जी एस टी – नेमकं काय आहे?

Written by  on June 30, 2007

मी काही चार्टर्ड अकाउंटंट नाही, पण माझा स्वतःचा व्यवसाय असल्याने ह्या जिएसटी कडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन इथे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख.

एखादी वस्तु एखाद्या फॅक्टरी मधे तयार होते, तेंव्हा त्यावर पुर्वी सर्वप्रथम १) एक्साइज ड्युटी, २) सेल्स टॅक्स – प्रत्येक स्टेट च्या नियमा प्रमाणे – व्हॅट किंवा सेंट्रल सेल्स टॅक्स  लावुन डिलर्स कदे वस्तु पोहोचवली जायची.

एक साधे उदाहरण पहा. मी जनरेटर्स विकतो. आता ह्याच जनरेटरची मुंबई मधली किंमत निरनिराळे सेल्स टॅक्स चे ऑप्शन वापरुन कशी बदलते ते पहा.

१) बेसीक किंमत समजा १००००० + १२.५% एक्साईज + व्हॅट १३.५% +ऑक्ट्रॉय ५.५% ( टोटल किंमत रु.१३४५१०.००) ( या मधे महाराष्ट्र व्हॅट लावुन बिल केलेले आहे)

२) दुसरा ऑप्शन सी एस टी ( सेंट्रल सेल्स टॅक्स )बिलींगचा. बेसिक किंमत  १००००० +१२.५% एक्साईज + सीएसटी २% फ़ॉर्म सी सहित +५.५% ऑक्ट्रॉय ( टोटल किंमत १२१०६१/-) इथे व्हॅट म्हणजे महाराष्ट्र सेल्स टॅक्स न भरता सेंट्रल सेल्स टॅक्स भरुन विक्री केली गेलेली आहे, जो केवळ २टक्के असतो.  जास्त खोलात शिरत नाही, पण फॉर्म सी _-ई १ वर ट्रॅन्स्झॅक्शन करुन टॅक्स वाचवता येतो. या मधे विक्री करणारी कंपनी आधी दुसऱ्या स्टेट मधे स्टॉक ट्रान्सफर करुन असा सौदा करु शकते.

३) तिसरा ऑप्शन म्हणजे विक्रेत्याने एक ऑफिस गुजरात मधे उघडायचे.  महाराष्ट्र व्हॅट १३.५% टक्के तर   गुजरात चा व्हॅट ५ टक्के होता.तिथला सेल्स टॅक्स नंबर घेऊन नंतर गुजरात मधुन महाराष्ट्रात ५ टक्के व्हॅट वर बिलिंग  करता यायचे. म्हणजे यात महाराष्ट्राचे नुकसान, पण कस्टमरचा फायदा.
बेसिक समजा १००००० + १२.५% एक्साइज + गुजरात सेल्स टॅक्स ५% + ऑक्ट्रॉय ५.५% ( टोटल १२४६२१?-) ( गुजरात सेल्स टॅक्स भरुन बिल केलेले आहे, या मधे सी फॉर्म देण्याची गरज नाही)

अजुनही काही पर्याय आहेत, पण हे सगळे पर्याय जर लिहित बसलो, तर इथे एक खुप कंटाळवाणी पोस्ट तयार होईल म्हणुन आवरतो. पण जस्ट थोडक्यात समजावे की टॅक्स मधे किती घोळ असतो, म्हणुन वर उदाहरण दिले आहे. वर दिलेली तिन्ही उदाहरणे अगदी १०० टक्के लिगल आहेत, पण टॅक्स ची अमाउंट किती बदलली आहे ते पहा.

“आता जिएसटी आल्यामुळे कुठल्याही स्टेट मधुन बिलींग केले तरीही किंमत बेसीक + १८% जीएसटी इतकीच राहिल. जिएसटी सुरु झाल्यामुळे आता एक्साइज ड्युटी  आणि इतर टॅक्सेस बंद झाले आहेत. तसेच ऑक्ट्रॉय पण बंद केला गेला आहे. तेंव्हा टोटल किंमत   जी एम् व्हॅट वर  १३४५१०.  ती आता जिएसटी वर रू/ १,१८०००/-  होईल. म्हणजेच कस्टमरचा  जवळपास १६००० चा फायदा झालेला आहे. या वरुन तुमच्या लक्षात येईल की ऑटोमोबाईल कंपन्या किंमती मधे कपात करुन कस्टमर्स ला बेनिफिट पास ऑन कशा करु शकतात ते!”

सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस ह्या जीएसटी मुळे बंद झालेले आहेत आणि त्यामुळॆ लोकांचा फायदाच होईल. पण विक्रेता हा फायदा पास ऑन करतो की स्वतः ठेऊन घेतो हा प्रश्न आहेच..

समजा मी जिएसटी देऊन कंपनीकडून एक मशिन विकत घेतले १००००० रु. ना, त्यावर जीएसटी ( १८%) लावल्यावर  होतो रु. १८०००/-
नंतर हेच मशीन मी १, २०, ०००/- या किंमती ला विकले. त्यावर १८% जिएसटी हा रु. २१६००/- कस्टमरला चार्ज केला, आणि कस्टमरला दिलेल्या बिलात पण तो मेन्शन केला. आता विक्रेता म्हणून मी सरकार कडे रु.
पण तो टॅक्स दाखवला. आता मी विक्रेता म्हणुन सरकार कडे २१६०० -१८०००= ३१६० रु टॅक्स जमा करेन. समजा कस्टमर जी एसटी मधे रजिस्टर असेल तर तो पण भरलेल्या जीएसटी च्या अमाउंटचा इनपुट क्रेडीट म्हणुन वापर करेल.

थोडक्यात बऱ्यापैकी सरळ झालेलं आहे टॅक्सेशन- आधीपेक्षा. सगळॆ चित्रविचित्र प्रकारचे टॅक्सेस आता या पुढे ऍबोलिश करण्यात आले आहेत. तुम्ही भारतात रहाता? तर मग एकाच देशात दोन राज्यात टॅक्स चा दर वेगळा नसावा आणि प्रत्येकाला टॅक्सेशन मधे सुविधा मिळावी म्हणून जी एस टी लागु केला गेला आहे.

प्रत्येक वस्तू वर एक रेट ०% ते २८% टक्के सेट केला गेला आहे. जिवनावश्यक वस्तूंवर शुन्य ट्क्के टॅक्स , तर चैनिच्या वस्तूंवर २८% अशी सरळ धोपट वर्गवारी केली गेली आहे जी मला पटलेली नाही .

आणि हो, पुर्वी ऍमेझॉन वर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऑन लाइन स्वस्त का मिळायच्या ह्याचे उत्तर म्हणजे वर दिलेला ऑप्शन क्र. ३. म्हणजे महाराष्ट्राच्या १३.५% व्हॅट ऐवजी तुम्हाला २ टक्के ते५ टक्के लावुन बिल केले जात होते. आता या पुढे ऑन लाइन वरची किंमत आणि दुकानातली किंमत या मधे फारसा फरक रहाणार नाही हे नक्की.

टॅक्सेशन…..

Written by  on June 18, 2007

 

इनकम टॅक्स म्हणजे आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय.नेमेची येतो मार्च महिना प्रमाणे डिसेंबर सुरु झाला की  इनकम टॅक्स भरायचे वेध लागतात. फेब्रुवारी , मार्च मधे पगार मिळणार की नाही- की सगळा पगार टॅक्स मधे जाणार?? याचे टेन्शन सुरु होते..

टॅक्स वाचवण्याच्या नवीन  युक्त्या घेउन एल आय सी वाले, म्युचुअल फंड वाले तुमच्या मागे लागतात , आणि एकमेकांच्या प्रपोझलस मधल्या त्रुटी सांगतात..

आम्ही कामं करायची, पैसे कमवायचे आणि ते सरकारच्या बोडख्यावर घालायचे!!!! किती संताप येतो ना इनकम टॅक्स भरताना?? मला तरी येतो….. आणि पुन्हा आपल्या पैशाची  जी उधळपट़्टी ही सरकारी धेंडं करतात ती पाहिली की मग तर अजूनच चीड येते. आपल्या टॅक्सच्या पैशातून चालणारी त्यांची चैन.. जाउ द्या…..हा एक वेगळाच विषय होईल .

