तेथे कर माझे जुळती….

Written by  on July 20, 2005

कुष्ठरोगी म्हंटलं की आपोआपच बाबा आमटेंचं नांव आठवतं आणि नतमस्तक व्हायला  होतं. माझा जन्मच मुळी वरोऱ्याचा , त्यामुळे आनंदवनाबद्दल एक वेगळी आत्मियता आहे.  अगदी लहान असतांना ( म्हणजे साधारण १०-१२ वर्षा्चा असल्यापासून) बैलगाडीने ( छकड्याने) तिकडे जाणे व्हायचे.तेंव्हा फक्त काही हातमाग आणि शेती वाडीचं काम केलं जायचं – पण गेल्या चाळीस वर्षात बरंच बदललंय आनंदवन.

नुकतीच मुलीची दहावीची परीक्षा झाली म्हणून तिला नागपूरला घेउन गेलो. नागपूरला गेलो की वरोड्याची एक चक्कर असतेच.या वेळेस मुलीला घेऊन आनंदवनात गेलो होतो.   तिला पण आनंदवनाबद्दल फारशी माहिती नव्हतीच. आम्ही जेंव्हा तिथे पोहोचलो तेंव्हा तिथला एक स्वयंसेवक -संजय आमच्या बरोबर आम्हाला आनंदवन दाखवायला आला. आनंदवनाबद्दल आजपर्यंत इतकी माहिती प्रसिद्ध झालेली आहे की मी फक्त माझा अनुभव  अगदी कमीत कमी शब्दात लिहिण्याचं ठरवलंय.

सकाळचे ९ वाजले होते. ११ पर्यंत  व्हिजीटर्सला आनंदवन दाखवलं जातं. इथे जवळपास ३००० कुष्ठ्ररोगी आणि जवळपास लोकं,तसेच  सुरुवातीला बाबांच्या सोबत इथे काम करायला आले होते , आणि आज जे अजिबात काम करू शकत नाही असे  ९०० अती वृध्द लोकं तिथे  रहातात.

आनंदवनात कम्युनिटी  लिव्हिंगचा कन्सेप्ट गेल्या  कित्तेक वर्षापासून पाळला जातो. इथे या ३९०० लोकांची  रहाण्याची व्यवस्था वेगवेगळ्या कॉटेजेस मधे केलेली आहे. प्रातर्विधी सा्ठीची व्यवस्था ही कॉमन केलेली असते. तसेच सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था पण ९ कम्युनिटी किचन मधे केली जाते. कुणाच्याच घरी वेगळा स्वयंपाक  बनवला जात नाही. जे काही कम्युनिटी किचन मधे  बनवले जाते ते सगळे जण खातात. कोणाच्याच घरात पर्सनल चुल किंवा गॅस नाही.पुलं, सुनीताबाई, नाना पाटेकर जेंव्हा इथे रहायचे तेंव्हा ते पण इथलं कम्युनिटी किचनमधलंच जेवायचे.

आत शिरल्यावर समोर एक वारली पेंटींग केलेला एक दगड लक्ष वेधुन घेतो.  त्या दगडावरचे ते कलात्मक वारली पेंटींग पाहिले आणि नकळत त्याचा फोटॊ काढला.संजय सांगत होता, इथे रहाणारा प्रत्येक माणूस स्वतः काम करण््याच्या वेळा पण ठरलेल्या आहेत. केवळ कुष्ठ रोगीच नव्हे तर अनेक विकलांग लोकांनाही इथेच आसरा दिला जातो. पुढे जेंव्हा आनंदवन ’पहाणे’ सुरु केले तेंव्हा हे प्रकर्षाने जाणवले.

