किंगफिशर रुल्स!!

Written by  on December 22, 2003

पुर्वी फक्त इंडीयन एअरलाइन्सच होतं.सगळा एकाधिकार होता.  आणि इंडीयन ची महती काय वर्णावी? टिपीकल नोकर शाही.. हिरव्या रंगाचं नेलपेंट, आणि जांभळी लिपस्टिक लावलेली एज बार झालेली एअर होस्टेस, तिचा तुमच्यावर उपकार केल्या प्रमाणे दिली जाणारी सर्व्हिस .. जितकं लिहावं तितकं थोडंच आहे. कांही दिवसांनी एखादी म्हातारी कंबरेत वाकलेली आणि हातात काठी घेउन वाकत चालणारी  एअर होस्टेस दिसली तर हमखास समजा.. ती नक्कीच इंडियन एअरलाइन्सची आहे म्हणून  🙂

अहो, इतक्यातलीच गोष्ट आहे.. मला वाटतं की मागच्याच आठवड्यात मी सकाळी औरंगाबादला गेलो होतो. जातांना सकाळच्या जेटने गेलो, पण परतिचं तिकिट मात्र संध्याकाळची ५ -१५ च्या इंडीयन एअर लाइन्सचं होतं. एअरपोर्टला गेलो, आणि गेटवर फोटॊ आयडी दाखवुन आत शिअरलो.. चेक इन काउंटरवर तिकिटाचा प्रिंट आउट आणि ऑफिसचं आय कार्ड दिलं.. तर तो काउंटरवरचा माकड मला म्हणाला की हे ऑफिसचं आय कार्ड चालत नाही.(???) पॅन कार्ड दाखवा..माझं टाळकं सरकलं.. म्हंटलं नाही आहे.. तू नकॊ देउस बोर्डींग पास.. !!  प्रिंट आऊट परत दे, आणि त्यावर लिही की पॅन कार्ड नसल्यामुळे बोर्डींग पास देता येत नाही म्हणुन.. मग मी पहातो काय करायचं ते….  यावर त्याने काही न बोलता बोर्डींग पास हातात ठेवला..

म्हणजेच काय.. तर त्याची इच्छा मला त्रास द्यायची होती… अशा त्रासदायक मनोवृत्तीचे  बरेच लोकं इंडीयन एअरलाइन्स मधे आहेत.मला वाटतं की त्याची इच्छा अशी असावी मी त्याची मनधरणी करुन , कसंही करुन मला  प्रवास करू द्या हो,  .. वगैरे म्हणेन .. आणि मग माझ्यावर उपकार केल्याच्या आविर्भावात तो माकड मला बोर्डींग पास इशु करेल. पण त्याच्या प्लॅनवर मी बोळा फिरवला.अर्थात.. हे सगळं मला त्रास देण्यासाठीच तो बोलत असावा.  त्याचा   उद्देश सरकारी बाबुगिरी प्रमाणे स्वतःचे नसलेले इम्पॉर्टन्स दाखवणे.. असाच काही तरी असावा..

इंडीयन एअर लाइन्स केवळ फुल सर्व्हिस एअर लाइन आहे , म्हणून जेट लाइट पेक्षा जास्त प्रिफर करतो आजकाल, नाहितर ही एअरलाइन्स अगदी थकलेली आहे.. अगदीच नाइलाज असेल तर प्रवास करतो मी ईंडियन ने..अशा प्रकारचे विचित्र अनुभव तुम्हाला पण आले असतीलच.. जेंव्हा इंडियन एअर लाइन्सला पुर्णपणे कंटाळलॊ होतो.. आणि कांहीतरी बदल व्हावा या एअरलाइन्स मधे,  असं वाटत असतांनाच  जेट  एअर सुरु झाली. सुरुवातीला फारच कमी फ्लाइट्स होत्या. पण लवकरच सगळा भारत कव्हर केला जेट ने..

नेहेमी प्रवास करावा लागायचा त्यामुळे इंडीयन एअरलाइन्सचं फिक्वेंट फ्लायर कार्ड पण विकत घेतलं होतं.. असं आश्चर्यानं काय वाचताय?? अहो खरंच तेंव्हा इंडीयन एअरलाइन्स फ्रिक्वेंट फ्लायर कार्डच्या रजिस्ट्रेशन साठी पण १००० की १५०० रुपये घ्यायची. किती ते नक्की आठवत नाही!आजकाल तर कुठलिही एअरलाइन्स फ्रिक्वेंट फ्लायर कार्ड साठी चार्ज करित नाही.

