लग्न करायंचय? मग हे वाचा..

Written by  on November 28, 2004

imagesकाल एक मेसेज आला, की आता मुलगी पहायला जायचंय तेंव्हा काय बोलावं तिच्याशी हेच कळत नाही. अर्ध्या तासात काय काय बोलणार? आणि तिच्याबरोबर आपले लग्नानंतर पटेल की नाही हे कसे काय समजणार? खुप कन्फ्युज झालोय म्हणाला तो.

पुर्वीच्या काळी बरं होतं, मुलगी पहाण्याचा कार्यक्रम व्हायचा, अगदी पद्धतशीर पणे घरची सगळी वडीलधारी मंडळी आणि नवरा मुलगा मुलीच्या घरी जायचे, मग आधी मोठे सगळे मुलीला प्रश्न विचारायचे, ते पण ठरलेले.. तुला गाणं येतं? स्वयंपाक येतो? काय छंद आहेत तुझे? वगैरे वगैरे.. झाल्यावर मुलाला पण तुला काही विचारायचं असेल तर विचार म्हणुन सांगितलं जायचं. आता इतक्या वडीलधाऱ्यांसमोर काही विचारायची हिम्मत त्याची कधीच व्हायची नाही, आणि मुलगा बिचारा खाली मान घालुन, वडिलधाऱ्यांच्या नकळत तिच्याकडे बघुन उगीच आपलं, काही नाही असं म्हणुन वेळ मारुन न्यायचा.

हल्ली दिवस बदलले आहेत, मोठ्या शहरात आधी मुलगा मुलीला बाहेरच कॉफी हाउस मधे भेटतो, आणि मग तिथेच दोघांचं बोलणं होतं. बरेचदा ज्या गोष्टी प्रोफाइल मधे दिलेल्या नसतात- जसे नॉनव्हेज खाणे, ड्रिंक्स घेणे, स्मोकिंगची सवय आहे का वगैरे वगैरे, आणि ह्या प्रश्नांची उत्तरं खूप महत्वाची असतात, शेवटी बरोबर रहायचं असतं पुढचं संपुर्ण आयुष्य. पण तरीही एखाद्या अनोळखी मुलीबरोबर काय बोलायचं? आणि मग दोघेही नुसते बसुन रहातात , बोलायला विषयच सुचत नाही, तेंव्ह परिक्षेत तयारी न केलेला प्रश्न आलाय, आणि त्याचे उत्तर येत नाही अशी काहीशी अवस्था होते.

खरंच, मुलगी पहायला जातांना किंवा मुलगा पहायला जातांना थोडी तयारी करुन गेलं तर? म्हणजे काय प्रश्न विचारायचे ह्याची मनातल्या मनात उजळणी केली तर नक्कीच थोडा मोकळेपणा येईल, आणि गप्पा मारायला विषयही सुचतील. काही सॅंम्पल प्रश्न खाली देतोय, त्यात तुम्हीही तुमचे खास प्रश्न ऍड करु शकता. या प्रश्नांची योग्य/अयोग्य अशी काही उत्तरं नाहीत!

