एका स्वप्नाची गोष्ट..

Written by  on October 24, 2003

politician-350_052812014256अहो, चहा घेता ना? म्हणून सीमा वहिनींनी चहाचा कप घेऊन राजा भाऊंना आवाज दिला. रात्री उशीरापर्यंत पुस्तक वाचत बसले होते, त्यामुळे अंमळ जास्तच झोप लागलेली दिसत होती. राजा भाऊंच्या चेहेऱ्यावर झोपेत पण हसू दिसतं होतं.डोळ्याची बुब्बुळं पापण्यांच्या खाली गर्र गर्र फिरत होती. बहुतेक कुठलं तरी  स्वप्न पडलं होतं ते! काहीतरी गमतीशीर असावे, कारण चेहऱ्यावरचे हसू दिसत होते.

स्मिता वहिनींनी हातातला कप टिपॉय वर ठेवला ,आणि राजा भाऊंच्या शिल्लक असलेल्या केसावरून हात फिरवला, आणि काय आश्चर्य, अहो सीमा वहिनी चक्क स्वप्नात शिरल्या राजा भाऊंच्या!.  क्षणभर त्यांना पण काही समजलं नव्हतं, पण समोरचं राजा भाऊंचं स्वप्न त्या पण पाहू लागल्या.   नवऱ्याच्या स्वप्नात जायचं भाग्य कुठल्या स्त्रीला लाभत का? पण सीमा वहिनींना ते लाभलं होतं, म्हणून त्या पण खूप खूष होत्या.

राजाभाऊ  मुलाखत देत होते.  तयार होते. एका मोठ्या पेपरचा पत्रकार मुलाखत घेण्यास आलेला दिसत  होता. राजा भाऊंच्या अंगावर  परीट घडीचे कडक स्टार्च केलेले कपडे, डोक्यावर पक्षाची ट्रेडमार्क टोपी , समोर उघडलेला लॅपटॉप, टेबल वर चहाचा कप, अ‍ॅशट्रे मधे जळणारी अर्धी सिगरेट ( अरे.. सिगरेट कधी काय सुरु केली ??  नाही.. स्वप्न आहे हे चालू दे.. सीमा वहिनीनी स्वतःलाच बजावले ) हे असं सगळं  म्हणजे लॅपटॉ वगैरे समोर असला, की आपलं खूप इम्प्रेशन पडतं असा समज होता नेताजींचा.अरे हे काय? सीमा वहीनी एकदम आश्चर्याने ओरडल्या- राजाभाऊ नेते कसे काय झालेत? स्वप्न आहे ना, चालायचंच, अगदी राजा भाऊंच्या मांडीवर त्यांची आवडती हिरोईन  जेनिफर अ‍ॅनस्टन ( फ्रेंड्स मधली हो, तीच ती ब्रॅड पिट ची एक बायको  ) जरी बसलेली दिसली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही. शेवटी काय, स्वप्नच आहे ना?? म्हणून त्यांनी पण स्वप्न एंजॉय करणं सुरु केलं.

नेताजी बोलू लागले,  समोरचा पत्रकार टिपण घेत होता. नेताजी म्हणाले, मी नॉन स्टॉप बोलणार आहे,   कॉलेज मधे असल्यापासूनच राजकारणात खेचल्या गेलो- आणि कसे.. त्याची पण एक गंमतच आहे!  तर काय झालं , की मी एका मुलीच्या प्रेमात पडलो,  चांगलं वर्षभर नेकिंग सुरु होतं, लोकांना असंही वाटायला लागलं होतं की तिच्याशीच मी लग्न करणार, पण तसे होणॆ नव्हते .

एक दिवस कॉलेजच्या कॅन्टीन मधे बसलेलो असतांना एक सुंदर मुलगी एफई ला आलेली दिसली,   आणि मग मी  पाहिल्या  बरोबर तिच्या प्रेमात पडलो. पहिल्या मैत्रिणीला  सोडून दुसरीच्या मागे लागलो. तिच्याशी लवकरच  मैत्री झाली, आणि लवकरच ती   पण माझ्या प्रेमात पडली.