माझा जेट चा प्रवास कसा सुरु झाला ? तर एकदा इंडियनच चे तिकिट न मिळाल्यामुळे जेंव्हा गोव्याला जेटने जावे लागले( ही गोष्ट आहे सात आठ वर्षांपूर्वीची, जेंव्हा जेट ही फुल सर्व्हिस एअरलाइन होती तेव्हाची), तेंव्हा जेट च्या सर्व्हिसने खूप इम्प्रेस झालॊ आणि   ताबडतोब  इफेक्ट  म्हणजे जेट ने प्रवास करणे सुरु केले, आणि इंडियन एअरलान्स ला राम राम ठोकला.. 🙂 पुढची ५-६ वर्षं बरी सर्व्हिस होती जेट ची. पण हे सहारा, आणि जेट लो कॉस्ट सुरु झालं आणि एखाद्या राजवाड्याचं झोपडीत रुपांतर व्हावं तसं झालंय जेट एअर लाइन्सचं.

जेट एअर जेंव्हा सुरु झाली तेंव्हा अगदी खूपच लो प्रोफाइल वर सुरु झाली होति, थोड्या फार फ्लाइट्स होत्या….

अगदी सुरुवातीच्या काळात जेट च्या फिक्वेंट फ्लायर प्रोग्राम मधे जर तुम्ही वर्ष भरात सोळा वेळेस प्रवास केला तर सिल्व्हर कार्ड दिलं जायचं. माझ्या सोळा फ्लाइटस तर अगदी दोन तिन महीन्यातंच झाल्या . आणि जेट प्रिव्हिलेजेस मिळणं सुरु झालं.. जसे… टेली चेकिन आणि लाउंज मधे एंट्री. लाउंजमधे बरा स्प्रेड असायचा स्नॅक्स आणि कॉफी वगैरे चा. जर इच्छा असेल तर एक बिअर पण मिळते .. अजूनही ही बिअरची फॅसिलिटी मुंबई, दिल्ली एअरपोर्टवर आहे. आता एक पिल्लु बिअर घेतल्याने काही होत नाही, म्हणून मग मास्टरकार्डवर पण एक बिअर फुकट मिळते.. 🙂 जरी तुमच्या कडे कुठल्याही एअरलाइन्सचं फ्रिक्वेंट फ्लायर कार्ड नसेल तरीही मास्टरकार्ड दाखवून तुम्ही लाउंज मधे प्रवेश मिळवू शकता..

मुंबई एअरपोर्टचा लाउंज ओबेरॉय मॅनेज करतं त्यामुळे क्वॉलिटी चांगली असते स्नॅक्सची. लंच टाइम मधे तर मुंबई, दिल्ली इत्यादी एअरपोर्टला सरळ लंच स्प्रेड लावुन ठेवलेला असतो लाउंज मधे! या लाउंजला आम्ही जेट एअरवेज चा लंगर म्हणतो.  एक दिवस तर बोर्डींग पास घेतांना तिने लाऊंजचे कार्ड दिलं नाही तेंव्हा अगदी न कळत त्या मुलीला म्हंटलं, जरा लंगर कार्ड देना.. तिने माझ्या कडे पाहिलं आणि जोर जोरात हसायला लागली.. !!! म्हणाली सर .. यु हॅव युज्ड ऍन अप्रोप्रिएट वर्ड फॉर लाउंज!! असो.. असं होतं कधी तरी…!

या नंतर बरिच वर्ष जेट ला पॅट्रोनेज करित होतो. पण हल्ली जेट ने आपलं स्टॅंडर्ड खुपच खाली आणुन ठेवलंय. पहिलं म्हणजे कधी तरी मेसेज येतो.. की जेट लाइट ( जुनी सहारा) ने प्रवास करतांना तुम्हाला लाउंजमधे प्रवेश मिळणार नाही.. नंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला, की जेट ने नविन लो कॉस्ट एअरलाइन सुरु केलेली आहे, आणि त्या एअरलाइनने प्रवास करतांना पण लाउंज फॅसिलिटी वापरत येणार नाही. असे रेगुलरली ह्युमिलिएट करणारे मेसेजेस आले की मग मी इरिटेट होतो. माझ मत पक्कं आहे.. कर्ट्सी इज एक्स्टॆंडेड..व्हॉलेंटिएअरिली.. इफ कर्टसी इज डीमांडेड  इट बिकम्स चॅरिटी!!या सगळ्या मेसेजेस, आणी इतर फॅसिलिटीज विथ्ड्रॉ केल्या पासुन मी जेट चा प्रवास पुर्ण पणे बंद केलेला आहे.

