आला, की स्वतः आबा पाटलांनी लक्ष घालूनही हे डान्स बार बंद होत नाहीत, याचा अर्थ ब्युरोक्रसी नेत्यांपेक्षा  पण  जास्त ताकतवर झालेली आहे असा होत नाही का?असो. इती लेखन सीमा.

पावागढ..

Written by  on September 7, 2007

पावागढ मंदीराचा कळ्स.

ह्या फोटो मधे काय दिसतंय ? एक मंदीराचा कळस? मग त्यात इतकं विशेष काय- असे कळस तर जागोजागी दिसतात.  एखाद्या सामान्य मंदिराचा कळस असता हा तर त्यावर इथे  लिहायला घेतलं नसतं. पण थोडी विचित्र गोष्ट नजरेला पडली  ह्या ठिकाणी म्हणून इथे – मंदीर आणि त्याच्या कळसावर असलेले पीर बाबाचे मजार सदृष खोपटे.. मंदीराच्या कळसावर एका मुसलमानाचे समाधी ( समाधी योग्य शब्द होईल की नाही ते माहीत नाही)  कशी काय असू शकेल? एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं किती कठीण असतं नाही? पण ते तसं इथे आहे.

पावागढ! गुजराती लोकांची आवडती देवी. गरब्याच्या नाचात हिचा बरेचदा उल्लेख येतो.  हिंदूंच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हे. पावागढला अंबाजी पर्वत  पण  म्हणतात. अशी आख्यायिका आहे की, महाशक्ती पार्वती देवीच्या शरीराचे ५१ भाग झाले होते, शंकर ते घेऊन आकाशमार्गे  जातांना त्यातला ह्रदयाचा भाग इथे या डॊंगरावर पडला म्हणून हे शक्ती पीठ इथे तयार झाले.

ही जागा तसं म्हंटलं तर खूप उंचावर आहे. वर जायला रोप वे ची व्यवस्था आहे.  रोपवे ने गेलो तर फार तर ४-५ मिनिटेच लागतात.  वर जायला पूर्वीच्या काळी रस्त्याने , काही ठिकाणी असलेल्या पायऱ्यांनी जावे लागायचे. कुठलेही वाहन वरपर्यंत जात नाही . आजही बरेच भक्त गण हे रोपवे ने न जाता पायी वर जातात. पायी जायला किती तास लागत असतील  बरं??

आम्ही अर्थात कारने वर गेलो. एका ठरावीक अंतरावर पोहोचल्यावर उडनखटोला (रोप वे ट्रॉली चे स्थानिक नांव) स्टॅंड वर जाऊन रोपवेने सरळ वर गेलो. तिथे  वर पोहोचल्यावर पण  मंदिरापर्यंत पोहोचायला बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात, तसेच  जातांना रस्त्याने बरीच जैन मंदीरं ( प्राचीन ) दिसतात. काही ठिकाणी डागडुजीचे काम सुरु असलेले दिसत होते.प्रत्येक मंदिरापाशी थांबून दर्शन घेत आम्ही पुढे निघालो. खूप जुने असलेली ही मंदीरं अजूनही चांगल्या स्थिती मधे आहे.  इतकं असूनही एकाही जैन मंदीरात कोणी जातांना दिसत नव्हतं.पर्वताच्या खाली चापानेरला मुस्लिम साम्राज्य असतांना पण ही हिंदू आणि जैन मंदिरं चांगली कशी टिकली  असावी हा प्रश्न सारखा डोक्यात येतच होता?

रस्त्याने वर जातांना दोन्ही बाजूला फोटोग्राफी, खाद्यपदार्थ, आणि इतर दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. आमच्या बाजू बाजूने बरीच गाढवं चालत होती. प्रत्येकाच्या पाठीवर असलेली पोती, मुकाट्याने वाहून नेत होती ती. इथे वर या दुकानासाठी सामान आणण्यासाठी एकच ट्रान्सपोर्ट अव्हेलेबल आहे, ते म्हणजे गाढव.केरोसिन पासून तर खाद्य पदार्थ किंवा गॅस सिलेंडर सगळं काही गाढवांच्या  पाठीवरून आणलं जातं. थोडं पुढे गेल्यावर या गाढवांच्या साठी विश्रांतीची जागा पण खास  तयार करून ठेवली आहे. गाढवं आहेत म्हणून सगळं नीट चाललंय – हा विचार मनात आला, आणि खदखदून हसू फुटलं. कुठल्याही क्षेत्रात, नौकरी करतांना वेळोवेळी भेटलेली गाढवं आठवली 🙂

