पेपर दिला..

Written by  on September 6, 2004

पेपर दिला.. किती साधा शब्द आहे? हल्ली नेहेमी प्रचारात असलेला हा शब्द. पेपर टाकला, पेपर दिला वगैरे अगदी सहजपणे आपण वापरतो रोजच्या जीवनात. अर्थात, सरकारी नोकरीतल्यांना याचा अर्थ कळणार नाही… पण…इतर लोकांना, म्हणजे ’ द रुथलेस कार्पोरेट वर्ल्ड’ मधल्या लोकांना नक्कीच समजेल.

एखाद्याने पेपर टाकला आणि तो ताबडतोब रिलिव्ह झाला ..अशी बातमी आली, की मग सगळीकडे  कुजबुज सुरु होते.. पेपर टाकला ?? की…………………..?? इतर रिजनल ऑफिसेस ्मधून पण  फोन येणं सुरु होतं.. हे कसं काय झालं रे?? पेपर टाकला की घेतला त्याच्याकडून??  दोन तीन दिवस अशी चर्चा चालते, मग नंतर सगळं थंडावते आणि लोकं रोजच्या कामाला लागतात.

या मधे पहिला प्रकार म्हणजे एखाद्याने चांगल्या पॅकेज साठी पेपर टाकणे. मग त्याला नोटीस पिरियड मधे काम करावं लागतं..मित्र विचा्रतात..   ऐकलं ते खरंय का?? आणि मग कुठे जाणार?? आणि सगळ्यात शेवटलं, म्हणजे, माझ्यासाठी पण बघ ना तिकडे शक्य होत असेल तर…  च्यायला वैताग आलाय इथे..  . अशा कॉमेंट्स असतात कलिग्ज च्या.

पण जेंव्हा कंपनी काढून टाकते तेंव्हा मात्र…. !

पूर्वीच्या काळी बरं होतं, एक नोकरी पकडली की मग आयुष्यभर चालायची,पण हल्ली तसं नसतं.नोकरी बदलण, हाय्यर पॅकेज वर दुसरी कडे हातातला प्रोजेक्ट अर्धवट टाकुन जाणं  हे अगदी कॉमन झालं आहे. माझी ग्रोथ होते आहे तर मी का जाउ नये? अशी एम्प्लॉइज ची मानसिकता झालेली असते..  सारखं आपली मार्केट व्हॅल्य़ु काय आहे ते बघायला म्हणून नेट सर्फिंग करित रहावं लागतं.

आपल्या कडे पण आता अमेरिकन ट्रेंड हायर ऍंड फायर आलेला आहे. पण मानसिक दृष्ट्या आपण तयार नाही या गोष्टी साठी. म्हणजे , थोडी बरी नोकरी  मिळत असेल, तर मग आपण सरळ असलेली नोकरी सोडून दुसरीकडे जॉइन करतो..पण ..तेच जर कंपनीने काही कारणाने रिट्रेन्च केले तर आपण ते सहज पणे घेउ शकत नाही. जर तुम्हाला कंपनीने नोकरी वरुन काढले तर मग तुमच्या कडे पहाण्याचा नाते वाइक आणि समाजाचा दृष्टीकोन पण एकदम बदलतो. तुमच्यात काही तरी कमी आहे म्हणूनच तुम्हाला नोकरी वरुन काढले असावे असाही अर्थ काढला जातो.सामाजिक प्रतिष्ठा पण कमी होते.. आणि हेच सगळ्यात वाईट आहे.

याला कारण पुन्हा आपल्या कडची एम्प्लॉयर्स ची मानसिकता. अशा नोकरी वरुन कमी केलेल्या किंवा हातामधे नोकरी नसलेल्या लोकांना नवीन कंपन्या थोड्या वेगळ्या नजरेने पहातात..जर तुम्ही एखादा जॉब सोडला/ किंवा कंपनीने रिट्रेंच केले,  आणि   पुन्हा जॉब शोधणे सुरु केले ,  तर सहजा सहजी चांगला जॉब मिळणे कठिण होते.

पुन्हा नवीन एम्प्लॉयर्सचा तुमच्या कडे  पहाण्याचा दृष्टीकोन एकदम बदलून जातो. हेड हंटर्स ला पण तुमच्या बद्दल फारसं अट्रॅक्श्न रहात नाही. आणि आयुष्य फार कठीण होतं.. म्हणून बरेचदा वाटतं, जुने दिवस खूप चांगले होते…थोडा पैसा कमी होता, पण मानसिक स्वास्थ्य  नक्कीच जास्त होतं..

