अस्थी..

Written by  on March 7, 2006

अस्थी..अण्णासाहेब पलंगावर झोपले होते, शेजारी हार्ट रेट मॉनिटर वरचा ग्राफ एका लयीत खाली वर होत होता. शेजारी असलेल्या तीन पेशंटस पैकी आपण एक पेशंट नंबर २, डॉ. राठींचा पेशंट! अण्णासाहेबांचे वय ९४, आज पर्यंत अगदी ठणठणीत तब्येत होती, पण परवा नेमकं बाथरुम मधे पाय घसरुन पडायचे निमित्त झाले, आणि इथे  दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली. आज पर्यंत कधी मला साधी सर्दी पण झाली नाही म्हणून ब्रॅगिंग करणारे अण्णासाहेब  आज पलंगावर पडून कसला तरी गहन विचार करत होते.

तेवढ्यात नर्स आली, आणि व्हायटल पॅरॅमिटर्स चेक करुन पलंगाच्या शेजारी लावलेल्या चार्ट वर नोट करू लागली. अण्णासाहेबांची चार मुलं, आणि दोन मुली. त्या पैकी तीन मुलं आणि एक मुलगी अमेरिकेत, एक मुलगा जो सध्या कामानिमित्त बंगलोर ला गेला होता तो एक आणि शेजारी बसलेली मुलगी श्वेता एवढेच काय ते भारतातले कुटुंब. हातावर जोडलेल्या सलाइनच्या ट्युब  ला मॅनिप्युलेट करुन अण्णासाहेबांनी तोंडावरचा ऑक्सीजन मास्क बाजूला करण्याचा आणि काही तरी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. श्वेता एकदम सजग पणे तोंडावरचा मास्क निट करायला गेली, पण त्या सलाईनची ट्यूब जोडलेल्या हातात असली नसली सगळी शक्ती एकवटून त्यांनी तिच्याकडे पाहिले. न बोलता, पण डोळ्यांनी बरंच काही सांगितलं श्वेताला, तिने हळूवार पणे मास्क बाजूला करुन त्यांच्या ओठाजवळ कान नेले, ते म्हणाले, ” रघुवीर ला बोलाव लवकर, मला त्याला काही महत्वाचे सांगायचे आहे, मी आता काही फार जगणार नाही’

रघुवीर म्हणजे भारतात असलेला मुलगा. श्वेताने त्याला ताबडतोब फोन केला, आणि अण्णासाहेबांचा निरोप सांगितला. रघु थोडा विचारात पडला, नेमकं काय सांगायचं असेल बरं अण्णासाहेबांना? त्यांची असलेली सगळी प्रॉपर्टी त्यांनी स्वतःच्याच मर्जीने आपल्या मुलांमधे वाटली होती. आता फक्त बॅंकेत असणारे ६ लाख रुपयेच शिल्लक होते, ते जरी आपल्या नातवांना वाटले, तरीही प्रत्येकी फार तर ६०-७० हजार मिळतील. त्याबद्दलच बोलायचं असेल का अण्णांना? अण्णासाहेबांचं आयुष्य जसे एखाद्या मध्यमवर्गीय माणसाचे जावे तसे गेले होते. विशेष घडामोडी ह्या फक्त सिनेमातल्या नटांच्याच आयुष्यात घडत असतात, ह्याचा पुरावा म्हणजे अण्णासाहेबांचे आयुष्य!  मुलांना शिकवणे, मोठे करणे, आणि वेळेवर लग्न करुन देणे हे सगळं काही व्यवस्थित पणे पार पाडले. सध्या पण मिळणारी पूर्ण पेन्शन ते तर एका अनाथालयाला दान देत आहेत गेल्या १५ वर्षापासुन. मग त्यांना नेमकं काय सांगायचं असेल?

रघु सरळ दवाखान्यात पोहोचला. अण्णासाहेबांच्या शेजारी जाऊन उभा राहिला. श्वेता पण काळजीयुक्त नजरेने पहात होती. दादू, अरे अण्णांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तु बस इथे, मी जरा फ्रेश होऊन येते. रघु अण्णांना म्हणाला, मी आलोय. अण्णांनी डोळे उघडले आणि धडपडत उठुन बसले. रघुने नर्स ला बोलाउन कॉट सरळ पोझिशन मधे म्हणजे बसण्याच्या पोझिशन मधे करायला सांगितली. नर्स गेली आणि अण्णा रघुला म्हणाले, बेटा मला तुला जे काही सांगायचं आहे ते सध्या जगात जिवंत असलेल्या व्यक्तींपैकी फक्त एकाला ठाउक आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे मी. आणि ही गोष्ट तु कोणालाही सांगणार नाहीस ह्याचे वचन दे. रघुने हळूवार पणे त्यांच्या सुरुकुतलेल्या हातांवर हात ठेवला, आणि हलकेच हात दाबला, एक अश्युअरन्स न बोलताच कन्व्हे केले.

