हिमालयातलं कॅंपिंग..

Written by  on February 22, 2007

पुण्याच्या चार वर्षांच्या वास्तव्यात जवळपासचे सगळे गड,किल्ले पालथे घातले. दर सुटीला कुठे ना कुठे तरी ट्रेक असायचाच. एक गृप होता , त्यांच्या सोबत मी ट्रेकिंगला जायचो.

या ट्रेकर्सचं एक बरं असतं, कोणीही ट्रेकिंगला तुमच्या बरोबर  येतो म्हंटलं, की यांना खुप आनंद होतो, आणि ते नवीन र्माणसाला पण आपल्या मधे पुर्ण सामावून घेतात. त्याला असं अजिबात वाटत नाही , की आपण ह्या गृप मधे नवीन आहोत.
पुण्याला असतांना जे कांही ट्रेकिंग केलं ते फक्त ‘डे ट्रेक्स’ असायचे. म्हणजे भल्या पहाटे ५ वाजता निघायचं आणि रात्री पर्यंत परत यायचं. रात्रीचा मुक्काम असलेला ट्रेक कधीच केला नव्हता.

सगळे गड किल्ले हे दोन तिन तासाच्या अंतरावर असल्यामुळे कदाचित असेल तसं. कॅंपिंग ला जाण्याची खूप इच्छा होती, सारखं वाटायचं की कॅंपिंगला कुठे तरी जाउन मस्त पैकी पॉट लक ट्राय करावं.. पण आमच्या ट्रेक्स मधे बाहेर ट्रेकला गेल्यावर बाहेरच कुठेतरी जेवायची सोय करायचॊ.स्वतः कधीच स्वयंपाक वगैरे केला नाही.त्यामुळे ती एक इच्छा राहुन गेली.

माझी आप्पांच्या बरोबर रायगड पहाण्याची खूप इच्छा होती. मी एक दोन वेळेस तळेगांवला जाउन आप्पांना भेटून आलोर्होतो. त्यांनी पण हो… नक्की नेईन रे तुला म्हणून आश्वासन दिलं होतं. पण ……म्हणतात ना , मॅन प्रपोझेस, ऍंड गॉड डिस्पोझेस’…. माझी ट्रान्सफर सर्व्हिस डिपार्ट्मेंटला झाल्यामुळे टुरींग सुरु झालं होतं. सलग, दिड -दोन महिने टुर असायचा.

खरा आउटींग चा अनुभव घेतला तो हिमालयामधे. एकदा माझं पोस्टींग कलकत्त्याला असतांना दार्जिलिंग डुवाट्झ टी गार्डन्स मधे असतांना मला एका चहाच्या मळ्यात कामा साठी जावं लागलं.काम सुरु केलं आणि काही ऑ पार्ट्स हवे म्हणून काम बंद झालं. सामान कलकतयाहुन यायचं म्हणून दोन दिवस वेळ होता. चहाच्या मळ्यात काही काम नसतं . जर काम नसेल तर तुम्ही नक्कीच कंटाळून जाल. करमणुकीचं एकच साधन, ते म्हणजे पुस्तकं.. बस, नुसती पुस्तकं वाचून वेळ घालवायचा.

बरं वाचन तरी किती करणार? कंटाळा यायचा मग..  त्या गार्डनचा मॅनेजर , त्याला खूप आवड होती कॅंपिंगची. म्हणाला दो दिन यहां बैठके क्या करेंगे??  चलो कॅंपिंग चलते है.  चहाच्या मळ्यात जो मॅनेजर असतो, त्याला सगळे लोकं   ’बडा साब’  म्हणायचे.. सपोझ्ड टु बी अ किंग ऑफ दट एरिया, तो म्हणेल ती पुर्व दिशा. या मॅनेजर्सची फॅमिली बहुतेक दार्जिलिंग ला मुलांच्या सोबत असायची, त्या मुळे हा सडा फटींग एकटाच रहायचा. तेंव्हा नक्षलवादी इतके ऍक्टीव्ह नव्हते, त्यामुळे परिस्थिती ्खूपच वेगळी होती.

