माझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स.

Written by  on June 22, 2006

हा लेख खूप मोठा होणार आहे ह्याची मला कल्पना आहे पण वाचतांना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही ह्याची खात्री मला आहे.

ह्या ऑर्कूट्चा शोध कोणी लावला असेल? गुगलींग केलं..आणि असं कळलं की हे एका ऑर्कूट नावाच्या माणसाने गुगल मधे काम करताना २०टक्के इंडीपेंडंट प्रोजेक्ट म्हणुन करताना डेव्हलप केलं. गुगल मधे काम करणाऱ्यांना रोज एक तास स्वतः च्या इच्छेप्रमाणे काहीही डेव्हलपमेंट वर्क करण्यासाठी परवानगी असते. त्या काळात हे ऍप्लिकेशन ऑर्कूट ने डेव्हलप केले असे म्हणतात. अशीही वदंता आहे, की ह्या ऑर्कूट ची एक गर्ल फ्रेंड होती , पण तिचा आणि ह्याचा संपर्क तुटला होता, म्हणून त्याने हे ऍप्लिकेशन तिला शोधण्यासाठी डेव्हलप केले. आता खरं खोटं माहिती नाही..

ही सोशल साईट अगदी भारतीय किंवा एशियन वाटते- फेस बुक- माय स्पेस च्या तुलनेमध्ये. मला वाटतं ह्याचं कारण ऑर्कुट वरचे   प्रोफाइल्स.. माझ्या जवळपास ३ वर्षाच्या ऑर्कुट वरच्या  एक्स्पिरियन्स मधे असे  बरेचसे प्रोफाल्स पहाण्यात आले की ते वाचतांना कधी कधी हसून गडाबडा लोळायची इच्छा झाली,तर कधी कपाळाला हात मारुन घ्यायची!

काही प्रोफाइल्स एकदम ट्रेंडी तर काही एकदम कॉंटेंपररी…     माझ्याच फ्रेंड लिस्ट मधल्या काही असे  प्रोफाइल्स आहेत… माझा एक मित्र आहे दिपक , ज्याच्या प्रोफाइलला एकदा भेट दिली असता मला त्याच्या “पुलंप्रेम”  ^(http://rangmarathiche.com/goto/http://cooldeepak.blogspot.com/)ह्या ब्लॉगची लिंक दिसली, आणि लक्षात आलं की हा पण अगदी आपल्यासारखाच तिरशिंगराव दिसतोय, एखाद्या लेखकावर मनापासून प्रेम करणारा..त्याच्याशी मैत्री झाली.. आणि त्याच्या ब्लॉगवरुन स्फुर्ती घेउन हा ब्लॉग सुरु केलाय.

आता हा माझ्या एका मित्राचा प्रोफाइल.. मी काहीच लिहित नाही. अगदी जस्ट जसा आहे तसा कट पेस्ट करतोय

प्रोफाइल असा आहे.. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.orkut.co.in/Main#Profile.aspx?uid=8331075207491752013) . लिंक दिलेली आहे पण खाली डिटॆल्स पण पोस्ट केले आहेत.

राम राम ‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗

विशेष सुचना :

1] ऊगाच येथे घुटमळू नये.
वारंवार चौकश्या करू नयेत.

2] उगाच इथे तिथे क्लिक करत बसू नये..
पेज ला चरे पडतात….

3] प्रोफ़ाईल पहाण्यास ना नाही..
पण चोरुन, लपुन प्रोफ़ाईल पहाण्यापेक्षा
एखादा स्क्र्याप टाकलात तर अधीक योग्य होइल.

4] अल्बम मधील फोटोंकडे एकटक पाहत बसु नये.
आत फ़ार काही पहाण्यासारखे नही.
एकदा पाहुन लगेच बाहेर कटावे.

5]प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये.

6]फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल.

7] ही खासगी जागा आहे, पाहण्यासारखे काही नाही.

8]स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.

9]स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

10] ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे. आम्ही बॅंड विड्थ चे पैसे भरतो.

11]या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल

12] फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही.

13] वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल.

14]ही कामाची जागा आहे. गप्पा मारायचा अडडा नाही
‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗

मागे वळून पुन्हा.
आता नाही बघायचं…

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं…

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं…

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच…

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं…

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं…

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं…

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं…

..

आता ह्या मित्राचे नांव पण मला माहिती नाही पण माझा मित्र आहे हा. अगदी जवळचा मित्र वाटतो. ऑर्कूटवर हे बरं असतं.. स्वतःबद्दलची काहीच माहिती न देता तुम्ही इथे प्रोफाइल बनवूशकता.