हे सगळं पाहिल्यावर , की हा साला, दिसायला सुमार असलेला राजाभाऊ, कशा काय सुंदर मुलींना गटवतो, म्हणून  कॉलेज मधली इतर मुलं माझ्या कडे सल्ला मागायला येऊ  लागले. आता मी काय लव्हगुरु वगैरे नव्हतो, पण तरीही आपल्या कडून जेवढी मदत करता येईल तेवढी लोकांना करायचो. एक नवीन क्लब सुरु केला , ” बर्ड कॅप्चरर्स”  नावाच !   सर्वानुमते क्लबचा प्रेसिडेंट मीच निवडल्या गेलो .  तर  ही माझी पहिली लिडरगीरी.  या नेतागिरी मुळे सगळीकडे नाव फेमस झाले होते.  अहो इतके, की अगदी कॉलेज मधले अविवाहित लेक्चरर्स पण माझ्याकडून टिप्स मागायला यायचे . दिवस मस्त चालले होते ,  नेतागिरी अंगात भिनली होती.

कसं कोणास ठाऊक, पण  नशिबाचे खेळ बघा, ज्या मुलीच्या प्रेमात पडलो, तिच्याशीच लग्न करावे लागले ( आता का करावे लागले, ते तुम्ही समजून घ्या) . लग्न झालं आणि प्रेयसी जेंव्हा  बायको झाली, तेंव्हा तिचे वागणे एकदम बदलले.तुझ्या साठी काही पण करीन म्हणणारी, कधी तुला उशीरा आलास तरी का उशीर झाला विचारणार नाही म्हणणारी, मित्रांसोबत कट्टा करायला पण कधी आक्षेप घेणार नाही म्हणणारी,  एकदम  बदलली, आणि आमचे मित्र, कट्टा, गपा, ट्रेकिंग सगळं काही बंद पडलं. पत्नी वास सुरु झाला होता माझा. नेताजी डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाले.

या अशा मानसिक त्रासा  मुळे जीव वैतागला होता. एक दिवस बार मधे बसलो होतो, तर तिथे आपल्यासारखेच समदुःखी दहा बारा मित्रं भेटले, सगळ्यांची दुःख सारखीच होती- सगळेच पत्नी पिडीत! एक आयडीया सुचली,  एक क्लब का सुरु करू नये पत्नी पिडीतांचा? अशा तऱ्हेने   ” पत्नी पिडीत क्लब” ची स्थापना झाली.  एकदा हा क्लब सुरु झाला, आणि हजारो . लाखो लोकं याचे मेंबर झाले.  एखाद्याला बायकोने मारले, की तो माझ्या कडे यायचा, मग माझ्या पेपर मधल्या मित्रांना विनंती करून त्याची बातमी छापून आणायचो पेपर मधे, मोर्चा न्यायचा त्याच्या घरावर . असं होता होता ,माझं नाव पण  एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नियमित पणे पेपर मधे यायला लागलं.  तशी लोकांना मदत पण तर होत होतीच, पण सोबतच आपलंही नाव मोठं होत होतं. ह्या पत्नी पिडित क्लब मुळे बायको पण जरा सांभाळून वागायला लागली हा सगळ्यात मोठा फायदा.

आता हे पण दिवस तसे बरेच जात होते. लवकरच कॉर्पोरेशनची निवडणूक  आली , आणि एकदिवस आमच्या भागातल्या एमएलए ने बोलावणे पाठवले आम्हाला. भेटायला गेल्यावर नेताजी म्हणाले, आता कार्पोरेशन निवडणूक आहे, तुम्ही लढवणार का? राजाभाऊ बोलत होते, अगदी नॉन स्टॉप, म्हणाले, का नाही? अवश्य उभा राहीन मी, तसाही इंजिनिअर होऊन असा कितीसा पैसा मिळणार आहे? त्या पेक्षा हे बरं. आणि आम्ही ती निवडणूक जिंकली.

“आता कार्पोरेशन च्या निवडणुकीचे ठीक आहे , पण तुम्ही एकदम एमएलए साठी कसे काय उभे राहिलात?” पत्रकाराने विचारले.

