दहा मिनिटात कवी व्हा..

Written by  on January 27, 2005

नेट वरून

फेसबुक वर कविता पोस्ट करण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढलंय. मुलींना   आपण किती संवेदनशील आहोत  हे दाखवायचं असेल तर चारोळी किंवा कवितेला पर्याय नाही, हे आजकालच्या तरूणांनी  ओळखलेलं  आहे म्हणूनच प्रत्येक तरूण कवी  बनण्याचा प्रयत्न करतो.  मंगेश पाडगांवकरांनी जे कवितेला वृत्त छंदाच्या जोखडातून बाहेर काढलं , त्या मुळे तर मुक्तछंद कवींचा सुळसुळाट झाला आहे,  हे जरी खरं असलं  तरी पण वृत्तबद्ध कविता आणि गझल मधला गोडवा काही औरच!

कवितेचा सगळ्या पॉप्युलर प्रकार  म्हणजे चारोळी. चंद्रशेखर गोखल्यांनी या चारोळ्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. शब्दांवर  प्रभुत्व असलेले चंद्रशेखर गोखले हे चारोळ्यांचे अनभिषिक्त राजे!  त्या मूळे जरी तुम्हाला वृत्तबद्ध कविता येत नसतील , तरीही नाराज होण्याची आवश्यकता नाही, चारॊळी हा प्रकार नक्कीच लिहून पाहिला जाऊ शकतो. अर्थात, त्या साठी तुमची कल्पना शक्ती उच्च कोटीची असायला हवी, नवनवीन कल्पना सुचायला हव्या. बरेच असे लोकं असतात की जे हुशार आणि उच्चशिक्षित जरी असले तरी साहित्याच्या  बाबतीत  ’ढ’  असतात. त्यांना कविता करण्या साठी  सगळ्यात मूल भूत गरज असलेले वृत्ताचे ज्ञान, वगैरे नसते, आणि  मुक्तछंद कविता करण्यासाठी शब्दांचे भांडार पण  नसते.    आता अशा लोकांनी काय बरं करावे?

तरूण मुली जात्याच थोड्या जास्त संवेदनशील असतात, त्यामुळे त्या  कविता या प्रकारात बऱ्याच रममाण होतात- आणि म्हणूनच मुलं पण  कवी होण्याचे स्वप्न पहात असतात. मुलांनाही वाटतं , की आपणही कविता कराव्या म्हणजे मनाचा संवेदनशील भाग जगापुढे ( मुलींच्या समोर ) दाखवता येऊ शकेल, पण लिहायला बसलं की काय करावं , कसं लिहावं हेच समजत नाही, म्हणून  आजचा हा लेख अशा होतकरू कवींसाठी- “दहा मिनिटात कवी कसे बनावे?”{ एका सर्व्हे नुसार (मी केलेल्या) }८५ टक्के मुलं ही केवळ मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कविता फेसबुक वर पोस्ट करतात, आणि त्या पैकी ९० टक्के या चोरीच्या असतात..)कवी  होण्यासाठी  काही फारसं करावं लागत नाही. दहा मिनिटात कवी कसे बनायचे याचे सोपे उपाय सांगतो.

पहिला उपाय म्हणजे जर तुम्हाला आपण  काही प्रस्थापित कवी, गझल लेखकांना  फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना आपल्या मित्रांच्या लिस्ट मधे सामील करून घ्या, म्हणजे त्यांचे अपडेट्स वेळोवेळी पहाता येतील. त्या मधे हमखास  उत्कृष्ट कविता सापडतील, त्या कविता तुम्ही आपल्या भिंतीवर आपली कविता म्हणून चिकटवू शकता. फेसबुक वर  पोस्ट करताना ज्याची कविता चोरली आहे  त्या मित्राला  दिसणार नाही अशी पोस्ट करू शकता( फेस बुक मधे तशी सोय आहे). आमचे मित्र धोंडॊपंत आपटे ( उत्कृष्ट गझल लेखक ), चंद्रशेखर गोखले (चारोळीकार), तर अशा चोऱ्यांनी खूप जेरीस आलेले आहेत. आणि परवा तर पंतांनी या चोरांना वैतागून चक्क एक स्टेटस टाकला  :- तो असा ,

सभोवती हे चोर तरी तू नकोस सोडू वाटेला
तुझी पौर्णिमा रोजच असता का घाबरशी अवसेला
कस सोन्याचा आहे त्याला लोखंडाची का भीती
सांग ’अगस्ती’ चोर कोणता चोरू शकतो प्रतिभेला?

