हर एक दोस्त जरूरी होता है…

Written by  on December 17, 2006

kayvatelteबरेच मित्र असतात आपले. काही चांगले काही वाईट, तर काही खूप चांगले. प्रत्येक मित्र हा एक वेगळ्या प्रकारचा असतो, कुठलेही दोन मित्र एकसारखे कधीच सापडत नाही. प्रत्येक मित्रा मध्ये एक युनिक क्वॉलिटी असते. मित्रांचं ऍनॅलिसिस करावे असे कधीच वाटत नाही, पण ते आपोआप सुरु होतं ते एखाद्या मित्राने मित्र म्हणून खांद्यावर हात ठेऊन  पाठीत सुरा खुपसल्यावर.  असो.

अगदी नर्सरी पासून मित्र हा कन्सेप्ट सुरु होतो. मुल नुकतंच घराबाहेर पडलेले असते, नेहेमी आईच्या प्रोटेक्शनची सवय असते, पण एकदम जेंव्हा ज्यु. केजी मधे जायची वेळ येते, तेंव्हा आधी तर आईचा आधार  शिक्षकांमध्ये शोधायचा ते मुल प्रयत्न करते, पण एक शिक्षक वर्गातल्या ६० मुलांना कसा पुरणार? मग बरोबरच्या मुला- मुलींशी मैत्री होते – ते पण एक गरज म्हणून!

वय वाढत जातं, आणि मग  पौगंडावस्थेत पोहोचल्यावर तर नातेवाईकांपेक्षाही  मित्र जास्त जवळचे वाटायला लागतात. मित्राच एक वेगळं विश्व तयार होतं.सध्या टिव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती प्रमाणे प्रत्येक मित्र हा युनिक सॅंपल असतो . प्रत्येकाची कॅटॅगरी, वागण्याची पद्धत एकदम वेगळी असते. कधी आपल्या मित्रांचे ऍनॅलिसीस केले आहे का? एक मेल आली होती, मित्र कसे नसावे याची काही दिवसापूर्वी!

गरजू:- हा पहिला प्रकार . ह्याला जेंव्हा पैशाची गरज पडते, तेंव्हा तो तुमच्या कडे येतो, आणि बराच वेळ गप्पा मारल्यावर अडचण आहे म्हणून पैसे मागतो. तुम्ही पैसे दिल्यावर, याची आणि तुमची भेट एकदम तो पैसे परत करायला येतो तेंव्हाच होते. एकदा पैसे परत केले, की नेक्स्ट भेट पुन्हा त्याला गरज पडेल तेंव्हाच!

खरा मित्र :- हे तुमचे अगदी खास जवळचे मित्र असतो आणि तुमच्या चांगल्या वाईट प्रसंगात तुमच्या बरोबर ( तुम्ही न बोलावता )असतो. असे फार कमी मित्र असतात.

त्रासदायक मित्र :- हे मित्र तुम्हाला कायम कुठल्या तरी  लफड्यात अडकलेले असतात. आणि तुम्हाला पण अडकवतात. जसे मुलगी  ह्याने पटवली असते, पण पळून जाऊन लग्न करायला तुमची कार हवी…. 🙂

जुने शाळेतले / कॉलेज मधले मित्र :-  मौल्यवान! ह्यांच्याशी तुम्ही कधीही गप्पा मारायला बसाल  तर वेळ कसा जाईल ते समजणार नाही. तुमच्या जीवनातला बहुमूल्य ठेवा असतात हे  मित्र!

फोनाळ मित्र : – ह्यांच्याकडे तुम्हाला भेटायला अजिबात वेळ नसतो, पण फोन वर मात्र तुमच्याशी हे तास अन तास गप्पा मारतात. तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात, पण भेट मात्र टाळतात. भेट मात्र अगदी कधी तरी होते, ती पण योगायोगानेच – ठरवून नाही!

एक्स्ल्युझिव मित्र :- यांची अपेक्षा असते की तुम्ही फक्त यांच्याबरोबरच मैत्री करावी. त्यांना न आवडणाऱ्या मुला- मुलींशी तुम्ही अजिबात मैत्री करू नये अशी यांची अपेक्षा असते.   ( उदाहरणार्थ:- जर तुम्ही पुरुष असाल तर  मैत्रिण अशी असते).

कुबेर मित्र :- हे म्हणजे पैशाची खाण असलेले मित्र असतात. यांना तुम्ही कधीही पैसे मागितले तरी पण ह्यांच्याकडे तयार असतात . एक फोन केला की पंधरा मिनिटात तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर करतात. पैसे देतांना पण आपण काही उपकार करतोय अशी भावना यांची नसते, त्यांच्या दृष्टीने ही एक सामान्य घटना असते.