राजाभाऊ म्हणाले, “अहो काय झालं, एकदा रविवारचा दिवस होता, बायको माहेरी गेली होती, मग उगाच काहीतरी टाइम पास करायचा म्हणून फिरत होतो. तर एके ठिकाणी एक रांग दिसली, ती रांग सिनेमाची रांग असेल म्हणून  रांगेत उभे राहिलो, आणि नंतर जेंव्हा आमचा नंबर आला, तेंव्हा समजलं, की सत्ताधारी पक्षाची लोकसभेच्या इलेक्शन तिकीट वाटपाची रांग होती !  आता  मला तिकीट  मिळालं, म्हणून इलेक्शन लढलो, आणि निवडून पण आलो-  नशीबाचा खेळ आहे सगळा.”

तो पत्रकार म्हणाला, आता मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, अगदी अजिबात विचार न करता उत्तर द्यायचं.. पहिला प्रश्न, इलेक्शन पूर्वी तुम्ही खूप कोमल होते, अगदी  फुला सारखे  मुलायम बोलायचे, तुमच्या आवाजात अगदी मध टपकायचं.. आणि एकदा निवडून आल्यावर मात्र तुम्ही अगदी दगडा प्रमाणे कठॊर  झालात असे का??

राजाभाऊ म्हणाले, ” अहो इलेक्शन पूर्वी लोकांना फुलं गोळा करून त्याच्या माळा करायच्या असतात, म्हणून आम्ही तसे नरम, मुलायम, फुलासारखे होतो, पण एकदा निवडून आल्यावर मात्र  “त्याच लोकांना ” दगडच लागतो – पूजा करायला!” म्हणून आम्ही दगड बनतो.

तेवढ्यात त्यांचे धाकटे कन्यारत्न ओरडत आले, ” अई, डबा दे, शाळेची वेळ झाली, आणि  त्याच क्षणीच सीमा वहिनी स्वप्नातून बाहेर पडल्या ” आणि राजाभाऊंना गदागदा हलवून ऊठवत , जोरात ओरडल्या, ” अहो, ऑफिसला जायचय ना? आणि डोळे चोळत उठलेल्या राजाभाऊंच्या हाती चहाचा कप  दिला, राजाभाऊ पण तो पत्रकार कुठे दिसतोय ते शोधत बसले होते, आणि  वास्तवात परत येण्याचा प्रयत्न करत होते..

१ सप्टेंबर १९४२..

Written by  on October 23, 2003

जर तुम्हाला आज सांगितलं , की भारताच्या एका भागाला स्वातंत्र्य  फार पूर्वी  मिळालं होतं, आणि त्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाला जवळपास सात देशांनी मान्यता दिली होती – ज्या मधे चीन,इटली आणि जर्मनी हे देश पण होते तर तुम्हाला खरं वाटेल??अर्थात नाही!!

कारण काही नेत्यांना , की ज्यांचा अहिंसेच्या चळवळीवर अजिबात विश्वास नव्हता, आणि जे म्हणत होते, की आम्हाला स्वातंत्र्य देणारे हे ब्रिटीश कोण? आम्ही तर स्वतंत्र आहोतच!  त्यांची आठवण आपण सगळे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. महापुरुषांच्या जिवनातला एखादा प्रसंग, किंवा एखादं वाक्य वेळोवेळी शाळेमधल्या त्या नेत्याच्या जयंती किंवा पुण्यतिथीला आळवतच आपण मोठे होतो. केवळ शाळेत शिकायचे म्हणून या नेत्यांची  चरित्रं वाचणारे आपण- केवळ काही इतिहास महापुरुषां पुरताच आपला अभ्यास मर्यादित ठेवतो. आजही “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, ” हे वाक्य किंवा ” मी  शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून टरफलं उचलणार नाही ” असे वाक्य आठवते लोकमान्य टिळक आठवले म्हणजे.लोकमान्य टीळकांनी एवढंच काम केलं का? असो..

सुभाषचंद्र बोस!! ह्यांचं नांव घेतलं की फक्त ” तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा” एवढंच माहीती आहे  यांच्या बद्दल. स्वातंत्र्यवीर सावरकर काय किंवा सुभाषजी असो, काही नेत्यांना कॉंग्रेसने मुद्दामच  जनमानसात रुजू दिले नाही. आज शाळे मधे नेहेरू, गांधी वर धडा असतो. सचीन तेंडूलकर, धोनी ते कपिल देव पर्यंत क्रिकेटर्स वर धडे असतात, पण ……….. असो..

