’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..

Written by  on April 16, 2005

कधी अटेंड केलंय़  का एखादं भैय्याचं लग्नं ??- नाही पुण्या मुंबईला नाही.. तर थेट बिहार युपी मधे ? नाही?? अरे यार.. तुम्ही जीवनातल्या एका अत्युच्च आनंदाला मुकला आहात. वन्स इन अ लाइफटाइम , त्यांचं लग्नं एकदा तरी अटेंड केलंच पाहिजे.ह्या भैय्या लोकांच्या लग्नामध्ये खुप मजा येते. इतकी मजा तर अगदी मारवाड्याच्या लग्नात पण येत नाही.

हे भैय्ये लोकं  कितीही शिकलेसवरले असले तरीही वागणुकीत फारसा फरक नसतो.  शेवटी वळणाचं पाणी वळणालाच मिळणार ना?

नुसती धमाल असते.. या लोकांच्या लग्नाची वेळ साधारण रात्री १ ते ४ च्या दरम्यान असते.    लग्न म्हणजे एक मोठा कार्यक्रम असतो. लग्न रात्री , म्हणजे दिवसभर फुल टू टाइम पास सुरु असतो. खाणं पिणं..इत्यादी इत्यादी.. इत्यादी  गोष्टींची रेलचेल असते. ज्याला जे वाटेल ते तो करित असतो.

तर अगदी पहिल्या पासून सुरु करु या आपण.. नवऱ्या मुलाला   कुठल्यातरी चांगल्याशा  हॉटेलमधे त्याच्या मित्रांसोबत उतरवलेले असते. आदल्या दि्वसापासूनच इथे त्यांची सरबराई सुरु असते. इतर बाराती पण तिथेच असतात, पण नवऱ्या मुलाच्या मित्रांना थोडा जास्तच मान दिला जातो.

लग्नाचा मंडप कुठे तरी दुसऱ्या एका ठिकाणी असतो. मंडपामध्ये सगळीकडे बसण्याची बैठक वगैरे व्यवस्था करुन ठेवलेली असते. जर जास्त झालीच तर झोपण्याची ही सोय असते. स्टेज बनवलेलं असतं, शक्यतो दोन भागात विभाजित असतं ते.  कशाला?? सांगतो!!पण पुढे , आत्ता नाही….!

लग्नाची वेळ व्हायची होती. नवरा मुलगा आय टी कंपनी  मधला- आणि मुलगी पण तिथलीच. मुलाचे सगळे मित्र आले होते कानपुरला लग्नासाठी . गप्पा, खाणं पिणं सुरु होतं सकाळपासून. शेवटी संध्याकाळी बारात निघायची तयारी झाली. अंदाजे सात- साडेसात झाले होते. हॉटेलच्या समोर बॅंडवाले  जोर जोरात बँड वाजवत होते. नवरा मुलगा खाली आला…. आणि एकदम स्मशान शांतता!!!! बॅंड वाजणे बंद झाले एकदम.. कोणालाच काही कळॆना.. काय झालं? तर बॅंडमास्टर पुढे आला, म्हणाल पैसा दो.. तो बॅंड बजेगा. ( पैसा दो.. हे म्हणताना डोक्यावरून ओवाळून टाकण्याची ऍक्शन करित होता तो).शेवटी हजार रुपये नवऱ्यामुलाकडून वसूल केल्यावर बॅंड परत सुरु झाला.

समोर एक सजवलेली कार होती. कारला बदकाचा आकार दिलेला होता. चकचकीत अल्युमिनियमच काम केलेलं होतं..वरचं टप उघडं होतं. त्यात नवरदेव बसणार तर पुन्हा तेच.. ड्रायव्हर खाली उतरला. पैसा दो… !तो ही गाडी चलेगी… इथे पण त्या नवऱ्यामुलाच्या भावाने हजार रुपये दिले, तरी पण तो कारवाला तयार होत नव्हता. १५०० रुपयांवर मांडवली झाली, आणि एकदाची समोर निघाली वरात.. थोडं पुढे गेल्यावर डोक्यावर लाइटींग घेउन चलणारे थांबले….

