(गाणी) सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज

Written by  on August 23, 2006

आपण कधीचं शोधतोय की ही सारगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज मधली  पार्टीसिपंट्सची ऑडीऒ गाणी कुठे डाउन लोड करता येतात ते? पण झी ने साईटच अपडेट केलेली नव्हती. आता साइट पुर्ण झालेली आहे.

सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज गाणी डाउन लोड करता येतील आता. झी ने साईट वर गाणी अपलोड केलेली आहेत. तुम्हाला जर कुणाचीही गाणी हवी असतील तर इथे क्लिक करा  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.zeemarathi.com/srgmp2009/downloadsongs.aspx)आणि आवडीची गाणी डाउन लोड करा.

झी टेलिफिल्म्स कधिही ही फॅसिलिटी बंद करु शकते, म्हणुन रेग्युलरली गाणी डाउनलोड करा म्हणजे नंतर पंचाइत होणार नाही.कारण झी ने डिक्लिअर केलंय की ते ह्या पार्टीसिपंट्स ची एक सीडी काढणार आहे, आणि गाणं जर फ्री डाउनलोड करायला ठेवली तर कोण सीडी घेइल विकत?? नाही कां?

काळजी ते निवृत्ती..

Written by  on August 16, 2006

भारतीय लोकांची मनःस्थिती अशी असते की , आपण नेहेमी वर्तमान काळात न जगता नेहेमीच  भूतकाळात रममाण होतो,  किंवा  भविष्याचा  विचार करत आजच्या दिवसातला आनंद घालवतो.कदाचित ह्या गोष्टीला कोणी बरेच लोकं आक्षेप घेतील,की नाही आम्ही असे नाही-  पण मी स्वतः मान्य करतो की , माझी तरी तशीच मनःस्थिती झालेली आहे . वेळ मिळेll तेंव्हा गतकाळच्या आठवणींना कुरवाळत बसायला मला आवडतं,  पुढे भविष्याबद्दल विचार करत बसायला ( दिवा स्वप्नं??)  विचार काही माझ्या मनातून जात नाहीत- आवडत नसले तरीही ! बरेचदा तर आजच्या दिवसातला आनंदी क्षण पण मी गमावून बसतो हे असे विचारात गुंतून  ………असो..

आज जर १० हजार रुपये हातात असतील तर त्यातले ८ हजार कसे बचत करता येतील या कडे जास्त लक्ष देतो आपण.इतर सगळ्या आवडीच्या गोष्टींना फाटा देऊन पैसे साठवण्या कडे कल असतो आपला.आज सहज पणे उपलब्ध असलेलं सुख आपण दुर्लक्षित करून नंतर पुढे कधी तरी याचा आस्वाद घ्यायला आपण साठवण करतो. आज मी दाताने सोलून ऊस खाऊ शकतो, पण पुढे काही वर्षांनी ते शक्य होईल कां? अर्थातच नाही- म्हणजे ऊस हा आजच खायला हवा, ऊसासाठी पैसा साठवून ठेवण्यात काही अर्थ नाही! पण याचा अर्थ सेव्हींग करण्यात काही  वाईट आहे असे मला म्हणायचे नाही- पण जी गोष्ट आज करायची ती आजच करायला हवी. सेव्हिंग करणे  आपली ही एक  मानसिक अवस्था ( की मानसिक रोग??)आहे, ज्या मधून आपण सगळेच जण नेहेमीच जात असतो. .

कॉलेज मधे शिकतांना – कधी एकदाचं  शिक्षण पुर्ण होतं  आणि नोकरीला  लागतो ह्याची काळजी, नंतर एक  नोकरी लागल्यावर  पुढे  दुसरी  या पेक्षा चांगली  जास्त पगाराची नोकरी कधी मिळेल याची काळजी! नंतर स्वतःचं  घर हवं ,  कार हवी  , नंतर लगेच काही दिवसांनी पुन्हा  मोठ्ठी कार हवी म्हणून  काळजी. पुढे मागे आपलं लग्न होईल मग बायको कशी मिळेल म्हणून काळजी, बायको मिळाली की नंतर मुलगा होईल की मुलगी होईल याची काळजी,  एकदा मुलं झाल्यावर मुलांना चांगल्या शाळात ऍडमिशन मिळेल की नाही  ही काळजी  .

तर  थोडक्यात सांगायचं तर  आपण सगळे  कायम कुठल्या ना कुठल्या काळजी मधे बुडालेले असतो. सुखाने जगणे, आजचा दिवस गोड मानणे वगैरे आपण पार विसरून गेलो आहे.  . नुसती काळजी करून काही होणार नाही हे माहीत असले तरीही आपण  काळजी करणं काही सोडत नाही.