कविता जरी चोरली, तरीही आपली प्रतिभा कोणी चोरू शकत नाही . पॉझिटीव्ह थिंकिंग म्हणतात ते यालाच.

दुसरा उपाय  म्हणजे गुगल सर्च मधे जाऊन  इंग्रजी   कवींच्या कविता शोधा, त्यातल्या त्यात रोमॅंटीक कविता जास्त चांगल्या, कारण त्यांना फेसबुक वर जास्त लाइक मिळतात.  त्यांचे मराठी मधे भाषांतर करून आपली कविता म्हणून आपल्या भिंतीवर चिकटवू शकता.  गुगल ट्रान्सलेट मधे इंग्रजी कविता हिंदी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय  भयंकर होते , तेंव्हा इंग्रजी ते हिंदी भाषांतर केल्यानंतर  त्याचा अर्थ नीट जाणून घ्या , आणि एकदा तो अर्थ व्यवस्थित समजला की  तेच शब्द  मराठी मधे  भाषांतर करुन आपली कविता तयार करा.

हिंदी मधे पण उत्कृष्ट कविता आहेत. इंटरनेट वर असे बरेच हिंदी कवितांचे ब्लॉग आहेत , त्या ब्लॉग वरच्या हिंदी कविता  पण खूप छान असतात. मराठी लोकं हिंदी ब्लॉग च्या वाटेला पण  जात नाहीत, म्हणून त्या कविता मराठी मधे ट्रान्सलेट करून आपल्या पोस्ट वर टाकू शकता.  इथे थोडं डोकं वापरून स्वतःचे शब्द वापरले तर कविता चोरीची आहे हे कोणालाच समजणार नाही.

हिंदी गाणी बरीच आहेत . इ.स. १९५० ते १९८० च्या कालावधी मधली गाणी फारच उत्कृष्ट भावपूर्ण असायची, त्यांची शब्दरचना पण अप्रतिम असायची. हिंदी गाण्य़ांची शब्दरचना  इंटरनेट वर शोधा, बऱ्याच साईट्स आहेत अशा गाण्यांच्या शब्दरचना  देणाऱ्या. त्यातल्या एखाद्या गाण्याचे मराठी मधे भाषांतर करा आणि करा पोस्ट आपल्या भिंतीवर! मी तुम्हाला खात्री देतो की हे कोणीही ओळखू शकणार नाही. माझा एक मित्र  आहे  कौस्तुभ नाबर   नावाचा, त्याला खूप हिंदी गाणी पाठ होती,  आणि त्याची अजून एक खासियत म्हणजे कुठल्याही कागदावर न लिहिता मनातल्या मनात भाषांतर करून शिघ्र कवी प्रमाणे तो पटापट कविता म्हणून दाखवायचा.  खूप वर्ष आम्हाला त्याची ही ट्रिक समजत नव्हती. हे अर्थात दिसतं तितकं सोपं नाही, त्या साठी शब्दांचं भांडार तुमच्याकडे असायला हवे, ते टॅलंट कौस्तुभ कडे होतं, म्हणून तो करू शकायचा, पण तुम्ही कागद पेन घेऊन बसा आणि करा प्रयत्न!

जुन्या काळी म्हणजे १९२०- ते ५० च्या काळात वृत्तबद्ध कवितांचे बरेच संग्रह निघाले होते. रद्दीच्या दुकानात गेल्यास कोपऱ्या मधे बेवारस पडलेले असे बरेच कवितासंग्रह दिसतील, त्या मधले एखादे जुने पुस्तक उचलून त्यातली एखादी कविता शब्दशः पोस्ट करा- ती कविता कोणी वाचलेली असण्याची शक्यता जवळपास नसते.ज्याची कविता आहे, तो काही तुमच्यावर आक्षेप घेण्यास जिवंत नाही, म्हणजे ती कविता इंटरनेट वर तुम्ही आधी पोस्ट केली म्हणजे तुमच्या मालकीची आहे, असे म्हणून तुम्ही कधीही भांडणं करू शकता.

नाटकिंग कोल नावाचा एक गायक होऊन गेला. त्याची रोमॅंटीक गाणी जसे” पुट युवर स्विट लिप्स निअर फोन , लेट्स प्रिटेंड वी आर टुगेदर..” वगैरे शब्दशः भाषांतरासाठी एकदम योग्य आहेत. सरळ सरळ शब्दशः भाषांतर जरी केलं तरी खपून जाऊ शकेल.

