मुक्त विचार…

Written by  on January 30, 2006

आजचे पोस्ट म्हणजे मुक्त विचार. एका विचाराच्या अनुषंगाने येणा्रे सगळे विचार इथे मांडतोय.

सावित्री बाई फुले.

आमच्या घरी एक नागपूरला असतांना एक बाई धुणे भांडी करायला यायची. तिचा नवरा सायकल रिक्षा चालवायचा. स्वतःची प्रॉपर्टी म्हंटलं तर रिक्षा आणि कार्पोरेशनच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली एक झोपडी . पाच मुलींची आई असलेली ती बाई जेंव्हा यायची तेंव्हा तिच्या पाचही मुली वय वर्ष दोन ते ७ च्या दरम्यानच्या तिच्या मागे एखाद्या बदकाच्या मागे पिल्लं यावी तशा यायचा.अंगावर नवऱ्याने केलेल्या  मारहाणीचे डाग असले तरी ते अभिमानाने दाखवायची, म्हणायची, नवरा आहे हो, मारणारच, मुलगा होत नाही म्हणून- म्हणजे पाच वेळेस मुलगी झाली हा तिचा दोष , आणि हे तिलाही मान्य होतं! खरं तर मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषावर   अवलंबुन असतं पण विचार कोण करतो? त्या साठी स्त्री ला दोषी समजणे ही पण  एक परंपराच आहे .  तिने एक दिवस येऊन सांगितले, की  पुन्हा दिवस गेले  आहेत, आणि तिने कामाला  येणे बंद केले.  वंशाला दिवा हवा होता त्याला.

वंशाला दिवा म्हणजे नेमकं काय असतं हो?  त्या रिक्षावाल्या कडे अशी कोणती मोठी प्रॉपर्टी होती? त्याला काय रिक्षासाठी वारस हवा होता की काय?  त्या माणसाची मुलासाठी होणारी जिवाची घालमेल पाहून खरंच नेहेमी आश्चर्य वाटायचं. गरीब असल्याने गर्भजल परिक्षा वगैरे काही केलेली नसल्याने प्रत्येक वेळी मुलाच्या अपेक्षेने चान्स घ्यायचा आणि नंतर मुलगी झाली, की तिची हेळसांड करून मारहाण करायचा.

पुरातन काळापासून हाच प्रकार सुरु आहे. केवळ अशिक्षित स्त्रीच्या च नव्हे तर चांगल्या शिकलेल्या लोकांच्या बाबतीतही हल्ली गर्भजल परीक्षा करून मुलगी असल्यास गर्भपात करण्याचे प्रमाण फार वाढले आहे.  लोकांना मुली का नको असाव्या? काय बरं कारण असेल? केवळ पूर्वापार चालत आलेले संस्कार?

दूर कशाला, एकदा नागपूरला आम्ही सगळे सासरी जमलो असतांना  जेंव्हा कोणीतरी त्यांच्या ओळखीचे पाहूणे आले होते. त्यांनी विचारलं, कोणाला किती मुलं आहेत? यावर सासूबाईंचे उत्तर मोठे मार्मिक होते, दोन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी, पण मुलीला (म्हणजे सौ.ला) दोन्हीही मुलीच आहेत हो. या मधल्या ’मुलीच” ह्या शब्दावर अनावश्यक दिलेला जोर, आणि त्या मूळे एकदम हताशपणा डोकावत होता . त्यांचा तो बोलण्याचा सूर अजूनही लक्षात आहे माझ्या.

जगातल्या कुठल्याही सुखा पेक्षा अपत्य प्राप्तीचे सूख सगळ्यात मोठे आहे.अपत्य प्राप्तीचे सूख म्हणजे एक भावनिक गरज असते. स्त्रियांच्या बाबतीत तर ती खूपच आवश्यक असते, आणि पुरुषाच्या बाबतीत  तर मुलं होणं म्हणजे त्याच्या पुरुषत्वाचा विजय असतो . काही कारणाने जर या अपत्य सुखांपासून वंचित रहावे लागले तर होणारा मानसिक क्लेश हा असह्य असतो. एखाद्या अपत्य नसलेल्या दांपत्या कडे  पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. मंगल कार्यात एखाद्या  प्रसंगी ’तिला’ दिल्या जाणारी वेगळी वागणूक तर स्त्रियांच्या डोळ्यातून हमखास पाणी काढते.

