गुजगोष्टी

Written by  on July 15, 2007

गुजगोष्टी हा शब्द जरा नवीन वाटत  असेल, कारण हल्ली हा शब्द फारसा वापरात नसतो,पण पूर्वीच्या काळी मात्र हा शब्द भरपूर वापरला जायचा.    एकत्र कुटुंबात मुलगी लग्न होऊन आली, की मग  हातावरच्या मेंदीचा रंग ओसरण्यापूर्वीच घरातल्या कामामधे गुंतून जावे लागायचे.  दळण, कांडण, वडिलधाऱ्या  आजारी लोकांची सेवा, आणि  दिवसभर घरातल्या मोठ्या बायकांच्या हाताखाली काम केल्यावर मग रात्री सगळं आवरून झोपायला गेल्यावरच नवऱ्याला भेटायला  चान्स मिळायचा.

त्या काळी दिवसभर नवरा नजरेसमोर जरी दिसला, तरीही त्याच्याबरोबर घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्तीं समोर बोलणे म्हणजे वडिलधाऱ्यांचा अपमान/ उद्धटपणा  समजले जायचे, त्यामुळे नवरा समोर दिसला तरीही नजर खाली घालून हलकेच एखादा तिरपा कटाक्ष.. बस्स .. ह्यातच काय तो रोमान्स वगैरे काय ते समजा. सारखे एकमेकांशी बोलण्याची इच्छा होणे अगदी साहजिकच नाही  का? पण तशी संधी मिळणे दुरापास्त असायचे, आणि म्हणूनच मग रात्र झाली की मग   नवऱ्याच्या कानाशी गुजगोष्टी करण्याची  संधी बायको सोडत नसे.

तर या गुजगोष्टी कशा असतात?  विनोद म्हणून वाचाल तर विनोदी, नाही तर जीवनाचे सार सांगणारा हा  तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तो खाली देतोय.

भ्रतारेसी भार्या बोले गुजगोष्टी- मन ऐसी कष्टी नाही दुजी,
अखंड तुमचे धंद्यावरी मन, माझे तो हेळण करती सर्व.

जोडितसा तुम्ही, खाती येरे चौरे, माझी तर पोरे हळहळती,
तुमची व्याली माझी  डाई हो पेटली, सदा दुष्ट बोली सोसवेना,

दुष्ट वृत्ती नंदुली  सदा द्वेश करी , नांदो मी संसती कोणामुखे
भावा दीर काही, धड ना हो बोले, नांदो कुणा खाले कैसी आता

माझ्या अंगेसंगे तुम्हासी विश्रांती, मग धडगती नाही तुमची

वेगळे निघता संसार करीन, नाही तरी प्राण देते आता
तुका म्हणे जाला कामाचा अंकीत, सांगे मनोगत तैसा वर्ते

ह्या अभंगात बघा, ही स्त्री   नवऱ्याला    कशी काय  आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करते ते , खूप  उत्कृष्ट पणे सांगितलेले आहे.  ती स्त्री पण खूप हुशार आहे, सुरुवातीला नवऱ्याचे आपल्या बोलण्याकडे लक्ष वेधले जावे म्हणून आधी त्याच्या कामाची तारीफ करते आहे. ते ऐकल्यावर मग त्याच्याकडे घरातल्या कामाची/त्रासाची जंत्री वाचून दाखवते. म्हणते, की  सासुरवास, जाऊबाई, नणंद, सासूबाई सगळे जण मला बोलतात,  नणंद तर नाक मुरडते, भावा -दीरांना तर बोलावेसे पण वाटत नाही माझ्याशी – आणि तुम्ही! तुम्हाला तर माझ्याकडे बघायला पण वेळ नाही! नंतर शेवटी हळूच आपल्या मनातला खरा विचार समोर आणते, म्हणते,   आपल्याला जर सुखाने संसार करायचा असेल तर वेगळं राहिले पाहिजे.  जेंव्हा नवरा अजिबात काही बधत नाही हे लक्षात आल्यावर मग ती मात्र आपले शेवटचे ठेवणीतले अस्त्र काढते, आणि म्हणते, ” मी जीव देईन आता, जर वेगळं झालं नाही तर!”