नंतर एकदा जेट लाइटने अहमदाबाद ते मुंबई प्रवास केला तेंव्हा लक्षात आलं , की एक लहानशी दोनशे एम एल ची बाटली ( अहो पाण्याची) फ्री दिली जाते, आणि जर एक्स्टॉ पाणि हवं असेल तर मात्र त्याचे पैसे द्यावे लागतिल. स्नॅक्स वगैरे पण सगळं काही चार्जेबल.

या प्रवासात ते सी सी डी चे प्रॉडक्ट्स विकतात. कॉफी मागवली तर तिने कप समोर ठेउन पाणी ओतलं . त्या कपात कॉफी प्रि मिक्स होतं टाकलेलं . मी जेंव्हा तिला म्हंट्लं की कॉफी टेस्टलेस आहे आणि मला नकोय.. तर तिने सॉरी म्हणुन परत घेतली. आणि पैसे परत द्यायला लागली. मी तिला म्हणालो, की पुर्वी तुम्ही ज्या पाउच द्यायच्या त्या नाहित कां? मला एक पुर्ण पाउच आणुन दे. पुर्वी कप+प्रिमिक्स्चा पाउच द्यायची.  आणि तिने ती आणून दिली. म्हणाली, सर आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत की एक पाउचमधे दोन कप बनवा कॉफी म्हणुन.आता एका पाउचचे दोन कप करतात हे भिकारडे जेट वाले… ( ती मराठीच होती!) .. अशा तर्हेने बेस्ट एअरलाइन्सचे अवॉर्ड सातत्याने चार पाच वर्ष जिंकणारी एअरलान कचरा एअर लाइन मधे परिवर्तित झालेली आहे.

एकदा पुर्वी एक पोस्ट टाकलं  होतं, तेंव्हा गिरिश म्हणाला होता कॉमेंट मधे के एफ ( किंग फिशर ) ट्राय कर म्हणुन! किंग फिशर ने म्हणुन प्रवास करुन पाहिला, आणि मी चक्क प्रेमातच पडलो. बेस्ट सर्व्हिस एअरलाइन्स म्हंट्लं तरिही हरकत नाही. कॅप्टन गोपिनाथचं एअर डेक्कन पण किंगफिशर रेड झालंय.

विजय मल्ल्याने टेकओव्हर केल्यापासुन या एअरलाइन्सचं रुपडंच पालटलंय. तो अगदी विचित्र युनिफॉर्म इतिहास जमा होऊन , के एफ चा स्पेशल रेड युनिफॉर्म दिलाय स्टाफला. आणि स्टाफ एफिशिअन्सी पण खुपच चांगली आहे.. सध्याच्या परिस्थितित किंग फिशर इज द बेस्ट!!पुर्वीची लो कॉस्ट एअरलाइन्स पण आता अजुनही लो कॉस्ट एअरलाइन असुनही  फुल सर्व्हिस देते. माझ्या तर्फे किंग फिशरला शंभर टक्के मार्क.. हल्ली माझा सिक्वेन्स बदललाय तिकिट बुक करतांनाचा. पहिला किंग फिशर, दुसरा इंडियन एअर , तिसरा जेट लाइट!!

काल इंदौरला आलो ते किंग फिशर रेड नेच!

थांबवतो आता इथेच.. बराच मोठा झालाय लेख..

लोकल मधल्या गप्पा…

Written by  on December 21, 2003

मुंबईकर  तीन गोष्टींच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे  म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नवीन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर चर्चा करण्याचा खेळ आहे 🙂   पण  क्रिकेट व्यतिरिक्त अजून दोन गोष्टी आहेत की ज्यावर चर्चासत्र सगळीकडेच झडतांना दिसतील तुम्हाला – अगदी लोकल पासून तर ऑफिस  लंच टाइम मधे सगळीकडे!! या विषयावर बोलतांना कधीच थकत नाहीत मुंबईकर.