फार पूर्वीच्या काळी स्त्री ला कायम कोणावर तरी अवलंबून रहावे लागायचे. ब्राह्मण समाजात तर विधवा स्त्रीचे आयुष्य अगदी खूप वाईट असायचे. पुनर्विवाह करण्याची परवानगी नाही, केशवपन, आणि नंतर लाल आलवण नेसून आयुष्यभर काबाड कष्ट करायचे. त्या स्त्रीवर इतके मानसिक अत्याचार केले जायचे, की तिला ब्राह्मण समाजात जन्म घेतल्याचा पश्चाताप होत असेल का हा प्रश्न नक्कीच पडतो. इतर समाजात पुनर्विवाह चालायचा, पण ब्राह्मण समाजात स्त्रियांची परिस्थिती फार वेगळी होती. पती निधनानंतर नात्यातल्या जवळच्याच कुठल्यातरी पुरुषाबरोबर शारिरीक  संबंध येऊन दिवस गेले तर  , तर तिलाच वाईट चालीची म्हणून मारून टाकले जायचे.  सावित्रीबाई फुल्यांनी   ब्राह्मण  स्त्रियांसाठी इतकं मोठं कार्य करून ठेवलं आहे , की आजच्या स्त्रियांनी पण त्यांचे आभार मानायलाच हवे.

राजकीय नेत्यांनी पोलिटिकल गेन साठी  सावित्री बाईं सारख्या दृष्ट्या समाज सुधारक स्त्रीला पण   जातीच्या दावणीला बांधलेले आहे, आमच्या जातीतल्या म्हणून त्यांचे आम्ही आदर करणार, अशी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणूनच सावित्री बाई फुले  फक्त “एका” समाजाच्या झाल्या आहेत. त्यांच्यावर हक्क फक्त आपलाच आहे अशी विधाने राजकीय हेतूने केली जातात. आजच्या समाजाला त्यांनी  ’ त्या काळी” काय काम केलेले आहे याबद्दल अजिबात काही माहिती नाही.

ब्राह्मण समाजात सावरकर जितक्या आत्मियतेने वाचले जातात तेवढे सावित्री बाईंच्या बद्दल का बरं वाचलं जात नाही?  कदाचित  काही  ब्राह्मण द्वेष्टा संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांकडून    सावित्रीबाई आमच्या , म्हणून सारखे  त्यांच्या फोटोच्या आड दडून  ब्राह्मण  द्वेषाचे  विचार     मुद्दाम   पसरवले जातात , त्या मूळे हा फोटो दिसला की त्याच्या खाली ब्राह्मण समाजाला शिव्या घातल्या असतील असे वाटते, कदाचित म्हणून वाचावेसे  वाटले  नसतील का?  समाजाचं मन फार हळवं असतं, असं सारखं कुठेतरी काही तरी लिहिलेले वाचून आपले विचार बनवत असतं.   सावित्री बाईंना ’त्यांच्या कडून  ” आजही सपत्न वागणूक दिलेली दिसते, कारण त्यांनी जे काम केलं, त्याचा फायदा ब्राह्मण समाजाला जास्त झाला हे तर नसेल?.   सहज मनात आलं म्हणून लिहितोय,  सावित्री बाईंचा फोटो जर आज ब्राह्मण स्त्रियां समोर ठेवला तर किती स्त्रिया त्यांना ओळखू शकतील?? जर सावित्रीबाई नसत्या  तर ’लाल आलवणातल्या ’ ब्राह्मण स्त्रियांना त्यातून बाहेर पडायला कित्येक वर्ष लागली असती. असो विषयांतर होतंय.

