११०१००० आभार..

Written by  on October 29, 2005

११०००००, 1100000, eleven lakhs, visitors, eleven lakh visitors, blog, marathi, mahendra kulkarniकाल ब्लॉग चा हिट्स चा आकडा अकरा लाखावर जाऊन पोहोचला. पोस्टची सुरुवात सगळ्या वाचकांचे आभार मानून करायची, की पोस्ट पूर्ण केल्यावर आभार मानायचे हेच ठरत नव्हते. शेवटी काय वाटेल ते पद्धतीने  जसे जसे मनात विचार येतील तसे तसे लिहायचे हे नक्की केले. वाचकांच्या हिट्स ची संख्या पाहिल्यावर निश्चितच आनंद झाला.

अगदी सुरुवातीलाच सांगतो, की कुठलाही ब्लॉग सुरु रहाण्यासाठी, किंवा त्या ब्लॉगरचा उत्साह टिकून रहाण्यासाठी वाचकांची  खूप गरज आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया तर ब्लॉगर्स साठी एक प्रकारचे टॉनिक असते.  मला एक मित्र परवा विचारत होता, की मी ब्लॉग वर लिहीणे कधी बंद करणार? माझे उत्तर होते, की लोकांच्या प्रतिक्रिया  येणे बंद झाले की – माझा ब्लॉग बंद होणार !  🙂  इतकी वर्ष उत्साह टिकून रहायला या वाचकांच्या प्रतिक्रिया कारणीभूत आहेत.

चार वर्षापूर्वी १७ जानेवारी २००९ तारखेला पहिले पोस्ट लिहितांना  खरंच आपण इतके वर्ष लिहीणे सुरु ठेऊ असे कधीच वाटले नव्हते.  मी स्वतः आरंभशूर !   कुठल्याही गोष्टीचा फार लवकर कंटाळा येतो मला. मग ते ~फेसबुक असो ,किंवा इतर कुठलीही सोशल साईट असो. माझ्या सारख्या  लिखाणाशी कुठलाही संबंध नसलेल्या, मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या जीवनातल्या घटना, सामाजिक जीवनावरचे त्याचे भाष्य , कोणाला वाचायला आवडतील असे पण कधीच वाटले नव्हते. पण एकदा ब्लॉग वर लिहीणे सुरू केले, आणि लोकांच्या  प्रतिक्रिया  पण यायला लागल्या,  आणि मग  कॉन्फिडन्स वाढला, एक लक्षात आलं, की आपणही लिहू शकतो..म्हणजे अगदीच  काही अगदीच वाईट लिहत नाही  आपण! 🙂

जेंव्हा ब्लॉग सुरु केला, तेंव्हा दोन गोष्टी  ठरवल्या होत्या, त्या म्हणजे जे काही लिहायचे ते स्वतःशी प्रामाणिक राहून,  आपण जसे आहोत तसेच ब्लॉग वर लिहायचे, उगीच भोंदूपणा करायचा नाही. नसलेले गुण स्वतःला चिकटवून घ्यायचे नाहीत. मी जेंव्हा ब्लॉग लिहीणे सुरु केले होते, तेंव्हा प्रस्थापित असलेले मराठी  ब्लॉगर साहित्यिक स्वरुपात काही तरी उच्च दर्जाचे लिखाण करण्याचा वाटेने प्रयत्न करतांना दिसायचे, आणि त्या मुळे लिखाणात ही बरेचदा कृत्रिम पणा जाणवायची  वाचतांना!  ती पुस्तकातल्या सारखी छापील खिळे असलेली भाषा , वाचतांना मला खूप  अवघडल्यासारखे वाटायचे, तेंव्हा वाटले, की इतर  लोकांना पण असंच वाटत असेल का?  आणि मी स्वतः अगदी सहज सोप्या भाषेत लिहीण्याचे ठरवले. थोडी सोपी भाषा वापरली, तर? आणि काय वाटेल ते चा जन्म झाला. आपण  मनापासून लिहिले, की ते दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहचते – हा माझा अनुभव आहे- त्या साठी फार कठीण  भाषा हवी असे नाही, तर  मला असे वाटते की बरेचदा कठीण भाषा दुरावा पण निर्माण करते- वाचक आणि लेखकामध्ये. लेखक जर  वाचकांशी   कनेक्ट होऊ शकत नसेल तर त्या लिखाणाला काही फारसा अर्थ उरत नाही .