१) स्वयंपाकाची आवड आहे का? आणि स्वयंपाक करता येतो का? हा प्रश्न दोघेही एकमेकांना विचारु शकतात. नोकरी करणाऱ्या मुलीने ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच विचारावे.
२) मी पण नोकरी करते, तेंव्हा घरी यायला वेळ होईल, तेंव्हा स्वयंपाक घरात मदत करण्याची तयारी आहे का?  बरेचदा, काही मुलं मला चहा पण करता येत नाही हे अभिमानाने सांगतात. अशा मुलाची घरामधे कितपत मदत होईल हा प्रश्नच आहे.
३)तु स्वतःला दहा वर्षानंतर कुठे पहातेस/ पहातो? तुझे लॉंग टर्म गोल्स काय आहेत?
४) करीअर बद्दल तुझ्या काय कल्पना आहेत?
५)तुला कशामुळे आनंद होतो? म्हणजे अगदी ब्राउन पेपर पॅकेजेस टाईड विथ द स्ट्रिंग्ज, दिज आर माय फेवरेट थिंग्ज- हे अशा प्रकारचे उत्तर आले तर अजूनही स्वप्निल दुनियेत वावरते/ वावरतो आहे असे समजायला हरकत नाही.
६)धार्मिक संकल्पना, सोवळ्या- ओवळ्या वगैरे बद्दल काय वाटतं? धार्मिक विचार कितपत दृढ आहेत? उपवास तापास वगैरे बद्दल काय संकल्पना आहेत?
७)तुझ्या फ्लॅटचे किती लोन शिल्लक आहे? की फ्लॅट पेड अप आहे?
८)  नोकरी करायला आवडते का? की लग्नानंतर नौकरी करणे सोडणार ?
९)कुठल्या सिरियल्स आवडतात?
१०) हॉबी कुठली आहे?
११)तुझ्या आई वडिलांशी तुझे नाते कितपत क्लोज आहे?
१२)तुला कुठला पोलिटीकल नेता आवडतो? आणि का?
१३)तुला शहराच्या कुठला भाग रहायला आवडतो?
१४) तुला अगदी जवळचे किती मित्र मैत्रिणी आहेत?
१५) इंटरनेट चा उपयोग फेसबुक आणि इमेल सोडुन कितपत करते/करतोस? बॅंकिंग व्यवहार वगैरे येतात का?
१६) तु केलेली सगळ्यात डेअरींग बाज गोष्ट?
१७)तुझ्या फॅमिली मधे कोणाला ब्लडप्रेशर ,डायबिटीस वगैरे सारखे अनुवंशिक रोग आहेत का?
१८) ब्लडगृप कुठला आहे?
१९) माझी सिटीसी अमुक अमुक आहे- तुझी किती आहे?
२०) ब्लड टेस्ट   करण्याची तयारी आहे ? Very Important.
२१) तु केलेली सगळ्यात वाईट आणि चांगली गोष्ट?
२२) तुला सुटीच्या दिवशी आयडिअली  काय  करायला आवडतं?
२३) डिनर मधे कधी तरी ब्रेकफास्ट च्या वस्तू चालतील का? जसे कॉर्नफ्लेक्स वगैरे..
२४)इन्कम टॅक्स चे रिटर्न्स स्वतः भरले आहेत की कोणाकडून भरुन घेतोस/घेते?
२५)कपडे विकत घेतांना एकटा /एकटी जातो/जाते की आई वडिल सोबत असतात?
२६) तुला कधी पोलिस स्टेशनला जायचे काम पडले होते का?
२७) घरच्या कामाची जबाबदारी दोघांनी इक्वल घेण्याची तयारी आहे का? जसे भाजी चिरुन द्यायला मदत करणे , घर आवरायला मदत करणे  इत्यादी.
२८) बॉय फ्रेंड/गर्ल फ्रेंड होती का? आणि असेल तर ब्रेक अप चे कारण?
२९) तुला मुलं आवडतात का? साधारण पणॆ लग्नानंतर किती वर्षांनी मुलं व्हावी असे वाटते?
३०) तुला गावाकडे सुटी मधे रहायला आवडेल का? ( जर आई वडील गावाकडे असतील, तर हा प्रश्न महत्वाचा)

३१) पत्रिका पहायची आहे का?  आणि कितपत विश्वास आहे पत्रिकेवर?

आता वरच्या प्रश्नांची अशी बरोबर म्हणुन काही उत्तरे नाहीत. जी काही उत्तरं मिळतील त्यावरुन आपले समोरच्या व्यक्तीशी जुळेल की नाही हा अंदाज बांधता येइल.

बार्बेक्युनेशन..

Written by  on November 17, 2004

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/130520103793.jpg)तुम्ही एखाद्या हॉटेलमधे  जाता. जर पंचतारांकित हॉटेल असेल तर,  त्या हॉटेलमधे लॉबी मधे शिरल्या बरोबरच आपल्या  पेक्षा वेटरचे कपडे जास्त चांगले दिसताहेत का? हा प्रश्न छळत असतो. सगळे टु पीस सुट मधले वेटर्स , आणि तुम्ही स्वतः कॅजुअल मधे.