खोटी बिलं लावली मेडीकलची म्हणून काही खासदारांकडून पैसे वसुल करण्यात आल्याची एक लहानशी बातमी वाचली कुठेतरी- आणि तेंव्हाच जाणवलं की आपल्यासारखे मध्यमवर्गीयच फक्त या टॅक्स नावाच्या  ब्रम्हराक्षसाला घाबरतात, नेते मंडळी  , बिझिनेस मन वगैरे तर  सगळ्या पळवाटा वापरतात..

सगळ्यात जास्त इनकम टॅक्स पेअर्स मधे आहेत, बिन भांडवली धंदा करणारे.. म्हणजे सिनेमा स्टार्स.. क्रिकेट स्टार्स… इत्यादी. क्रिकेटर्स मधे अर्थात धोनी /तेंडुलकर  आणि सिनेमाच्या जगात असलेले अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांची नांव प्रामुख्याने बातम्यात झळकत असतात.

आपल्या कडे मल्टिपल टॅक्सेशन आहे. तरी बरं सेल्स टॅक्स मधे  आजकाल व्हॅट सुरु झाल्यामुळे थोडं रेगुलरायझेशन आलंय या टॅक्सेशन मधे.पूर्वी प्रत्येक स्टेट ला वेगवेगळा टॅक्स स्ट्रक्चर होतं , ते सगळं एका रांगेत आणायला म्हणून घेतलेली ही स्टेप !!  काहीही झालं तरी लास्ट पॉइंटला जो कोणी असेल त्याला टॅक्स भरावाच लागतो, त्यापासून सुटका नाही.. आणि व्यापाऱ्यांना मल्टीलेव्हलला फक्त डिफरन्स टॅक्स भरुन मॉड्व्हेट घेता येतो. हे जे काही लिहिलंय ते एक्साइझ आणि सेल्स टॅक्स बद्दल आहे.

नविन कार घेतांना आयुष्यभरासाठी रोड टॅक्स घेतला जातो आपल्या कडुन. हा टॅक्स पुढली पंधरा वर्षं रस्त्यांच्या दुरुस्ती साठी वापरावा अशी अपेक्षा असते. तरी पण   नदीवर नवीन पुल बांधाला गेला की ,त्यासाठी टोल टॅक्सचा बुथ ताबडतोब उभा रहातो. याला पुन्हा एक सुंदर नाव आहे- ’बिओटी’… म्हणजे बिल्ड, ओन , आणि तुमचे पैसे वसुल झाले की ट्रान्सफर करा सरकारला.

आता जर बिओटी या तत्वावर जर  नवीन कामं होणार असतील तर आपण टॅक्स कसला भरतो?? बरं हे जाउ द्या.. पण समजा  एकदा एखाद्या कंपनीला कंत्राट दिलं की तुम्ही बिओटी तत्वावर रस्ता बनवा, की मग त्या कंपनीच्या मालकाच्या पुढच्या सात पिढ्या त्या बनवलेल्या रस्त्याचे पैसे वसूल करित रहाते.

त्या रस्त्याच्या डेव्हलपमेंटचे पैसे वसुल झाले की टोल बंद करावा अशी अपेक्षा असते.. पण तसं होत नाही…….!!!!! आणि हा जिझीया कर नेहेमी करता सुरु रहातो. पैसे वसूल झाले आणि  सरकारला  रस्ता  किंवा ब्रिज ट्रान्स्फर करण्याची वेळ आली की रस्ता पुन्हा खराब झालेला असतो… आणि मग पुन्हा बीओटी चं  नवीन टेंडर निघतं..  .असो.. विषयांतर होतंय…. हे पोस्ट मुख्यत्वे करुन इनकम टॅक्स वर आहे.

