एअर इंडीया

Written by  on August 31, 2004

एअर इंडीयाची मुंबई – मंगलोर आय सी १७९ फ्लाइट. !.कालच बातमी वाचली-एअर इंडीयाच्या  विमानात एक्स्ट्रॉ पॅसेंजर्स नेले.विमानात जागा नसतांना पण बोर्डींग पासेस इशु केलेत . मग अशा परिस्थिती मधे काय करावं, केबिन क्रू ने?  एक्स्टॉ पॅसेंजर्स ला बोर्डींग पास इशु केला गेला आणि मग बसायला जागा नव्हती म्हणून क्रेबिन कृ च्या सिटवर दोन पॅसेंजरला आणि पायलट शेजारी एका पॅसेंजरला बसवुन नेण्यात आले.

मला एक प्रश्न पडला की जर पॅसेंजर्स केबिन कृ च्या सिट वर बसुन नेले तर मग केबिन कृ काय स्टॅंडींग मधे कां? डोळ्यासमोर चित्र उभं करा दोन सिटच्या मधे लोकलमधल्या प्रमाणे हँडल्स लावलेले, त्याला लोंबकळणारे लोकं. दोन सिटच्या मधे पण घुसुन उभे राहिलेले लोकं,बिझिनेस क्लास मधे दोन सिटांच्या मधे जास्त  जागा त्यामुळे तिथे जागा पकडायची लोकांची धावपळ… !!

एअर इंडिया कडे जी विमानं आहेत त्यापैकी बरिचशी विमानं तर फारच जुनी आहेत. काही विमानं (जुनी बोइंग्ज) लॅंड करतांना अगदी खुळखुळ्या सारखा आवाज करतात.बरेचदा लॅंडींगच्या वेळेस तर चक्क भिती पण वाटते हा असा आवाज ऐकला की. अख्खं विमान डिसईंटिग्रेट होइल असं वाटतं.

पुर्वी एअर इंडीया   एअर होस्टेसला त्यांचं वय ३० झाल्यावर ग्राऊंड ड्युटी साठी वापरायचे पण, नंतर यांच्या युनियनने  कोर्टातुन आदेश आणला की यांना ऑन फ्लाइट ड्युटी करु द्या वयाच्या साठ वर्षा पर्यंत!!म्हणजे आता  दिवस फार दुर नाहीत की एअर इंडीयाच्या होस्टेसेस ६० वर्षांच्या खोकत  खोकत तुम्हाला सर्व्हिस देतील… 🙂

काही दिवसा्पूर्वी एरो ब्रिज काढायचा विसरल्यामुळे तो डॅमेज झाला होता. पायलट तर नेहेमी विचारतो ना कृ ला – चेक डोअर्स, आणि नंतरच विमान  पुढे नेतो. इथे एरो ब्रिज डॅमेज झाला म्हणजे पायलटने डोअर्स बंद झाले की नाही हे चेक न करताच विमान पुढे नेले.. त्या पायलटचे लायसन्स कॅन्सल करण्यात यावं असं मला वाटत..

यावर जॉनी लिव्हरचा एक जोक होता, तो आठवला एकदम. आता एअर लाइन्स म्हणे ज्या ग्राउंड स्टाफने ही चुक केली त्यांना नौकरी वरुन काढून टाकणार !एअरपोर्ट सिक्युरिटी तर नुसती बोंब आहे.त्यावर एक लेख लिहिला होता आधी. ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/05/15/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80/)

ही बातमी ऐकली आणि मला अगदी एस्टी बसची आठवण झाली. ड्रायव्हर शेजारी इंजीनच्या बोनेटवर बसलेले लोकं आठवले. ड्रायव्हरशी जवळीक साधायला तंबाखू मळून ड्रायव्हरच्या समोर हात धरुन.. घ्या ना भाउ… म्हणणार… तसाच या पायलटशेजारच्या माणसाने पण केले असेल कां? :)भारतात इतर सगळ्या एअरलाइन्सकडे बोइंग्ज आहेत , पण इंडीयन एअर लाइन्सकडे फक्त एअर बसेस आहेत. त्यांचा आधिपासूनच असा प्लान असावा म्हणुन एअर ’बसेस’ घेतल्या असतील 🙂