आता हा दुसरा प्रोफाइल बघा.. येंगावंडोट्टो झिंन्गिबांडो त्याचे कंटॆंट्स खाली पेस्ट करतोय.माझ्या माहिती प्रमाणे हा ग्रुहस्थ पिएचडी झालेला आहे मराठी मधे . ह्या प्रोफाइलमधे काही फोटॊ आहेत अवश्य पहा..   हसून पोट दुखेल असे फोटॊग्राफ्स ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.orkut.co.in/Main#AlbumList.aspx?uid=12832887223726423927&rl=mo) आहेत..

about me:

माझी प्रोफ़ाईल फ़ेक आहे याची प्रत्येकाने नोंद घ्यावी.

[माझ्याकडुन तुम्हाला काहीही शिकण्यासारखे नाहीये]

माझा उद्देश कुणालाही दुखवण्याचा नाही अथवा कुणाचाही अपमान करण्याचा नाहीये.

मी ही प्रोफ़ाईल माझ्या करमणुकीसाठी फक्त एक विरंगुळा म्हणून बनवली आहे आणि तसेही तुमचे पण चांगलेच मनोरंजन करण्याचा माझा प्रयत्न असेल.

मी एवढं चांगले मराठी कसे बोलतो या प्रश्नाचे उत्तर या प्रोफ़ाईल ला अनुसरून देत आहे याचा माझ्या वास्तविक जिवनाशी काही एक सबंध नाहीये.

मी एका मानाच्या विद्यापीठातुन मराठी वा:ड्मय या विषयात Phd केलेली आहे.

आणि मी यालाच अनुसरून सर्वांच्या सकर्मक क्रियापदाचे अकर्मक क्रियापद करण्यासाठी इथे आलो आहे.

माझ्याबद्दल अधिक माहीती जाणुन घेण्यास इछुक असाल तर,

दिल कि बाते येंगावंडोट्टो कि जुबानी;) 

फ़ुकट काही मिळत नसत,
पण इथे फ़ुकट प्रोफ़ाईल पहाण्यास ना नाही,
पण चोरुन, लपुन प्रोफ़ाईल पहाण्यापेक्षा
एखादा स्क्र्याप टाकलात तर अधीक योग्य होइल.

हे असे गमतीशीर प्रोफाइल्स पहातानाच एका कवी मनाच्या अविनाशची प्रोफाइल ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.orkut.co.in/Main#Profile.aspx?uid=4133735459638919225).. ह्याच्या प्रोफाइल वरुनच कळतं की हा माणुस कसा असेल ते. खरं तर यांचं वय हे ६० च्या आसपास असावं. पण मैत्रीला वय नसतं म्हणतात ना,, म्हणून एकेरी उल्लेख लिहितांना झालाय.. माझ्या पहाण्यात इतक्या रोमॅंटीक कविता  ^(http://rangmarathiche.com/goto/http://avinashkulkarni.blogspot.com/)करणारा तरी एवढ्यात  कोणी आला नाही. ह्याच्या प्रोफाइल वरची कविता इथे पेस्ट करतोय..

ॐकारने ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.orkut.co.in/Main#FullProfile.aspx?rl=pcb&uid=16923562864882064908) तर बरंच काही लिहिलंय प्रोफाइलवर.ॐकार हा गोनिदांचा भक्त, रामदास स्वामींवर भरपुर अभ्यास… पॊटापाण्यासाठी एच आर मधे काम्करतो. पण ह्याच्या प्रोफाइलमदे लक्षवेधी म्हणजे खायला काय काय आवडतं ते.  वाचा इथे…

cuisines:

पुरण पोळीशेवग्याच्या शेंगांयुक्त कटाची आमटीमसाले भातआळुची भाजीसुरळीच्या वड्याकाकडिची कोशिंबीरघोसावळ्याची भजीबिर्ड्याची डाळिंब्यांची उसळपाटवड्यापापडकैरीचे लोणचेजिलबीमठठापुदिन्याची चटणीबटाटे वडेभोपळ्याचे भरीतआमसुलाची चटणीपंचामृतउकडिचे मोदक,मटाराच्या करंज्याआळू वडीमटार बटाटा फ़्लॉवरची भाजीआमरसडाळ मेथ्याकैरीची डाळसोलकढीमुटकूळीकायरस इ.