बरेचदा तर अशीही वेळ येते की वर्षा अखेर तुम्ही जेंव्हा इनकम  टॅक्स डिडक्टेड ऍट सोअर्स ची अमाउंट पहाता तेंव्हा खरं तर भोवळच येते. पण आपल्या सारख्या ्नोकरी पेशातल्या माणसांना इनकम सगळं व्हाईट असल्यामुळे लपवता येत नाही!!!!!आणि टॅक्स तरी किती प्रकारचे.. परचेस टॅक्स, सेल्स टॅक्स, एंट्री टॅक्स, ऑकट्रॉय, इंटरस्टेट सेल्स टॅक्स..  म्हणजे तुम्ही काहीही करा.. टॅक्स आहेच भरायचा…

इनकम टॅक्स भरण्यासाठी पुर्वी तो सरल फॉर्म होता , त्या पुर्वी चार पानांचा फॉर्म होता. तो समजून घ्यायलाच बराच वेळ लागायचा,पण दर वर्षी ह्या रिटर्न्स ची पध्दत बदलते..तुम्हाला थोडं फार समजू लागलं की लगेच नवीन फॉर्म येतो टॅक्सेशनचा. आता या वर्षी तर ऑन लाइन फॉर्म भरायचा पण ऑप्शन दिलेला आहे.

आपल्याला या वर्षी किती टॅक्स भरावा लागेल हे पण कॅल्क्युलेट करता येत नाही. वर्ष झालं की ५०० रुपये देऊन कोणाकडून तरी तो फॉर्म भरुन घ्यायचा – हेच आपण करतो..

इथे एक एक्सेल शिट आहे. ती शिट डाउन लोड करा,  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.4shared.com/file/175781689/bb22c0ef/TaxCalc_2010.html)आणि त्यामधे सगळे आकडे भरा.. तुमची टॅक्स लायब्लिटी कॅल्क्युलेट केली जाऊ शकते…..अगदी कुठल्याही टॅक्स कन्सल्टंटची मदत न घेता…. अतिशय उपयोगी एक्सेल शिट आहे ही….बघा किती टॅक्स भरावा लागेल या वर्षी ते…… !!!!

नॅशनल शेम!

Written by  on June 16, 2007

flagइथे एक झेंडा लावलेला आहे या पोस्ट शेजारी . तुम्हाला माहिती आहे का तो झेंडा कुणाचा आहे ते?  तुम्हाला माहिती असायलाच हवा, जर तुम्ही भारतीय असाल तर. अहो आपण सगळे जण हा धर्म पाळतो. आपल्या धर्माच्या सर्वोच्च पीठाचा झेंडा  आहे  हा.    ह्या झेंड्याचं महत्त्व जर तुम्ही भारतीय असून जाणत नसाल, तर तुमचे भारतीय होणे वाया गेले असे म्हणावे लागेल.  🙂  ( हलके घेणे) असो तर हा झेंडा आहे -बीसीसीआय चा.

मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग हे काही नवीन नाही. वर्षानुवर्ष हे घडतंय. पूर्वी पण घडलंय, आजही घडतंय. त्यात नवीन काय? पण आज जेंव्हा ही बातमी वाचली, आणि बिसीसी आयच्या अधिकाऱ्यांचे टिव्हीवरचे इंटरव्ह्यू पाहिले, तेंव्हा मात्र “माझी सटकली” आणि म्हणून हा लेख. मी पण तुमच्यासारखाच एक काळी  क्रिकेट वर प्रेम करणारा, मॅचेस फॉलो करणारा एक क्रिकेटवेडा, पण हल्ली मात्र अजिबात मॅच फॉलो करत नाही. जेंव्हा अझरुद्दीन ( माझा फेवरेट प्लेअर होता तो ) फिक्सिंग मधे पकडला गेला तेंव्हापासून माझा इंटरेस्ट कमी झाला. तसा सचिन आणि राहूल हे दोघं आहेत आवडीच्या प्लेअर्स पैकी, तरी पण…..

