वर्ल्ड हेरीटेज चर्च.
आपल्या भारता मधे असलेल्या २८ हेरीटेज पैकी एक सगळ्यात मह्त्त्वाची हेरीटेज वास्तु गोव्याला पण आहे-ती म्हणजे सेंट झेवियर्स चर्च. ह्या चर्च कडे एक हेरीटेज वास्तू म्हणून पाहिले जात नाही , कारण या चर्च मधे ठेवलेली सेंट झेवियर्सची ममी . तिथे पोहोचलो, की केंव्हा एकदा आत जाऊन त्या झेवियर्सच्या ममी ला पहातो असे लोकांना होते, आणि मग १५ व्या शतकात बांधलेल्या त्या सुंदर इमारतीच्या बांधकामा कडे दुर्लक्ष होते.
पोर्तुगीज भारतामधे जेंव्हा आले, तेंव्हा त्यांचा मूळ उद्देश हा धर्मप्रसार करणे इतकाच होता. इथे येऊन सरकार विरोधी असलेल्या किंवा धर्मांतरासाठी नकार देणाऱ्या हिंदूंच्या संपत्ती सरकार जमा करणे , तसेच जर एखादा हिंदू मागे वारस न ठेवता मेला तर त्याची संपत्ती सरकार जमा करणे आणि त्या पैशातून चर्च बांधणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन ते इथे आले होते. एखाद्या हिंदू किंवा मुसलमान माणसाने जर ख्रिश्चन धर्म स्विकारला, तर त्याला अभय देणे , आणि सवलती देणे ही तर जुनी स्ट्रॅटेजी होती. कसेही करून ख्रिश्चन धर्म इथे रुजवाय्चा होता.या चर्च साठी किंवा गोव्यातल्या कुठल्याही चर्च साठी पैसा हा हिंदूंचा वापरला गेलेला आहे. अर्थात ही आहे १४ व्या १५व्या शतकातली गोष्ट!
सगळीकडे नुसता टुरीस्ट लोकांचा गोंधळ दिसतो. काही लोकं हातात मेणबत्त्या धरून किंवा मेणाचे अवयव, जसे हात, पाय वगैरे घेऊन चर्च मधे शिरतांना दिसतात. असे समजले जाते की, मेणाचे अवयव चर्च मधे वाहिले, तर त्या अवयवाचे दुखणे बरे होते. असो.
चर्च चे प्रांगण खूप मोठे आहे.मुख्य म्हणजे चारही बाजूला कंपाऊंड ची भिंत असल्याने कुठलेही अतिक्रमण नाही. जे काही विक्रेते आहेत ते कंपाऊंडच्या बाहेर मेणबत्त्या आणि मेणाचे अवयव विकत बसलेले दिसतात. या रिकाम्या जागेत अक्षरशः वाळवंट असल्यासारखे आहे. तिथे एखादा चांगला बगीचा करून मेंटेन केला तर ही इमारत जास्त सुंदर वाटेल. पण सरकारी मुर्खपणा आड येत असावा.
आत शिरल्या बरोबर ही जागा हेरीटेज वास्तू आहे म्हणून एक पाटी दिसते- त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही खूण दिसत नाही. चर्चच्या समोर तोंड करून उभे राहिले असता उजव्या बाजूला नवीन बांधकाम केलेली ( म्हणण्यापेक्षा प्लास्टर केलेली )इमारत दिसते. या भागात चर्चचे म्युझियम आहे.

डोरीक( डोरियन ) पद्धतीचे बांधकाम
हे चर्च तिन मजली आहे. दुरुन पाहिले तर खूप उंच असलेली पोर्तुगीज शैलीतली एक मोठी इमारत दिसते. सगळेच चर्च असेच असल्याने ही इमारत चर्च ची आहे हे न सांगता लक्षात येते. गोव्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला चिरा ह्या चर्चच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. इतकी उंच असलेली भिंत कुठलाही आधार नसलेली पाहून थोडे आश्चर्य अवश्य वाटते, पण डोरियन आणि कोरिएन्थिएन पद्धतीच्या बांधकामा मुळे हे सहज शक्य झालेले आहे. ह्या दोन्ही ग्रीक बांधकामाच्या फार जुन्या शैली आहे. या मधे खांबांचा आधार घेऊन इमारत उभी केली जाते.जर खांबांचा सपोर्ट नसला ,तर ७८ फुट उंचीची भिंत उभी करणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. या खांबाच्या आधाराच्या प्रकाराचा एक फोटो पोस्ट केलाय .
चर्चच्या समोर उभे राहिले असता चर्चच्या डाव्या बाजूला तीन भिंती परपेंडीक्युलर बांधुन अर्धवट सोडल्या सारख्या वाटतात. पण चर्चची ७८ फुट उंचीच्या भिंतीला आधार देण्यासाठी म्हणून त्या भिंती बांधल्या गेलेल्या आहेत. जर या भिंती बांधल्या गेल्या नसत्या तर कदाचित ही भिंत कधीच कोसळली असती. गोव्याच्या बहुतेक चर्च चा समोरचं एलीव्हेशन असेच आहे. उजव्या बाजूच्या भिंतीला, बांधलेल्या खोल्यांमुळे ( जिथे सध्या म्युझियम आहे ) आपोआपच आधार मिळतो.
चर्च चे पुर्ण बांधकाम हे चिरे वापरून केलेले आहे, पण समोरचा दर्शनी भाग मात्र एक वेगळा बेसाल्ट दगड वापरून बनवलेला आहे. अशा दगडाचा उपयोग राजस्थानात केला जातो. समोरच्या भागाची उंची ७८ फुट आहे. समोरचा भाग चार भागात बनवलेला आहे. खाली मुख्य दरवाजा , नंतर वरच्या म्हणजे दुसऱ्या भागात तीन मोठ्या खिडक्या , आणि सगळ्यात वर गोलाकार तीन खिडक्या आहेत. बेसॉल्ट च्या दगडाच्या वापरामुळे दर्शनी भागास खूप उठाव आलेला आहे. शक्य तितक्या ठिकाणी कोरीव काम केलेले आहे.
हे चर्च साधारण पणे १५ व्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज लोकांनी बांधलेले आहे. या चर्चचे बांधकाम पुर्ण करायला जवळपास दहा वर्ष लागली. भारतातील हे त्या काळचे सगळ्यात मोठे चर्च!गोव्याच्या सेंट पॉल चर्च वर ह्या चर्चचे डिझान बेतलेले होते. पण नंतर काळाचा ओघात सेंट पॉल चर्च नष्ट झाले.
चर्च चा आतला भाग ’मोझॅक कोरींथिय” स्टाइल मधे बनवलेला आहे. या चर्च चे फ्लोअरींग मार्बलचे आहे. १८२ फुट लांब आणि ५६ फुट रुंद असलेला मुख्य हॉल आहे. आत शिरल्या बरोबर उजव्या बाजूला एक कन्फेशन चेंबर ठेवलेले आहे. लाकडी कोरीव काम केलेल हे कन्फेशन चेंबर १६ व्या शतकातील आहे. इथल्या दरवाजाचे कोरीव काम पण अप्रतिम कलाकाराची कलाकृती म्हणता येईल.