जास्त न लिहिता   जास्तित जास्त फोटॊ टाकायचे ठरवले आहे .मी या फोटो मधे कुष्ठ रोग्य़ांचे तुटलेली बोटं वगैरे दाखवणार नाही तर त्यांचे चांगले रूप दाखवायचा प्रयत्न असेल.. कारण नुसतं लिहायचं म्हंटलं तर किती लिहू अन किती नाही असं होणार आहे आज. आमची पहिली भेट होती ती हातमागावर कापड विणण्याच्या विभागाला. बाहेर अंगणात रंगवलेले सूत ( दोरा)  दोरीवर वाळत टाकले होते.  लाल भडक रंगाचं सूत बाहेर तारेवर वाळत टाकलेलं  खूप सुंदर दिसत होतं.

आम्ही जेंव्हा आत गेलो तेंव्हा हातमागावर एक पायाची बोटं नसलेला माणूस पण हात तसे बरे असलेला तिथे  हातमागावर कपडे विणत बसला होता. दुसऱ्या खोलित स्त्रिया सुत बॉबिन वर गुंडाळून तयार करुन ठेवत होत्या- या बॉबिन्स  मशिनवर कपडे बनवतांना वापरतात.  हे काम  ज्या लोकांच्यानी हेवी काम होत नाही त्यांना – वि्शेषतः  स्त्रियांना दिले जाते. कपडे विभागात तयार होणारे कपडे म्हणजे  पंचे हे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहेत. तसेच  सतरंजी पण  भरपूर प्रमाणात विकली जाते.

पुर्वीच्या काळी प्राथमीक शाळांमधे बसायला कपड्याच्या फाऱ्या ( लांबच लांब पट्ट्या) वापरल्या जायच्या.  तसेच पुर्वी लग्नाच्या पंगती मधे पण जेवतांना ह्या साधारण दिड फुट  ्रूंदीच्या पट्ट्या खाली बसायला वापरल्या जायच्य़ा.  अशा प्रकारच्या पट्ट्यांना अजूनही लहान गावात  भरपूर डिमांड आहे.

नागपूरच्या एका पॉवरलुमच्या मालकाने आपली फॅक्टरी बंद केली आणि सगळी मशिनरी आनंदवनाला दान केली. त्यामूळे आता पॉवरलुमचा पण विभाग सुरू करण्यात आलेला आहे. सगळ्याच विभागांमधे कुष्टरोगातून बरे झालेले पेशंट्स काम करतात. यांना हे काम करायला पण इथेच शिकवले जाते.

बरीच मंडळी अशीही आहेत की ज्यांना महारोग तर झालेला नाही, पण शारिरिक  दौर्बल्य  ( पॅरेलिसिस झालेले, अंध , वगैरे) इतकं जास्त प्रमाणात आहे की त्यांच्याकडून कुठलीही अंगमेहेनतीची कामं केली जाऊ शकत नाहीत. अशा लोकांच्या साठी तिथे एक संगित विद्यालय उभे केले गेलेले आहे. या विद्यालयात अंध, अपंग वि्द्यार्थ्यांना संगीत शिकवले जाते.  आम्ही तिथे गेलो होतो  तेंव्हा अशा मुलांचा तिथे सराव सुरु होता. आम्ही समोर बसल्याबरोबर, त्यांनी आम्हाला खास गाणं ऐ्कवलं, त्याचं व्हिडीओ रेकॉर्डींग केलं ते इथे आहे पोस्ट केलेलं. जी मुलगी गाणं म्हणते ती पुर्ण अंध आहे. या मुलांच्या ऑर्केस्ट्रा चे कार्यक्रम हे बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत आणि होत असतात.

हे पाहून बाहेर निघालो, तर शेजारच्या एका खोलीमधे एक मुलगी पायाने सुई दोरा वापरून ग्रिटींग्ज वर डीझाइन्स काढत होती.  ते दृष्य़ पाहिलं , आणि  तिच्या जगण्याच्या चिकाटीचं कौतूक करावंसं वाटलं.  तिला हाताचा वापर अजिबात करता येत नाही – म्हणून पायाचा इतका व्यवस्थित वापर पाहिला आणि खूप इम्प्रेस झालो. आजच पेपरला बातमी वाचली की चांगला धडधाकट  भारतीय नेव्हीचा एक जवान ( रीटायर्ड) त्याने आपल्या बायको मुलींचा खून केला – आणि ह्या   पार्श्वभूमीवर तर तिची चिकाटी बघून नतमस्तक झालो. इथे एक लहानसा व्हिडीओ आहे.

