जिभ कापा, नोकरी मिळवा..

Written by  on February 24, 2005

दक्षिणेत गेल्यावर तिकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तिथल्या लोकांचं सिनेमा वरचं प्रेम. कुठलाही सिनेमा लागला की त्या सिनेमातल्या हिरॊचे मोठमोठे कट आउट्स हे तर नेहेमीचेच झालेले आहेत.   एक वेळ स्वतःला खायला नसेल तरी पण   हे सगळे लोकं हिरोच्या कट आऊटला मात्र दुधाची आंघोळ घालणार हे नक्की.

दक्षिणेकडच्या लोकांना राजकीय परिपक्वता थोडी कमीच आहे अशी शंका  नेहेमीच येते मला!  सिनेमातले हिरोला  वास्तविक जीवनातले हिरो समजून पूजा करणे हे तर कायम सुरु असतेच.  एकदा अभिनेत्याचा नेता झाला की मग तर काही पहायलाच नको. एमजीआर, एनटीआर ,ते जयललिता ही त्याची जितीजागती उदाहरणं!

बरं दक्षिण भारतातली इलेक्शन पाहिली की बरेचदा मला तर प्रश्न पडतो की ही निवडणूक आहे की गुलामांचा खरेदी करण्याचा बाजार? एक उमेदवार म्हणतो , आम्ही फुकट टीव्ही देऊ, दुसरा म्हणतो, एक रुपया किलो तांदूळ, तर एक म्हणतो की आम्ही मंगळसूत्र देऊ प्रत्येकाला. हे सगळं अगदी उघड पणे सुरु असतं.  व्यवस्थित पणे पेपर मधे जाहीरात देऊन हे सगळे केले जाते.

इतक्या उघडपणे मतं विकत घेतांना पाहिले, की मग निवडणूक आयोगाचे अस्तित्त्व आहे की नाही?? याचा संशय यावा अशी परिस्थिती असते दक्षिण भारतात.इतक्या उघडपणे मतांसाठी पैशाची, सोन्याच्या मंगळसूत्रं किंवा टीव्हीची लालूच दाखवणे कुठल्या कायद्यात बसते हेच मला समजत नाही.

नेत्यांना पण चांगलं माहीती आहे, की लोकं गरीब आहेत, त्यांचा सिनेमा पाहण्यातला  उत्साह पण माहीत आहेच, मग  जर मतं हवे असेल , तर प्रत्येकाला कलर टिव्ही द्या, म्हणजे  उपाशी पोटी स्वप्नांच्या रंगीत दुनियेत सगळे मश्गुल राहून त्यांचे इतर ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल, आणि मते मिळतील. एका भागातल्या केबल ऑपरेटरने जर निवडून आलो, तर सगळ्यांना दोन वर्ष केबल टिव्ही फुकट देण्याचे मान्य केले होते- आणि तो निवडून पण आला . हे सगळं उघड सुरु आहे, आणि म्हणे भारतात लोकशाही आहे.

कदाचित आठवत असेल, तो राजकुमार नावाचा एक कन्नड अभिनेता जेंव्हा विरप्पन ने पळवून नेला होता, तेंव्हा सरकारवर त्या विरप्पनला काय हवं ते द्या, पण राजकुमारला सोडवा म्हणून प्रेशराइझ करण्यात आलं होतं.  नंतर हाच राजकुमार जेंव्हा म्हातारा होऊन मेला, तेंव्हा संपूर्ण कर्नाटकात जाळपोळ, दंगली झाल्या होत्या.  बरं, हा अभिनेता मेला ह्याचे कारण ’नैसर्गिक मृत्यु’ असे असतांना सुद्धा जाळपोळ झाली.!!

व्यक्ती पूजा जितकी दक्षिण भारतात आहे, तितकी कुठल्याही राज्यात नाही. हल्ली महाराष्ट्रातही हे लोण हळू हळू पसरत चाललंय. इथे कुठल्याही ’एका पक्षा ’बद्दल मी बोलत नाही, तर कुठल्याही पार्टीच्या नेत्याची हीच परिस्थिती आहे.

एखाद्या नेत्यावर अंधविश्वास ठेऊन त्याचे मागे स्वतःची अक्कल गहाण ठेऊन  ’मेंढरा प्रमाणे’ चालत जाणारे कार्यकर्ते  आणि त्यांचे चमचे  पाहिले की खरंच फार वाईट वाटते. बरेचदा तर आपण लोकशाहीला लायक आहोत का असाही प्रश्न पडतो.

इथे नेत्यांना ’सुपर ह्युमन’चा दर्जा देऊन त्याच्या समोर लोटांगण घालण्यापासून तर त्यांच्या चप्पल उचलण्या पर्यंत कामं करण्यात ह्या ज्युनिअर किंवा होतकरू नेते( थोडक्यात चाटुगिरी करणाऱ्या )लोकांना कमीपणा वाटत नाही.

नुकतीच एक बातमी वाचली होती, की  रामानंतपुरम जिल्ह्यातील २७ वर्षाची एक दोन मुलींची आई असलेली तरूणी! तिचं नांव संगीता ! एकेकाळी २०० च्या वर चित्रपटात काम करणाऱ्या आणि आज सी एम असलेल्या  जयललीता या नटीची ही संगीता भक्त!!    जयललिताच्या विजयासाठी या संगीताने म्हणे नवस बोलला होता, की जर जयललिताची पार्टी निवडणुकीत   जिंकली , तर ती आपली जीभ देवा समोर कापून  वाहील.

जयललिताची पार्टी मेजॉरीटीने इलेक्शन जिंकली, आणि मग संगीताने ठरवल्याप्रमाणे देवासमोर  आणि हजारो लोकांच्या साक्षीने आपली जीभ कापून देवाला वाहिली. इतका अविवेकी मूर्खपणा कोणी करू शकेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. दुसरं म्हणजे, इतके लोकं समोर असतांना कोणी तिला अडवले कसे नाही हा पण प्रश्न आहेच.

ही संगीता   नवऱ्याने सोडलेली आहे, आणि आपल्या दोन मुलींच्या सोबत रहाते . तिच्या बद्दल जयललिताला कळल्यावर जयललितांनी तिला नोकरी  आणि एक लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. तसेच तिचा उपचार एका प्रायव्हेट दवाखान्यात करण्याचा खर्च पण दिलेला आहे.

मला हा प्रश्न पडतो, की हे संगीताचे असे करणे, आणि त्या घटनेचे उदात्तीकरण करणे कितपत योग्य आहे?? मिडीयाने पण या प्रकारणाचे भरपूर भांडवल करून त्या संगीताला मद्रास मधे  तर ’हिरोईन’ बनवले आहे.    हे पाहिल्यावर  पुढेही अशाच घटना अजून जास्त प्रमाणात होण्याची शक्यता वाढेल ह्यात काही संशय नाही.

त्या संगीताला नोकरी देण्यापूर्वी एखाद्या सायकीऍस्ट्रीस्ट ची आवश्यकता आहे !  तिच्या मानसिक अवस्थेची पूर्ण पणे तपासणी करून तिच्यावर औषधोपचार  करणे जास्त गरजेचे वाटते .केवळ संगीताच नाही, तर या घटनेचे उदात्तीकरण करणारे सगळे  जण  मानसोपचार तज्ञा कडे गेले तर ते  जास्त योग्य ठरेल.

  या सगळ्या प्रकरणातून  अशाच ’मानसिक दृष्ट्या कमजोर ’लोकांना  कुठला  संदेश दिला जातोय??जीभ कापा, आणि   नोकरी  व एक लाख मिळवा????