वर एक बाल्कनी पण आहे, ज्या मधे उच्चभ्रू लोकं मासेस च्या वेळेस बसायचे, पण सामान्य लोकांसाठी मात्र खाली बसण्याची व्यवस्था केलेली होती. उजव्या बाजूला खूप कलाकुसर केलेली एक लहानशी बाल्कनी दिसते. पूर्वीच्या काळी माईक आणि लाउड स्पिकर सिस्टीम नसल्याने प्रिचिंग करणारा प्रिस्ट त्या बाल्कनी मधे उभे राहून प्रिचिंग करायचा.
समोर सोनेरी मुलामा दिलेली सुंदर भिंत दिसते. वरून जरी ती सोनेरी पत्र्याची भिंत दिसत असली, तरीही ती भिंत म्हणजे भिंतीवर लाकडी कोरीव काम केलेले शिल्प आहे, पण त्यावर सोन्याचा मुलामा दिल्याने लाकूड अजिबात दिसत नाही. त्या चित्रामधे एक खूप लठठ माणूस दाखवला आहे, तो म्हणजे जेरोम मस्करहॅन्स! ह्या मस्करहॅन्सनेच चर्च चे बांधकाम पूर्ण केले होते. त्याची आठवण म्हणून ते शिल्प कोरलेले आहे. त्याच्या बाजूला सेंट इग्नेशिअसची दहा फुट उंचीची प्रतिमा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला सूर्य पण लक्ष वेधक आहे. ही सगळी कलाकुसर ही १६ व्या शतकातली असूनही अजूनही चांगल्या स्थिती मधे आहे.
झेवियर्स चे शव ठेवण्यात आलेली शवपेटी ही व्हलेरिन रेग्नार्ट नावाच्या रोमन कलाकाराच्या डिझानवरून गोव्याच्या कलाकारांकडून फादर मार्सेलो यांनी तयार करून घेतली आहे.६ फुट लांब ३ फुट रुंद आणि तितकीच खोल असलेली ही शवपेटी चांदीने मढवलेली आहे. शव खराब होऊ नये म्हणून आत पुर्ण पणे व्हेल्वेट लावले आहे.
एक सांगावसं वाटतं, की ह्या चर्च मधली प्रत्येक गोष्ट ही खूप सुंदर आहे. चर्च मधले फोटो काढण्यासाठी मनाई नाही, पण फक्त त्या फोटो मधे तुम्ही स्वतः नसावे इतकीच माफक अपेक्षा आहे. पण लोकं मात्र ,इथे आल्यावर त्या सूचनेकडे पुर्ण दुर्लक्ष करतात आणि स्वतःचे फोटो त्या कार्व्हिंग समोर काढून घेण्याचा प्रयत्न करतात.
हेरीटेज म्हणून हे एकच नाही, तर जवळपास १८ चर्च आहेत गोव्याला.सगळे चर्च साधारण याच सुमारास बांधल्या गेले आहेत. पण इथे झेवियर्स ची ममी असल्याने या चर्चला जास्त महत्त्व मिळते इतकेच. पुन्हा एक वर्ल्ड हेरीटेज पण दुर्लक्षित ! इथे जर या इमारतीच्या रचने बद्दल माहिती देण्यासाठी असतं तर बरं झालं असतं. जे गाईड्स आहेत त्यांना पण यातलं काहीच माहिती नाही. ते फक्त झेवियर्सची माहिती सांगत असतात.
एखाद्या हेरीटेज वास्तूचे महत्त्व हे त्या वास्तूचे बांधकाम कसे केले गेले? पुर्ण करतांना काय त्रास झाला ? अडचणी काय आल्या ?या बद्दल माहिती मिळवायची इच्छा असते, पण आपल्या कडे कुठेही लिखीत स्वरूपात डॉक्युमेंटेशन केल्या गेलेले नाही याचे वाईट वाटते. ही माहिती कशी मिळवायची तेच समजत नाही. असो.
महागाई
पेपर मधली बातमी वाचली ३० वर्षाच्या तरूणाने आपल्या २८ वर्षाच्या पत्नी बरोबर आत्महत्या केली. दोनच दिवसा पूर्वी वाचलं होतं की एका ६५ वर्षाच्या वृद्धानी पण अशीच महागाईला कंटाळून आत्महत्या केली . त्यांनी लिहून ठेवलं होतं, की ” माझ्या मृत्युला सरकार जबाबदार आहे” . जीव दिला, सरकारवर जबाबदारी पण टाकली, पण त्याने काय झालं? पेपर मधे मधल्या पानावर एक चौकट छापून आली!! बस्स!
काही दिवसांपूर्वी एक ९ वर्षाच्या लहान मुलीच्या आत्महत्येची बातमी पण वाचण्य़ात आली होती. आपल्या मृत्युनंतर आपली किडनी वडीलांना आणि डोळे भावाला लावण्य़ात यावे अशी इच्छा तिने लिहून ठेवली होती. घरातली गरिबीची परिस्थिती- पैसा अजिबात नाही .वडिलांची किडनी खराब झालेली, तर भावाचे डोळे गेलेले. आपल्या मृत्यु मुळे वडिलांना किडनी आणि भावाला डोळे मिळतील , आणि सगळेच प्रॉब्लेम्स आपोआप सुटतील असे तिला वाटले, म्हणून तिने आत्महत्या केली होती.
विदर्भातले शेतकरी नेहेमीच आत्महत्या करतात. त्याची आता मिडीयाला इतकी सवय झालेली आहे की , त्याचे ’बातमी मुल्य’ शुन्य झाले आहे, आणि पेपर मधे त्याचा साधा उल्लेख पण नसतो. आज पर्यंत केवळ खेड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असलेला हा आत्महत्या करण्याचा मानसिक रोग हल्ली शहरातल्या लोकांमध्येही पसरला आहे.आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.दोन उच्चवर्गीय स्त्रियांनी (त्यातली एक चार्टर्ड अकाउंटंट) आपल्या रहात्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावरून, मुलासहीत उडी मारून केलेली आत्महत्या पण उगाच मनाला चटका देऊन गेली.
ह्या सगळ्या आत्महत्यांच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे महागाई! महागाई वाढली म्हणून आपण हल्ली सगळेच ओरडा करत असतो. घराच्या काढलेल्या लोनचा वाढलेला हप्ता, पेट्रोल, कुकिंग गॅसचे वाढलेले भाव, भाजी-किराणा सामानाचे भाव- ह्या महागाईची झळ सगळ्यांनाच बसलेली आहे.पगार जरी वाढला तरी खर्च मात्र त्या पेक्षा जास्त प्रमाणात वाढल्याने सगळा मेळ बसवणे एकदम अवघड होऊन बसले आहे.