जास्त लिहित नाही पण, ह्या गार्डनच्या मॅनेजर च्या घरच्या मेड सर्व्हंट्स दर सहा महिन्याने बदलल्या जायच्या.अगदी गरीब असलेल्या त्या प्लॅंटर्स इथे येउन काम करायला खूप खूष असायच्या, कारण बडा साब च्या बंगल्यावर काम केलं, की एक्स्ट्रा बेनिफिट खुप मिळायचे. जाउ दे, विषयांतर खूपच जास्त होतंय..

दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता निघायचं ठरलं. सकाळी ५ वाजत पुर्ण उजाडलेलं होत. मस्त थंडगार वातावरण होतं. अंगात स्वेटर, जर्किन, घालुन तयार झालो होतो. ट्रेकिंग गिअर्स सगळे त्या (मॅनेजरनेच) अग्रवालने घेतले होते. जोंगा जिप – सहा सिलेंडरचं इंजीन असलेली ४बाय ४ ची जीप, वर रात्री कॅंप करायचं म्हणून फ्लड लाइट्स लावलेले, मागच्या भागात एक्स्ट्रॉ डिझल कॅन, स्लिपिंग बॅग्ज, स्टोव्ह, एक मोठं भांडं, फ्राय पॅन, एक लहानशी पिशवी , ज्या मधे खाण्याच्या वस्तु आणि मसाले, तेल वगैरे,एक वॉटर बॅग, एका कोल्ड केस मधे चिकन चे पिसेस (स्टिम्ड )ठेवलेले होते.- फिशिंग करण्याचा काटा,त्याला काय म्हणतात ते माहिती नाही, आणि बराच संसार होता.. मला हे सगळं पाहून गम्मतंच वाटली. मी त्याला म्हंटलं पण, अरे आपण कॅम्पिंगला जाणार की तिथे जेवायला जाणार?? नुसता हसला तो.. आमच्याच गाडी मधे अजुन तिन मित्र होते त्याचे.

आमचा पांच जणांचा गृप निघाला. वळणा वळणाच्या रस्त्याने शेवटी आम्ही इच्छित ठिकाणी पोहोचलो. अगदी व्हर्जिन प्लेस होती ती. अग्रवालला या भागाची चांगली माहिती होती, आणि याच जागी तो आधी पण कॅंपिंगला आलेला होता. समोरच नदीचं खळखळतं पाणी वहात होतं. एका बाजुला जरा खोल पाणी असल्यामुळे जरा थांबून वहात होतं पाणी. त्या पाण्यामधे हात घातला, आणि एकदम बाहेर ओढून घेतला.. बर्फाचं वितळून झालेलं पाणी खुप गार होतं. मागे मागे डोंगर — छे.. हिमालयाला डॊंगर म्हणण्याचा करंटे पणा कसा करु शकतो मी? मागे हिमालय, समोरुन नदीचं पाणी खालच्या अंगाला वहात जाणारं.सुंदर निसर्ग दृष्य होतं.

ड्रायव्हरने वाळलेल्या लाकडं जमा करणं सुरु केलं होतं. आम्ही पण तेच काम करु लागलॊ. पुरेसा लाकुड फाटा जमा झाला होता. टेंट्स आणलेले नव्हते. म्हणजे रात्री ऊघड्यावरच झोपावं लागणार अग्रवाल म्हणतो, रात्री इथे वाइल्ड लाइफ पण बघायला मिळेल. हे ऐकलं, आणि मनातुन घाबरलोच होतो, त्याला प्रश्नार्थक मुद्रेने म्हंटलं…… वाइल्ड लाइफ?? त्यावर तो सहज पणे म्हणाला, कोल्हे, लांडगे, एखादं अस्वल, जंगली हत्ती वगैरे.. सहज म्हणून त्याने शेजारीच पडलेली लिद दाखवली, म्हणाला, ही लिद दिसते आहे ना ती लांडग्यांची आहे – माझा चेहेरा पाहिला, आणि तो अगदी मनसोक्त ह्सला. अरे साहब, कुच नही होगा.. चिंता मत करो, आणि त्याने आपलं रिव्हॉल्व्हर दाखवलं.. म्हणाला, आज तक इतने बार कॅंपिंग किया, लेकिन इसका वापर सिर्फ रॅबिट मारनेके लिये ही किया है…