अण्णा सांगु लागले, ही गोष्ट आहे साधारण ६० वर्षा पुर्वीची. १९४६ साल असावे.  आमच्या आबांचा शेतात साप चावुन मृत्यु झाला. तसे म्हंटले तर आबांचे काही हे मृत्युचे वय नव्हते. आबा म्हणजे अण्णासाहेबांचे वडील. एक  नावाजलेले शेतकरी, गावचे वतनदार. सहा फुट उंचीचे धिप्पाड आबा म्हणजे मालगुजार. भरपूर माय जमवलेली. पण शेवटी दैवापुढे कोणाचे काय चालते? अण्णा सांगत होते, आणि रघु कुठेही त्यांना न टोकता ऐकत होता.

तर झाले असे, की आबांच्या मृत्यु नंतर त्यांच्या अस्थी घेऊन मी आणि तुझा नरु काका , गेला बिचारा तो पण ! बनारसला निघालो. आधी नागपूर स्टेशनल पोहोचलो आणि बनारसचे तिकीट काढले. प्रवासात जायचे म्हणजे एक वळकटी त्या मधे अंथरायची पांघरायची चादर, आणि एक धोतरजोडी – कुर्ता.  अस्थी एका पितळेच्या कडीच्या डब्यात घेतल्या होत्या. तर हा सगळा लवाजमा घेऊन आम्ही थर्डक्लास च्या डब्यात कसे बसे शिरलो. त्या काळी फारशी गर्दी नसायची ट्रेन मधे आम्ही दोघेही खिडकी जवळची जागा धरून बसलो.  ट्रेन निघाली, पाच सहा तास झाले, अजुनही जबलपूर आले नव्हते, पण आमचे मात्र डोळे लागायला लागले. वळकटी उघडुन सतरंजी अंथरली आणि दोन बर्थ च्या मधल्या जागेत आडवे झालो. पितळेचा चकचकीत अस्थींचा डबा शेजारीच ठेवला होता. आमचा डॊळा लागला आणि जाग आली तर सतना स्टेशन आले होते. आम्ही धडपडून उठलो आणि आपल्या अंथरुण पांघरुणांच्या घड्या करून पुन्हा वळकटी बांधुन तयार झालो. थोड्याच वेळात अलाहबाद आले आम्ही आपले सामान आवरुन उतरण्याची तयारी करु लागलो, तर पितळेचा डबा कुठेच दिसेना? आता काय करायचे? इकडे तिकडे शोधला, पण काही कुठे सापडला नाही. बहूतेक चोराला वाटले असावे की सोन्याचे दागिने वगैरे असतील डब्यात म्हणुन इतके सांभाळत होतो आम्ही, आणि म्हणुनच तो डबा चोरला असावा.

काय करावे काही सुचत नव्हते, शेवटी तुझ्या नरु काकाला म्हंटले, नऱ्या कोणाला सांगशिल तर खबरदार, तंगडं मोडीन तुझं. आपली दोघांचीही चूक आहे, तेंव्हा आपणच निस्तरायची. तसेच घाटावर गेलो, आणि पंडीतजींना झालेली घटना सांगीतली. पंडीतजी म्हणाले, आपण दर्भाच्या अस्थी करून करु या विसर्जन, थोडा जास्त खर्च होईल, पण  तुम्ही काळजी करु नका. तर शेवटी एकदाच्या नसलेल्या अस्थींचे विसर्जन करुन आम्ही परत गावी आलो.

तर तुला आज हेच सांगायला बोलावले की माझ्या अस्थी जपून घेऊन जा, रस्त्यात हरवु नकोस, आणि व्यवस्थित विसर्जन कर. सांग्रसंगीत पूजा करून मग नंतरच विसर्जन कर अस्थींचे. आणि अण्णासाहेबांनी डोळे मिटले. रघुच्या चेहेऱ्यावर किंचीत हसु आले, पण डोळे मात्र पाण्याने डबडबले होते, तो तसाच  अण्णांचा निर्जिव हात हातात धरुन  बसुन राहिला. ..

