जैन आणि हिंदू

Written by  on May 11, 2007

हा लेख लिहिण्या पुर्वी मला हेरंब प्रमाणे आधी डिस्क्लेमर टाकावं का? हा विचार खरं तर मनात आला होता, पण शेवटी कुठल्याही डिस्क्लेमर  न लिहिता सरळ लेख सुरु करतोय.

मुंबई मधे सध्या फक्त शाकाहारी लोकांच्या साठी वेगळी  गृह संकुलं बांधायची  एक नवीनच पद्धत सुरु झालेली आहे.त्या संकुलात केवळ शाकाहारी लोकांनाच घरं दिली जातात.खरेदी करणारे  जर स्वतः रहाणार नसतील तर फक्त शाकाहारी लोकांनाच घर भाड्याने देईन असे प्रतिज्ञा पत्र  लिहून घेतले जाते. मराठी लोकं , मुळ कोळी समाज किंवा आंग्रे समाज हा मांसाहारी, म्हणून इथे मराठी लोकांना घरं नाकारली जातात.

जैन लोकांचे मांसाहारी लोकांच्या शेजारी नकोसे वाटणे  ह्या गोष्टीला राजकीय स्वरुप देणे कितपत योग्य आहे? जैन लोकांच्या सोसायटी खास वेगळ्या बनवलेल्या असतात, त्या मधे महाराष्ट्रीयन लोकांना फ्लॅट विकत न देणे हे योग्य की अयोग्य?  जैन धर्मियांची जी शाकाहारी जीवन पद्धती आहे, त्यांना जर केवळ शाकाहारी लोकांच्या शेजारी रहायला आवडणे, ह्या  विरुद्ध आवाज उठवणे हे योग्य आहे का? हे असे प्रश्न मला नेहेमीच छळत असतात.

ह्या विषयावर माझे विचार लिहीण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. पण  लिहिण्याचा योग आज आला.  जैन धर्मीय तसे ना कुणाच्याही कुठल्याही गोष्टी मधे पडत नाहीत. नेहेमीच स्वतःच्याच विश्वात मग्न असतात. त्यांची आपली  जिवन पध्दती आहे, तिच्या प्रमाणे ते जगत असतात. जसे कांदा लसून न खाणे, किंवा शुध्द शाकाहार, जमींकंद न खाणे वगैरे. मुंबईला जैन लोकांची संख्या भरपुर आहे.कुठल्याही हॉटेल मधे गेल्यावर तुम्हाला जैन डिशेशनी  मेनुकार्डचा  बराचसा भाग व्यापलेला  दिसेल, याचं कारण हे की ते कधीच कॉम्प्रोमाइझ करीत नाहीत. जर आपल्या जिवनपध्दती प्रमाणे खाण्याची वस्तू नसेल तर ते काहीही खात नाहीत, त्यामुळे हॉटेलचालकांना धंद्याच्या दृष्टीने त्यांना चालणारे जैन व्यंजनं मेनुकार्ड मधे इन्क्लुड करणे आवश्यकच ठरते- शेवटी धंदा आहे नां???

मी स्वतः अगदी हार्ड कोअर मांसाहारी आहे. मला मांसाहारी विशेषतः मासे आणि चिकन  खूप आवडतात. पण घरी मात्र सगळे लोकं शुध्द शाकाहारी आहेत. अगदी अंडं पण चालत नाही आमच्या घरी कोणालाच. मी स्वतः रहातो एका कॉस्मोपोलीटीयन सोसायटी मधे ७ व्या मजल्यावर.