कंजूस मित्र:- वर दिलेल्या कुबेर मित्रांच्या अगदी विरुद्ध यांची वागणूक असते, कधी पैसे मागितले, तर मिळण्याचे चान्सेस कमीच!  जवळ असूनही शक्यतो देणार नाहीत. जर कधी खूपच गळी पडलात, तर परत कधी देणार? मला पण पैशाची गरज आहे वगैरे वगैरे दहा गोष्टी सांगून मग पैसे देणार हे तुम्हाला.जर कधी पैसे दिलेच तर इतर दहा मित्रांना पैसे दिले आहेत ही गोष्ट रंगवून सांगणार.

त्रासदायक मित्र : – हे कायम कुठल्या ना कुठल्या तरी लफड्यात अडकलेले असतात. यांना तुम्ही कधीही भेटला किंवा फोन केला तरी पण हे मित्र तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम्सचा पाढा वाचून दाखवतात , आणि तुमच्याही नकळत तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम मधे अडकवतात.. हे मित्र कसे ओळखायचे?? यांचा फोन आला, की तुमच्या कपाळावर चार आठ्या आपोआप तयार होतील , फोन उचलायच्या पूर्वी!

अदृष्य मित्र : – हा तुमचा चांगला मित्र असतो, पण तुम्हाला जेंव्हा कधी याची गरज पडते, तेंव्हा हा ह्याला कधीच वेळ नसतो. तुमच्या गरजेच्या वेळेस सोइस्कर पणे   तुम्हाला टाळून इतर काही तरी करणार हा !

सहानुभूती दाखवणारे : -तुम्ही जेंव्हा खूप ’लो’ असाला, आणि तुम्हाला जर कोणाच्या तरी बरोबर आपले प्रॉब्लेम शेअर करायचे असतील तर हे मित्र  उपयोगी पडतात. तुम्ही जे सांगाल ते  सिंपथॅटिकली न कंटाळता ऐकतात. सायकॉलॉजिस्ट चा खर्च वाचवायला हे मित्र उपयोगी पडतात.

बडबड्या मित्र :- वर दिलेल्या सहानुभुती वाल्याच्या अगदी विरुद्ध . हा तुम्हाला अजिबात बोलू देणार नाही. स्वतःच इतकी बडबड करेल की जेंव्हा तुमची बोलायची वेळ येईल तेंव्हा तुम्ही स्वतः आपण काय बरं बोलणार होतो? हेच विसरून जाल.

संशयी मित्र : – तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी वर संशय घेणारे .  सहजासहजी तुमच्यावर हे विश्वास ठेवत नाहीत.तुम्ही सांगितलं की मित्राबरोबर सिनेमाला गेलो होतो, तर हे  तो मित्र होता की मैत्रिण?? हा प्रश्न नक्की विचारतील.यांना तुम्हाला यांची मैत्री नको आहे असाही संशय मनात असतो, आणि ते वेळोवेळी तुमच्याकडून तसे नाही -हे वदवून घेण्याचा प्रयत्न करतात.

स्वप्नभंजाळलेले :- हे मित्र तुमच्या कुठल्या स्वप्ना मधे ऍक्टीव्हली सहभागी  होतात. जसे तुम्ही म्हंटले की ” मी बिझीनेस सुरु करतो” तर ताबडतोब हे मित्र तुमच्या बिझीनेस मधे स्वतःला पण सहभागी होऊन रुपरेषा तयार करणे सुरु करतात. 🙂

वार्षिक मित्र :- तुम्ही गावाकडे सुटी मधे गेलात आणि  ह्यांना भेटलात की मधे एक वर्षाचा काळ गेला होता हे लक्षात पण येत नाही असे हे मित्र असतात. असेच काही मित्र तुम्ही रहाता त्याच शहरातले पण असू शकतात, यांची नियमीत भेट होत नसते, पण कधी भेट झाली की मधला काळ गेला होता हे विसरायला होते.

काळजीवाहू मित्र :- तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला की  हे मित्र +व्ह अटीट्यूडने तुमचे मओधैर्य वाढवतात.प्रसंगी तुमच्या वतीने भांडण्यास पण हे उभे रहातात.

सल्लागार :- हे मित्र तुम्ही न मागता पण सल्ला देणयसाठी काय्म तयार असतात. तुम्ही कितीही नको नको म्हंटलं, तरीही हे सल्ला देणे काही बंद करत नाहीत.

नो रिप्लाय फेंड्स :- हे मित्र कधिच फोन उचलत नाहीत, तुम्हाला असा पण संशय येतो की ह्याचा नंबर तर बदललेला नसेल ना?? पण यांना काम पडले की मात्र यांचा फोन नक्की येतो.

