सुवर्ण मंदीर

Written by  on October 31, 2006
श्रीशैलम, shrishailam, srishailam, golden temple, सोनं, सोन्याचं मंदीर

श्रीशैलम मंदीर

सुवर्ण मंदीर म्हंटलं की मग आठवतं ते  अमृतसर. अमृतसर शिवाय इतर ठिकाणी सुवर्ण मंदीर असू शकतं हे आपण सहजा सहजी मान्य करूच शकत नाही.

ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीशैलम ला जाउन आलो. या मंदीराबद्दल अजिबात काहीच माहिती नव्हती. टॅक्सी ड्रायव्हर अती उत्साही! त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पण नक्षलवादी भागातून. तिथे पोहोचे पर्यंत थोडी धाकधूक वाटत होती. तिथे पोहोचल्यावर  उतरून सरळ मंदीराकडे वळलो.

एका ठरावीक काळा मधेच या मंदीरात गर्दी असते, इतर वेळेस दर्शन सहज घेतलं जाऊ शकतं. श्रावण महिन्यात दक्षिण भारतीय लोकं तिरूपतीला न जाता या मंदीरात जातात, त्या काळात तिरूपतीला अजिबात गर्दी नसते.  मंदीरा भोवती  भक्तांना जाण्यासाठी कठडे बांधलेले होते. पण गर्दी अजिबात नव्हती. सरळ चालत आम्ही  गाभाऱ्या पर्यंत जाउन पोहोचलो आणि ५  मिनिटात  दर्शन घेतले.

्श्रीशैलम, shrishailam, srishailam golden temple
श्रीशैलम सुवर्णध्वज

मुख्य मंदीरा भोवती इतर मंदीर पण आहेत. तिकडे त्या लहान लहान मंदीराच्या समोरून जातांना उगाच शास्त्र म्हणून हात जोडले  आणि पुढे निघालो. मंदीर पुर्ण पणे सोन्याने मढवलेले आहे. ध्वज पताका पण पुर्णपणे सोन्याच्या पत्र्याने मढवलेली आहे. या देवस्थानांच्या कडे भक्तांनी दिलेले ( हुंडी मधे) सोनं नाणं भरपूर असतं, त्याचा उपयोग करून मंदीर सोन्याने मढवून काढले आहे. मंदीर प्राचीन काळचे आहे. हेमाडपंथी  ( हेमाडपंथी म्हणजे मला दक्षिण पद्धतीचे मंदीर अभिप्रेत आहे ) . बऱ्याच ठिकाणी काही भटजी लोकं ’तीर्थ’ घेउन बसलेले होते, तर काही कपाळाला लावायचे गंध घेउन. तुमच्या कपाळावर त्याने बोट टेकवले की लोकं समोरच्या ताटलीत काहीतरी टाकुन पुढे जायचे- तसंच आम्ही पण केलं.

या सोन्याने मंदीर मढवण्याच्या प्रकाराविषयी बराच उहापोह झालेला आठवला. पुर्वी एकदा अमिताभ बच्चन ने इथे आले असतांना मंदीराला सोन्याचे कवच चढवण्यासाठी म्हणून एक करोड रुपये देण्याचे कबूल केले  होते २००७ साली. हातोहात ११ लाखाचा चेक पण दिला होता. नंतर मात्र बाकीचे पैसे दिले की नाही ते माहिती नाही. पण  देवस्थान या बाबतीत बरेचदा पेपरमधे या बद्दल बातम्या छापून आणते.   देवस्थान वेळोवेळी अमिताभ बच्चनने दिलेल्या वचनाची आठवण करून देते पेपरमधे छापून  की अमिताभला आम्ही बरेचदा पत्र पाठवलं, पण पैसे मिळाले नाहीत म्हणून. असो. जर अमिताभला द्यायचे नसतील तर देवस्थान त्याला कम्पेल करूच शकत नाही. आणि देवस्थानाकडे इतका पैसा जो कुजत पडला आहे, तो वापरून मंदीराला सोन्याने मढवण्याचे काम केले जाऊ शकते- त्या साठी अमिताभने दिलेल्या पैशावर देवस्थान अवलंबून निश्चितच नाही. तरी पण इतका पाठपुरावा का करतंय देवस्थान हे काही समजत नाही. प्रसिद्धी साठी???

