एल्गार..

Written by  on November 20, 2005

“साध्याच  माणसांचा एल्गार येत आहे,
हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.”

सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’  आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य!   नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा   नाही- तर हा लेख आहे ’श्रमिक एल्गार” वरचा- म्हणजे श्रमिकांची सेना! आता श्रमिकांची नुसती सेना   असेल, पण त्यांच्याकडे   योग्य सेनापती नसेल तर ती सेना काय करू शकेल? पण या ’श्रमिक  एल्गार’ च्या बाबतीत तसे झालेले नाही. त्यांना  अगदी योग्य सेनापती लाभलाय ज्या मुळे प्रत्येक बाबतीत या सेने ने हातात घेतलेले काम पुर्ण केलंय.

प्रत्येक वेळेस  जेंव्हा एखादा ब्लॉग लिहतो,  आणि त्यामधे काही करायची वेळ येते, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ब्लॉग वर एखाद्या इश्यु बद्दल लिहले  की बऱ्याचशा कॉमेंट्स अशाही असतात, की असे लेख लिहून काय होणार? काय करू शकतो आपण? सगळ्या सिस्टीम च्या विरुद्ध आपण उभे राहूच शकत नाह, सगळी कडे करप्शन आहे भरलेले. ही लाल फित शाही काही काम करूच देणार नाही कोणाला, हे जे काही आहे, ते असेच चालत रहाणार वगैरे वगैरे  …….

डोंबीवली फास्ट मधल्या नायका सारखी मानसिक घडण होत असते आपली बरेचदा!    त्या डोंबीवली फास्ट च्या नायकाने स्वीकारलेला   मार्ग पण योग्य वाटतो -वाटतं की हत्यार हातात घेऊन रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींचा बिमोड करावा! हा मार्ग  जरी अयोग्य असला  तरी सुद्धा बरेचदा आपलं मन त्या मार्गाकडे झुकते हे नक्की. अर्थात आपल्यावरचे संस्कार मात्र त्या गोष्टी तुम्हा-आम्हाला करू देत नाहीत हे नक्की..

रुक्मिणी अवॉर्ड स्विकारतांना.. परोमिता गोस्वामी

पण केवळ योग्य दिशेने प्रयत्न करून गुंता सोडवण्याचे कसब असेल, तर कुठलेही काम कायद्याच्या चौकटीत राहुन पुर्ण केले जाऊ  शकते ह्यावर आपला  लवकर  विश्वासच बसत नाही.  परवाच  वर्षाचा एक् मेल आला होता, आणि  परोमिता गोस्वामी बद्दल समजले, की जिने चंद्रपूर जिल्ह्यात एकांगी लढा लढलाय गेले एक तप!  त्यांच्या बद्दल वाचल्यावर मात्र जर एक गोष्ट लक्षात आली, की जर  एखाद्याची खरंच काही करायची इच्छा असेल तर कुठलीच गो्ष्ट ध्येयपूर्तीकडे जाण्याच्या   आड येऊ शकत नाही .  त्याचीच ही कथा  -मनातल्या   पॉझिटीव्ह विचारांना नक्कीच चालना मिळेल हे वाचल्यावर .

माणिकगढच्या शेतकरी स्त्रिया ज्यांच्यासाठी माणिकगढ सिमेंट विरुद्ध रणशिंग फुंकले होते त्यांच्या बरोबर

श्रमिक एल्गार !सुरुवातील अगदी साधारण स्वरूपातील सुरु झालेल्या या संघटनेचे सध्या   २० हजाराच्या वर सदस्य  आहेत. श्रमिक एल्गार ट्रेड  युनियन ऍक्ट च्या अंतर्गत   रजिस्टर केलेली चंद्रपुर येथील एक संस्था – कुठलेही राजकीय लागेबांधे नसलेली. इथल्या भागात रहाणाऱ्या आदिवासी आणि गैर आदिवासी  लोकांसाठी ही संस्था काम करते. जंगल विषयक कायदा, दारूबंदी , शिक्षण वगैरे सगळ्याच सामाजिक गोष्टी आहेत की ज्यांच्याबद्दल आंदोलनं केली आहेत एल्गारने.

गडचिरोली जिल्हा!हे नांव प्रत्येकाने ऐकले असेलच.   पोलीस डीपार्टमेट मधे शिक्षा  म्हणून   या जिल्ह्यात पोस्टिंग देतात म्हणून तरी हे नाव  सगळ्यांना माहीती आहे,  नाहीतर   संयुक्त महाराष्ट्रात हा जिल्हा आहे हे कोणाच्याच ध्यानी मनी ही आलं नसतं.( महाराष्ट्रात असूनही नसलेला हा जिल्हा आहे ) नक्षलवादी कारवाया अगदी जोरात सुरु असतात इथे. या जिल्ह्यातल्या  जंगलाला नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हंटलं तरीही चालेल, इतका जोर आहे त्यांचा इथे!