बाजारात मिळणारी प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे, आणि त्याची कारणं पण जागतीक , राष्ट्रीय किंवा प्रादेशिक असतात असतात असे म्हटले जाते. त्यावर आपला काहीच कंट्रोल नाही. अमेरिकेचे क्रेडीट रेटींग कमी झाले म्हणून आपला शेअर बाजार क्रॅश होणार, चांदी, सोन्याचे भाव एकदम वेड्यासारखे वाढणार. असो .
महागाई वाढलेली असतांना हल्ली मुंबई आणि इतर शहरातही जागांचे भाव एकदम वर चढले आहेत. उपनगरातही एक लहानसा फ्लॅट घ्यायचा म्हटलं, तरीही ८० लाखा पासून तर कोटी रुपयांपर्यंत भाव झाले आहेत.गेल्या वर्षभरापासून भाव कमी होतील म्हणून ऐकतोय , पण बिल्डरलॉबी कडे असलेल्या पैशांमुळे त्यांनी नेट लावून जागांचे भाव वरच्या पातळीवर मेंटेन केलेले आहेत. थोडक्यात मध्यमवर्गीयांच्या हाताबाहेर गेले आहे घरं बांधणं.
पूर्वी पेट्रॊल टॅंक फुल केल्यावर १५०० रु. द्यावे लागायचे ते हल्ली २१०० पर्यंत द्यावे लागतात. तूर डाळीचे भाव काही महिन्यापूर्वी ४० रुपयांपासून एकदम ८० ते १०० पर्यंत गेले होते, ते अजूनही ७० च्या आसपास आहेत, मध्यंतरी कांद्याचे भाव पण असेच १०० रुपया पर्यंत पोहोचले होते.
महागाई वाढली आहे म्हणून आपण सरकारने काही तरी केलं पाहिजे म्हणून म्हणत असतो, ते सरकारचं काम आहे यात संशय नाही, पण केवळ सरकारला दोष देऊन गप्प बसण्यापेक्षा , त्याच सोबत आपण स्वतः काय करु शकतो हे पण पहायला हवे.
एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बजेट!! खर्चाचं बजेट बनवून खर्च करणं हल्ली एकदम बंद झालंय. पूर्वी महिन्याच्या एक तारखेला रेडीओ वर गाणं लागायचं, खुश है जमाना आज पहली तारीख है.. कारण याच दिवशी लोकांचे पगार व्हायचे, आणि महिन्याच्या खर्चाचे बजेट बनवले जायचे. वाण्याकडले सामान, दूधवाला, शाळांची फी इत्यादी सगळे खर्च नीट लिहून त्या प्रमाणे केले जात असत. कशावर किती खर्च करायचा याचा विचार केला जात असे. गृहीणी खर्चाची बॅलन्स शिट तयार करत असे. हे केल्यावर कितीही कमी पगार असला, तरीही काही पैसा हा बाजूला शिल्लक पडलाच पाहिजे या कडे गृहीणीचा कल असायचा. आजकाल ते बंद झालंय. कुठलाही विचार न करता, जसा वाटेल तसा , आपल्या खिशाचा विचार न करता खर्च करणे सुरु केले आहे आपण.
मी स्वतः मागच्या महीन्यात एक प्रयोग केला. महिनाभर सगळा हिशोब लिहिल्यावर बऱ्याच गोष्टींसाठी विनाकारण केलेला खर्च माझ्या लक्षात आला. जो खर्च टाळता आला असता तो पण मी टाळला नाही असा! एकट्याला ऑफिसला जातांना कारने जाण्यात काय फायदा? विनाकारण तिनशे रुपये रोजचे खर्च करायचे ? महिन्यात मी मी सहा- सात वेळा तरी कारने ऑफिसला गेलो होतो . म्हणजे १८०० रुपये पेट्रोल खर्च झाला ,तो वाचवता आला असता. लाईटचे बिल हे महिन्याला साधारण ३५० युनिट्स चं येतं, ते जर खोलीत कोणी नसतांना लाईट – पंखे बंद केले तर २५० युनिट्स पर्यंत येतं हे पण अनुभवलं (मग बाबा हल्ली किती कटकट करातात, या अशा डायलॉग कडे दुर्लक्ष करावे लागतेच). बेस्ट ने विजेचा प्रती युनिट रेट्स वाढवले म्हणून ओरडा करण्यापेक्षा ( कारण फायदा काहीच नाही त्याचा ) विजेचा थोडा योग्य वापर केला तरीही खर्च आटोक्यात ठेवला जाऊ शकतो हे लक्षात आलं.
भाजी आणायला गेल्यावर एकाच दुकानासमोर उभा राहून दुकानदाराच्या हाता पिशवी देऊन, भाव न विचारता सगळ्या भाज्या न घेता , चार दुकानं हिंडून भाव करून भाजी घेतल्यावर जवळपास ३० टक्के तरी नक्कीच पैसे वाचले.
पूर्वी फक्त एक लॅंडलाइन फोन असायचा तो हल्ली प्रत्येकाच्या घरी चार पाच तरी मोबाईल असतात. फोनवर कामापुरतं बोललं तरीही खर्च पण कमी केला जाउ शकतो. शिळोप्याच्या गप्पा मारायला फोन वापरणं बंद केलं. ऑफिस मधे बसलो असतानाही केवळ नंबर डायल करायचा कंटाळा येतो, म्हणून सेल वरून डायरेक्ट फोन करायचो ते फक्त बंद केले, मी आणि चक्क बिल जे महिन्याला २१००- २५०० पर्यंत यायचे ते १६०० पर्यंत आलं.
प्लास्टीक मनी ( क्रेडीट कार्ड ) आल्यापासून जेंव्हा काही विकत घ्यायची इच्छा होते, तेंव्हा आपण ते विकत घेतो- पैसे खिशात नसले तरीही. “ऋणं कृत्वा, धृतं पिबेत”, असं एक चार्वाक चं वाक्य आहे. त्याप्रमाणे आपण सगळे वागतो असे मला वाटते.खीशात पैसे नसतांना पण आपल्याला काही कमी नाही, असा आव आणून कर्ज काढून ( क्रेडीट कार्ड ने ) खर्च करणे बंद केले तरीही बरीच बचत होऊ शकेल. ज्याच्या अंगावर कर्ज नाही, जो असलेल्या पैशात सुखाने चटणी भाकरी खाऊन (शब्दशः अर्थ घेउ नये) दिवस काढू शकतो तो सगळ्यात जास्त सुखी असे मला वाटते.
एक लहानशी गम्मत, तुमच्या खिशातल्या पाकिटात किती पैसे आहेत असे विचारले तर मला वाटत नाही की तुम्ही सांगू शकाल ? ,मला वाटत नाही. मी स्वतः पण सांगू शकणार नाही. खिशातली एखादी शंभराची नोट जरी काढून घेतली बायकोने तरीही लक्षात येत नाही . याचं कारण आपण पैशाची किंमत विसरलो आहे .जेंव्हा आपल्याला पैशाची किंमत लक्षात येईल, तेंव्हाच त्याचा योग्य वापर करणे शक्य होईल.