एक प्रोफाइल  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.orkut.co.in/Main#Profile.aspx?uid=7393196961981178669)म्हणजे एखाद्या कॉज साठी स्वतःला वाहुन घेतलेल्या तरुणाचा प्रोफाइल. हा पण माझ्याप्रमाणेच राइट एक्स्ट्रिमिस्ट पोलिटीकल व्ह्युज असलेला आहे राघव खंडेलवाल.. वय वर्ष २०,पण पुर्णपणे वैचारिक डेव्हलपमेंट झालेला. ह्याचा उल्लेख न करता लेख संपवणं योग्य होणार नाही..

about me:

▲▼▲▼▲▲▼▲▼||जय श्री राम|| ▲▼▲▼▲▲▼▲▼▲
श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा…
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा…

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रीं ची इच्छा…
||जय भवानी|| ||जय शिवाजी||

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही “सहिष्णुतेला”.

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची “संवेदनाही” भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला “शॄंगार” कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक “उज्ज्वल” भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे “मराठयांच्या मनगटात”..
सिंहाच्या जबड्यात घालून हात
मोजीन दात
अशी ही आमची मराठ्याची जात

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

होता तो कोहिनूर हिरा
नाव त्याचं ‘शिवाजी राजा’

महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल

———————–————
____________0____00___0____________
____________00_______0000__________
_____________000000000000__________
_______________000000000___________
______000000______00!______________
_____000000000___________000000____
_____00______00_________000000000__
______________00_______0000__00000_
______________00_______00______000_
_____________000___00000________00_
____________000__00000000________0_
0________0000000000000000________0_
0________00000_0000____00________0_
00________00____00_____00________0_
00_______________00____00_______00_
_00______________000___00_______00_
_00_______________00___00______000_
__00______________000__0000000000__
___00____________0000___00000000___
____000__________0000____00000_____
_____0000_____000000_______________

I m HARDCORE HINDU FOR ANTI-HINDU. I DON’T BELIVE IN SECULAR……but different people think differently in there own way...

तर अशा अनेक गमती जमती आहेत पण हा लेख संपवायला हवा ना. म्हणुन इथे थांबतो. ऑर्कुट हा विषय माझ्या दृष्टीने ओपन ठेवतो म्हणजे पुन्हा कधी तरी लिहिता येइल..

अवयव

Written by  on June 11, 2006

 मानवी शरीराचे अवयव विकायला कायद्याने बंदी आहे, या विषयावर ’मी  मरा्ठी” या साईट वर  एक चर्चा वाचण्यात आली, थोडा वेळ विचार केला, आणि विसरलो सुद्धा!  दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर दोन बातम्या दिसल्या एक बातमी म्हणजे एका माणसाने बायकोला किडनी विकायला जबरदस्ती केली म्हणून तिने पोलिसांकडे धाव घेतली, आणि दुसरी बातमी , एका माणसाने बंगाल मधल्या गावातून पळवून आणलेल्या १७ वर्षाच्या मुलीला केवळ ६ हजार रुपयात कुंटणखान्यात विकले.

दर वर्षी बकरी ईद च्या दिवशी पेपर मध्ये बातमी असते, की एक कुठला तरी बकरा , की ज्याच्या पाठीवर अल्लाह लिहिलेले आहे, किंवा ७८६ ही अक्षरं आहेत, तो बकरा पाच लाख किंवा प्रसंगी जास्त  किमतीत विकला गेला. बकऱ्याचं वजन साधारण ३० किलॊ समजा, म्हणजे प्रती किलॊ काय भाव पडतो?  फार नाही , फक्त रू.१६६६६.००!

चिकन ८०-१०० रुपये किलो मिळतं.. त्या हिशोबाने त्या कुंटणखान्यात विकलेल्या मुलीचे वजन जर पन्नास किलो असेल, तर तिचा भाव साधारण पणे  १२० रुपये किलॊ पडला असेल नाही?  विचारात पडलात ना? मानवी शरीराची किंमत ही बकऱ्या पेक्षा पण कमी!