दुसरा एक महत्वाचा  मुद्दा, मंदीराला सोन्याने मढवायचं म्हणजे त्याला स्क्रू लावण्यासाठी ड्रीलिंग करून छिद्र करावे लागतात. इतक्या जुन्या अर्वाचीन ( की प्राचीन? मला नेहेमीच गोंधळल्या सारखं होतं या दोन शब्दांच्या बाबतीत- योग्य शब्द कुठला असेल बर? 🙂 ) काळच्या वास्तू मधे अशा प्रकारे छिद्र केल्यास त्या वास्तूचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. लवकरच पुर्ण मंदीर सोन्याने मढवले जाणार आहे असे तिथला भटजी म्हणाला.

सुवर्ण मंदीर, काय वाटेल ते, महेंद्र कुलकर्णी,

श्री शैलम सुवर्ण मंदीर

पण एक सांगतो, मला मात्र खूप मस्त वाटलं ते सोन्याचं मंदीर आणि सोन्याचा ध्वजस्तंभ पहायला. उगीच कॉलर ताठ झाली 🙂

मंदीराच्या रस्त्यावर शंकराचार्यांचे एक शक्ती पीठ पण दिसले.  शंकराचार्य आपले ( किंवा आपल्यातले ) वाटतंच नाही. एक धर्मगुरु म्हणुन त्यांनी काय केलं म्हणून त्यांना मान द्यायचा हेच कळत नाही. पुर्वी एकदा द्वारकेला गेलो असता शंकराचार्यांच्या पीठात गेलो होतो, पण इथे मात्र  इच्छाच झाली नाही.  शंकराचार्यांनी खरं तर लोकांच्या मनामधे धर्माबद्दल आस्था वाढवण्याचे काम करायला हवे, पण ते तर  कधीच करतांना दिसत नाहीत. शंकराचार्यांचे नांव काय आहे हे पण  आज मला एकट्यालाच नाही तर  बऱ्याच लोकांना माहिती  नसावे, पण इतर धर्माच्या बाबतीत असे नाही-त्यांचे धर्मगुरु नेहेमीच समाजाशी जोडलेले असतात.असो..

सहज म्हणून एक जुनी गोष्ट  आठवली , पुर्वी एकदा नेपाळला   असताना नेपाळ नरेश (राजा्ला ) रस्त्यावरून जातांना पाहिले, आणि जगातला एकुलता एक हिंदू राजा म्हणुन त्याच्या पुढे आपोआपच नतमस्तक झालो  होतो. त्या वेळी त्या राजाने हिंदूंसाठी काय केलं हा प्रश्न का मनात आला नाही हे समजत नाही आज मला.

जुन्या मंदीरांना सोन्याचे कवच चढवणे ,सोन्याचं सिंहासन बनवणे वगैरे प्रकारचा शो करणं खरंच आवश्यक आहे का? देवस्थानाकडे कुजत असलेला करोडॊ रुपयांचा  काय उपयोग केला जाऊ शकतो? ते पैसे समाजोपयोगी कामासाठी वापरला जाऊ शकतो  का?  ह्या प्रश्नावरच हा लेख संपवतो.

चापानेरचे वर्ल्ड हेरीटेज

Written by  on October 24, 2006

खरं तर जेंव्हा त्या रस्त्याने गेलो, तेंव्हा आपण इथे थांबु असे कधीच वाटले नव्हते.   सकाळची १० ची वेळ होती. कोवळी उन्हं त्या तटबंदीच्या दगडावर पडून सोन्यासारखी झळाळी आणत होती त्या तटबंदीला. इतकं सुंदर दृष्य़ क्वचितच दिसतं, त्या सोनेरी रंगावर नजर ठरत नव्हती. मधेच एक सज्जा पण दिसत होता. तटबंदीला सज्जा?? पहिल्यांदाच पाहिला होता.

दुरुन दिसणारी भिंत आणि सज्जा

विटांचे बुरुज.. सगळी भिंत दगडाची मग हे बुरुज विटांचे का.