अगदी बरोबर ओळखलं.इथे पैसे उडवायची ऍक्शन केली त्या बत्ती वाल्यांनी.. म्हणजे  नवऱ्या मुलाच्या डोक्यावरून ओवाळून पैसे उडवा…. इथे दहाच्या आणि शंभराच्या नोटांचं बंडल होतंच त्या मुलाच्या भावाच्या हातात, म्हणजे त्याला पुर्ण खात्री होती की असं काहीतरी होणार म्हणून. डान्स बारमधे नोटा ऊडवतात तशा नवऱ्यावरून ओवाळून नोटा उडवणे सुरु झाले. ह्या बत्ती वाल्यांच्या बरोबर लहान मुलं पण होती. ती नोटा गोळा करुन आपापल्या आई बापाकडे देत होते. सोबतंच डोक्यावरच्या बत्त्या खाली ठेवून ते लोकं स्वतः पण नोटा गोळा करित होते.  नवरा मुलगा केविलवाण्या प्रमाणे हे सगळं पहात होता.

असं होता होता वरात एकदाची कण्हत कुथत लग्न मंडपा जवळ ( म्हणजे अर्धा कि.मी वर ) पोहोचली. तिथे एक सुंदर सजवलेला पांढरा घोडा, छानसं खोगीर घालुन तिथे उभा होता. त्या घोड्यावर मुलाला बसवलं.. अरे भाई…. बारात तो घोडीपेही आएंगी नां…. तर तो घोडा घेउन त्याचा मालक चालायला लागला. समोर फटाके उडवणं सुरु होतं..

घोडी चालत होती, तेवढ्यात एक गाणं सुरु झालं, आणि त्या घोडीच्या मालकाने घोडीच्या लगामाला विशिष्ट झटका दिला आणि ती घोडी नाचायला लागली. मोठं मजेशीर दृष्य होतं ते. घॊडीच्या पाठीवर नवरा मुलगा जीव मुठीत धरुन बसलाय , आणि ती घॊडी नाचते आहे. मला तर वाटलं की तो नवरा मुलगा पडणार आता. अहो घोडीवर बसायचं, आणि लगाम हातात नाही, नुसती आयाळ धरुन किती वेळ तोल सांभाळणार?????. नवरा बिचारा केविलवाणा चेहेरा करुन विनंती करतोय की  बस्स.. करो भाई.. मत नचाओ घोडी को….मला उतरव रे बाबा.. पण … नो वे.. तो घोडी वाला अजुन चेव आल्यासारखा त्या  घोडीला नाचवत होता…  शेवटी त्या मुलाचा भाउ पुढे आला, आणि त्या घोडीवाल्याला १००० रुपये दिले, तेंव्हा हा तमाशा थांबला…आणि  ती घॊडी दुडक्या चालिने मंडपाकडे निघाली.

नवऱ्या मुलाची सगळी हाडं खिळखीळी झालेली असावी त्या नाचण्यामुळे.चेहेरा अगदी पहाण्यासारखा झालेला.. त्याला पण वाटलं असावं, की कशाला आपल्या मित्रांना बोलावलं लग्नाला, उगीच शोभा करुन घ्यायला!!!परत गेल्यावर ते आपल्याला कसे चिडवतील हा पण एक प्रश्न होताच..

लग्न मंडपाच्या दाराशी, टिका लावणे हा प्रकार झाला. आणि नवरा मुलगा आत जाउन बसला. समोर जेवणाची व्यवस्था करुन ठेवलेली होती. स्नॅक्स वगैरे होतेच.. आणि कोणीतरी हळूच येउन सांगितलं की उपर व्यवस्था की गई है.. वरच्या मजल्यावर अपेय पानाची व्यवस्था होती. लोकं वर जाउन पिऊन येत होते, तर काही लोकं खालीच बाटल्या घेउन आलेले होते. समोर स्टेजवर मुलगा आणि मुलगी बसले होते. स्टेजच्या अर्द्याहुन जास्त भागात………!!!!!!!!!!!

