ब्लॉगचे आयुष्य

Written by  on November 22, 2006
ब्लॉग  चे आयुष्य

ब्लॉग चे आयुष्य

दोन दिवसापूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे  चार वर्षापूर्वी माझ्यासोबत ज्यांनी ब्लॉगिंग सुरु केले होते, त्या पैकी फारच कमी लोकं ऍक्टीव्ह आहेत. बहुतेक ब्लॉग हे निद्रावस्थेत  आहेत.हे असे का  झाले असावे? ब्लॉग चे आयुष्य कसे ठरते? लोकांनी लिहीणे का बंद केले असावे? हा प्रश्न डोक्यात आला , आणि त्यावरून हे पोस्ट.

१)लोकं ब्लॉग का सुरु करतात याची बरीच कारणं आहेत, पण पहिले कारण म्हणजे मिसळपाव, मी मराठी, मायबोली , उपक्रम वगैरे साईट्स वर टोपणनावाने १०-१२  लेख लिहून झाले की आपले हे सगळे लेख एकत्र असावे , म्हणून एखाद्या ब्लॉग ला तयार केले जातो. एकदा मनातले विचार कागदावर उतरवता यायला लागले की मग ब्लॉग वर लेख लिहीणे सुरु होते,

२)ब्लॉग सुरु  करण्याचे दुसरे कारण म्हणजे ,   एकटेपणा!   दिवसभर बोलायला कोणी नसतं,  आपल्या मनात काय आहे ? हे ऐकायला कोणी तयार नाही अशी परिस्थिती असते.  संवाद साधणे ही मानवाची मुलभूत गरज आहे, आणि मग संवाद साधायला कोणी समोर नसेल तर मग ब्लॉग काय वाईट?मग जे काही मनात येईल ते ब्लॉग वर लिहून टाकले जाते.

३) तिसरे कारण म्हणजे इतरांचे ब्लॉग वाचल्यावर ” अरे असं तर मी पण लिहू शकतो, मग का नाही सुरु करायचा ब्लॉग? ”   ह्या विचाराने सुरु केल्या जाणारे ब्लॉग. जसे  – “काय वाटेल ते ”   😀

४)ब्लॉग सुरु करण्याचे कुठलेही कारण जरी असले तरी त्याचे आयुष्य साधारणपणे सारखेच असते.  सुरु झालेल्या ब्लॉग पैकी ७० टक्के हे पहिल्या सहा महिन्यातच बंद पडतात, उरलेले ३० टक्के काही वर्ष ( १-२ वर्ष )सुरु रहातात आणि उरलेले रडत पडत का होईना, पण जिवंत रहातात.

५)सुरुवातीला तुमचा विचार फक्त चांगलं लिहायचं एवढाच असतो, त्यामुळे ब्लॉग प्रमोट वगैरे करण्याच्या भानगडीत तुम्ही पडत नाही. ब्लॉग स्वान्तसुखाय आहे हे विचार मनात पक्के असतात.पण जेंव्हा सारखे स्टॅट पहाणे सुरु होते, तेंव्हा वाचक कसे वाढवायचे या दृष्टीने हालचाल सुरु होते. तुम्ही अगदी “मॅडली इन लव्ह विथ युवर ब्लॉग” होता.   किती लोकं आहे, किती कॉमेंट्स आल्या वगैरे वगैरे यांचा ट्रॅक ठेवणे हेच तुमचे लक्ष असते .

६)तुमचे लक्ष तुमच्या फॉलोअर्स च्या संख्येकडे  जाणे सुरु होते,  जितके जास्त फॉलोअर्स तितकी जास्त पोहोच! 🙂 स्वतःच्या ब्लॉग चे मार्केटींग करण्याचा तुम्ही पद्धतशीर पणे प्रयत्न करता.

-त्या साठी शक्य तितक्या ठिकाणी फेसबुक वर आपल्या ब्लॉग ची लिंक शेअर करता. मेल मधे लिंक लोकांना पाठवता.

-ब्लॉग ला  मराठी ब्लॉग . नेट किंवा मराठी ब्लॉगर्स . नेट शी जोडता.

-तुमच्या ब्लॉग च्या नावाने  फेसबुक पेज, ट्विटर  हॅंडल सुरु करता.