अलायंस एअर वेज नावाची एक सिस्टर ऑर्ग सुरु केली होती. या कंपनीत सगळी स्क्रॅप ( कदाचीत हा शब्द योग्य होणार नाही) झालेली इंडीयन एअरलाइन्स्ची विमानं ट्रान्सफर करण्यात आली. एर इंडीयाच्या स्टाफ बद्दल काहीच न बोललेलं बरं.. हिरव्या पापण्य़ाच्या वरचा भाग, जांभळं नेल पेंट, भडक रंगाच्या लिप्स्टीक्स, आणि म्हाताऱ्या एअरहोस्टेसेस.. काही मागितलं, तर कशाला मागतोय हा असा चेहेऱ्यावर भाव आणणार त्या.. अगदी “प्रोफेशनल”( कूठला प्रोफेशन ते समजुन घ्या) बायकां सारख्या दिसतात या अशा भडक मेकप मुळे. बरेचदा तर खिडकीतल्या बायकांसारख्या पण वाटतात.. एअर इंडीयाची सर्व्हीस अगदी थर्ड रेट  आहे.

एखाद्या पॅसेंजर कडे पाहुन हसलं, तर आपलं मिलियन डॉलर स्माइल वाया जाइल अशा तर्हेचं वागणं..!!!जेंव्हा अगदी कुठलाही पर्याय नसतो तेंव्हा मी एअर इंडीयाने प्रवास करतो. यांचं मेक ओव्हर आवश्यक आहे, तरच तग धरेल ही एअरलाइन्स..

तसंही आपलं एस टी महामंडळ आहेच प्रवाशांच्या सेवे साठी, त्या मुळे त्यांनी असं काही केलं तर समजु शकतो.. पण एअर इंडीयापण लोकांच्या सुरक्षतेशी खेळ कसा काय करु शकते? तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ केला तर फक्त २५० ते १००० रुपये दंड व्हायचा एअर लाइन्सला तो आता २००८ पासुन १० लाख करण्यात  आला आहे.१९३८ पासूनचा सिव्हिल एव्हिएशन चा नियम होता हा. इतकं स्वस्त आहे का मानवी जीवन? पुर्वी असलेली जास्तित जास्त एक महिन्यांची शिक्षा आत दोन वर्षं करण्यात आली आहे. हा नियमातला बदल रिसेंटली (२००८ पासुन) करण्यात आलेला आहे.

सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्स (सिएआर) हे नियम आहेत पॅसेंजर सेफ्टी, पॅसेंजर राइट्स
बद्दल. कुठल्याही प्रकारच्या व्हायोलेशनसाठी आता एअरलाइन्सला खुप पैसे मोजावे लागतिल असं पण वाचण्यात आलंय. इतके नियम तोडले जातात, आणि तेंव्हा डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं   ऑफिस काय झोपा काढतं काय-असा प्रशन पडतो मला …..

हे सगळं लिहुन झाल्यावर आजच्या एका पेपरला  (TOI ) बातमी  आहे की ते तिन एक्स्ट्रॉ पॅसेंजर्स हे एका पायलटची बायकॊ आणि दोन मुलं होते. आता समजलं?? का नियम तोडला गेला ते!!!!एअर इंडीया म्हणजे तर यांची इन्सेस्टर्स प्रॉपर्टी आहे नां…..!

मराठीचे शत्रु

Written by  on August 29, 2004

मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुद्ध मानली जाते. मराठी भाषेचा माझा अभ्यास नाही. पण केवळ मराठी ही मातृभाषा आहे म्हणून मी इथे मराठीत लिहितो..

तुम्ही भारतामधे कुठलीही भाषा घेतलीत तरीही ती संस्कृत बेस्ड आहे. बरेचसे शब्द हे संस्कृत मधुन प्राकृतात घेतलेले आहेत. केवळ मराठी सोडून प्रत्येक भाषेने संस्कृत शब्द जरी घेतला तरीही व्याकरण मात्र बोली भाषेचंच वापरले आहे..मराठी भाषेत मात्र संस्कृत शब्दांना व्याकरण पण संस्कृतचं लावल्यामुळे लिहितांना ह्र्स्व दिर्घ चा गोंधळ होतो. .      ( सौ. ने कधी तरी बोलतांना सांगितलं होतं ते लक्षात आहे)पुस्तकी भाषा आणि बोली भाषेत फरक हा असतोच. पुस्तकी भाषा बोलायची तर तोंडात छापखान्यातले खिळे बसवून सखाराम गटणे प्रमाणे बोलणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.