दुसरी गोष्ट  जी मला एक वर्षानंतर लक्षात आली,  ती म्हणजे  कधीही आपले पोस्ट प्रेडिक्टेबल किंवा टाइपकास्ट होऊ द्यायचे नाही. एक पोस्ट झाले, की दुसरे  पोस्ट त्याच प्रकारचे न लिहिता, एकदम वेगळ्याच विषयावरचे लिहायचे . एकाच विषयाला वाहिलेले ब्लॉग काही दिवसानंतर कंटाळवाणे होतात असा माझा अनुभव आहे. एक खूप छान विनोदी ब्लॉग  होता, पण केवळ तीच ती पात्रं, आणि एकाच पठडीतले विनोद घेऊन लिहित राहिल्याने हल्ली फार  कंटाळवाणा झालाय. अहो जेवणात नुसती भाजी पोळी  किंवा आमटी भात असून चालत नाही, सोबत चटणी, कोशिंबीर, लोणचं, आणि पापड वगैरे पण हवाच, आणि शेवटी स्विट डीश असेल तर  अजूनच उत्तम! ब्लॉगिंगचं पण तसेच आहे-वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी   विषयांचे व्हेरिएशन्स आवश्यक आहे.

ह्या ब्लॉगिंग ने बरेच कुठलाही स्वार्थ नसलेल्या नवीन मित्र मैत्रिणी दिल्या आहेत. भारतात आल्यावर आवर्जून फोन करणारे आणि प्रत्यक्षात भेटणारे बरेच परदेशी रहाणारे ब्लॉगर्स आहेत, इथे भारतातच असणारे काही मराठी ब्लॉगर्स तर नेहेमीच भेटत असतात . ब्लॉगर्स मिट च्या निमित्याने बऱ्याच  ( १२० लोकं आले होते पहिल्या ब्लॉगर्स मिटला) ब्लॉगर्सशी प्रत्यक्ष भेट पण झालेली आहे.  काही कटू प्रसंगही ओढवले या चार वर्षात  (कुठले ते लिहत नाही ), पण ते केवळ बोटावर मोजण्य़ा इतकेच!

मला आता  चार वर्षानंतर ब्लॉगिंग कडून काय हवंय़? काहीच नको.. मला फक्त माझं मन मोकळं करायचं आहे. मला या ब्लॉगिंग कडून काही फारशा अपेक्षा नाहीत, जाहिराती , उत्पन्न, वगैरे काही नकोय या मधून. मला फक्त मन मोकळं करण्यासाठी एक स्थान हवंय, आपलं हक्काचं!

आजपर्यंत ६४० पोस्ट्स लिहून झाल्या आहेत. अर्थात केवळ ६४० पोस्ट्स  मधे माझे आयुष्य समावले आहे असे नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्या काही वर्षानंतर लिहीन म्हणतोय. नोकरी संपल्यावर कार्पोरेट वर्ल्ड वर एखादे पुस्तक लिहायची इच्छा आहे. गेल्या ३० एक वर्षात कार्पोरेट वर्ल्ड चे बदलते रंग मी अनुभवले आहेत.स्वार्थ, बॅकस्टॅबिंग, मैत्री, करप्शन, आणि या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचे बदलते स्वभाव, बदलती समीकरणे , आणि त्यावर अवलंबून असलेली  कार्पोरेट कल्चरची पोकळ मैत्री – अशा असंख्य गोष्टींवर लिहायचे आहे. पण ते सगळे नोकरी संपल्यावर. मी जे काही अनुभवले आहे ते अगदी जसेच्या तसे जरी लिहिले तरी एक ६०० पानांची कादंबरी सहज होऊ शकेल. पण ते  काम सगळं   रिटायरमेंट नंतर.

सरते शेवटी पुन्हा एकदा सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार मानून हे पोस्ट संपवतो.

अनुभव म्हणजे ??

