.. याच ठिकाणा पासून मिलिटन्सी सुरु झाली होती. बारामुल्ला.. दोन्ही बाजुला अर्धवट जळलेली काश्मिरी पंडितांची घरं दिसत होती. टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता, सर इसी जगहसे टेररिझम शुरु हुवा था. साथ साथ रहने वाले हजारो काश्मिरी पंडीतोंकॊ उनके पडोसियोने मार डाला, या फिर भगा दिया. घरोंपर जबरदस्ती कब्जा कर लिया. जिन्होने घर छॊडनेसे इन्कार किया उनके घरोंके साथ उन लोगोंको भी जला दिया था.जो लोग साथ मे इद और दिवाली मनाते थे एक दुसरेके खुनके प्यासे हो गये थे.हे सगळं तर आधी पण बरेचदा ऐकलं होतं , आणि वाचलं पण होतं, पण जेंव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेंव्हा मात्र मन विष्ण झालं.
इथल्या काश्मिरी पंडितांच्या तरुण मुलींना आणि सुनांना पळवून नेवून त्यांच्यावर अत्याचार केले त्या टेररिस्ट लोकांनी. रस्त्याच्या शेजारच्या घरांच्या कडे पाहिलं की त्या घरांवरील हिंदु ठसा लक्षात येत होता. एक घरावरचा ॐ खोडून त्यन जागी लिहिलेलं ७८६ नजरेत भरत होतं.घराचे केशरी रंग, जरी त्यावर हिरवे रंग पोतले असले तरीही अधूनमधून डोकं बाहेर काढत होते, आणि ते पाहून अजूनच कसं तरी होत होतं.. सहज बरोबर असलेल्या बायको कडे आणि दोन मुलींच्या कडे लक्ष गेलं. काहीच न बोलता शांत पणे कारच्या खिडकी च्या बाहेर पहाणं सुरु केलं. काश्मीरचे सौंदर्य, जे गेले आठ दिवस मनाला मोहवत होतं तेच आता नजरेला बोचायला लागलं.
समोर पोंचू घातलेल्या बायका आणि पठाणी ड्रेस घातलेले ते पुरुष, सगळेच मला टेररिस्ट वाटतं होते. त्यांच्याकडे पाहिलं की वाटायचं की आत्ता हा त्य अ पोंचु च्या आड लपवलेली बंदुक काढेल आणि गोळीबार सुरु करेल. किंवा एखादा ग्रेनेड काढून आमच्या क्वॉलिस वर फेकेल. दोनच दिवसापूर्वी आम्ही जेंव्हा श्री नगरला होतो तेंव्हा श्रीनगरला शालिमार गार्डन जवळ ब्लास्ट करण्यात आला होता.
जम्मुला एअरपोर्टला उतरल्यापासुनच आम्ही क्वालिस भाड्याने घेतली होती. पुर्ण टुर होत १५ दिवसांचा. सोबत आपलं वाहन असलं की बरं असतं. सगळा टुर मी स्वतःचा प्लान केला होता. मुंबईला काश्मीर टुरिझम चं ऑफिस आहे ड्ब्लु टी सी ला त्यांच्याकडेच सगळं बुकिंग केलं होतं. फक्त टॅक्सी एका जम्मुच्या मित्राकडून बुक केली होती. म्हटल ओळखीचा ड्रायव्हर असावा, आणि तो मुस्लिम नसावा.. बस्स! इतकीच माफक अपेक्षा होती. थोडं हसू आलं.. अरे हा काय विचार करतोय मी? ड्रायव्हर जो जम्मूचा हिंदु होता तो म्हणाला ,साहब, हे टेररिस्ट लोकं टुरिस्ट लोकांना अजिबात त्रास देत नाही . कारण इथली सगळी एकॉनॉमी टुरिझम वरंच अवलंबून आहे.जर टुरिस्ट आले तरच इथल्या लोकांना पैसा मिळणार , नाहितर नुसते आक्रोड आणि बदाम खाऊन पोटं भरावी लागतील.
