आमची हनुमान जयंती

Written by  on May 18, 2005

दुपारी दोन ची वेळ असेल, उन्हाळ्याचे दिवस, आणि  यवतमाळचा विदर्भात ला उन्हाळा. तरी पण घरात बसून रहाणे कधीच नसायचे. अगदी लहानपणापासून मला समोरच्या शामबाबुच्या गॅरेज मधे बसून टाइम पास करायला आवडायचं. तिथेच मी आधी कार रिपेअर्स बद्दल बरंच शिकलो. आम्हा मित्र मंडळींचा फड तिथेच जमायचा. साधारणतः वय असेल १२-१३ वर्ष. गॅरेज च्या शेजारीच एक चिंचेचं झाडं होतं.

एकाएकी झाडावरुन एक माकड खाली असलेल्या इलेक्ट्रिक च्या ओव्हर हेड वायर्स वर पडलं. आम्ही सगळे जण आवाज  कसला आला म्हणून धावत बघायला गेलो. एकाने गॅरेज मधून पाणी आणले आणि त्या माकडाच्या तोंडावर घातले, पण दोन तिन आचके देउन ते शांत झालं.

आम्ही सगळे जण आवाक झालो. समोर कुठल्याही प्राण्याला मरतांना पहिल्यांदाच पाहिले होते. वेगळंच काहीतरी वाटत होतं. दिवस होता हनुमान जयंती चा. दर वर्षी हनुमान जयंती आली की हा प्रसंग आठवतोच. तर, काय करायचं? आम्ही सगळे एकमेकांकडे बघू लागलो. दिलप्या म्हणाला ह्याला जमिनीत खड्डा करुन गाडून टाकू . दफन करणे वगैरे शब्द आमच्या डीक्शनरित त्या काळी नव्हते. शाम्या लगेच उठला आणि घरी पळाला. त्याची शेती होती, त्या मुळे कुदळ, फावडॆ, घमेले(लोखंडी टोपली) वगैरे सगळं सामान त्याच्या घरी नेहेमीच असायचंच.

जागा शोधण सुरु झालं.. शेवटी एक जागा निश्चित केली आणि तिथे खड्डा करणे सुरु केले, ५ फुट खोल खणल्यावर  त्यात त्या माकडाला दफन करणार एवढ्यात  कोणाच्या तरी लक्षात आलं  की स्ट्रे कुत्री त्याला ्खणून काढतील .म्हणून त्यावर टाकायला म्हणून दगडी चिरे आणले ( शेजारच्याच नाल्याचा काढून) .! एकदाचा हा दफन  विधी पार पाडला. आम्ही परत आता पुढे काय? असा मिलियन डॉलर प्रश्न डोक्यात घॊळवत विचार करित बसलो होतो.

हे सगळं झालं आणि मग ठरलं की तिथे एक मंदिर उभं करायचं शेजारी सुरु असलेल्या बांधकामाच्या सामानातुन काही विटा आणि सिमेंट रेतीचं मिक्सचर आणलं आणि हातानेच थापून तिन भिंती उभ्या केल्या. वर छतासाठी एक लोखंडी पत्रा घेतला आणि एक घमेलं त्यावर उलटं घालुन त्यावर सिमेंट थापले. आणि अगदी क्रूड पद्धतिने एकदाचं मंदिर उभं केलं.हे सगळं करण्यात सिमेंट योग्य पद्धतिने न हाताळल्यामुळे आमचे हात संपुर्ण सोलून निघालेले होते. पण घरी काही बोलायची सोय नव्हती , कारण कशाला तडफडायला गेला होतास.. म्हणून माझीच पुजा बांधल्या गेली असती.

आत्ता पर्यंत ह्या माकडाच्या मृत्युची खबर सगळी कडे पोहोचली होती. बरीच मोठी माणसं , म्हणण्यापेक्षा मोठी मुलं पण आली होती.काय झालं? कसं झालं? ह्यावर सगळी माहिती सांगायला आम्ही हिरारीने पुढे पुढे करित होतो. आज हनुमान जयंती, आणि माकड म्हणजे प्रत्यक्ष हनुमानाचे वंशज, म्हणून त्याची पुजा करायची असे ठरले.कोणाच्या ते आठवत नाही पण कुठल्यातरी मोठ्या मुलाच्या ( हल्ली तो एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर आहे पिडब्लुडी मधे म्हणुन नांव लिहित नाही) डोक्यात आलं की आज रात्री आपण सगळे मिळून एकत्र प्रसाद करु या! तर होता होता  शेवटी भंडारा करण्याचे निश्चित झाले…

भंडारा म्हणजे सगळ्यांच्या साठी एकत्र स्वयंपाक करुन मारुतिला नैवेद्य दाखवायचा. त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे कणीक, कांदे , बटाटे आणि प्रत्येकी काही पैसे गोळा केले  . आम्ही लहान मुलं कणीक गोळा करायला निघालो.. हातामधे एक मोठा अल्युमिनियम चा डबा घेउन तो सायकलला लावला जायचा.