Written by  on October 18, 2005

’अनुभव हीच खात्री’ असं लिहिलं असतं बरेचदा .. जाहिराती मधे.. पण जर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा म्हंटलं तर मार्कंडेय ऋषींचं आयुष्य पण पुरणार नाही अशी एक म्हण आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेउन मग ठरवतो म्हंटलं तर ते कदापी शक्य नाही..काही ऐकीव कथांवर विश्वास ठेवावाच लागतो. पण   कोणाच्या अनुभवावर विश्वास ठेवावा??? हा एक मुलभूत प्रश्न आहे.

बरेचसे लोकं आपल्या अनुभवा बद्दल सारखं काहीतरी सांगून वैताग आणत असतात. केवळ एकच काम  आपण आयुष्यभर केलं म्हणून आपण  त्यात   एक्स्पर्ट झालो,  असं बऱ्याच लोकांना वाटतं, आणि मग ते अकलेचे तारे तोडणे सुरु करतात.

अहो गाढव पण आयुष्यभर ओझं वहात, म्हणून काय ते ट्रान्स्पोर्टर बनतं का?? नाही ना??   ते गाढव आयुष्यभर गाढवच रहातं – ओझं वहाणार….  तसंच आहे हे.. ट्रान्स्पोर्टर बनायचं तर सरदारंच व्हावं लागतं, … आता यातला विनोदाचा भाग जरी सोडून दिला तरी पण हे अगदी शतशः खरं आहे, म्हणून केवळ अनुभवावर विश्वास ठेवतांना पण आपण काळजी पूर्वक असलं पाहिजे- की कोणाचा अनुभव आपण ऐकतो आहे, आणि त्यावर विश्वास ठेवतोय ते..

नेव्ही मधे एकदा काम करित असतांना एक केस पांढरे झालेला, वय अंदाजे माझेच असावे , केस मेंदीने रंगवलेले, असा एक टेक्निशिअन सारखा कामात अडथळा आणत होता.आमचा सर्व्हिस इंजिनिअर  कुठलिही गोष्ट करायला गेला की याच्या कॉमेंट्स सुरु .. ये नै चलेंगा….मैने धुपमे बाल सफेद नहीं किये.. हे पालुपद सुरु व्हायचं…. ! बरं त्याला कोणी काही विचारलं म्हणून तो सांगतोय असं पण नाही.. त्याला कोणीही काहिही विचारलं नव्हतं तरीपण हा माणुस मात्र सारखा त्रास देत होता. तेंव्हा मी पण समोरच होतो उभा, त्याला म्हंटलं, की ठिक आहे, तुच इथे काम कर,  माझी माणसं मी इथून विथड्रॉ करतोय.. बस.. एवढंच म्हणायची देर, की   तो समोरून निघून गेला..!  ह्या लोकांना काम करता येत नाही, पण त्रास मात्र देता येतो..

मी कस्टमर सर्व्हिस फिल्ड मधे असल्यामुळे असे अनुभव नेहेमीच येत असतात. बरेचदा मारवाडी कंपनीत  ( स्मॉल स्केल- किंवा मिडियम स्केल) एक कोणीतरी ’कल्लु मिस्त्री’ असतो, जो सगळ्या फॅक्टरीचं मेंटेनन्स पहात असतो. सेठ्जी पण त्यावर पुर्ण अवलंबून असतात. आता मारवाडी कंपनीचा ऑर्गनायझेशन चार्ट असा असतो..मालक, त्याच्या खाली एक मुनिम, एक कल्लु मिस्त्री, एक फॅक्टरी इंचार्ज. या कंपन्यांमधे कामं करणाऱ्यांचा एक वेगळा क्लास असतो. हे सगळे बहुतेक वर्षानं वर्ष कामं करुन या लेव्हलला पोहोचलेले असतात. मालकाचा पुर्ण विश्वास असतो यांच्यावर, आणि त्याच्या जोरावर या लोकांचं एकछत्री राज्य असतं , आणि त्याच्या जोरावर हे लोकं एखाद्या क्वालिफाईड इंजिनिअरला पण त्रस्त करुन सोडतात..