आम्ही जेंव्हा जम्मु ते श्रीनगर प्रवास केला, तेंव्हा आमची कार एका मिल्ट्री कारव्यासोबतच होती अगदी श्रीनगर पर्यंत. अगदी प्रत्येक शंभर फुटावर एक मिल्ट्रीचा जवान होता हातात स्टेनगन घेउन- अगदी ’तयार ’पोझिशन मधे..!त्यामुळे अगदी सेफ वाटत होतं. इथल्या मिल्ट्री जवानांच्या जीवाला खूप धोका आहे. कोण कधी कुठुन हल्ला करेल ते सांगता येत नाही. मिल्ट्री च्या ट्रक्स वर तर नेहेमीच हल्ले होतात, पण टुरिस्ट लोकांना मात्र कधीच काही केलं जात नाही. हे ऐकुन पुन्हा जरा बरं वाटलं … आणि नंतर स्वतःच्या कमकुवत मनाची लाज वाटली- सैनिकांवरच हल्ला करतात हे ऐकुन मला सेफ वाटलं?? कसं मन असतं नाही माणसाचं. स्वतःची सेफ्टी आधी महत्वाची वाटते.. इव्हन ऍट द कॉस्ट ऑफ अदर्स लाइव्ह्ज….. !!
गेले आठ दिवस बायको मुलांच्या बरोबर होतो, त्यामुळे बरेचसे विषय चघळुन झाले होते.मुंबईला असतांना संवाद तर कमीच होतो. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतो. पण इथे मात्र चोविस तास बरोबर…..मुलगी कारच्या अगदी मागच्या सिटवर आडवी पडून झोपायचा प्रयत्न करित होती. दुसरी मुलगी पुस्तक वाचत बसली होती. काश्मीरच्या सृष्टी सौंदर्याची जादू आता कमी झाली होती. आम्ही सगळे त्या सुंदर निसर्गाशी नकळत पणे एकरुप झाले होतो. त्या निसर्गाचाच एक भाग झालो होतो. बायकोने डोक्याभोवती ओढणी बांधुन घेतली होती केस उडू नये म्हणून.. सहज लक्षात आलं, बायको अजुन ही तरुणच दिसते, तिचं एजिंग कमी झालंय माझ्या पेक्षा. कदाचित कमी खाणं आणि जिम चा परिणाम असावा. पुर्वी नियमीतपणे पणे जिमला जायची ती.
शेजारच्या घरांच्या कंपाउंड वॉल्स वर गुलाबाचे ताटवे बोगन वेली प्रमाणे सोडलेले होते. काही घरांच्या कंपाउंड वॉल्स तर अगदी लाल चुटूक दिसत होत्या. दूर असलेल्या पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर घरं उठ्न दिसत होती.पण त्या घरामधे जिवंतपणाचं काही लक्षण दिसत नव्हतं.एखाद्या चित्रकाराने एक सुंदर मुलीचं चित्र काढावं पण त्यात नेमकं त्या मुलीचे किंवा पापण्या काढणं, किंवा भुवया काढणं…सुंदर डोळे काढणं विसरुन जावं तसं काहिसं दिसत होतं..
शेवटी एकदचं आम्ही खीर भवानीच्या मंदिराजवळ पोहोचलो. कार पार्क केली आणि आम्ही निघालो दर्शनाला. मंदिराचं मुख्य दार बंद होतं. तिथे समोर रेतीची भरलेली बरीचशी पोती होती.. त्यांच्या आड काही मिल्ट्री चे जवान गन्स घेउन बसले होते. समोर दुकानं होती युजवल पूजेच्या सामानाची.त्या सामानात नेहेमीच्या पूजेच्या सामाना व्यतिरिक्त फक्त एकच गोष्ट जास्त होती. ती म्हणजे खिरीचे मोदक.. तांदुळाच्या, साखर आणि दूध घालुन डिहायड्रेट केलेल्या स्टिक्स.. खीर भवानी देवीचं मंदिर एका लहानशा टाक्यात आहे. चारही बाजुला पाणी असतं. त्या मधे आपण आणलेले खिरीचे ते स्टीक्स टाकायचे अशी प्रथा आहे. सुंदर दुधाळ रंगाचं पाणी दिसत होतं, पंडितजी म्हणाले, की जेंव्हा एखादं परकीय आक्रमण किंवा धोका असेल तेंव्हा हेच पाणी लाल होतं..
आम्हाला पाहुन तिथला पंडितजी पण समोर आला. आमच्या सगळ्यांच्या कपाळाला त्याने कुंकवाचे बोट टेकवले.सर्व मांगल्य मांगल्ये…. सुरु केलं. श्रध्दापूर्वक देवीला नमस्कार केला आणि झाडाच्या पारावर टेकलॊ. तिथलं कुंद वातावरण, आणि संपुर्ण मोठ्या मंदिरामध्ये फक्त आमची फॅमिली. कसंतरी वाटत होतं. मंदिर म्हंटलं की कसा राबता हवा माणसांचा. त्याशिवाय काही मजा नाही.इथे जवळपास सगळी मुस्लिम बहुल वस्ती आहे आता. सगळी पंडितांची घरं मुस्लिमांनी विकत घेतली आहेत, त्या मुळे इथे येणार तरी कोण?प्रसाद म्हणून एका वाटीमधे तांदुळाची गरम गरम खीर दिली तिथे.