तर स्टेजच्या दुसऱ्या अर्ध्या भागात डान्सकरिता स्टेज सजवलं होतं.समोर चार मोठे मिशीवाले गुंडासारखे दिसणारे लठैत होते. स्टेजवर बिडी जलाइले …. जिगरसे पिया…. गाण्यावर दोन अर्ध नग्न स्त्रिया नाच करित होत्या- तुम्ही सिनेमात पहाता ना, अगदी तस्संच…. स्टेजवरच एक मेक शिफ्ट पडदा लावलेला होता. नाच सुरु असतांनाच एखादा टुल्ली झालेला स्टेजवर चढायचा प्रयत्न करित होता….. आणि मग लगेच ते लठैत का आहेत याचा शोध लागला..

कोणी त्या स्टेज वर चढलं आणि त्या मुलींच्या अंगचटीला जाउ लागलं, तर ते लठैत त्या माणसाला खाली उतरवायचे… आणि तेवढ्यातच त्या स्त्रिया पडद्यामागे धावत जायच्या, आणि ते लोकं खाली उतरले की मग पुन्हा स्टेजवर  यायच्या… अशा चार मुली होत्या..आलटून पालटुन नाचायला.. 🙂

थोड्या वेळाने अनाउन्समेंट झाली, की आता १० मिनिटांचा ब्रेक आहे, आणि तेवढयात पाहुण्यांनी खान -पान करुन यावे. लोकं धावतंच माडिवर गेलेत पेय पान करायला…!आणि खायला..पुन्हा थोड्यावेळाने सिडी लाउन नाच सुरु झाला.आणि पुन्हा तेच सगळं.. लोकांचं ओरडणं .. वगैरे वगैरे….

जयमालेची वेळ रात्रीची एक वाजताची होती. जयमाला झाली आणि पुन्हा हा नाच सुरु झाला. रात्री मग इतर कार्यक्रम सुरु होतेच. बरेचसे लोकं तिथेच  टाकुन ठेवलेल्या बिछायतीवर आडवे होऊन घोरु लागले होते.. लग्नाचे इतर विधी पण झालेत रात्रभर चालणारा हा सोहोळा कधी संपला ते कळलंच नाही….. 🙂 विदाईची वेळ सकाळी  आली, तो पर्यंत अर्धे लोकं आडवे झालेले होते… 🙂

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अटेंड करावा असा हा सोहोळा… मस्ट फॉर एव्हरी वन .. वन्स इन लाइफ टाइम…! 😀 बाय द वे.. मी नाही अटॆंड केलं हे, तर माझी बहीण आणि तिचा नवरा दोघे पण गेले होते या लग्नाला. ती दिल्लीला असते , आयटी मधेच 🙂 तिने केलेले वर्णन इथे लिहुन काढलंय. आज आली होती  ती मुंबईला..

छोटीसी कहानी.. भाग २

Written by  on April 13, 2005

दोन तिन दिवसांपासुन थोडी तब्येत नरम गरमच होती राहुलची . सुटी घेतली असती तर तो खवीस ओरडला असता, आणि मग पुन्हा घरी जातांना सुटी देतांना त्याने इशु केला असता, म्ह्णून तापातच ऑफिस मधे गेला होता. क्रोसिन घशाखाली उतरवली कॉफीच्या घोटाबरोबर , आणि आपल्या क्युबिकल मधे बसला.