या नेत्यांचं कार्य फक्त वर दिलं तितकंच आहे का?  सुरुवातीला महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य संग्रामात उतरलेले नेताजी १९३७ मधे कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. नेमकी त्याच काळात दूसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालेली होती. कॉग्रेस मधे पण सगळी अंदाधुंदी माजलेली होती. त्या मधे पण दोन गट पडले होते. एकाचं म्हणणं होतं, की इंग्लंडला जर्मनी विरुद्धच्या युद्धात सहाय्य करावे, तर दुसरी विचार धारा अशी होती, की इंग्लंड म्हणजे आपला शत्रू, आणि शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र- म्हणजे जर्मन आपला मित्र -तेंव्हा जर्मनीला सहाय्य करावे, आपले हे विचार उघडपणे मांडल्यावर ते अर्थातच तत्कालिन कॉंग्रेसी नेत्यांना आवडले नाहीत, आणि इंग्रज सरकारला पण , आणि म्हणूनच  नेताजींना भारत सोडून बाहेर जावे लागले होते.

जर्मनी ला आपला मित्र मानल्यावर , नेताजींनी त्यांच्या कडे मदतीसाठी जायचे ठरवले, त्या साठी प्रवास  कसा केला ती पण रोचक कहाणी आहे. त्याच दिवसात एक परिषद भरली होती, जपानमधे. पूर्वोत्तर आशियामधल्या सगळ्या भारतीयांना एकत्र करण्याचे काम  रासबिहारी बोस   करत होते.  रास बिहारी हे खरे तर भारतीय, पण जपानमध्ये एका जपानी स्त्री बरोबर लग्न करून  स्थाईक  झालेले! अर्थात या परिषदेचे अध्यक्षपद पण त्यांच्याकडेच होते. इंडीयन इंडिपेंडन्स लिग या संस्थेने सगळ्या भारतीयांचे प्रतिनिधित्व करावे असे  या  परिषदेत  ठरले. तसेच मोहन सिंग यांनी  जपानची मदत घेऊन, भारतीय सैनिकांचे एकत्रीकरण  करावे असाही ठराव करण्यात आला-तो दिवस होता १ सप्टेंबर १९४२ – आझाद हिंद सेनेच्या स्थापनेचा दिवस. याच काळात आझाद हिंद सेनेची जबाबदारी पेलण्यासाठी समर्थ माणूस हवा मग नेताजीं शिवाय दुसरा कोण?? म्हणून    नेताजींना  (तेंव्हा ते जर्मनीला होते)जपानला बोलावण्यात आले.

सुभाषचंद्र बोस यांनी जेंव्हा शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने  जर्मनीला सपोर्ट केला होता, त्या   काळात नेताजींच्या जिवाला अर्थातच धोका निर्माण झाला होता. तेंव्हा त्यांनी जर्मनीला जायचे ठरवले.  कलकत्ता ते जर्मनी पर्यंत त्यांनी केलेला प्रवास म्हणजे पण एक मोठी संघर्ष यात्राच होती. कलकत्त्याहून  निघाल्यावर महंमद झियाउद्दीन नावाने ते रेल्वेने   पेशावरला गेले ,  तिथून पुढे  काबूल पर्यंतचा प्रवास बस, कार, आणि  पायी  पूर्ण केला.

एकदा काबूलला पोहोचल्यावर मात्र तिथून विमानाने ’ओर्लांदो मान्झोत” या नावाने  जर्मनीला विमानाने गेले. तिथे गेल्यावर त्यांना रासबिहारी बोस यांचा निरोप मिळाला, आणि ते जपानला जायला निघाले.

कील ते साबांग पाणबुडीने आणि पुढे टोकीयो पर्यंत विमानाने प्रवास केला त्यांनी .जर्मनीतून जपानला जाण्यासाठी, सरळ रस्ता होता, पण  पकडले जाण्याचे चान्सेस जास्त होते, म्हणून सरळ सरळ  न जाता, युरोप आणि आफ्रिका खंडाला वळसा घालून ते जपानला गेले होते.  ह्या प्रवासाला जवळपास ८८ दिवस लागले त्यांना. इतका थ्रिलिंग प्रवास वाटतो वाचतांना, पण जिवाची भिती, जागत मोस्ट वॉंटॆड स्टेटस मधे असा प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरतच.