भारताच्या क्रिकेट विश्वात बिसीसीआय चे स्थान मोठे आहे. ही संस्था स्वतःला स्वायत्त संस्था म्हणवते . बिसीसीआय चे क्रिकेट च्या खेळा मधून , जाहिराती मधून  करोडो रुपयांचे उत्पन्न आहे , आणि म्हणूनच असेल की ,  बरेच राजकीय नेते पण या संस्थेकडे स्वतःला क्रिकेटचा “क्री” पण येत नसतांना आकर्षित झाले आहेत/होत असतात. शरद पवारांना पण या मधे इंटरेस्ट होताच 🙂  बिसीसीआय चा   स्वतःचा ध्वज. लोगो – आहे , जो क्रिकेट पटू ड्रेस वर मिरवतांना

हा लोगो पण ब्रिटीश काळी दिल्या जाणाऱ्या ” ऑर्डर ऑफ द स्टार” या सर्वोच्च बहूमानाची कॉपी आहे. तो ओरिजिनल लोगो पण खाली देतोय. अरे कमीत कमी स्वतःचा लोगो तर स्वतः बनवा.. तिथे पण ब्रिटीशांची चाटू गिरी??

दिसतात. भारतीय टीम चा ड्रेस पण निळा आहे, कारण तो पण बीसीसीआय च्या झेंड्याचा रंग आहे म्हणून!

फार पूर्वी एकदा एका बिसीसीआय च्या  अधिकाऱ्याने तोडलेले तारे  वाचले होते, म्हणत होता, की क्रिकेट खेळाडू जेंव्हा  बाहेर खेळायला बीसीसीआय तर्फे पाठवले  जातात, तेंव्हा ते भारताचे प्रतिनिधित्व करत नसतात, तर “बीसीसीआय” चे करीत असतात.अशी  निर्लज्जा सारखी  कॉमेंट वाचली आणि तेंव्हा तर जाम चीड आली होती.  मला  आणि इतरही  भारतियांना   (जरी माहिती असलं की बीसीसीआय चा संघ आहे ) तरी मनातून वाटत असतं  की जो संघ खेळायला जातो तो भारताचाच असतो आणि, म्हणूनच भारतीय लोकं त्यांच्यावर प्रेम करतात .काही खेळाडूंना देवाप्रमाणे पूजा करतात.

जी मॅच होते, ती भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी असते. बिसीसीआय विरुद्ध पाकिस्तान नसते. बीसीसीआय ला महत्व आहे ते केवळ भारतीय ऑफीशिअल संघ म्हणून समजल्या जाणाऱ्या संघा मुळे . मॅच सुरु असतांना मैदानावर सचिनने सिक्स मारली, हरभजनने विकेट काढली, द्रविड ने सेंच्युरी मारली  की भारताचा तिरंगा झेंडा फडकवला जातो, तुमचा बीसीसीआय चा झेंडा नाही.  मॅच पहायला जाणारे लोकं आपल्या चेहेऱ्यावर भारताचा झेंडा रंगवतात, बीसीसीआय चा नाही. टींमचा विजय हा भारताचा विजय असतो बीसीसीआय चा नाही . भारत पाकिस्तान मॅच जिंकली की भारताचा विजय झाल्याचा आनंद फटाके उडवून साजरा करतात- बीसीसीआय चा नाही! वर्ल्ड कप हा भारत जिंकतो, सगळी कडे म्हणजे पेपर, टीव्ही वर भारताने वर्ल्ड कप जिंकला ही बातमी असते, बीसीसीआय ने नाही! ही गोष्ट त्यांनाही माहिती आहेच, पण “येडा बनके पेडा खानेका काम” बरोबर करते बीसीसीआय.

आणि अशीही पुस्ती जोडली जाते की बीसीसीआय या संस्थेला ती सरकारी अखत्यारीत येत नसल्याने  जे काही करायचं असेल ते ही संस्था करू शकते, आणि त्यांनी तसे का केले  याचे उत्तर जनतेला किंवा सरकारला देण्यासाठी ते बांधील नाहीत. तुम्ही यांना ’माहितीच्या अधिकारा ’खाली पण एकही प्रश्न विचारू शकत नाही. क्रिकेटच्या चार तासाच्या आयपीएल च्या मॅचचे तिकीट हे ७५० ते २५००० पर्यंत असते , ते का ?? इतके जास्त तिकिटं ठेवण्याचे कारण काय? हे विचारण्याचा पण कोणालाच अधिकार नाही.