गाढवांबरोबर मी स्वतःला नेहेमीच कोरीलेट करत असतो. गाढवाला ’वैशाख नंदन’ म्हणतात. म्हणजे वैशाखातल्या उन्हातही आनंदी रहाणारा प्राणी.याच संदर्भात  एक कहाणी अशी पण सांगितली जाते – एकदा वैशाख महीन्यात एक गाढव  माळरानावरून जात होता, त्याने मागे वळून पाहिले, तर त्याला मागे  एकदम वैराण माळ रान दिसलं. एकही गवताचं हिरवं पातं नाही किंवा काहीच शिल्लक नाही असे…  आमचे गाढव एकदम आनंदी झालं की राव  , त्याला वाटतं की मागचं सगळं हिरवं गवत आपणच सगळं खाऊन टाकलंय ! तर म्हणून वैशाख नंदन. मान्य करायला हवंच , की नोकरी मधे  आपणही वैशाख नंदना प्रमाणेच वागतो- कळत किंवा नकळत…!!

सगळ्यात जास्त दोन्ही बाजूला असलेली फोटोग्राफर्सची दुकान पाहून मजा वाटत होती. अहो काय नाही त्या दुकानात?? मोटरसायकल, कार, मागे बॅकड्रॉपला पावागढचा सिन, किंवा देवीदेवतांचे मोठे फोटो.. काय वाट़्टेल ते होतं तिथे. पण सगळ्यात ग्रेट म्हणजे पांढरा वाघ !! वाघावर बसून पण फोटो काढून घ्या… देवी प्रमाणे.. लहानपण पुन्हा एकदा जगतोय असं वाटायला लागलं- आणि खूप आनंद झाला . ही अशी दुकानं नेहेमी जत्रेमधे पहायला मिळायची मी लहान असताना.

एकदाचा वर पोहोचलो. पण अजुन बऱ्याच पायऱ्या बाकी होत्या.  लहान असलेल्या पायऱ्यांवर खूप गर्दी होती. कसातरी कण्हत कुथत वर पोहोचलो. पुन्हा एकदा ठरवलं, की आता वजन नक्की कमी करायचंच.. च्यायला, किती त्रास होतो या वजनाचा.

पुढे मंदिरा मधे रांग होती. कोणीतरी मधेच रांगेत घुसत होता. तेंव्हा रांगेतले लोकं मात्र मोठमोठ्याने अंबे…….. करून ओरडत होते आणि आपली नापसंती दर्शवत होते.कोणी म्हणत होतं की ” अरे कमीत कमी देवाच्या ठिकाणी तरी आपली शिस्त पाळा”. मधेच कोणीतरी म्हणायचं, “जाऊ दे, त्याला देवी बघुन घेईल काय आहे ते.. त्याला देवीचं दर्शन फळणार नाही बघ” .. तो पुढे गेलेला माणूस जर कोडगा असेल तर याकडे दुर्लक्ष करायचा, पण एखादा पापभिरू मात्र पुन्हा रांगेत मागे रांगेच्या शेवटी जाउन उभा रहायचा दर्शनाला. खरं तर फार गर्दी नव्हती, तरी पण असे प्रकार सुरु होतेच..माझ्या रांगेतून जाऊन घेतलेल्या दर्शनाला फारतर दहा मिनिटे लागली असावी.:)

बाहेर पडलो, तर काही लोकं मंदिराच्या कळसाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर चढतांना दिसले. एकाला विचारलं, की काय आहे वर? तर तो म्हणाला की वर एक मजार आहे . मंदीराच्या कळसावर मजार म्हंटल्यावर बसलेला अनपेक्षित धक्का झेलत मी पण वर निघालो.  कळसावर एका लहानशा खोपट्यात काही फोटो वगैरे ठेवले होते, एक माणुस मोर पिसांचा पंखा घेऊन उभा होता.लोकांना लवकर चला म्हणून म्हणत होता. अतिशय कमी असलेल्या जागेतला तो माणसांचा कल्ला नकोसा वाटत होता मला तरी!

