आनंद..

Written by  on June 29, 2004

आनंद कधी होतो मला?

दररोजच्या राजकीय नेत्यांच्या   वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्या उड्या बघून कधी चिड्चीड – कधी संताप तर कधी करमणूक होते, पण आनंद ? छेः!!  कधीच  नाही.

कोलांट्या उड्या जर एखाद्या जोकरने मारल्या तर एकवेळ बघतांना आनंद होईल पण इथे नेत्यांना शाब्दिक कोलांट्या उड्या मारलेल्या पहातांना फक्त करमणूक होते!  किती गम्मत आहे नाही? एखाद्या गोष्टीपासून करमणूक होऊ शकते पण आनंद नाही!

माझे बरेचसे मित्र ( आता त्यांना मित्र म्हणायचं कां??) आहेत की ज्यांना कायम मला जेंव्हा शक्य होईल तेंव्हा त्रास द्यायला आवडतं. कामाच्या बाबतीत तर हमखास. होतं काय , काही लोकांशी वर्षानुवर्ष संबंध येतो. आणि बरेच वर्ष संबंध आल्यावर मग संबंध मैत्री पुर्ण  होतात-उगाच वाटायला लागतं की हा आपला मित्र आहे म्हणून. पण खरी मैत्री नसते ती.

खरी मैत्री निस्वार्थी असते, जिथे मला तुमच्या कडून काही नकोय आणि तुम्हाला पण माझ्या कडून काही नको   म्हणजे   खरी मैत्री. असो.. ते मित्र शक्यतो तुम्हाला कायम मैत्रीचा हवाला देऊन काही ना काही तरी त्रासच देत असतात आणि केवळ भिडेपोटी तुम्ही सगळं  सहन करत बसता . तर असा एखादा मित्र  प्रॉब्लेम मधे अडकला   की  ( असुरी)आनंद होतो- पण इथे जरी आनंद  असला तरी करमणूक मात्र अजिबात नसते. असुरी आनंद जास्त वेळ टिकतो.

शाळेत शिकत असतांना   कधी एकदा शाळा संपते आणि आपण कॉलेजला जातो असे होत असते. एकदा शाळा संपली आणि टिसी हातात मिळाली, की आता कॉलेजमधे जाणार म्हणून आनंद तर असतोच, पण हुरहुर पण असते-

इंजिनिअरींगला गेलो याचा आनंद असतोच पहिले काही दिवस! हातामधे मिनिड्राफ्टर, स्लाईड रुल्स ( हल्ली कॅल्सी) , ड्रॉइंगशिट्स चं भेंडॊळं मिरवत कॉलेजात जातांना जे वाटतं त्याला अभिमान म्हणता येईल – आपण ब्रिड अपार्ट असल्याचा……तो आनंद होता कां? नाही…. बहुतेक नसावा!! तो एक काहीतरी मिळवल्याचा अभिमानच असावा.

कॉलेज सुरु झालं तरीही- कसं होईल?? ही धास्ती असतेच – च्यायला साली केटी लागायला नको.. !! नायतर बापुस वाट लावेल…( लक्ष्मणराव देशपांड्याच्या भाषेत- काय होईल? कस्सं होईल? लांबचा  पल्ला!)

कॉलेज सुरु झालं आणि पहिली दोन सेमिस्टर्स झाली की कधी एकदाचं संपते हे कॉलेज आणि  आपण नौकरीला लागतो असे होते.  शेवटचं सेमिस्टर असतं. मग सारखं राहुन राहुन पापा कहते है बडा नाम करेगा.. बेटा हमारा बडा काम करेगा हे कयामतसे कयामतचं गाणं घोळत असतं.बरीच वर्ष जिची  तुम्ही वाट पहात असता ती  एकदाची कुठे तरी नौकरी लागते. नौकरी लागल्यावर   आनंद असतो??  हो.. असतो ना.. पण फक्त   जॉइन होई पर्य़ंत असतो .. पण नंतर मात्र  .. एक भ्रमनिरास असतो!

’तिच्या’ बरोबर फिरतांना अंधाऱ्या रस्त्यावर तिला बाइक वर मागे बसलेली असतांनाच मागे वळून घेतलेला पहिले चुंबन? ह्या मधे आनंद वाटण्यापेक्षा हुर हुर , कोणी पाहिल का? ही चिंताच जास्त असते- . कारण कोणाला दिसलं आणि घरापर्यंत बातमी पोहोचली तर??