चापानेर!! बडोद्या पासून फक्त ५० किमी वर असलेली ही जागा. तसं म्हटलं तर ही जागा प्रसिद्ध  आहे ती पावागढ वासीनी देवी साठी. लोकं चापानेरला येतात, आणि इथून सरळ गडावर निघून जातात देवीच्या दर्शनासाठी. इथे ही तटबंदी असलेला भाग पहायला कुणीच येत नाही. माझ्या बरोबर असलेला मित्र पण म्हणाला की आधी इथे दहादा तरी येऊन गेलो असेन, पण फक्त देवीचे दर्शन घेऊन परत गेलो, इथे काय आहे ते पहायला आलो नाही. पण मला मात्र समोरच्या  तटबंदीचा  मोठा दिंडी दरवाजा  सारखा खुणावत होता- काहीतरी वेगळं पहायला मिळेल आत असे सारखे वाटत होते. शेवटी  रहावलं नाही, आणि ड्रायव्हरला गाडी साईडला घ्यायला सांगितली.

मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारची जागा. अजून किल्ल्यात जायचं आहे, पण समोरच आधी मुतारी दिसते. खरं तर हा फोटो वर लावायला हवा होता, आणि नंतर वरचा मुख्य दाराचा.

उतरून आत त्या दरवाजाकडे निघालो. बाहेरून पाहिल्यावर ही भिंत म्हणजे शहराची तटबंदी असल्यासारखी दिसत होती. त्या तटबंदीला पण सरकारी खर्चाने कुंपण घातलेलं दिसत होतं. मुळ बांधकाम काही ठिकाणी दगडी , तर काही ठिकाणी विटांचे बांधकाम दिसत होते. बुरूज विटांचा बघून तर मला आश्चर्यच वाटले. बुरूज तर दगडी असायला हवे ना?

कार पार्क करुन त्या दिंडी दरवाजा कडे निघालो. जसा जसा जवळ जात गेलो, तसा तसा मिथेनचा उग्र वास नाकात शिरत होता. किळस वाटली – आणि रागही आला, इतक्या चांगल्या जुन्या धरोहरचा मुतारी म्हणून केल्या जाणारा उपयोग पाहिल्यावर! आत काय आहे याची काहीच कल्पना नव्हती सरळ आत चालत गेलो. मुख्य दरवाजाच्या वर एक सज्जा दिसला. बहुतेक पूर्वीच्या काळी इथे वाजंत्री , म्हणजे चौघडा वाजवण्यासाठी लोकं बसत असावेत का? की  बाहेर नजर ठेवण्यासाठी आहे तो??

थोडं आत गेलं की तिसरं दार लागतं. गावातल्या लोकांचा वहिवाटीचा रस्ता आहे हा.

शहर मस्जिद पुर्ण व्ह्यु. पाच घुमट आणि बरेच खांब असलेले हे स्ट्रक्चर आहे.

थोडं आत चालत गेल्यावर आपल्या गेलेल्या वैभवाच्या खुणा अंगावर बाळगत दगडी भिंत साथ देत होती. समोरच्या दरवाजाच्या शेजारी एक फुलं कोरलेले दिसत होते. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक चांगल्या स्थिती मधे असलेली एक पाच घुमट असलेली इमारत आणि तिचे दोन मिनार लक्ष वेधून घेत होते. टूरीझम डिपार्टमेंटचे  तिकिटांचे काउंटर पण गेट वर दिसले.   आत गेल्यावर एक मॉडरेटली कलाकुसर केलेली इमारत समोर दिसत होती. एका दगडावर लिहले होते, की ही इमारत १५२२ साली बांधण्यात आली .म्हणजे ५३३ वर्षापूर्वी- मनातल्या मनात गणित केले.

भिंत, बाहेरून दगडाची आणि आत मात्र विटा , चुना बांधकाम असलेली.