मानवी शरीराची जडणघडण हे एक  जगाच्या पाठी वरचे  एक चमत्कारच नव्हे तर एक न सुटणारे कॊडे आहे. तुम्हाला सगळं जग जरी दाखवत असले तरीही , तुमचे डोळे स्वतःला पाहू शकत नाहीत, कितीही आवाजाचा त्रास होत असला तरीही तुमचे कान  स्वतःला झाकून घेऊ शकत नाहीत – त्या साठी त्याला हातांची गरज पडते. नाक सगळे वास घेऊ शकला, तरी तोंडात असलेल्या वस्तूचा वास घेऊ शकत नाही- अगदी एक इंचावर असले तरीही. डोकं खांद्यावर मानेने जोडलेलं असले, तरीही कधी विश्रांतीची वेळ आली, की डोकं टेकायला दुसऱ्याचा खांदा लागतो, स्वतःच्याच खांद्यावर स्वतःचंच डोकं टेकवता येत नाही. शरीराचा सगळा भार उचलणारे पाठीचे मणके, स्वतःचे ओझे उचलू शकत नाहीत…

परमेश्वराने वर दिलेल्या सगळ्या अवयवांना एकत्र करून निर्माण केलेल्या या मानवाने स्वतः साठी नाही, तर दुसऱ्यांसाठी जगायचे असते .हे शरीरावर दिसणारे बाह्य अवयव, सौंदर्य वगैरे गोष्टींपेक्षा त्या मधे असलेला माणूस महत्त्वाचा – आणि त्याचं मोल कोणीच लावू शकत नाही.

कायद्याने जरी शरीराचे अवयव विकणे गुन्हा असला तरीही, काही खाजगी दवाखान्यात हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो . त्या मधे मग बरेचदा एजंट्स लहान गावाकडे जाऊन गरीब लोकांना किडनी विकायला तयार करतात. अहो, ज्याला एक वेळ खाण्याची भ्रांत आहे, त्याला जरी ३०-४० हजार देतो म्हंटलं, तर तो ही ऑफर सहजासहजी  नाकारू शकत नाही. एकाने किडनी विकली, की तो एजंट बनून गावातल्या इतर लोकांना तयार करतो  किडनी विकायला.

जो पर्यंत एखाद्या बातमीचा आपल्यावर डायरेक्ट परिणाम होत नाही, तो पर्यंत  कुठल्याही  गोष्टीकडे  आपण अगदी मनात कुठलेही विचार न येऊ देता अगदी मुर्दाड मनाने पाहू शकतो- मग ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो, किंवा कुठलातरी झालेल्या अपघाताची बातमी असो,  किंवा वर दिलेली किडनी चोरीची बातमी असो.

शरीराच्या आत  असलेला कुठलाही अवयव  जरे किडनी,  लिव्हर, हार्ट वगैरे माणसाचे शरीर बंद पाडू शकतो,   पण शरीराच्या बाहेरचा अवयव  फक्त सौंदर्यात भर घालतो- आणि  त्याचा  आपल्या जिवंत रहाण्य़ावर काही परिणाम होत नाही.

वर दिलेली गोष्ट जरी खरी असली, तरी आपण फक्त आपल्या  बाह्य सौंदर्याची म्हणजेच बाहेर दिसणाऱ्या अवयवांची  जास्त काळजी घेतो, मुलं पिंपल्स चेहेऱ्यावर दिसले की एकदम कासाविस होतात, निरनिराळ्या क्रिम्सचा मारा सुरु करतात, गोरं होण्यासाठी पण बरीच औषधं आहेतच,केसांचे शांपू, चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्या  घालवायचं क्रिम, वगैरे आहेतच. ब्युटी पार्लर मधे जाऊन पेडी क्युअर, मॅनी क्युअर , नखांची काळजी पण घेतात हल्ली स्त्रिया… पण  गोरं होण्यापेक्षा स्किन तजेलदार दिसायला हवी, मसल्सचं टोनिंग व्हायला हवं, चरबी  कमी व्हायला हवी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ,पण त्या कडे लक्षं दिलं जात नाही.

ज्या गोष्टी आपल्या जगण्यावर, /आयुष्यावर सरळ परिणाम करतात , जसे खाणे, वजन, त्याकडे अआपण पूर्ण दुर्लक्ष करतो. सिगरेट, तंबाखू, दारू , इतर खाणं वगैरे गोष्टींमुळे आतल्या न दिसणाऱ्या अवयवांवर (लिव्हर, किडनी, फुफुस वगैरे) टॉक्सिन्सचा मारा करत असतो आणि स्वतःचंच आयुष्य कमी करून घेत असतो. नेमक्या ह्याच विचारांमधे , जीवन शैली मधे आपण बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