असेच अनुभव आयटी मधल्या लोकांना पण येत असतात, केवळ बॉस आहे म्हणून चुकीच्या  गोष्टींना पण मान्य करावं लागतं. बॉस च्या म्हणण्याप्रमाणे  बरेचसे काम करावं लागतं.तुम्हाला माहिती असतं की हे काम बॉस ने सांगितलेल्या पद्धतीने  केल्यावर चुका होणार ,पण ते तसंच करावं लागतं- केवळ  बॉस म्हणाला म्हणून, त्याला अनुभव जास्त आहे म्हणून..

पण या गोष्टीवर  काहीच उपाय नाही. बरेचदा समोर काहीतरी वेड्यासारखं बरळतो, आणि आपण मात्र ते केवळ समोरचा माणुस सिनिअर आहे, किंवा बॉस आहे म्हणुन भक्ती भावाने ऐकावं लागतं..  आणि तसं (त्याने सांगितल्या प्रमाणे  चुकीचं)   काम करावं लागतं. केवळ सिनिअरिटिच्या जोरावर बरेच लोकं विनाकारण ……….असो….

केवळ अनुभव तुम्हाला काहीच शिकवु  शकत नाही. रिकामा अनुभव काय कामाचा?

तुम्ही अनुभव घेतला, पण   जर तुम्ही   तो अनुभव तुमच्या जीवनाशी जर तुम्ही कोरिलेट करु शकत नसाल, आणि – जो पर्यंत तुमच्या कडे  अनुभवातून शिकण्यासाठी   शिक्षणाचं बेसिक  फ्रेमवर्क नाही , तो पर्यंत  तुम्ही जो  ३० वर्षाचा अनुभव घेतलाय असं म्हणता .. तो म्हणजे ’एक वर्षाचा अनुभव’  ३० वेळा घेतला..  एवढीच त्याची किम्मत.

थोडक्यात तुम्ही एक वर्षाचा अनुभव तिस वेळा घेतलाय असा पण  अर्थ काढता येइल. अनुभव  या शब्दाची खूप मोठी व्याप्ती आहे, केवळ एकच काम, एकाच पद्धतीने  सारखं करित रिपीट करित रहाणं, आणि नंतर तेच योग्य आहे या शिवाय दुसरं काही होऊच शकत नाही.. असे समजणे… म्हणजे अनुभव मिळवणं नाही..
जास्त लिहित नाही..  थांबतो इथेच..

भगुरिया

Written by  on October 15, 2005
coursey http://shivselvan.blogspot.com/

coursey http://shivselvan.blogspot.com/ ^(http://rangmarathiche.com/goto/http://shivselvan.blogspot.com/)

तरुण मुली आणि तरुण मुलं.. एकत्र जमा व्हायचं, ठरावीक दिवशी आणि मग मुलाने मुलीला पळवून न्यायचं…..

मुलीचे आई  वडील  वगैरे असतांना..

हे मी काय लिहितोय?? वा

चा पुढे म्हणजे कळेल.

मुलगी पळवून न्यायचा  कन्सेप्ट आहे एका जमाती मधे.

Bhagoria-004

Courtsey http://shivselvan.blogspot.com/ ^(http://rangmarathiche.com/goto/http://shivselvan.blogspot.com/)

इंदौरला पोहोचलो सकाळच्या ६-३० च्या जेट लाईटनी. ऍज युजवल , लेट झाल्यामुळे ८-३० वाजता पोहोचलो इंदौरला. बाहेर आमचा टॅक्सी वाला उभा होताच. त्याने हातातली बॅग घेतली आणि हसून पुढे झाला. आधी पासूनच सांगून टाकलं होतं, की कुठे जायचं आहे ते..पॆटलावद नावाचं एक गांव आहे , इंदौरपासुन साधारणतः १८० किमी असावं.तिथेच एका साईटवर काम होतं.

बदनावर, धार क्रॉस केलं आणि एकदम झबुवा च्या रोडला आम्ही लागलो.एम पी चे रस्ते आता भाजपा सरकार आल्या पासुन बरेच चांगले झाले आहेत. जसं आम्ही धार क्रॉस केलं रस्त्यावर पिवळ्या रंगाचे फेटे घातलेले बरेच लोकलं लोकं दिसू लागले. हे वेगळ्याच पध्दतिने बांधलेले फेटे सारखं लक्ष वेधून घेत होते. कांही लोकांनी बांधणी प्रिंटचे राजस्थानी स्टाइलचे फेटे लाल , हिरवे पण बांधलेले दिसत होते. बोडखा माणुस विरळाच.