मुंबईकर मंडळी मुळातच चर्चाळू !! आता चर्चाळू म्हणजे  कशावरही चर्चा करायला  आवडणारा. भर उन्हाळ्यात पण लोकल मधे कसल्या तरी मुद्यावर( मग तो आयपीएल असो की आज सकाळी बायकोने नाश्ता करायला शिळी चपाती आणि आम्लेट दिलं  यावर अ्सो ) चर्चा करतांना  मुंबईकर इतका रंगून जातो (आणि तो इतका सेन्सिटीव्ह आहे) की त्याला स्थळ, काळ कसलंच भान रहात नाही. या वर्षी तर आयपीएल बरोबर शशीथरुर , ललित मोदी बरोबर सुनंदा पण होती तोंडी लावायला- मग काय मुंबईकरांची मज्जाच मज्जा!! लोकल मधे माझे तर महिनाभर अक्षरशः कान किटले सारखं तेच ते आयपीएल बद्दल ऐकून. 🙂

एकीकडे उन्हामूळे अंगाची होणारी काहली,  हवेचा कणही जायला जागा शिल्लक नसलेल्या गर्दी मुळे  लोकल मधे  कसा तरी उभा राहून , आणि घामाने भिजलेल्या शर्टकडे ( फक्त शर्टच नाही तर अगदी अंतर्वस्त्रापर्यंत सगळं भिजलेले असते) संपुर्ण दुर्लक्ष करून  ,  झालेल्या घामोंळय़ाची  काळजी न करता,एकमेकांशी   चर्चा करतांना – बरेचदा तर अहमहमिकेने भांडताना  मुंबईकराला लोकल मधे पाहिलं की धन्य  धन्य वाटतं.  आणि सहन त्याच्या सहनशक्तीचा आदर वाटतो. असो मुद्द तो नाही.

कांद्यांची माळ..

उन्हाळ्यामधे,   मंगळवारी सिद्धिविनायकाला गेल्यावर   फुलांची माळ  घालायला एक वेळ मुंबईकर विसरला- असं ऐकलं तरीही मी विश्वास ठेवेन पण   मुंबईकर मराठी माणसाने उन्हाळ्यात   कांद्याची माळ आणली नाही हे जर कोणी सांगितलं तर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही. या कांद्याच्या माळेचं आणि मराठी मुंबईकराचं फारच जवळचं सख्य  आहे .

सुरुवातीला  म्हणजे मार्केटला जेंव्हा येते तेंव्हा या माळेचा १४० ते १५० पर्यंत भाव असला, तरीही खरा मुंबईकर  माळ विकत घेणार म्हणजे घेणारच! माळेच्या कांद्याची चव फक्त मुंबईकरच जाणतो, त्यामूळे पांढरा माळेचा कांदा, हा विकत घेतलाच जातो.

एखाद्याच्या टीफिनमधे लंच टाइम मधे माळेचा कांदा दिसला की ताबडतोब त्यावर डीस्कशन सुरु होतं . आला का मार्केटला?? कितीला आहे माळ  एखादा आसुसलेला  माणूस विचारतो. कांद्याच्या माळेच्या भावाची चीरफाड सगळे जण सुरु करतात – कित्ती महाग झालाय हल्ली.. ज्याने अजून माळ आणलेली नाही, तो मनातल्या मनात ठरवतो, की हो आता आजच घरी जातांना मंडपातून न्यायची घरी माळ म्हणून. थोडं विषयांतर .. हे   अकलेचे कांदे म्हणतात ते कॊणाला? हा मला पडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.दुसऱ्या दिवशी  पासून सगळ्यांच्याच डब्यात माळेचा कांदा दिसायला लागतो.

घरी पण येता जाता स्वयंपाक घरात “कांद्याची माळ” खुंटीवर विराजमान झाली की बगळ्यांची माळ फुले च्या चालीवर कांद्यांची माळ  फुले अजुनी खुंटीवर  हे गाणं सारखं  आठवत असतं.

उन्हाळ्याची चाहूल आंब्याची चाहूल असते.उन्हाळा येतो तो घाम ,वैताग, गरमी हे सगळं घेउन. उन्हाळा एकच आनंदाची गोष्ट घेउन येतो  ती म्हणजे ’हापुस’ !!! येणार- येणार म्हणुन आधीपासूनच गाजावाजा झालेला हापुस म्हणजे तर मुंबईकरांचा  -विक पॉइंट!  मुंबईकरांचा काय, हापुस तर अख्ख्या जगाचा विक पॉइंट आहे .

मटा मधे बातमी येते की हापुसची पहिली पेटी चार हजारात विकली गेली म्हणून. अर्थात ही पेटी नक्कीच कुठल्या तरी गुजराथी/पंजाब्याने  घेतलेली असते. त्या ऑक्शनला मराठी माणुस गेला असेल का? हा प्रश्न मला नेहेमीच छळत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकल मधे कोणीतरी पेपर उघडतो, अन त्यावर चर्चा सुरु होते. आंबे कसे महाग झाले आहेत, चांगला माल कसा दुबईला एक्सपोर्ट होतो आणि सेकंड क्वॉलीटी भारतात विकला जातो ,वगैरे.