शेवटचं म्हणजे, फेसबुक वर बरेच कवितांचे गृप आहेत, शक्य तितके जास्त ग्रूप जॉइन करा आणि तिकडच्या कविता  स्वतःच्या वॉल वर पोस्ट करा. जर मूळ लेखक भांडायला आला तर त्याला ब्लॉक करा.. 🙂

तर मंडळी अशा तऱ्हेने तुम्ही केवळ दहा मिनिटात कवी होऊ शकता . हा लेख  लिहीण्याचा प्रयत्न केलाय, कारण माझे बरेचसे लेख  फेसबुक वर काही लोकं स्वतःच्या नावे पोस्ट करताहेत. एक डार्क ह्युमर म्हणून लिहीण्याचा केलेला प्रयत्न, कितपत जमलाय तुम्हीच ठरवायचं.

चोर

Written by  on January 22, 2005

परवा रात्री म्हणजे नागपूर हून परत आलो. नेहेमी प्रमाणेच रात्री विमान जवळपास दीड तास मुंबईवर घिरट्या घालून खाली उतरले. आधीच उशिरा असलेली फ्लाईट  रात्री चक्क १२.३०  वाजता मुंबईला उतरली.   रिक्षा घेऊन घरी निघालो तर घर  साधारण पणे अर्धा किमी  असताना   रिक्षा बंद पडली. थोडा वेळ वाट पाहिली की रिक्षा सुरु होईल म्हणून, पण  ती सुरु होत नाही हे लक्षात आल्यावर , रिक्षावाल्याला तिथेच पैसे देऊन आपली लॅपटॉपची बॅग पाठकुळीला अडकवून आणि कपड्यांची हातात धरून घराच्या दिशेने पायीच चालू लागलो.

साधारण पाच एक मिनिटानी घरी पोहोचेल इतक्या अंतरावर पोहोचल्यावर २५ एक वर्षाचा एक तरुण पुढे आला , आणि हात समोर करून  “दोन रुपये देना साब” असं   म्हणाला.  त्याच्याकडे लक्ष गेलं, आणि लक्षात आलं, की जर या धिप्पाड माणसाने अगदी चार इंची चाकू जरी समोर धरला, तरी पण मी जवळ जे काही असेल ते त्याला काढून दिलं असतं. शेवटी जीवापेक्षा पैसा महत्वाचा नसतोच कधी.जवळचे पाच रुपयाचे नाणे काढून दिले, आणि  ते घेऊन  तो समोरून निघून गेला.

मी पण घरी पोहोचलो, तो भिकारी निघुन गेला,  पण मला मात्र त्या भिकाऱ्याला  “कुछ लेते क्युं नही?” च्या तालावर विचारावसं वाटत होतं की “चोरी क्युं नहीं करते भाई? भिक क्यों मांगते हो?” कदाचित माझे हे विचार तुम्हाला मूर्खपणाचे वाटत असतील , पण प्रामाणिकपणे सांगतो, त्या क्षणी आणि तेंव्हापासून मला तसंच  वाटतंय. एखाद्या धडधाकट भिकाऱ्याला पाहिले की “कुछ  काम करो, भिक क्युं   मांगते हो?   म्हणणारे बरेच लोकं असतात , पण मला मात्र  इतकी धिप्पाड शरीरयष्टी असतांना पण मला दोन रुपये मागायचा करंटेपणा करणाऱ्या त्या भिकाऱ्याची मला किव आली. त्या भिकाऱ्याने मला भिक  मागण्यापेक्षा   मला धमकी दिली असती, तर त्याला माझ्या दोन अंगठ्या अंदाजे ६० हजार रुपये आणि चेन ३० हजार रुपये अशी लाखभर रुपयांची मालमत्ता मिळाली असती.   असो. तेंव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न सारखा उसळ्या मारतोय. की का बरं???????????????