शरीराचे अवयव विकणे हा कायदा  नसता तर काय झालं असतं तर???मी विचार केला की जर विकायचा म्हंटलं, तर  मी  स्वतःच्या शरीराचा केवळ कापलेली  नखं आणि केस हे दोनच ( ह्यांना अवयव म्हणू शकत नाही ) विकू शकेन.. इतर एकाही अवयवाशिवाय जगणे शक्य होणार नाही मला. बिहार मधे काही शहरात तरूण मुलाला पळवून नेऊन त्याचे लग्न लावून देणे  हा प्रकार सर्रास चालतो,   त्याच प्रमाणे जर  हा कायदा नसता, तर लोकांना पळवून नेऊन त्यांचे अवयव विकायचा राजरोस पणे धंदा सुरु केला असता- आणि या मधे बिहार नाही, तर मुंबई सगळ्यात पुढे राहिले असते असे मला वाटते.

वर लिहिलेल्या  त्या सहा हजारात विकत घेतलेल्या मुलीला कुंटणखान्यात विकले म्हणजे तिच्याकडून पैसे वसूल करून घेण्यासाठी जर तिची किडनी विकली गेली, तर आजच्या बाजार भावाने एक लाख तरी मिळतील, डोळ्यांचा रेटीना , तिची स्किन जी स्किन बर्न पेशंट किंवा प्लास्टीक सर्जरी साठी वापरली जाऊ शकते, तिचं लिव्हर, तिच्या शरीराचा प्रत्येक भाग विकल्या गेला असता  …. जाऊ द्या , नुसता विचार जरी मनात आला, तरी अस्वस्थ होतंय..

इंदूबेननूं खाकरा ..

Written by  on June 10, 2006

इंदुबेननूं खाकरा

अहमदाबादला गेलो की कितीही घाई असली तरीही इंदूबेनच्या दुकानात गेल्याशिवाय रहात नाही. अहमदाबादला गेलो की  नेहेमी हॉटेल चेम्बर्स मधे उतरतो  ( लॉ गार्डन जवळचं) . तिथुन आश्रमरोडला असलेल्या आमच्या ऑफिसकडे जातांना चार पाच दुकानं लक्ष वेधून घेतात- एक हांडवो, दुसरं खींचू आणि दोन तीन खाकऱ्याची दुकानं, त्यामधले एक म्हणजे ’इंदूबेननुं  खाकरा’. गेली विस पेक्षा जास्त वर्ष झालीत पण ह्या दुकानातून खाकरा आणल्याशिवाय परत मुंबईला कधीच  जात नाही. इंदूबेननू खाकरा, डबल डायमंडनूं सिंग हे मस्ट आहे अहमदाबादला.

परवा अहमदाबादला असतांना या दुकानात नेहेमीप्रमाणे गेलो होतो, आणि तिथे जाउन  रांगेत उभा राहिलो. हो, जसे पुण्याचे चितळे बंधु होते (काही वर्षापूर्वी )की जिथे लोकं रांगा लावून सामान विकत घ्यायचे, तशीच परिस्थिती इथली पण असते. इथे जवळपास पन्नास प्रकारचे खाकरे मिळतात. त्यातल्या त्यात मुलांना सगळ्यात जास्त आवडणारे पाणीपुरी, पावभाजी, आणि जिरा हे प्रकार मी नेहेमी घेउन जातो घरी. इथे मिळणारा बाजरीचा खाकरा मला विशेष आवडतो.

सहज भिंतीकडे नजर गेली तर तिथे एक अवॉर्ड लावलेलं दिसलं. टाइम फुड अवार्ड! दुकानदाराला विचारलं, तर म्हणाला, की नुकतंच म्हणजे १५-२०  दिवसा पूर्वीच मिळालंय हे अवार्ड. अहमदाबादी लोकं म्हणजे ’चवाण ’प्रीय, आणि त्यामुळे २०१० चं बेस्ट फरसाण अवॉर्ड जे या दुकानाला मिळालेले आहे ते नक्कीच क्रेडीटेबल आहे.

टाइम्स अवॉर्डत्या काउंटरवच्या माणसाशी गप्पा मारायच्या होत्या, पण त्याला गर्दी मधे फक्त हिशेब करणे आणि माल देणे या शिवाय काही करायला वेळच नव्हता. तरी पण थोड्या गप्पा मारल्या, तर म्हणे की खूप वर्षा पुर्वी एक घरगुती व्यवसाय म्हणून इंदूबेन यांनी सुरु केलेला हा व्यवसाय सचोटी, आणि स्वच्छता या जोरावर इतका मोठा झालाय.  आज त्यांची  मुलं  हाच व्यवसाय सांभाळत आहेत. म्हणाला, जुनीच  रेसिपी, आणि स्वच्छता ह्या गोष्टी अजुन ही पालन केल्या जातात ( अर्थात, टाइम्स ने अवॉर्ड दिलं, तेंव्हा ते ओघा ओघाने आलेच) .आणि म्हणूनच कुठलाही अहमदाबादी माणूस बाहेर जातांना इथे आल्याशिवाय जात नाही.