स्त्रिया पण वेगळ्याच आदिवासी स्टाइलने साडी नेसलेल्या चांदिचे दागिने घातलेल्या. ड्रायव्हरला विचारले हे कुठले लोकं आहेत?? तर म्हणाला हे ’मामा’ लोकं आहेत. हे सगळे मामा म्हणजे भिल्ल जमातिचे लोकं असतात.या लोकांचे आपले स्वतःची पंचायत असते,स्वतःचे नियम कायदे असतात.  लग्नाची  तसेच डिव्होर्स ची पण पध्दत असते.   अनेक वर्षापासुन चालत आलेल्या  प्रथा अजूनही पाळली जातात.कोणीही कम्प्लेंट करित नाही.

झबुवा, अलिराजपुर कुक्षी या भागात हे लोकं रहातात. राजस्थान ची बॉर्डर जवळ असल्यामुळे त्यांच्या वेशभुषेचा प्रभाव आहे यांच्यावर.

http://shivselvan.blogspot.com/

courtsey http://shivselvan.blogspot.com/ ^(http://rangmarathiche.com/goto/http://shivselvan.blogspot.com/)

कार चालत होती आणि शेजारुन बरेचसे लहान लहान खेडे जात होते. जवळपास सारखच दृष्य होतं. प्रत्येक गावाच्या वेशीजवळ रंगबेरंगी झेंडे

लावून ठेवलेले होते. मला वाटतं की गावाची चतुःसिमा सुरु झाल्याची ही खुण असावी. एका गावाजवळ पोहोचल्यावर मात्र समोर दोन रस्ते आले. कुठल्या रस्त्याने जायचं ते कन्फ्युजन होतं म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलॊ . तिथे एक दुकान होतं चहाचं, तिथे विचारलं.

ज्या मामाला विचारलं त्याचा उग्र दर्प येत होता. देशी दारु आणि वेगळाच वास होता कसला तरी. समोरच हॉटेल मधे   जलेबी तळणं सुरु होतं. आम्ही परत गाडीत बसलो, मी ड्रायव्हरला विचारलं की हा वास कसला येत होता त्या मामाचा”? तर ड्राय्व्हर म्हणाला, हे मामा लोकं देशी दारु पितात बाजाराच्या दिवशी आणि गुळाची जिलबी खातात. मला जो घाण वास येत होता तो या दोन्ही वासांचे मिश्रण. जो पर्यंत हे लोकं ’हाट’ मधे कच्ची दारु पिऊन गुळाची जिलबी खात नाही तो पर्यंत ह्यांचा बाजार पुर्ण होत नाही.

गावामधे लहान सहान दुकानं तर होती पण  अजुन ही हे लोकं धनुष्य बाण वापरताना अंगठा वापरत नाहीत. स्वतः भिल्ल असल्याचा यांना खूप अभिमान असतो. मला खरं तर आश्चर्यच वाटलं, की आजच्या युगातही असे लोकं आहेत म्हणून.

हे भिल्ल लोकं कुक्षी, अलिराजपुर झबुवा या भागात रहातात.या भागात रात्री प्रवास करणे धोक्याचे आहे असं म्हणतात.  जर तुमची कार बंद पडली तर तुम्हाला हमखास लुटले जाईल, म्हणून शक्यतोवर जास्त रात्री प्रवास करु नये या भागात. हे सगळे भिल्ल लोकं शेतिवाडीची कामं करतात, किंवा इतर वेळेस मात्र इंदौर ,धार वगैरे शहरात जाउन पडेल ती कामं करतात.

Courtsey http://shivselvan.blogspot.com

Courtsey http://shivselvan.blogspot.com ^(http://rangmarathiche.com/goto/http://shivselvan.blogspot.com/)

या लोकांची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे लग्नाची. त्याला म्हणतात भगुरिया .. भगुरिया करता तरुण आणि तरुणी वर्षभर वाट पहात असतात..वर्षात ठरावीक दिवशी होळीच्या जवळपासचा दिवस असतो हा.