घरोघरी..

Written by  on September 4, 2004

नविनच लग्न झालय . जस्ट एक महिना. आत्ता एवढ्यतच   हनिमुन हुन परत आलो आम्ही. कालचीच गोष्ट बघा.. दुपारी त्याने ऑफिसमधुन फोन केला होता. म्हणाला, आज घरी काही करु नकोस.. बाहेरच जाउ जेवायला.. खुप आनंद झाला होता.. चला आज तरी त्या स्वयंपाक नावाच्या बोअरिंग कामापासुन सुटी मिळाली म्हणुन.

मला स्वयंपाकाचा मनापासुन कंटाळा.माझ्या आई कडे मी कध्दी कध्दी काहीच केलंं नाही.  आईने पण कध्दीच काही करु दिलं नाही,म्हणाली येईल तुला वेळ आली की आपोआप सगळं. पण आता कधी तरी पोळ्या जमत नाहित, किंवा भाजी कच्ची रहाते, मिठ जास्त होतं, काही तरी होतंच असतं. पण एक बाकी बरं, कसंही बनवलं तर तो बिचारा सगळं गोड मानुन घेतो, आणि कुरकुर न करता खातो.

परवाचीच गोष्टं, मसाला वांगी केली होती, त्यात मिठ जास्त झालं होतं, इतकं खारट की अगदी तोंडात पण धरवत नव्हती ( अर्थात मला हे तो गेल्यावर  मी जेंव्हा जेवायला बसले तेंव्हा कळलं ). त्याला ऑफिसला जातांना वाढली, तर त्याने त्यातच थोडं दही घालुन खाउन घेतली, म्हणाला, मला वांग्याच्या भाजीवर दही आवडतं..!!मी दुपारी जेंव्हा जेवायला बसले, तेंव्हा समजलं खरं कारण दही मिक्स करुन  भाजी खाण्याचं..इतकं कसं हा शांत राहू शकतो??शेवटी संध्याकाळी तो घरी आला तेंव्हा ,मीच रडायला लागले, आणि मग त्यानेच माझी समजुत काढली..कित्ती कित्ती चांगला आहे नां तो?? माझं नशिब चांगलं, म्हणुन इतका समजुतदार नवरा मिळाला मला.

लग्नापुर्वी तर अजिबात माहिती नव्हती ना.. की हा नॉन व्हेज खातो म्हणुन.. जर माहिती असतं तर मी लग्नाला हो म्हंटलं असतं कां??  कदाचित नाही … नाही.. छे.. नक्कीच हो म्हंटलं असतं.. नॉन व्हेज खातो हे माहिती असतं तरीही!!

मी स्वतः  व्हेज अन नवरा तर  पट़्टीचा नॉनव्हेज खाणारा. काय करावं?संध्याकाळी तो घरी आला आणि आम्ही जेवायला गेलो हॉटेलमधे. त्याने स्वतःसाठी ते तंगडी कबाब आणि माझ्या साठी हरा भरा कबाब मागवला. त्याला ते चिकनची तंगडी हातात धरुन दाताने ते मांस तोडून खातांना पहातांना कसंतरीच वाटत होतं. खुप कृर दिसत होता तो. अगदी आदी मानवा सारखा.. त्याला कसं सांगायचं हे??

नंतर त्याने फिश करी मागवायचं ठरवलं.. तेंव्हा बाकी त्याला म्हंटलं.. की तु फिश खाल्लीस की तुझा खुप वांस येतो रे फिशचा, आणि मग कसंसंच होतं. त्याने मोठ्या समजुतदार पणे व्हेज जेवण मागवलं , मी तर अगदी कसं बसं थोडंसं चिवडल्यासारखं केलं , कारण जेवणाची इच्छाच संपुन गेली होती..  आम्ही परत घरी आलो. येतांना मस्त पैकी आइस्क्रिम खाल्लं ! तेवढीच काय ती  मजा आली…पण एक आहे, त्याचा तो चिकन खातांनाचा चेहेरा मी कधीच विसरू शकणार नाही.

जॉर्ज बर्नॉड शॉ म्हणायचे की मी व्हेज खातो कारण  माझ पोट  म्हणजे कब्रस्तान नाही जनावरांचे… एकदा त्याला पण सांगितलं होतं हे गम्मत म्हणुन.. पण त्याच्या लक्षात आलेलं दिसत नाही की मला  त्याने माझ्या समोर नॉन व्हेज  खाल्लेलं नाही आवडत  ते…

—————————————————–
आता लग्न तर झालंय..   मला नॉनव्हेज  मनापासुन आवडतं. त्यातल्या त्यात फिश करी तर खुप आवडते.