इथेच सगळं संपत नाही. इकडे जपान मधे आशि्यन  भारतीयांच्या एकीकरणाचे प्रयत्न रासबिहारी यांनी सुरु होते. आझाद हिंद सेनेचा नेता म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. या सेने मधे जपानने सोडलेले युद्धकैदी,मलेशियातले प्लांटेशन वर्कर्स, आणि इतर भारतीय लोकं होते ज्यांना भारतासाठी काही तरी  करायची इच्छा होती .

सिंगापूरला एकदा सैनिकांशी बोलताना   तेंव्हा नेताजी म्हणाले होते, “मी तुम्हाला उपासमार, भूक , तहान, कष्ट आणि मृत्यु फक्त देऊ शकतो पण तरीही आपण पुढे जाण्यासाठी लढणारच आहोत”. हिंदू स्थानाच्या स्वातंत्र्या शिवाय सध्या दुसरी कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही. फौज पुरेशी नसल्याने, जो पर्यंत हिंदुस्थानचे सरकार तयार केले जात नाही, तो पर्यंत  आझाद हिंद सेनेला ’मुक्ती सेनेचा’ दर्जा मिळणार नाही  याची जाणीव त्यांना होती. जपानचे पंतप्रधान ताजो ह्यांच्याबरोबर बोलणी करून स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार पहिले सरकार स्थापन केले. तो सुवर्ण दिवस होता २१ ऑक्टो १९४३.भारताचे पहिले सरकार!!  .नेताजींनी दिलेली ’जय हिंद’  घोषणा ही त्याच काळातली, की जी आजही तितक्याच  आवेशात घेतली जाते.

या सरकारने काय मिळवलं? हा प्रश्न किंवा नेताजींनी सरकार स्थापनेची घाई केली का? हा प्रश्न तुर्तास बाजूला ठेऊ. इथे कोणाचं चुकलं, की बरोबर आहे हा मुद्दा घेतलेला नाही- . याचे चर्विचवर्वण करण्यासाठी बरेच लोकं आहेत.   या सरकारला मान्यता केवळ तीन दिवसात चीन, ब्रह्मदेश, जपान , थायलंड, जर्मनी ,इटली आणि इतर काही देशांनी मान्यता दिली होती ही गोष्ट महत्त्वाची.. मला वाटतं की हा एक पूर्ण पणे योग्य दिशेने चालणारा लढा होता.

जपानचे पंतप्रधान ताजो हे तर सुभाषबाबूंच्या बरोबर होतेच. त्यांनी ५ नोव्हेंबर १९४२ रोजी आझाद हिंदूस्थानला स्वतःचा म्हणून एक लहानसा भूभाग नेताजींच्या स्वाधीन केला- तो भाग म्हणजे अंदमान , निकोबार हा द्विप समूह! नेताजींचे मत होते, की आम्ही स्वतंत्र आहोतच, आम्हाला स्वातंत्र्य देणारे हे ब्रिटीश कोण?? ही भावनाच या लढ्याचा कणा होती. सरकार स्थापन केल्याबरोबर तिन चार दिवसातच इंग्लंड बरोबरचे आपले युद्ध घोषित करण्याचा आत्मविष्वास केवळ नेताजीच्या मधेच असू शकतो.

आता वेळ आली होती ती प्रत्यक्ष युद्धाची!जपानी सैन्याच्या मदतीने एक मोहीम आखण्यात आली. त्या अंतर्गत ’आझाद हिंद सेनेचे’ तीस हजार सैनिक रंगून येथे येऊन पोहोचले. रंगून ते इंफाळ म्हणजे फक्त दऱ्या खोऱ्यांचा भाग. या भागातून कोणी येऊच शकत नाही, हा आत्मविश्वास होताच ब्रिटिश सैन्याला. त्यामुळे या भागाकडे थोडे दुर्लक्षच झाले होते ब्रिटिशांचे. याचा फायदा घेत , जवळपास दोनशे ते अडीचशे  किमी अंतर आझाद हिंद सेनेच्या जवानांनी दऱ्याखोऱ्यातुन चालत पार केले.एक आठवडा  लागला हे इतके अंतर कापायला. पण ही सेना पोहोचली आणि इंफाळला वेढा घातला.