जामा मस्जिद मिनाराचे कार्व्हिंग

कला कुसर जरी फारशी केलेली नसली, तरी इमारत खूप छान दिसत होती. इतकी वर्ष झाली तरीही अजुन ही इमारत चांगल्या अवस्थेत आहे. कदाचित फार जास्त लोकं येत नसेल म्हणून असेल. आत शिरल्यावर एखाद्या हिंदू मंदिराच्या प्रमाणे खूप खांब असलेले सभामंडप दिसले . प्रार्थना करण्यासाठी कोनाडे केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मस्जिद मधे पण एक प्रकारचा घाण वास सुटला होता. इथे पण कोणीतरी कोपऱ्या मधे मुत्रविसर्जन केलेले दिसत होते. इतकी जुनी आणि सुंदर वास्तू, जी पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे अशी- आणि ही अवस्था?? पुरातत्त्व विभाग बरोबर आपलंही काही कर्तव्य आहे हे मी विसरलोच होतो.

मस्जिदच्या आवारातच एक दगडी भिंत तुटलेली दिसत होती. ती पाहिल्यावर लक्षात आलं, की बाहेरची तटबंदी काही ठिकाणी विटांची, आणि काही ठिकाणी दगडी का आहे ते. बाहेरून दगडी बांधकाम, पण आतमधे मात्र चांगली ५ फुटाची विटांची भिंत आणि त्याला आतून पण दगडाने मढवलेले.. असा तो प्रकार दिसत होता. मस्जिद एका ओट्यावर बांधलेली आहे. ५०० वर्ष जुनी वास्तू ,म्हणून खूप महत्त्वाची वास्तू आहे ही.

आत मधे फिरून आल्यावर बाहेर निघालो, तर बाहेर गेटवर पुरातत्त्व विभागाच्या तिकीट घरात विचारले की इथे राजवाडा कुठे आहे? तसं काही शिल्लक नाही म्हणे इथे! पण हो, एक जामा मस्जिद म्हणून मस्जिद आहे म्हणे. साधारण एक किमी अंतरावर. उन्हं तर तापलं होतं, पण दहा मिनीटे चालल्यावर पुन्हा शहराची तटबंदी लागली. आता मोडकळीस आलेली, आजूबाजूला असलेले जुन्या घरांचे जोते, अर्धवट पडलेल्या भिंती…  एक वेगळीच वातावरण निर्मिती करत होत्या.  कोणीही समोर नव्ह्तं. मला क्लिंट इस्ट्वुड चा जुना सिनेमा आठवला. रखरखीत टळटळीत  दुपार झाल्यासारखं उन्हं सकाळच्या ११ वाजताच होतं.

मस्जिद समोर पोहोचलो. दुरून तर फक्त एक खूप मोठी असलेली मस्जिद असं वाटत होतं.  चार मिनार, भरपूर घुमट , असलेली एक मोठी इमारत दिसत होती समोर.उंचवट्यावर बांधलेली सोनेरी दगडांची इमारत , बाहेरच्या बाजूला उघडणाऱ्या खिडक्या – की त्याला सज्जे म्हणायचं? कोरीव काम केलेले आहे त्यावर. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिसत होत्या. इमारतीच्या आवारात शिरल्यावर वर्ल्ड हेरीटेज चे बोर्ड दिसले. म्हणजे अनपेक्षित पणे  आपण एका महत्त्वाच्या जागी पोहोचलो तर!! स्वतःलाच शाबासकी दिली.

जामा मस्जिदचा मुख्य एंट्रन्स!

१५ फुट जाडीची भिंत ही शेवटची, आणि इथुन बाहेर पडलं की समोर दिसते ती जामा मस्जिद

मस्जिद खूप सुंदर आहे. बांधकाम पुर्ण होण्यास ८० वर्ष लागली असा कुठेतरी उल्लेख वाचला. पायऱ्या चढून आत शिरल्या बरोबर समोरच एक १५ बाय १५ चा व्हरंडा दिसतो. त्यातून डावीकडे पाहिले तर मस्जिदचे दार, आणि इतर ३ दिशांना बगीचे दिसत होते. कोरीव काम केलेल्या बऱ्याच जाळ्या मात्र आता तुटल्या आहेत, पण जितक्या शिल्लक आहेत तितक्या पाहिल्यावर इतर वस्तूची कल्पना येते.