अजुन सगळ्यात मोठी काळजी- ( माझ्या वयाच्या लोकांची ) म्हणजे   निवृत्ती. मला अजूनही १० वर्ष आहेत निवृत्तीसाठी,   हा विषय खरं म्हणजे व्यक्ती सापेक्ष झालेला आहे. जी व्यक्ती निवृत्त  होते, तिच्याशिवाय इतरांचा त्याच्याशी काहीच संबंध नसतो. तरी पण कारे तुझी अजुन किती वर्ष शिल्लक आहेत रे? असं कोणी विचारलं की जाम वैताग येतो. 🙂

निवृत्तीचे पण दोन प्रकार आहेत.व्हॉलंटरी रिटायरमेंट, आणि कम्पल्सरी रिटायरमेंट!प्रायव्हेट कंपन्यांमधे काम करणाऱ्यांना ह्या दोन्ही टर्म्स म्हणजे व्हीआरस, आणि सीआरएस चांगल्याच माहीती असतात. सीआरएस म्हणजे ’पिंक स्लिप’ साठी वापरलेला कोडवर्ड आहे. एक दिवस आकस्मित पणे एक सर्क्युलर येतं, की अमुक अमुक माणसाने नोकरी सोडली आहे, की मग त्यावर डिस्कशन्स सुरु होतात.. ” तो गेला, की त्याला जायला सांगितलं?” ’व्हीआरएस’ मधे स्वतःच्या मर्जीने नोकरी सोडलेली असते, त्यामुळे त्रास कमी होतो, पण ’सीआरएस’   नंतर मात्र   खूप मानसिक त्रास होतो.वय ६० झाले म्हणून घेतलेली निवृत्ती पण सीआरएस मधेच मोडते.  हे असं  का घडत असावं म्हणून विचार केला तर …… खूप गोष्टी मनात आल्या.  .

४५व्या वर्षी निवृत्ती घेतलेले काही लोकं पण मी पाहिलेले आहेत. घरची परिस्थिती चांगली आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, मग काय हरकत आहे व्हीआरएस घ्यायला? पण इतर लोकं – म्हणजे आमच्या सारखे, जे वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होणार ते. आपल्या निवृत्तीकडे एक बागुलबुवा म्हणून बघणारे-अहो आयुष्यभर काम केल्यावर मग रिटायर झाल्यावर काय करायचे हा यक्ष प्रश्न असतोच समोर. कामच करायचं नाही तर मग   करायचं तरी काय? परिश्रम म्हणजे माणसाचं जिवन असतं, परिश्रम  करणे संपले ,किंवा जमेनासे झाले की , की आपला ’श्वास’ संपत आलाय की काय? याची भिती वाटू लागते.

दुपारच्या वेळेस सूर्याची गती जाणवत नाही. तो स्थिर आहे असे वाटते, पण संध्याकाळी  पश्चिमेच्या क्षितिजावरचा मावळतीचा   सुर्य  कसा झर्रकन खाली जातो नाही?? मावळणाऱ्या सूर्याची गती खूप जास्त असते.  पंचेचाळीस नंतर  वार्धक्य, किंवा निवृत्तीचे वय पण तसेच एकदम  वेगाने येते – कानामागच्या ’एका’ पांढऱ्या केसाच्या जागी पांढऱ्या केसांचा पुंजका कधी होतो ते कसं लक्षात येत नाही- तसंच आहे हे पण!!

आयुष्यभर नोकरी केल्यावर पण निवृत्तीची भिती ही प्रत्येकाला बागुलबुवा सारखी वाटत असते. खरं तर निवृत्ती म्हणजे एकप्रकारे सगळ्या बंधनातून मुक्तता, मनाप्रमाणे ’काय वाटेल ते’ करण्याचा आयुष्यातला काळ! कधी उमेदीच्या काळात  गाणं शिकायची, चित्र काढणं शिकायची, टेनिस खेळायची  इच्छा असते , पण ती इतर प्रायोरिटीज मुळे शक्य होऊ शकत  नाही  ,  अशा इच्छा  पुर्ण करण्याचा काळ असतो हा. आयुष्य भर आपण सेव्हींग याच तर काळासाठी करून ठेवले असते.

पण साधारण पणे तसे होत नाही- नोकरी संपली, की अधिकाराची खुर्ची गेली, आणि खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणार? असे विचार पण येतात मनामधे. लोकं हे विसरतात, की त्या खुर्चीशिवाय पण त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व आहे!! चोखून टाकलेल्या आंब्याच्या कोयी कडे जसे लोकं निरिच्छ पणे पहातात, तशी आपली अवस्था होईल का? तसं होऊ नये असं वाटत असेल तर थोडा रस शिल्लक ठेवायला हवा कोयीला.  भयंकर बेचैनी, मानसिक स्थित्यंतरं  आणतो हा निवृत्तीचा विचार. निवृत्ती जवळ आली की दिवस मोजणारे लोकं पण पाहिलेले आहेत मी. कधी एकदाचं या कामाच्या रगाड्यातून सुटका करून घेतो अशी अवस्था असते त्यांची.