सहज आजूबाजूला नजर जाते आणि इतर कस्टमर्स कुठल्या प्रकारचे कपडे घालुन आलेले आहेत तिकडे लक्ष जातं. जेंव्हा सगळे इतर कस्टमर्स पण फॉर्मल ट्राउझर शर्ट किंवा कॅज्युअल्स ऍपरल्स मधे दिसतात तेंव्हा जीव भांड्यात पडतो, आणि आपला गेलेला कॉन्फिडन्स परत येतो.. कुठल्याही पंचतारांकित हॉटेल मधे गेल्यावर येणारा हा फील मला नेहेमीच अस्वस्थ करतो. काही हॉटेल्स जरी ऑफिशियली पंचतारांकित  नसले, तरीही त्या हॉटेलमधे काम करणारे कर्मचारी अगदी त्याच पद्धतीने वागत असतात.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/130520103771.jpg)बार्बेक्यु म्हणजे कोल वर डायरेक्ट भाजून केलेले पदार्थ. हा प्रकार तसं खरं तर अमेरिकेत खूप पॉप्युलर आहे. पण आपल्या कडे पण हल्ली बराच पॉप्युलर झालेला आहे. तंदूर मधे डायरेक्ट निखाऱ्यावर धरुन भाजले जात नाही, एवढाच काय तो फरक तंदूर अन बार्बेक्यु मधे.

परवाच पुण्याला जाउन आलो. मिटींग नंतर पार्टी होती वाकड जवळच असलेल्या सयाजी हॉटेल मधे दहाव्या मजल्यावरच्या रुफ टॉप ओपन एअर रेस्टॉरंट  आहे नांव आहे – बार्बेक्युनेशन -नवीनच कन्सेप्ट आहे तसा हा ..

खरं तर भारतामधे सयाजी हॉटेलने ह्या चेन च्या अंतर्गत बरीच हॉटेल्स सुरु केलेली आहेत. मुंबईला , ठाणे, पुणे, बंगलोर, बडोदा, दिल्ली, अहमदाबाद  आणि अजून बऱ्याच ठिकाणी ह्या हॉटेल्सचे आउटलेट्स आहेत.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/130520103778.jpg)तुमच्या टेबलवर लाइव्ह बार्बेक्यु- हा कन्सेप्ट आहे. खरं तर ह्या हॉटेल मधे गेल्यावर आधी बिना टेबलक्लॉथ चे टेबल्स पाहिले की थोडं आश्चर्यच वाटतं. टेबलवर मध्यभागी एक कव्हर असतं, ते कव्हर काढून त्या ठिकाणी वेटर बार्बेक्यु ( लाकडी कोळसा (चार्कोल)  पेटलेला असतो आणि वर जाळी आणि सळ्या लावण्याची व्यवस्था केलेली असते)  आणून लावतो. त्या छोटेखानी बार्बेक्युच्या प्रतिकृती मधे पदार्थ तयार होणे शक्य नाही असे नाही- जरी पुर्ण पणे शिजवायचे म्हंटले तर  वेळ खूप लागणार, म्हणून तुमच्या टेबल वरच्या त्या बार्बेक्यु मधे  सगळेच पदार्थ ऑलमोस्ट शिजलेले अशा  अवस्थेत आणून लावतात. टेबलवरची बार्बेक्यु फक्त ते पदार्थ गरम ठेवायलाच उपयोगी पडते.कोळशावर वर शिजवलेल्या पदार्थांची एक वेगळीच चव असते. तंदूर अन बार्बेक्यु मधल्या पदार्थाच्या चवीत खूप  अंतर असते.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/130520103779.jpg)हॉटेलचा ऍम्बिअन्स खूप छान आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दहाव्या मजल्यावर ओपन एअर रेस्टॉरंट  हवेशीर बसायला खूप छान वाटत होतं. वेटरने येउन व्हेज की नॉनव्हेज विचारलं. समोरचा मेन्यू पाहिला, आणि नॉनव्हेज सांगितलं त्याला. थोड्याच वेळात ब्लॅक ऍंड व्हाईट आणि चिकन जैतूनी लेग पिस  आणि सीख कबाब समोर आला एका प्लेट मधे आणून ठेवला. समोर ग्लास आहे हे विसरुन गेलो आणि  पाचच मिनिटात चिकन लेग चा फडशा पाडला.