तर चोर! चोर कोण असतो हो?? मला तर वाटतं की,  प्रत्येकच माणुस हा  चोर असतो. आता हे वाक्य वाचल्यावर  प्रत्येकालाच आपण कधीतरी केलेली चोरी आठवेल. कधीतरी घरचे आईच्या पर्समधले पैसे (चोरून) घेऊन न सांगता खाल्लेली भेळ पुरी  , किंवा लहानपणी मारुतीच्या देवळात शनिवारी समोर कोणीतरी नारळ फोडून  प्रसाद म्हणून ठेवला की  इकडे तिकडे पहात कोणी पहात नाही याची खात्री करून उचलून तोंडात टाकलेला  तो नारळाचा तुकडा, ही  लहानपणीची  आठवण  किंवा अशा असंख्य आठवणी येतील तुमच्या मनात  पण ! आईने भाजी आणायला सांगितली की घरी आल्यावर पाच रुपये पाव आणलेली वांगी घरी येईपर्यंत आठ रुपये करून वरचे तीन रुपये कंची मारणे  म्हणजे चोरी का??  ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी ना कधी तरी केलेल्या असतातच ,अर्थात काही अपवादात्मक लोकं असतील न करणारे, पण मी मात्र खरंच केल्या आहेत अशा गोष्टी.

शाळेत असतांना वर्गात एक मुलगा होता त्याचे वडील लायब्ररीयन होते, आमच्या लहानपणी कव्हर लावायला वर्तमान पत्र वापरले जायचे . ब्राऊन पेपर विकत आणून लावणे वगैरे नव्हते. तर त्या मित्राचे वडील लायब्ररीयन असल्याने, त्याच्या वह्यांना मस्तपैकी गुळगुळीत इम्पोर्टेड मासिकाच्या कागदांची कव्हर्स असायची, आणि त्यामुळे त्या मित्राबद्दल कायम एक असूया वाटायची. एका मित्राचे वडील तहसील कार्यालयात क्लर्क होते , त्याची रफ वही म्हणजे एकीकडून लिहिलेली तहसील ऑफिसची कागदं- आणि तसे कागद आपल्याकडे नाहीत म्हणून वाटणारी असूया-  किंवा काय असेल तो भाव की ज्याला काय म्हणावं हे मला समजत नाही! एका मित्राच्या घरी  स्टेपलर, आणि परफोरेटर ( भोक यंत्र, किंवा पंचींग मशीन )  पण त्याच्या वडलांनी ऑफिसमधून घरी आणून ठेवलेलं होतं. पेन्सिली, पेन वगैरे ऑफिसमधून आणलंय माझ्या वडलांनी म्हणून  अभिमानाने सांगणारी लहानपणीची मित्रमंडळी अजूनही लक्षात आहे- आणि आपले बाबा असं का करत नाहीत याची खंत पण होतीच मनात. इथे जे शाळेतलं लिहितोय, तो काळ म्हणजे साधारण १९६६ – १९७७ पर्यंतचा आहे हे लक्षात घ्या , म्हणजे जे काही लिहीलंय ते आऊट ऑफ  प्लेस वाटणार नाही.

मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती, ती अजूनही आहेच. खूप काही पुस्तकं वाचली आहेत मी.  पण हल्ली डॊळ्य़ांना दुर्बिणीच्या काचांप्रमाणे +३ चा चष्मा लागल्यापासून मात्र वाचनाचा जाम कंटाळा येतो. लहानपणी जे शब्द वाचले ते सगळे मनात नाचत असतात. मला वाटतं मी इथे जे काही लिहीतो, ते माझं लिखाण नाहीच. किंबहुना    शब्द पण माझे नाहीत, वाक्य पण नाहीत, काहीच माझे नाही. मी फक्त जे शब्द लहानपणापासून शिकलो, वाचले आहेत तेच पुन्हा मागे पुढे करून  त्यांची वाक्य बनवून माझे मनातले विचार मांडण्यासाठी इथे लिहीत आसतो .

जन्म झाला तेंव्हा मला फक्त एक भाषा येत होती- ती म्हणजे रडण्याची. आईने शिकवलेले शब्द- आई, बाबा, काका ,मामा शिकता शिकता ते शब्द मी माझा मालकी हक्क नसतांना “माझे” समजू लागलो.नंतर शाळे मध्ये गेल्यावर शिकलेले नवीन शब्द, नवीन भाषा, चौथीत असतांना मित्रां कडुन शिकलेले ते अश्लिल शब्द स्त्रीपुरूषांच्या  गुप्तांगाची  नावं, आणि नंतर ती नावं आपण का शिकलो म्हणून वाटणारा ओशाळलेला पणा हे पण मला आज आठवतंय. पहिल्यांदा ते शब्द जेंव्हा समजले, तेंव्हा घरी आल्यावर खूप गिल्टी वाटत होतं . आपण काहीतरी वाईट शिकलोय याची जाणीव होती, पण त्याच सोबत ’ते शब्द’ माझे नाहीत, म्हणून वाटणारा एक प्रकारचा मानसिक संतोष पण होता.   अशा अनंत गोष्टी आहेत ज्या ’माझ्या’ नाहीत पण ’मी’ वापरतोय.   म्हणून म्हणतोय, इथे जे काही लिहीलंय ते शब्द जरी मी लिहित असलो तरी ते माझे नाहीत – पण मी वापरतोय तर मग  त्याचा अर्थ मी शब्द चोरलेले आहेत असा अर्थ होतो  – नाही का?