बाहेर जेवायला जाणे हे आजकाल नेहेमीचंच झालं आहे. कधी बायकोला कंटाळा आला म्हणून तर कधी मुलांना काहीतरी खायचं आहे म्ह्णणून. दर महिन्याला जर हॉटेलिंगचा खर्च मुंबईला जर ३-४ वेळा गेलं, तर २ ते ३ हजार पर्यंत होतो ( व्हेज हॉटेल असेल तर ) तर तो नक्कीच कमी केला जाऊ शकतो, पण आपले खर्च तसेच ठेवायचे, आणि मग महागाईला दुषणं द्यायची- असे आपण करतो. वर दिलेली उदाहरणं फक्त एक केस स्टडी म्हणून दिलेली आहेत. या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्यांचा व्यवस्थित वापर केला तर खर्चावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं.
आपण सरकारला पण दोष देतो- कारण ते सोपं आहे म्हणून! पण हे असं करण्यापेक्षा थोडा आपला माईंड सेट बदलला तर जगणं एकदम सोपं होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा असे माझे म्हणणे नाही, पण जो खर्च अनावश्यक आहे तो जरी टाळला तरीही पुरेसे आहे.
काही लोकं जे खूप आशावादी आहेत ते म्हणतील , की तुम्ही आपलं महिन्याचं इनकम वाढवा, म्हणजे महागाईचा परिणाम होणार नाही तुमच्यावर. ते जरी खरं असलं, तरीही सहज शक्य नाही. आपल्या हातात जे आहे ते म्हणजे अनावश्यक खर्च टाळणं , एवढं जरी केलं तरीही महागाईला सामोरा जाता येईल आणि आयुष्य सुसह्य होईल, आणि आत्महत्या करण्या सारखे विचार मनात येणार नाहीत.
वॉल आर्ट..
अहमदाबादला गेलो की नेहेमीच एक गोष्ट मला फॅसिनेट करते. ती म्हणजे वॉल आर्ट.. किंवा त्याला एक प्रकारची ग्राफिटी पण म्हणता येइल. ग्राफिटी हा विद्रोही आर्टचा प्रकार. पण इथे विद्रोही आर्ट नाही, पण केवळ भिंती चित्रे आहेत म्हणून ग्राफिटी म्हणतोय मी त्याला.
तुम्ही एअरपोर्ट वरून आश्रम रोडकडे जायला निघालात की एक सबवे लागतो. त्याचं नांव काय हे मला माहिती नाही. पण ह्या संपुर्ण सबवे मधे महात्मा गांधींचं लाइफ साइझ पोर्ट्रेट बनवलं आहे. अगदी ६०-७० फुट लांबीचं किंबहुना त्यापेक्षाही जास्त लांबीचं असेल. जवळपास संपुर्ण सबवेच्या भिंतीवर हे चित्र बनवलेले आहे.
हे बनवायला फक्त लहान लहान टाइल्स चे रंगीत तुकडे वापरण्यात आलेले आहेत. थोड्या अंतरावरून पाहिलं तर एकदम सुंदर चित्र दिसतं.. यात, महात्मा गांघींची वेगवेगळी रुपं आहेत, मग गांधीजी अगदी कचरा उचलतांना पण आहेत. या सबवे मधे इतका ट्रॅफिक असतो, की फोटो काढणं पण कठिण होतं. सारखी वाहनं समोरुन जात असतात. त्यामुळे ओपन व्ह्यु मिळत नाही चित्रांचा. बरं.. थांबावं म्हंटलं तर ताबडतोब मागे हॉंकिंग सुरु होतं. त्या मुळे थांबता पण येत नाही. माझी इथे अहमदाबादकर वाचकांना विनंती आहे, जर ह्या भिंतीचे संपुर्ण फोटो तुमच्या कडे असतील तर कृपया मला इ मेल ने पाठवा. नाहितर मी अगदी पक्कं ठरवलं आहे की पुढच्या अहमदाबाद टुरला मी नक्कीच फोटो काढणार गाडीतून उतरुन..
एक फोटॊ मी कार मधुन डाव्या बाजुच्या भिंतीचा पण काढला आहे, तो केवळ टाइल्स च्या वापराचा अंदाज यावा म्हणुन.. अतिशय सुंदर चित्र आहे हे.. अप्रतिम..तो गांधीजींचा जमिनिवरचा कचरा उचलतांनाचा पण फोटॊ काढला आहे पण , मधे कारचं हॅंगिंग आल्यामुळे जरा बिघडलाय..तरीही इथे पोस्ट करतोय.
आज अगदी सहज मोबाइलमधली चित्र पहात होतो, तर हे दोन फोटो दिसले म्हणुन हे पोस्ट लिहायला घेतलं. या व्यतिरिक्त अजुन एक गोष्ट आहे अहमदाबादमधली ! लॉ कॉलेज चौकातला नळ.. ह्या नळाला कुठेच सपोर्ट दिलेला दिसत नाही पण नळामधुन पाणि नेहेमीच वहात असतं. पहिल्या वेळेस तर मी तिथे थांबुन निट पाहिलं की कुठे सपोर्ट आहे कां.. त्या नळाला. बराच वेळ बघितल्यावर लक्षात आलं की त्या पाण्याच्या धारेमधे एक पाइप आहे जो पाणि वर नेतो . अहमदाबादच्या रखरखित उन्हाळ्यामधे ह्या नळामधुन धो धो वहाणारं पाणी खरंच नजरेला किती सुख आणि थंडावा देतं ते स्वतः अनुभवल्या शिवाय समजणार नाही.
या शिवाय पण बरंच आहे अहमदाबादमधे.. मला माहिती आहे माझं पोस्ट खाण्याच्या जागांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. पण आज जस्ट फॉर अ चेंज काहीच लिहित नाही खाण्याबद्दल…
पॅराग्लायडींग…
गोव्याला आलो की मी नेहेमी कोलवा बिच जवळच्या हॉटेलमधे गेली कित्तेक वर्ष उतरतोय . कोलवा बिच मला खूप आवडतो, कारण एक तर गर्दी नसते, आणि जवळपासच्या जे्वणाच्या चांगल्या जागा माहिती आहेत मला म्हणून.
आजचे हे पोस्ट अगदी गडबडीत टाकलेले आहे. तर काय झालं, नेहेमीच ( म्हणजे फक्त फेब्रु ते जुलै महिन्यात) कोलवा बिच वर वॉटर स्पोर्ट्स सुरु असतात. त्यातल कधीही बिच वर गेलं की पॅरा ग्लायडींग सुरु असलेले दिसते. मला पॅराग्लायडींग मनापासून आवडते. कितिही गडबडित असलो, तरीही तो अर्धा तास मी नेहेमीच स्वतःकरता ठेवतो. प्रत्येक वेळेस तर शक्य होत नाही, पण जेंव्हा कधी शक्य होईल तेंव्हा पॅराग्लायडींग माझ्या विश लिस्ट मधे असते.