जुन्या दुकाना शेजारी एक नवीनच दुकान पण आता सुरु केलंय.खाकऱ्या व्यतिरिक्त इथे अजून बरंच काही फरसाण वगैरे पण मिळतं, ते मात्र कधीच घेउन पाहिलेले नाही. एक दिड किलो खाकरा मात्र आवर्जून नेतो मुंबईला परत जातांना.वाजवी दर, आणि उत्कृष्ट क्वॉलीटी यांची खात्री म्हणजे हे दुकान.अहमदाबादला गेलात तर अवश्य भेट द्या..

गोविंदा आला रे….. ..

Written by  on June 3, 2006

1234गोविंदा आला रे….. हा गजर या वर्षी ऐकु येणार नाही. एक करमणुकीचा कार्यक्रम नाही या वर्षी.  स्वाइन फ्लु चं  गोकुळाष्टमी  ला लागलेलं ग्रहण , आणि त्यामुळे पुर्णपणे झाकाळून गेलेली दहीहंडी…. असंही वाटतं, की, काय फरक पडतो दही हंडी बंद केली तर? पण नंतर असंही वाटतं की हा सोहोळा म्हणजे आपले संस्कार आहेत. गेल्या कित्येक पिढी दर पिढी चालत आलेला वारसा आहे. हिंदू संस्कृतिचे प्रतीक पण म्हणता येइल याला.त्यामुळे दहीहंडी चा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे वाईट वाटले.

खरं तर प्रत्येक विभागातल्या  राजकीय नेत्यांना स्वतःची शक्ती दाखवण्याचा हा कार्यक्रम असतो.प्रत्येक लहान मोठा नेता आपलाच कसा   या भागात ’वट आहे” हे दाखवण्याचा प्रयत्न करित असतो. आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी यावं म्हणून मग मोठ्य़ा रकमेची हंडी बांधली जाते. या साठी पैसे गोळा केले जातात ….. ..

एका भागात ११ लाखाची हंडी मनसे ने बांधली तर दुसऱ्या भागात घड्याळवाले ( राष्ट्रवादी) १२ लाखाची हंडी बांधणार हे नक्की. बरं एकाने जर सात माळ्यावर हंडी बांधली तर दुसरा ८ माळ्यावर बांधणार. याहून मोठ्या रकमेची दहीहंडी बांधण्याच्या होड मधे शिवसेना पण मागे नसते.हंडी जितकी उंच तितका जास्त गाजावाजा केला जातो शहरभर..

काही मोक्याच्या ठिकाणावर च्या दहीहंड्यांसाठी हिरो आणि हिरोइन्स पण आपली हजेरी लावतात. मग अशा वेळी स्टेजवर जागा मिळवण्यासाठी बऱ्याच लोकल स्वयंघोषित नेत्यांचा स्वतःला मोठेपणा घेण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. स्टेजवर गळ्यात ५० तोळ्यांच्या सोन्याच्या माळा आणि पाची बोटात हिऱ्याच्या अंगठ्या घातलेले सगळे हे नेते आपापल्या ’आका’ ला (मुख्य नेत्याला), एखाद्या मोराने लांडोरा समोर केलेल्या नाचा प्रमाणेच , काहीतरी ऍक्टीव्हीटी करुन  प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. अगदी पांढरे शुभ्र कपडे आणि पांढऱ्या चप्पल किंवा बुट जरी घातले तरीही ह्यांचा व्यवसाय काय असावा हे,गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या आणि हातातल्या अंगठ्या बघूनच- न सांगता ओळखू येतो.

मोठ्या रकमेची हंडी खूप उंचीवर बांधली जाते. दिवसभर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केल्यावर पण ती फुटत नाही.अर्थात इतक्या वर बांधलेली हंडी कोणिच फोडु शकत नाही, मग रात्री नंतर तिला खाली करुन आपल्याच पक्षाच्या एखाद्या गोविंदा पथकास   हंडी फोडू दिली जाते. असो.. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ लाइव्हलीनेस कडे लक्ष द्यायचं.. आणि मग बघा दही हंडी बघणं पण कसं एंजॉय करता येते ते!!!!