कोहिमा पर्यंतचा भाग जपानच्या जपानची ३३वी डिव्हिजन च्या मदतीने  ताब्यात  घेतला. इथून पुढे थोड्याच अंतरावर इंफाल होते,सैन्याची  मनःस्थिती  अतीशय उत्कृष्ट होती. इथपर्यंतचा प्रवास खूप सरळ सरळ कुठेही न अडखळता झाला होता.

ताजो , जपानचे पंतप्रधान म्हणाले होते, की हा भूभाग आमच्या अखत्यारीत आलेला आहे, आणि आता याचे प्रशासन आणि नियंत्रण आम्ही ’आझाद हिंद सेने’ कडे सोपवणार आहोत.या भागाचे प्रशासक म्हणून आझाद हिंद सरकारने आपले श्री ए सी चटर्जी यांची नेमणूक केली होती.मणिपूर आणि आसामचा सिल्हट मधला बराचसा भाग आता आझाद हिंद सरकारच्या ताब्यात आला होता.

इंफाळ एकदा आपल्या हातून गेले की आपले या भागावरचे नियंत्रण कमी होणार ह्याची पूर्ण जाणीव ब्रिटीश सरकारला होती. त्या मूळे या पुढे काहीही झाले तरीही इम्फाळ हातून जाऊ द्यायचे नाही, म्हणून ब्रिटीश सरकारने आपले ६० हजार सैनिक तिथे आणून उभे केले. अशा परिस्थितीत इंफाळ काही सहजासहजी हाती येणार नाही याची जाणीव झाली होती नेताजींना.

लेफ्टनंट कर्नल रेन्या मितागुची हा जपानी अधिकारी  हा जपान्यांचा मुख्य लष्करी अधिकारी.  इथे जर आपण गेलो, तर आपण  इंफाळ जिंकू शकत नाही- कारण ६० ह्जार ब्रिटिश सैन्य!  त्यामुळे   त्यांनी दिमपूरच्या दिशेने कुच करावे असा सल्ला नेताजींनी मुतागुची ह्यांना दिला- ज्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले नितागुचीने.

दिमपूर च्या दिशेने का जायचे? तर एकदा दिमपूर हातात आले, की मग बिहारमधल्या राजमहल हिल्स पर्यंत, आपल्याला ब्रिटीश सैन्य कुठेही लष्करी आघाडी उघडून  ब्रिटीश सेना, आपल्याला अडवू शकणार नाही,  ही बाब लक्षात आली होती नेताजींच्या. पण मितागुची यांनी नेताजींचा सल्ला न ऐकल्याने,  आतापर्यंत व्यवस्थित सुरु असलेलेले मार्गक्रमण एकदम स्पोक लागल्याप्रमाणे अडले .जवळपास एक वर्ष भर ्सेना तिथेचे मुक्काम करून होती.

अंतराष्ट्रीय बाबींचा पण यावर खूप परिणाम झाला होता.दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले होते. पॅसिफिक मधले सैपान हे बेट आता अमेरिकेच्या ताब्यात गेले होते. एक लहानशी घतना. तसे म्हंटले तर काही फारशी महत्त्वाची वाटत नाही ना?? पण ही घटनाच सगळ्या युद्धाला कलाटणी देणारी ठरली होती.

त्या काळी विमाने सरसकट लांबचा प्रवास करू शकत नव्हते. त्या मुळे जपानवर सरळ हल्ले करण्यासाठी असे एखादे ठिकाण अमेरिकेला हवे होते – की जे जपानच्या जवळ असेल , आणि तिथुन विमानांना इंधन पुरवठा करून जपानपर्यंत विमानदलाची पोहोच वाढेल. हे बेट हातून गेल्यावर मात्र जपानचे जनमत एकदम बिथरले, कारण आता अमेरीकेची विमाने या बेटावरून  जपान पर्यंत  पोहोचू शकत होती- आणि   अमेरिकेला जपानवर हल्ला करणे सोपे झाले होते. य सगळ्या घटनांचा परीपाक म्हणजे जपानी पंतप्रधान  ताजो, यांचा राजिनामा.

