सूर्य मंदीर -मोढेरा
सूर्य मंदीर म्हंटलं की कोणार्क आठवतं. पण तितकंच सुंदर असलेले एक सूर्य मंदीर अहमदाबाद जवळ आहे म्हणून सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ असल्या की त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे पण तसंच..
हेरिटेज वास्तू या मला नेहेमीच भुरळ घालत आल्या आहेत. हेरीटेज वास्तूंची कला कुसर पाहिली किंवा मोठमोठे दगड वर कळसा पर्यंत चढवलेले पाहिले की हे काम ” त्या” काळी कसं बरं केले असेल हा प्रश्न पडतो. भारता मधे सर्वसामान्य जनतेला जरी हेरिटेज वास्तूंची पर्वा फारशी नसली, तरीही पुरातत्त्व विभाग आपलं काम चोख करित असतो.
अशा पुरातन वास्तू जो पर्यंत कोणी जाणकार दाखवत नाही, तो पर्यंत त्यामधला आनंद तुम्हाला मिळू शकत नाही, जर या वास्तूंची माहिती सांगणारा कोणी नसेल तर मग उगाच काहीतरी कोरीव काम केलेलं मंदीर पाहिलं, बस्स्स, यापेक्षा जास्त काही समाधान मिळत नाही. पण तेच जर एखाद्या जाणकार व्यक्तीने दाखवले की त्या वास्तूला एक वेगळंच परिमाण (डायमेन्शन) प्राप्त होतं. या बाबतीत मी थोडा नशीबवान आहे असे म्हणायला पाहिजे. पूर्वी एकदा शिरपूरजवळ उत्खनन सुरु असतांना श्री अरूण कुमार शर्मा हे जागतिक ख्यातीचे आर्किओलॉजिस्ट भेटले होते, आणि त्यांनी उत्खनन सुरु असतांना कसे काम केले जाते ते प्रत्यक्ष दाखवले होते. त्या बद्दल पण पूर्वी या ब्लॉग वर” उत्खननाच्या साईटवर” म्हणून लेख लिहिला होता. या वेळेस पण जेंव्हा सूर्य मंदिराजवळ पोहोचलो, तर तिथे एक जाणकार आर्किओलॉजिस्ट पटेल साहेब भेटले, त्यांनी आम्ही कोण कुठून आलो ही प्राथमिक चौकशी केली आणि अजिबात काही आढेवेढे न घेता मंदीर दाखवायला आमच्या सोबत आले.
मेहसाणा ! अहमदाबाद पासून ७० एक किमी असेलेले एक शहर. मेहसाणाचं औद्योगिक दृष्ट्या असलेले महत्त्व हे त्याच्या आसपास असलेल्या ओ एन जी सी च्या ऑफिस/साईट्स आणि अमूलचे कलेक्शन सेंटर मुळे आहे. इथे येणारे बहुतेक लोकं याच ऑफिसच्या कामासाठी येत असतात. पण माझ्या मते, अहमदाबादला फिरायला म्हणून आल्यावर इथे सूर्य मंदिर, रानीका वाव, आणि पटोला साडी , पाहिल्या शिवाय अहमदाबाद भेट पूर्ण होऊच शकत नाही.
पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर अहमदाबाद पासून साधारण ८०-९० किमी अंतरावर मांढेरा गावात इ.स.१०२२ साली एक सूर्य मंदीर बांधले गेले. सोलंकी वंशाचे राज्य असतांना आणि हिंदू धर्माच्या भरभराटीचा काळ असतांना जे काही बांधकाम झाले, त्या मधले हे एक! मंदिर पाहिले, की त्याकाळच्या हिंदू डायनेस्टीची किती भरभराट झाली होती हे लक्षात येते. मंदिराच्या बांधकामासाठी जयपुरचा सॅंड स्टॊन वापरला गेला आहे. इतक्या दुरून त्या काळी हा सॅंड स्टोन कसा आणला असेल हा प्रश्न मनात येतोच. मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३८ वर्ष लागली असे म्हणतात.

मंदिर बांधण्यासाठी ही अशी लाकडी पाचर वापरलेली आहे. दोन दगडांच्या मधे..
