अंबानींचं घर

Written by  on May 22, 2006

ambaniमुकेश अंबानी  करोडॊ रुपये किमतिचं घर बांधताहेत अल्टमाउंट रोडला , मुंबईला. प्लॉट्ची साइझ तशी मॉडरेट आहे .. फक्त ४५३२ स्क्वेअर मिटर्स.. म्हणजे साधारण ४५ हजार स्क्वेअर फुट. ही जागा अंबानींनी २००२ मधे विकत घेतली होती.त्याच्या बद्दल खरं तर बरंच येउन गेलंय.. पण इथे एक फोटॊ पोस्ट करतोय..आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे खाली.

२७ मजले.. काचेच्या तावदानांचा पुढचा भाग असलेली बिल्डींग असेल ही.  या बिल्डींग मधे १६० कार्स आणि तिने हेलिपॅडची सोय असेल.

इतकं मोठं घरं म्हंटलं की नोकर माणसं आलितंच. म्हणुन जवळपास ६०० स्टाफची सोय असेल इथे .

घराच्या प्लॅन प्रमाणे १७३ मिटर उंचिची बिल्डींग असेल ही. जर एखादी रेगुलर बिल्डींग असती तर एवढ्या उंचिच्या बिल्डींग मधे ६० मजले उभे केले असते बिल्डरने. पण इथे तसं नाही. फक्त २७ मजलेच आहेत.

असं म्हणतात की खालचे सहा मजले फक्त पार्किंग करताच राखिव आहेत. जवळपास १६८ इम्पोर्टेड कार्स पार्क करण्याची व्यवस्था इथे केल्या गेली आहे.

एका मजल्यावर एक फुल फ्लेज्ड सिनेमा हॉल कम एंटरटेनमेंट सेंटर असेल. ह्या मधे काय काय एंटरटेनमेंट असेल हे तर अजुन फारसं कळलेलं नाही. पण सिनेमा व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी असाव्यात.. जसे स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, इन डॊअर स्विमिंग पुल, जिम.. वगैरे..

मिनी थिएटरचा रुफ टॉप हा गार्डन साठी असेल. आणि वरच्या बाल्कनी मधे पण टेरेस गार्डन असेल.  टेरेस गार्डन म्हंटलं की मला आपलं ते चार पाच कुंड्या बाल्कनीत ठेऊन त्यात लावलेले क्रोटन्स आठवतात.. पण तसं नाही हं इथे.. 🙂

नऊवा दहावा आणि अकरावा फ्लोर हा हेल्थ फोअर म्हणुन इअर मार्क केला गेलाय. इथे स्विमिंग पुल, अथलेटीक गेम्स कोर्ट,वगैरे असेल.

त्याच्यावरचे दोन मजले अंबानी परिवाराच्या गेस्ट लोकांसाठी असतिल. सगळ्यात वरचे चार मजले जे अरेबियन सी चा व्ह्यु देतिल, ते सगळे मुकेश आणि त्याच्या बायको आणि दोन मुलांसाठी आहेत. म्हणजे प्रत्येक मजल्यावर फक्त एकच जण रहाणार.

ह्यांच्या घराच्या वरचे दोन फ्लोअर्स हे मेंटेनन्स एरिया म्हणून रहातिल . आणि सगळ्यात वर एअर स्पेस फ्लोअर असेल.

ह्या घराची एस्टीमेटेड किंमत आहे. ४००० करोड….. हुश्श.. समोर किती शुन्य द्यायचे हे न कळल्यामुळॆ शब्दामधे करोड लिहिलंय..

दहा मिनिटात कवी व्हा..

Written by  on May 17, 2006

नेट वरून

फेसबुक वर कविता पोस्ट करण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढलंय. मुलींना   आपण किती संवेदनशील आहोत  हे दाखवायचं असेल तर चारोळी किंवा कवितेला पर्याय नाही, हे आजकालच्या तरूणांनी  ओळखलेलं  आहे म्हणूनच प्रत्येक तरूण कवी  बनण्याचा प्रयत्न करतो.  मंगेश पाडगांवकरांनी जे कवितेला वृत्त छंदाच्या जोखडातून बाहेर काढलं , त्या मुळे तर मुक्तछंद कवींचा सुळसुळाट झाला आहे,  हे जरी खरं असलं  तरी पण वृत्तबद्ध कविता आणि गझल मधला गोडवा काही औरच!