इथूनच पुढे खरा संघर्ष सुरु झाला. आता भारतामधे शिरायचे तर कुठून? अफगाणिस्थानातून एक मार्ग आहे, त्या साठी रशियाची मदत पण मागण्याचा प्रयत्न केला होता, जो निष्फळ ठरला. जपानचा नसलेला सपोर्ट, अन्न धान्याची रसद मिळणे पण कठिणच झाले होते.  रंगून येथे जवळपास एक वर्ष भर आझाद हिंद सेनेचा मुक्काम होता. दिल्लीच्या दिशेने कुच करणारी आझाद हिंद सेना आता थांबली होती, आणि माघार घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय समोर दिसत नव्हता.

नेताजींचा अजूनही स्वतःच्या आझाद हिंद सरकार/ सेने वर विश्वास होताच. हे युद्ध आपण ” शेवटचा सैनिक, आणि शेवटचे काडतूस असे पर्यंत  लढू” म्हणून त्यांनी  सांगितले. आझाद हिंद सेना आता निराशेच्या गर्तेत सापडलेली होती, पण हरलेली नव्हती. या पुढची रणनिती काय ठरवायची ह्याचा विचार सुरु होता, तेवढ्यात दुसऱ्या महायुद्धातला तो कलाटणी देणारा क्षण आला होता. ६ आणि ८ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी वर अणूबॉंब टाकले होते, आणि याच दोन बॉंब ने जपानचे आणि हिंदुस्थानचे स्वप्न भंग झाले. या पुढचा आझाद हिंद सेनेचा प्रवास एकदम गुढते कडे जातो आणि नंतर नेताजिंचा गूढ मृत्यु वगैरे घटना घडतात.

आझाद हिंद सेना हा एक योग्य निर्णय होता का?  मला वाटतं होय, त्या काळात जय हिंद ही घोषणा, प्रत्येक भारतीयाच्या मनात स्फुल्लिंग पेटवणारी, क्रांतीची ज्वाला पेटवणारी ठरली होती . आझाद हिंद सेनेला जर थोडी दैवाने साथ दिली असती तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं .

आज एक सप्टेबर .. आझाद हिंद सेनेचा स्थापना दिवस. म्हणून या लेखाचे प्रयोजन.

६५ वी कला…

Written by  on October 22, 2003

पुराणामधे  चौसष्ट कलांचा उल्लेख आहे, पण त्या मधे एक कला दिलेली नाही- आणि  ती पण अशी कला आहे की, जी येणं अत्यावश्यक आहे आणि ती आल्याशिवाय  जिवनात नेहेमी कुठेतरी काहीतरी अडणार हे नक्कीच. लहानपणापासून काही बाबतीत मी खरंच अनलकी आहे. दुर्दैवी म्हणायला कसं तरी वाटलं, म्हणून हा अनलकी शब्द वापरलाय. ह्या कलेमधे  पारंगत कधीच होऊ शकलो नाही मी. या कलेशी  संबंध जरी  अगदी शैशवात असल्यापासून आला  तरी प्राविण्य  मात्र अजूनही मीळवता आलेलं नाही.

मिल्क मेड ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/milkmaid-2.jpg)स्वयंपाक घरातून प्रेमाने हाक ऐक आली – ’अहो ’ की त्या हाकेमधले मार्दवाची  लेव्हल  ऐकुन आपल्याला कुठल्या कामासाठी बोलावलंय ते लक्षात येतंय हल्ली. अहो लग्नाला २२ वर्ष झाल्यावर इतकं जर समजलं नाही, तर मग काय अर्थ आहे या २०+ अनुभवाचा?  अगदी सहज हाक मारलेली, थोडी कोरडी- की समजावं माळ्यावरचा डबा, किंवा माळ्यावर कधी तरी लागेल म्हणून ठेवलेलं एखादं भांड वगैरे हवं आहे. थोडं जास्त प्रेमाने बोलावते आहे असं वाटलं , की समजावं, काहीतरी मदत हवी आहे- जसे कांदे चिरून, किंवा कोशिंबिरीसाठी काकडी- टोमॅटो चिरून, किंवा लसूण सोलून हवाय, पण जर अगदी मधात घोळलेल्या आवाजात जर हाक ऐकू आली तर समजायचं की किंवा चटणी साठी  नारळ खवुन हवंय किंवा एखाद्या पायनॅपल स्लाइसचा ,किंवा कौतूकाने आणलेला बेक्ड बिन्स चा डबा किंवा मिल्क मेड च्या डबा उघडून हवाय.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/tesco-value-beans_design.jpg)