आज सकाळीच नॉन व्हेज खाण्याची इच्छा झाली. म्हणुन तिला ऑफिसमधे गेल्यावर फोन करुन सांगितलं तयार रहा म्हणुन.संध्याकाळी जाउ जेवायला बाहेर म्हणुन. घरी पोहोचलॊ तर ती तयार होती बाहेर जायला. तिला पाहिलं अन वाटलं की आता   कॅन्सलच करुन टाकावं बाहेर जाणं. उगिच लिप्स्टीक खराब होईल.. दुर रहा असं ऐकायला लागलं की वैताग येतो. अरे तुम्ही हासगळा नट्टा पट्टा करता कोणासाठी??आमच्या साठीच नां?? मग हे   मेकप खराब  होईल वगैरे बहाणे कशाला?? जाउ द्या. या बायकांना समजुन घेणं इतकं सोपं नाही.

आता सकाळपासुनच ठरवलं होतं, म्हणुन हॉटेल मधे गेल्यावर  चिकन मागवलं.  मी चिकन खातांना तिचा चेहेरा बघितला, आणि लक्षात आलं की तिला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही म्हणुन. तिच्या डोळ्यामधली घृणा  ( की किळस?) स्पष्ट दिसत होती. तरी पण संपवलंच चिकन.

अर्थात  यात तिचा पण काही दोष नाही म्हणा, कारण लहानपणापासुन कधी पाहिलेलं पण नव्हतं चिकन वगैरे.. आणि आता एकदम कोणी   जर समोर बसुन खाणं सुरु केलं तर तिला अनिझी वाटणं सहाजिक आहे. मला पण एकदा म्हणाली होती, तुमच्या डॊळ्यापुढे तो प्राणि येत नाही कां खातांना?? आता म्हंटलं हो.. म्हणुनच तर खायची इच्छा होते..

फिश करी मागवली तर म्हणाली की नको मागवु फ़िश – वास येतो नंतर. म्हणुन कॅन्सल केली. नाहीतर उगिच रात्री वास येतो म्हणुन…………   !!!!! एक ठरलं, की या पुढे ती सोबत असतांना तरी कधीच नॉन व्हेज खायचं नाही. शेवटी लग्न केलंय ,तेंव्हा दोघांनी पण थोडं थोडं कॉम्प्रोमाइझ करायलाच हवं. आणि तिला नॉनव्हेज आवडत नाही, म्हणजे आता या पुढे कायम भेंडीची भाजी आणि आमटी भात खायची सवय करायलाच हवी.पण हिला नेमकी फिश करी आवडत नाही. अशाने आता कसं होणार पुढे कोण जाणे.

आता माझे काही मित्र पण आहेत की ज्यांनी बायकोला पण शिकवलं नॉनव्हेज खायला .. आता आम्ही कसं शिकवायचं ह्याचाच विचार करतोय .. नाही तर …. चलता है!!!घर मे राम , गली मे शाम… म्हणजे घरी  शाकाहारी आणि  बाहेर एकटं असलं की  नॉननव्हेज खायचं झालं..

———————————–
आता लग्नाला  बरिच वर्ष झालेली आहेत. आता बाहेर जेवायला जायचं म्हंटलं की कुठल्यातरी व्हेज हॉटेलमधेच जातो आम्ही दोघं. त्या दिवसा पासुन त्याने कधीच नॉनव्हेज खाल्लं नाही माझ्या सोबत असतांना. कधी तरी बाहेरुन खाउन येतो. मग तो घरी आला, की माझ्या लक्षात येतं. स्पेशली फिशचा वास.. पण मी दाखवत नाही मला समजलंय म्हणुन.

सुरुवातीचा त्याचा चांगुलपणा हल्ली कुठे गेला तेच कळ्त नाही. हल्ली कुठल्याही लहानशा गोष्टीवरुन चिडतो. अगदी टॉवेल जरी सापडला नाही आंघोळीला तरी पण त्याचा इतका संताप होतो की बस.. अशा तर अनेक गोष्टी आहेत की ज्यामधे याची चिडचीड होते – बरेचदा तर संशय पण येतो-  की हाच का तो??  एखादा माणुस इतका कसा बदलू शकतो??

शेवटी लग्न म्हणजे काय एक कॉम्प्रोमाइझच असतं नां? दुसरं काय??