लोथल, मृतांचे शहर.

Written by  on May 31, 2004
लोथल शहराचा प्लान असा होता. आर्टीस्ट ने काढलेले चित्र.

लोथल शहराचा प्लान असा होता. आर्टीस्ट ने काढलेले चित्र.

मोहनजोदारो आणि हरप्पा हे शब्द मी चौथ्या वर्गात असतांना ऐकले होते.  यातला हरप्पा शब्द म्हणायला खूप मजा वाटायची. इतिहासातला तो धडा फक्त या हरप्पा मुळे लक्षात राहिला. इतिहास तसाही माझा आवडता विषय ,  हडप्पा संस्कृती २५०० ते ३०००  इसवीसन पूर्वीची होती म्हणजे नेमकं काय ते समजण्याचं वय पण नव्हतं ते, आणि त्यामुळेच त्याचा सिरियसनेस पण नव्हता. तरी पण या जागेला एकदा तरी पहायचं हे मनात ठरवले होते. या जुन्या ऐतिहासिक वास्तू/जागा पहाण्याची आवड फार नंतर निर्माण झाली.  आणि आता तर अशी परिस्थिती आहे, की एखादं असं चांगलं ठिकाण असले की वेळात वेळ काढून मी तिथे हमखास भेट देतो  .

मोहन्जोदारो आणि हरप्पा संस्कृतीचे अवशेष मुख्यत्वेकरून पाकिस्तान मध्ये सिंध प्रांतात  आहेत. आता पाकिस्तानात जाऊन ते अवशेष पहाणे तर शक्य नाही. पण एकदा कामाच्या निमित्याने जेंव्हा

अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा  असेच त्याच काळातले एक शहर अहमदाबाद जवळ सापडले आहे अशी माहिती मिळाली.. भारतीय पुरातत्त्व खात्याने १९५५ च्या सुमारास उत्खनन करून मोहन्जोदारो हरप्पन संस्कृतिच्या काळचे काही अवशेष शोधून काढले. अवशेष म्हणण्यापेक्षा पूर्ण गावच शोधून काढले म्हंटले तरी हरकत नाही. ती जागा म्हणजे लोथल.

लोथल! अहमदाबाद पासून साधारण ८० – ९० किमी अंतरावर आहे. अहमदाबादला गेल्यावर लोकं काय पहायचं म्हणून नुसता विचार करत बसतात, पण अहमदाबादला  इतके काही पहाण्यासारखे आहे की कमीत कमी तीन दिवस तरी पूर्ण  लागू शकतात.

ही लोथलची साईट जरा वेगळ्याच मार्गावर असल्याने इथे कधीच जाणे झाले नव्हते, पण जेंव्हा सुटी काढून बायको मुलींच्या सोबत  खास सुटी साठी म्हणून अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा मात्र एक दिवस खास राखून ठेवला होता या जागेला भेट देण्यासाठी. तसंही एखाद्या लहान गावी जायचे म्हंटले की खाण्याची आबाळ होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणूनच आम्ही निघतांनाच अहमदाबादच्या कुणाल बेकरी मधून पॅटीस, कोल्ड्रिंक्स, वगैरे खाण्याचे सामान पॅक करून घेतले होते. अगदी सकाळी सकाळी साडे आठच्या सुमारास आम्ही हॉटेल वरून निघालो. लोथल  या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे “मृतांचे शहर”. आणि ते अगदी शब्दशः खरं आहे  हे तिथे गेल्यावर जाणवलं . अगदी चिटपाखरूही त्या ठिकाणी नव्हतं.

गुजरातचे रस्ते चांगले असल्याने प्रवासाचा वेळ फारच  फार लवकर संपतो याची जाणीव होतीच, म्हणून जातांना आधी अडलज ची वाव पाहून मग पुढे निघालो. लोथल! या ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला कार्व्हिंग केलेली मंदीरं, दगड, किंवा मोठे पॅलेस वगैरे पहायला मिळतील अशी आशा मनात ठेऊन गेल्यास निराशाच पदरी पडेल. अर्थात, पाच हजार वर्षापूर्वी बांधलेली  घरं आजही सुस्थितीत असतील अशी कल्पना करौन तिथे गेलात तर निराशाच पदरी पडेल. पण पाच हजार वर्षापूर्वीची संस्कृती कशी आणि किती डेव्हलप झालेली होती हे इथे नक्कीच पहायला मिळेल.

