पुस्तकं -टर्मिनेटेड ??

Written by  on March 24, 2007

aटर्मिनेटर ने पाठ्य पुस्तके टर्मिनेट केली आहेत असं म्हणतात..म्हणजे या पुढे शाळांमधे मुलांना पुस्तकं न्यायची गरज पडणार नाही कॅलिफोर्नियात. कॅलीफोर्निया चे विद्यमान गव्हर्नर  अर्नॉल्ड ची आयडीया आहे ही पैसे वाचवायची..

अर्नॉल्ड श्वार्जनगर! कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.  त्याच्या कडे पाहिलं की मला खूप बरं वाटतं. एक प्लिझंट व्यक्तिमत्त्व आहे त्याचं . मला वाटतं केवळ व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हा गव्हर्नर म्हणून निवडून आला असावा.  जसा आपल्या कडे गोविंदा सारखा टुकार नट पण निवडुन येऊ शकतो तसंच असावं हे पण ….

त्याचे सगळेच चित्रपट पाहिलेले आहेत पण मला सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट म्हणजे किंडर गार्डन कॉप.. खूपच सुंदर काम केलंय त्याने त्या चित्रपटात. श्वार्जनेगर चा टिपिकल चित्रपट नाही तो..म्हणजे नुसत्या मारामाऱ्या आणि खून नाही  त्या चित्रपटात.

असो.. काल एक बातमी वाचली. अर्नॉल्ड ने कॅलिफोर्नियामधे पाठ्य पुस्तकांची गरज नसल्याचे जाहीर करुन मुलांनी आता काळाच्या बरोबर राहुन नेटवर पाठ्यपुस्तके वापरावी  असा फतवा काढला आहे. या मागचे कारण म्हणजे – आजकाल मुलं  इंटर्नेट्च्या जवळ पोहोचलेली आहेत हे फेस बुक , ट्विटर आणि इतर गोष्टींवरुन लक्षात येते.त्यामुळे मुलांना इंटर्नेटवर पुस्तकं वाचणे जास्त सोपे जाईल . मुलं सगळ्यात जास्त ऑन लाइन टेकनिक वापरतात, त्यामुळे ऑन लाइन बुक्स हे  नक्कीच पॉप्युलर होतील.

दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकांमधे ऑन लाइन असल्यामुळे चेंजेस करणं सोपं होईल. अर्थात कॅलिफोर्नियात ही नेते काही आपल्यापेक्षा फार वेगळे नाहीत . हे जे कांही केलं जातंय ते केवळ ३.५ करोड डॉलर्सचा पुस्तकं छापायचा खर्च वाचवायचा एक उपाय म्हणून श्वार्जनेगरने हा निर्णय घेतला आहे.

पुस्तकं या पुढे मूर्त स्वरुपात नसणार म्हणजे पलंगावर लोळत वाचत पडायचं सुख यापुढे मुलांना मिळणार नाही. अभ्यास करायचा म्हंटलं, की पिसी वर पुस्तकं वाचायचं, आता कंटिन्युअस वाचनामुळे डॊळ्यांचे जे काही नुकसान होईल त्याकडे मात्र सोईस्करपणे कानाडोळा केलेला आहे.मुलांचे होणारे आरोग्याचे नूकसान ह्या काही करोड डॉलर्सच्या बचतीच्या पूढे  खूपच जास्त आहे असे मला वाटते.

शाळा सुरु झाली  की नवीन पुस्तकं.. त्यांचा तो नवीन वांस.. आणि मग कव्हर्स घालण्यासाठी होणारी  तारांबळ, त्यावर नांव टाकण्यासाठी  म्हणून लेबल्स चिकटवणे , आणि…. ते आवडीच्या कार्टून्सचे लेबल मिळवण्यासाठी बाबांना १० दुकानांत फिरवलेले..अगदी त्यांनी चिडे पर्यंत.. !माझ्या धाकट्या मुलीनी एकदा मला दोन तास वेगवेगळ्या दुकानात फिरवलं होतं बार्बिचं नेम लेबल मिळवण्याकरता!  हे सगळं आता मुलं मिस करणार तर कॅलिफोर्नियामधे!!!

एकंदरीत काय.. तर कुठेही जा.. राजकारणी सगळे सारखेच!!!!!!

आधार

Written by  on March 12, 2007

लहानशा आधाराने पण फार मोठं काम केलं जाऊ शकतं.

बऱ्याच गोष्टी, किंवा  लोकं  आपल्या नकळत आपल्याला आधार देत असतात, आणि हे आपल्या लक्षातही  येत नाही, कारण आपण बऱ्याच गोष्टींना   गृहीत धरलेले असते.  आधार देणारी व्यक्ती मुद्दाम तुम्हाला आधार द्यायचा म्हणून देत नसते, तर तुमच्या तिच्या संबंधांमुळे आपोआपच     तिच्या वागण्या बोलण्यामुळे   तुम्हाला आधार मिळत असतो. ही गोष्ट तुमच्या-आमच्या  नकळत होत असल्याने आपल्याला तिचे महत्त्व समजत नाही.