सुरुवाती- लाडीगोडी, नंतर – तक्रार, शेवटी – धमकी! किती हुशार आहे ती स्त्री नाही का?  इतका वेळ नवरा शांतपणे ऐकत  असतो, पण आता मात्र कामातूर झालेला तो नवरा  कसेही करून तिला खुष करण्यासाठी कोणकोणती आश्वासने देतो ते  तुकोबारायांनी    एका अभंगात  लिहून ठेवलेले आहे- तो खाली देतोय अभंग….

सकाळी उठोनी वेगळा निघेन, वाहतो तुझी आण निश्चयेसी
वेगळे निघता, घडीन दोर चुडा, तू तर माझा जोडा जन्मवरी

ताईत साखळी गळाची दुलडी, बाजूबंद जोडी हातसर
वेणीचे ते नग सर्वही करीन, नको धरू शीण मनी काही,
नेसाया साडी सेलारी चुनडी, अंगीची काचोळी जाळिया फुले

तू तर माझी जन्माची साथीदार आहेस, मी उद्या सकाळी उठलो की तुला निरनिराळे अलंकार , सोन्याची बांगडी, बाजूबंद, हात सर , वेणीचे दागीने, सेलोरी चुनरी ( कदाचित त्या काळच्या साडीचे नाव असावे)  घेऊन देईन. आता इतकी आश्वासने दिल्यावर ती पाघळली नसेल तरच नवल. म्हणूनच शेवटचे वाक्य म्हणजे तुकोबा म्हणतात,

तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासवे धाव घेतलीसे.

मला वाटतं की हे उपहासात्मक रुपक वापरले आहे इथे. संसारात गुंतलेल्या माणसाची अशीच अवस्था होत असते. “रांडेने केला गाढव, “या चरणात, विनोद, उपहास भरलेला आहे .

तर इथे गुजगोष्टी फक्त नवराबायकोच्या नसतात , तर त्या दोन स्त्रियांच्या पण असू शकतात. दोन (गडणी – मला वाटते गडी म्हणजे पुरुष म्हणून गडणी हा शब्द स्त्रियांसाठी वापरला असावा )समदुःखी स्त्रिया आपली करूण कहाणी एकमेकींना सांगून स्वतःचे दुःख हलके करू पहाताहेत. तो अभंग असा आहे..

होनवर तीजवर दोघी त्या गडणी, अखंड कहाणी संसाराची,
माझा पती बहू लहानची आहे, खेळावया जाय पोरासवे,

माझे दुःख जरी ऐकशील सई, म्हातारा तो बाई खोकतसे,
वेळे सांजवरी बाहेरी तो राहे, वाट मी वो पाहे सेजेवरी.

पूर्व पुण्याई माझी नाही बाई नीट, बहू होती कष्ट सांगो बाई
जवळ मी जाते, अंगा अंग लावू, नेदी जवळ येऊ कंटाळतो.

केवळ सहा ओळींचा हा अभंग    समाजाला अभिप्रेत असलेल्या   स्त्री पुरुषांमधील   संबंधांवर उजेड टाकतोय- कसा ते बघा.  बाल विवाह, बाल जरठ विवाह , हे त्याकाळी अगदी कॉमन होते. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य स्त्री ला कधीच नसायचे. मग वडील म्हणतील त्या बिजवर, तिजवराला माळ घालायची आणि पुढे मग जे काही होतंय ते केवळ “पूर्वसुकृताचा ठेवा” म्हणून मान्य करतांना दोन्ही स्त्रिया दिसतात. अभंग खूपच सोपा आहे, म्हणून जास्त विश्लेषण करत नाही. असो.होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रारब्धाला दोष द्यायचा ही   मनोवृत्ती  मनाला खूप चटका लावून जाते हे मात्र नक्की.