गुप्त मित्र :_ हे तुमचे मित्र/मैत्रिण असतात, पण इतरांना ते कळू नये अशी यांची इच्छा असते. कधी रस्त्यावर भेटलात तर ओळख न दाखवता पण पुढे निघून जातात.

नो कॅटॅगरी :- हे तुम्हाला नेहेमी कुठला ना कुठला फेवर मागत असतात . असे कधीच होत नाही, की ह्यांची भेट झाली, आणि ह्यांनी काही मागितले नाही!

चिपकू:- कुठेही जातांना तुम्ही यांच्या सोबत जावे अशी अपेक्षा करतात, तुमच्या वेळेची यांना अजिबात किंमत नसते.

ब्लॉगर मित्र : – यांची कंपनी मस्त असते, पार्टी खादाडी ट्रेक या साठी बेस्ट! लिखाण हा कॉमन इंटरेस्ट असल्याने वेळ मस्त जातो , यांच्यासोबत असतांना.

आळशी मित्र :- तुमच्या कुठल्याही गृप च्या कार्यक्रमांना येण्याचा कंटाळा करणारे  🙂

फेसबुक फ्रेंड्स :- हे स्वतः कधीच फेसबुक वर अपडेट्स देत नाहीत, पण तुमचे अपडेट्स नेहेमी पहात असतात, त्यामुळे यांना तुमच्या बद्दल बरीच माहिती असते, पण तुम्हाला मात्र यांच्याबद्द्ल अजिबात काही माहिती नसते.

ऑप्टीमिस्ट:-  तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम चे सोल्युशन यांच्याकडे असते

पेसिमिस्ट :- तुमच्या प्रॉबेम मधून तुम्ही कसे बाहेर पडू शकत नाही, आणि “आता तुमची वाट लागली आहे ” हे पटवून देण्याचे काम इमानेइतबारे करतात.

हुषार मित्र :- याला तुम्हाला काय हवे आहे हे आपोआप समजते आणि त्या प्रमाणे तो वागत असतो.

सायको :- तुम्हाला काही पॉब्लेम तर नाही ना? ही गोष्ट तुम्ही “काही प्रॉब्लेम नाही”  हे उत्तर दिल्यावर पण हजारदा विचारतो, आणि शेवटी तुम्ही ओपन होत नाही म्हणून रुसुन बसतात . ( हे बहुतेक मुलगा असेल तर मैत्रिणीच्या बाबतीत घडते )

कलिग मित्र :- हे तुमचे मित्र नसतात,  पण मित्र असल्याचा आभास निर्माण करण्यात एक्स्पर्ट असतात. ह्यांच्यापासून सांभाळून राहणेच योग्य.

कल्ला करणारे :- हे मित्र तुमच्या घरी येऊन तासाभराने परत गेल्यावर घर एकदम शांत वाटायला लागतं..

विसरभोळे :- तुमच्याकडून घेतलेले पुस्तक, पैसे वगैरे परत देण्याचे हमखास विसरणारे.

अजुनही बरेच प्रकार असतील पण इथे थांबवतो कारण तसाही  लेख खूप मोठा झालाय. तुम्हाला काही सुचत असतील तर इथे नक्की लिहा कॉमेंट मधे.

कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी

Written by  on December 13, 2006

एका कलिगचा फोन आला. एक हॅबि्च्युअल जॉब हॉपर. आमच्या कंपनीत त्याची ही तिसरी नौकरी- फार तर दोन वर्ष झाले असतील जॉइन करुन. म्हणाला, की त्याला हेड हंटर्स कडून एक नवीन जॉब ऑफर आलेली आहे – जावं का सोडून?  सांगत होता  की कंपनी पण चांगली आहे, सॅलरी हाईक (’जंप’ हा शब्द वापरला जातो नेहेमीच) पण जवळपास ३८ टक्के आहे- तेंव्हा मी आता पेपर टाकायचा विचार करतोय – तुमचे काय मत आहे?

काही कंपन्या पेपरला किंवा नेट वर जाहिराती न देता सरळ प्लेसमेंट एजन्सीज ला हे काम देतात. शक्यतो कॉंपिटीटर्स कडले लोकं फोडून आणायचे काम ह्यांना सांगितलं जाते. एखादा कॉंपिटीटर कडला माणुस घेतला म्हणजे दुसऱ्या दिवसापासून कामाला लागू शकतो. काही ट्रेनिंग  वगैरे देण्याची गरज भासत नाही किंवा त्याला नवीन कंपनीत  सॆट व्हायला वेळ पण  लागत नाही.