अगदी सकाळपासून कुठल्यातरी राजकीय पक्षाने किंवा एखाद्या लोकल लिडर ने स्पॉन्सर केलेल्या टी शर्ट घालुन ,काही भागातले गोविंदा दोन दोन घोट रिचवून, ट्रकमधे मागच्या भागात बसुन आरडाओरडा करित दही हंड्या फोडण्यासाठी निघतात. एका भागातील दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करुन झाला की मग इतर ठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी हे गोविंदा निघतात.ह्या गोविंदापैकी किती जण उद्या दवाखान्यात किंवा हात गळ्यात बांधून दिसतील याचा विचार नक्कीच डोक्यात येतो.. इतके लोकं पडतात, धडपडतात ,तरी पण या हंडी फोडण्यातला उत्साह काही कमी होत नाही.

आमच्या कॉम्प्लेक्स मधे प्रत्येक बिल्डींग मधे ११२ फ़्लॅट्स आहेत. अशा १८ बिल्डींग्ज आहेत म्हणजे टॊटल २०१६ फॅट्स , प्रत्येक फ्लॅटमधुन  २०१ रुपये म्हणजे टॊटल कलेक्शन ४०५२१६/- रुपये फक्त.दही हंडी   असते साधारणपणे १०००१ रुपयांची.. उरलेल्या पैशाचं काय होतं?? हा तर एका लहानशा सोसायटीतील सोहोळा, जे मोठ-मोठ्या हंड्या बांधतात त्यांचं काय??

या वर्षी स्वाइन फ्लु मुळे दहीहंडी ला विराम आहे…! मुंबईकर या वर्षी गोविंदाला नक्कीच मिस करणार ….!!कसंही जरी असलं तरी हा एक चांगला करमणुकीचा कार्यक्रम असतो!

कॅशलेस? नॉट फॉर मी..

Written by  on June 3, 2006

downloadनोटाबंदी झाल्याचा तो काळ होता, की ज्याने माझे आयुष्यभराचे खर्चाचे नियम बदलुन टाकले. मी जरी टेक्नोसॅव्ही असलो, तरी खर्च करण्याच्या बाबतीत पारंपारीक पद्धत म्हणजे कॅश वापरायचो. मग तो किराणा असो, की लाईट बिल असो. तशी पण हल्लीची मंडळी कॅशलेस कडे वळल्याने, बिल भरायला रांग नसतेच, अगदी दोन मिनिटात काम होतं.

तर , हजार आणि पाचशे च्या नोटा बंद केल्या गेल्या आणि आमचे प्रॉब्लेम्स सुरु झाले. नुकतेच दोन दिवसापूर्वी खर्चासाठी म्हणून ४० हजार रुपये काढून आणले होते. अर्थात त्या पैकी फक्त दोन हजार च्या शंभर च्या नोटा आणि बाकी सगळ्या पाचशे आणि हजार! त्यामुळे फारसा कधी कॅशलेसच्या वाटेला न जाणारा एकदम डेबिट कार्ड वापरायला लागलो. कदाचित लहानपणापासुनचे संस्कार असतील, मी क्रेडीट कार्ड शक्यतो वापरले नाही- आपलं अंथरुण पाहुन पाय पसरावे ही शिकवण अंगी भिनल्याचा परिणाम.

महिनाभर सगळा गोंधळ सुरु होता. माझे तसे दोन अकाउंट्स आहेत, एका अकाउंट मधे नेहेमीच्या खर्चाचे पैसे ठेवलेले असतात, ( ज्याचे कार्ड मी नेहेमी जवळ बाळगतो) .महिना उलटला होता, आणि एकदिवस डिमार्ट ला जाऊन किराणा घेतला आणि लागलेल्या नवीन सवयी प्रमाणे कार्ड पुढे सरकवले. त्या मुलाने कार्ड स्वाईप केले, अमाउंट टाकली आणि तेवढ्यात त्या मशिन वर मेसेज आला, इनसफिशिअंट फंड! क्षणभर एकदम लाजल्यासारखे झाले, अरे कार्ड डिक्लाइन होतं म्हणजे काय? पण मुलगी सोबत होती, तिने कार्ड दिले आणि पेमेंट झाले.