फिअर इज द मोटीव्हेटर.. २

Written by  on March 7, 2006

रात्री बराच वेळ मरीन लाइन्सच्या कठड्यावर एकटाच बसला होता . दिवसभर आपण काय केलं याचा विचार करत. काय वाईट केलं आपण? काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का? तो पहिला टॅक्सीवाला नाही, कसा म्हणाला, की जाओ पुलीस को बुलाओ…बरोबर केलं आपण.नकळत आईची आठवण झाली , डोळे भरून आले. तिला समजलं की आपल्याला एच आय व्ही आहे तर काय वाटेल तिला? हे रोगाचे जे संक्रमण झाले आहे, ते दिलेल्या रक्तातून ह्यावर विश्वास ठेवेल ती? तिथून उठला आणि चालत निघाला. टॅक्सी थांबवली, आणि घरी निघाला.

घरी जाण्यापूर्वी एका हॉटेल मधे जेऊन घेतलं, आणि घरी पोहोचल्यावर टीव्ही सुरु केला. सगळीकडे तो ’ पोस्ट ईट’ किलर ची बातमी सुरु होती. कोणालाच काही सांगता येत नव्हतं . पण काही लोकं मात्र उगाच टिव्हीवर यायचं म्हणून पोलिसांना आपण त्या पोस्ट इट किलरला पाहिल्याचे सांगत होते. काही लोकं तो सहा फुट उंच आणि सावळा आहे म्हणत होते, तर काही चांगला गोरा पान आहे हो, पण अंमळ बुटकाच.. म्हणत होते. टिव्ही चॅनलचा प्रतिनिधी मात्र रस्त्यावर दिसेल त्या माणसाला थांबवून विचारत होते, की ’ या खुन्याबद्दल तुम्हाला काय वाटते?”  जवळपास ९५ टक्के लोक या खुन्यावर एकदम खुष होते, म्हणत होते, हे असंच व्हायला हवं!

शांतपणे झोप लागली आज रोहनला. रात्री ११ वाजता जाग आली .   जे काही झालं, ते इन्स्टंट रिफ्लेक्स होतं, पण या पुढे मात्र प्रत्येक गोष्ट करायची ती पूर्ण विचार करून. नगर सेवकांचे बोर्ड दिसत होते त्याला सगळीकडे लागलेले. काही ठिकाणी तर सोन्याने लडबडलेले नगर सेवक, त्या पोस्टर्स मधून अंगावर आल्यासारखे दिसत होते. बस मधे कंडक्टरला एका वयोवृद्ध माणसाने ति्कीट मागितले आणि दहाची नोट दिली. नेहेमीप्रमाणे कंडक्टर खेकसला, आणि “खाली उतरा चिल्लर नाही’म्हणून त्या माणसाच्या आईबहिणींचा उद्धार करत म्हणाला. जवळपास ७० तरी वय असावं. रोहनला वाटलं आपण द्यावे पैसे, पण नको.. उगाच नजरेत भरायला नको कोणाच्या. एका तरूणीने , काका, थांबा मी देते, म्हणून त्यांचे चार रुपये दिले तिकीटाचे.  बस सुरु झाली, लहानसा प्रसंग, पण कोणी इतका मनावर घेतला नाही.

शेवटच्या स्टॉप चं तिकिट घेतलं रोहनने, आणि शेवटल्या स्टॉप   येण्यापूर्वीच सगळे लोकं उतरून गेले. फक्त रोहन , कंडक्टर आणि ड्रायव्हर होता.  रोहनने पिस्तुल काढले, आणि कंडक्टरच्या  कपाळावर टेकवून हलकेच ट्रिगर ओढला. खिशातून आधीच लिहून ठेवलेली पोस्ट ईट त्याच्या शर्टवर मागे चिकटवली , आणि काही झालेच नाही  अशा आविर्भावात चालत पुढे निघाला. त्या पोस्ट ईट वर लिहिलं होतं,” जर हा वयोवृद्ध लोकांशी नीट वागला असता, तर अजून नक्कीच जगला असता”

रात्री उशीरा फिरणे धोक्याचे आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त असतो, उगाच एखाद्याने पकडले तर मग आपल्याकडे असलेल्या पिस्तुलाबद्दल काही जस्टीफिकेशन देऊ शकणार नाही.तो घरी गेला आणि शांत पण झोपला. आज मात्र खरंच शांत झोप लागली होती रोहनला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जाग आली, त्याने दार उघडून कडी मधे अडकवलेला पेपर काढला, त्या मधे फक्त टॅक्सीवाल्यांच्या खुनाची माहिती होती. दोन टॅक्सी वाले आणि एक बस कंडक्टर. त्या पोस्ट ईट बद्दल बहुतेक पोलिसांनी गुप्तता पाळलेली दिसत होती, पण टीव्ही वरच्या बातमीचा हवाला देऊन मात्र त्यांनी उल्लेख नक्कीच केला होता. कोण असेल हा पोस्ट ईट किलर? म्हणून खूप चर्चा केली गेली होती. काही लोकं तर असे अजून काही पोस्ट ईट किलर्स तयार व्हायला हवे असेही म्हणत होते.

दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना रिपोर्ट दाखवायचा होता. त्याला दवाखान्यात दिल्या गेलेला त्रास आठवला. पैसे जास्त काढायचे म्हणून विनाकारण कराव्या लावलेल्या टेस्ट्स, आणि देण्यात आलेले एच आय व्ही + रक्त! ह्या दवाखान्याप्रमाणेच सगळीकडे सुरु असतं . पॅथोलॉजीस्ट! खरं तर त्याने रक्त देण्यापूर्वी चेक करायला हवं होतं, पण नाही, त्याने न केल्यामुळॆ आपल्याला हा रोग झालाय. तो सरळ डॉक्टरच्या केबिन मधे गेला, आणि आतून दार बंद केले. डॉक्टर एकटेच बसलेले होता. हातातले पिस्तूल काढून समोर धरले, आणि  खिशातून मॉर्फिन भरलेली सिरिंज काढली. जवळपास २० एमएल मॉर्फिन होतं त्यात. ते टेबलवर  ठेवले, आणि डॉक्टरला टॊचलं. एक पोस्ट ईट ठेवली ” जर याने आपलं काम व्यवस्थित केले असते,  तर आज हा मेला नसता”  आणि तिथून बाहेर पडला.

पुढचे दोन तिन दिवस नुसता घरात बसून होता रोहन. फक्त सारखा बातम्या पहात होता तो.
रोहनने जवळ असलेले काडतूसं मोजले. जवळपास ९३ शिल्लक होते अजून. ठरवले की अजून कमीत कमी ९२ लोकं तरी संपवायचे. आणि आता हेच आपले जीवित कार्य.

काही दिवसापूर्वी आपण जेंव्हा बाईकच्या रजिस्ट्रेशन साठी गेलो होतो, तेंव्हा झालेला आरटीओ मधला त्रास, कार्पोरेशन मधला त्रास, घराच्या केस साठी वकिलांनी दिलेला त्रास,आपलं घर फोडलं गेलं होतं, तेंव्हा पोलीस कम्प्लेंट करायला गेलो असता, तिथे पोलिसांनी आपल्याला चोर असल्याप्रमाणे  दिलेली वागणूक, कॉलेज मधे वडीलांना द्यावे लागलेले डोनेशन, शाळां मधले भ्रष्टाचार, अशा अनेक गोष्टी नजरेसमोर आल्या, आणि  आपल्या जगण्यालाही काही तरी अर्थ आहे, हे वाटायला लागलं.

पुढच्या काही महिन्यात रोहनच्या जवळच्या जवळपास ६८ बुलेट्स संपल्या होत्या . सगळीकडे त्या पोस्ट इट खुन्याची चर्चा होत होती. कोण असेल तो? पण जे काही करतोय ते बरं करतोय., असाही सुर असायचा लोकांचा. पोलिसांचं पण काम कमी झालेलं होतं. रोहन  नोटीस केलं होतं, की   कंडक्टरचे वागणे, शाळांच्या मालकांचे वागणे, , शिक्षण सम्राटांचे पैसे मागणे,आरटीऒ, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, सरकारी नोकर , व इतर सरकारी विभागातले लोकं, व्यवस्थित वागू लागले होते. पोस्ट ईट किलर चा सगळीकडे उदो उदो होत होता.

आजकाल   मात्र  रोहन घरीच बसला होता. आजकाल सगळे लोकं एकमेकांशी चांगले वागत होते. कोणी कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत होते. “काय सांगावं, आपण एखाद्याला त्रास द्यावा, आणि नेमका तोच पोस्ट ईट किलर निघाला तर?”  जग सुंदर आहे याची प्रचिती येत होती.

“फिअर इज द की” एकदा लोकांना कशाची तरी भिती असली, की लोकं व्यवस्थित वागतात. आपले कायदे इतके कुचकामी आहेत, की कायद्यांना कोणीच घाबरत नाही. लाच, लुचपत, वगैरे गोष्टी अगदी पोलीसा पासून तर राजकीय नेत्यांपर्यंत सगळेच करप्ट आहेत. काय करणार? आता उरलेल्या बुलेट्स वापरायची वेळ येते की नाही? हा विचार आला होता मनात. आता दुसऱ्या शहरात जायचं का?? ह्या विचारत असतांनाच .. दारावरची बेल वाजली आणि कोरीयरच्या मुलाने एक पाकिटं हातात दिले आणि सही  घेतली.