ही अशी कोरीव काम केलेली असंख्य मंदिरं भारतात आहेत, मग या मंदिरात विशेष काय? मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर मोठा बगिचा आहे. हे मंदीर तसे लोकवस्ती पासून त्या काळी दूरच असावे. इथे आल्यावर देवदर्शनापूर्वी लोकांना अंघोळ वगैरे करता यावी म्हणून नैसर्गिक पाण्याचे एक कुंड बनवलेले आहे. त्या काळी खरं म्हंटलं तर ’वाव’ म्हणजे विहीर बांधण्याची पद्धत होती- पण इथे मात्र एक मोठे कुंड बांधलेले आहे. पाण्यापर्यंत पोहोचता यावे म्हणून पायऱ्या बांधलेल्या आहेत. दोन दग एकत्र ठेवण्यासाठी लाकडी पाचर वापरली जायची त्याचे खूणा अद्यापही काही ठिकाणी दिसतात. चौकोनी आकाराच्या या कुंडाला सौंदर्य लाभले आहे ते सभोवताली असलेल्या पायऱ्यांनी आणि त्या पायऱ्यांवर असलेल्या १०८ मंदिरांच्या मुळे. चारधाम यात्रा करणे प्रत्येकाला शक्य होत नसल्याने ह्या १०८ मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले की झाले, अशी भावना होती.

सूर्य मंदिरातला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे हे कुंड..
कुंडाच्या पायऱ्यांचे एक्झॅक्ट चोकोनी असलेले आणि अगदी शेवटच्या मिलिमीटर पर्यंत एकसारखे असलेले आकार, आणि रचना खरंच मनमोहक आहेत. मंदिराच्या जवळ पोहोचलो, की इथेच आपण त्या वास्तुच्या प्रेमात पडतो.
सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिराचा कळस हा अगदी बरोबर “कर्क वृत्ता”वर येतो. सूर्य मंदीर आहे म्हणून तसे बांधले असावे.कुंडा शेजारी एक ५२ खांब असलेला सभामंडप आणि नंतर त्या मागे सूर्य मंदीर बांधलेले आहे.एका वर्षाचे ५२ आठवडे असतात, म्हणून मंदिरासमोरचा हा सभामंडप ५२ खांबावर बांधलेला आहे!प्रत्येक खांबावर धर्म, अर्थ, काम मोक्ष अशा जीवनातल्या चारही महत्त्वाच्या गोष्टींचे शिल्प कोरण्यात आलेले आहेत. दुर्दैवाने ह्या साठी सॅंड स्टॊन वापरल्याने सगळ्या मुर्त्यांचे कोरीव काम बरंच झिजले आहे.
ह्या मंदिराची उंची! ती देखील बरोबर ५२ फुट आहे. मंदिराच्या ईशान्य दिशेला एक स्टेज बनवलेले आहे. या स्टेज वर पूर्वीच्या काळी नाच गाण्याचे कार्यक्रम किंवा ईश स्तवन होत असावे.
मुख्य मंदिरामध्ये एक सूर्य मूर्ती पूर्वी होती ती बहुतेक नंतरच्या काळात कुठे गेली याची माहिती उपलब्ध नाही. ( आख्यायिका नुसार मुसलमानांनी ती तोडली – पण याला काहीच आधार नाही) . कर्कवृत्तावर असल्याने दर वर्षी एक दिवस म्हणजे २१ जून रोजी सूर्याच्या मूर्तीच्या चेहेऱ्यावर गाभाऱ्यात प्रकाश पोहोचतो. ह्या दिवशी सूर्य प्रकाशाचा खेळ पहाण्यासाठी बरेच लोकं येतात.

श्रुंगार करतांना.. खांबावर कोरलेली प्रतिमा
प्रत्येक खांबावर धर्म,अर्थ काम मोक्ष- या चार मूल भूत गरजा कोरल्या आहेत. धर्म – म्हणजे एखादा रामायण महाभारताचा प्रसंग, अर्थ- ज्या मधे त्याकाळच्या धंद्याच्या देवतांचा म्हणजे विश्वकर्मा आणि जसे शेती वगैरे करणारी माणसं, झाडं तोडताना शिल्प वगैरे इतर दररोज केली जाणारी कामं कोरलेली आहेत. काम म्हणजे काही संभोग क्रिया करतानाची शिल्पं कोरलेली आहेत. आणि मोक्ष म्हणजे विष्णू , सूर्य, कुबेर , शिव इत्यादी देवांची शिल्पं कोरलेली आहेत. प्रत्येक शिल्प हे वेगवेगळ्या विषयाला जरी वाहिलेले असले, तरीही ते एकाच खांबावर कोरले आहे हे विशेष. थोडक्यात , पूर्वी च्या काळी धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या बाबींना काही ठिकाणी अगदी सारखे महत्त्व दिले जायचे.