आता समजा उद्या श्रीसंत किंवा ते दोन चंगूमंगू प्लेअर्स पकडले गेले,   त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून दिलेली शिक्षा भोगून ते बाहेर आल्यावर बीसीसीआय  त्यांच्यावर आजीवन बंदी घालायची की काही वर्षासाठी याचा निर्णय घेऊ शकते.  कोर्टाने जरी दोषी ठरवले, पण जर बीसीसीआय च्या स्वतःच्या शोध समितीने यांना निर्दोष म्हटले, तर हे सगळे  कदाचित पुन्हा भारताकडून खेळतांना दिसतील.

ज्या देशात क्रिकेट हा धर्म समजला जातो त्या देशात  श्रीसंत आणि त्या दोन चंगूमंगू चे वागणे हे राष्ट्रीय शोक  व्यक्त करण्याच्या लेव्हलचे आहे आणि म्हणूनच ते  नॅशनल शेम मधे मोडते.

पैशाचा भ्रष्टाचार समजा देशहिताच्या आड येत असेल तर? बीसीसीआय ची टीम ही भारतीय टीम म्हणून ओळखली जाते, तेंव्हा या संस्थेवर काही तरी अंकुश असायला हवा की नाही? तसेच ह्या संस्थेला   स्वायत्त संस्था म्हणून राहू देणे कितपत योग्य आहे? उत्तर तुम्हीच शोधायचं आहे. ह्या प्रश्ना वरच हा लेख संपवतो.

भिमबेटका च्या २५ हजार वर्ष जुन्या गुहा, आणि गुहा चित्रं.

Written by  on June 9, 2007

आपल्याकडे काय आहे, आणि त्याचं महत्त्व किती    आहे हे आपल्याला दुसऱ्या  कोणी तरी सांगितल्या शिवाय समजत नाही. “भिमबेटका” या २५-३० हजार वर्ष जुनी चित्र असलेल्या गुहांबद्दल  पण असंच काहीसं घडलं.  जो पर्यंत २००३ मधे युनेस्कने या जागेला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा दिला  नाही, तो पर्यंत या जागेकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.     इथे लोकं यायचे ते फक्त आर्किओलजिकल सर्व्हेचे!   वर्ल्ड हेरीटॆज साईट्स बद्दल मला एक वेगळंच आकर्षण आहे. एक गोष्ट  मात्र प्रकर्षाने जाणवली,   की बऱ्याच वर्ल्ड हेरीटॆज साईट्स  आपल्या देशात असूनही त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांना सुद्धा फार कमी माहिती आहे. कदाचित आपल्या देशात अशा खूप साईट्स असल्यामुळे  लोकांना याचं महत्त्व जाणवत नसेल.

आज जुने फोटो पहातांना एकाएकी काही जुने फोटो समोर आले, आणि त्या बद्दल लिहावं असं वाटलं ते फोटो होते भिमबेटका गुहांचे. शाळेत असल्यापासूनच आपण केव्हमेन किंवा पाषाण युगा बद्दल वाचत असतो. त्यांच्या बद्दल एक सुप्त आकर्षण प्रत्येकाच्या मनात असतं.  त्यांची रहाणी, जीवन पद्धती आणि ते कसे रहात असतील- काय खात असतील ? शाळेत असतांना तर अशा असंख्य गोष्टी  मनात यायच्या. एखादा अणकुचीदार दगड सापडला, की असेच दगड लाकडी काठीला बांधून ते शिकार करत असतील का हा प्रश्न तर मला   नेहेमीच पडायचा.

भोपाळला तुमच्यापैकी किती लोकं जाऊन आले आहेत? बरेच असतील, पण  भिमबेटका ही वर्ल्ड हेरीटेज साईट पहायला किती लोकं गेले होते- हा प्रश्न विचारला तर नक्कीच फार कमी लोकं हात वर करतील. मी कोणालाही या गोष्टीसाठी दोष देत नाही, मी स्वतः पण कित्येक वर्ष भोपाळला जाऊनही इथे गेलो नव्हतो. भोपाळ  पासून फक्त  ३५-४० किमी अंतरावर  भिमबेटका ही  एक जागा. कित्येक वर्ष ही जागा बुद्धीस्ट केव्ह च्या नावे ओळखली जायची.  या गुहा  बुद्धकालीन नाहीत हे कसे समजले याची पण एक कथा आहे.