एका गावात यांचा मेळा भरतो. तरुण मुलं आणि मुली , त्यांचे पालक इथे येतात. लग्नाळु मुलं , मुली एक मेकांना भेटतात. जर एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर मग तो मुलगा त्या मुलीला पान ऑफर करतो.   त्या मुलींने पान खाल्लं तर त्याचा अर्थ त्या मुलीची लग्नाला संमती आहे.

मग तो मुलगा आणि मुलगी दोघही पळून जातात. एकदा पळुन गेल्यावर ,सगळे नाते वाईक त्या मुलीला आणि मुलाला शोधतात, जर ते सापडले तर त्या मुलाला खुप चोप दिला जातो , आणि जर सापडले नाहीत तर मग कांही दिवसांनी त्या दोघांचे लग्न लावून दिलं जातं.हे सगळं ऐकल्यावर माझा विश्वासच बसला नाही. पण नंतर म्हंटलं की ….चलो.. ऐसा भी होता है.. !!

मी पुर्वी नागपुरला असतांना  छत्तीसगढ मधे पण बरंच फिरलो आहे. चिरिमिरी, अंबिकापुर वगैरे.. त्या बद्दल आणी तिकडल्या आदिवासी लोकांच्या बद्दल नंतर पुढे कधी तरी…  🙂

इन्सिडन्टली मी या वेळेस काढलेले फोटो डिलिट झाले म्हणुन नेट वर शोधुन एका ब्लॉग वरचे फोटो इथे पोस्ट करतोय.. तुम्हाला अजुन काही फोटॊ बघायचे असतील तर त्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या. ^(http://rangmarathiche.com/goto/http://shivselvan.blogspot.com/2009/02/jhabua-land-of-tribes.html)

हुश्शार पुणेकर.. त्यांच अनुकरण करा मुंबईकरांनो..

Written by  on October 9, 2005

हे असे दृष्य नेहेमीच दिसते. गणेश विसर्जन झाले की दुसऱ्या दिवशी आक्सा बिच वर जाऊन पहा… ( फोटो नेट वरून )

गणपती मुंबईचा आणि पुण्याचा. दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण गणपती आला, आणि मला उगिच उदास वाटायला लागले.गणपती  उत्सव आपण गणपती आणून सिलेब्रेट करतो की गणपतीचे विडंबन करतो  हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. नाही लक्षात येत? लोकमान्यांनी सार्वजनिक गणपतीचा उत्सव सुरु केला तो गिरगावातल्या ’केशवजी नाईक चाळीत” ! शंभराच्या वर वर्ष  परंपरा असलेला हा उत्सव आहे,   जरी उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले, तरीही त्याचे  महत्त्व   मात्र कमी झाले नाही. काही लोकांना पैशाचं महत्त्व , तर काही लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे, तर काही लोकांना उत्सवाचे- धमाल करता येईल याचे.

सार्वजनिक गणपती हा कशाचाही असू शकतो, कधी तुम्हाला तो एखाद्या मोटरसायकल बसलेला, कोकाकोलाच्या बाटल्यांचा, लाडूचा, सर्फ च्या पाकिटाचे  किंवा “मै भी अण्णा” ची टोपी घातलेला ! आपल्या गणपतीचं एक बरे आहे, कोणी कसलाही गणपती करा, कोणाच्याच भावना दुखावल्या जात नाहीत. कारण हा बाप्पा सर्वसमावेशक आहे.