आत शिरल्या बरोबर दोन्ही बाजूला पडलेल्या खोल्या दिसतात. नेहेमी प्रमाणे समोर एक मोठे आंगण आहे. तिथे साधारण लोकं नमाज पढण्यासाठी यायचे.   इथे पण गाईड नाहीच, त्यामुळे कोणीच काही सांगायला नव्हते.  पुन्हा तिकीट काउंटरवरच्या बाईंच्या कडे गेलो, आणि त्यांच्याकडे चौकशी केली, तर त्या बाइने तिला माहीती असलेली माहिती  सांगितली.

छत आणि वरचे तिन मजले

कोरीव काम मिनारावरचे

तुटलेले खोल्यांचे अवशेष.. मशिदीच्या अंगणात. याच अंगणात आम जनता नमाज पढायची

ही एक ३ मजले असलेली मस्जिद आहे. अशा प्रकारची मस्जिद ही भारतामधे एकुलती एक आहे म्हणून महत्वाची.खालच्या मजल्यावर राजा स्वतः नमाज पढायचा, दुसऱ्या मजल्यावर त्याच्या राण्या, आणि तिसऱ्या मजल्यावर इतर सरदारांच्या बायका नमाज पढायच्या. मला आतापर्यंत वाटायचं की मस्जिद मधे फक्त पुरुषंनाच नमाज पढण्याची परवानगी आहे  , पण इथे समजलं की बोहरा  समाजात स्त्रियांना पण परवानगी आहे मस्जिद मधे येण्याची.मस्जिदच्या आतल्या भागात १७५  खांब आहेत. थोडंफार मंदिराच्या सभा मंडपा प्रमाणे बांधकाम आहे या मस्जिदचे. बऱ्याच ठिकाणी कोरीव काम पण केलेले आहे. पाचशे वर्षापूर्वी इथे कोणी मुस्लिम राजा होता, त्याच्या काळातले हे बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे. त्या राजाबद्दल काही फारशी माहिती मिळाली नाही.

इतकी महत्त्वाची वास्तू, वर्ल्ड हेरीटेज असलेली, पण पूर्णपणे दुर्लक्षित. १४८८ पर्यंत हा किल्ला हिंदू राजा चौहानच्या ताब्यात होता, पण नंतरच्या काळात मात्र मुस्लिम राजा मुहम्मद ने ह्या राज्याला जिंकले.नंतर बेगाडा सुलतानाने ही जामा मस्जिद बांधली. १७५ खांब असलेली ही देखणी वास्तू युनेस्कोच्या नजरेस पडल्यावर हीला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा देण्यात आला. उंचावर प्लिंथ असलेली एक तीस मिटर उंचीची वास्तू अतिशय देखणी आहे .एका गोष्टीचे वाईट वाटले, की आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत ते पण आपल्याला इतर कोणीतरी सांगावे लागते? दुर्दैव!! दुसरं काय!!

या मस्जिदचे फोटो इथे लिंक वर  देतोय… ^(http://rangmarathiche.com/goto/https://picasaweb.google.com/kbmahendra/Champaner#5596590219902167394) इतके सुंदर फॊटॊ आहेत, पण सगळेच फोटो इथे देता येत नाहीत म्हणून  पिकासाची फक्त लिंक देतोय..

चिल्लर..

Written by  on October 21, 2006


घरुन निघतांना सुटे पैसे हवेच असतात . रिक्षा, बस मधे कंडक्टर नेहेमी पुरुषांना खूप त्रास देतात सुटे पैसे नसले की. पुरुषांना हा शब्द विचारपुर्वक वापरलेला आहे. एखाद्या सुंदरीने दहाची नोट दिली, तर अजिबात कपाळावर आठ्या न आणता तिकिट देऊन सुटे पैसे परत देणारा कंडक्टर, तुम्ही दहाची नोट पुढे केली की चिरक्या आवाजात तुमची इज्जत काढून ठेवायला कमी करत नाही “इतके शिकले सवरलेला मानसं तुमी- अन राव सुटे पैसे आनत नाय !!” कंडक्टरच्या नोकरी मधे असा कुणाचाही अपमान करण्याचा परवाना त्याला दिलेला आहे , आणि स्पेशल ट्रेनिंग दिलं जात असावं का? हा प्रश्न नेहेमीच पडतो मला