लोथल ला आम्ही पोहोचलो, आणि समोर एक लहानशी एक मजली म्युझियमची इमारत दिसली. लोथलच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू या म्युझियम मधे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या मधे काचेच्या मण्यांच्या माळा, मातीची भांडी, टेरेकोटाची मडकी, खेळणी आणि बरंच काही सामान इथे व्यवस्थित शोकेसेस मधे लावून ठेवलेले आहे. पण फोटो काढण्याची परवानगी नाही. 😦

म्युझियम पाहून झाल्यावर आम्ही उत्खननाच्या जागेवर जाऊन पोहोचलो. सगळी कडे मातीची भांड्यांचे तुकडे पडलेले आहेत. .सहज एक तुकडा उचलला, आणि त्यावर एक काळी रेष ओढलेली दिसत होती. कदाचित कुठल्यातरी एखाद्या मोठ्या चित्राचा तो हिस्सा असावा. तो तुकडा पाच हजार  वर्षापूर्वीच्या काळात कोणी तरी वापरलेल्या भांड्याचा आहे ही जाणीव झाली  आणि अंगावर शहारे आले. पूर्वीच्या काळी धान्य साठवणी करता, पाणी साठवण्यासाठी मातीची भाजून पक्की केलेली भांडी वापरली जायची. इथल्या म्युझियम मधे इथल्या उत्खननात अशी बरीच चांगल्या स्थितीतील रंगवलेली भांडी सापडलेली आहेत.

लोथल म्हणजे गुजरात आणि सिंध प्रांतात असलेल्या मोहंजोदारॊमधे होणाऱ्या व्यापाराचे मुख्य ठिकाण. वाहतूक अर्थातच नदीच्या पात्रातून  केली जायची.  लोथलला एक पाच हजारवर्षापूर्वीचे बांधलेले पोर्ट ( धक्का –   जेटी) आहे. जगातील ज्ञात असलेले हे सगळ्यात जुने पोर्ट. इथून साबरमती नदीच्या पात्रातून अगदी सिंध प्रांतापर्यंत व्यापार चालायचा. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील इंदूस नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या मोहन्जोदारो ( २७० किमी अंतरावर आहे इथून)बरोबरचा व्यापार इथूनच चालायचा.

विहीरीचे बांधकाम असे केले आहे.

विहीरीचे बांधकाम असे केले आहे.

लोथल चे म्युझियम पाहून आम्ही उत्खननाच्या साईट वर निघालो. चारही बाजूंनी कंपाऊंड घातलेले आहे.  आत शिरल्या बरोबर समोर एक विहीर दिसली. साधारण ५००० वर्षापूर्वीची विहीर अजूनही सुस्थिती मधे आहे. खालपर्यंत विटांचे बांधकाम असलेली ही विहीर आहे. मध्यंतरीच्या काळात विहीर बांधायला दगड वापरला जायचा, पण इथे मात्र फक्त विटांचा वापर केल्या गेलेला दिसतो.

विहीरी मधे अजून एक  वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट दिसली. ती म्हणजे विहीरीच्या  बांधकामासाठी वापरलेल्या विटा. या विटांचा आकार  चौकोनी न करता एका बाजूला लहान ठेवला आहे. या आकारामुळे या विटा एकत्र रचल्या की आपोआपच गोलाकार तयार होतो.  ५००० वर्षापूर्वीची ही बांधकामा बद्दलची जाण पाहून आश्चर्य वाटते.

इथे डॉक/पोर्ट  जवळ साधारण दहा एक फुट उंचीच्या चबुतऱ्यावर एक स्टोअर रुम होती. उंचावर असल्याने, त्या गावचा मुख्य वर बसून सगळ्या पोर्ट वर नजर ठेऊ शकत असे.  इथे फक्त चबुतरा शिल्लक आहे. धक्का, म्हणजे पोर्ट चं बांधकाम पण विटा वापरून केलेले आहे, आणि आजही ते सुस्थितीत आहे.

लोथल ला एक काचेचे मणी तयार करण्याची भट्टी आणि तिचे अवशेष पण सापडले आहेत. या ठिकाणी उत्खननात सापड्लेले मणी इथेच तयार केले गेले असावे. त्या मण्यांच्या फॅक्टरी मधे ११ खोल्या आहेत. तयार झालेला माल इथेच ठेवला जात असावा. लोथल हे मायक्रो बिड्स साठी त्या काळी प्रसिद्ध होते.