हे सगळं पाहून झाल्यावर आम्ही अभयारण्यात गेलो. तिथे बरेच प्राणी वगैरे पाळलेले आहेत . इंमू फार्मिंग, ससे पालन, मगर सुध्दा पाळलेली दिसली. फुल बागा, फणसाच्या बागा, तसेच ऑर्किड्स पण आहेत. ह्या सगळ्यांसाठी म्हणजे शेती साठी सुध्दा लागणारी मशिनरी मेंटेनन्स वगैरे ची कामं पण इथले लोकंच करतात. लोखंडी कपाटांची पण  इथे एक कार्यशाळा आहे. वेल्डींग पासून तर उच्च  दर्जाच्या पेंटींग पर्यंत सगळं काही इथे इन हाऊस केलं जातं.

सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे इथे काम करणाऱ्यांना कोणीही काहीच शिकवलेले नाही. जुने काम करणारे लोकं नवीन लोकांना काम करायला शिकवतात. एक पायाने अधू असलेला एक एक्सपर्ट माणुस  इतर स्त्रियांना आणि पुरुषांना  रेग्झिन्स च्या बॅग कशा बनवायच्या ते शिकवत  होता. एकमेकांना नवीन गोष्टी शिकवून  मॅनेजमेंटच्या भाषेत ” युटीलायझिंग अव्हेलेबर रिसोअर्सेस अँड मोबिलायझिंग देम टु  परफॉर्म बेटर” असं म्हणता येईल .

सामाजिक सहजीवन म्हणजे काय ते इथे समजलं मला.  इतर लोकं नुसतं बोलतात, इथे ते सगळं करून दाखवतात.

पायाची बोटं तुटलेली तर बऱ्याच लोकांची दिसतात. काही लोकांची तर पावलं पण पुर्णपणे तुटलेली दिसली. म्हणजे फक्त पायाचा  गुडघ्या खालचा भाग नाही.. असेही लोकं दिसले.   त्या लोकांना पाहिलं आणि मला डॉम्निक लॅपायरचं एक वाचलेलं पुस्तकं ’सिटी ऑफ जॉय ’ मधला एक प्रसंग आठवला. त्यामधे एक डॉक्टर भारतामधे कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी येतो. बरेच रोगी असतात. कुष्ठ रोग्यांना दुःख वगैरे होत नाही, म्हणून सेडेटिव्ह न देता कत्तलखान्यातल्या कसाया प्रमाणे शरीराचे खराब झालेले अवयव कापून काढल्याचा एक चॅप्टर आहे. अंगावर वाचतांना काटा येतो. असो.. तर अशा लोकांना  नीटसं उभं पण रहाता येत नाही. म्हणूनच असेल की बऱ्याच ठिकाणी तिन चाकी सायकली ( हाताने चा्लवायच्या) पार्क करुन ठेवलेल्या दिसतात.

कचऱ्या मधून कला या विभागात तर अगदी सलाइनच्या बाटल्यांपासून केलेल एक शो पीस , एक्सरे फिल्म वापरुन केलेल वह्या पुस्तकांची कव्हर्स. फाइल कव्हर्स, अशा अनंत गोष्टींच्या शिवाय तिथे केळीच्या साला पासून, आणि मक्याच्या कणसाच्या साला पासून    बनवलेले अनेक  कलाकृती पहायला मिळाल्या – तसेच ह्या कलाकृती  टाकाऊ वस्तू पासून बनवल्या आहेत यावर विश्वास  बसत नाही. आणि हे सगळं  करणारे कुष्ठ रोगी आहेत… एक लहानसा व्हिडीओ बघा या कामाचा..