डोकं भयंकर दुखत होतं, दोन कप कॉफी संपवली तरी पण शांत वाटत नव्हतं. आता दिवाळी जवळच आली होती. दिवाळीच्या सुटीला लागुनच पंधरा दिवस एल टी सी घेतली होती. बॉस ने नेहेमी प्रमाणेच कुरकुर केली, म्हणाला, ग्रो अप!! बी प्रोफेशनल.. ( म्हणजे काय असतं?? ) आणि अजुनही बरंच काही सांगत होता की कसा तो नेहेमी सुटी न घेता काम करित असतो ते. म्हणे वर्ष भर कॅजुअल  सुटी घेतलेली नव्हती त्याने.आणि जर मोठं व्हायचं असेल तर सुट्या वगैरे विसरा , आता जर सुट्या न घेतल्याने मोठं होता येत असेल तर ते काय कामाचे??

दिवाळीसाठी घरी जायचं म्हणून तयारी सुरु करायलाच हवी. बरीच पर्सनल कामं पेंडींग होती, आईसाठी साडी, रश्मिचा ड्रेसचा कपडा आणि बरंच काही.उद्या सुटी आहे रविवारची, आणि पुढल्या शनिवारी निघायचंय. तेंव्हा  सगळी खरेदी आधी उद्याच आटोपावी लागेल कुठल्याही परिस्थिती मधे. एसी मधे पण दरदरुन घाम सुटला, बहुतेक क्रोसिनचा असर झाला असावा.. वॉश रुम मधे जाउन चेहेऱ्यावर पाण्याचा हबका मारला, आणि समोरच्या एसी ब्लोअर खाली  उभा राहिला . ताप उतरल्यामुळे आता एकदम फ्रेश वाटत होतं.

किती दिवसानंतर इतकं छान वाटलं बरं आज?? उत्साहाच्या भरात पिसी समोर जाउन बसला आणि कामाला सुरुवात केली. संध्याकाळी एमजी रोडला जायचं मनात नक्की केलं , आणि घरच्या आठवणींच्या गुंतून गेला. कसा बसा दिवस ढकलला, आणि  दुसऱ्या दिवसाच्या प्लानिंग मधे राहुल मग्न झाला.

शेवटी रविवारचा दिवस उजाडला. आज खुप काम करायचं होतं, मार्केटला गेल्यावर कपडे वगैरे खरेदी केली. आईची साडी, रश्मीचा ड्रेस , पप्पांचा शर्ट सगळं झालं , तेवढ्यात त्याची नजर समोरच्या काळ्या टॉप वर गेली.. आणि त्याला रिया आठवली.. तिला छान दिसेल ना??  आणि तो पण पॅक करुन घेतला होता – वेगळा!!

होता होता, एक आठवडा कसा भुर्रकन उडुन गेला, आणि राहुल दिवाळी साठी घरी निघाला.  एअर पोर्ट वर पप्पा आले होते रिसिव्ह करायला.आता पंधरा दिवस काही एक काम नाही करायचं.. नुसता आराम!! बस्स!असे विचार मनात येत होते.  इथे पण मनात सारखे तेच विचार सुरु होते, की यावं कां परत मुंबईला?? बस्स झालं !!

राहुल घरी पोहोचला. सगळे जण वाट पहात होते. रश्मी , रिया दोघी पण बसलेल्या दिसल्या. तेवढ्यात फोन ची घंटी वाजली, आई ने फोन उचलला, तर मुलाकडच्यांचा फोन होता. म्हणत होते की मुलगा उद्या संध्याकाळी परत जाणार आहे, तेंव्हा फक्त उद्याच सकाळीच वेळ आहे त्याला रश्मीला पहायला येण्यासाठी. रश्मी पण लाजुन लाल झाली होती. रिया पण खोडकर पणे रश्मी कडे पहात होती.मला या बद्दल काहीच माहिती नव्हते. ही सगळी डेव्हलपमेंट गेल्या दोन दिवसातली होती.  आई म्हणाली आता तुझा पण नंबर लाउ या लवकर..