मंदिराच्या बाहेरची शिल्पं ही थोडी वेगळी आहेत. विद्या सगळ्यात मह्त्त्वाची , ही गोष्ट हजार वर्षापूर्वी पण सर्व मान्य होती, म्हणून विद्येच्या देवतेचे सरस्वतीचा शिल्प मंदिराच्या सर्वोच्च म्हणजे कळसाच्या जवळ कोरलेले आहे. , म्हणजे सर्वोच्च ठिकाणी विद्येच्या देवतेचे सरस्वतीचे चित्र कोरलेले आहे.
मंदिराच्या बाहेरच्या भागाकडे पाहिले तर सगळ्यात खालच्या भागात म्हणजे पायाजवळ १०८ हत्ती कोरलेले आहेत, आणि प्रत्येक हत्तीची सोंड ही वेगवेगळ्या दिशेला वळलेली कोरलेली आहे. या पैकी बरेच हत्ती खराब झाले असले तरी अजून काही हत्तींचे सौंदर्य मात्र अजूनही दिसून येते. लहान मुलं जेंव्हा मंदिराला प्रदक्षिणा घालतील तेंव्हा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येतील अशा तऱ्हेने ही हत्तीची शिल्पं कोरली आहेत .
पूर्वीच्या काळी साधारण चौदा वर्ष वयाच्या मुलाला स्त्री पुरुषांच्या संबंधातील ज्ञान मिळावे अशी अपेक्षा असायची. त्यामुळे चौदा वर्षाच्या मुलाच्या नजरेच्या उंचीच्या टप्प्यावर येईल अशा तऱ्हेने मंदिराच्या चारही बाजूने संभोग चित्रे कोरलेली आहेत – ज्या मधे समूह संभोग , किंवा त्या संबंधातील इतर विषयही वर्ज नाहीत. आजच्या युगातसुद्धा आपण सेक्स एजुकेशन असावे की नसावे या बद्दल चर्चा करतो,पण कुठल्याही निर्णयावर येऊ शकत नाही, पण पूर्वीच्या काळी मात्र ते अस्तित्वात होते ही वास्तविकता किती अविश्वसनीय वाटते नाही??
याच्या चित्रांच्या वरच्या उंचीवर, म्हणजे तिसऱ्या टप्प्यात मोठ्या आकारात सूर्य देवाची सात घोडे असलेल्या रथावर बसलेली प्रतिमा, तसेच कुबेर , अप्सरा इत्यादींचे कोरीव काम केलेले आहे. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की संभोग चित्रे ही अतिशय लहान आकारात, तर इतर देवांची आणि अप्सरांची चित्रे ही त्यापेक्षा दहा पट किंवा त्याहूनही जास्त मोठ्या आकारात आहेत, म्हणजेच शारिरीक गरजांपेक्षा आध्यात्मिक गरजांना मोठेपण दिले गेलेले आहे.
समुद्र मंथन,सीतेचे अपहरण, हनुमानाच्या संजिवनी आणण्याचा प्रसंग वगैरे बरेच प्रसंग पण चित्रित केलेले आहेत- पण सॅंड स्टोन वापरल्याने नैसर्गिक झिज झाल्याने नीट कोणीतरी दाखवल्याशिवाय आणि समजून सांगितल्याशिवाय समजत नाही. पटेल साहेब सोबत होते, म्हणून त्यांनी सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितले,
पटेल साहेब म्हणाले की परतीच्या रस्त्यावर एक “वाव” म्हणजे स्टेप वेल च्या उत्खननाचे काम सुरु असलेले दिसेल . ही स्टेप वेल पूर्वीच्या काळी गावातल्या लोकांच्या पाण्याचे साधन होती. इथे सामान्यपणे विहिरींची खोली ७० फूट ते १०० फूट असायची- हल्ली आपण बोअर वेल पण तितकीच खोल करतो, आणि साधी विहीर ही २५ फुटा पर्यंत खोल असते. असो..हे पोस्ट फार मोठं होतंय- या विषयावर आणि “रानीका वाव” वर एक वेगळं पोस्ट याच पोस्टचा दुसरा भाग म्हणून लिहीन..
तुम्ही कधी तिकडे गेलात, तर पहातांना काही गोष्टींची माहिती असावी म्हणून हे पोस्ट!