जेंव्हा व्याक्रणाचे नियम लिपीबद्ध केले गेले तेंव्हा इंग्रजांनी एका कोंकणातल्या ब्राह्मणास हे काम दिले होते. त्यामुळे कोंकणी बेस असलेली मराठी ही शुद्ध म्हणून मान्यता प्राप्त झाली.महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जवळच्या दुसऱ्या प्रदेशाच्या भाषेचा इम्पॅक्ट हा त्या भागातील बोली भाषेवर दिसतो. जसे मुंबईच्या मराठी वर गुजराथीचा खूपच जास्त प्रभाव आहे. वगैरे शब्द वापरलेले आहेत. मुंबईला बोली भाषेत बोलतांना, मी आलेलो, मी गेलेलो, शब्द बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. हे शब्द म्हणजे हूं आयेलो , हूं गयेलो.. वगैरेचे भ्रष्ट भाषांतर आहे. मुंबईची मराठी ही  अशी..

तेच तुम्ही विदर्भात जाल, तर जवळच्या मध्य प्रदेशाचा खूपच परिणाम इथल्या मराठी वर आढळतो. मै वहा जा रहा हुं चं शब्दशः भाषांतर मी तिकडे जाउन राहिलो असं केलं जातं.म्हणून जाउन राहिलो, येउन राहिलो वगैरे शब्द हमखास वापरात दिसतात. बोली भाषा ही ज्या भागातल्या सामाजिक जीवनावर ,कल्चर वर अवलंबून असते- त्यामुळे तिला अशुद्ध म्हणता येत नाही. बोली भाषा ही बोली भाषाच असते..

मराठवाड्यात मराठी भाषा पुन्हा एक वेगळाच बाज घेउन जास्तच भारदस्त होते. मला एक्झॅक्टली कारण माहिती नाही, पण करायली, यायली, जायली हे शब्द वापरले जातात. ( जर कोणाला माहिती असेल तर  कॉमेंट्स मधे- यावर जरुर लिहा) आता ही जी भाषा बोलली जाते ती अशुद्ध म्हणायची का? अर्थात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने आपली मातृभाषा ही सगळ्याच शुद्ध आणि गोड असते. सगळं लहानपण आपलं गेलं असतं अशीच भाषा ऐकण्यात .. अजुन ही एखादा जुना विदर्भातला मित्र भेटला की, काउन बे? चालते का च्या प्यायले?? असं विचारावंसं वाटतं ……  🙂  विदर्भात बऱ्याच ठिकाणी अशी भाषा बोलली जाते. विदर्भात सुध्दा दोन प्रकारची मराठी आहे, वऱ्हाडात पुन्हा एक वेगळाच बाज असतो या भाषेला.

मला हेच सांगायचंय , की प्रत्येक भागातल्या बोली भाषेला एक गोडी आहे. अहिराणी भाषा ऐकली आहे कां? मला ही भाषा समजत नाही पण खूप गोड वाटते ऐकायला.. जळगांवकडची मंडळी मान्य करतील या भाषेचा गोडवा. बहिणाबाईंचे मराठी पण अद्वितीय आहे. भाषेतलं सौंदर्य पहायचंय?? मग वाचा कविता  बहिणाबाईंच्या!

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

बोला.. वरच्या कवितेतला गोडवा ती जर पुस्तकी भाषेत असती तर जाणवला असता कां?

मराठीचे शत्रु हे या लेखाचे शीर्षक का? असा प्रश्न पडला असेल . विदर्भात/ मराठवाड्यात  काही उच्चवर्णीय कुटूंब सोडल्या तर लोकल ऍसेंट असलेली मराठी बोलली जाते. हाच प्रकार कोल्हा्पूरला पण आहे. कोल्हापुरी मराठी एक रांगडेपणा घेउन येते. शुध्द पुस्तकी भाषेची तुलना जर बोली भाषेबरोबर करायची तर साजुक तुपात तळलेल्या जिलबी ची तुलना तांबड्या रश्श्यातल्या मिसळीबरोबर करावी लागेल.

कोल्हापुरचा/मराठवाडा/नागपुरातला एखादा माणुस पुण्याला किंवा मुंबईला आला तर त्याच्या कडे हा कुठला एलियन आलाय? अशा नजरेने पाहिले जाते. त्याच्या बोलण्याच्या स्टाइलची नेहेमी हेटाळणी केली जाते.एखाद्या गृपमधे एकटा पडला की मग तो सरळ मराठी बोलणं बंद करतो आणि सरळ हिंदी बोलणं सुरु करतो.