वाईट वाटतं ना?? मला पण खूप वाईट वाटतं असं काही दिसलं की.. ( फोटो नेट वरून )

कोणे एके काळी घरटी एक रुपया, दोन रुपये किंवा यथाशक्ती वर्गणी गोळा करून त्या पैकी काही पैशांची एक लहानशी मूर्ती बसवली जायची. उरलेल्या पैशात देवाचा प्रसाद, आरती, वगैरे खर्च केले जायचे. उरलेले सगळे पैसे शेवटच्या दिवशी खर्च केले जायचे. पण हल्ली तसं नाही. गणपतीची वर्गणी मागायला मुलं आली, की वर्गणी मागताना जणू काही खंडणी मागतो आहोत असा आविर्भाव असतो. पावती आधी फाडली जाते, आणि हातात दिल्यावर त्यावर लिहीलेली रक्कम  निमुटपणे द्यावी लागते. ह्या गुंडा गर्दीला काही उपाय नाही. जर तुम्ही पैसे देण्यास नकार दिला, तर एखादा वर्गणी मागणारा, ” तुमची खाली ती सिल्व्हर कलरची कार आहे ना- तिच्यावर काळा स्प्रे मस्त दिसेल” असे म्हणाला, की तुम्ही निमुटपणे  पैसे काढून देता. तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीयांची हजार दोन हजारावर सुटका होते, पण आमचा चौकातला दुकानदार म्हणाला, की  पन्नास हजार ते पाच लाख कितीही वर्गणी मागितली जाते, आणि एकदा मागितली की दिल्याशिवाय पर्याय नाही.    त्या परिसरातली १०० दुकानं जरी म्हटली ,तरी किती बरं रुपये जमा झाले असतील- तुम्हीच हिशोब करा.?

या सार्वजनिक उत्सवाचे दोन अंग आहेत, एक म्हणजे सामाजिक, आणि दुसरे म्हणजे धार्मिक. मी इथे धार्मिक अंगाबद्दल अजिबात काही लिहीणार नाही . दर वर्षी लालबागच्या राजाच्या दरबारात लाखो करोडॊ रुपयाचे सोन्याचे दागिने आणि इतर भेट वस्तू जमा होत असतात. त्याची मोजदाद करतांना आपण सोन्याने मढलेले मंडळाचे कार्यकर्ते पहातच असतो  🙂 ह्या गणपतीला नवसाला पावणारा म्हणून जास्त पैसे, दागिने दान केले जातात.

गणपती मुळात बसवला गेला तो सामाजिक एकात्मते साठी , पण लवकरच त्या मधे धार्मिक आणि आर्थिक इंटरेस्ट चे  प्रमाण इतके वाढले की त्या मधे लोकल गुंड लोकांचा सहभाग सुरु झाला, आणि हा उत्सव कसा हायजॅक केला गेला ते लोकांच्या लक्षातही आले नाही. खंडणीच्या स्वरूपात खूप पैसा जमा होतो, हे लक्षात आल्यावर काही मोठे प्रसिद्ध गुंड जसे छोटा राजन सारखे परळच्या गणपती बरोबर जोडले गेले. असे म्हणतात की आजचा प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा हा एकेकाळी छोटा राजनचा गणपती होता. छोटा राजन घाक दपटशा दाखवून ह्या गणपतीच्या प्रतिष्ठापनासाठी  त्या भागात पैसे गोळा करायचा. पण हा गणपती आज धार्मिकतेच्या अंगाने विचार केला तर खूप महत्वाचा आहे.

गणपती म्हणजे सगळ्यांचच लाडकं दैवत. पूर्वीच्या काळी ह्या उत्सवाच्या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, कॉलनी मधल्या मुलांचे नाच, गाणी ,खेळ,स्पर्धा, तरूण आणि प्रौढांसाठी मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं अरेंज केली जायची. स्त्रियांसाठी एखादी  पाककला स्पर्धा, किंवा भजनी स्पर्धा पण असायच्या.  या मुळे मुलं, तरूण आणि मध्यमवयीन लोकं सगळे जण गणपतीची वाट पहात असायचे. तेंव्हा थॊडे  कमी पैसे जरी गोळा झाले तरी हे सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित मॅनेज केले जायचे.(पण “गेले ते दिवस, पूर्वी असं नव्हतं” आणि असं म्हंटलं की आपण म्हातारे झालो की काय.. असे वाटायला लागते. )

लोकलच्या स्टेशन शेजारी एक गणपती बसतो. त्याचं स्टेज बांधणं सुरु होतं, मी सहजतिथे दोघांचं बोलणं ऐकलं, एक म्हणत होता, स्टेज खाली कमीत कमी पाच फुट उंच तरी जागा हवी म्हणजे पत्ते खेळायला व्यवस्थित पणे बसता येइल. वर गणपती, आणि स्टेजच्या खाली ( गणपतीच्या खाली ) पत्ते! कदाचित रात्री दारू वगैरे चा पण प्रोग्राम होत असावा – कोणास ठाऊक! गणपतीचे दहा दिवस तर मस्त पैकी उत्साहात जातात, पण शेवटच्या दिवशी जो धुमाकूळ असतो त्याबद्दल काही न बोलणे बरे.