एखाद्या दिवशी साईटवरून लवकर परत आलो, लवकर म्हणजे अंधार पडण्यापुर्वी. सध्या गोव्याला संध्याकाळी ७ – ७.१५ वाजता अंधार पडत . परवाचा दिवस तसा बरा होता. लवकर रुमवर परत आलो आणि सरळ बिच ची वाट धरली. बिच वर पोहोचलो, तर एक मुलगा — साब अच्छा……….. जाउ द्या. त्याला टाळून सरळ पॅराग्लायडींग वाल्यासमोर उभा राहिलो. त्याने समोर केलेल ते ग्लायडींग गिअर अडकवले आणि आकाशात उडायला तयार झालो.
ग्लायडरला स्टिअर करण्यासाठी एक माणूस सोबत फ्लाय करतो. तो मागे उभा होता. त्याने हसून म्हंटलॆ, साब , बहुत दिनोके बाद दिखा?? म्हंटलं, अरे मै तो आया था,लेकिन तेरे पास आनेकू टैम नई मिला!! काम भी तो पैला करना मंग ताय नां!!! त्याने पण मला तत्वज्ञान शिकवले, म्हणाला बरोबर है साब!पैला काम करनेका, बादमे मस्ती!! मी हसलो आणी स्वतःला त्या ग्लायडरच्या रोपला हुकने अडकवून घेतले.
मला स्पेशली तो जमिनिपासून डीटॅच होऊन उंच ऊडण्याचा क्षण खूप आवडतो. शब्दातित भावना असतात तेंव्हा.एकदा उंच ऊडाल्यावर ती खालची बोट तुफान स्पिडने पळते, आणि तुम्ही सागरावर तरंगत असता. खालची किड्यामुंगी सारखी माणसं बघितली की आपण उगिच खूप मोठं झालंय असं वाटतं.
नेहेमीचाच अनुभव होता, त्यामुळे नाविण्य जरी नव्हतं तरी पण एक वेगळाच आनंद मात्र नक्की होता. पाण्यावर हात पाय न हलवता फ्लोटींग करण्याचा अनुभव आहे? एक्झॅक्टली मला तेच फिलिंग येतं. आपण या संसारापासून पुर्ण वेगळे आहोत हे जे जग खाली बघतोय ते अगदी निराळं आपल्याशी संबंध नसलेले आहे ही फिलिंग येते मला. ते पंधरा मिनिटं अगदी मनापासून स्वतः बरोबर असतो मी .
खाली अथांग महासागर, सोसाट्याचा वारा, आणि त्या बोटीच्या इंजीनचा आवाज आणि या सगळ्यांशी जुळवुन घेणारे तुम्ही. मला पहिल्या वेळेस तर ही फ्लाईट संपूच नय असे वाटले होते. या वेळेस त्या माणसाला कॅमेरा -सेल फोन हाती दिला आणि क्लिक कर दोन तिन स्नॅप्स म्हणून सांगितलए.
बस्स्स . इतकंच आहे हे पोस्ट. फक्त काही फोटॊ पोस्ट करतोय इथे.

पॅराग्लायडींग करता तैयार.. आता फक्त उडायचं आकाशात..

हवेत उंच उडतांना. या फोटो मधे मी हाललोय की कॅमेरा तेच कळत नाही. बिघडलेला फोटो अप्ण एक आठवण म्हणून पोस्ट करतोय.

समुद्र किनाऱ्यावर मेक शिफ्ट शॅक्स बनवल्या जातात फेब्रुवारी ते जुन पर्यंत यातली ही समोर दिसते ती माझी फेवरेट जागा. इथल्या खुर्च्या मला खूप आवडतात. इथे बसुन बिअर पिणे एक मस्ट वेळ काढू काम आहे.

आकाशात नाही तर आपण अवकाशात असल्याचं फिलिंग येतं . म्हणूनच असेल, मला पॅरा ग्लायडिंग खूप आवडतं.

या फ्लाइट नंतर रिलॅक्स व्हायला जागा म्हणजे ही शॅक. समोर समुद्र, मागे कोणीच नाही- एक्सलंट फिलिंग. कधी स्वतः बरोबर रहायला आवडत असेल तर मस्त आहे ही जागा. मी इथे बसलो की कमित कमी दोन तास ऊठत नाही.

नुकताच वेटर येउन गेला, खानेमे क्या लाउं? म्हणून. इथे फिश फ्राय पॉंप्लेट ४५० रुपये म्हणाला. फार तर ९ इंच असेल . भाव विचारूनच ऑर्डर प्लेस करा या शॅक्स मधे. मेनू कार्ड मधे भावाची जागा रिकामी असते फिश च्या बाबतीत.- म्हणून ही काळजी घेणं आवश्यक आहे.

एवढं सगळं झाल्यावर भूक तर लागणारच . फक्त एक पिस फिश विथ चिप्स, आणि फिश करी + राइस.
तर आजचं हे पोस्ट अगदी शॉर्ट आहे. एक लहानसा अनुभव शेअर करावा म्हणून दिलेले. इथे दोन माणसांसाठी ग्लायडींगचे ५०० रुपये मागतात. भाव केल्यावर, आणि गर्दी नसेल तर ४०० पर्यंत पण तयार होता. एकट्याचे कमित कमी २५० ते ३०० रुपये घेतात .
पण एक सांगतो, अनूभव एकदम पैसा वसूल!!!
पुरस्कार.
पुरस्कार कोणाला आवडत नाहीत? प्रत्येकालाच पुरस्काराबद्दल एक खास आकर्षण असतं. एखादी लहानशी ट्रॉफी जरी मिळाली, तरी ती घरात समोरच्या खोलीत शो केस मधे सजवून ठेवण्यातला आनंद काही निराळाच असतो. शाळेत आठवीत असतांना स्नेहसंमेलनात मधे मिळालेले प्रशस्ती पत्र मी अजूनही जपून ठेवलेले आहे.
सिनेमा साठी ,पूर्वी फक्त फिल्म फेअर पुरस्कार होता, आता त्याच स्वरूपाचेच निरनिराळ्या नावाने चार पाच तरी नवीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात. ज्यांना फिल्म फेअर मिळाला नाही, ते ह्या पुरस्कारावर समाधान मानताना ्दिसतात. टीव्ही चं पण तसंच, स्टार टिव्ही तर केवळ स्वतःच्याच चॅनल वरच्या कार्यक्रमांवर पुरस्कार देत सुटलाय. मग त्या मधे अगदी बेस्ट बहू, बेस्ट लडकी, बेस्ट दादी वगैरे असंख्य पुरस्कार आहेत- असे की ज्या मुळे प्रत्येकी एक तरी मिळतोच.