दुसरा दिवस उजाडला, आणि सकाळीच दाखवणे हा कार्यक्रम आटोपला, दोघांचिही पसंती झाली, आणि लग्नाची तारीख पण नक्की करण्यात आली. इतक्या लवकर लग्न जुळतं?? राहुल थोडा आश्चर्य चकीत झाला. आई म्हणाली, की आता रश्मी सासरी गेली की मग घर एकदम रिकामं वाटेल , तेंव्हा आता दादूसाठी पण मुली पहायला हव्यात.असं कोणी म्हंटलं की लाजल्या सारखं होतंच ना.. आणि ते पण साहजिकच होतं म्हणा. आईने असं म्हंटलं की ऑफिसमधल्या वेगवेगळ्या मुलींना आपल्या बायकोच्या जागी कल्पना करुन मस्त टाइम पास व्हायचा. कधी भसा भसा सिगारेट ओढणारी ती सिन्हा बायको म्हणून कशी वाटेल? असा काही विचार मनात आला की राहुलला स्वतःचंच स्वतःला हसु यायचं. काही दिवसांपूर्वी ऑफिस पिकनिकच्या वेळेस ती शेजारी बसली होती बस मधे. रात्री परत येतांना पुर्ण टूल्ली होती.. राहुल बिचारा पुढचे दोन दिवस खांद्याला आयोडेक्स चोळत बसला होता.

रश्मीचं लग्नं ठरलं आणि मुलगा लगेच ऑन साईट जाणार, म्हणून लग्नाची तारीख फक्त एका आठवड्यानंतरचीच काढावी लागली. रश्मीचा पासपोर्ट अव्हेलेबल होताच. लग्न झाल्यावर डिपेंडंट व्हिसा मिळणं सहज शक्य होतं, म्हनुन लग्नाची घाई होती आणि घरातलं वातावरण एकदम बदलुन गेलं होतं. सगळीकडॆ खुप उत्साह होता. रिया पण सारखी रश्मी च्या मागे मागे असायची. दोघींचही पान एक मेकींच्या शिवाय पान पण हलत नव्हतं. सारखी रिया राहुलच्याच घरी असायची. तिचं पण कॉलेज संपलं होतं, त्यामुळे कूठलच टेन्शन नव्हतं तिला पण. लग्न  अगदी पुर्णपणे एंजॉय करित होती ती..

लग्नाचं शॉपिंग म्हणजे एक मोठं काम. रश्मीचे कपडे टाकले होते शिवायला. रश्मी म्हणाली की दादू कपडे आणून दे माझे, सोबत रियाला पण घेउन जा.. म्हणजे ती सगळं तपासुन घेईल व्यवस्थित आणि पुन्हा दुसरी चक्कर पण होणार नाही. राहुलच्या कपाळावर चार आठ्या उमटल्या. रश्मी राहुलच्या पुढे उभी राहिली आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या दोन बोटांनी सरळ करित म्हणाली.. इतकं वाईट  वाटून घ्यायला नको, रियाला सोबत ने म्हंटलं तर.आठ्या दूर कर दादू नाहीतर इस्त्री करावी लागेल !!

बाइकला किक मारुन स्टार्ट केली. रिया पण मागे बसली . जिन्स घातलेली असल्याने दोन्ही साईडला पाय घालुन बसली होती. बाइक सरळ सुरु करुन मार्केटला दुकाना समोर थांबवली. रिया खाली उतरली, तर राहुल म्हणाला, इथे नो पार्किंग आहे, तु जाउन सामान घेउन ये, मी  इथेच थांबतो . भर दुपारी दोन वाजताची वेळ होती. उन्हामुळे घामाच्या धारा सुरु होत्या. स्वतःवरच वैतागला राहुल. किती वेळ लावणार अजुन ही?? इतकी वेंधळी आणि हळूबाई असेल तर हिच्या नवऱ्याचं काही खरं नाही.. आणि स्वतःशीच हसला.. तेवढ्यात रिया परत आली आणि  बावळटसारखा हसणाऱ्या राहुल कडे आश्चर्याने पहात राहिली.