दुपारचे १२ वाजत आले होते. भुका लागल्या होत्या. अग्रवाल ने अंडी काढली, म्हणाला रोस्ट अंडा खिलायेगा आपको.. रोस्ट अंडा??? त्याने समोरचा चिखल जमा केला. जरा घट्टंसरंच होता तो. अंडं त्या चिखलाच्या गोळ्यामधे गुंडाळले, आणि तो गोळा अल्युमिनियम फॉइल मधे गुंडाळुन समोरच्या कॅम्प फायर मधे टाकला. म्हणाला, हिमालय का मिट्टी का असर है की ये अंडा जलता नहीं..थोड्यावेळाने, ती अंडी बाहेर काढुन त्यावरचं मातिचं कव्हर जे आत पक्कं झालेलं होतं ते तोड्लं.. आणि बॉस सांगतो.. असं अंडं मी कधी आयुष्यात खाल्लेलं नव्ह्तं..

अग्रवालच्या एक्पिरियन्स कॅम्पर असल्याच्या गोष्टी वर या घटनेने शिक्का मोर्तब केलं. जवळपास कुठेही जाउन या पण फार दुर जाउ नका..  त्याचे दोन मित्र पाण्यामधे गळ टाकुन बसले होते फिश पकडायला. सोबतच एक लांबसर जाळी पण होती. चौकोनी जाळी तिला एक लांब दांडा. म्हणाला जर काट्याने मासे पकडता आले नाही तर ही जाळी धरुन बसायचं, प्रवाहात येणारे मासे सहजतेने पकडता येतात या युक्तीने.

जेवणाची तयारी करायची. आग पेटलेलीच होती. असलेल्या गोष्टी म्हणजे चिकन वगैरे सगळं संपवलं. चिकन पण त्याने आधी अल्युमिनियम फॉइल मधे पक्कं गुंडाळून मग वर चिखलाचा गोळा  लाउन समोरच्या कॅंप फायर मधे टाकलं. ब्रेड होतीच सोबत आणलेली. जेवण होई पर्यंत बराच वेळ गेला. आता मात्र झोप येत होती. इथे दुपारी ४, ४-३० वाजताच अंधार पडणं सुरु होत्तं .

आम्ही फिरायला निघालॊ,बराच वेळ भटकून परत आलो. अग्रवालने समोरच्या उतारावर जाउन सशाची बिळं तपासु लागला, म्हणाला, इथे ससे खुप मिळतात. रात्री करता बघतो एखादा. अग्रवाल आणि एक मित्र ससे पहायला गेले, आम्ही तिथेच त्या नदीशेजारी चंदेरी स्वच्छ पाण्याकडे पहात बसलो होतो.

अंधार पडणं सुरु झालं होतं. फक्त नदीचा खळखळणारा आवाज.. आणि रात किडे, पक्षी यांचे आवाज.  हॉरर सिरियल प्रमाणे वातावरण निर्मिती झालेली होती. थोड्याच वेळात अग्रवाल परत आला, म्हणाला, ससा मिळाला नाही.. तशी फारशी भुक नव्हतीच, पण समोरच्या आगी मधले थोडे निखारे आणि लाकडं बाजुला करुन  तिन दगड माडुन त्यात तांदुळ, चिकन, डाळ, आणि मसाले घालुन शिजत ठेवलं.

अग्रवालची रमची बाटली निघाली होती बाहेर.. थंडी मुळे थोडं जरी दुर झालं त्या आगी पासुन तर एकदम हुडहुडी भरायची.  पकडलेले मासे पण होते. माश्यांची डॊकी कापुन टाकली आणि मग त्यांना तसंच ग्रिल वर ( ग्रिल म्हणजे चक्क एक ८ एम एम रॉड्स ची जाळी होती) वर भाजायला ठेवले. त्या फिश मधुन थोडं थोडं पाणी खाली निखाऱ्यावर पडुन चर्र असा आवाज येत होता. फिश पलटवायला दोन काड्या घेउन त्यांनीच पलटवल्या फिश.. अर्धवट झालेली फिश , आणि सोबत आणलेले फर्साण, यांच्या बरोबर रम सुरु झाली. किती वेळ आम्ही बसलो होतो काय माहिती. वेळ थांबल्या सारखी झालेली होती.  अग्रवाल म्हणे, उद्या सकाळी आपण ट्रेक ला जाउ या. समोरच एक मंदिर दिसत होतं.. खुप उंचावर.. म्हणे तिथे जाउ या उद्या सकाळी..