चंद्रपूर पासून जवळ असूनही दूर असलेला हा जिल्हा. नक्षलवादाचा या भागात असलेला प्रभाव, आणि त्यामुळेच या भागात लोकांसाठी ,( आदिवासी किंवा इतर )काही  काम करणे अतिशय कठीण. नक्षलवाद्यांना  हे सामाजिक काम करणारे  लोकं म्हणजे सरकारी  वाटतात, तर सरकारी लोकांच्या मनात कायम संशय असतो की हे लोकं नक्षलवाद्यांशी तर निगडित नाहीत??  इथे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना  नक्षलवाद्यांशी आपले नांव जोडले जाईल का-ही भिती कायम मनात असते.  पण अशा प्रतिकूल परिस्थिती मधे  गेले एक तप काम करणारी एक  व्यक्ती म्हणजे परोमिता गोस्वामी आणि त्यांचे सहकारी!

श्रमिक एल्गार  ने या भागात  काम सुरु   करूनही आता जवळपास दहा एक वर्ष झाली असावीत.  फॉरेस्ट राईट्स ऍक्ट या कायद्या अंतर्गत  त्या भागातल्या आदिवासी लोकांना जमिनीचे पट़्टॆ देण्याचे प्रावधान आहे ,पण शासनाच्या कूर्मगतीने सुरु असलेल्या कामामुळे ,   चंद्रपूर जिल्ह्यातल्या   आदिवासींना मात्र या तरतुदी पासून काहीच फायदा होत नव्हता, तेंव्हा परोमिता गोस्वामी यांच्या    सपोर्ट वर काही आदिवासी/गैर आदिवासी शेतकऱ्यांनी   केलेले आंदोलन, जंगलाच्या  काही भागात केलेली शेती, त्यांना झालेली  अटक .. … वगैरे   घटना इतक्या वेगाने घडल्या की   श्रमिक एल्गार चे नांव सर्वतोमुखी झाले .

१९९९ मधे सरकारी लालफितशाहीने सरळ या संघटनेचा नक्षलवाद्यांशी संबंध आहे म्हणून आरोप केले आणि तपासणीचे शुक्लकाष्ठ मागे लावून दिले.  नक्षलवाद्यांशी काही संबंध नाही हे  सिद्ध करण्यासाठी परोमिताला हायकोर्टात केस करावी लागली .हायकोर्टात बरीच वर्ष  केस चालली, शेवटी २००२ मधे सेंट्रल गव्हर्नमेंट ने परोमिता   आणि  त्यांच्या संघटनेला   क्लिन चिट दिली- की यांचे कुठल्याही नक्षलवादी ग्रूपशी संबंध नाही .

यांच्या संघटनेने बरीच समाजोपयोगी कामं केलेली आहेत. मुख्य म्हणजे दारू बंदी साठी ’मुल ते नागपूर विधानसभेपर्यंत काढलेला  २०००  च्या वर  कष्टकरी बायकांचा  पायी मोर्चा. जवळपास १३० किमी अंतर पायी चालत ३ दिवसात पुर्ण  केले  होते.  दारू मुळे होणारे कुटुंबाचे नुकसान, आणि त्याच्या विरोधात सगळ्या स्त्रियांना एकत्र करून चळवळ उभी करण्याचे मोठे काम त्यांनी केलेले आहे ^(http://rangmarathiche.com/goto/https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=1QAQJGDRJQwzUZyUnBv9Dka9Pw-Fo9QZ0JvSdlbLT01c6pXtvIc5IAt_ayv0d&hl=en). गवातली दारुची दुकानं बंद व्हावी म्हणून केलेल काम नक्कीच उल्लेखनीय आहे , पण केवळ ए्वढेच नाही तर , गावांमधला पिण्याच्या  पाण्याचा इश्यु,शाळा  अशा अनेक गोष्टींसाठी  त्यांनी आंदोलनं केली- आणि नुसतीच आंदोलनं केली नाहीत , तर शेवटापर्यंत नेली- अगदी रिझल्ट्स मिळे पर्यंत!

त्यांची  एक सगळ्यात मोठी  सक्सेस स्टॊरी म्हणजे माणिकगढची. माणिकगढ सिमेंट म्हणजे  चंद्रपूर मधला एक बिर्ला गृपचा मोठा सिमेंट कारखाना.  सिमेंट कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून लाईम स्टॊन  वापरला जातो. या लाइम स्टोनची खाण कुठेतरी जवळच असेल तर जास्त चांगलं. लाईम स्टोन ला खाणी मधून प्रोसेसिंग प्लांट पर्यंत नेण्यासाठी डम्पर , शॉवेल्स, किंवा कन्व्हेअर चा उपयोग केला जातो. माणीकगढ सिमेंट्ने खाणी पासून कन्व्हेअर बेल्ट लावण्यासाठी सरकारी जमीन वापरायचे ठरवले कारण    कन्व्हेअर चा मेंटेनन्स चा खर्च डम्पर्स, शॉवेल्स किंवा डॊझर्स  पेक्षा फारच कमी असतो , आणि विश्वसनीयता चांगली असते.