हापुस आंबा.

को्णीतरी नुकतंच कोंकणात जाऊन आलेलं असतं, तो सांगत असतो, की   यावर्षी आंबा चांगला येणार नाही कारण परवाच्या वादळात सगळा मोहोर गळून पडला – वगैरे.त्याने एवढं सांगितलं की सगळ्या ऐकणाऱ्यांच्या चेहेऱ्यावरचे काळजी युक्त भाव अगदी दगडी मनाला पण पाझर फोडणारे असतात.

च्यायला- साला आंबा नाही या वर्षी म्हणजे काय़? मागल्या वर्षी आम्ही चक्क ४८० रुपयांच्या भावाने खाल्ला हो आंबा.  आता या वर्षी किती होणार भाव कोण जाणे. नाहीतर आपल्याला राजापुरीवरच समाधान मानावं लागेल असं दिसतंय. तेवढ्यात दुसरा कोणीतरी मधेच बोलतो, आम्ही तर गोखल्यांच्या कडूनच आंबे घेतो बॉ! खात्रीशीर माल असतो त्यांचा  -देवगडचा. थोडा महाग असला तरीही क्वॉलिटी गॅरंटेड असते.

मधेच कोणीतरी आम्ही मागल्या वर्षी गांवी गेलो होतो आणि तिथुन आणलेला हापुस कसा मस्त होता ते रंगवून सांगत असतो, तेवढ्यात कोणीतरी  एखादा त्याचा त्याची टांग खेचतोच..  अरे तू महाडचा ना? मग महाडला कसले रे ते हापुस? कायच्या काय बोलतंय बग येडं…. अन सगळे लोकं अगदी पोट धरधरून हसतात.

तेवढ्यात दुसरा कोणीतरी आमच्या ऑफिसातल्या दात्याची बाग आहे म्हणे रत्नांग्रील , तिकडून मागवतो तो दरवर्षी आंबे (खरं तर कोंकणात  दातेंची बाग आहे – हे सगळं ऐकीव असतं, कोणीही ती बाग पाहिलेली नसते- पण  हापिसातल्या कोणालाही विचारा, दात्यांची बाग कोंकणात हे  छाती ठोकपणे सांगेल कोणीही  )  🙂 याच कमावलेल्या नावाच्या मिळकतीवर दातेबुवा आपला वार्षीक उद्योग ( धंदा)  चालवत असतात.

सगळेच (ओरिजनल कोंकणात  मूळ गांव असणारे )  मुंबईकर, “आमच्या गांवी- दहा पोफळी, अन दहा आंबा आहेत बरं का!” असं नेहेमीच सांगत असतात. मुंबईला रहाणाऱ्या सगळ्या कोंकणातल्या ओरिजिनल चाकरमान्यांच्या   आंब्यांच्या  झाडांची टोटल केली तर ती नक्कीच कोंकणातल्या  खरोखरीच अस्तित्वात असलेल्या झाडांच्या संख्येच्या  दहा पट ( की शंभर पट??)  तरी होईलच यात काहीच शंका नाही.

हापुस मुंबईला आला, की ह्यावर सगळ्यात जास्त चर्चा होत असतात. मग नाक्यावरचा भैय्या कसा पायरीला हापूस म्हणुन विकतो, पासून ते कार्बाईड वापरुन पिकवलेल्या आंब्यापेक्षा खरा नॅचरल पिकलेला आंबा कसा चांगला? ह्या विषया पासून तर कोणी कोंकणात जाणार आहे कारे?? माझी पण एक पेटी आण….  इथ पर्यंत पोहोचते.

जगामधे मोस्ट फोटॊग्राफ्ड मॉन्युमेंट म्हणून ताजमहालाचं नांव आहे, तसंच जर मोस्ट डिस्कस्ड फ्रुट – म्हणुन फळाचं नांव शोधलत  तर ते अर्थातच आंब्याचं नांव असेल यात दुमत नाही.