शाळेत जाणारा अगदी केजी मधे शिकणारा मुलगा पण बक्षीस या संकल्पनेने भारावलेला असतो. मला आठवतं, एकदा माझी धाकटी मुलगी शाळेत असतांना तिच्या शाळेत राखी मेकिंग काँपीटीशन होती. राखी घरून बनवून न्ययची होती. सौ. ने एक सुंदर तिरंगा झेंड्य़ाच्या रंगाची राखी बनवून दिली. त्या राखीला मिळालेले पहिले बक्षिस घेऊन जेंव्हा मुलगी घरी आली, तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी लपवता येत नव्हता. पण आई जवळ जाऊन म्हणाली, ” अगं पण हे बक्षिसं तुलाच मिळालंय, कारण ती राखी तूच बनवली होती ना?” . हे वाक्य ऐकून खरंच खूप बरं वाटलं, की त्या लहान वयातही ही जाण होती, की बक्षिस जर मिळवायचं, तर त्या साठी आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाने! असो, विषयांतर होतंय.
हल्ली बरेचदा पेपर मधे कुणाला तरी कसला तरी पुरस्कार मिळाल्याचे छापून येत असते. कुठली तरी स्वयंसेवी संस्था जीवन गौरव, किंवा इंजिनिअरींग/मेडिकल,/समाजसेवा / किंवा इतर कुठल्याही क्षेत्रा मधे केलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार मुक्त हस्ते वाटत असतात. आणि हे करत असतांना आपण हे एका सामाजिक जाणिवेतून करीत आहोत हे सारखे ठसवण्याचा प्रयत्न पण करत असतात. हे पुरस्कार ज्याला मिळतात, बरेचदा त्याला स्वतःला पण आपण काय योगदान दिलेले आहे हे माहिती नसते.
या पुरस्कार देणाऱ्या संस्थांची नावं पण कधी कोणी आयुष्यात ऐकलेली नसतात, पण तुम्हाला एखादा इ मेल येतो, की तुमच्या अमुक अमुक क्षेत्रातल्या भरीव योगदाना बद्दल तुम्हाला आम्ही एक पुरस्कार देण्याचे योजले आहे, तेंव्हा तुम्ही पुरस्कार घेण्यासाठी येऊ शकाल का? पुरस्कार वितरण मुंबई, किंवा दिल्ली वगैरे सारख्या कुठल्यातरी ठिकाणी अमुक अमुक तारखेला आयोजित केलेला आहे . आता हा असा इ मेल पाहिल्यावर कोणीही नक्कीच भारावून जातो आणि आपल्या कार्याची कोणीतरी नोंद घेतोय, हे पाहून कृत कृत्य होतो.
इ मेल पाहिल्यावर आधी त्या संस्थेच्या वेब साईट वर जाऊन तुम्ही चेक करता, की ती संस्था खरंच अस्तित्वात आहे की कोणी तुमच्यावर प्रॅक्टिकल जोक करतोय. वेब साईट वर संस्थेद्वारे पुरस्कृत केल्या गेलेल्या व्यक्तींचे फोटो, आणि पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा असतो. ते पाहिल्यावर विश्वास बसतो, आणि तुम्ही ताबडतोब उत्तर पाठवून मग तो मी हा पुरस्कार स्वीकारण्य़ास येत आहे, हे कळवून मोकळा होता.
होता होता पुरस्काराचा दिवस उजाडतो, तुम्ही पुरस्कार स्वीकारण्यास जाता. छानसा कार्यक्रम होतो एखाद्या हॉल मधे. शंभर दोनशे लोकं आलेले असतात. तुमच्या प्रमाणेच इतरही २०-२५ लोकं असतात की ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे. कार्यक्रम सुरु होतो, तुम्ही दिलेल्या तुमच्या क्षेत्रातल्या योगदाना बद्दल एक लहानसं भाषण करून एक ट्रॉफी आणि मान पत्र तुम्हाला दिलं जातं. कुठल्या तरी चॅनलचे कॅमेरामन आलेले असतात, शुटींग , फोटोग्राफी होते, वृत्तपत्राला पण या कार्यक्रमाची प्रेस नोट पाठवली जाते. सगळं काही कसं व्यवस्थित होतं. दुसऱ्या दिवशी पेपरला पण बातमी येते, बातमीचे कटींग नंतर तुम्हाला आवर्जून पाठवले जाते, टिव्ही वर पण लहानशी बाईट दाखवली जाते .
या अशा कार्यक्रमासाठी खर्च किती होत असेल? एक हॉल संध्याकाळ साठी भाडे- साधारण दहा हजार, आणि इतर खर्च ( अल्पोपहार वगैरे) दहा हजार म्हणजे एकंदरीत तीस हजार. असो.
कार्यक्रम झाल्यावर , अल्पोपहारानंतर त्या संस्थेचे संचालक , सेक्रेटरी म्हणतात, की आमची ही संस्था असे उपक्रम नेहेमीच राबवीत असते- आणि स्वयंसेवी संस्था असल्याने खर्चाची मोठी ओढाताण होते. ते असंही म्हणतात, की हे जे काही सुरु आहे, ते केवळ तुमच्यासारख्या लोकांच्या मुळेच. कारण दर वेळी आम्ही जेंव्हा कोणाचा सत्कार करतो, तेंव्हा ते अशाच पुढील कार्यक्रमासाठी म्हणून दहा विस हजाराची मदत संस्थेला करून जातात. सेक्रेटरी हे पण सांगायला विसरत नाहीत, की कोणा एका माणसाने एक लाखाची मदत पण केली होती. तुम्हाला ते पूर्वी ज्या लोकांनी मदत केलेली आहे, त्यांची छायाचित्रे आणि चेक चे फोटो दाखवले जातात.
हे सगळं पाहिल्यावर तुम्ही पण आपले चेक बुक काढून लोकलाजेस्तव का होईना ,रु. २००००/- चेक देता आणि ती पाचशे रुपयांची ट्रॉफी, मानपत्र आणि काही फोटो घेऊन घरी येता, स्कॅन केलेले पेपर कटींग सोबत फेस बुक वर पोस्ट करण्यासाठी.
द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद
सोशल मिडीयाचे महत्व या निवडणुकीत नक्कीच अधोरेखित झाले आहे. भाजपा ला जो मोठा निर्विवाद निर्भेळ विजय मिळाला त्या मागे सोशल मिडीयाचा मोठा हात आहे. सोशल मिडिया कोणा एका व्यक्तीने मोटिव्हेट केलेला नसतो, कारण त्या मधे हजारो व्यक्ती आपणहून भाग घेतात. ” अच्छे दिन आने वाले है” म्हणून नरेंद्र मोदींनी दिलेली हाक अगदी प्रत्येक जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली, आणि जवळपास प्रत्येकच व्यक्ती नमो पंतप्रधान व्हावे या साठी आपणहून प्रचार करू लागली. नमो पंतप्रधान व्हावे म्हणून अगदी कोणीही नर्मदेतला गोटा जरी इलेक्शन मधे उभा केला असता तरी निवडून आला असता .