एक पूर्णपणे वसवलेले शहर म्हणजे लोथल असे म्हणता येईल.खालच्या अंगाला असलेल्या भागात, बाजार पेठ,  कामगारांची रहाण्यासाठी घरं , विहीरी  वगैरे आहेत.  इथे साधारण २५-३० कुटुंबांच्या रहाण्याची सोय केलेली असावी असे अवशेषांवरून वाटते. इथून जवळच एक घराचा चबुतरा दिसतो, तो बहुतेक या गावच्या मुख्य माणसाच्या घराचा असावा. त्या ठिकाणी असलेली बाथरूम, किचन आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या विटांच्या नाल्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत, आणि त्या काळच्या डेव्हलपमेंटची साक्ष देतात, म्हणूनच याला आर्किटेक्चरल मार्व्हल म्हणता येईल.  एका ठिकाणी तर अतिशय उत्तम स्थिती मधे असलेली  पाणी साठवण्याचे सोय पण दिसुन येते. या पाणी साठवणीच्या वस्तूला बरे लोकं फरनेस समजतात. पण फरनेस सध्या नामशेष झालेली आहे, आणि फक्त अवशेष शिल्लक आहेत.त्यांना पण जाळीने झाकून बंदिस्त करून ठेवले आहे.

हे  इतके डेव्हलप असलेले शहर नामशेष होण्य़ाचे कारण म्हणजे नदीला आलेला पूर. त्या पुरानंतर  इथे रहाणारे लोकं विस्थापित झाले. ज्या पाण्यासाठी त्यांनी इथे शहर  बसवले होते त्या पाण्यानेच त्यांचा घात  केला.

तसं म्हंटलं तर लोथल ला काहीच नाही, आणि म्हंटलं तर बरंच काही आहे. जर तुम्हाला पुरातन वास्तू मधे, आर्किओलॉजी मधे काही इंटरेस्ट असेल तर ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल.  अहमदाबाद पासून केवळ ८० किमी वर असलेली ही जागा  पुढल्या वेळेस अहमदाबादला गेल्यावर मिस करू नका .

(इथे मोहंजोदारो आणि हरप्पन संस्कती बद्दल जास्त काही लिहलेले नाही, कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त या जागेची ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न.)

वास

Written by  on May 5, 2004

नवीन कोऱ्या पुस्तकाचा वास, छापलेल्या शाईचा वास, पाउस पडून गेल्यावर येणारा जमिनीचा वास.. अरे हो… हा जमिनीचा वास प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो. मुंबईला पाउस पडल्यानंतर येणारा वास एका वेगळ्याच प्रकारचा असतो.घराजवळंच सगळं अंगण ( मुंबईला अंगण?? हसू येतंय ना? पण हो, मला तोच शब्द सुचतोय लिहायला) आणि त्यावरच्या पावसाचा वास, आणि लोकलच्या स्टेशनवरचा , रेल्वे ट्रॅकचा वास, किंवा मार्केट मधला भाजी पाला सडल्या नंतरचा येणारा वास.. सगळे वास स्वतःची एक कहाणी सांगत येतात. तुम्हाला ती कहाणी ऐकु आली तर ठीक, नाहितर च्यायला,कसला घाण वास आहे म्हणून नाकाला रुमाल लाऊन पुढे जाल तुम्ही.

लहानपणी शाळा सुरू झाली की नवीन पुस्तकं आणल्यावर त्यांचा वास, बुटांना पॉलिश केल्यावर येणारा वास, आईने डब्यामधे   तेल लोणचं आणि बारीक चिरलेला कांदा ,काळा मसाला , आणि तेल कालवीन दिलेल्या वरणाचा सुगंध, सोबत दिलेल्या तूपसाखर पोळीच्या गूंडाळी चा सुगंध. किती म्हणून सांगु??

peepal

लहानपण अगदी लहान गावात गेलं त्यामुळे लहानपणचे वास अगदी नाकात पक्के बसलेले आहेत.लहानपणी पिंपळाच्या /वडाच्या झाडाखालून पाउस पडल्यानंतर जातांना येणारा वास खूप आवडायचा. त्या पानाची  सळसळ, आणि चुकार पणे अंगावर पडणारे थेंब…. तो वास आणि अनुभव पण खूप वेगळा असायचा.