समोरच्या बार्बेक्यु वर वेटर लोखंडी सळी मधे चिकन, फिश, पनीर व्हेज  लावलेल्या समोरच्या बार्बेक्यु वर आणुन लावत होते. बार्बेक्युच्या शेजारीच एका साईडला बटर, बार्बेक्यु ऑइल, स्पाइसेस आणि सॉस ठेवले होते. समोरच्या पिसेसला फिरवायला म्हणून लाकडी मुठ होती त्या सळीला.  समोरच्या सळीवरच्या फिशचे पिसेस काही फारसे आवडले नाहीत, पण चिकन आणि मश्रुम विथ पायनॅपल आणि इतर व्हेज डिशेस पण छान होत्या. अधुनमधून   वेटर सीख कबाब, बार्बक्यु पोटॅटो आणुन सर्व्ह करत होता. कुठल्यातरी पांढऱ्या बार्बेक्यु  सॉस मधले ते बार्बेक्यु पोटॅटो चवीला एकदम मस्त लागत होते. व्हेज खायचं नाही असं ठरवलं तरीही बटाट्याला नाही म्हंटलं नाही शेवटपर्यंत. प्रत्येक सर्व्हिंग ला घेतले ते  पोटॅटो.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/130520103791.jpg)सोबत मित्र मंडळी, नुकतंच काम आटोपले- रिलॅक्स होण्यासाठी एकदम अप्रतीम जागा.  ड्रिंक्स चा ग्लास धरुन  गप्पा मारत टाइम पास करायला ही जागा एकदम उत्कृष्ट  ! इथे जायचं तर   दोन तीन तास हाताशी असलेच पाहिजे. घाई गडबडीत बिझिनेस डिनर साठी ही जागा नाही. जवळपास अडीच तास असंच बार्बेक्यु थंड होई पर्यंत खाण्यात घालवले. मस्त पैकी गप्पा आणि खाणं..

शेवटी  इतर काही खायची इच्छाच नव्हती, म्हणून सरळ डेझर्ट्स कडे मोर्चा वळवला.   आइस्क्रीम, पेस्ट्री, डार्क चॉकलेट पेस्ट्री घेतली. गुलाब जाम टाळले.  या जागेवर नॉनव्हेज अतिशय उत्कृष्ट मिळते, पण व्हेज साठी इतके पैसे म्हणजे ५५० रु. थोडे जास्तच वाटतात.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/130520103782.jpg)कमीत कमी दहा  लोकं असतील तर बारमन्स पॅकेज  देतात ते लोकं. पण त्या साठी आधी पासुन बुकींग करावे लागते. त्या पॅकेज मधे अनलिमिटेड सिलेक्टेड ड्रिंक्स आणि बार्बेक्यु असतो. स्कॉच मधे ब्लॅक ऍंड व्हाइट , टीचर्स, चा चॉइस होता तसेच बिअर वगैरे पण होते. आता एक गोष्ट तेवढीच खरी की अशा ठिकाणी गेल्यावर खाण्यावर जास्त भर दिलेला असतो पिण्या  पेक्षा. या पॅकेजची किम्मत साधारण १०००- ते १२००  रुपयां पर्यंत असते. मेनू मधे फक्त आज काय आहे अव्हेलेबल तेवढंच दिलेलं असते. पॅकेज मधे सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज, व्हेज इन्क्लुडेड आहे.    ऑर्डर करायची तर साधारण ५५० रुपये प्रती  व्यक्ती चार्जेस आहेत. जर नॉन व्हेजचे शौकीन असाल तर एकदा अवश्य भेट द्या या जागेला. पुणे, दिल्ली , बंगलोर, बडोदा, कुठेही असाल तरी..