एक कोणीतरी मुस्लिम देवीचा भक्त होऊन गेला. तो मंदिरात रहायचा आणि म्हणून त्याच्या मृत्युनंतर त्याची समाधी मंदिराच्या कळसावर बांधलेली आहे असं म्हणतात. तिथे गेल्यावर देवीच्या दर्शनानंतर  वरच्या मजारचं दर्शन घेतल्याशिवाय   दर्शन पुर्ण होत नाही असं म्हणतात. लोकं ज्या भक्ती भावाने देवीला हात जोडतात, त्याच भक्ती भावाने त्या त्या मजार पुढे पण नतमस्तक होत होते. त्याला मजार म्हणणे पण त्याला योग्य होणार नाही, कारण वर समाधी वगैरे काही नाही, फक्त एक खोपटं आहे, आणि त्यामधे ठेवलेले फोटो !

वर जातांना दोन्ही बाजूंच्या कठड्यांना बांधलेला प्रत्येक   लाल कपडा, दोरा , कुठल्या ना कुठल्या माणसांच्या तृप्त झालेल्या आशा आकांक्षाची कहाणी सांगत होते. एका कपड्याला उगाच हात लावला- बरं वाटलं, एक पॉझीटीव्ह थिंकींग… की हा कपडा म्हणजे कोणाची तरी इच्छा पुर्ण झाल्याचे प्रतीक आहे म्हणून.

नौकरी मधे काय मिळवलं ?

Written by  on September 4, 2007

प्रत्येकालाच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून  नोकरी किंवा धंदा करावाच लागतो.आता पोटापाण्याचा म्हट्ल म्हणजे पैशासाठीच नोकरी करतो प्रत्येक जण. पैशा व्यतिरिक्त काही मिळू शकतं का नोकरीतुन??   मी गेली २७ वर्ष नोकरी करतोय. बरेचदा असंही वाटतं की आता रिटायरमेंट नंतर पुढे काय? तसा अजुन बराच वेळ आहे रिटायरमेंटला. पण  तरीही हा प्रश्न सतावत  असतो. गेल्या सत्तावीस वर्षातील  नोकरी ने मला काय दिले?? पैसा?समृद्धी? नांव लौकिक?? ओळख??? काय दिलं मला या इतक्या वर्षांच्या  नोकरीने??? ह्या सगळ्या गोष्टी तर  नोकरी मधे अनुभव आणि अधिकार तर आपोआपच येतात.

वय वाढलं की राजू चा राजाभाऊ होणं किंवा बाळ चा बाळासाहेब होणं , माधव चा माधवराव होणं, हे जितकं साहजिक असतं , तितकंच हे नोकरी मधली प्रमोशन्स, इन्क्रिमेंट्स, आणि त्या प्रमाणात मान, हा वाढणं सहाजीक असतं असं मला वाटतं. म्हणूनच नोकरीने मला काय दिलं ह्या प्रश्नापेक्षा मी स्वतः नोकरी मधे काय मिळवलं?? हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो .

ह्या प्रश्नाचं उत्तर  शोधायचा प्रयत्न केला तर  अगणित प्रश्नांची मालिका मात्र डोळ्यासमोर उभी राहिली. मला खरंच काही सुचत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर! कदाचित समज कमी पडत असेल. आता नोकरी मधे पैशा शिवाय काय मिळतं?? जॉब सॅटीस्फॅक्शन?  छेः.. हे तर अगदी सामान्य उत्तर झालं..  काय बरं मिळवलं असावं मी???

सुरुवातीची तीन वर्ष प्रॉडक्शन डिपार्टमेंटला शॉप फ्लोअर वर काम केलं होतं.  नुकताच कॉलेजमधून बाहेर निघालो होतो, जगाची ओळख नव्हती. तेंव्हा शॉप फ्लोअरवर वडिलांच्या वयाच्या लोकांकडून कामं करुन घेतांना खुप विचित्र वाटायचं. बरं ते सगळे बेरकी लोकं अगदी पोहोचलेले होते – एखादं काम सांगितलं की ते का होऊ शकत नाही हे सांगण्याकडे जास्त कल असायचा.  आमच्या सारख्या नविन लोकांना अगदी कोळुन प्यायचे, पण तेवढ्यात  सिनिअर इंजिनिअर आला आणि त्याने पण तेच काम सांगितलं तर अगदी न कुरकुरता तेच काम पुर्ण करायचे.!! तेंव्हाच  पहिली गोष्ट शिकलो, ती ही की इथे नोकरी मधे वयापेक्षा पोस्ट महत्वाची. फक्त एखाद्याचे पांढरे केस असले म्हणून त्याला जास्त   रिस्पेक्ट  दिला तर तो डोक्यावर पण बसू शकतो.