आता पर्यंत प्रत्येक घरी माहिती झालेलं होतं की काय झालं ते. सगळ्यांनी तिथे एकदा तरी चक्कर मारलेली होतीच. त्यामुळे पुढचं काम सोपं झालं. प्रत्येकाला जास्त काही सांगावं लागलं नाही.प्रत्येक घरची कणीक त्या डब्यात रिकामी केली जायची. असं करता करता प्रत्येकाच्या घरी जाउन कणीक , कांदे, बटाटे आणले .

स्वयंपाक करण्याचे काम वाड्यातल्या मुलीच करायच्या.तेल आणि इतर साहित्य कोणाच्या तरी घरुन आणुन बटाटयाची भाजी आणि पुऱ्या तळल्या . कोणी तरी घरुन रव्याचा भाजुन शिरा करुन आणला होता..

रात्री हनुमानाची आरती.. सत्राणे उड्डाणे हुंकार वदुनी.. झाली. जितकं काही येत होतं तेवढं सगळं.. म्हणजे भीमरूपी वगैरे म्हणून झालं. सगळे जण हिरिरीने म्हणत होते सगळे श्लोक वगैरे.  जेवायला येतांना प्रत्येकाने घरुन ताट आणि पेला आणणे जरुरी असायचे. अशा तर्हेने हा हनुमान जयंतीचा कार्यक्रम पुर्ण झाला. त्या नंतर दर वर्षी आम्ही हा सहभोजनाचा कार्यक्रम करायचो.

रिसेंटली दिलप्याशी परवाच फोन वर बोललो, तर म्हणाला की अजुन ही पुढची पिढी हा कार्यक्रम करते आहे. पिढी दर पिढी हा वारसा पुढे गेलाय. आता जवळपास ३५ वर्ष झाली असतील त्या गोष्टीला …

अजुन ही हनुमान जयंती म्हंटलं की ते दिवस आठवतात.आणि आपण काय मिस करतोय ते आठवतं..

बॉनी एम

Written by  on May 12, 2005

काल रात्री जुनी बॅग उघडून काही कागदपत्र शोधत होतो. तर एक जुनी टेलिफोन डायरी सापडली. हल्ली तर टेलीफोन डायरी ठेवणं बंदच केलंय. सगळे नंबर्स सेल फोनच्या मेमरी मधेच असतात. सहज डायरी उघडली आणि जुने नंबर , नावं पहाणं सुरु केलं बरेचसे लोकं तर आता संपर्कात पण नाहीत. टेलिफोन नंबर्स पण पाच आकडी, किंवा काही ठिकाणचे तर चक्क चार आकडी पण होते.  पानं उलटणं सुरु ठेवलं, तर एका पानावर एक ऑटो ग्राफ दिसला. मला खरं तर स्वतःला तशी   ऑटो ग्राफ गोळा करण्याची काही सवय नाही, पण हा मात्र मी आवर्जून घेतलेला ऑटो ग्राफ  होता.. तो बघितला, आणि एकदम मस्त वाटलं. तो होता माझ्या फेवरे्ट—— !!!

आपले आवडीचे   बरेच लोकं असतात, कोणी लेखक ,  कोणी खेळाडू तर कोणी गायक तर कोणी अजून कोणीतरी. कधी ना कधी तरी त्यांना भेटायचं अशी मनामधे इच्छा असतेच, पण आयुष्यात चान्स काही येत नाही. एअरपोर्टवर बरीच सेलिब्रेटीज दिसतात, पण कधी कोणाची स्वाक्षरी घेण्याची इच्छा होत नाही . पण हे मात्र एक एक्सेप्शन होतं- कारण माझ्या फेवरेट बॅंडचा ऑटोग्राफ होता हा. ह्या ऑटोग्राफचा इतिहास एक क्षणात नजरेसमोरुन गेला. तो क्षण पुन्हा जगलो त्या पाच सेकंदा मधे आणि मन प्रसन्न झालं.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/06/photo0004.jpg)