उज्जैनच्या एका कॉलेज मधे प्राध्यापक आणि हे जगविख्यात  इतिहास संशोधक असलेले श्री वाकटकर  एकदा  १९५७ मधे भोपाळला ट्रेन ने जात होते. जाता जाता त्यांचं लक्षं या  ठरावीक विशिष्ट पद्धतीने रचलेल्या दगडी ढिगार्‍याकडे गेलं, आणि त्यांच्या  लक्षात आलं की हे काही तरी वेगळं प्रकरण आहे. नंतर त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी संशोधन करून इथे अशाच प्रकारच्या २४३  गुहांचा अभ्यास करून त्या बौद्ध कालीन गुहा नाहीत तर अती प्राचीन म्हणजे २०-३० हजार वर्ष जुन्या आदीवासी लोकांच्या रहाण्याच्या जागा आहेत  हे  सिद्ध केले.  या गुहां मधल्या  काही केव्ह पेंटींग्ज चे  फ्रान्स आणि स्पेन मधल्या गुहांशी असलेलं साधर्म्य  लक्षात आल्यावर,  त्यांनीच  ही गुहा चित्रे १० हजार ते ३० हजार वर्षापूर्वी काढलेली आहेत,आणि या  गुहामध्ये आदिमानवाचे वास्तव्य होते  हे  सांगितले.

वाकटकरांनी शोधल्यावर पण फक्त आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट सोडलं तर इथे कोणी फारसं येत नव्हतं. तसं म्हंटलं, तर  सर्वसामान्य लोकांना इथे गुहांमधे पहाण्यासारखं आहे तरी काय  हा प्रश्न आहेच. जुनी खंडहर पहाण्यासाठी पण एक  आवड असावी लागते. विंध्य पर्वतावर असलेल्या या गुहा साधारण पणे १० हजार ते २५ हजार वर्ष जुन्या आहेत. या गुहांमधे पूर्वी केव्हमेन ( आदीमानव ) रहायचे ,तेंव्हा  काढलेली पेंटींग्ज आहेत- पण त्यांना पेंटींग म्हणण्यापेक्षा भित्तीचित्रे म्हणणे जास्त योग्य होईल.

इ.स. २००३ मधे या गुफांचे महत्त्व  लक्षात घेता  युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज च्या यादी मधे या गुहाचा समावेश केलेला आहे. दुर्दैवाने जरी वर्ल्ड हेरीटेज मधे समावेश केला गेला असला, तरीही इथे  टुरिस्ट लोकांची फारशी वर्दळ नसते .

मला स्वतःला तसाही पुरातन वास्तू मधे किंवा आर्किओलॉजिकली महत्वाच्या जागांमधे फार जास्त इंटरेस्ट आहे. एकदा मी कामानिमित्य मुंबई हून भोपाळला जास्त असता एक ब्रिटीश माणूस शेजारी बसला होता. त्याने जेंव्हा या जागेबद्दल सांगितले , तेंव्हा  माझी मलाच ही जागा माहिती नसल्याबद्दल लाज वाटली होती.  पण तरीही ही जागा पहाण्याचा योग काही बरीच वर्ष येऊ शकला नाही.

त्या दिवशी भर दुपारची वेळ – साधारण चार वाजत आले होते. उन्हाचा दाह जरी कमी झाला असला, तरीही भोपाळचं उन्ह अंग भाजून काढत होतं . गुफांसाठी उजवी कडे वळा अशी एक पाटी पाहिली, आणि एकदा वळल्यावर फक्त पाच   मिनिटात गुहांपर्यंत पोह्चलो. कार थांबल्यावर पण एसी मधून बाहेर येण्याची इच्छा होत नव्हती. समोरच आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट चं एक तिकिटं घर दिसत होतं. थकला भागला एक जीव तिथे उगाच काहीतरी टाइमपास करत बसला होता. जर कोणी येणारच नसेल तर त्याने तरी काय करायचे??दोन तिकीट घेऊन आम्ही गुहा पहायला निघालो.