मला एक सांगावसं वाटतं, की सगळे शब्द जे आहेत ते आपले नाहीत, शब्द हे शब्द आहेत , अगदी कोणाच्याही मालकीचे नसलेले, आपण फक्त इथे त्यांची फक्त रचनाबदलतो.

तर त्या रात्री भेटलेल्या भिकाऱ्याने माझ्याकडून पैसे का चोरले नाहीत, किंवा मला धमकावून माझ्याजवळ असलेले  पाकीट, सोनं वगैरे का हिसकावून घेतलं नाही? हा प्रश्न मला अजूनही छळतोय.

चोरी म्हणजे नेमकं काय? जे आपलं नाही, ते त्या गोष्टीच्या मालकाला न विचारता आपण वापरणं म्हणजे  चोरी ही व्याख्या जर बरोबर असेल ,तर आपण सगळेच चोर आहोत असा होत नाही का? मग हे शब्द पण तर आपल्या मालकीचे नाहीत , तरी पण आपण वापरतोच ना??

असो.. संपवतो इथेच. माझ्या मनातलं द्वंद्व इथे लिहून तुमच्या मनात विचार श्रुंखला सुरु झाली असेलच.. तेंव्हा फक्त एकदा या होळीच्या दिवशी -ब्लॉग वरचे साहित्य चोरणाऱ्यांच्या बैलाला होSSSSSSSSSSSSSS   म्हणून एक बेंबीच्या देठापासून बोंब मारून , आणि होळीच्या शुभेच्छा देऊन  हा  लेख संपवतो.

सुनीताबाई देशपांडे

Written by  on January 14, 2005
 Sunitabai Deshpande

सुनिताबाई देशपांडे

एकदा न्यु माजरी कोल फिल्डस मधे काम होतं म्हणुन वरोऱ्याला जाणं झालं. कामाच्या निमित्ताने का होईना, पण वरोऱ्याला जाणं झालं की बरं वाटतं. असं म्हणतात की जिथे तुमची नाळ गाडली गेली असते तिथे तुम्हाला नेहेमीच जास्त कम्फर्टेबल वाटतं. वरोऱ्या बरोबरच्या माझ्या बऱ्याच सुंदर आठवणी आहेत  लहानपणीच्या , म्हणून वरोऱ्याला जायचं म्हट्लं की इतका आनंद होतो की  “पंछी बनु… ” म्हणट नाचावसं वाटतं….

नागपुरला सकाळी पोहोचल्यावर, विमानतळावरुन टॅक्सी करुन न्यु माजरीला निघालो. वेस्टर्न कोल फिल्ड्स मधे मिटींग होती १२-३० ला . कामं आटोपून परत येतांना बाबा आमटेंना भेटुन यावं म्हणुन आनंद वनाकडे मोर्चा वळवला.न्यु माजरी पासुन खूपच जवळ म्हणजे फार तर १०-१५ किमी असेल आनंदवन. त्या काळी बाबांची तब्येत थोडी नरम गरमच होती. त्यांना नमस्कार केला, आणि म्हट्लं.. ’बाबा मी आप्पाजींचा नातु’ .. अस व्हय.. कोणाचा रे तु?? म्हंटलं सुहास चा मोठा मुलगा .. एकदम ओळखल्याचं ह्सूं आलं चेहेऱ्यावर. बाबांचं गावातलं घर आमच्या अजोबांच्या घरा शेजारचं..