सोशल मिडीया हा नेहेमीच ’कॉज ड्रिव्हन” असतो. एखादं कारण सापडलं, आणि ते भावलं, की सगळा सोशल मिडीया त्या कारणाला सपोर्ट करतो .अण्णा हजारे यांचे उदाहरण अगदी डोळ्यासमोर आहे . कॉंग्रेस सरकारच्या विरोधात अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पण असाच पाठिंबा दिला गेला . असे चित्र उभे करण्यात आले, की आता भ्रष्टाचार संपणार- पण तसे होणे नव्हते. अगदी तशीच परिस्थिती या लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान झाली होती. महागाईचा भस्मासुर , भ्रष्टाचार सामान्य जनतेला जगणॆ असह्य करित होता- पेट्रोल, डिझल, कुकिंग गॅस चे भाव वाढ झाल्याने सामान्य जनतेच्या डोळ्यात अश्रू आले होते.
ते अश्रू आधीपासूनच डोळ्यांच्या कडांपर्यंत येऊन ठेपले होते, त्यांना फक्त वाहून निचरा व्हायला एक कारण हवे होते, ते कारण पण मिळाले, आणि त्या अश्रूंनी आपण असहाय्य नाही, तर प्रत्येक वाहिलेल्या अश्रूच्या थेंबाची किंमत एकेका मताद्वारे वसूल केली. तरुणांना कोणी विश्वासात घेत नाही, त्यामुळे ” मला त्याचे काय? ” अशी मनोवृत्त्ती झालेली होती. ओबामाने जे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या इलेक्शन च्या वेळेस केले, तेच भारतात नमो ब्रिगेड ने केले.तरुणांची अलिप्त रहाण्याची वृत्ती या इलेक्शन मधे एकदम बदललेली आढळली. तरूणांना पण राजकारणात इंटरेस्ट वाटु लागला. या ब्रिगेडचा एकच कॅप्टन होता, तो म्हणजे नमो. प्रत्येक तरुणांच्याच मनात ” अच्छे दिन आयेंगे” चे स्फुलिंग पेटवले गेले.
कॉंग्रेस च्या राजवटील विरुद्ध, लोकांच्या मनात इतका द्वेषा निर्माण झाला होता, की त्या मुळे प्रत्येक तरूण त्वेषाने नमो च्या बाजूने प्रचार करित होता. कुठलीही गोष्ट करतांना जर त्वेष मनात असेल तर ती पूर्णत्वास नक्कीच जाते, हीच गोष्ट पुन्हा सिद्ध झाली.
लोकशाही मधे आपले म्हणणे सामन्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विनोद हे एक उत्कृष्ट माध्यम आहे. नेहेमीच्या कंटाळवाण्या निरस जीवनात विनोद नक्कीच चेहेऱ्यावर हसू आणतो.राजकीय नेत्यावर विनोदी कार्टून्स वगैरे पोस्ट केले जाण्यात अजिबात आक्षेप नाही, पण तो विनोद विषारी नसावा, अपमान करणारा नसावा. विनोद असा असावा, की वाचल्यावर किंवा व्यंगचित्र पाहिल्यावर आपोआप हसू यायला हवे, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या बरोबर बसून पहातांना पण संकोच वाटू नये, तसेच अगदी ज्या व्यक्तीवर विनोद केलेला आहे, तिला पण जर हसू आले, तर तो विनोद अगदी १०० नंबरी! एखाद्याचा अपमान करणारे फोटोशॉप केलेले विकृत फोटो म्हणजे विनोद नाही. थोडक्यात पुर्वी तंबी दुराई ज्या प्रमाणे लोकसत्ता मधे लिहायचा – तसे विनोद म्हणतोय मी!
सोशल मिडीया चा स्वतःवरचा ताबा निश्चितच वाखाणण्याजोगा होता. राहूलचे पप्पू म्हणून झालेले बारसे, हे म्हणजे एक निर्भेळ नसलेला विनोद होता. राहूलची प्रतिमा पप्पू म्हणून एकदम हुबेहुब रंगवली गेली. निरनिराळी व्यंग चित्रे पण शेअर केली गेली. काही लोकांनी मात्र ताळतंत्र सोडून काही आक्षेपार्ह फोटोशॉप मधे केलेले फोटो फेस बुक आणि व्हॉट्स ऍप वर शेअर केले . त्यापैकी काही फोटो पाहिल्यावर आपसूकच हसू येत होते, पण काही फोटो पहाताना मात्र किळस वाटत होती.
फोटोशॉप केलेल्या फोटो मधे – नमो आणि सोनियाचा ” तशा अवस्थेतला ” फोटो, मनमोहन सिंग बरोबरचा सोनियाचा फोटो वगैरे मात्र पहातांना मात्र तो फोटो बनवणाऱ्याच्या विकृत बुद्धीची कीव येत होती. असे किळसवाणे फोटो नेट वर शेअर करणे कायदेशीर पणे पण मान्य नाही, आणि त्या साठी तुम्हाला तुमच्या आयपी वरून पकडून शिक्षा पण होऊ शकते. एक आश्चर्य वाटले, की लोकांना हे पण समजत नाही, की नमो चा तशा अवस्थेतला फोटो पोस्ट करून ते नमोचा पण अपमान करताहेत. ही गोष्ट बरेच दिवस मनात होती, आता पुन्हा इलेक्शन येणार आहेच, तेंव्हा सोशल मिडियाचा जपून वापर केला जावा अशी अपेक्षा आहे, नाही तर कदाचित काही लोकांना जेल मधे जाण्याची वेळ येईल.
बंबई
मी जरा लोअर परेलला जाउन नंतर कस्टमर व्हिजीट आटोपून डिलरकडे जाईन. म्हणजे परत ऑफिसला येणार की नाही याची खात्री नाही- असं म्हणून तो समोरून निघून गेला. आमच्या हा इंजिनिअर अगदी खास मुंबईकर बरं कां. अगदी जन्मापासून मध्य मुंबईतच मोठा झाला. लाल बागेच्या चाळीत याचं लहानपण गेलं, मराठी असल्याचा ( मला वाटतं त्या पेक्षा जन्माने मुंबईकर असल्याचा ) खूप अभिमान आहे त्याला. मराठी पण चांगला बोलतो, आणि म्हणूनच त्याचे हे असे बोलणे खटकले.
मुंबईकरांच्या मधे दोन प्रकार असतात, एक जन्माने मुंबईकर, आणि दुसरे कर्माने . कर्माने म्हणजे नोकरी निमित्याने इथे बदलून आलेले , सुरुवातीला आपण हे कुठे येउन पडलोय ? असा त्रासिक भाव चेहेऱ्यावर वागवत फिरणारे, पण नंतर थोड्याच दिवसात इथल्या गर्दीमधे सामावून गर्दीचा एक भाग होऊन रहाणारे असे ’मुंबईकर’ 🙂 . कालच एका मित्राने मला मलाड हा शब्द मालाड या ऐवजी लिहिल्याचे निदर्शनास आणून दिले होते, म्हणून त्या जन्माने आणि कर्माने मुंबईकर असलेल्या मित्राचे लोअर परेल हे कानास खटकले.