गुजगोष्टींच्या हलक्या फुलक्या पोस्ट ला इतक्या सिरियस वळणावर  नेऊन संपवायचे नव्हते, पण, जीवनाचा तो पण एक भाग आहेच, तेंव्हा टाळता येत नाही हे नक्की.आजकालच्या दिवसात गुजगोष्टी एकत्र कुटुंबपद्धती सोबत  तशा संपल्यातच जमा झालेल्या आहेत , कारण समाजात मोकळे पणा आलाय हल्लीच्या काळात.बायकोला नवऱ्याशी बोलायला रात्र होण्याची वाट पहावी लागत नाही 🙂  तरी  पण आजही ह्या अभंगात जे काही दिलेले आहे, ते लागू पडते .  खूप दिवसांपासून ठरवले आहे की एकदा तुकारामाची गाथा वाचायची  म्हणून . बघू या कधी जमतं ते.,

कॅशलेस? नॉट फॉर मी..

Written by  on July 14, 2007

downloadनोटाबंदी झाल्याचा तो काळ होता, की ज्याने माझे आयुष्यभराचे खर्चाचे नियम बदलुन टाकले. मी जरी टेक्नोसॅव्ही असलो, तरी खर्च करण्याच्या बाबतीत पारंपारीक पद्धत म्हणजे कॅश वापरायचो. मग तो किराणा असो, की लाईट बिल असो. तशी पण हल्लीची मंडळी कॅशलेस कडे वळल्याने, बिल भरायला रांग नसतेच, अगदी दोन मिनिटात काम होतं.

तर , हजार आणि पाचशे च्या नोटा बंद केल्या गेल्या आणि आमचे प्रॉब्लेम्स सुरु झाले. नुकतेच दोन दिवसापूर्वी खर्चासाठी म्हणून ४० हजार रुपये काढून आणले होते. अर्थात त्या पैकी फक्त दोन हजार च्या शंभर च्या नोटा आणि बाकी सगळ्या पाचशे आणि हजार! त्यामुळे फारसा कधी कॅशलेसच्या वाटेला न जाणारा एकदम डेबिट कार्ड वापरायला लागलो. कदाचित लहानपणापासुनचे संस्कार असतील, मी क्रेडीट कार्ड शक्यतो वापरले नाही- आपलं अंथरुण पाहुन पाय पसरावे ही शिकवण अंगी भिनल्याचा परिणाम.

महिनाभर सगळा गोंधळ सुरु होता. माझे तसे दोन अकाउंट्स आहेत, एका अकाउंट मधे नेहेमीच्या खर्चाचे पैसे ठेवलेले असतात, ( ज्याचे कार्ड मी नेहेमी जवळ बाळगतो) .महिना उलटला होता, आणि एकदिवस डिमार्ट ला जाऊन किराणा घेतला आणि लागलेल्या नवीन सवयी प्रमाणे कार्ड पुढे सरकवले. त्या मुलाने कार्ड स्वाईप केले, अमाउंट टाकली आणि तेवढ्यात त्या मशिन वर मेसेज आला, इनसफिशिअंट फंड! क्षणभर एकदम लाजल्यासारखे झाले, अरे कार्ड डिक्लाइन होतं म्हणजे काय? पण मुलगी सोबत होती, तिने कार्ड दिले आणि पेमेंट झाले.

विचार मनात आला, हे असे कसे झाले? अकाउंट मधे जवळपास ८० हजार रुपये होते, गेले कुठे? नंतर एक एक खर्च आठवायला लागला, घराचे पडदे केले त्याचे २३८०० रुपये, सोफा कव्हर्स चे ८००० रुपये आणि इतरही बरेच खर्च डोळ्यासमोर आले. ह्या कॅशलेस मुळे प्रत्येक ठिकाणी कार्ड पुढे सरकवुन पेमेंट्स केल्याने खर्चाकडे लक्ष नव्हते.