सावित्री बाईंच्या बद्ल विकीपिडीया वर हे असे लिहून ठेवलेले आहे.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.

समाजातील इतर जाती मधल्या स्त्रियांची   परिस्थिती, ब्राह्मण स्त्रियांच्या  इतकी वाईट नसली, तरीही  फारशी चांगली नव्हती.  क्षत्रीय समाजात तर लढवय्या हवा, म्हणून मुलाच्या जन्माला मुलीपेक्षा जास्त महत्व   होते. आज लढाया संपल्या पण मानसिकता तशीच आहे अजूनही.

अनादी काला पासून सगळ्या धर्मांत लग्न हे संभोग सुखासाठी नाही तर वंश वृद्धी साठी करायचे अशी शिकवण  असायची.  प्रत्येकाला (हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन) ७-८ अपत्य तरी असायचीच.मुलं जन्माला तुम्ही घालता  ते केवळ परमेश्वराची इच्छा. तुम्ही तुमचे काम करा, संगोपना बद्दल पण  हे स्त्रीचेच काम आहे, असे प्रत्येकच धर्मात तिच्या मनावर ठसवले जाते. मुलं जर दोघांचीही आहेत, तर संगोपन केवळ स्त्रीने का करायचे हा प्रश्न  कधीच कसा   कोणाला  पडलेला नाही.?मुलींच्या संगोपना कडे नीट लक्ष दिले नाही की , मग   त्यापैकी काही मुली कुठल्या तरी आजाराने मृत्यूमुखी पडायच्या. घरामधे मुलीचा जन्म म्हणजे “एक जबाबदारी”  अशी मनोवृत्ती वाढण्याचे कारण म्हणजे मुलींचे समाजात सुरक्षित नसलेले स्थान.

युद्धासाठी, शेती मधे काम करण्यासाठी, पुरुषांची गरज ही असायची, म्हणून प्रत्येक घरात जास्तित जास्त मुलं झालेली बरी अशी भावना लोकांच्या मनात रहायची . मुलगा झाला म्हणजे घरात कामासाठी दोन हात वाढले, तलवार ढाल घेऊन घराचे संरक्षण करण्यास दोन हात वाढले, अशी मानसिकता त्या काळात होती, म्हणून एखाद्या स्त्री च्या पोटी मुलगा झाला की जास्त आनंद सिलेब्रेट केला जायचा. मुलींची हेळसांड करण, मेली तर बरी, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणं, असे प्रकार तर आजही पहायला मिळतात. कुठल्याही युद्धाच्या प्रसंगी सर्वप्रथम जेता हा त्या जिंकलेल्या भागातल्या स्त्रियांनाच आपल्या वासनेचे शिकार बनवतो.   स्त्रियांची सामाजिक असुरक्षितता आणि  योनीशूचितेच्या  व्हिक्टोरियन काळातल्या  कल्पना हे कारण पण असेल मुलींच्या जन्माला रोखण्याचे.

हल्ली बराच बदल झालाय वरच्या परिस्थिती मधे असे तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्ण पणे चूक आहे. स्त्रिया सुशिक्षित झाल्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने पैसे कमावतात,  पण स्त्री मधे  मातृत्त्वाची भावना, म्हणजेच आई होण्याची तीव्र इच्छा  एकदा वाढीस लागली की मग ती नोकरी सोडण्यासाठी पण तयार होते.  नोकरी सोडल्यावर साहजिकच घरातले इनकम कमी होतं, पण तो त्याग करायला पण स्त्रीया तयार असतात.  दोघांचेही मुल असले, तरीही रात्री बेरात्री मुलं रडल्यास , रात्रभर जागून त्याला कडेवर घेऊन फिरवणे, नॅपी बदलणे, स्वच्छ करणे वगैरे ही कामं सगळी स्त्री ची असतात. पुरुषांना कधी बाळाची नॅपी बदलून बाळाची शी  स्वच्छ करतांना पाहिलंय का? पुरुष फक्त मुलाला तो हसरा असतांनाच कडेवर घेऊन खेळतो, पण एकदा मुलं रडू लागलं, की” अगं,ह्याला   बघ बरं का रडतोय तो” म्हणून सरळ बायकोकडे देतो.   असो, याचे कारण म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या विचारांमधे असावे. सहज गम्मत म्हणून विचार आला ’  आनुवंशिक विचार म्हणायचं का याला”?