बराच वेळ उन्हात उभं असल्याने घसा कोरडा पडला होता, बाइक वर रिया बसली, आणि राहुलने बाइक सरळ समोरच्या शेट़्टीच्या हॉटेल समोर पार्क केली. तिने काही न बोलता हॉटेलमधे त्याच्या सोबत शिरली. तिचा चेहेरा लाल बुंद झाला होता उन्हाने. नाकाचा शेंडा थोडा जास्तंच लाल दिसत होता. घामाचे थेंब कपाळावर जमा झाले होते. पिटुकला रुमाल बाहेर काढून तिने चेहेरा पुसला.. आणि राहुलने काही म्हणण्या आधीच म्हणाली.. एक पेप्सी .. माझ्यासाठी..

लहानपणापासुन एक मेकांना ओळखत असल्यामुळे दोघंही कम्फर्टेबल होते. काहीतरी बोलायचं म्हणून राहुल म्हणाला, कॉलेज काय म्हणतंय? तिने वर पाहिलं, आणि तिच्या डोळ्यात पाहिल्यावर राहुलला समजलं की हा प्रश्न एक्स्पेक्टेड नव्हता.. शी वॉज एक्स्पेक्टींग समथिंग डिफरंट.. काय असावं बरं ते?? कपड्यांचं काम झालं होतं, आता इतर लहान सहान कामं पण होती, जसे भटजी बुवांना सांगून वेळ पक्की करणं, केटरर ला भेटुन मेनु मधले बदल सांगायचे वगैरे वगैरे..

रश्मी प्रत्येक ठिकाणी राहुलच्या बरोबर रियाला पाठवित होती. आणि रिया पण आनंदाने बाइकवर मागे  बसुन फिरायची. राहुल मात्र खुप वैतागला होता.. हे काय सारखं मगे शेपुट लावल्यासारखं हिला घेउन फिरायच? सगळी कामं मी एकटाच करु शकतो नां? मग ही ब्याद कशाला मागे उगीच? पण रश्मीचं मन मोडायचं नाही, म्हणून प्रत्येक वेळेस रियाला बरोबर घेउन जात होता.

कितीही नाही म्हंटलं तरी पण रिया बाइकवर मागे बसली की त्याला आवडायला लागलं होतं. बाहेरची कामं आटोपून दोघंही परत निघाली घरी जायला. घरी जाई पर्यंत राहुलला सारखं वाटत होतं की तिला काहीतरी बोलायचंय, पण त्याच्या काहीच लक्षात आलं नाही. एक आठवडा कसा निघून गेला ते समजलं पण नाही. रश्मिच्या लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाला फारच कमी लोकं बोलावले होते, फार कमी वेळ असल्यामुळे. लग्न आटोपुन रश्मी गेली तिच्या नवऱ्याबरोबर..  आता घरामधे अगदी कोणीच नव्हतं. आई तर खूप कंटाळली होती. सारखी डोळ्यात पाणी आ्णून रडत होती.रश्मी दोन दिवसानंतर येणार होती परत.

( पुढे चालु )

सांचीचा स्तूप

Written by  on April 10, 2005

पाच रुपयांच्या नोटेवर एक चित्र नेहमी असायचं, ते पाहिलं की त्या बद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायचं,  ते चित्र होतं ’सांची स्तूप’. बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे ठिकाण आज वर्ल्ड हेरीटेजच्या नकाश्यावर अग्रस्थानी आहे. कित्येक वर्ष ’सांची’ ही जागा  कुठेतरी बिहारात आहे असे वाटायचे मला.