वडाच्या किंवा पिंपळाच्या वर बऱ्याच पक्षांची घरटी असायची. त्यामुळे पक्षांचा मुक्काम नेहेमीच असायचा या झाडांवर. पक्षांच्या विष्ठेत बऱ्याच झाडांच्या बिया पण न पचलेल्या अवस्थेत असतात. पक्षांच्या  बिटच्या मुळे खालची जमीन खूप सुपीक ( बरोबर नां?) व्हायची आणि वेगवेगळ्या रोपांना जन्म द्यायची.

IMG_0907प्रत्येक रोपाला पण एक वेगळाच वास असायचा. आमच्या इथे काही घरांशेजारी  फुलांचं झाड असायचं , एकाच फुलामधे ५०-६० वेग्वेगळ्या रंगाची बारिक फुलं असायची. त्या गुच्छाला थोडा जरी स्पर्श झाला तरी त्याचा एक रानटी दर्प हाताला लागायचा.इतरांना जरी तो वास नकोसा होत असला तरी मला तो रानटी वास खूप आवडतो.

समोरच्या महादेव मंदिराच्या कुंडातल्या साचलेल्या शेवाळ्याचा पाउस पडल्यावर असा विचित्र वास का येतो ते मात्र कधीच समजलं नाही.

अगदी १०-१५ दिवसांच्या बाळाला जवळ घेतल्या नंतर स्वतः मधे प्रोटेक्शनिस्टची भावना निर्माण करणारा वास पण मनात घट्ट बसलाय.समोरच्या  बागेतली काळी माती अगदी नरम झालेली आणि त्यात पाय पडल्यावर पायाबरोबर बाहेर आलेला गांडूळ आणि त्या मातीचा वास एकदम नकोसा वाटायला लागतो.

आईच्या हातचा सत्तुच्या पीठाचा वास,काळा (गोडा) मसाला ,   चकली ची वेगळी चव आणि वास, आईच्य़ा हातच्या पुरणपोळीचा वास, लहानपणी श्रावणीच्या वेळेस घेतलेल्या पंचगव्याचा वास, कित्ती कित्ती वास असतात नां…बायकोने कितीही जीव तोडून केलं तरीही आईच्या हातची चव नाही जमली. किंवा ’तसं’ नाही जमलं .. असं वाटतं नां? कोणी मोठ्याने बोलत नसेल पण मनात येतं ना — एकदा तरी… बरंं चुकिने तरी? काही लोकं मान्य करतील , तर काही अगदी मान्य करणार नाहीत.

पाउस पडला की  लहानपणी आमच्या घरासमोरच्या शामबाबुच्या गॅरेजचा पण वास बदलायचा. वर्षभर जमिनीवर फेकलेले वापरलेले लुब ऑईल आणि ग्रिस, कॉटन वेस्ट, थिनर, पेंट यांचा सम्मिश्र वास पण एक वेगळंच निमंत्रण द्यायचा, या आणि बघा.. या पावसाने काय केलंय मला.

नवीन कारची डीलीव्हरी घेतली काल.नवीन कारचा वास.. आतल्या सगळ्या पॉलिमर्सचा तीव्र सुगंध आणि सिटकव्हरचा वास..पायाखालच्या रबर मॅट्सचा वास, सिटकव्हर लावणं बाकी असल्यामुळे प्लॅस्टीक कव्हर न काढल्याने त्याचा पण येणारा वास..पेट्रोल चा एक सुगंध आणि कारच दारं बंद केल्यानंतर सगळ्यांच्या निरनिराळ्या पर्फ्युम्सचा/ डिओ’ज चा एक संमिश्र सुगंध जेंव्हा काल अनुभवला , तेंव्हाच क्षणभरात वर लिहिलेले सगळे वास आठवले.

मित्रांनो.. वर बऱ्याच ठिकाणी वास हा शब्द सुगंध या अर्थाने वापरलेला आहे.मला वाटतं या वासावर कितीही लिहिलं जाऊ शकतं..

अरे वा… हे काय , मी चक्क ललित लिहिलं की.. चला इम्प्रुव्हमेंट आहे तर !! 🙂