-सगळ्या मित्रांना माझं पेज लाइक करा म्हणून मेसेज करता- ( खरं तर त्यांनी तुमचे पेज लाइक केले काय किंवा नाही, तरी काही फरक पडत नाही, कारण तुम्ही तुमच्या प्रोफाइल वर  टाकलेली ब्लॉग लिंक त्यांना दिसतच असते.)

-तुमच्या मी  मराठी, मिपा, माबो, उपक्रम वगैरे साईट्स च्या सिग्नेचर मधे तुमच्या ब्लॉग लिंक देता, त्या सोशल साईट्स वरून पण तुमच्या ब्लॉग वर व्हिजिटर्स येणे सुरू होते.

७)पहिले हजार वाचक झाले की मग खूप आनंद होतो, तुम्ही वाचकांचे आभार मानणारी  पोस्ट टाकता. अजून वाचक कसे मिळवायचे हा विचार करू लागता. एखादं खूप कॉंट्रोव्हर्सीअल पोस्ट टाकता आणि मग प्रतिक्रियांचा पाऊस सुरु होतो. ब्लॉग आता बाळसं धरू लागतो.

८)इतर ब्लॉगर्स कोण असतील? कसे असतील? हा विचार मनात येतच असतो, बऱ्याच ब्लॉगर्सशी व्हर्च्युअल मैत्री झालेली असते, तुम्ही मग “ब्लॉगर्स मिट” अरेंज करता- सगळ्या ब्लॉगर्स ला भेटणे हा एक मूळ उद्देश असतो. ओघाओघाने पेपर मधली प्रसिद्धी, टिव्ही वर न्युज येतेच  🙂  त्या नंतर नियमित, बाहेर भेटी गाठी , ट्रेक्स, खादाडी वगैरे सुरू होऊन व्हर्चुअल संबंध वैयक्तिक पातळीवर पोहोचतात.

९)इतर ब्लॉग वर जाउन कॉमेंट टाकणे हा वाचक मिळवण्याचा एक उपाय आहे  हे तुमच्या लक्षात आल्याने तुम्ही बहुतेक सगळ्या ब्लॉग वर कॉमेंट्स करणे  सुरू करता. जेंव्हा तुम्ही कॉमेंट देता, तेंव्हा त्या बरोबरच तुम्ही आपल्या ब्लॉग ची लिंक पण देत असता:)  त्या ब्लॉग  चे  इतर वाचकही तुमची   कॉमेंट पाहून  तुमच्या   ब्लॉग लिंक वर क्लिक करून   वाचक मिळण्याची शक्यता जास्त वाढते.नियमित पोस्ट+ नियमित कॉमेंट्स = जास्त वाचक.:)

१०) म्युच्युअल एनकरेजमेंट सुद्धा ब्लॉग साठी पोषक  आहे. एकाच विचाराचे ब्लॉगर्स , पण वेगवेगळ्या विषयावर लिहणारे चांगले मित्र होऊ शकतात, आणि एकमेकांना एनकरेजही करू शकतात, हे सिक्रेट ऑफ द ट्रेड समजले की तुमचा यशस्वी ब्लॉगर होण्याचा मार्ग मोकळा होतो. एक मेका सहाय्य करू, अवधे धरू सुपंथ  🙂

११)सुरुवातीला विषयांची कमतरता नसते, कोणी वाचेल की नाही ह्याची खात्री नसल्याने, आणि तुम्हाला कोणी वैयक्तिकरीत्या ओळखत नसल्याने तुम्ही अगदी काय वाटेल ते लिहत असता. एखाद्या दिवशी काही विषय सुचत नाही, मग स्वतःचे अनुभव, हा मुख्य विषय होतो लिहीण्याचा. दुसऱ्याच्या आयुष्यात डोकाऊन पहायला सगळ्यांनाच आवडतं, त्या मुळे ही पर्सनल पोस्ट्स नक्कीच हिट होतात.