कवितेचा सगळ्या पॉप्युलर प्रकार  म्हणजे चारोळी. चंद्रशेखर गोखल्यांनी या चारोळ्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. शब्दांवर  प्रभुत्व असलेले चंद्रशेखर गोखले हे चारोळ्यांचे अनभिषिक्त राजे!  त्या मूळे जरी तुम्हाला वृत्तबद्ध कविता येत नसतील , तरीही नाराज होण्याची आवश्यकता नाही, चारॊळी हा प्रकार नक्कीच लिहून पाहिला जाऊ शकतो. अर्थात, त्या साठी तुमची कल्पना शक्ती उच्च कोटीची असायला हवी, नवनवीन कल्पना सुचायला हव्या. बरेच असे लोकं असतात की जे हुशार आणि उच्चशिक्षित जरी असले तरी साहित्याच्या  बाबतीत  ’ढ’  असतात. त्यांना कविता करण्या साठी  सगळ्यात मूल भूत गरज असलेले वृत्ताचे ज्ञान, वगैरे नसते, आणि  मुक्तछंद कविता करण्यासाठी शब्दांचे भांडार पण  नसते.    आता अशा लोकांनी काय बरं करावे?

तरूण मुली जात्याच थोड्या जास्त संवेदनशील असतात, त्यामुळे त्या  कविता या प्रकारात बऱ्याच रममाण होतात- आणि म्हणूनच मुलं पण  कवी होण्याचे स्वप्न पहात असतात. मुलांनाही वाटतं , की आपणही कविता कराव्या म्हणजे मनाचा संवेदनशील भाग जगापुढे ( मुलींच्या समोर ) दाखवता येऊ शकेल, पण लिहायला बसलं की काय करावं , कसं लिहावं हेच समजत नाही, म्हणून  आजचा हा लेख अशा होतकरू कवींसाठी- “दहा मिनिटात कवी कसे बनावे?”{ एका सर्व्हे नुसार (मी केलेल्या) }८५ टक्के मुलं ही केवळ मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कविता फेसबुक वर पोस्ट करतात, आणि त्या पैकी ९० टक्के या चोरीच्या असतात..)कवी  होण्यासाठी  काही फारसं करावं लागत नाही. दहा मिनिटात कवी कसे बनायचे याचे सोपे उपाय सांगतो.

पहिला उपाय म्हणजे जर तुम्हाला आपण  काही प्रस्थापित कवी, गझल लेखकांना  फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना आपल्या मित्रांच्या लिस्ट मधे सामील करून घ्या, म्हणजे त्यांचे अपडेट्स वेळोवेळी पहाता येतील. त्या मधे हमखास  उत्कृष्ट कविता सापडतील, त्या कविता तुम्ही आपल्या भिंतीवर आपली कविता म्हणून चिकटवू शकता. फेसबुक वर  पोस्ट करताना ज्याची कविता चोरली आहे  त्या मित्राला  दिसणार नाही अशी पोस्ट करू शकता( फेस बुक मधे तशी सोय आहे). आमचे मित्र धोंडॊपंत आपटे ( उत्कृष्ट गझल लेखक ), चंद्रशेखर गोखले (चारोळीकार), तर अशा चोऱ्यांनी खूप जेरीस आलेले आहेत. आणि परवा तर पंतांनी या चोरांना वैतागून चक्क एक स्टेटस टाकला  :- तो असा ,

सभोवती हे चोर तरी तू नकोस सोडू वाटेला
तुझी पौर्णिमा रोजच असता का घाबरशी अवसेला
कस सोन्याचा आहे त्याला लोखंडाची का भीती
सांग ’अगस्ती’ चोर कोणता चोरू शकतो प्रतिभेला?

कविता जरी चोरली, तरीही आपली प्रतिभा कोणी चोरू शकत नाही . पॉझिटीव्ह थिंकिंग म्हणतात ते यालाच.

दुसरा उपाय  म्हणजे गुगल सर्च मधे जाऊन  इंग्रजी   कवींच्या कविता शोधा, त्यातल्या त्यात रोमॅंटीक कविता जास्त चांगल्या, कारण त्यांना फेसबुक वर जास्त लाइक मिळतात.  त्यांचे मराठी मधे भाषांतर करून आपली कविता म्हणून आपल्या भिंतीवर चिकटवू शकता.  गुगल ट्रान्सलेट मधे इंग्रजी कविता हिंदी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय  भयंकर होते , तेंव्हा इंग्रजी ते हिंदी भाषांतर केल्यानंतर  त्याचा अर्थ नीट जाणून घ्या , आणि एकदा तो अर्थ व्यवस्थित समजला की  तेच शब्द  मराठी मधे  भाषांतर करुन आपली कविता तयार करा.