बॉनी एम स्वाक्षरी

ही घटना होती १९८६ ची! (कसं आठवलं म्हणता? त्या ऑटो ग्राफ खाली चक्क तारीख पण आहे.)  माझं वय तेंव्हा साधारण २६ असेल- ते वय म्हणजे मस्त पैकी जाझ, रॉक म्युझिक ऐकायचं. तशी मला क्लासिकल ऐकायची आवड तर लहान पणा पासूनच आहे, पण सोबतच नाटकिंग कोल, ऍबा किंवा बोनी एम तर हमखास ऐकायचो. बोनी एम चा मी डाय हार्ड फॅन.  डॅडीकुल पासुन सगळ्या रेकॉर्डस होत्या संग्रही. त्या काळात बॉनी एम आणि ऍबा म्हणजे तरुणांच्या गळ्यातले ताईत.बॉनीएम चं फिव्हर वगैरे तर तरुणां मधे खूपच फेमस होतं. आजकाल कदाचित कोणाला माहिती नसेल , पण यांची गाणी खूपच अप्रतिम आहेत.

गोव्याला कामासाठी आलो होतो. सेसा गोवाचं ऑफिस होतं वास्कोला, पण काम असायचं ते सोणशी माइन्स ला. वास्कोची मिटींग आटोपली आणि पाहिलं तर   दुपारची दिड ची वेळ झालेली. जेवण आवरून एअरपोर्टला  मुद्दाम थोडा लवकरच निघालो.  फार लहान  रस्ते होते तेंव्हा   गोव्याचे , त्यामूळे  प्रवासात नक्की किती वेळ लागेल ते सांगता येत नव्हते. रस्ता मोकळा होता, आणि  म्हणूनच  एअरपोर्टला अपेक्षेपेक्षा खूप  लवकरच  पोहोचलो.

स्वतःशीच हासलो,  म्हंटलं की टाइमपास तरी बरा होईल. तो काळ होता हिप्पी मुव्हमेंटचा. त्या मूळे बरेच हिप्पी लोकं   गोव्यात रहायचे 🙂  त्यांना ना जगाची चिंता ना स्वतःची. ड्रग्ज च्या नशेत  असायचे, आणि मग इतर पब्लिक साठी फ्री शो!! 🙂  ह्या हिप्पी लोकांना पहात वेळ घालवणे हा  एक जनरल टाइम पास असायचा गोव्याला गेलो की.तुमच्या नजरेतले भाव दिसले बरं का मला. पण तेंव्हा माझं वय फक्त २५-२६ होते हे वर मुद्दाम आधीच लिहिलंय!!! 🙂

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/06/boneym.jpg)तर एअरपोर्टला पोहोचल्यावर चेक इन  रांगेत उभा राहिलो . समोर एक निग्रो  गृप उभा होता. एकाच्या हातात गिटारचा बॉक्स होता. मला डॅडीकुलच्या रेकॉर्डवरचा चेहेरा आठवला, आणि लक्षात आलं की हा तोच!!!! आणि आश्चर्याने एकदम आवाकच झालो. त्याचं नांव तर माहिती नव्हतं, सगळे त्या बॅंडमधले लोकं म्हणजे बॉनी एम! काय करावं हेच सुचत नव्हतं.   हातातल्या बॅग मधे असलेली टेलिफोनची डायरी काढली , आणि एक पान उघडून ’स्क्युज मी – ऑटोग्राफ प्लिज’ म्हणुन समोर केली. त्यावर केविन ने  मला विचारलं – यु रेकग्नाइझ्ड मी? म्हंटलं ’ ऑफ कोर्स- यु आर वन ऑफ द  बॉ्नी एम’, त्याला पण बहुतेक  बरं वाटलं असावं- मस्त पैकी गिटारचं चित्र काढलं  आणि ऑटोग्राफ दिला. त्याच्या व्यतिरिक्त इतर दोघांचेही ऑटोग्राफ्स घेतले.  तेच ते दोन ऑटोग्राफ्स मला समोर दिसत होते त्या डायरी मधे.. एका मस्त दिवसाची आठवण!! हे ऑटोग्राफ्स दाखवून खूप मित्रांना जळवलं होतं हे पण आठ्वलं.

या ऑटोग्राफ्स व्यतिरिक्त फक्त सचिन तेंडुलकरचा आणि राहुल द्रविडचा ऑटोग्राफ घेतला होता बोर्डींग पास वर-  तो पण  आता शोधावा लागेल कुठे आहे तो. आयुष्यातल्या काही  खूप खास आठवणी असतात , त्यांच्याबद्दल नुसतं आठवलं तरीही दिवस कसा मस्त जातो अगदी!!