१२)स्वतःचे काही अनुभव कथांमधे किंवा ललित लेखांमध्ये गुंफून पोस्ट्स लिहिले जाते. नंतर येतो रायटर्स ब्लॉक – म्हणजे काय लिहावं हेच सुचत नाही, तुम्ही लिहीणं बंद करता, तुमच्या ब्लॉग वर लोकं येऊन काहीतरी लिहा म्हणून गळ घालतात, तुम्ही एखादा दुसरा लेख लिहिता सुद्धा, पण लवकरच उत्साह संपतो ( कदाचित नवीन गर्ल फ्रेंड मिळणे, लग्न होणे, मुल होणे ही कारणं असतात )आणि ब्लॉग मृतवत होतो.

१३)या सगळ्या प्रकारातून वाचलेल्या ब्लॉगर्स ची नंतरची स्टेज:- स्वानुभव बहुतेक लिहून झालेले असतात, नवीन अनुभव आणायचा तरी कुठून? मग वाचलेल्या इंग्रजी कथांवर आधारित कथा, प्रवास वर्णने,   सिनेमाची परीक्षणं वगैरे लिहीणं सुरू होतं.काहीही करून एखादं तरी पोस्ट लिहिलं गेलंच पाहिजे हा अट्टाहास असतो. जेवायला गेल्यावर समोरच्या डिश चा आधी फोटॊ काढला जातो , आणि मग नंतरच जेवण सुरू केले जाते. ( काय सांगावं? कधी एखादी पोस्ट लिहावीशी वाटली तर उपयोगी पडेल, हा विचार असतो त्या मागचा 🙂  )

१४)राजकारण, समाजकारण, वगैरे अनेक गोष्टींवर तुम्ही आपली काय वाटेल ती मतं मांडत असता.वाचकांची संख्याही बरीच वाढत असते,  पण आता मात्र तुमचे लक्ष त्या संख्येकडे नसते. तुम्ही लिहिल्यावर किती वाचक आले, किती कॉमेंट्स आल्या ह्या गोष्टी गौण होऊ लागतात, फक्त काय वाटेल ते लिहीणं   एवढाच उद्देश असतो..

१५)पेपर मधे  तुमचा एखादा लेख छापून येतो, पुस्तक छापून येतं, आणि मग उगीच आपण काहीतरी मिळवलंय असा समज होतो, अत्यानंदाने मग त्या विषयावरची एखादी पोस्ट लिहीतो. या नंतर तुमचे बरेच लेख वेगवेगळ्या पेपर मधे  प्रसिद्ध होतात, पण पहिल्या लेखाच्या प्रसिद्धीचा जो आनंद असतो, तो पुन्हा अनुभवता येत नाही.

१६)तुमच्या लेखन विषयात वैविध्य आपोआपच येतं, आणि लिखाणाचा पोतं ही सवयीमुळे सुधारतो. तुमच्या ब्लॉग ला एखादं रेकग्निशन, एखादं बक्षीस , मिळतं. खूप काही तरी मिळाल्याचा आनंद होतो. आता पुढे अजून काय मिळवायचं म्हणून लिखाणातला उत्साह काही लोकांचा संपतो आणि  ब्लॉगिंग बंद होतं.

१७)या तडाख्यातून सुटलेले ब्लॉगर्स,ज्यांनी ब्लॉग बंद केलेला नाही, ते   एकप्रकारे समाधानी असतात. आपण लिहिलेले अगदीच टाकाऊ नाही ही गोष्टच त्यांना सुखावून जात असते, केवळ हेच कारण असतं की  ते  लिहीणे बंद करत नाहीत. त्यांची लिखाणाची फ्रिक्वेन्सी  आणि  लेख कमी झाले असले तरी नियमित पणा असतो, आणि त्यामुळेच वाचक वर्ग टिकून रहातो. हे समाधानी ब्लॉगर्स पुढे ब्लॉगिंग कंटीन्यु करतात  🙂 हे जरी खरे असले तरी त्यांच्याही मनात कधी तरी आता आपण बंद करायचं का ब्लॉगिंग हा विचार येतच असतो 🙂 पण ….

तर ही आहे ब्लॉगर्सच्या / त्याच्या ब्लॉग च्या आयुष्याची कथा 🙂  त्या बंद झालेल्या ब्लॉग चे काय होते? काही लोकं बंद केल्यावर तिकडे ढुंकूनही पहात नाहीत, तर काही लोकं चक्क ब्लॉगच डिलीट करून टाकतात. तुम्ही सध्या कुठल्या स्टेजला आहात?