कधीच कोणाला मी कामाच्या निमित्याने खूप फिरणं झालं. सुरुवातीच्या काळात तर पुर्वांचला पासून तर दक्षिण भारता पर्यंत सगळ्या भागात फिरावं लागायचं. तेंव्हा सगळा प्रवास हा रेल्वेनेच करावा लागायचा. फक्त मॅनेजर्स लोकांना विमान प्रवास करणे  हे कंपनीच्या नियमात बसत होते. सगळ्यात प्रवास कंटाळवाणा व्हायचा तो मुंबई ते कलकत्ता. प्रवासात शेजाऱ्यांशी गप्पा मारणे हे मला तरी कधीच जमले नाही. स्वभाव संशयी, आणि नुकतीच वडिलांच्या चुलत भावाला काही तरी गुंगीचं औषध खाउ घातल्याची घटना, आणि त्याचा त्यात झालेला मृत्यु मुळे असेल, पण आजही मी प्रवासात कधीच कुणाशी ओळख वाढवायचा प्रयत्न करित नाही.

माझं आजही असं मत आहे , की प्रवासातल्या ओळखीचा कधीच काही फायदा नसतो, लोकं विनाकारण एकमेकांना नांव पत्ता, फोन नंबर देतात-आयुष्यात  कधीही न भेटण्यासाठी!! प्रवास व्हायचा कंटाळवाणा, मग पुस्तकं वाचणं हाच एक उपाय असायचा. प्रवासात हेरॉल्ड रॉबिन्स,इर्विंग वॅलेसची सगळी पुस्तकं वाचायचो तेंव्हा मी. समोरच्या सोफ्यावर दोन उषा आडव्या लाउन एखादं बेस्ट सेलर वाचणे हा तर माझा अगदी लहानपणापासूनचा छंद होता.. इथे त्याला खत पाणी मिळालं!!

जेफरी आर्चर पण खुप वाचला. त्याचं ’नॉट अ पेनी मोअर – नॉट अ पेनी ले” अगदी लक्षात रहाण्या सारखं पुस्तक आहे.’.केन ऍंड एब” आणि त्याचा सिक्वेल ’प्रोडिगल डॉटर”पण कलकत्ता प्रवासातच वाचलं होतं. वाचनाची आवड होतीच, पण ती पुन्हा जास्त वाढली.. प्रवासामुळे!!प्रवासात वाचलेली काही पुस्तकं तर अजूनही आठवतात. स्फिंक्स, फाउंटन हेड ही दोन्ही पुस्तकं  अशीच आठवणीत राहिलेली. तेंव्हा जी वाचनाची आवड लागली , ती आजपर्यंत टिकुन आहे.

म्हणतात ना, “वाचाल तर वाचाल”. मला वाचायला काही पण चालतं- पण शक्य तो नवीन मधला जॉन ग्रिश्म,  आणि जुन्यातला  रॉबर्ट लुडलुम  (बोर्न सिरिजनी तर वेड लावलं होतं राव! काय लिहायचा हा माणुस, जेंव्हा वारला तेंव्हा खूप वाईट वाटलं. त्या पब्लिकेशन हाऊसने त्याच्या नावाने नंतर पण काही पुस्तकं प्रसिद्ध केलीत.. असो.. )  मला वाटतं की माझी वाचनाची आवड जोपासायला माझी फिरतीची नोकरीच कारणीभूत ठरली.

वाचनाची आवड वाढली.. आणि सोबतच , जितकं जास्त वाचत गेलो, तितकं जास्त एकलकोंडा होत गेलो.पुण्याला  असतांना गुरुवारी सुटी असायची, पण त्या दिवशी पण लायब्ररीतुन आणलेलं पुस्तक वाचत दिवस भर प्डून रहाणं मला बरेचदा आवडायचं. नंतर थोड्या दिवसांनी एका नवीन मुलाशी ओळख झाली . तो अगदी हार्ड कोअर ट्रेकर.. मग त्याच्यामुळे ट्रेक्स ला जाउन,  ट्रेकिंगची आवड निर्माण झाल्यावर मात्र बरेच मित्र झाले, आणि मग गुरुवारी रुमवर बसून वाचत   रहाणे सुटले…