फार पुर्वी एकदा  इथे बाबा आमटे असतांना  चंद्रपूरहून नागपूरला जातांना, पुलं आणि सुनिताबाईंना इथेच भेटलो होतो.   नाना पाटेकर स्वतःच्या प्रॉब्लेम्स मुळे इथे येउन एक वर्ष राहिला होता. पैसा, प्रसिद्धी सगळं काही असलेली इतकी मोठी माणसं  – पण त्यांना इथे येऊन रहावंसं का वाटलं असावं बरं?

सुतारकाम विभागात,  इथली जमीन साफ करतांना जी मुळं वगैरे सापडली, त्यांच्यापासून बनवलेली  बनवलेल्या कलाकृती मांडून ठेवलेल्या आहेत. तसेच बरेच नवीन फर्निचर पण बनवत होते. मागे मोठी लाकडांची वखार होती. हातापायाची बोटं झडलेल्या त्या लोकांना कामं करतांना बघून वेगळीच प्रेरणा मिळत होती.सगळं पाहून झालं होतं. फक्त बाबा आमटेंची समाधी पहायची होती. रम्य वातावरणात उघड्यावर एका शेतामधे एक लहानसा चौथरा केलेला होता. त्यामधे बाबा आमटॆंच्या अस्थी ठेवलेल्या होत्या.  शेजारी सुंदर फुलझाडं होती लावलेली. त्या समाधीला हात जोडले आणि परतीच्या वाटेला लागलो.

वारलीपेंटींग केलेला दगड..

हातमागावर कापड विणतांना ( चादर)

बॉबिन्स बनवतांना स्त्रिया.

स

रंगवलेले सुत उन्हात वाळवतांना. ह्या पासूनच पुढे कपडा बनवला जातो.

सतरंजी विणतांना .. अतिशय कष्टाचं काम आहे हे.

प्राथमीक शाळांत मुलांना बसायच्या पट्ट्या.. अजूनही खेडेगावात वापरल्या जातात ह्या.

बाबा आमटेंची समाधी

संगीत विद्यालय . आनंदवन अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रा आहे यांचा. शारिरीक विकलंगांना इथे गाणं शिकवलं जातं.

कचऱ्यातून कला, अतिशय सुंदर कलाकृती आहेत इथे तयार केलेल्या . सलाईनच्या बाटल्यांपासून तयार केलेले झाड समोर दिसते आहे

गौशाळा.

केळिच्या सालापासून आणि मक्याच्या सालापासून तयार केलेली कलाकृती हे जे रंग दिसताहेत ते नॅचरल कलर्स आहेत त्या सालांचे. ्नानापाटेकरचा फेवरेट विभाग. तो स्वतः इथे राहिला होता एक वर्ष.

लाकुडकाम विभाग. या विभागात अगदी पहिल्या स्टेजवर दुरुस्त झालेले रोगी , जे शारिरिक दष्ट्या धडधाकट आहेत तेच काम करतात. बरंच अंगमेहेनतीचं काम आहे इथलं.

ग्रिन हाऊस, इथेच सगळे शेतीविषयक प्रयोग, किंवा रोपं तयार करणं केलं जातं. सगळ्यात नविन टेक्नॉलॉजी वापरली जाते इथे.

या वृध्दाश्रमात ९०० वृध्द कुष्ठ रोगी आहेत. हे जे लोकं बाबा आमटेंनी जेंव्हा आश्रम सुरु केला तेंव्हापासून इथे आलेले आहेत. पुर्ण दुरुस्त या लोकांनी इथेच राहून कुष्ठ रोग्यांची आयुष्यभर सेवा केली.सुरुवातीला इथेच काम करून रहायचे, पण आता मात्र वयोमानामुळे कामं होत्ं नाहीत यांच्या हाताने.

अशा सायकल्स खूप दिसतात तिथे.

अजून बरेच फोटो  काढलेले आहेत ते नंतर लोड करीन. कुठल्याही कुष्ठरोग्याचे फोटो  पोस्ट करणे टाळले आहे. . हे पोस्ट पण लिहून ठेवलं होतं , फक्त व्हिडीओ अपलोड केलेले नव्हते म्ह्णणून राहून गेलं ते आज पोस्ट करतोय.