शेजारीच कृष तरी पण ट्रेडमार्क चष्म्यामुळे भाई पण बसले होते पण, क्षणभर विश्वासच बसला नाही..  इथे पुलं कसे काय हा प्रश्न मनात आला.    बाजुला सुनीता बाई  बसल्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य पाहून बरं वाटलं. खादीची साडी, गळ्यात काळ्या मण्यांची माळ आणि बस्स!!इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांच्याकडे  पहातच राहिलो  .   पुलं ना आणि  शेजारच्या सुनिता बाईंना  पण नमस्कार केला. ही माझी पुलंची पहिली आणि शेवटली भेट – अगदी अनपेक्षित झालेली .तसंही आहे मनोहर तरी वाचल्यामुळे सुनिताबाईंची थोडी ओळख झालेलीच होती .   एकदा आत्मचरित्र लिहिलं की तुमच्या जिवनातले बरेच बरे वाईट प्रसंग लोकांना समजतात, आणि तुमच्या बद्दल एक आपलेपणा निर्माण होतो लोकांच्या मनात. अगदी हेच झालंय सुनीताबाईंच्या बाबतीत.

काल सुनीता ताई गेल्या म्हणून एक मेसेज टाकला होता सागरने.आधी मला समजलंच नाही की कोण सुनिता ताई ते. नंतर संध्याकाळी त्यावर आनंदचं उत्तर होतं की सुनीताबाई देशपांडे.. आणि ते वाचल्यावर एकदम धक्काच बसला, आणि त्यांच्या भेटीचा हा प्रसंग आठवला- आणि  खुप वाईट वाटलं.आणि सुनिताबाईंना तर प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.. त्यामुळे   कॊणी आपल्या जवळचं माणुस गेल्याप्रमाणे वाटलं. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. !!अतिशय निःस्वार्थ आणि समाजाशी नाळ जुळलेलं दांपत्य म्हणून पुलं आणि सुनिताबाई कायम स्मरणात रहातील.

राहुल गांधींची मुंबई भेट

Written by  on January 10, 2005

मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता वगैरे नाही. पण जेंव्हा ह्या बातमी कडे एका त्रयस्थाच्या भूमिकेतून पहातो तेंव्हा जे काही वाटलं ते इथे लिहितोय.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/02/rahul.jpg)

राहुल मुंबई लोकल मधे

आवाज कुणाचा?????? शिवसेनेचा…. असं म्हणत आरोळ्या ठोकणारा  शिवसैनिक आज काल दिसेनासा झालाय.   ढाण्या वाघ   आरोळी देतो, पण त्या कडे एखाद्या सर्कसमधल्या पिंजऱ्यातल्या वाघाच्या ओरडण्यासारखे जसे लक्ष दिले जात नाही, तसे यांच्या दमबाजी कडे लोकं अजिबात लक्षच देत नाहीत असं काहीसं होतंय हल्ली. राहुल गांधी सारखा कच्चा बच्चा पण या कडे दुर्लक्ष करुन मुंबईला येतो आपली सभा आटोपून परत जातो आणि  आपल्या स्वतःच्या राजकीय स्थैर्याचा पुरावा देतो.

नुसत्या पोकळ घोषणांचा तर आता अगदी कंटाळा आलाय. मराठी माणुस मूलतः सोशीक, नम्र आणि एखाद्याला नेता मानले, की  स्वतःचा  विचार न करता  जो नेता म्हणेल तसंच वागणारा अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे- पण ती खरी आहे का?? मला तरी तसं वाटत नाही – इथे लोकं विचार करतात तुम्ही काय म्हणता त्यावर , फक्त दुर्दैव इतकंच की ते मतदान करायला जात नाहीत.!

राहुल आला, त्याने चक्क ट्रेन ने प्रवास केला अंधेरी ते घाटकोपर पर्यंत- जे धाडस आजपर्यंत कुठल्याही नेत्याने ( उध्दव , राज, बाळासाहेब तर आता वय झालंय म्हणा किंवा गेला बाजार कॉंग्रेसचे नेते – गोविंदा सोडून , पण तो गोविंदा नेता आहे का हो??) केले नाही ते त्याने करुन दाखवले. आता शिवसेनेला घाबरुन त्याने असं केलं असा जर उध्दवचा गैर समज असेल तर शिवसेनेने खुशाल तसे समजावे- पण त्याने दाखवून दिलं की  तो जे बोलला त्या नुसत्या पोकळ वल्गना नव्हेत .

ज्या प्रमाणे राजीव गांधींनी सुरक्षा व्यवस्था बाजुला ठेवून सामान्य लोकांच्या जवळ जाउन त्यांच्या मधे मिसळून वागणं सुरु केलं होतं, अगदी त्याच प्रमाणे, अतिशय पद्धतशीर पणे त्याने लोकल ट्रेनने प्रवास करुन लोकांना एक आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

उध्दवच म्हणणं की आमचे कार्यकर्ते असलेला रस्ता त्याने घाबरुन चुकवला आणि तो लोकलने गेला- असं समजून स्वतःची पाठ थोपटून घ्यायला बरं वाटत असेल तर उध्वस्त तसे अवश्य समजावे.( प्रत्येकालाच हस्तिदंती मनोऱ्यात रहाण्याचा अधिकार आहेच) .