एकदा साईटला पोहोचलो की मग बरेचदा कस्टमरशी ओळख वगैरे झाल्यावर काही कस्टमर्स तर पर्सनल फ्रेंड्स बनले. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण मला गेली २३ वर्ष  आमचे एक जुने कस्टमर आहेत,  सिलिगुडी जवळच्या एका टी गार्डनचे मॅनेजर ,  श्री अग्रवाल म्हणुन- त्यांच्या साईटला मी २३ वर्षापुर्वी गेलो होतो  आणि तेंव्हा दोन तीन दिवस एकत्र राहिलो – त्या नंतर त्यांच्याशी एकदा पण भेट झाली नाही ,पण आजही ते   न चुकता नव वर्षाला ग्रिटींग पाठवतात आणि फोन करतात.. तसाच एक गोहातीचा मनोज.. असे अनेक लोकं खूपच अंतरंगातले मित्र झाले. इतकी वर्ष झाली पण अजूनही मी बऱ्याच लोकांशी  संपर्कात आहे.  भरपूर मित्र!!! मला वाटतं हेच मिळवलं मी पैशा व्यतिरिक्त माझ्या नौकरीमधे.

प्रवास खूप झाला. आणि प्रवासाने शहाणपण येतं असं म्हणतात…  मला ते आलं नाही असं वाटतंय हल्ली.. कारण सौ. आणि मुली- बाबा तुम्हाला काहीच समजत नाही असं म्हणत असतात  . 🙂

नोकरी च्या निमित्याने जेंव्हा वॉरंटी पोर्टफोलिओ पण सर्व्हिसचा भाग म्हणुन सांभाळावा लागला, तेंव्हा ’ नाही ’ कसं म्हणायचं हे शिकलॊ. ज्या मशिन्स आम्ही विकतो त्यांची किंमत ५ लाख ते ५० लाख कितीही असू शकते. तेंव्हा एखादा पार्ट फेल झाला की वॉरंटी ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाच. बरेच कस्टमर्स मित्र पण झालेले असतात. तेंव्हा त्यांना ’फेल्युअर वॉरंटबल  नाही’ हे म्हणण्याचा स्पष्टवक्ता   पणा आवश्यक असतो. आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की, माझ्या अशा स्पष्टवक्तेपणामुळे कोणा्शीच  मैत्रीत फरक पडला नाही. नोकरी आणि मैत्री वेगवेगळ्या कंपार्टमेंट्स मधे ठेवायला शिकलो ..

मध्यंतरी ची काही वर्ष मार्केटींग मधे काम केलं. तेंव्हाचा अनुभव पुर्णपणे वेगळा होता.लोकं भेटायला बोलवायचे अन तासन तास बसवुन ठेवायचे- अगदी अपॉइंटमेंट घेउन गेल्यावर सुध्दा.मी पण अगदी शांतपणे एखादं पुस्तकं काढून वाचत बसायचो. ह्या अशा वेटींग मुळे मी नेहेमी स्वतःला सेल्स इंजिनिअर नाही तर इंजिनिअर इन रिसेप्शन/ कॉरिडॉर असे म्हणायचो.या सगळ्या प्रकारामुळे सोशिकपणा मात्र नक्कीच अंगी वाढला  . मान – अपमानाच्या कल्पना बदलल्या . कोणी बोलावून भेटलं नाही तरी पण डिस्टर्ब होत  नाही मी ! एखाद्या पार्टी मधे एखाद्या मित्राने, किंवा कलीगने इग्नोअर केलं किंवा एखाद्या वेळेस बॉस ने समोर बसवून ठेऊन स्वतःचं काम करणं सुरु ठेवलं, तरी राग न येऊ  देता शांत रहाणं शिकलो मी… थोडक्यात काय तर  एखाद्या सुने प्रमाणे सोशिकपणा वाढलाय.