अगदी लहानपणी ज्या आईच्या च हाताचा आधार घेऊन उभे रहाणं किंवा पहिले पाऊल टाकणे लहान मुल शिकतं, पन्नास एक वर्षा नंतर त्याला  त्याच आईला हाताला धरून आधार द्यावा लागतो. दोन्ही हात तेच आहेत, एकमेकांनी धरलेले,  फक्त आधार कोणी  कोणाला दिला ह्यात  बदललं झालाय.  हेच खरं आयुष्य असतं. ज्याला हे समजलं, त्याचं जीवन सोपं झालं असं समजायचं.

वयोमाना प्रमाणे आईला शारिरीक आधाराची जरी गरज  पडली , तरीही तिची मानसिक क्षमता आणि तुमच्याशी भावनिक जवळीक  इतकी जास्त असते,की  तुम्हाला जेंव्हा कधी  मानसिक आधार हवा असतो तर फक्त तिला केलेला एक फोन पण पुरेसा असतो, तिने नुसतं म्हंटलं,” की काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल,” की एकदम मनावरचं दडपण एकदम  कमी होतं.आईचा मानसिक  आधार अनकन्डीशनल असतो, नो क्वेश्चन आस्क्ड” . काही लोकं असेही म्हणतील की अशा वेळेस बायको कडूनही आधार मिळू शकतो, हे जरी खरं असलं, तरी  पण त्या आधी पन्नास प्रश्न, मग तुमचं कसं चुकलं ते,तुम्ही कसं वागायला हवं होतं म्हणजे अशी वेळ आलीच नसती – असे   ऐकल्यावर  ,    जेंव्हा ती आधार द्यायला तयार होते, तेंव्हा पर्यंत तुम्ही मानसिक दृष्ट्या जाम थकलेले असता.   पण आईचं तसं नसतं, ती अनकन्डिशनल आधार देत असते, तुमचं शंभर टक्के चुकलं असलं तरीही.

कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं, आणि ते खूप आवडलं होतं म्हणून इथे लिहितोय. “आयुष्य म्हणजे दोन्ही कडून जळणारी मेणबत्ती” , एकी कडून तुमचं घरगुती आयुष्य, तर दुसरी कडून तुमचं प्रोफेशनल आयुष्य. दोन्ही टोकं इतक्या वेगाने जळत असतात, की मधल्या मेणाच्या भागाला   नेहेमीच आधार  हवा असतो. मधल्या भागाला आधार नसेल तर मेणबत्ती खाली पडून कुठलं तरी एक टोक  ( किंवा दोन्ही टोकं ) विझण्याची शक्यता असते. मग ते प्रोफेशनल साईडचं टोकं विझणं किंवा घरगुती आयुष्याच्या बाजूचे टोक विझले तरी नुकसान सारखेच असते. एकीकडचे टोकं जास्त वेगाने जळू लागले, की मग मधला  आधार डावी- उजवी कडे सरकवून मेणबत्तीचा समतोल साधावा  लागतो. वाचतांना जरी हे  सोपं वाटत असलं तरीही आपल्या आयुष्यात  हे साध्य करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते..

जगातले सगळेच जण आधार घेतच   आपलं आयुष्य जगत असतात. दोनशे फुट उंच असलेल्या वडाच्या झाडाला पण आधार मात्र मुळांचा घ्यावा लागतो. आपलंही तसंच असतं, जीवनाच्या सुरुवातीला आई वडलांचा आधार, मग शिक्षणासाठी  शिक्षकाचा आधार,ऑफिस मधे इनक्रिमेंट्स, प्रमोशन्स साठी बॉस चा आधार, आजारी पडल्यावर डॉक्टरचा आधार, परीक्षेच्या वेळेस साई बाबा, गणपती , लकी शर्ट चा आधार- असे प्रसंगानुसार आपले   आधार बदलत आपलं   आयुष्य जगत असतो. खरं सांगायचं तर आपण तिन्ही त्रिकाळ फक्त आधारच शोधत असतो,  एक आधार सापडला, की दुसरा  त्या पेक्षा बळकट शोधण्याचा आपला स्वभाव काही जात नाही.

बरं  आपण आधार शोधत असतो ही  गोष्ट खरी जरी असली, तरीही इतर कोणाला ती कळू नये हीच आपली इच्छा असते. “मी स्वयंपूर्ण आहे , आणि मला कोणाचीच गरज नाही” हे ठणकावून सांगायला प्रत्येकालाच आवडतं. केवळ तुम्हीच नाही, तर सगळी मानवजात जरी “स्वतंत्र” दिसत असली, तरीही  एकमेकांच्या आधाराशिवाय जगु शकत नाही .जे स्वातंत्र्य आहे असं  आपण समजतो , ते खरंच स्वातंत्र्य आहे, की एकटेपणा आहे हे समजून घ्यायची कोणाचीच  इच्छा नसते.

ज्या प्रमाणे सावली   नेहेमी बरोबर असली तरी पण  अस्तित्वाची जाणीव होत नाही, तसाच आधार पण सोबतच असतो, आणि वेळोवेळी जाणीव न होऊ देता  तो तुम्हाला सावरत असतो.  सगळ्या नात्यांमधे एक आईचं सोडलं तर केवळ पती-पत्नी चं नातंच असं असतं की ज्या मधे दोघंही एकमेकांना कुठल्याही स्वार्थाशिवाय आधार देत असतात.

कुबडीला असं वाटतं, की आपल्या आधार मुळेच माणूस चालू शकतोय, पण माणसाच्या आधाराशिवाय कुबडी पण उभी राहू शकत नाही ही गोष्ट कुबडीला माहिती नसते..