बार्बेक्युनेशन चे तुमच्या शहरातले आउटलेट कुठे आहे? इथे त्यांच्या वेब साईटवर चेक करा… ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.barbeque-nation.com/location.htm)

उन्हाळ्याची सुट्टी.

Written by  on November 12, 2004

ह्या पोस्ट मधे जो काळ आहे तो साधारण पणे ३५ वर्षापुर्वीचा काळ आहे. काही संदर्भ काल बाह्य वाटू शकतात.

आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या म्हणजे वरोऱ्याला जाणे व्हायचे. ( बरोडा गुजरातेतलं नाही, वरोरा हे चंद्रपुर जिल्ह्यातलं गांव– बाबा आमटॆंचं आनंदवन इथेच आहे) आमचा खूप मोठा गोतावळा असायचा. माझ्या ३ मावश्या आणि ४ मामा, त्यांची प्रत्येकी २-किंवा ३ मुलं असे सगळे मिळून जवळपास घरामधे ३०-४० लोकं व्हायचे. आजोबा असे पर्यंत सुट्ट्यांमधे प्रत्येक सुना आणि मुलगी  ही उन्हाळ्याच्या सुट्टी मधे घरी यायची . आजोबांचा खुप दरारा होता. जुने मामले दार होते वरोऱ्याचे खूप शेती वाडी होती , बरीच म्हणजे १००० एकरांच्या वर.. घरामधे गडी माणसं.. (त्यांना नोकर म्हणत नव्हते त्या काळी) असायची.मग रात्री गाद्या घालणे ते सकाळी उचलणे ही सगळी कामं तेच करायचे.

घरामधे मोठ्या मोठ्या कणग्या (  जवळपास 5 फुट व्यासाचे आणि ६ फुट उंच असे एक भांडे.. बांबु च्या काड्यांपासुन बनवलेले…बांबूच्या काड्यांची मोठी ढोली,ही कणगी बरेच वेळा शेणाने सारवून सगळी बारीक भोकं बुजवल्या गेलेली असत.पूर्वी च्या काळी सुप किटवणे हा एक प्रकार होता , तसाचा काहिसा प्रकार होता किटवण्याचा..) की ज्या मधे साठवणी ची गहू, ज्वारी इत्यादी वस्तू साठवून ठेवल्या जात. बाजारात भाव वाढले की मग ते बाहेर काढुन विकले जात. पेवा मधे पण साठवणीचे तुर वगैरे ठेवले जायचे. पेव म्हणजे जमिनीतल्या केलेल्या खड्ड्यांमधे व्यवस्थित लाइनिंग करुन साठवणी चे धान्य ठेवले जायचे.

सकाळ झाली की सगळे उठायचे. मागच्या अंगणामधे एक मोठी चुल पेटलेली असायची. त्या वर एक मोठी हंडी , आणि त्यात आंघोळीसाठी पाणी तापत असायचं,. ह्या व्यतिरिक्त एक तांव्याचा बंब होता, त्या मधे पण पाणि गरम करायला ठेवायचे. ह्या चुलीमधे पऱ्हाटी च्या काड्या घालत आणि सोबत  एक  मोठं लाकूड ही टाकलं जायचं . ही पऱ्हाटी ची म्हणजे कापसाच्या झाडाची काडी पोकळ असते. तेंव्हा एखादा वात्रट मुलगा, त्यातली एखादी काडी तोंडात धरुन उगाच धूर उडवायचा. मग तेवढ्यात एखादं लहान कार्टं , जे आमच्या खेळण्या मधे नसायचं ते आत जाउन अनाउन्स करुन यायचं की बाहेर काय उद्योग सुरु आहेत ते. आणि मग एखादा पाठीमधे धपाटा, थोडी रडा रड होत सगळं शांत व्हायचं.