ब्लॅकबेरी वापरत असाल तर…

Written by  on December 4, 2003

bbपरवा एक फोन आला होता, एक स्त्री होती, म्हणाली की मी दिल्लीहून बोलते आहे, आणि तुम्ही रोहन ला ओळखता का?  हा प्रश्न अगदी साधा सरळ वाटतो. होय, ओळखतो असे उत्तर दिल्यावर , ती बाई म्हणाली की  ” रोहन वर एक फोर्जरी चा गुन्हा दाखल झालेला आहे, आणि विटनेस म्हणून तुमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला आता दिल्ली कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतील. लगेच लक्षात आलं, की हा फ्रॉड फोन आहे आणि सरळ फोन कट केला. पहिले काम केले ते रोहनला मेल पाठवला, आणि त्याचे उत्तर अर्थातच अपेक्षित होतं, ती बाई फ्रॉड आहे, तिने बऱ्याच लोकांना असे फोन केले आहेत, तेंव्हा लक्ष देऊ नकोस.

हे कसं काय झालं असावं? एक म्हणजे हरवलेला फोन कोणाच्या तरी हाती लागला असेल का?

मोबाइल फोन हरवणे म्हणजे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तसाही मोबाईल आल्यापासून आपली स्मरणशक्ती कमी झाल्याचे मला जाणवते. पूर्वी आपण डायरी मधे नंबर पाहून मग तो डायल करायचो, त्या मुळे नंबर्स लक्षात रहायचे, पण हल्ली आपण मोबाइल मधे केवळ नाव पाहून डायल करतो त्यामुळे नंबर वाचायचे कामच पडत नाही- आणि हेच कारण असावे बहुतेक , नंबर्स लक्षात न रहाण्याचे.

मोबाईल चोरीला जाणे हे दुःस्वप्न मी बरेचदा अनुभवले आहे. अगदी पहिल्यांदा मोबाईल जेंव्हा हरवला होता, तेंव्हा तर सगळे नंबर्स पण गेले होते, आणि मग एक – एक करून पुन्हा सगळे नंबर्स जमा करायला खूप त्रास झाला. त्यातही काही महत्त्वाच्या संपर्काचे नंबर्स तर पुन्हा मिळूच शकले नाहीत.सुरुवातीच्या काळात मोबाईल चा आकार खूप मोठा होता आणि तो कम्प्युटरला कनेक्ट केला जाऊ शकत नव्हता. त्या मुळे मोबाईल  हरवला की सगळा डेटा  पण जायचा. कॅमेरा नसल्याने फोटो वगैरे दुसऱ्याच्या हाती लागण्याची भिती नसायची.

हजार एक फोन नंबर्स, तेवढेच इ मेल अ‍ॅड्रेसेस , डेबिट कार्डचे पास कोड्स, काही पासवर्ड्स,  वाढदिवस, काही महत्त्वाच्या घटना  वगैरे सेल फोन वर सेव्ह करून ठेवायची सवय मला आहे- आणि बहुतेक सगळ्यांनाच असते.  पण जर कधी मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर  हा सगळा डेटा जर एखाद्या गैर व्यक्तीच्या हाती लागला तर ?

सिंबियन फोन नंतर आलेल्या अ‍ॅंड्रॉइड फोन ने मात्र  हा प्रॉब्लेम बराच प्रॉब्लेम कमी झालेला आहे. फोन हा कॉम्प्युटरला कनेक्ट केला जाऊ शकल्याने सगळ्या फोन नंबर्स चा वगैरे बॅक अप फोन वर घेऊन ठेवता येऊ शकतो. आणि जरी फोन हरवला तरी हा सगळा डेटा पुन्हा कम्प्युटर वरून नवीन सेल फोन वर टाकला जाऊ शकतो. पण त्या चोरीला गेलेल्या मोबाइल वरचा डेटा  त्या चोराच्या हाती लागला असेल त्याचे काय? 😦 मी मात्र सिंबियन फोन वरून सरळ ब्लॅक बेरी वर गेलो.

नुकताच माझा ब्लॅक बेरी बोल्ड चोरीला गेला, आणि नंतर मी नवीन फोन घेऊन, ब्लॅकबेरी प्रोटेक्ट   वरून सगळे नंबर्स,  डेटा डाउनलोड करून पुन्हा फोन  वापरणे सुरु पण केले. जुन्या फोन  बद्दल तर मी विसरून पण गेलो होतो.