जरी एकंदर २४३ गुहा असल्या तरीही फक्त १८ गुफा लोकांना पहाण्यासाठी उघड्या ठेवल्या आहेत. समोर दोन मोठे दगडी पहाड दिसत होते. विंध्य पर्वताचा एक भाग असलेला तो पहाड  २५ हजार वर्षापूर्वीच्या तिथल्या समाज जीवनाचा एक भाग होता ही जाणीव मनाला स्पर्श करून गेली.  इथे या जुन्या  गुहा पहाणं म्हणजे एक अनुभव आहे, तो शब्दांमधे मांडणे फार कठीण आहे.  इथे अजूनही बरीच झाडी दिसते, पण पूर्वीच्या काळी इथे घनदाट अरण्य असावे . जितकं जास्त झाडी तितकी जास्त गुहांची गरज. जंगली प्राण्यांपासून आणि उन्ह पावसापासून संरक्षणासाठी गुहा या हव्याच.

गुफांमधे रहात असतांना तेंव्हाच्या आदिमानवांनी काढलेली चित्रं ही जगातल्या पहिल्या कलाकृतींपैकी एक आहे. इतक्या उंचावर चढण्याची काही सोय नसल्याने  झाडावर चढून , एखाद्याच्या खांद्यावर उभे राहून ही चित्रं काढली गेली असावी . पहिल्या गुहे मधले चित्र जेंव्हा आपण पहातो तेंव्हा ते एखाद्या लहान मुलाने काढलेल्या चित्रासारखे वाटते. पांढऱ्या रंगाच्या रेषांनी तयार झालेले ते चित्र पाहिल्यावर, हे चित्र २५ हजार वर्षापूर्वी  काढले आहे ही जाणीवच एकदम अंगावर शहारे आणणारी ठरली. चित्र पहात होतो, पण मनात मात्र विचार सुरु होते, कसे रहात असतील बर ते आदिमानव इथे??

इथे या गुहा पहात असतांना तुम्ही पण त्या काळात जाऊन पोहोचता. भिंतीवर पांढऱ्या , लाल रंगात २५ हजार वर्षापूर्वी काढलेली चित्रं अजूनही पहाता येतात.  २५ हजार वर्ष उन्ह, पाऊस, वारा, थंडी झेलुन पण ही चित्र इतक्या चांगल्या अवस्थेत कशी काय राहिली हा प्रश्न पडतो. मिनरल्स, झाडांपासून तयार केलेले रंग,झाडाचा गोंद, रक्त  वापरून ही चित्रं बनवलेली आहेत. या रंगाचा ज्या दगडावर ही चित्र काढ्ली आहेत, त्या दगडावर  रंगाचा – ऑक्सिडेशनचा परिणाम झाल्याने ही चित्रे आजपर्यंत शाबूत आहेत.

एकंदर १८ गुहांचा हा समुह लोकांना पहाण्यासाठी ठेवलेला आहे. दिड दोन किमी अंतरामधे या गुहा पसरलेल्या आहेत. या रस्त्यावरून चालत जातांना आपल्या नकळत आपण त्या काळात जाऊन पोहोचतो आणि हा दिड दोन किमी चा ट्रेक एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

जगा मधे अशा प्रकारची केव्ह पेंटींग फक्त स्पेन आणि फ्रान्स मधे आहेत असे म्हणतात. इतकी महत्त्वाची जागा आपल्याकडे आहे हे सांगायला युनेस्कोला यावं लागतं, आणि वर्ल्ड हेरीटेज म्हणून घोषित करावं लागतं. आणि युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज म्हणून घोषित  केल्यावर पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही हे वाक्य मी इथे येणाऱ्या व्हिजिटर्सच्या संख्येवरून लिहितोय. असो.. जर कधी भोपाळला गेलात तर एक वेळ बडी मस्जिद, बडा तलाव वगैरे पाहिला नाही तरी हरकत नाही, पण  ही जागा पहायला  मात्र नक्की विसरू नका. एक वेगळाच अनुभव देणारी जागा आहे ही .