प्रत्येकालाच  आपण वृद्ध झाल्यावर मरणार,आणि मग आपल्या पश्चात आपल्या मागे  काय रहणार याची (विनाकारण) काळजी वाटत असते. या शाश्वत जगात, आपल्या अशाश्वत आयुष्याची  कुठल्या ना कुठल्या स्वरूपात   निशाणी   सोडून जायची इच्छा असते.  काही लोकं, या अशा मानसिकते  मधला फोल पणा समजून , मुलींना पण मुलांच्या इतकंच प्रेमाने वाढवतात, मोठं करतात ,शिकवतात हे जरी खरे असले, तरी बहुसंख्य लोकं  मात्र पूर्वापार चालत आलेली  संकल्पनांची जोखडं मानेवर  अभिमानाने  वागवत “वंशाच्या दिव्या”  साठी   पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहातात.

काही कर्तृत्ववान लोकं  जसे स्वामी विवेकानंद, विदा सावरकर,  सावित्रीबाई फुले वगैरे मात्र या मनोवृत्तीवर ओव्हर राईड करून  आपल्या मृत्यु नंतर आपली छाप आपण केलेल्या  कामाने सोडून जातात,  आणि उरलेले ……….??  

हा लेख थोडा भरकटला आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तरीही मी हा पोस्ट करतोय.स्त्री भ्रूण हत्या हा विषय घेऊन लिहीणे सुरु केले होते, पण लिहित असतांना  लेखाच्या अनुषंगाने बरेच बरेच  विषय मनात जसे जसे येत गेले ते तसेच लिहत गेलो. मन चक्क भरकटू दिलं जसे हवे तसे पब्लिश तर करतोय, पण …. डिलिट करावा  का? हा विचार मनात ठेऊन..

हनिमुन..

Written by  on January 28, 2006

honeymoonकाय… मस्त वाटलं ना हेडींग बघून? की आता या पोस्ट मधे काहीतरी चमचमीत वाचायला मिळणार म्हणून?? 🙂 तसा हनिमून हा शब्द  ऐकला की अगदी स्वप्नांच्या देशात गेल्यासारखं वाट्त. उगाच ते जुने दिवस आठवतात….जर लव्ह मॅरेज असेल तरी पण हनिमुनची गम्मत काही वेगळीच.त्यामुळे प्रत्येकालाच तो आयुष्यभर लक्षात रहावासा वाट्तो. कांही तरी स्पेशल करावं असं वाटत असतं.

आमच्या विदर्भात लग्न म्हणजे एक मोठा सोहोळा असतो. आदल्या रात्रीच्या सिमंतपुजना पासून तर अगदी सुन मुख होई पर्यंत दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होते.आणि हे सगळ होई पर्यंत नवरा मुलगा आणि ती मुलगी दोघंही अगदी थकून जातात. घरी गेल्यावर पण पाहुणे वगैरे असतातच. म्हणजे घरी गेल्यावर पण मोकळीक अशी नाहीच.. इथे मुंबईला लग्नं कशी पटापट होतात. सकाळी ८ ला सुरु झालं की ११ वाजे पर्यंत होम, सुन मुख सगळं कांही आवरलं जातं, आणि संध्याकाळी सगळे पाहुणे आपापल्या घरी. मला आवडली इथली फास्ट पध्दत.