काही वर्षापुर्वी  जेंव्हा खालच्या मजल्यावर एक बंगाली कुटुंब रहायलं आलं  आणि    त्यांच्या घरी सरसूच्या तेलामधे मासे तळणे सुरु झाले की जो  वास यायचा तो  आमच्या घरात खिडक्या बंद केल्या तरीही  इतका जास्त यायचा, की तो सहन न होऊन  सौ. आणि आईच्या उलट्या सुरु व्हायच्या.कदाचित मांसाहारी लोकांना जो सुगंध वाटतो तो इतरांना म्हणजे शाकाहारी लोकांना दुर्गंध वाटतो हेच कारण असावे. मध्यंतरी आमच्या इथे एक केरळी कुटूंब रहायला आलं. त्यांच्या घरी खोबरेल तेलामधे बिफ तळण्याचा जो वास येतो तो मी स्वतः मांसाहारी असूनही सहन करू शकत नव्हतो . पण केवळ नाइलाज म्हणून ऍडजस्ट करावे लागायचे . सौ. तर सारखी मागे लागली असायची की दुसरं घर पहा म्हणून.

मला वाटतं की जैन लोकांच्या मनात महाराष्ट्रियन लोकांच्या बद्दल किंवा मराठी भाषिक लोकां बद्दल काही तेढ नाही. माझे स्वतःचे बरेच जैन मित्र आहेत.  हे मराठी शेजार नको म्हणणे म्हणजे केवळ  खाण्यापिण्याच्या सवयीच्या मुळेच आहे , दुसरे राजकीय कारण त्यात काहीच नाही. मराठी लोकांच्या जेवणात गेला बाजार सुकी मासळी तरी नक्कीच असते. तिचा वास, किंवा फिश शिजवताना सुटणारा वास हा शाकाहारी लोकांना अजिबात आवडत नाही .

तसेही जैन  लोकं मुळतः कांदा लसूण पण जेवणात वापरत नाहीत, त्या मुळे साध्या मसाल्याच्या भाज्यांचा वास पण त्यांना नकोसा होत असावा. ऑस्ट्रेलियन लोकांना आपल्या भारतीय लोकांच्या अंगाचा करीचा वास येतो असे ते म्हणतात. आपल्या जेवणात जे हिंग किंवा जे मसाले वगैरे वापरले जाते, त्याचा वास जरी आपल्याला सुगंध वाटत असला तरीही त्यांना नकोसा वाटत असेल तर त्यांना दोष देता येइल का?

सध्या जैन लोकांच्या सोसायटी मधे मराठी लोकांना घरं दिली जात नाहीत, म्हणजे हे एक मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचे  षडयंत्र आहे, इथला मराठी टक्का कमी करण्याची एक चाल आहे असे म्हंटले जाते.

माझा एक मुस्लीम मित्र एका सोसायटी मधे रहातो. त्या सोसायटी मधे दर इद ला बकरे, आणि इतर बळी दिले जातात. जर तिथे इतर धर्मीय लोक असते तर ते शक्य झाले नसते. ती केवळ बोहरा लोकांची सोसायटी आहे. जैन लोकांच्या प्रमाणे मुस्लीम लोकांच्या पण सोसायटी आहेत की जिथे फक्त मुस्लीम, आणि ते पण ठराविक जमातीच्याच लोकांना घरं विकली जातात.

मला एकच विचारायचंय, किती मराठी लोकं त्या टाउन साईडला करोडॊ रुपयांचे फ्लॅट्स विकत घेउ शकतात? आणि जरी घेऊ शकत असतील तर त्या जैन लोकांच्याच सोसायटी मधेच घेण्याचा अट्टाहास का? त्याच भागात इतरही स्किम्स असतातच फ्लॅटच्या. तिकडे पण फ्लॅट घेतल्या जाउ शकतो?

या गोष्टी विरुद्ध  बरेच लोक  (राजकीय नेते) मराठी व्हर्सेस जैन असा वाद निर्माण करत आहेत.  मला     संशय असाही येतो की  खरंच हा मुद्दा मराठी विरुद्ध जैन असा आहे का? की हा एक  मराठी मतांसाठी तयार केलेला (अर्थात ओढून ताणून) राजकीय  मुद्दा आहे? असंही वाटतं की  एका ठराविक जीवन शैली असलेल्या लोकांची एकत्र रहाण्याची इच्छा म्हणजे अशा सोसायटी!!