बहुसंख्य मोठे गणपती हे समुद्रावर विसर्जन केले जातात. हे गणपती असतात प्लास्टर ऑफ पॅरिसचे, की जे पाण्यात सहजा सहजी  विरघळत नाही. विसर्जनाच्या वेळी जर भरती असेल, तर फारसं आत न नेता, हे गणपती किनाऱ्याच्या जवळच विसर्जन केले जातात. दुसऱ्या दिवशी मग जेंव्हा ओहोटी सुरु होते, तेंव्हा हेच तुटके गणपती उघडे पडतात. आमच्या आक्सा बिच वर तर हात तुटलेले, सोंड तुटलेले, आडवे पडलेले असे शेकडॊ  गणपती समुद्राच्या पात्रात पडलेले दिसतात. कार्पोरेशन चक्क डोझर आणून मग कधी तरी सगळी सफाई करते. या मोठ्या गणपतींची ही दैना खरंच पहावत नाही. गणपती हा मातीचाच असला पाहिजे याबद्दल जर नियम बनवला तरी बराच फायदा होईल- पण हे करणार कोण??. गणपतीला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे रंग हे लेड  ( शिसं )युक्त असतात, आणि इतके किलॊ लेड ( शिसं) समुद्राच्या पाण्यात मिसळल्यावर पर्यावरणाचे काय होत असेल याची कल्पना करा.

पर्यावरणा बद्दल कोणाला काही घेणं नसतं.  पहिली गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या ( १८ फुट उंच) वगैरे मूर्तीची गरजच नाही- फार तर ४ फुटाचा गणपती पुरेसा असतो. आणि जरी समजा तुम्ही १८ फुटी मुर्ती तयार करवली,तरी  ठीक आहे, पण  तिच्या बाबतीत  पुण्याची पद्धत वापरायला काही हरकत नाही. पुण्याचा गणेशोत्सव अजूनही वाखाणण्यासारखा आहे. प्रत्येक गोष्ट शिस्तीत सुरु असते. मिरवणूक असो की विसर्जन. पुण्याला मोठ्या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही.  दगडू शेठ हलवायाची, सारसबाग, शनिवारवाडा, वगैरे अनेक मोठमोठ्या गणेश मूर्ती कित्येक वर्ष जुन्या आहेत. दरवर्षी त्याच मूर्तीला पेंट करून पुन्हा बसवले जाते, आणि पूजा झाल्यानंतर लहान मूर्तीचे विसर्जन केले जाते. पुणेकरांचे अनुकरण जर मुंबईकर करतील, तर त्यांच्या आवडत्या गणेशाच्या विडंबन झालेले त्यांना पहावे लागणार नाही.

नुकताच मी अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा तिथे पण भाजपा सरकारने साबरमती वर गणपती विसर्जनास मनाई केलेली आहे असे समजले. कांकरीया तलाव , जो एकेकाळी अहमदाबादचे गटार म्हणून ओळखला जायचा , त्याच तलावात गणॆश विसर्जन केले जायचे. आज त्याच तलावाचे केलेले सौंदर्यीकरण पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. जर हे गुजराथ मधे नरेंद्र मोदीला शक्य आहे, तर महाराष्ट्रात का बरं नाही?  गेले कित्येक वर्ष मनात असलेला सल आज इथे लिहून काढलाय ..

शेवटी पुन्हा एकदा म्हणतो, पुणेकरांचे  अनुकरण मुंबईकरांनी या उत्सवाच्या बाबत करायला काही हरकत नाही, म्हणजे या आवडत्या देवाची विटंबना टळेल.. कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही, पण जर दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व!