मूळ स्वभाव किती बदलू शकतो नोकरी मुळॆ?? माझा स्वभाव ऍरोगंट आहे हे तुम्ही आजपर्यंतच्या माझ्या पोस्ट वरुन ओळखलंच असेल- एखाद्याशी भांडण झालं  आणि  जर झी चुक नसेल तर कोणाही पुढे नमतं न घेण्याचा स्वभाव आहे माझा.मित्र म्हणतात, मी खूप ऑफेन्सिव्ह आहे. ( खरं आहे का ते मला माहिती नाही) .  पण.. आता उद्धट पणे प्रत्युत्तर देणं,रागीट आणि  एकलकोंडा असा  हा  माझा मुळ स्वभाव खुप सोशल झालाय – ह्याची जाणिव होते जेंव्हा विचार करतो की मी काय मिळवलं या नौकरी मधे  हा विचार केला तर!!!अर्थात अधूनमधून पुन्हा  पूर्वीचा मुळ स्वभाव डोकं वर काढतो, पण त्याला काही उपाय नाही.. खरं ना??

सुला वाइन्स!

Written by  on September 3, 2007

कसारा घाट, नाशिक

मुंबई ते नाशिक प्रवास आजकाल खूपच सोयीचा झालेला आहे. चारपदरी रस्ता, आणि नुकताच पाउस पडून गेल्याने तयार झालेली मस्त पैकी हिरवळ.   पावसाळ्यात मुंबई ते नाशिक प्रवास हा मस्त अनुभव असतो. घाटन देवीला म्हणजे घाटाच्या सर्वोच्च भागात पोहोचलो की धुक्यामुळे अगदी दोन फुट अंतरावरचं पण काही दिसत नाही. हवेतला दमटपणा अनुभवायला खिडकी खाली केली की बाहेरचे ढग कार मधे येतात, की एकदम त्यांना कवेत घेतलंय  असे वाटते. तो कुंद दमटपणा श्वासात भरून घेतला की मस्त वाटतं. एका जागेवर कार थांबवून थोडा ब्रेक घेतल्याशिवाय पायच निघत नाही तिथून. पावसाळ्यात कसारा घाटातला प्रवास मनापासून आवडतो मला.

सुला वाइन्स, नाशिक, महेंद्र कुलकर्णी, काय वाटेल ते , http://kayvatelte.com

सुला वाइन्स – टिपीकल फ्रेंच वायनरी सारखी अरेंजमेंट आहे

अंतर फार नव्हतंच, आम्ही दहापंधरा मिनिटातच त्या वायनरी मधे पोहोचलो.  आता मी वायनरी म्हंटलं आणि तुमच्या डोळ्यापुढे त्या   वाईन महोत्सवा मधे ओक कास्क मधे पायाखाली द्राक्ष तुडवणाऱ्या मुली आल्या असतील. खोटं कशाला सांगू मी पण जेंव्हा तिथे पोहोचलो, तेंव्हा पासूनच तो द्राक्ष पायाखाली तुडवायचा लाकडी घंघाळ(ओक कास्क) कुठे दिसते ते शोधत होतो 🙂 अर्थात सापडला नाही तो- किती भ्रम निरास 😦

द्राक्ष क्रश करायचं मशिन.. आणि ओक कास्क्स ( इम्पोर्ट केले जातात) ओक कासक मध्ये मॅचुअर केलेली वाइन खूप टेस्टी असते असे म्हणतात. जितकी जास्त मॅच्युअर तितकी जास्त महाग.

काय वाटेल ते, महेंद्र कुलकर्णी, मराठी, द्राक्षं

द्राक्षं स्वच्छ करुन इथे कन्व्हेअर द्वारे क्रशिंग मशिन मधे पाठवले जातात.

सुला वाइन्स, महेंद्र कुलकर्णी, मराठी, mahendra kulkarni

जुन्या काळी वापरण्यात येणारं व्हिंटॆज ग्रेप क्रशिंग मशिन ( फ्रान्स मधे पुर्वी अशी मशिन्स वापरली जायची )

सुला वाइन्स! भारतीय वाइन ला प्रतिष्ठा मिळवून देणारी माणसं – असं म्हंटलं की एका वाक्यात ओळख करुन देता येते. समोर आत शिरल्यावर एक युरोपीयन स्टाइलची इमारत  लक्ष वेधुन घेत होती. समोर लाकडी कास्क एका स्टॅंड वर रचून ठेवलेले होते. आज पर्यंत केवळ इंग्रजी सिनेमामधे वाइन मॅच्युअर करण्याचे कास्क पाहिले होते, ते प्रत्यक्ष पाहिले. वायनरीचे मेंटेननस इंजीनिअर विलास सोनावणे समोर दिसले. त्यांची ओळख करून दिली डीलरने. थोडा वेळ कामाचं बोलणं झालं, आणि नंतर त्यांनी म्हंटलं की चला, तुम्हाला वाइन तयार करण्याची प्रोसेस दाखवतो.