कोणी तरी कांदे आणि बटाटे आणायचं आतल्या कोठी घरातून आणि त्या फुफाट्यामधे (चुलीच्या ) टाकायचे. भाजल्या गेल्यावर कांदा आणी बटाटा एकदम मस्त लागतो.. बार्बेक्यु विसरुन जाल इतकी सुंदर चव असायची. तेवढ्यात एखादा गडी जनावरांना घालण्यासाठी  पेंड +कुट्टी+धान्याचं पिठ+ ढेप हे सगळं एकत्र करुन  म्हशीच्या समोर ठेवायचा. जिचं दुध काढायचं आहे तिच्या समोर घमेल्यात हा गोळा ठेवला जायचा.८ -१० म्हशी, दोन गाई होत्या आजोबांकडे. एखादी म्हैस जर नाठाळ असेल तर तिचे मागचे दोन पाय दोरीने बांधुन मग तो गडी दुध काढायला बसायचा.दुध काढणं सुरु करण्या पुर्वी त्या म्हशीचे वासरु तिच्या आचळाला तोंड लावायला सोडायचा, थोडं दुघ त्याचं पिउन झालं की त्या वासराला दुर करुन दुध काढलं जायचं. बरं, त्या मधे पण एक नियम होता, एका आचंळाचे दुध तो कधीच काढत नसे, म्हणायचा ते त्या वासरा साठी आहे.. आम्ही सगळे बाजुला उभे राहिलो की तो वैतागायचां.. अहो छोटे मालक, म्हस बह्यकते नं वो.. जरा दुर उभे ऱ्हा.. असं म्हणायचा. मग आम्ही थोड्या अंतरा वरुन त्याला दुध काढतांना पहायचो. दुधाची धार त्या चरवी मधे पडली की जो एक चुर्र चुर्र आवाज येतो तो आवाज ऐकायला खूप आवडायचं.

आमच्या इथे एक गाय पण होती. ती अगदी गरीब स्वभावाची होती, तिच्या पायाखाली आंचळाकडे बघत तोंड उघडुन डायरेक्ट धार तोंडात उडवायला मजा यायची. तो गडी माणूस धार उडवायचा, पण कधी ती डोळ्यात तर कधी नाकात उडायची. तो तोल सांभाळत आ वासुन खाली उभे रहाणे … एक वेगळाच अनुभव असायचा….!आणि तोंडात न चुकता धार पडली की मग अवर्णनीय आनंद व्हायचा.

सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की दोन ग्रुप पडायचे . मुलींचा वेगळा आणि आम्हा मुलांचा वेगळा. दर दोन दिवसा आड पडवितल्या खांबाला लागुन एक रवी होती, तिने दही घुसळून लोणी काढले जायचे. कृष्ण सिरियल मधे दाखवतात ना तसलीच रवी असायची आणि दही घुसळले जायचे  ते एका मोठ्या रांजणात.. ताक तर झाडाखाली फेकुन दिले जायचे, किंवा जो कोणि मागायला येइल त्याला दिले जायचे.

आम्हा भावंडांमधे सगळ्यात जास्त वात्रट मी आणि माझा मावस भाउ राम.. ( अशी अपेक्षा करतो की तो हे पोस्ट वाचणार नाही 🙂  ) बाकी सगळे जण सरळ होते. जास्त खोलात जात नाही , नाहितर त्यावरच एक पुर्ण कादंबरी होइल .. आमच्या वात्रट पणावर..! त्या काळी जुन्या टाइपचे संडास होते.. आणि माझा मावस भाउ त्या मधे रोज एक भांडं टाकायचा.. फार तर ७-८ वर्षाचा असेल तो, माझ्या पेक्षा ४ वर्षानी लहान..

वरच्या मजल्यावरच्या खोलीमधे आंब्याचा ’माच’ ( म्हणजे गवतावर सगळे आंबे लावुन ठेवलेले असायचे पिकायला म्हणुन. त्यावर पुन्हा गवत घातलं जायचं. त्याला आंब्याचा माच म्हणतात आमच्याकडॆ) एका मोठ्या बादलीत पाणी घेउन त्यात पिकलेले आंबे बुडवून ताबडतोब खाणं सुरु करायचो. आमच्या शेजारिच जयंत काकडे (कार्टूनिस्ट आणि लेखक, हे तरुण भारत मधे नियमित लिहायचे , यांचं नांव तसं विदर्भात फेमस आहे.) यांचे घर होत. आंबे खाणं झालं की कोय त्यांच्या आणि भैय्यासाहेबांच्या अंगणात फेकायचो.