हनिमून पिरियड किती दिवस चालणार? लग्न झाल्यावर रिसेप्शन, पाहुणे वगैरेची धावपळ संपली की मग आधी कुलदेवतेचे दर्शन ,कांही लोकांच्या घरी देवीचा गोंधळ , झाला आणि पुजा झाली की मग दोघंही मोकळे होतात, आणि नंतर उरलेल्या वेळात हनिमून,!अशी परंपरा आहे  . ह्या सगळ्या समारंभात वडिलधाऱ्या माणसांच्या दृष्टिने अगदी सगळ्यात कमी महत्वाचा भाग म्हणजे हनिमून.  जी १५ दिवस सुटी मिळते तेवढ्यातच हे सगळं बसवायचं असतं. लग्न तर झालं, पण नौकरी पण महत्त्वाची ना? त्यामुळे एक्झॅक्ट हनिमूनसाठी पिरियड म्हणजे जास्तीत जास्त ५ दिवस ते एक आठवडा.

आयुष्यात हा हनिमुन पिरियड बरेचदा येतो. अरे काय राजे?? असे कपाळावर आठ्या का आणताय? आधी नीट वाचा तर पुढे… तर काय… की आजकालच्या जॉब हॉपिंगच्या कल्चर मधे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारणारे बरेच लोकं असतात. मग नवीन ठिकाणी गेल्यावर, तिथलं वर्क कल्चर, कंपनीचं आपलं स्वतःचं अस्तित्व आणि त्या अनुशंगाने लोकांची कंपनीतली , आणि एकमेकांशी असलेली वागणुक खूप वेगळी असते.नवीन नौकरी.. नवीन बॉस.. आणि वर दिलेलं नवीन कल्चर.. ह्या सगळ्यांशी जुळवून घ्यायला, आणि कामाचं स्वरुप समजावून घ्यायला थोडा  वेळ नवीन   नवीन एम्प्लॉइ ला दिला जातो. या काळात बॉस त्याला काहीच म्हणत नाही. . पण एकदा थोडे दिवस गेले की  मग मात्र….. जे कांही होतं ते असं असतं- खाली दिल्यासारखं…

परवाच आमच्या इथे एका नवीन सेल्स इंजिनिअरला मार्केटिंग मॅनेजर झाप- झाप- झापत होता, आणि तो बिचारा खाली मान घालुन येस सर करित ऐकत होता. म्हंटलं   हनिमून पिरियड संपला रे बाबु तुझा , बच्चे अब दाल आटे के भाव मालुम पडेंगे.

हनिमून नंतरचं पहिलं भांडण आणि नंतर किस हर ऍंड मेक अप.. असं इथे ऑफिसमधे करता येत नाही नां. ( अर्थात बॉस जर …. असो….  🙂 ) त्यामुळे ही बॉस बरोबरच्या  पहिल्या फायरिंगची/ भांडणाची  जखम जरा जास्तच जिव्हारी लागते.उगाच जुनी कंपनी सोडून इथे आलो, तिथेच बरं होतं, चांगलं चाललं होतं कुठुन दुर्बुद्धी सुचली म्हणून इथे या कंपनीत आलो- असं वाटायला लागतं.

असं वाटतं ना की हनिमून पिरियड जर आयुष्यभर चालला, किंवा थोडा जास्त चालला तर कित्ती मज्ज्ज्ज्जा येईल ? हो की नाही??? अहो सहज शक्य आहे ते. आजच  एक बातमी वाचली आज एक महाशय  डेव्ह नावाचे आहेत, की ज्यांचा हनिमून हा चार वर्षं चालला. युरोप मधे कुठल्याशा गावात टॉपशॅन ( डेव्हॉन -यु के) ( नावं पण अशी विचित्र असतात की मराठीत प्रोनाउन्स करायला पण कठीण  )  डेव्ह आणि हेझल या दोघांनी लग्न केलं . नंतर हनिमूनला म्हणुन एका फक्त ५० फुटी मॉडिफाय केलेल्या बोटीने त्यांनी पुर्व युरोप, आफ्रिका, अटलांटिक, कॅनरी आयलंड,अमेरिकेला वळसा घालुन १४ हजार माइल्सचा प्रवास केला. हे सगळं करायला त्यांना लागले ४ वर्षं.. 🙂

चार चार वर्ष हनिमून.. आणि हो, जेंव्हा ते हनिमून हून परत आले तेंव्हा त्यांच्या बरोबर एक दोन वर्षांची गोंडस मुलगी पण त्यांना झालेली होती. आहे की नाही मज्जा??