 सोफ्यावर बसला, आणि त्याने ते पाकिटं उघडले., त्यात लिहिले होते, की तुम्हाला पूर्वी  दिल्या गेलेला एच आय व्ही + चा रिपोर्ट हा तुमचा नसून दुसऱ्याचा आहे, आणि चुकिने तुमचे नांव टाईप केल्या गेल्याने तुम्हाला दिला गेला होता. सबब, तुम्ही  तुमचा खरा रिपोर्ट (एच आय व्ही – निगेटिव्ह असलेला ) सोबत पाठवत आहे, आणि सोबत रिपोर्ट जोडलेला होता …रोहन कपाळाला हात लावून बसला.

फिअर इज द पॉवर फुल मोटीव्हेटर.. जर आपल्याला आपण मरणार आहोत ही भिती नसती तर आपण हे सगळं केलं असतं का??  कदाचित नाही.  फिअर इज द की….!!

सौंदर्याचा महामेरू

Written by  on March 5, 2006

madhu1मला आठवतं मी लहान असतांना माझे सगळे काका लोकं  मधुबालाच्या आरस्पानी सौंदर्याचे चाहते होते. माझ्या एका काका च्या वहीत तिच्या फोटोंचे कात्रणं पण होते बरेच.तेंव्हा फारसं कळत नव्हतं पण  मधुबाला हा विषय हमखास असायचा त्यांच्या बोलण्यात हे मात्र पक्कं आठवतं. मी एकदा विचारल्याचं पण आठवतं.. ही मधुबाला कोण म्हणून? ( अर्थात माझं वय तेंव्हा ६-९ वर्ष असावं)

इतक्यातच कुठेतरी वाचण्यात आला मधुबाला” शब्दाचा लॉंगफॉर्म -मला वाटतं उदय सप्रे यांनी लिहिलंय- हे नांव पण  लक्षात रहाण्याचे कारण उदय सप्रे नावाचा माझा एक शाळकरी मित्र पण होता”.मला बाकी एक लक्षात यायचं की मधुबालाचं नाव काढलं तरीही माझ्या काकांचा आवाज उगाच हळवा होतो.. 🙂

म= मदिरेशिवाय
धु=धुंदावणारं
बा= बावनकशी
ला= लावण्य
काय सुरेख शब्दच्छल आहे नाही का?   खरंच दाद द्याविशी वाटते. हळूहळू जसे आम्ही सिनेमा पहायला लागलो , तेंव्हा मधुबालामुळे पाहिलेला पहिला चित्रपट आणि त्यातलं ते गाणं.. एक लडकी भिगी भागी सी.. बस्स! आणि प्रेमातच पडला महाजालाच्या!त्या नंतर मॅटिनीला लागणारे बरेच चित्रपट पाहिले मधुबालाचे.

नंतरच्या काळात माधुरी दीक्षित आली. आमच्या वेळी तर माधुरी चे अबाधित राज्य होते. तिचं सौंदर्य हे मधुबालाच्या  कॅटॅगरितलं म्हणजे अगदी फोटोजेनिक.  मला पण माधुरी दीक्षित खूप आवडायची . तिच्या सोबतच आलेल्या इतर नट्या जसे मद्रदेशीय श्रीदेवी, किंवा भारत सुंदरी जुही चावला(विथ ड्यु रिस्पेक्ट) ह्या पैकी कोणीच माधुरीच्या आसपास पण पोहोचु शकले नाही असं मला वाटतं.

आणि माधुरी दीक्षित ने अबाधित राज्य केले ह्या बॉलिवुडवर. तसं म्हणायला अगदीच डेस्परेशन दाखवून , सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले करत कपुर कन्या करिष्मा पण नाचली ( की लोळली सगळ्यांसमोर?) पण त्याचा फायदा हा फक्त बी ग्रेड प्रशंसक मिळवण्याकडे झाला.. गोविंदा सोबतचे काही चित्रपट असो.. काही उल्लेखनीय नाही…….

delhi-6हा विषय आठवण्याचे कारण?? आज एक सुंदर फोटो पाहिला आणि एकदम आवडला.. आणि तो फोटॊ इथे देतोय.. जिआयएफ इमेज आहे ही.. ही नवीन नटी पण एकदम फोटॊजेनिक चेहेरा घेउन आलेली . सोनम कपुर. खरं सौंदर्य आहे हिचं