हेड हंटर्स  ना काम देतांना नेहेमीच बरेचदा  कॉंपिटीटरचा एखादा खास माणूस पण फोडून आणण्याची जबाबदारी दिली जाते.  मार्केटींग च्या क्षेत्रा मधे दुसऱ्या कंपनीच्या लोकांचा संबंध नेहेमीच आपल्या कॉंपिटीटर्स शी येत असतो. त्या मूळे  कॉंपिटीटर कडे   पण कोण  चांगले लोकं आहेत ह्याची  माहिती असते. ’हेड हंटर्स ’   अशा लोकांशी फोन वर संपर्क साधून त्यांना नवीन नोकरीच्या संधीची माहिती सांगून आपला रेझुम पाठवायला सांगतात .

तो एक चांगला मार्केटींग इंजिनिअर आहे. सोडून गेला, मॅनेजमेंटच्या भाषेत कंपनीसाठी ’असेट’ आहे तो, आणि पुर्वी दोन वेळा जॉब बदलण्याचा निर्णय घेतलेला. असे असतांनाही त्याला आज काय करावे हा प्रश्न का पडावा याचे आश्चर्य वाटले.

एक अपॉर्चुनिटी आहे, पण त्या संधीची   व्हॅल्युएशन करता येत नाही – की अपॉर्चुनिटी घ्यायची की नाही?कदाचित आज घेतली नाही तर उद्या पश्चाताप होईल , आणि जर घेतली आणि तो निर्णय चुकीचा निघाला तर?असे प्रश्न नेहेमीच डोक्यामधे भुंग्याप्रमाणे कुरतडत असतात.

मॅनेजमेंट आणि एकॉनॉमिक्स मधे ” कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी” हा कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट जर अशा प्रसंगात वापरला तर योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. तुमच्या आयुष्यात बरेचदा संधी(अपॉर्चुनिटी) येते , पण तिची खरी किंमत किती हे समजत नाही. त्या मूळे बरेचदा तर योग्य संधी पण गमावली जाते. ’संधीची किंमत ’ (कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी)म्हणजे काय ते समजले तर संधीचे इव्हॅल्युएशन व्यवस्थित करता येउ शकते . ते कसे ? थोडक्यात सांगतो..

आता समजा, तुम्ही हॉटेल मधे गेलात.   चिकन , आणि फिश   दोन्ही तुम्हाला आवडतात, आणि जी  हवी ती डीश खायची संधी आहे -पण तुम्ही एकच डीश ऑर्डर करु शकता!!”अशा प्रसंगी जर तुम्ही समजा फिश ऑर्डर केली ,   तर याचा अर्थ फिश साठी तुम्ही चिकनची संधी नाकारली.   थोडक्यात   चिकन म्हणजे  फिश खाण्यासाठी तुम्ही दिलेली कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी”. थोडं कन्फ्युजिंग वाटतंय?

बरं दुसरं साधं उदाहरण, समजा तुम्ही दहा रुपयांचं लॉटरी तिकिट घेतलं विकत . आणि तुम्हाला त्या तिकिटाचे १० लाख जिंकण्याची संधी दिली- म्हणजेच त्या संधीची किंमत आहे दहा रुपये..

अजून एक उदाहरण, रविवारचा दिवस आहे. तुम्हाला पुलं च नवीनच पुस्तक वाचत घरी पडून ’आळशाचा रविवार” ( लेझी संडॆ) एंजॉय करायचा आहे. तुमचा दहा वर्षाचा मुलगा/मुलगी तुम्हाला बाहेर सिनेमाला चल म्हणून मागे लागतात. तेंव्हा या केस मधे सिनेमा पहाण्यासाठी तुम्ही आवडीचे पुस्तक वाचनाच्या संधीचा बळी देताय.खेळण्याच्या ऑपॉर्चुनिटी कॉस्ट म्हणजे तुमचे पुस्तकाचे वाचन.

तुमच्या दृष्टीने कुठल्या गोष्टीला प्राथमिकता द्यायची त्या वर सगळे निर्णय अवलंबून आहेत. बरेचदा लहानशा संधीची किंमत खूप जास्त असते, किंवा खूप मोठी संधी पण फार कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. इथे जे लिहिलंय ते  इकोनॉमिक्सच्या संदर्भात, पण तीच गोष्ट आपल्या आयुष्याच्या संदर्भात पण खूप उपयोगी ठरते.

जसे नोकरी बदलायची आहे, तेंव्हा नवीन  नोकरी मधे जरी जास्त पैसे मिळत असतील तरीही तुम्ही तुम्ही मिळवलेली सध्याच्या नोकरी मधली  गुडविल ही तर  त्या नवीन  नोकरीची  ऑपॉर्चुनिटीची कॉस्ट झाली.