दुर कशाला कोल्हापुरच्या भागातल्या लोकांना   घाटी म्हणून हिणवले जाते. मी म्हणतो असं का??का बरं त्या दुसऱ्या माणसाच्या मातृ भाषेला पुरेसा मान दिला जात नाही? का म्हणून त्याची हेटाळणी केली जाते?एक मराठी माणुस दुसऱ्याला घाटी म्हणून शिवी का देतो?? घाटावर रहाणं म्हणजे कमी दर्जाचं आहे का? किंवा जर कोणी जळगाव, विदर्भात रहात असेल तर तो कमी दर्जाचा होतो का? असं का???? एका मराठी माणसाचा दुसरा मराठी माणुस केवळ एवढ्यासाठी अपमान करतो कारण त्याची बोलण्याची स्टाइल वेगळी आहे म्हणून?

याचाच फायदा इतर भाषा वाले घेतात. महाराष्ट्रात मराठी लोकांच्या मधे पण एकी होऊ शकत नाही… आणि याला कारणीभूत पण मराठी माणूसच..!! डीव्हाइड ऍंड रुल.. याच तत्वावर ब्रिटीश लोकांनी राज्य केलं .. आणि आता इथले मराठी पण ब्रिटिशांचे काम करताहेत. याचा परिणाम??ही सगळी मंडळी मग पब्लिक प्लेस मधे मराठी बोलणे टाळतात. सगळीकडे हिंदीच बोलणं पसंत करतात. मी स्वतः बऱ्याच नागपूरकडच्या मराठी लोकांना इथे हिंदी बोलतांना पहातो, . जेंव्हा त्यांना कळतं की मी पण विदर्भात ला, तेंव्हा ते जरा मोकळेपणाने बोलीभाषेत बोलतात .

इथे आपण सगळे, विदर्भातले, मराठवाड्यातले, कोंकणातले, मुंबईचे, पुण्याचे आहोत, महाराष्ट्रातला कोणीच नाही… !!!

आज तुम्ही बघाल, तर मराठी लोकांमध्ये पण एकता नाही. केवळ विविधतेत एकता. विविधतेत अखंडता , असं नुसतं  म्हणून चालणार नाही. तसं वागणही आवश्यक आहे. प्रत्येक बोली भाषेला मान हा मिळालाच पाहिजे. आणि कुठल्याही ऍसेंटची हेटाळणी टाळली तर मराठी लोकांच्या मधे एकता निर्माण होईल.एका मराठी माणसाने, दुसऱ्या मराठी माणसाच्य़ा मराठीचा/त्याच्या मातृभाषेचा आदर केला तरच मराठी टीकेल .. ……………………. नाहीतर…..  !!!!!!!!!  बोंबला, इथे भैय्या येतोय म्हणून………………..आणि हिंदी बोलणारे नवीन  मराठी  भैय्ये तयार करा!

चायना मधे वडा पाव.

Written by  on August 11, 2004

Yiwuमुंबईला दोन प्रकारचे हॉटेल्स आहेत . एक म्हणजे शेट्टी लोकांचे आणि दुसरे म्हणजे  पण शेट्टी लोकांचे 🙂 तसे तुरळक हॉटेल्स मराठी लोकांची किंवा गुजराथ्यांची पण आहेतच पण मुख्य शेअर जो आहे तो आहे शेट्टींचा.प्रत्येक सबर्ब मधे ‘चालणारं’ हॉटेल हे शेट्टीचच असतं . कारण मॉडरेट चार्जेस आणि फास्ट सर्व्हीस. अगदी चौघांचं जेवणाचं बिल पण    २०० ते ३०० च्या घरात होतं,आणि क्वॉलिटी पण बरी असते.  .

परवा आमच्या नेहेमीच्या शेट्टी कडे गेलो होतो विथ फॅमिली. तसे दोन शेट्टी आहेत, एक म्हणजे गोरेगांवचा सेंट पायस जवळचा, दुसरा सत्यम शिवम हा कांदिवली चा , ज्यांच्या कडे आम्ही नेहेमी जातो. युजवली मेनू कार्ड न पहाताच ऑर्डर दिली जाते. सगळ्यांचं अगदी ठरलेलं असतं.. काय मागवायच ते. अगदी कार मधे बसल्यापासूनच डिस्कशन सुरू होतं.. कोणाला काय हवं आहे ते त्या्मुळे हॉटेलला पोहोचे पर्यंत पक्कं  झालेलं असतं…