जर तुमचं लग्नं झालेलं नसेल तर हा आदर्श जरुर ठेवा डोळ्यापुढे.. चार वर्षं नाही, तर कमीतकमी चार महिने तरी—-????आणि जर लग्न झालेलं असेल तर उरलेला बॅक लॉग भरुन काढा.. 🙂

मुळ बातमी इथे आहे … ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.dailymail.co.uk/news/worldnews/article-1217649/Couple-return-home-year-honeymoon-sailing-world--daughter-2.html)

बॉडी लॅंग्वेज

Written by  on January 11, 2006

मॅनेजमेंटची पुस्तकं तशी वाचायला बोअर होतात. तुम्ही एखादं आर्टिकल वाचायला घेतलं की  कशी मस्त झोप येत बघा . एक पान अगदी फारच झालं तर दोन पानं वाचली की मग मात्र डोळ्यावर झापड येते. पण तेच  एखादं फिक्शन वाचायला घेतलं तर  झोप का येत नाही??

समजा…तुम्ही ऑफिस मधे बसले आहात, अगदी एखाद्या सिरियस मिटींग मधे , लॅप टॉप समोर आहे उघडलेला. कुठली तरी एखादी एक्सेल शीट उघडी आहे आणि कोणीतरी तावातावात कुठला तरी मुद्दा मांडतो आहे, खरं तर मिटिंग मधे तुमचं कांहीच काम नाही. पण केवळ बॉस ने म्हंटलं म्हणून तुम्ही मिटींग मधे बसले आहात. समोरच्या प्लेट मधली बिस्किट्स पैकी  बॉर्न बॉर्न  संपली आहेत. आता मोनॅको कडे हात वळतोय. मारी बिस्किट मात्र कोणीतरी थोबाडीत मारल्या सारखी दुर्लक्षित पडली आहेत. एक कुठलंसं क्रिम बिस्किट ज्या मधे क्रिम आहे, आणि मधल्या छिद्रात लावलेलं मिक्स फृट जाम खुणावतंय. पण एकच बिस्किट आहे, म्हणून तुम्ही लाजेस्तव त्याला हात न लावता, शेजारचं मोनॅकॊ उचलता, आणि आता लंच  साठी किती वेळ आहे ते मनातल्या मनात हिशोब लावता  .आत्ता पर्यंत चार कप चहा आणि दोन प्लेट बिस्किटे संपवली आहेत.

knife-in-back1मिटींग मधे काय सुरु आहे या कडे तुमचे अजिबात लक्ष नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की या मिटींग मधे तुम्ही मिस फिट आहात. पण पुर्ण वेळ बसणं कम्पलसरी आहे. सहज चाळा म्हणून तुम्ही   तुम्ही सहज आउटलुक रिफ्रेश करता, आणि  तुमच्या फ्रेंड च्या फोल्डर मधे  कांही मेल्स दिसतात. चेहेऱ्यावर थोडं स्मित हास्य तर उमलत. पण जर ते   मॅनेजमेंट सिरीज मधलं एखादं  कार्टून असेल तर मात्र स्मित हास्याचं रुपांतर थोडं पुढच्या स्टेजला पण जाउ शकतं, म्हणजे थोडं मोकळं ह्सू….काल असंच झालं आणि माझ्या चेहेऱ्यावर एकदम मोठ्ठ हसू फुललं , आलेलं चित्र पाहून.. इथे पोस्ट केलंय..