ही तर तुम्हाला कुठल्याही परिस्थिती मधे भरुन येत नाही. तसेच  नवीन नोकरी मधे जर जास्त बेनिफिट्स असतील, पण जर नवीन कंपनी कमी टर्न ओव्हर असणारी असेल, तर मग त्या केस मधे तुम्ही नवीन नोकरी करता मोठ्या एस्टॅब्लिश्ड कंपनीची नोकरी सोडणे ही किंमत देता.

बरेचदा लोकं  डेसिग्नेशन साठी पण नोकरी बदलतांना पाहिलेले आहेत. लहान कंपनी मधे थोडेसेच जास्त पैसे पण खूप मोठी पोस्ट मिळाली तरी पण लोकं नोकरी बदलतात. “एक तर मोठ्या कंपनीत लहान पोस्ट वर काम करा, किंवा लहान कंपनीत मोठ्या पोस्ट वर”  चॉइस तुमचा. त्या कलीगला पण हा कन्सेप्ट   सांगितला, आणि म्हंटलं  तूच आपला काय तो निर्णय घे.

मुंबई आणि मराठी माणुस…

Written by  on December 4, 2006

photo. courtsey .http://http://unsettledcity.wordpress.com ^(http://rangmarathiche.com/goto/http://http//unsettledcity.wordpress.com)

हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत.

कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं वाटलं. सगळ्या पाट्या ’मराठी’  मधे लिहिलेल्या होत्या. माझा ’मराठी प्रेमी”  उर अभिमानाने भरून आला. जय हो!  सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठी मधे- अजून काय पाहीजे? चक्क एका झटक्यात एक धमकी दिली तर सगळ्या पाट्या मराठी मधे केल्या बघा सगळ्या .

पण हा आनंद फारच कमी काळ टिकला.   सगळ्या दुकानांच्या वरची नावं जरी देवनागरी मधे होती, तरी दुकानांचे मालक मात्र सगळे  हिंदी आणि गुजराथी वगैरे   आहेत हे प्रकर्षाने जाणवले . औषधालाही   पण एकही   दुकान मराठी माणसाचे  दिसले नाही जवळपास अर्धा  किमी च्या मुख्य रस्त्यावर .

एक पाटी   लावलेली पाहिली ’कला केंद्र मालाड ’मधे,- लिहिलं होतं, “दो शर्ट पे लेपटोप बेग फ्री”, तसेच दुसऱ्या  एका दुकानावर वाचले की  इथे ’पेंट पीस मिळेल’, तसेच एका बाजूला बोर्ड लागलेला दिसला, की “होल बाजूमे आहे.” -मला वाटतं हॉल बाजुला आहे लिहायचं असावं.

तर या अशा पाट्या वाचणे म्हणजे  निव्वळ मनोरंजन जरी होत असलं तरीही हे सगळं पाहिल्यावर  खूप वाईट झाले.  मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय?? मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय अपेक्षित असतं? हे सगळं पाहिलं की  मला प्रश्न पडतो, खरंच आपण काय मिळवलं हो मराठी पाट्या लावून? कसली मराठी अस्मिता जपली आपण??  जर सगळ्या दुकानांचे मालक मराठेतर असतील तर ह्या देवनागरी मध्ये लावलेल्या पाट्यांना काय अर्थ आहे?? हा  प्रश्न मेंदू कुरतडतोय , आणि मी  उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय कालपासून.

मुंबईतल्या इतर भागात मराठी पाट्या जरी असल्या , तरीही   माटुंगा भागात  मात्र दुकानांची नावं तामीळ मधे लिहिलेली दिसतात. जैन ज्वेलर्सचे पण नांव तामीळ मधे वाचून मला आश्चर्यच वाटले.  एका रांगेतल्या सगळ्याच दुकानांची नावं तामीळ मधे आहेत.  दक्षिण भारतात पाट्या पण त्यांच्या मातृभाषेत आणि दुकानांचे मालक पण स्थानिक दक्षिण भारतीय भाषिकच आहेत पण  आपल्याकडे तसे  का नाही  याचा विचार व्हायला हवा. असो.

मराठी लोकांची मुंबई असं आपण म्हणतो.पण खरंच  तसं आहे का? मुंबई मराठी लोकांची  आहे?

कदाचित वाचून वाईट वाटेल पण मुंबई मराठी माणसांची राहिलेली नाही. पूर्वीचे दिवस आठवतात का? साधारण जेंव्हा शिवसेना तयार झाली ते दिवस? ‘१९५५’ चं साल असेल .. तेंव्हा मराठी माणसांची टक्केवारी मुंबई मधे ६० टक्क्यांच्या वर होती  ( ज्या ६० टक्क्यांच्या जोरावर मुंबई सहीत संयुक्त महाराष्ट्र झाला )ती आज दुर्दैवाने १५ टक्यावर घसरलेली आहे .