मला वाटतं की मुख्य कारण म्हणजे जरी माझे ८० हजार खर्च झाले, तरी पण पैसे खर्च  केल्याचा फिल / गिल्ट अजिबात नव्हता. कारण खरे – पैसे म्हणजे से हार्ड मनी माझ्या हातातुन गेले नव्हते ,फक्त कार्ड स्वाइप करून पिन नंबर टाकला होता, त्यामुळे पैसे गेल्याचा फिल अजिबात नव्हता. जेंव्हा आपण खिशातुन कोणाला १५-२० हजार देतो, तेंव्हा पैसे आपल्या हातातुन ( अकाऊंट मधुन आपणच काढले असतात) तो फिल येतो, पण ऑन लाइन ट्रान्स्फर मधे /किंवा कार्ड पेमेंट मधे पैसे गेल्याचा फिल येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे  एकिकडे सरकार  म्हणते की कॅशलेस व्हा, आणि दुसरी कडे प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर ०.१ % ते २% टॅक्स लागतो. बरेच दुकानदार कार्ड पेमेंट साठी २% जास्त पैसे मागतात. हा एक्स्ट्रॉ खर्च आपण का द्यायचा? पैसे पण आपलेच आणि आपण टॅक्स भरायचा? ही कुठली पध्द्त? अमाउंट किती आहे टॅक्स ची हे महत्वाची नाही, पण आपण ते कुठल्याही कारणाने देण्याची गरज नाही. गॅस ऑन लाइन बुक केला की ५ रुपये सुट मिळते आणि ७.५० पैसे ट्रॅन्झॅक्शन फी द्यावी लागते. सिनेमाची तिकिट बुक केली  की पण सरचार्ज द्यावा लागतो.  आपण  आपले पैसे फुकट का म्हणून द्यायचे?

बॅंका हल्ली खूप स्पॅमिंग करतात , दररोज तिन चार मेसेजेस तरी असतात. पण आपण नेहेमीचे स्पॅम असेल म्हणून ते मेसेजेस न पहाता डिलिट करतो. माझ्या पण बाबतित तेच झाले होते, मेसेजेस यायचे बॅंकेकडून पण मी ट्रू कॉलर मेसेज सर्व्हिस वापरतो, त्यामुळे ते सगळे स्पॅम मधे गेले होते. असो.

कॅशलेस म्हणजे एक प्रकारचा सापळा आहे, त्याची गोडी लागली की तुम्ही त्यातुन कधीच बाहेर पडु शकत नाही. क्रेडिट कार्ड तर अजुन एक सापळा, पैसे नसतांना खर्च करण्याची संधी मिळते, मग आपण खर्च करतो आणि पुढे त्यावर व्याज भरत बसतो. शक्यतो क्रेडिट कार्डचा उपयोग टाळावा. त्यावर मिळणारे पॉइंट्स हवे, म्हणुन कार्ड वापरणारे बरेच लोकं आहेत , त्या फुटकर पॉइंट्स साठी आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात घालणे कितपत योग्य वाटते ?

एका महिन्यात हा प्रयोग करून पहा. बॅंकेतुन महिन्याभराचे पैसे कॅश काढून प्रत्येक ठिकाणी कॅश खर्च करा, आपोआप खर्चावर नियंत्रण येइल.मी आता पुन्हा पुर्वीच्या ट्रॅडीशनल पद्धतीने कॅश खर्च करणे सुरु केले आहे, आणि खर्च नक्कीच कमी झालाय. तुम्ही जेंहा स्वतः कॅश द्याल, तेंव्हा आपले पैसे जाण्याचे दुःख म्हणा किंवा फिल म्हणा तो येतो, आणि आपण सांभाळुन खर्च करतो.

तेंव्हा विचार करा, कॅशलेस चा वापर करता करता, तुम्ही कधी कॅशलेस होऊन जाल ते लक्षात पण येणार नाही, तेंव्हा सांभाळुन. फॅसिलिटी अगदी गरजेच्या वेळॆलाच वापरली तर उपयोगी, नाही तर सापळा.