शेट्टी हॉटेलचा मेनू म्हणजे कमीतकमी ५०० च्या वर आयटम्सची लिस्ट असते. भाज्यामधे पण इतके प्रकार असतात की तुम्ही कनफ्युज व्हाल.. पण एक बाकी आहे, जरी निर निराळी नावं असली तरीही, टेस्ट जवळपास सारखीच असते.    एखाद्या भाजी वर एक मेणबत्ती लाउन आणली की व्हेज अंगारा.. त्याच भाजीवर काजू किसमिस चे तुकडे घालुन आणले की तिच भाजी काश्मिरी व्हेज म्हणुन खपुन जाते. त्याच भाजीमधे  थोडं जास्त तिखट घालुन एक लाल तळलेली मिरची उभी खोचून आणली की त्याला व्हेज कोल्हापुरी असं नांव दिलेलं असतं.. एकंदरीत काय तर भाजी एकच असते.

शेट्टीच्या हॉटेलमधे व्हेज बिर्याणी ही नेहेमी लाल रंगाची असते, आणि हैद्राबादी म्हंटलं की हिरवी.. आता एखाद्या हैद्राबादी माणसाने जर ही हैद्राबादी बिर्याणी बघितली तर तो नक्कीच बेशुद्ध होईल. बरं बिर्याणीवर खवलेलं नारळ (?) आणि एखादा कढीपत्ता (?) दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कुठल्याही शेट्टीच्या हॉटेलातली चव ही सारखीच असते, फरक असतो तो केवळ ऍम्बियन्स मधे.तुम्ही एसीमधे बसाल तर एक्स्ट्रॉ १० टक्के चार्जेस.

धाकट्या मुलीला उगाच मेनू कार्ड वाचायचा छंद आहे. टाइम पास म्हणून मेनू कार्ड आणि अगदी मसाल्याच्या पाकिटावर चे कंटेट्स पण वाचून काढते ती. नर्गीसी बिर्यानी, काश्मिरी बिर्यानी सोबतच काजोल बिर्यानी, हिंदुस्थानी पुलाव वगैरे नावं पण होतेच.  एका वेगळ्या नावाने आकर्षित केलं.. ते म्हणजे चायनीज भेळ. काय बरं असेल हा प्रकार?

बाबा ट्राय करायची  का  चायनिज भेळ…..?? म्हंटलं.. ठीक आहे.. नेहेमीच्या डिश सोबत चायनिज भेळ पण मागवली. व्हेज मन चाऊ सुप ( हे खरंच चायना मधे लोकं खातात कां?) हे आमचं फेवरेट. खूप स्ट्रॉंग मसाले असलेलं,आणि आलं, मिक्स व्हेज , सोया सॉस बेस असलेलं हे   काळं सूप आणि त्यामधे घातलेल्या तळलेल्या नुडल्सच्या स्ट्रिंग्ज.. अगदी भारतीय टेस्ट असते – आम्ही आवडीने खातो.

सौ. नेहेमी प्रमाणे कुठलाही प्रयोग करण्याच्या मनःस्थितीत नसते आणि सरळ टोमॅटॊ सूप वर कॉम्प्रोमाइझ करते.. पण ती चायनिज भेळ म्हणजे काय असेल?? लवकरच आमचा वेटींग पिरियड संपला.

चायनिज भेळ ऍज अ स्टार्टर म्हणून आली. तळलेले नुडल्स + भारतिय भेळेचे सगळे पदार्थ म्हणजे कांदा, टोमॅटो,स्प्रिंग ओनियन्स, चिंचेची चटणी,  इत्यादी + टोमॅटॊ केचप ( कसलं भारी कॉंबो आहे नां? ) सगळं एकत्र मिक्स केलेलं.. आणि भली मोठी डिश.. एकटा माणुस तर खाऊच शकत नाही इतकी क्वॉंटीटि ! आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं.. पण जेंव्हा पहिला घास घेतला, तेंव्हा मात्र .. अरे वाह~~~~ मस्त आहे ! आपण आधी का ट्राय केली नाही ही डिश? टेस्ट मात्र एकदम मस्त होती. एक प्लेट संपल्यावर दुसरी पण बोलावली.. इतकी आवडली ती सगळ्यांना..

शेट्टी कडचा पिझा पण चांगला असतो. अगदी भारतीय टेस्ट. डोमिनोज चा पिझ्झा मला अजिबात आवडत नाही. त्या ऐवजी मी शेट्टी कडला मसाला पिझ्झा प्रिफर करतो.स्मोकिंग जोज, किंवा पिझ्झा हट मधे भारतीय टेस्ट चा पिझ्झा मिळतो. पनीर टीक्का मसाला पिझ्झा, किंवा तत्सम कांहीतरी.तो एक वेळ चालेल , पण डोमिनोज.. सिंपली हॉरिबल टेस्ट.. म्हणजे टेस्ट लेस पिझ्झा..!