मी जरी या सगळ्यांच्या बरोबर बसलो होतो, तरी पण माझी नजर मात्र एखादं हिंस्त्र श्वापद येतं का या विचारानेच इकडे तिकडे शोध घेत होतं.. समोरच्या अंधारात डोळे वगैरे काही चकाकतांना दिसतात कां? म्हणुन मी डोळे फाडुन बघत होतो. चांगले तिन -चार लार्ज झाल्यावर मात्र जेवणं आटोपली आणि स्लिपिंग बॅग मधे शिरलो. त्या रेक्झिनच्या स्लिपिंग बॅगचा थंडगार स्पर्श अगदी हाडांच्या पर्यंत शिरला. अंग शहारलं…बराच वेळ वरचे तारे मोजत बसलो , आणि नंतर कधी झोप लागली ते समजलंच नाही.

हा एक विचित्र  हो.. विचित्रंच अनुभव वाटत होता. थोडी भिती, थोडी  हुरहुर.. थोडी गम्मत, मजा सगळ्यांचं मिश्रण होऊन एक्वेगळं फिलिंग येत होतं. सकाळी उन डोक्यावर आलं होतं -ऊठल्यावर सहज घड्याळात पाहिलं तर फक्त ७ वाजले होते. रम मुळे सकाळी अजिबात हॅंग ओव्हर नव्हता.

ब्रश केला, प्यायचं पाणी जे सोबत आणलं होतं ते संपलं होतं. मी नदिमधलं पाणी पिणार तेवढ्या  अग्रवालने मला थांबवले. समोरच्या नदी जवळ गेला आणि लाकडाच्या तुकड्याने रेतिमधे खड्डा करु लागला. २ -३ इंच खोल केल्यावरच पाणि लागलं, पण तरिही त्याने खड्डा चांगला ८-१० इंच खोल आणि तेवढाच रुंद केला. गढूळ पाणी जमा झालं होतं. एका प्लास्टिक च्या लहान ग्लासने ते पाणि काढुन टाकलं, आणि थोड्याच वेळात स्वच्छ पाणि दिसायला लागलं . ते स्वच्छ पाणी वॉटर बॅग मधे जमा केलं.त्यामधे एक क्लोरिनची गोळी घातली आणि मला म्हणाला, अब ये ठिक है….!! अब इसे पी सकते है..!!

तसा दुसरा दिवस फारसा इव्हेंटफुल नव्हता. आता समोरचं निसर्ग सौंदर्य पहाण्याची पण डॊळ्यांना सवय झालेली होती. जे कांही ’वाह’ तोंडातून निघायचं ते निघून गेलं होतं. समोरच्या मंदीरामधे जायला निघालो. अग्रवालने समोरच्या नदीतून पाणी आणलं आणि आग विझवली. आणि आम्ही दर्शनाला निघालो. सोबत वन्य प्राणी म्हणजे  केवळ माकडं दिसली. इतर कुठलाही प्राणी पहायला मिळाला नाही. अग्रवाल म्हणे , नशिबात नसेल तुमच्या तरच दिसेल .. नाहितर  काहीच चान्स नाही… आमचं नशीब खराब होतं.

दर्शन घेउन पुन्हा बेस कॅम्पला आलो. दुपारचं जेवण बनवलं, ससा पण मिळाला नाही अग्रवालला.. मग पुन्हा मासे आणि भात, सोबत उरलेली ब्रेड होतिच.. ती संपवुन परत निघालो गार्डनला.जातांना एका धाब्यावर थांबुन व्यवस्थित जेवलो आणि मग लक्षात आलं , की खरंच भुक लागली आहे आपल्याला खुप म्हणून..

तर असा होता पहिला आउटिंगचा अनुभव. हा अनुभव आहे मी  सर्व्हिस इंजिनिअर असतांनाचा, म्हणजे २२ वर्षांपुर्वीचा…  :)असा अनुभव पुन्हा कधी घेता आला नाही, पण थॅंक्स टु अग्रवाल फॉर प्रोव्हायडिंग सच नाइस एक्स्पिरिअन्स… !!