एकदा कंडक्टर समोर दहाची नोट दिली, तर म्हणाला की ’साहेब सुटे द्या’,
म्हंटलं ’नाही माझ्या कडे ’
तर म्हणाला पुढल्या स्टॉप वर उतरुन घ्या !! (उतरुन “घ्या” काय ’घ्यायचं”?? हा खास कंडक्टरी शब्दकोशातील शब्द आहे).
मला पण थोडी घाई होतीच. ’म्हंटलं, कंडक्टर सरळ तिकिट द्या नाहीतर….’
तो म्हणतो नाहीतर काय?? एकदम भांडायच्या पावित्र्यात आला तो..नाय दिलं तर काय करणार तुम्ही?
म्हंटलं की मी काही करणार नाही, ’पण असे पैसे असतांना पण लोकांना सुटे पैसे दिले नाहीत, तिकिटं दिली नाहीत, की माणुस पुढल्या जन्मी पण कंडक्टर ‘च’ होतो बरं का…..” आणि त्याने माझ्याकडे न पहाता तिकिट दिले, आणि सुटे पैसे पण परत केले.

काल सहज घरुन निघतांना चिल्लर पैशांच्या डब्यात हात घातला आणि पैसे बाहेर काढले तर सगळे चार आण्याची नाणी बाहेर निघाली. अगदी वेचून वेगळे केल्याप्रमाणे सगळे चार आण्याची नाणी होती फक्त सगळी . प्रवास करतांना कंडक्टरने तीन रुपये सुटे द्या म्हणून पैसे मागितले, जवळ सगळ्यात लहान नोट फक्त दहाची नोट दहा रुपयांची ! शेवटी लॅपटॉपच्या बॅगेतून सगळे चार आणे झाडून गोळा करुन त्याला दिले, तर तो “काय साहेब? बसच्या प्रवासा करता बरेच दिवसा पासून सेव्हिंग करताय वाटतं!!  किंवा आयुष्यभर केलेले सेव्हिंग एकाच प्रवासात खर्च करताय की काय?  असा प्रश्न विचारेल का? ही शंका मला नेहेमीच असते.   आणि म्हणून हे सगळे चार आणे मी नेहेमीच घरच्या चिल्लर पैशांच्या डब्यात टाकतो.

आमच्या घरी एक नोटा इकडे तिकडे पडलेल्या असल्या तर त्याला शक्यतो कुणी हात लावत नाही. पण एक, दोन, पाच रुपयांची नाणी दिसली की सरळ बायको किंवा मुलगी स्वतःच्या पर्समधे टाकतात. रिक्षा, बस सगळ्याच ठिकाणी सुटे पैसे लागतात . चार आण्याची नाणी मात्र वर्षानुवर्ष जमा होत आहेत आमच्या घरी- त्यांना मात्र कोणी हात लावत नाहीत. भाजीवाला पण सरळ नकार देतो ही नाणी घ्यायला.

हल्ली चार आण्याच्या नाण्यांना काहीच किम्मत राहिलेली नाही. मुंबईला तर ही नाणी कुठलाच दुकानदार घेत नाही. कशाला एखाद्या वेळेस भिकाऱ्याला आपण ते नाणं दिलं तर ते तो घेईल की नाही याची पण शंकाच येते. चार आणे हे फक्त देवाच्या पेटीत टाकायला उपयोगी पडतात – तो देव मात्र बिच्चारा अजिबात काही कुरकुरही न करता ज्या निर्विकारपणे हजाराची नोट घेतो त्याच निर्विकार पणे चार आणे पण ठेऊन घेतो. लोकं जे भिकारी पण घेत नाही ते देवाला टाकतात!! 🙂

मी लहान असतांना तांब्याचा एक पैसा पण चलनात होता. तसेच दोन , तीन , पाच पैसे पण होते. आजची जी चार आण्याची स्थिती आहे ती एक , दोन ,तीन, पैशाची होती, पण पाच पैशाला मात्र किंमत होती- कोथिंबीर,मिरची,वगैरे मिळायचं . तीन पैशाचे नाणे षट्कोनी असायचे, एक पैशाचं आणि पाच पैशाचं चौकोनी तर दोन पैशाचे फुलाच्या आकाराचे. आजकाल सगळी नाणी ही गोल आकाराचीच असतात.