बरं शिवसैनिक इतके का कमी झाले आहेत  की रेल्वे प्लॅटफॉर्मवर, ट्रेन मधे , दादर प्लॅटफॉर्म वर सगळे लोकं राहुल गांधी की जय चा नाराच लावत होते. एकही माणुस किंवा गृप असा दिसला नाही की ज्याने राहुल गांधी मुर्दाबाद म्हणून नारा लावला असेल. याचा अर्थ रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर एकही शिवसैनिक नव्हता असा घ्यायचा का? आणि जर असं असेल तर……….

आजचे पेपर वाचतांना खुप मजा वाटली. मटा मधे उद्धव म्हणतो ( आजकाल तर तो काहीही बोलतो.. कायम असा कन्फ्युज्ड स्टेट मधे असल्या सारखाच असतो म्हणा तो – जसे दोन दिवसा पूर्वीच राहुलला म्हणाला होता, की काश्मीरच्या लाल चौकात जाउन तिरंगा फडकवून दाखव वगैरे .आता माझ्या सारख्या सामान्य माणसाला हे काश्मीर कुठुन मधे अचानक उगवलं असं वाटू लागलं?? तेवढ्यातच पुन्हा एक बातमी वाचली- राहुल ला म्हणावं( कोणी म्हणावं???) की काश्मिरात पण कुणालाही जाउन रहाण्याचा अधिकार आहे असं म्हणून दाखव- ( कलम नं ३७० आहे हे विसरला की काय ?) असो. आम्हाला इतके निर्बुद्ध नका हो समजू, की तुम्ही काहीही बोलाल, आणि आम्ही त्यावर डॊळे मिटून विश्वास ठेउ..   इथे हे जसे तमाशामधे सवाल जवाब चालतात , त्या लेव्हलचे सवाल वाचलं की आम्हाला मळमळते हो हल्ली.. बस करा आता अशी फालतू निरर्थक कॉमेंट्स!!

मध्यंतरी रेडीओ मिर्ची  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/12/17/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80/)नावाचा लेख लिहिला होता – त्या लेखावरची शेवटची कॉमेंट वाचा -सौरभ पंची ची….. त्या नंतर त्याच संदर्भात मी स्वतः आणि इतर काही लोकांनी   मनसे- शिवसेनेला पत्रं पाठवली होती.  एकाही पक्षाने या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक समजले नाही – अजुजूनही व्होडाफोन वाले मराठीत बोलत नाहीत, किंवा एफ एम वर एकही  जॉकी मराठीत बोलत नाही.

माझं असं मत झालेलं आहे की  निवडणुका जशा जवळ येऊ लागतात, तसा या राजकीय लोकांचा मराठी माणसावरच्या प्रेमाचा पुळका जास्तच वाढतो.  अतिशय  वाईट वाटतं की राजकीय  पक्षांना काहीतरी राजकिय लाभ असल्याशिवाय   मराठी प्रेम दाखवुन द्यायची इच्छा होत नाही.

मुंबई कुणाची?? हा अगदी बालिश प्रश्न आहे. हे असे प्रश्न उभे करुन लोकांमधे दूही माजवणं हेच राजकीय पक्षांचं काम आहे. इथे समजा असं म्हंटलं की मुंबई सगळ्यांची- तर काय फरक पडतो?? किंवा समजा असं म्हंट्लं की मुंबई मराठी माणसाची तरीही काय फरक पडतो?? नुसत्या फुकाच्याच बोलण्याने जर मुंबईची मालकी मिळत असेल तर ठीक आहे.. नाहीतर काहीही अर्थ नाही या असल्या घोषणा बाजीला.

राहुल गांधीची बिहारातली कॉमेंट पण एकदम पोरकट होती,  आणि आवश्यकता नसलेली होती. तेंव्हा तर एक राजकीय नेता असं वक्तव्य कसं काय करु शकतो म्हणून खूप राग आला होता.अजिबात राजकीय प्रगल्भता नसलेला एक नेता काहीतरी बोलतोय असं वाटलं होतं..  मला तर खात्री होती की इथे म्हणजे मुंबईला आल्यावर तो नक्कीच मुंबई पोलिसांची वाह वाह करेल, पण इथे आल्यावर पण त्याने त्याला त्याची आवश्यकता वाटली नाही याचं वाईट वाटलं. कमीत कमी इथे आल्यावर त्याने शहीद झालेल्या मुंबई पोलिसांच्या शौर्याचा उल्लेख करायला हवा होता.