मला नेहेमी वाटायचं की शेतकऱ्यांची मज्जाच मज्जा असते. द्राक्षं चांगली निघाली पिकली की विकायची, आणि आपली नेहेमी   द्राक्षं सडली की त्याची वाइन बनवयला विकायची- पण तसे नाही. द्राक्षं सडली की सरळ फेकुनच द्यावी लागतात. वाइन ही नेहेमी कच्च्या द्राक्षांचीच बनवली जाते. इतकी कच्ची असतात ती द्राक्ष, की  तुम्ही तोंडात पण धरू शकणार नाही इतकी आंबट असतात.  वाईनच्या  द्राक्षांची वेगळीच लागवड केली जाते.  द्राक्ष कच्चे असतांना   पिकण्यापूर्वीच तोडून वाइन साठी आणले जातात.

वाइन   साठी लागणारी वेगळ्याच जातीची द्राक्षं  आणि त्याचं बियाणं    फ्रान्स हून आणण्यात आलेलं असतं. हे बियाणं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ( म्हणजे वायनरीशी जोडलेल्या) शेतकऱ्यांना दिलं जातं.शेतकऱ्यांकडून  सगळं उत्पादन हे वायनरी विकत घेते -म्हणजे शंभर टक्के कॅश क्रॉप झालं की हे!

विलास सोनवणे यांनी पुर्ण प्लॅंट दाखवला. सुरुवात केली ती क्रशिंग युनिट पासून. एकदा द्राक्षं आली की ती इथे कन्व्हेअर वरुन क्रशिंग करता पाठवली जातात.समोर मोठ मोठे विस हजार लिटरचे बॅरल्स – त्या मधे क्रश केलेल हे द्राक्ष साठवले जातात. थोड्या थोड्या वेळाने सेल्फ जनरेटेड अल्कोहल आणि इतर बऱ्याच गोष्टी चेक केल्या जातात. थोडी जरी चूक झाली की सगळं म्हणजे ते विस हजार लिटर वाइनचं व्हिनेगर होऊ शकतं. खूपच क्रुशिअल काम आहे हे. ह्या प्रोसेसचे फोटो वर दिलेले  आहेत.

वाइन
वाइन साठवण्याचे बॅरलस.वाइन अशा बॅरल्स मधे साठवून ठेवली जाते.
वाइन, महेंद्र कुलकर्णी

सगळ्या वाइनचं तापमान सारखं रहावं म्ह्णून मुद्दाम एका पंपाने सगळी वाइन त्या सिलेंडर मधे फिरवली फिरवली जाते ज्यामुळे वाइन खराब होत नाही.

रेड वाइन तयार करतांना सालं ठेवली असतात काही दिवस, नंतर मग या फिल्टर मशिन द्वारे ती सालं काढून टाकली जातात.

थंडपणा सगळीकडे सारखा रहावा म्हणून सिलेंडर्स मधली वाइन ही पंपाद्वारा रिसर्क्युलेट केली जाते. बरं एक गोष्ट सांगायची राहूनच गेली , द्राक्षांचा फक्त रस इथे ठेवला जातो, ज्या पासून व्हाईट वाइन, आणि स्पार्कल तयार केली जाते. स्पार्कल म्हणजे शॅंपेन. पण शॅंपेन हे ब्रॅंड नेम असल्यामूळे स्पार्कल हे नांव वापरले जाते. इथे तयार होणारी शॅंपेन खूप उच्च दर्जाची असते, म्हणूनच इंटरनॅशनल मार्केट मधे पण ही वाइन विकली जाते. रेड वाइन तयार करतांना काळ्या द्राक्षांचा रस हा साला सहित ठेवला जातो. नंतर ठराविक वेळाने तो रस फिल्टर करुन त्यातली सालं काढून टाकली जातात. पण व्हाईट वाइन साठी सालं अजिबात चालत नाहीत.

एकदा वाइन व्यवस्थित तयार झाली (म्हणजे अल्कोहल पर्सेंटेज जितकं हवं तितकं आलं ) की तिचे टेम्प्रेचर हे मायनस ४ डिग्री पर्यंत मेंटेन केले जाते. हे जे मोठ मोठे सिलेंडर्स दिसताहेत ते टेम्परेचर मेंटेन्ड रहावे म्हणून संपुर्ण पणे इन्सुलेट केलेले आहेत.खूप मोठा रेफ्रिजरेशन प्लांट लागतो या कामासठी.