हिंदी मधे पण उत्कृष्ट कविता आहेत. इंटरनेट वर असे बरेच हिंदी कवितांचे ब्लॉग आहेत , त्या ब्लॉग वरच्या हिंदी कविता  पण खूप छान असतात. मराठी लोकं हिंदी ब्लॉग च्या वाटेला पण  जात नाहीत, म्हणून त्या कविता मराठी मधे ट्रान्सलेट करून आपल्या पोस्ट वर टाकू शकता.  इथे थोडं डोकं वापरून स्वतःचे शब्द वापरले तर कविता चोरीची आहे हे कोणालाच समजणार नाही.

हिंदी गाणी बरीच आहेत . इ.स. १९५० ते १९८० च्या कालावधी मधली गाणी फारच उत्कृष्ट भावपूर्ण असायची, त्यांची शब्दरचना पण अप्रतिम असायची. हिंदी गाण्य़ांची शब्दरचना  इंटरनेट वर शोधा, बऱ्याच साईट्स आहेत अशा गाण्यांच्या शब्दरचना  देणाऱ्या. त्यातल्या एखाद्या गाण्याचे मराठी मधे भाषांतर करा आणि करा पोस्ट आपल्या भिंतीवर! मी तुम्हाला खात्री देतो की हे कोणीही ओळखू शकणार नाही. माझा एक मित्र  आहे  कौस्तुभ नाबर   नावाचा, त्याला खूप हिंदी गाणी पाठ होती,  आणि त्याची अजून एक खासियत म्हणजे कुठल्याही कागदावर न लिहिता मनातल्या मनात भाषांतर करून शिघ्र कवी प्रमाणे तो पटापट कविता म्हणून दाखवायचा.  खूप वर्ष आम्हाला त्याची ही ट्रिक समजत नव्हती. हे अर्थात दिसतं तितकं सोपं नाही, त्या साठी शब्दांचं भांडार तुमच्याकडे असायला हवे, ते टॅलंट कौस्तुभ कडे होतं, म्हणून तो करू शकायचा, पण तुम्ही कागद पेन घेऊन बसा आणि करा प्रयत्न!

जुन्या काळी म्हणजे १९२०- ते ५० च्या काळात वृत्तबद्ध कवितांचे बरेच संग्रह निघाले होते. रद्दीच्या दुकानात गेल्यास कोपऱ्या मधे बेवारस पडलेले असे बरेच कवितासंग्रह दिसतील, त्या मधले एखादे जुने पुस्तक उचलून त्यातली एखादी कविता शब्दशः पोस्ट करा- ती कविता कोणी वाचलेली असण्याची शक्यता जवळपास नसते.ज्याची कविता आहे, तो काही तुमच्यावर आक्षेप घेण्यास जिवंत नाही, म्हणजे ती कविता इंटरनेट वर तुम्ही आधी पोस्ट केली म्हणजे तुमच्या मालकीची आहे, असे म्हणून तुम्ही कधीही भांडणं करू शकता.

नाटकिंग कोल नावाचा एक गायक होऊन गेला. त्याची रोमॅंटीक गाणी जसे” पुट युवर स्विट लिप्स निअर फोन , लेट्स प्रिटेंड वी आर टुगेदर..” वगैरे शब्दशः भाषांतरासाठी एकदम योग्य आहेत. सरळ सरळ शब्दशः भाषांतर जरी केलं तरी खपून जाऊ शकेल.

शेवटचं म्हणजे, फेसबुक वर बरेच कवितांचे गृप आहेत, शक्य तितके जास्त ग्रूप जॉइन करा आणि तिकडच्या कविता  स्वतःच्या वॉल वर पोस्ट करा. जर मूळ लेखक भांडायला आला तर त्याला ब्लॉक करा.. 🙂

तर मंडळी अशा तऱ्हेने तुम्ही केवळ दहा मिनिटात कवी होऊ शकता . हा लेख  लिहीण्याचा प्रयत्न केलाय, कारण माझे बरेचसे लेख  फेसबुक वर काही लोकं स्वतःच्या नावे पोस्ट करताहेत. एक डार्क ह्युमर म्हणून लिहीण्याचा केलेला प्रयत्न, कितपत जमलाय तुम्हीच ठरवायचं.