कामानिमित्त भोपाळ हून विदीशा मार्गे बीनाला जायला निघालो. जातांना अल्पोपाहारासाठी म्हणून विदीशाला थांबलो. विदीशाला प्रसिद्ध असलेली कचोरी आणि जिलबीचा नाश्ता करून पुढे निघणार, तेवढ्यात एक प्रवासी गट समोरून आला, आणि नुकतेच पाहून आलेल्या स्तूपाच्या जवळ साधे पाणी पण मिळू शकले नाही म्हणून त्यातले लोक वैताग व्यक्त करीत होते. त्यांचं बोलणं ऐकून उत्सुकता चाळवली आणि ते कुठल्या स्तूपाबद्दल बोलताहेत आणि तो कुठे आहे याची चौकशी केली, तर समजलं की फक्त ९ किमी अंतरावर हे सांचीचे स्तूप आहे.जातांना थोडी वाकडी वाट करून स्तूप पाहून मग पुढे बीनाला जायचे ठरवले.

आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा तिथे मप्रचा कडक उन्हाळा सुरू होता. कारच्या वातानुकुलीत सौख्यामधून बाहेर आल्यावर उन्हाचे चटके बसत होते अंगाला.पायातल्या बुटांच्या तळव्याखाली पण उष्णता जाणवत होती.   या स्तूपाशेजारी खूप सुंदर बाग केलेली आहे. आम्ही जवळपास कुठे गाईड वगैरे दिसतो का म्हणून चौकशी केली, पण अर्थात तिथे कोणीच नव्हते. फक्त काकडी विकणारा एक माणूस मात्र झाडाखाली बसला होता, तो म्हणाला कोणी व्हिआयपी येणार असेल तर काही साहेब लोकं येतात इथे.

तसं म्हटलं तर ’सांचीचा’ संबंध कधीच  गौतम बुद्धाशी आला नाही. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याला एक जागा हवी होती की जी शहरापासून फार दूर पण असू नये आणि फार जवळ पण असू नये – जेणेकरून बौद्ध भिक्खूंना भिक्षा मागण्यासाठी फार दूर जावे लागू नये . याच उद्देशाने विदिशापासून साधारण ८-९ किमी वर असलेली ही सांचीच्या स्तूपाची जागा निवडण्यात आली होती

. या स्तूपाचे पौराणिक वास्तू संशोधनाच्या दृष्टीने म्हणून महत्त्व खूप जास्त आहे याचे पहिले कारण म्हणजे ह्या स्तूपाच्या निर्मितीचे काम सम्राट अशोकाने इ.स. पूर्व २७३ साली सुरू केले होते .  ख्रिस्त पूर्व काळात निर्मिलेल्या फार कमी वास्तू आज अस्तित्वात आहेत  , त्या पैकी ही एक! या दोन्ही कारणांमुळे या स्तूपाचे महत्त्व खूप वाढते.

स्तूपाचे काम जरी इ.स. पूर्व २७३ साली सुरू झाले असले, तरीही त्या नंतरच्या ५०० वर्षाच्या काळात मुख्य स्तूपाच्या आसपास अशा अनेक स्तूपाचे आणि मठांचे काम १२व्या शतकापर्यंत सुरू राहिले. या मठांमध्ये बौद्ध भिक्खू राहून अर्चना करीत, आणि भिक्षा मागण्यासाठी जवळपासच्या गावात जात असत . ही जागा इतकी अद्वितीय आहे, की त्या काळात ( म्हणजे इस पूर्व) जगात कुठेही अशा प्रकारचे बांधकाम तयार झालेले नाही. इतके असून सुध्दा   ह्या  स्तूपाची जागा म्हणजे एक असेच दुर्लक्षित वर्ल्ड हेरीटेज ठिकाण आहे . भारतीय लोकं भोपाळला गेल्यावर सरळ पचमढीला निघून जातात, पण केवळ ६८ किमी वर असलेल्या ह्या जागेला कोणीच फारशी भेट देत नाहीत.