ब्लॅक बेरी वर ब्लॅक बेरी प्रोटेक्ट म्हणून एक फ्री सर्व्हीस आहे. तुम्ही आपल्या फोन वर हे ऍप्लिकेशन डाउन लोड केले की तुमच्या फोन वरचा सगळा डेटा ब्लॅक बेरीच्या सर्व्हर वर बॅक अप घेऊन ठेवता येतो. आणि जेंव्हा तुम्ही नवीन ब्लॅक बेरी विकत घेता, तेंव्हा तो डेटा लोड करता येतो. तीन वर्ष हे ऍप्लिकेशन माझ्या फोन वर आहे, आणि मला याचा फक्त एवढाच उपयोग माहिती होता. पण हेच ऍप्लिकेशन वापरून तुम्ही तुमचा फोन रिमोट लॉक करू शकता, आणि तुमच्या  ब्लॅकबेरी वर तुम्ही सेव्ह करून ठेवलेले सगळे नंबर्स, आणि इतर डेटा पण पुसून टाकू शकता ह्या गोष्टींची कल्पना पण नव्हती.माझ्या प्रमाणेच बऱ्याच लोकांना हे माहिती नसावे म्हणून ही पोस्ट लि्हीली आहे.

पद्धत सोपी आहे, ह्या  लिंक ^(http://rangmarathiche.com/goto/https://protect.blackberry.com/protect/mydevice?cid=1290065) वर जाऊन तुमचा ब्लॅकबेरी  आयडी  ने लॉग इन  करा, तुम्हाला  पाच ऑप्शन्स दिसतील, तुम्हाला हव्या त्या ऑप्शन वर क्लिक करा..

१)तुमच्या फोन चे लोकेशन  दाखवण्यासाठी पहिला ऑप्शन आहे.  जर फोन सुरु झाला असेल तर तो फोन कुठे आहे  हे तुमच्या कम्प्युटर वर दिसते.

२) दुसरा ऑप्शन, जर तुमचा फोन सायलेंट मोड मधे असेल  आणि सापडत नसेल तर इथून तुम्ही त्या फोन ला रिंग देऊ शकतात. सायलेंट मोड मधे पण रिंग वाजेल.

३)तसेच  जर समजा तुमचा फोन हरवला असेल आणि जर लॉक केलेला असेल तर तुम्ही त्याच्या लॉक असलेल्या स्क्रिन वर एक मेसेज पाठवू शकता- म्हणजे ज्याला तो सापडला असेल तो माणूस तुम्हाला कॉंटक्ट करू शकतो..

४) फोन पासवर्ड ने लॉक करू शकता.

५) फोन वर असलेला सगळा डेटा पुसून टाकू शकता.

हे सगळं करून शेवटी काय मिळतं? तर  तुमचा डेटा पण कोणाच्या हाती लागला नाही याची खात्री आणि तुमचा चोरीला गेला फोन दुसरा कोणी वापरू शकणार नाही याचे मानसिक समाधान!

व्हर्च्युअल बायको?

Written by  on December 3, 2003

तुमचे लग्न झालेले नाही. बॅचलर आहात- माफ करा मोस्ट एलीजिबल बॅचलर म्हणू या हवं तर- मग हे पोस्ट तुमच्याच साठी आहे. चांगली नोकरी, घर, गाडी  सगळं काही झालंय. कमतरता आहे तर ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे एका बायकोची. लग्नाबद्दल थोडं सुप्त आकर्षण, थोडी भिती, किंवा थोडा हवाहवासा वाटणारा सहवास, नको असलेली लायब्लीटी.. ती कशी असेल ही हुरहुर.  ह्या सगळ्या प्रश्नांच्या गराड्यात गुंतलो की सगळं सोडून द्यावं आणि सरळ संन्यास घ्यावा असे वाटते की नाही?? सगळं काही व्यवस्थित असतांना पण एक प्रकारचे भिती असतेच मनामधे. 

बायको कशी असावी? हाऊस वाईफ की नोकरी करणारी? बरं, आजकालच्या जगात एकाच्या नोकरीवर काय होणार? म्हणून नोकरी करणारी म्ह्टलं तरी कोणती नोकरी करणारी असावी? आपल्याच प्रोफेशनची की दुसऱ्या कुठल्या प्रोफेशनची?घरच्यांशी ती जुळवून घेईल की नाही?  असे हजारो प्रश्न असतात ना मनात? सहाजिक आहे-  पण काही काळजी करू नका.  सहज सर्फ करतांना मला एक साईट सापडलेली आहे. लग्न न करता पण लग्नाचा अनुभव घेण्याची सोय केलेली आहे त्या साईट वर. तसा वाईट अर्थ काढू नका- ’तसा’ अनुभव नाही, तर ’नॅगिंग वाइफच” अनुभव घेण्यासाठी म्हणतोय मी!