विचार मनात आला, हे असे कसे झाले? अकाउंट मधे जवळपास ८० हजार रुपये होते, गेले कुठे? नंतर एक एक खर्च आठवायला लागला, घराचे पडदे केले त्याचे २३८०० रुपये, सोफा कव्हर्स चे ८००० रुपये आणि इतरही बरेच खर्च डोळ्यासमोर आले. ह्या कॅशलेस मुळे प्रत्येक ठिकाणी कार्ड पुढे सरकवुन पेमेंट्स केल्याने खर्चाकडे लक्ष नव्हते.

मला वाटतं की मुख्य कारण म्हणजे जरी माझे ८० हजार खर्च झाले, तरी पण पैसे खर्च  केल्याचा फिल / गिल्ट अजिबात नव्हता. कारण खरे – पैसे म्हणजे से हार्ड मनी माझ्या हातातुन गेले नव्हते ,फक्त कार्ड स्वाइप करून पिन नंबर टाकला होता, त्यामुळे पैसे गेल्याचा फिल अजिबात नव्हता. जेंव्हा आपण खिशातुन कोणाला १५-२० हजार देतो, तेंव्हा पैसे आपल्या हातातुन ( अकाऊंट मधुन आपणच काढले असतात) तो फिल येतो, पण ऑन लाइन ट्रान्स्फर मधे /किंवा कार्ड पेमेंट मधे पैसे गेल्याचा फिल येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे  एकिकडे सरकार  म्हणते की कॅशलेस व्हा, आणि दुसरी कडे प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर ०.१ % ते २% टॅक्स लागतो. बरेच दुकानदार कार्ड पेमेंट साठी २% जास्त पैसे मागतात. हा एक्स्ट्रॉ खर्च आपण का द्यायचा? पैसे पण आपलेच आणि आपण टॅक्स भरायचा? ही कुठली पध्द्त? अमाउंट किती आहे टॅक्स ची हे महत्वाची नाही, पण आपण ते कुठल्याही कारणाने देण्याची गरज नाही. गॅस ऑन लाइन बुक केला की ५ रुपये सुट मिळते आणि ७.५० पैसे ट्रॅन्झॅक्शन फी द्यावी लागते. सिनेमाची तिकिट बुक केली  की पण सरचार्ज द्यावा लागतो.  आपण  आपले पैसे फुकट का म्हणून द्यायचे?

बॅंका हल्ली खूप स्पॅमिंग करतात , दररोज तिन चार मेसेजेस तरी असतात. पण आपण नेहेमीचे स्पॅम असेल म्हणून ते मेसेजेस न पहाता डिलिट करतो. माझ्या पण बाबतित तेच झाले होते, मेसेजेस यायचे बॅंकेकडून पण मी ट्रू कॉलर मेसेज सर्व्हिस वापरतो, त्यामुळे ते सगळे स्पॅम मधे गेले होते. असो.

कॅशलेस म्हणजे एक प्रकारचा सापळा आहे, त्याची गोडी लागली की तुम्ही त्यातुन कधीच बाहेर पडु शकत नाही. क्रेडिट कार्ड तर अजुन एक सापळा, पैसे नसतांना खर्च करण्याची संधी मिळते, मग आपण खर्च करतो आणि पुढे त्यावर व्याज भरत बसतो. शक्यतो क्रेडिट कार्डचा उपयोग टाळावा. त्यावर मिळणारे पॉइंट्स हवे, म्हणुन कार्ड वापरणारे बरेच लोकं आहेत , त्या फुटकर पॉइंट्स साठी आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात घालणे कितपत योग्य वाटते ?

एका महिन्यात हा प्रयोग करून पहा. बॅंकेतुन महिन्याभराचे पैसे कॅश काढून प्रत्येक ठिकाणी कॅश खर्च करा, आपोआप खर्चावर नियंत्रण येइल.मी आता पुन्हा पुर्वीच्या ट्रॅडीशनल पद्धतीने कॅश खर्च करणे सुरु केले आहे, आणि खर्च नक्कीच कमी झालाय. तुम्ही जेंहा स्वतः कॅश द्याल, तेंव्हा आपले पैसे जाण्याचे दुःख म्हणा किंवा फिल म्हणा तो येतो, आणि आपण सांभाळुन खर्च करतो.

तेंव्हा विचार करा, कॅशलेस चा वापर करता करता, तुम्ही कधी कॅशलेस होऊन जाल ते लक्षात पण येणार नाही, तेंव्हा सांभाळुन. फॅसिलिटी अगदी गरजेच्या वेळॆलाच वापरली तर उपयोगी, नाही तर सापळा.