ह्या ६० टक्क्यांमधे कोण होतं? माथाडी कामगार, मिल मजूर आणि इतर दुकानदार .. मुंबई पोर्ट ट्रस्ट वर हजारो गोदी कामगार काम करायचे . परदेशातून येणाऱ्या जहाजांची वर्दळ खूप जास्त होती. माथाडी कामगार म्हणजे गरीब कोंकणी मराठी माणूस मर मर काम करून दोन वेळची भाताची सोय करायचा.

रहाण्यासाठी  जागा, अर्थातच जवळपासच्या चाळींमध्ये! एका खोलीत  आपला संसार थाटायचा. लाल बाग, परळ सुतळी बाजार, लोहार चाळ भागातही अशा अनेक   चाळी होत्या.    नंतर कोणाचं डॊकं चाललं ते माहीत नाही, पण मुंबई पोर्ट   पोर्ट उरणला    (जवाहरल पोर्ट) नेणे हे मराठी माणसाच्या  पोटावर पाय देणारे ठरले. सगळा माथाडी कामगार वर्ग  मुंबईतून  उरणला तडीपार  झाला. मराठी माणसाचा टक्का घसरणे सुरु झाले मुंबईतले. “मला तर वाटतं की ही एक सोची समझी साजीश होती मराठी लोकांचे मुंबईतले वर्चस्व कमी  करण्यासाठी ? ”

सगळ्या कापड गिरण्या पण चांगल्या  जोरात सुरु होत्या. मुंबईचे दमट हवामान कापड उद्योगास पोषक म्हणून इथे चांगल्या क्वालीटीचे सुती कापड तयार केले जायचे. कोहिनूर, सेंच्युरी, डॉन वगैरे असंख्य मिल्स इथे सुरु होत्या . काही मिल मालकांनी तर कामगारांसाठी चाळी पण बांधल्या होत्या .  तेंव्हा  हा सगळा  कामगार वर्ग  लाल बाग, परळ , दादर, या भागात चाळींमध्ये रहात होता.. कुठल्याही जागी  पहा, तरी मराठी नावं  दिसायची – राणे, पवार, पाटील , ओक, जोशी ,भालेराव,  चितळे, परब, चव्हाण, केळकर,   प्रत्येक घराच्या पाटीवर.

कापड मील मालकांना पण भरपूर नफा मिळायचा . कित्येक मालक करोड पती झाले केवळ याच धंद्यावर. वर्षातून कमीत कमी एकदा तरी कामगारांना बोनस मिळायचा- आणि जास्तीत जास्त तीन वेळा.  या मिल मधे काम करणारा कामगार वर्ग परळ, लालबाग, प्रभादेवी , वरळी या भागात चाळीं मधे रहायचा. बऱ्याच मील मालकांनी तर मिलच्या आवारात पण चाळी बांधल्या होत्या कामगारांसाठी. नंतर तो ऐतिहासिक संप झाला, आणि     या सगळ्या  फायद्यातील मिल्स  लवकरच  एका पाठोपाठ  सगळ्या   बंद पडल्या- (की जमिनींचे सोन्या सारखे वाढलेले भाव बघून मालकांनी  कामगार नेत्यांच्या संगनमताने बंद पाडल्या  ?हा  प्रश्न अजूनही मला छळतो.)  मिल कामगार,   जे मुंबईला  चाळीत रहात होते, त्यांनी चाळीतली घरं विकून लवकरच सबर्ब मधे घरं घेणं सुरु केले,  तर काही लोकांनी  चाळीतली  घरं विकून गावाकडे परत जाणे पसंत केले.

काही  चाळी तर  रिडेव्हलेपमेंटच्या नावाखाली बिल्डर्स लॉबी ने ताब्यात  घेतल्या, आणि मग त्या चाळीत रहाणारा मराठी माणूस विरार, डोंबीवली , कल्याण , ठाणे या भागात स्थलांतरीत झाला. थोडक्यात सांगायचे तर या सगळ्यांचा परिणाम म्हणजे  मुंबईतला ’मराठी टक्का’ कमी होणे हाच झाला. त्यांची चाळीतली घरं कवडीमोलाने व्यापारी वर्गाने विकत घेतली,  बऱ्याच घरात तर गोडाउन्स उघडले गेले. सुतळी बाजार, नागदेवी क्रॉस लेन, धोबी तलाव, इत्यादी भागातल्या घरांमधे ऑफिसेस, दुकानं उघडली गेली . हार प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसून येतो.