या मधे तुम्हाला चार निरनिराळ्या प्रकारच्या बायकोचा आस्वाद ( या शब्दावर कृपया आक्षेप घेऊ नये कोणी) घेता येऊ शकतो. त्यांच्या बद्दल थोडक्यात खाली दिलेले आहे.  व्हर्च्युअल बायको म्हणून जे चार प्रकार आहेत त्यातला   पहिला प्रकार म्हणजे रीता वय २१ एका एमएनसी मधे सेक्रेटरी. बॉलीवुड गॉसिप मधे इंटरेस्टेड. ऑफिस मधे खूप पॉप्युलर असलेली. लोकांना नको असतांना पण सारखे सल्ले देणारी अशी.खूप बडबड करणारी, फनी, बबली,  अशी मुलगी.. द गर्ल नेक्स्ट डॊअर..

दुसरी प्रकार २६ वर्षाची बॅंकेत नोकरी करणारी, एमबीए झालेली, गॅजेट्स बद्दल वगैरे एकदम अपटूडेट माहीती असलेली. ब्रॅंड कॉन्शस, रस्त्यावरची कुठलीही वस्तू विकत न घेणारी.इव्हन आपली भाजी पण ऑन लाइन विकत घेणारी अशी ही टेक सॅव्ही बायको आहे.एकदम अपटूडेट रहाणी असलेली- सगळ्यांना  बायको म्हणून हवी हवीशी वाटणारी. स्वतःचे विचार पुर्ण पणे डेव्हलप झालेले असलेली. पण जर अशी मुलगी बायको झाली तर काय होईल? याची थोडी टेस्ट इथे घेता येईल.

बरेचदा डॉमिनेटींग बॉसींग करणारी बायको हवी हवीशी वाटते काही लोकांना. स्पेशली बंगाली लोकांना. घरातली सगळी कामं स्वतः करते, आरडा ओरडा, आदळ आपट, पण थोडंसं प्रेमाने बोललं की विरघळून तुमच्या कुशीत शिरणारी! पण अशी बायको सांभाळणं म्हणजे काय चेष्टा नाही.  ही तिसऱ्या प्रकारची बायको आहे.

चौथा प्रकार म्हणजे एकदम सिनेमातली घरगुती बायको. नवरा हाच परब्रह्म समजून वागणारी. स्वयंपाक करणे, क्लासिक रोमॅंटीक नॉव्हेल्स वाचणे वगैरे हिचा खास पास टाइम. टिव्ही सिरियल्स मधे कायम गुंतलेली. सोसायटी गॉसिप मधे एकदम खूप इंटरेस्टॆड पण  डिव्होटेड बायको. नवऱ्याला सारखे   पॅंपरींग करणारी अशी.टिव्हीसिरियल्स, सिनेमा गॉसिप मधे खूप इंटरेस्टेड.

या साईटवर तुम्ही तुम्हाला हवी तशी मुलगी सिलेक्ट करून तुम्ही तुमचा सेल नंबर दिला की मग तुम्हाला ती  वेळोवेळी मेसेजेस पाठवत राहील. 🙂  मेसेजेस कसे असतील? ते अवलंबुन आहे तुम्ही कुठल्या प्रकारची बायको सिलेक्ट करता यावर. नाही लक्षात येत? ओके.. समजा तुम्हाला ऑफिस मधुन घरी यायला वेळ झाल, तर ” अरे लवकर ये, वाट बघते आहे रे तुझी” म्हणून प्रेमाने आळवणारी किंवा दुसरी  जी व्हर्चुअल वाइफ आहे ती जरा शार्प असलेली, ’ ऑफिस मधे जर अजून बसलास तर , थांब तुझे बेड ऑफिसमधे पाठवून देते” म्हणून धमकवणारी . हे फक्त एक सॅंपल आहे.सकाळी ब्रेक फास्ट पासून मेसेजेस सुरु होतील. 🙂

ही अशी  व्हर्च्युअल बायको असणे बरोबर की चुक ? हा मुद्दा घेऊन ही पोस्ट लिहिलेली नाही हे लक्षात घ्या.  एक गमतीशीर साईट, आणि तिची माहीती द्यायला हे पोस्ट आहे.  जाऊ दे, जास्त काही लिहित नाही, तुम्ही तुम्हाला जी हवी ती बायको निवडा  आणि ’विवाहा पुर्वी’ वैवाहीक जिवनाचा अनूभव घ्या.
व्हर्च्युअल बायकोचे आपले  इथे शेअर केले तरीही माझी  हरकत नाही..

इतकं सगळं सांगितलं, पण ती वेब साईट कुठली ते सांगितलंच नाही. तिची लिंक इथे ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.biwihotohaisi.com/) दिलेली आहे बघा. 🙂

मुलीसाठी व्हर्च्युअल नवरा नाही …