एक सिनेमा होता शाहरुख खानचा , चक दे इंडीया. त्यामधे तो सीन आठवतो?? मला खुप आवडला होता-जेंव्हा सगळ्या खेळाडूंना तो आपली ओळख सांगा म्हणतो तो सीन??  तेंव्हा सगळ्या मुली आपापल्या स्टेटचं नांव घेउन त्या स्टेटची आहे  असं सांगतात पण फक्त एकच मुलगी म्हणते मी भारताची …… जो पर्यंत ही राष्ट्रीयत्वाची भावना येणार नाही, तो पर्यंत विकास अवघड आहे.

शाहरुख खानच्या बाबतीत पण शिवसेनेने असंच काहीतरी म्हंटलं होतं की आम्ही माय नेम इज खान इथे लागु देणार नाही वगैरे वगैरे….. पण झालं काय़?? शेवटी ही पण एक फुसकी दम बाजी ठरली.शाहरुख म्हणतो मी माफी कशाबद्दल मागू?? शिवसेनेला आता शाहरुख, अमिताभ सारखे पण सिरियसली घेत नाही हल्ली!!!

एक शंका आली मनामधे, सध्या विदर्भात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही होत आहेत. मला तरी एकही शेतकरी किंवा गरीब मराठी कामगार इथे रस्त्यावर फुटपाथ वर येउन राहिलेला दिसत नाही. उलट तो आपल्याच भागात राहुन आत्महत्या करतांना दिसून येतं.इथे येणारे आणि फुटपाथ वर रहाणारे केवळ युपी आणि बिहारचेच कां असतात? याचं कारण एकच , मराठी शेतकऱ्यांमधे असलेला स्वाभिमान.. नुसता नारायण सारखं (विदर्भातले शेतकरी दारु पिऊन आत्महत्या करताहेत म्हणणारा अती शहाणा (???) माणुस) पार्टीचं नांव स्वाभिमान ठेऊन तो येत नसतो.. तो अंगी असावा लागतो त्या शेतकर्यांसारखा हे नार्याला कधी कळणार?). म्हणून ते इथे मुंबईला येत नाहीत.

मुंबई मधे हे लोकं येउन रहातात, झोपड्या बांधतात- एक प्रश्न आहे, जर सरकारने ठरवलं की इथे मुंबई मधे झोपड्या वाढू द्यायच्या नाहीत तर त्यांना इथे रहाणं शक्य  होइल?? सगळेच राजकीय पक्ष ( शिवसेना, भाजप, कॉंग्रेस इन्क्लुडेड) इथे झालेल्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करण्यासाठी हिरारीने प्रयत्न करतांना दिसतातवेळो वेळी आता ९७ पर्यंतच्या झोपड्या रेगुलराइज, मग २००० पर्यंतच्या अशा घोषणा ऐकत असतो आपण . त्यांच्या झोपड्या रेग्युलराइझ करुन , किंवा त्यांना आधी पर्यायी जागा फुकट देऊन त्यांना इथे प्रस्थापित करणारे आपले  निवडुन दिलेले (कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा )नेते गण…. काय म्हणावं तेच समजत नाही. ( त्या ऐवजी त्यांच्या झोपड्या   पाडून टाकुन त्यांना परत  कां पाठवत नाहीत?? किंवा पहिली झोपडी उभी रहाते तेंव्हाच ती हटवली का जात नाही?)

राजकिय नेत्यांनी प्रत्येक वार्डात अशा अनधिकृत लोकांसाठी रेशन कार्ड वगैरे काढून देण्यासाठी  मदत केंद्र उभी केली आहेत.जेंव्हा तुम्ही आम्ही निवडुन दिलेले नेतेच असं करतात तेंव्हा हे बिहारी – यु पी वाले मजुर इथे येतच रहाणार,  झोपडपट्टी बांधत रहाणार. सगळ्या मराठीच्या तारणहार लोकांना आता मराठी माणुस आठवेल तो पुढल्या  इलेक्शनलाच..  आणि …………. जाउ द्या हो. कोळसा उगाळावा तितका काळाच…