महेंद्र कुलकर्णी, काय वाटेल ते,

वाइन बाटली बंद केली जाते , मार्केटला पाठवण्यासाठी. चित्रं सौजन्य सुला वाइन्स.

वाइन बॉटल्स रेडी फॉर मार्केट..

तयार झालेली वाईन मग बाटलीबंद करुन लेबलींग करुन मार्केटला पाठवली जाते. मार्केटला पाठवण्यापुर्वी बाटली मधली वाइन खराब होऊ नये म्हणून त्या मधे काही अ‍ॅडीटीव्ह्ज मिसळले जातात. स्पार्कल मधे गॅस ( कार्बन डाय ऑक्साईड) पण मिसळला जातो.   ते बुच उंच उडायला हवे नां, बाटली उघडली की – म्हणून.:)  पण इतकं सोपं काम पण नाही ते. थोडा जास्त गॅस, आणि बाटली फुटू पण शकते.

विलासने सांगितले की हा प्लॅंट अगदी फ्रान्स मधल्या एखाद्या प्लॅंट सारखाच बनवलेला  आहे. वाइन फर्मंटेशन  करण्याची जागा, ते अगदी वाइन टेस्टींग एरीया पण अगदी एखाद्या आंतराष्ट्रीय प्लांट सारखा बनवलेला आहे.

वाइन, चिझ, ऑलिव्ह.. ग्रेट कॉम्बो… चिझ दोन प्रकारचं होतं बहुतेक डॅनिश चिझ असावं.

वाइन, वाइन चॉकलेट्स..

सगळ्यात जास्त एंजॉयेबल पार्ट… धुंद हवा, वाइन चा ग्लास, आणि मागे द्राक्षाच्या बागा.. हमीयस्तू..

सगळा प्लॅंट बघुन झाल्यावर आम्ही वाइन टेस्टींग एरीयामधे गेलो. वाइन तयार झाली की ती बरोबर आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी टेस्टर्स असतात. ते ठरवतात की वाइन ची क्वॉलिटी स्टॅंडर्ड प्रमाणे आहे की नाही ते. वाइन पिणं म्हणजे  नुसती ग्लासात ओतली आणि घशाखाली उतरवली असे नसते.  वाइन पिण्याची पण पध्दत असते. आधी अगदी करेक्ट  टेम्प्रेचरची  वाइन सुंदरशा ग्लासात ओतायची, नंतर नाकाजवळ ग्लास नेउन त्याचा सुगंध अनुभवायचा, एक लहानसा घोट घ्यायचा, त्याला मस्त पैकी तोंडामधे घोळवायचं, आणि नंतर  मग  दुसरा घोट….  अधुन मधुन चांगल्या प्रतीचं चीझ , आणि ऑलिव्ह तोंडात टाकायला असले तर मग अजून  काय हवं?

लिटिल इटली. इथलं एक मस्त रेस्टॉरंट. पण इथे मात्र जाउ शकलो नाही. नेक्स्ट टाइम…

एक हॉस्पिटॅलिटी एरीया पण आहे. मस्त पैकी बार आहे, त्याच्या काउंटरवर वाइन चॉकलेट्स पण दिसली. आम्ही बाहेरचा कोपऱ्यावरचा टेबल पकडला. वेटरला एका वाइनची ऑर्डर दिली. सोबतच दोन प्रकारची इम्पोर्टेड चिझ ( नांवं विसरलॊ सगळी विचित्र नावं असतात )क्रॅकर्स आणि ब्राइन वॉटरमधली ग्रिन ऑलिव्ह्ज होती.सगळी  बॉटल संपवायला चांगला तास लागला. हातामधे वाइनचा ग्लास, हिरवा गार निसर्ग, थंड गार वाऱ्याची झुळूक, आता पाउस पडतो की काय याची आठवण करून देणारे, दोन चार चुकार पावसाचे थेंब- थांब आता लवकरच तुझी भंबेरी उडवतो म्हणणारे.. सगळंच कसं धुंद करणारं वातावरण होतं. बऱ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत, त्यातली ही एक…

पुढल्या वेळी नाशिकला आलो की इथे हमखास चक्कर होणार हे नक्की- कामासाठी जरी नाही तरी वाइन टेस्टींग आणि लिटल इटली साठी 🙂