अरे हो….पण आज हे सगळं खाण्याचं का आठवतंय?तसं तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच की मी किती खादाड आहे ते.आणि खाण्यावर प्रेम म्हणून लिहिलं पण खूप जातं प्रेमाने. 🙂

एक बातमी वाचली. चायना मधे वडा पाव.. भारतातले जास्तीत जास्त लोकं ट्रॅव्हल करतात यिवु ( YIWU)  ला ! बिजिंग किंवा चायना पेक्षा जास्त ट्रॅव्हल करतात.यिवु हे एक लहानसे गांव पण इथे भारतीयांचा खूप राबता आहे. भारतीय पण जे जातात ते नेहेमी राजस्थानी, गुजराथी किंवा महाराष्ट्रीयन असतात.घनःशाम आणि गिरिश हरियानी हे दोघं मुळचे उल्हास नगरचे. एकदा काही कामानिमित्त चायना मधे गेले तेंव्हा त्यांनी इथलं पोटेन्शिअल बरोबर ओळखलं आणि इथे एक इंडीयन रेस्टॉरंट सुरू केलं. असं रेस्टॉरंट की जिथे अगदी वडा सांबार, ते व्हेज मिल्स, किंवा नॉन व्हेज मिल्स अगदी ऑथेंटीक इंडीयन स्टाइलचं मिळेल.त्या रेस्टॉरंटचं नांव स्वाद ए हिंदुस्थान!  ! आपल्या कडे भारतामधे कसे कलकत्याला चायनिज लोकं आहेत ना शु मेकर्स?? तसेच!.

ह्या दुमजली हॉटेल मधे एक मजला केवळ व्हेजीटेरियन लोकांसाठी राखीव आहे. दुसऱ्या मजल्यावर व्हेज आणि नॉन व्हेज पण मिळते. रेश्मा पाटील म्हणुन एक हिंदुस्थान टाइम्सची चायना करस्पॉंडन्स आहे तिच्या ब्लॉग वर तिने लिहिलंय की चायनामधल्या ह्या हॉटेल मधे तिने अगदी दोसा, इडली , वगैरे सगळं ट्राय केलं आणि टेस्ट अगदी सेम टु सेम.. 🙂 जस्ट इंडीयन..

इथे मुंबईचा वडापाव पण मिळतो. मॅक्झिमम गुजराथी आणि महाराष्ट्रातले लोकं येतात इथे, म्हणून हे हॉटेल चांगले चालते असे तिने लिहिले आहे. या रेस्टॉरंट मधे चायनिझ पेंटर्सनी पेंट केलेलं इंडीयन आर्ट वर्क आहे भिंतींवर . तसेच टिव्ही वर नेहेमी सिडीज सुरु असतात .. विक्रम और वेताळ वगैरेच्या. त्या मुळे अगदी ऍट होम फिल होतं इथे.. भारताबाहेर आहे असं वाटतंच नाही.

जर तुम्ही चायना ला गेले  असाल,  तर तुम्ही माझा  भारतीय रेस्टॉरंट मधे जेवण्याचा आनंद तुम्ही समजू शकाल.इथे जेवणाचे फारच हाल होतात .. असं म्हणताहेर रेश्मा पाटिल.. या चायनिज वडापावातील भाजी कशी असेल?? पानकोबी, शिमला मिर्ची , आणि स्प्रिंग ओनियन्स ह्यांचं  मिक्सचर बटाट्यामधे मिक्स करुन त्याचे वडे + पाव+आणि पावाला लावायला चटणी ऐवजी व्हिनेगर, आणि सोया सॉस   असेल कां? असं मला उगाच वाटून गेलं . पण तसं नाही . अगदी रेग्युलर बटाटा वडा + लसुण चटणी+ चिंचेची चटणी+ पाव असतो बरं का इथे स्वाद ए हिंदुस्थान मधे. आणि ही बातमी कुठे आली आहे?? तर चायनाच्या पेपरमधे.. 🙂

इंग्लंडची नॅशनल डीश म्हणजे चिकन टीक्का, किंवा टिक्का करी झाली आहे.  तसेच आता काही दिवसातंच चायनाची नॅशनल डिश ही वडा पाव होइल कां?? अहो……. काय सांगावं होईल पण..   🙂