बंद पडलेल्या मिलच्या जागांवर सुरु झालेले शॉपिंग मॉल्स, किंवा बॉलींग ऍलीज वगैरे सुरु झालेल्या आहेत.  काही ठिकाणी हाय एंड हाउसींग प्रोजेक्ट्स सुरु करण्यात आलेले आहेत – ज्या मधे फ्लॅट्सच्या   किमती करोडॊंच्या घरात आहेत.  नुकताच एका जुन्या चाळींच्या जागेवर बांधलेल्या  अशा एका मोठ्या कॉम्प्लेक्स मधे जावे लागले एका माणसाला भेटण्यासाठी . मोठी १९ मजली टॉवर,    तिथे खाली लॉबी मधे  त्या बिल्डींग मधे रहात  असलेल्या लोकांच्या नावाची पाटी वाचली, तेंव्हा लक्षात आलं, की त्यामधे एकही मराठी नाव नाही! कुठे गेला मराठी माणूस  मुंबईतला??  मला तर कोणीच सापडत नाही, तुम्हाला जर कोणी  सापडला तर मला जरूर कळवा.

जर मला अजून पंधरा वीस  वर्षानी  पुण्यावर लेख लिहायची वेळ आली तर तो पण साधारण याच प्रकारचा असेल असे वाटते. पुण्यातली परिस्थिती पण काही फार वेगळी नाही-  तेंव्हा आत्ताच सावध हो  पुणेकरा….

स्वात मधे तालिबान.

Written by  on December 3, 2006

संध्याकाळी घरी आलो आणि टिव्ही सुरु केला तर  बातम्यात दाखवत होते की स्वात घाटी मधे तालिबान चे नेते सुफी मोहम्मद ह्याने तालिबानी कायदा लागू केला आहे. पाकिस्तान सरकारने ह्या भागातील मिलिटरी ऍक्शन थांबवून तालिबानच्या सरकारला मान्यता दिलेली आहे.कट्टर पंथी लोकांची पकड जवळ पास ३५% पाकवर आहे. आता स्वात , नंतर पुर्ण पाकिस्तान.

तसंही बातम्यांत  दाखवले होते की,तालिबानी हे इस्लामाबाद पा्सून केवळ २८ कीमी  वर पोहोचले आहेत.

भारताच्या दृष्टीने हे अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. जे स्वात मधे झाले आहे ते  पाकच्या इतर भागात कशा वरून होणार नाही? अशीच जर तालिबानने आपली पोहोच वाढवली तर त्यांची घोडदौड रोखणे शक्य होणार नाही. अर्थात, अमेरिकेला पण ह्याची पुर्ण काळजी आहेच, म्हणुनच ड्रोन चा वापर करुन तालिबानी ठिकाणांवर हल्ला केला जात आहे.

पाकचे नेतृत्व पण कणाहीन असल्यामुळे त्यांनी पण इस्लामिक कायद्यांना सरळ सरळ मान्यता दिलेली आहे. तालिबान्यांनी सगळ्या वकील आणि जज लोकांना आपापल्या नोकऱ्या सोडण्याचे फर्मान सोडले आहे, न सोडल्यास, जिवे मारण्याची धमकी पण दिली आहे. सगळ्या वकिलांनी आणि जज लोकांनी नोकऱ्या सोडल्याचे समजते.. म्हणजे तालिबान ची १००% जीत झालेली  आहे , स्वात मधे….

शरीयत कायदा  १००% लागु झालाय,  ही गोष्ट  मिलिटन्सी समोर पाकिस्तान सरकारचे गुढगे टेकवून   जमिनीवर नाक रगडण्या  सारखी आहे. अर्थात नाक शिल्लक राहिलंय का ? की ते कधीच कापल्या गेलं, जेंव्हा त्यांचा सहभाग मुंबई वर केल्या गेलेल्या हल्ल्याच्या संदर्भात  पुराव्या सहीत सिद्ध झाला होता   तेंव्हा.नेमकी हीच गोष्ट त्यांच्या ’आका’ अमेरिकेला सहन होणार नाही.

अमेरिकन स्पाय विमानांनी   फायर केलेल्या मिसाइल अटॅक मधे ३० तालिबानी मारले गेले – खरा आकडा तर खूपच जास्त असेल. ड्रोन म्हणून अमेरिकन स्पाय प्लेन्स जे पायलट विरहित विमानं  आहेत आणि   सॅटेलाइट द्वारा निश्चित केलेल्या जागी अटॅक करु शकतात.

सामान्य पाकीस्तानी लोकांना हे तालिबानी नको आहेत पण त्याच सोबत त्यांना अमेरिकन अटॅक्स पण नकॊ आहेत. त्यांना वाट्त की पाकिस्तान सरकारनेच  हा इशू सांभाळावा.जी अशक्य कोटीतली गोष्ट आहे.

मुंबई अटॅक्स मुळे भारताबरोबर चे संबंध खराब झाले आहेतच, आणि अफगाण युद्ध मुळे अमेरिकेशी संबंध पण वांद्यातच आहेत.