अगदी असंच झालं.. परवा.  . मला तर मिटींग मधे हसु आवरलं नाही. मिटिंग मधे स्पिकरला ( आमचा क्वॉलिटी मॅनेजर होता )त्याला वाटलं की मी त्यालाच हसतोय, आणि फॉर अ सेकंड तो थोडा डिस्ट्रॅक्ट झाला , त्याला वाटलं की मी बहुतेक त्याचा कुठला तरी चुकीचा पॉईंट पकडलाय. आता क्वॉलिटी अन सर्व्हिस- मार्केटींग मधलं भांडण तर नेहेमीचंच आहे. मार्केटींग नी क्वॉलिटी च्या नावाने ओरडायचं , आणि क्वॉलिटी वाल्यांनी सर्व्हिस च्या नावाने बोंब मारायची..आणि मी मात्र सुपरलेटिव्ह डिग्री मधे फ्रेश झालेलो होतो. माझ्या हसण्यावरून त्याचा बहुतेक समज झाला की त्याचं कांही चुकतंय आणि मी चान्स मिळाला, की त्याला स्कृ करणार.. त्याने सरळ आवरतं घेतलं..त्याचा पॉईंट अगदी रास्त असूनही, त्याने आपला कॉन्फिडन्स लुज केला.बॉडी लॅंग्वेज चा इतका सुंदर उपयोग मला कधीच झाला नाही.

मुक बधिर लोकं ही बॉडी लॅंग्वेज चा उपयोग वर्डलेस कम्युनिकेशन करता सुंदर तऱ्हेने करतात. केवळ बोटांचा वापर करुन जे कांही कव्हे करायचं आहे ते करतात . माझी एक आत्या त्यांच्या   शाळेत शिकवते ती सांगते की ही मुलं पण खूप मस्ती करतात क्लास मधे . शिकवतांना त्यांच्या चेहेऱ्याकडे नाही तर त्यांच्या हाता कडे पण लक्ष ठेवावं लागतं . शिकवतांना जरी त्यांनी गप्पा मारल्या तरीही आवाज नसल्यामुळे समजत नाही.  त्यांच्या कम्युनिकेशन साठी वापरता येणाऱ्या खुणा इथे पोस्ट केल्या आहेत. खुणा खूपच सोप्या आहेत , एकदा लक्षात आल्या आणि सवय झाली की मग कांही कठिण वाटणार नाहीत.
asl_clip_image0021
वर्डलेस कम्युनिकेशन बद्दल बरंच कांही लिहिलं गेलंय. आर डी चं एक पुस्तकं पण होतं.इयरली सब्स्क्रिप्शन बरोबर फ्री आलेलं . त्यात, त्यांनी बऱ्याच खूणांच्या बद्दल लिहिलं होतं  . त्यातल्या काही खुणा इथे लिहितोय. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंफली की मग समजावं की पुढचा माणुस थोडा नर्व्हस आहे. जर पांच ही बोटांची टोकं एकमेकाला चिकटवून हात जोडल्या च्या मुद्रे मधे असतील तर तो माणुस अगदी फुल्ल कॉन्फिडन्स मधे आहे असे लक्षात येते.गालावर हात ठेऊन बसलेला माणुस विचारात आहे असे समजावे.  नाकाला सारखा हात लावून जर कोणी बोलत असेल तर समजा की तो कांही तरी लपवत आहे किंवा खोटं बोलतोय.तुम्ही बोलत असतांना जर डॊळॆ चोळत असेल तर त्याच्या तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही.हात चोळत बसलेला माणुस कांही तरी अपेक्षा करतोय असं समजा.पाय क्रॉस केलेले, आणि हात डोक्याच्या मागे सपोर्टला असतील तर माणसामधे  सुपिरिअररिटी कॉम्प्लेक्स आहे..

हे आर्टीकल असं ऍबरपट्ली  संपवतोय.. कारण पुढे काय लिहायचं हेच कळत नाही!