या स्तूपांनी बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ पाहिलेला आहे. १८१८ पर्यंत ह्या स्तूपाचे अवशेष पुर्णपणे दुर्लक्षित होते, म्हणजे या स्तूपाचे अस्तित्व किंवा मह्त्व पण कोणालाच माहीत नव्हते. पण १८८१ मध्ये काही ब्रिटिश अधिकार्‍यांच्या नजरेत हा स्तूप आल्यावर मात्र या जागेवर बरंच उत्खनन करण्यात आले , आणि बाहेर निघालेल्या या स्तूपाची दुरुस्ती पण करण्यात आली. हे दुरुस्तीचे काम १९१२ ते १९१५ या काळात झाले .

स्तूप म्हणजे काय?? तर, गौतम बुद्धाच्या परीनिर्वाणाची खूण म्हणजे स्तूप असे म्हटले जाते.

मुख्य स्तूपाच्या समोर असलेले ते सुंदर कोरीव काम असलेले चारही  दिशांना असलेले द्वार पाहिले, आणि नकळतच मनातल्या मनात त्या कारागिरांना हात जोडले गेले. या कमानींवर  अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. त्या कोरीव कामामध्ये बौद्ध धर्माच्या काही प्रतीकांचा वापर  करण्यात आलेला आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी चार दारं (कमानी) आहेत, एका कमानीवर जातक कथा, तर दुसर्‍या एका कमानीवर गौतम बुद्धाच्या चरित्रातले काही प्रसंग पण कोरून दाखवण्यात आलेले आहेत. त्यावरची सगळी चित्र काही वाचता आली नाहीत, आणि त्यामुळे गाईडची कमतरता प्रकर्षाने जाणवली.

इसवीसन पुर्वीचे इतके सुंदर कोरीव काम ्जगात कुठेच नसावे .

या स्तूपामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घुमटाचा आकार..घुमटाचा आकार बनवणे हे इंजिनीअरिंगच्या दृष्ट्या फार कठीण समजले जाते. पूर्वीच्या काळी केवळ दगड व्यवस्थितपणे चौरस आकारात कापून आणि माती वापरून एकत्र बसवून बनवलेला घुमटाचा आकार केला आहे तो शंभर टक्के अचूक आहे. त्यात तसूभरही चूक नाही! . ख्रिस्त पूर्व काळात , कुठलीही औजारं नसताना इतकी सुंदर कलाकृती कशी काय निर्माण केली गेली असावी ? हा प्रश्न राहून राहून मनात येत  होत

या स्तूपाचा अक्ष पण पृथ्वीच्या अक्षाशी समांतर आहे. पूर्वीच्या काळी हे साध्य करायला काय केले असावे? हा प्रश्न मनात उठत होता. या मुख्य स्तूपाच्या शेजारीच अर्धवट तुटलेले वगैरे असे दुसर्‍या स्तूपाचे नुतनीकरण केले गेले आहे, पण हा मुख्य स्तूप म्हणजे कलाकारीचा अप्रतिम नमुना समजला जातो .

स्तूपाच्या वरून एक प्रदक्षिणा घालण्याची सोय केलेली आहे, चारही दिशांना सातपुड्याच्या रांगा , आणि उन्हामुळे वैराण झालेली जमीन दिसत होती. समोर बनवलेली बाग मात्र अगदी व्यवस्थितपणे राखली असल्याने डोळ्याला आल्हाददायक वाटत होते. एक उत्कृष्ट आणि महत्त्वाची पौराणिक वास्तु म्हणून अवश्य भेट द्यायला हवी.

बौद्ध धर्मीयांच्या मते देखील गौतम बुद्धाशी संबंधित नसल्याने ह्या वास्तुला फारसे धार्मिक महत्त्व दिले जात नसावे, आणि म्हणूनच फारशी वर्दळ पण इथे नसते .तरीही एकदा आवर्जून भेट द्यावी असे हे एक ठिकाण आहे.

पूर्व प्रकाशित ’शब्दगारवा’