बऱ्याच पाकिस्तानी लोकांना असंही वाटतं की १९६७ प्रमाणे आजही पाकिस्तान एक्झिस्टंस क्रायसेस मधुन जातोय. आणि ही सिच्युएशन परत दुरुस्त होण्याची चिन्हही नजिकच्या भविष्यकाळात   दिसत नाहीत.

असिफ अली जरदारी – पाकिस्तानी प्रेसिडेंट हे अमेरिकेत वॉशिंग्टन मधे पॉप्युलरिटी  मिळवली आहे , पण पाकिस्तानमधे मात्र त्यांना लोकप्रियता मिळवता आली नाही.रिसेंट पोल मधे पॉप्युलरऍटी इंडॆक्स हा १९% पर्यंत खाली उतरला आहे.  एका पाकिस्तानी  ब्लॉगर च्या मते  -पाकिस्तान हे एक अमेरिकेच्या अफगाणिस्थान च्या युध्दातले   एक प्यादे मात्र आहे. अमेरिकन्स हे पाकिस्तानी मिलिट्री सोबत वेपन्स किंवा इन्फॉर्मेशन शेअर करित नाही, त्यामुळे पाकिस्तानी हाय्यर ऑफिशिअल्स ला आपण निग्लेक्ट केले गेलो आहोत , असाही काही लोकांचा सुर आहे.केवळ ह्याच कारणासाठी स्वात मधे तालिबानला ढील दिल्या जात आहे.

पाकिस्तानी लोकांना वाटते की अमेरिकेने त्यांची जमीन आधी रशिया बरोबर युद्ध करायला वापरली, नंतर तालिबान, आणि अजुन ही इथेच डेरा जमवून बसले आहेत. अमेरिकेने अफगाणी मुजाहिदिनी अतिरेक्यांना रशिया बरोबरच्या युद्धात पाकिस्तानच्या बरोबरीने शस्त्र  पुरवली होती. अमेरिकेला पण आता लक्षात यायला पाहिजे   की ह्या लोकांना त्यांच्या’ कॅंपेन अगेन्स्ट टेररिझम मुळे किती त्रास झालाय ते(?) !

अफगाण तालिबान्यांसाठी हे युद्ध  स्वातंत्र्य युद्ध आहे. तुम्ही त्याला काही नांव ठेवले तरीही ते त्याला फ्रिडम फाइटच म्हणणार.त्यांच्या दृष्टिने अमेरिकन्स घुसखोर आहेत, तेंव्हा घुसखोरांना बाहेर काढण्याकरिता ते काहीही करू शकतात.

माझ्या मते पाकिस्तानमधला आणि अफगाणिस्थान मधला प्रॉब्लेम हा एकच आहे . तो म्हणजे ह्या दोन्ही देशात आज पर्यंत डेमोक्रसी कधीच रुजू  शकली नाही.तसा थोडाफार प्रयत्न जरुर झाला , पण मिलिट्री ने टेक ओव्हर करुन डेमोक्रसीला कधीच मजबुत होऊ दिले नाही. हे रिपीटेड टेम्परिंग जे झालं डेमोक्रसी सोबत त्यामुळे डेमोक्रसीची मुळंच खिळखिळी झाली .

पाकिस्तानामधे जो पर्यंत मुशर्रफ होते , तो पर्यंत बरा कंट्रोल होता,मुशर्रफ असतांना त्यांनी पेशावर आणि स्वात मधे २५००० ची फौज डीप्लॉय केली होती .नंतर  डेमोक्रसी पचवणे पण त्यांना सहज शक्य होत नाही.भारताच्या दृष्टीने ही गोष्ट खरंच काळजी करण्या सारखीच आहे. तालिबान चा एक फालतू कमांडंट ’भारताला’ सरळ धमकी देतो, की पाक वर अटॅक केल्यास तालिबान रशियन सैन्या प्रमाणे भारतियांना हाल करुन मारेल.. इतकी हिंम्मत त्यांची होऊ शकते? जे पाक सरकारने म्हणायला हवे ते जर तालिबानी म्हणतील, तर नक्कीच सामान्य लोकांना सरकार पेक्षा तालिबान जवळचे वाटेल ! नेमकं तेच होतंय .. आणि तेच आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे..

हा सगळ्या चक्रव्यूह भेदून  भारतीय नेते कसे चातुर्याने मार्ग काढतात आणि अमेरिकेला पाक वर प्रेशराइझ करण्यास भाग पाडतात हेच  सध्या महत्वाचे. इथे मिलिट्री मुव्हमेंट्स पेक्षा, राजनैतिक चाल जास्त महत्त्वाची आहे.