माइन्स पासून तर फॅक्टरी पर्यंत असलेली जमीन  फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या  मालकीची, पण या जमिनीवर तिथले आदिवासी आणि इतर गैर आदिवासी लोक वर्षानुवर्ष शेती करत होते. फॉरेस्टची ही जमीन एकाही शेतकऱ्याच्या नावावर नव्हती हे पण लक्षात घ्या. एक दिवस फॉरेस्ट आणि माणिकगढ सिमेंटचे लोकं या लोकांकडे जमिनीचा ताबा मागायला गेले. भरपूर धमक्या देणे, दंडेली करणे वगैरे सगळे प्रकार करून झाले त्या फॅक्टरीचे. बरेच वेळा तर फॅक्टरीचे लोकं  मशिनरी घेऊन पण आले होते काम सुरु करायला पण श्रमिक एल्गार ने या लोकांना भरपूर पाठबळ दिले.

कंपनीचे म्हणणे होते की ती जागा या लोकांच्या नावे नसल्याने तिचे कॉम्पेन्सेशन देण्याचा प्रश्नच येत नाही. कंपनीने मिनिस्ट्री ऑफ एनव्हायरोमेंट ऍंड फॉरेस्ट कडून आवश्यक तो क्लिअरन्स पण आणला होता. तसेच जमिनीची नाममात्र लिझ ची किंमत सरकारकडे जमा केली होती .

इकडे सगळ्या शेतकऱ्यांनी  जो पर्यंत बाजार भावाने कॉम्पेन्सेशन दिले जात नाही , तो पर्यंत जमिनी ताब्यात घेऊ देणार नाही असा पवित्रा सगळ्या शेतकऱ्यांनी घेतला. कशाचा जोरावर सगळे लोकं कॉम्पेन्सेशन मागत होते? जमीन तर नावावर नव्हतीच एकाही शेतकऱ्याच्या?? हा प्रश्न आला असेलच मनात तुमच्या पण. इथेच परोमिता गोस्वामी यांचे एक्स्पर्ट गायडन्स उपयोगी पडले त्या शेतकऱ्यांच्या, की ज्या मुळे कंपनीला झुकावे लागले, आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.

परोमिता ने काय केलं असेल?   ’फॉरेस्ट  एंटायटलमेंट ऍक्ट’ म्हणून एक कायदा अस्तित्वात आहे, की ज्या कडे कोणाचेच लक्ष नव्हते, या कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या शेतकऱ्यांची बाजू मांडली आणि शेवटी बाजार भावा प्रमाणे या शेतकऱ्यांना ४ लाख रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि घरातल्या एका व्यक्तीला कंपनी मध्ये नोकरी असे निगोशिएट करून  न्याय मिळवून दिला. उभ्या असलेल्या पिकाची जो पर्यंत कापणी होत नाही तो पर्यंत काम सुरु केले जाणार नाही असेही कंपनीने मान्य केले.  अर्थात एखादी व्यक्ती जर कायदा जाणणारी  असेल , तर तिला कायद्याच्या तरतुदींचा व्यवस्थित वापर करून घेता येतो.

माणिकगढ जिंकल्यावर…

काही लोकं कसे  कुठलेही पोलीटीकल बॅकिंग नसतांना सामाजिक कार्य करू शकतात, आणि त्या मधे यशस्वी पण होऊ शकतात  ह्याचं उदाहरण आहेत म्हणजे   परोमिता गोस्वामी. जेंव्हा एखादा सुशिक्षित माणुस मनावर एखादी गोष्ट घेतो, तेंव्हा तो कायद्याच्या चौकटी मधे राहुन सुद्धा एखादे काम कसे करवून घेऊ शकतो याचे हे उदाहरण- ’डोंबीवली फास्ट’ हे   प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही!

नुकताच यशवंतराव चव्हाण विद्यापीठातर्फे परोमिताचा सत्कार करण्यात आला, आणि त्यांना रुक्मिणी पुरस्कार देण्यात आला होता.  हा लेख म्हणजे परोमिता गोस्वामींच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या पॉझिटीव्ह थिंकीग  मुळे  आपले जर कधी विचार भरकटले असतील तर ते  विचार जागेवर यायला मदत होईल. आणि या जगात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे , आणि जर ध्येय योग्य असेल आणि स्वतःच्या ध्येयावर विश्वास असेल तर त्याची पूर्ती होणे काही अवघड नाही यावर विश्वास बसेल.

श्रमिक एल्गारचा ब्लॉग ^(http://rangmarathiche.com/goto/http://elgarupdates.blogspot.com/) इथे आहे..