आंबे पण किती खाणार नां?त्याचाही कंटाळा आला की टाइम पास करण्याचे एक ठिकाण म्हणजे तेल घाणी आणि कुंभाराचे घर. आमच्या आजोळी तेल हे विकत आणले जात नव्हते. घरचे तिळ घेउन माणुस घाणीवर जायचा अन , तिळाचे तेल काढून आणलं जायचं.घाणिवर तिळाचे तेल काढतांना पहाणे पण एक मजा होती. आम्ही सगळे जण तेल काढून आणायला जायचॊ. गावातले सगळे लोकं ओळखायचे की आप्पा साहेबांचे नातवंड आलेत म्हणुन. सगळे लोकं आपल्याला ओळखतात म्हणून एक वेगळीच गंमत वाटायची… ते दिवसच वेगळे होते.

जवळच एक कुंभार रहायचा, त्याच्या घरासमोर एक मोठ्ठं बैलगाडीचं चाकं लावुन त्यावर तो माठ आणि इतर भांडी बनवायचा. आम्ही सगळे तासन तास ते बघत उभे रहायचो..शेवटी त्या कुंभारालाच सारखं आम्हाला बघुन कंटाळा यायचा! थोडा जास्त वेळ झाला की त्याच्याच कडचे माठातले थंडगार पाणी पिउन आम्ही परत घरी यायचो.

हिवाळ्यामधे कधी वरोऱ्याला जाणे झाले की मग हुर्डा खाण्याची चंगळ असायची. शेतावर जाउन हुर्डा पार्टी केली जायची.आता इतके सगळे उद्योग करे पर्यंत जेवायची वेळ व्हायची अन सगळे घरी परत यायचो.  जेवणात हमखास घरच्या आंब्यांचा रस असायचा. सगळ्यांची एकत्र पंगत बसून जेवणं व्हायची.

संध्याकाळपर्यंत काही तरी रिकामटेकडे उद्योग ,पत्ते खेळणे इत्यादी प्रकार चालायचे. मजा यायची. संध्याकाळी बस स्टॅंड शेजारच्या तलावाच्या पाळीवर जाउन बसायचो. तिथे ते संथ पाणी पहात बसणॆ हा पण एक टाइम पास होता.
एखाद्या वेळेस आनंदवनामधे जाउन यायचो.आनंदवनात जायचं म्हणजे रेंगी ( एक प्रकारची विदर्भातली बैलगाडी ) काढून जायचो. मला रेंगी चालवायला खुप आवडायचं. मग आमची भांडणं व्हायची.. शेवटी, घरापासून ते बस स्टॅंड एकाने , तिथुन पुढे दुसऱ्याने , परतीच्या मार्गावर तिसरा चालवेल असं ठरायचं…आमटेंचं घर अगदी आजोबांच्या घरा शेजारिच होतं. आजोबांना मात्र बाबा आमटेंचं काम कधीच पसंत पडलं नाही. म्हणायचे अरे तो आमट्यांचा मुरली सगळं सोडून तिकडे महारोगी गोळाकरुन बसलाय त्या आनंदवनात… चांगलं शेती करावी.. ते नाही. नसते उद्योग करतो नुसते… पण नंतरच्या काळात मात्र बाबा आमटेंना चांगलं म्हणायला लागले- म्हणायचे.. त्या मुरली ने बघ कसं चांगलं काम केलं.. नाहितर तुम्ही.. शिका जरा त्याच्या कडून..  माणसाची विचारसरणी कधी बदलेल तेच सांगता येत नाही.
स्वतःबद्दल लिहायला बसलो, की कळत नाही आपण किती अन काय लिहितोय ते.  थांबवतो इथेच आता. पुढची गोष्ट नंतर कधी तरी.