नंतरच्या काळात तांब्याच्या ऐवजी ऍल्युमिनिअमची नाणी पण निघाली होती एक पैशाची!! असं म्हणतात की त्या तीन पैशाच्या , आणि तांब्याच्या एक पैशाची किंमत ही फेस व्हॅल्यु पेक्षा खूप जास्त होती म्हणून काही लोकं ती नाणी वितळवून स्क्रॅप म्हणून विकायचे ,आणि कालांतराने ही नाणी नामशेष झालीत. याच नाण्यांप्रमाणे एक रुपयांचं चांदीच नाणं पण लवकरच नाहीसं झालं. मला अजूनही आठवतं, त्या एक रुपया मधल्या चांदीची किंमत ही आठ रुपये होती.ते पण नाणं हल्ली दिसत नाही कुठेच.

कोणाला पितळेचे कमळाचे चित्र असलेले वीस पैशाचे नाणे आठवते का? त्याची पण अशीच वासलात लावली आपल्या लोकांनी. बरेच लोकं तर या वीस पैशांच्या नाण्याच्या अंगठ्या करुन घ्यायचे. ( का? हे मला कधीच समजलं नाही)मी शाळेत असतांना घरुन जेंव्हा कधी पैसे चोरुन घेउन जायचो ( आमच्या लहानपणी मुलांना पैसे देणे वगैरे काही प्रकार नव्हते- तेंव्हा पैसे कधी हातात आले तर ते असेच घरातून चोरुन – शब्द फार खराब वाटत असेल तर उचलून हा वाचावा चोरुन ऐवजी) तेंव्हा दहा पैशात मस्त चैन व्हायची. पाच पैशाचे खारे दाणे आणि उरलेल्या पाच पैशाचं संत्र्याच्या चवीचं आइसफ्रूट!! आहाहा…. काय चव असायची!!

हल्ली मला थोडं कमी दिसतं जवळचं. ( वयाचा परिणाम आहे झालं) जवळचा चष्मा चांगला जाड भिंगाचा आहे-दूरचं बघायला चष्मा लागत नाही, त्यामूळे नेहेमी लावत नाही. आजकाल पैसे देतांना माझी खूप तारांबळ उडते.

चष्मा लावलेला नसला की एक रुपया आणि दोन रुपये हे अगदी सारखेच दिसतात. चुकून एक रुपयाच्या ऐवजी दोन रुपये दिले का आपण ही शंका नेहेमीच भेडसावत असते. पाच रुपयाचं नाणं पण अगदी पन्नास पैशाच्या सारखंच दिसतं. खिशात जर एखादं असेल तर मी ते अगदी सोन्याची मोहोर असल्या प्रमाणे जपून पाकीटात एका खास कप्प्यात वेगळं ठेवतो. एखाद्या वेळेस एखादं पाच रुपयांचं नाणं आठ आणे म्हणून दिल्या गेलं की खूप वाईट वाटतं. चिल्लर पैशाच्या बाबतीत मी खूप सेन्सिटिव्ह आहे 🙂

काही वर्षापूर्वी नाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती. तेंव्हा दुकानदार आपल्या नेहेमीच्या ग्राहकांना स्वतःचे कूपन द्यायचे, जे पुढल्यावेळी परत दिले की पैसे म्हणून कन्सिडर व्हायचे. नोटा पण फाटलेल्या होत्या तेंव्हा पण एक, दोन आणि पाचच्या नोटा कितीही फाटक्या असल्या तरी त्या एका प्लास्टीकच्या पाकिटात पॅक करुन हस्तांतरीत व्हायच्या. वेगळी समांतर अर्थव्यवस्था उदयास आली होती, आणि तिचा सगळ्यांनीच स्वीकार पण केला होता. एखाद्या दुकानाच्या नावाचं कूपन, नगदी पैशा प्रमाणे जपून ठेवायचे लोकं

पैसा आयुष्यात महत्वाचा असतोच- पण “सुटे पैसे” सगळ्यात जास्त महत्वाचे असतात ! आणि ह्याची प्रचिती नेहेमीच येते. खरंय की नाही?