माझ्याबद्दल म्हणाल, तर एक वेळ ठीक आहे ,बाहेरून आलोय मी- म्हणजे दुसऱ्या प्रकारचा मुंबईकर आहे. नोकरी निमित्ताने इथे येऊन झालेला मुंबईकर. माझी व्यवस्थित शब्द वापरण्यात( मुख्यत्वे करून जागांची नावं )चूक होणं शक्य आहे, पण चक्क खास जन्माने/कर्माने मुंबईकर असलेलेच जेंव्हा जागांची मराठी नावं विसरून सरळ इतर भाषिकांनी ठेवलेली नावं वापरतात त्याचे आश्चर्यच वाटले.
आपण सगळे मराठी लोक, किती जागांची नावं व्यवस्थित वापरतो? आपल्याला एक विचित्र खोड आहे. आपण जागांची नांव नेहेमीच बदलत असतो. काही गावांची नावं मराठीत करण्याचा विनाकारण प्रयत्न करतो. जसे भोपाल साठी भोपाळ, ग्वालियर साठी ग्वाल्हेर, इंदौर साठी इंदूर , देहराडून साठी डेहराडून , गोलकोंडा साठी गोवळ कोंडा वगैरे. बरं असंही नाही की आपल्याला ती खरी नावं माहिती नाही, तरीही आपण अट्टाहासाने ती नावं वापरत नाही.
हा असाच हट्टीपणा आपण मराठी नांव वापरताना का दाखवू शकत नाही? सर्वप्रथम मुंबई ला मुंबई म्हणताना आपली जीभ का अडखळते? परप्रांतीयंशी बोलताना त्यान मुंबई ऐवजी बंबई शब्द वापरला तर आपण का आक्षेप घेत नाही? बरेचदा आपल्यापैकी काही लोकं बॉंबे शब्द का वापरतात? ( मी पण त्यात आलोच बरं का! अजाणतेपणी पण हा शब्द वापरला जाऊ नये अशी काळजी घ्यायला हवी हे मला आज प्रकर्षाने जाणवले)
आज एक प्रश्न विचारावासा वाटतो किती मुंबईकर मराठी लोकं बांद्रा न म्हणता वांद्रे असे संबोधतात ? बरेचदा तर मराठी मंडळी बॅंड्रा असेही म्हणताना दिसतात वांद्रेला. बॅंड्रा म्हणणे स्टायलिश समजले जाते. खरा शब्द आहे वांद्रे
बहुसंख्य मराठी लोकसंख्या असलेलं विले-पार्ले ! तिथे पण खुद्द मराठी माणसंच त्याला विले-पार्ले असे न म्हणता केवळ पार्ला असे म्हणताना दिसतात. सायन या स्टेशनचे खरे मराठी नांव शीव आहे – ते किती वेळा आपण वापरतो? आणि जर ही नावं वापरात ठेवली नाहीत तर काळाच्या ओघात ती अपभ्रंशी नावं रुळायला वेळ लागणार नाही आणि ती ऑफिशिअल नावं होउन मराठी नावं काळाच्या गर्भात गाडली जातील .
नुकताच एका मित्राने मुंबईतल्या इतरही काही विभागाची नावं निदर्शनास आणून दिली की ज्यांचा उच्चार नेहेमी मराठी माणसं पण चुकीचा करतात. , सी०एस०टी० ऐवजी व्ही०टी० , विक्रोळी ऐवजी विखरोली ( ळ चा नेहेमीच ल असा उच्चार केला जातो) तळेगाव ऐवजी तलेगाव, मालाडचा चिंचवली बंदर मार्ग ऐवजी चिंचोली बंदर रोड , पुणे ऐवजी पूना , नाशिक ऐवजी नासिक , सोलापूर ऐवजी शोलापूर , ठाणे ऐवजी थाना, थाने , डहाणू ऐवजी दहानू , कुलाबा ऐवजी कोलाबा , वसई ऐवजी बेसिन . महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवर बर्याच ठिकाणांची नावे इंग्रजी व हिंदीमध्ये लिहून मराठीला रजा दिलेली असते. अशा पाट्यांवरील मराठी नावांचे हिंदीकरण करमणूक करते व चीडही आणते.
प्रत्येकच बाबतीत अती शुद्ध मराठी वापरावे असा मी आग्रह कधीच धरत नाही. मी स्वतः टेबलला मी टेबलच म्हणतो , मेज नाही, इंटरनेटला इंटरनेटच म्हणतो, ब्लॉग ला ब्लॉगच म्हणतो. त्या साठी पर्यायी शब्द वापरण्याची गरज वाटत नाही मला पण कमीत कमी गावांची नावं तरी व्यवस्थित वापरली गेली पाहिजे, ती बदलली जाऊ नये असे मला वाटते.
मुंबईला एक विचित्र प्रकार दिसतो, रेल्वे प्लॅटफॉर्म वर जे नावाचे बोर्ड असतात ते इंग्रजी हिंदी गुजराथी मधे असतात. प्रत्येक भाषेतला त्याचा उच्चार वेगळा लिहिलेला दिसतो.
जसे गुजराती मधे બાંદ્રા, मराठी मधे वांद्रे, आणि Bandra इंग्रजी भाषेत लिहिले जाते. पण इंग्रजीत लिहितांना Vandre असे का लिहिले जात नाही? उच्चारा प्रमाणेच लिहायचे तर मग मराठी उच्चाराप्रमाणे का नाही??
याचे कारण म्हणजे मराठीचा टक्का घसरलाय असे मी म्हणून स्वतःचे समाधान करून घेणार नाही, तर मराठी मतांच्या मलिद्यावर निवडून येणारे आणि मराठीचा जोर /आग्रह धरणारे पक्ष मात्र या मुद्द्याकडे,अ का दुर्लक्ष करतात हे समजत नाही.
नुकतीच एक बातमी वाचली, की कौशल इनामदार बाळासाहेबांना भेटले आणि तिथे त्यांनी मराठी गाणी एफ एम वर न लावले जाण्याबद्दल सांगितले, आणि मग त्यावर बाळासाहेबांनी दम दिल्याचे वाचले. आता याच अनुषंगाने आठवले की पुर्वी एकदा राज ठाकरेंनी पण असाच जाहिर दम दिला होता मटा च्या माध्यमातून – आणि तो पण याच गोष्टीसाठी. पण बहुतेक त्यांच्याही धमकीला हे हिंदी भा्षिक रेडीऒ वाले जुमानत नाही असे दिसून येते- कारण अजूनही मराठी गाणी लावणे सुरु झालेले नाही. मराठी पक्ष एकदम ढिले पडलेले दिसतात या प्रश्नावर.ह्या गोष्टीबद्दल बऱ्याच लोकांनी शिवसेनेच्या आणि मनसेच्या साईटवर जाऊन लिहिलं होतं.. पण…… असो.विषयांतर झालंय .
इतर कुठल्याही प्रांतात गावाचे वेगवेगळ्या भाषेत नांव बदलल्याचे माझ्या तरी पहाण्यात नाही. मग फक्त मराठी नावंच का बदललेली दिसतात?जर आपणच आवर्जून मराठी नावं वापरणे सुरू ठेवले तरच ही नावं टिकतील अन्यथा मुंबईचे बंबई व्हायला वेळ लागणार नाही.