आनंदाचा क्षण म्हणजे काय?  विमानात बसलेले असतांना निरभ्र आकाशात  दूर दिसणाऱ्या क्षितिजाच्या सूर्यास्ताच्या वेळच्या शेंदरी रंगछटा दिसल्या की मन प्रफुल्लित होतं. रंगीबेरंगी आकाश पहायला बरं वाटतं – तो आनंदच असतो का?

लग्नापूर्वी तिच्या कंबरेच्या खालपर्यंत लांब केसामधे मोगऱ्याचा गजरा माळतांना,  केसांचा मंद शिकेकाईचा सुगंध , अंगाचा सुगंध, आणि त्या मधे मोगऱ्याचा सुंगंध मिसळल्यामुळे तयार होणारा तो  एक निराळाच सुगंध नाकात शिरला  की जी अनुभूती किंवा जे भाव मनात निर्माण होतात  ते म्हणजेच  का आनंद?  की ती फक्त विषय वासना?

लग्न ठरलं , आता तिची तशी भेट चोरुन घ्यायची गरज उरलेली नसते. तिला हवं तेंव्हा तिच्या घरी जाउन हक्काने भेटता येत असतं- त्या मधे तो पूर्वीचा लपून छपून भेटण्याचा आनंद मात्र गमावलेला असतो. ती हुर हुर.. अजून कशी आली नाही ?? भेटण्याची वेळ दहा वाजता असेल तर ९ वाजताच जाउन पोहोचणे, आणि तिला पण ९ वाजताच त्या ठिकाणी आलेली पाहिल्यावर होणारा आनंद- क्षणिक असला तरी पण परिपूर्ण असतो.

लग्नामधे सनई चौघड्यांच्या नादा मध्ये तिच्या गळ्यात हार घालतांना मनात येणारे भाव म्हणजे जबाबदारीची जाणिव करुन देणारे! लग्न होतंय म्हणून आनंद नसतो झालेला- पुढे कसं काय होईल ही भावना सारखी मनात डोकावत असते! तिच्या मनात तेंव्हा काय असेल बरं??

लग्नानंतर तुम्ही बाप होणार ही बातमी जेंव्हा कळते तेंव्हा मनात जे कुठले भाव येतात तो म्हणजे आनंद का? कदाचित क्षणिक आनंद असतो, पण ताबडतोब  काळजी वाटु लागते. तिच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनच एकदम बदलतो. काही तरी बहुमूल्य गिफ्ट तुम्हाला ती देणार .. मग तिची इतकी जास्त काळजी वाटते, पण ती  काळजी कशी करायची हेच समजत नाही. नुस्ता वेंधळेपणाच असतो झालं.

पहिली बाइक घेतो स्वतःच्या पैशानी. त्याचा आनंद मात्र बरेच दिवस टिकतो ( मॅन्स मेंटॅलिटी)तसेच पहिली कार घरी आणल्यावर ( आमच्या काळी सेकंडहॅंड असायची ) तरी पण घरी गेल्यावर बायकोला निरांजनाचं तबक आणून त्या कारची पुजा करतांना पाहिलं की जो आनंद होतो, तो  अगदी अवर्णनीय असतो.नंतर त्याच कारमधे बसुन चक्कर मारायला-फिरायला नेल्यावर होणारा आ्नंद प्राइसले्स !!.आज पर्यंत पाच वेळा कार बदलल्या. पण पहिली सेकंडहॅंड कार घेतल्यावर झालेला आनंद  मात्र  पुन्हा उपभोगता आला नाही. पहिलटकरणीचा आनंद होता तो.

आनंद खरं तर दोन प्रकारात डिव्हाइड केला जाउ शकतो, एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरा सामाजिक. जाउ द्या . आनंदाची व्याख्या कशाला करायची?

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/happiness-logo.gif)क मात्र मला नक्की समजलंय की आपलं मन  हे मर्कट बुद्धी असतं, ते तुम्हाला आनंद  फार काळ उपभोगू देत नाही. आनंदाच्या महासागरात तुम्ही पोहायला उतरलात की   ताबडतोब वास्तवाच्या  काळजी , हुरहुर इत्यादींच्या डोहात  आणून सोडते.