सौ. मंदिरामधे वॉश रुम मधे गेली आणि मी त्या पंडितजींशी गप्पा मारत बसलो.
पंडितजींनी पण तेचं सगळं सांगितलं जे ड्रायव्हरने सांगितले होते. फक्त डॊळ्यात पाणी आणून म्हणाला, तुम्ही इकडे का आलात? सुंदर निसर्ग तर हिमाचल मधे पण आहे.. तुम्ही इकडे यायला नको होतं . तुम्ही लोकं इथे येता, हाउस बोट्स, घोडे भाड्याने घेता. आणि ’त्या’ लोकांना पैसे देता. मग ह्याच पैशातला मोठा हिस्सा हा ते टेररिस्ट ऍक्टीव्हिटीज साठी डोनेट करतात. त्यांच्या मस्जिद मधे जेहादच्या नावाखाली पैसा गोळा केला जातो , आणि तोच पैसा कुठे वापरला जातो ते तुम्ही जाणताच…
तुम्ही लोकं इकडे येता, त्यांना पैसे देता.. . टेररिस्ट फंडींग करताय तुम्ही लोकं – अजाणतेपणी.. मला तर काय बोलावं ते कळत नव्हतं. मी नुसता बसून राहिलो.
पंडितजी म्हणाले, जर तुम्ही कांही वर्षांपूर्वी आले असते तर या मंदिरामध्ये तुम्हाला खूप लोकं दिसले असते. पण आता इथले हिंदु लोकं विस्थापित झाल्यामुळे या मंदिरात येणारे लोकं कमी झालेले आहेत. फक्त सणा वाराला, किंवा आमच्या सारखे टुरिस्ट लोकंच फक्त येतात.. मला खूप वाईट वाटलं. मी पंडितजींना म्हणालो, तुमचं म्हणणं पटलंय मला , आणि मी इतरांना पण कन्व्हे करिन ..
पंडितजींच्या मुलांनी बारामुल्ला सोडलंय. आता पंडितजी आणि फक्त त्यांची बायको दोघंच रहातात तिथे. म्हणाले, मुलगा दिल्लीला गेलाय. मोठ्या मुश्किलीने त्याच्या बायकोची आणि मुलींची इज्जत वाचली ’त्या’ वेळी.. पंडितांनाही खूप बोलायचं होतं, पण तेवढ्यात सौ. आली.
पंडीतजींनी अगदी आपुलकीने आणि काळजी युक्त स्वरात सांगितलं की लवकर जा, अंधार पडण्याच्या आत पोहोचा श्रीनगरला. उगाच त्यांचे डोळे भरुन आले मुलींच्या कडे पाहून.. मला वाटतं त्यांना आपल्या नाती आठवल्या असतील. बायकोचे पण डोळे उगाच पाणावले, जरी तिला आमचं झालेलं बोलणं काहीही माहिती नसलं तरीही आमच्यातला थंड शांतपणा तिला नक्कीच जाणवला असणार..
शेवटी मी पुरुष,आणि पुरुषाच्या डोळ्यात अश्रू नको, म्हणून निग्रहाने ते अश्रू माघारी पाठवलं .. तरी पण कडा ओलावल्याच. मुलींच्या समोर नको डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायला…त्यांना वाटतं ना, माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट.. :)म्हणून खाली वाकलो आणि पंडितजींना नमस्कार करुन उभा होतांना उगाच डोळ्यांवरून फिरवला, म्हंटलं कुंकु गेलं वाटतं डोळ्यात.. आणि रुमालाने पुसला चेहेरा..पंडितजींच्या पाया पडलो, एक पाचशे रुपयांची नोट त्यांच्या हातात ठेवली. त्यांच्या कडे पाहिलं.. डोळ्यांना डॊळे भिडले , आणि निरोप घेतला… अगदी आपल्या अजोबांना सोडून चालल्या प्रमाणे वाटत होतं.. आणि आम्ही परत निघालॊ श्रीनगरला.
मला वाटतं की हवेतला बोचरा गारवा , आणि त्यामुळे उमटणारे शहारे.. थोडी मनातली भिती.. सोबत असलेल्या मुलींची आणि बायकोची काळजी.. …. आणि या सगळ्यांच्या सोबत “मी” कधी सगळ्यांसोबत असूनही एकटाच……