एखादी गोष्ट जर तुमच्यावर लादली गेली तर ती नकोशी वाटते. जसे लहानपणी वडलांनी आईला सांगून ठेवले होते की , की  मी सकाळी उठल्यावर जो पर्यंत स्नान, संध्या , अथर्वशीर्ष आणि रामरक्षा म्हणत नाही तो पर्यंत दूध, किंवा काही खायला द्यायचे नाही.  तेंव्हा वाटणारी  बंधनं, आज जेंव्हा आपण होऊन स्वतःवर   उपवास, वगैरे    करतो तेंव्हा त्याचा त्रास होत नाही. कुठलीही गोष्ट तुमच्यावर लादली गेली की ती न करण्याकडे कल असतो माणसाचा- नाही लक्षात येत?

एखाद्या दिवशी रस्त्याने जातांना तुमच्या मागे एखादा कुत्रा लागला, आणि तुम्ही धावत सुटला, थोडं समोर गेल्यावर कुत्र्याने तुमचा नाद सोडला. थोडक्यात काय तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध धावायला लावले कुत्र्याने- या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास, चिड , संताप होईल-   पण  तुम्ही जेंव्हा हजार रुपये भरून जिम मधे धावायला जाता, तेंव्हा तुम्हाला आनंद वाटतो.  तेंव्हा तुम्हाला काही त्रास होत नाही,कारण तेंव्हा, तुम्ही जे  धावता   ते शिक्षा म्हणून नाही. तसंच आहे हे पण निवृत्तीचं! लादलेली , आणि आपणहून घेतलेली. एखादी गोष्ट आपणहून घेतली की तिचा त्रास कमी होतो, म्हणूनच व्हीआरएस घेतलेले लोकं आनंदी दिसतात, कारण त्यांनी घेतलेली निवृत्ती ही पुर्ण विचारांती घेतलेली असते. लोकांना  जो पर्यंत हवे हवेसे वाटत आहोत तो पर्यंत रहाणे कधीही चांगले..

वयोमाना प्रमाणे आपल्या समाजात बरीच बंधनं लादली जातात, काही लोकं ती  स्विकारतात, तर माझ्या सारखे काही ती चक्क धुडकावून लावतात. बायको  बरोबर बाहेर फिरायला निघालो, आणि तिचा हात जरी धरला, किंवा खांद्यावर जरी हात ठेवला, तरी हे काय.. रस्त्यावर आहोत ना आपण… असं जेंव्हा म्हणते, किंवा आता वयाला साजेसं वागा- हे काय २० वर्षाचं असल्यासारखं वागता, तेंव्हा नेमकं कसं वागणं अपेक्षित असतं? हे मला तरी अजुन समजलेलं नाही. पन्नाशीला पोहोचला, आता चालती लोकल पकडणं बंद कर, खाण्या पिण्यावर बंधनं ठेव, अरबट चरबट खाणं सोडून दे, वात्रट सारखं बोलणं सोडून दे, फालतू पिजे मारणं बंद कर, मुली मोठ्या झाल्यात, असे जोक्स मारू नकोस  अशा अनेक बंधनांना सामोरं जावं लागतं.अर्थात मी काही बंधनं पाळतो, तर काही सोडून देतो. कुठली सोडून देतो ते तुम्हाला पण चांगलंच माहीती आहे.

पैशांची गरज तर प्रत्येकालाच असते. अहो आज वर्षाला कितीही पगार मिळाला, तरीही तो कमीच पडतो. आपले खर्च पण त्याच प्रमाणात वाढतात, स्टॅंडर्ड ऑफ लिव्हींग वाढवत नेतो आपण,  आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मग पैसा कमी पडतो. हे सगळं का आठवलं?? काल एक फोन आला इन्शुरन्स एजंटचा, म्हणत होता, एक पॉलिसी घ्या , म्हणजे रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळेल तुम्हाला. प्रायव्हेट कंपन्यांमधे नोकरी करणाऱ्यांना पेन्शन नसते, आणि म्हणून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून छळणारे  इन्शुरन्स एजंट्स असतातच. हे असे फोन आले की मला जाम संताप येतो .

जे काही मनात येत गेलं, तसं तसं लिहिलय.. कदाचित थोडं असंबद्ध वाटेल, पण हे माझे स्वतःचे मनातले अगदी खरे खरे विचार, ज्या क्रमाने आले, त्याच क्रमाने इथे लिहले  आहेत. निवृत्ती हा एक प्रत्येकाच्याच जीवनात येणारा एक पडाव असतो, कोणाच्या जीवनात अजुन दहा पंधरा वर्षांनी तर कोणाच्या अजुन काही जास्त वर्षांनी. निवृत्ती ही न टाळता येणारी गोष्ट आहे. त्या गोष्टीला ग्रेसफुली समोर जाता यावं एवढीच मनापासून इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने मानसिक तयारी पण करून ठेवायला हवी हे आज जाणवलं. म्हणून हे पोस्ट!

शेवटी एकच मागणे आहे, ” मरण यावं, ते पाठीवर नाही, तर पायावर उभे असतांना” जो पर्यंत स्वतःच्या पायावर उभा आहे, तो पर्यंत निवृत्त होणं शक्यच नाही मी… !! 🙂