बेक्ड बिन्स कॅनया डबा

डबा उघडण्यात विशेष काय ?  इतकं सोपं नाही राव ते. बाहेरच्या देशात बरं असतात , असे डबे डूबे उघडायला ओपनर असतं, त्या ओपनरने डब्याला लावले आणि करा करा फिरवले की  दहा सेकंदात तो डबा उघडला जातो,  पण आपल्या कडे मात्र अजूनही  आपल्या पारंपारीक हत्यारांचाच उपयोग केला जातो.

आपल्या कडे पण तसे ओपनर  मिळत असावे, पण आपण  कधी शोध पण घेत नाही- टीपिकल आपली मध्यमवर्गीय मेंटॅलिटी- विनाकारण फालतू खर्च कशाला??   म्हणूनच कुठल्याही स्पेशल टूल शिवाय- हा डबा उघडणे म्हणजे पासष्टावी कला आहे असे म्हंटले तरीही हरकत नाही.

असा डबा उघडायची वेळ आली की मी आधी फर्स्ट एड चं सामान कुठे आहे ते शोधणे सुरु करतो. नेहेमीच्या कपाटात तो फर्स्ट एडचा डबा दिसला की जीव भांड्यात पडतो अगदी 🙂 पुर्वीच्या काळी   मिल्क मेडचा डबा उघडायचा, किंवा बेक्ड बिन्स चा डबा उघडायचा म्हणजे आमची जय्यत तयारी सुरु व्हायची. एक लोखंडी उलथनं, किंवा तत्सम टोकदार वस्तू, जुनी सुरी, बत्ता, अशा अनेक गोष्टी गोळा केल्याशिवाय हे काम सुरुच करता  यायचं नाही .

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/nail-cutter.jpg)

छान डिजाइन सारखं दिसतंय – तेच ते कॅन ओपनर

आजकालच्या डब्यांचं बरं असतं, वर एक लहानशी रिंग दिलेली असते, ती ओढली की वरचं झाकण निघुन येणार!पण पुर्वी तसं नव्हतं, नेस्लेचा मिल्कमेडचा डबा उघडणं म्हणजे एक कसरत असायची. एक    स्क्रू ड्रायव्हर, आणि हातोडी( किंवा बत्ता) निघायची बाहेर टुल किट मधून. स्क्रु ड्रायव्हर ठेऊन त्याला हातोडिने फटका मारला की डब्याला छिद्र पडण्याऐवजी स्क्रु ड्रायव्हरचं वरचं प्लास्टीकचं हॅंडल तुटायचं  -असे  बरेच स्क्रुड्रायव्हर्स तोडलेत मी आजपर्यंत 🙂  .. नंतर नंबर यायचा तो टोकदार लोखंडी उलथणं  (ज्याचा उपयोग फक्त नारळ सोलायलाच केला जातो ) ते ठेउन बत्त्याने मारुन  डब्याला फोडण्याचा प्रयत्न केला जायचा, पण डब्याला छिद्र न पडता, ते लोखंडी उलथणं व्हायचं वाकडं, आणि मग सौ.च्या लक्षात यायच्या आधी त्याला  बत्त्याने ठोकुन ठोकुन सरळ करून ठेवायचं.

त्यानेही जमलं नाही, की  एकदम आठवायचं, अरे ते ने्लकटर आहे नां, त्यामधे आहे की कॅन ओपनर तो वापरुन बघू, आणि मग त्या कॅन ओपनर(????) म्हणुन नेलकटरमधे दिलेल्या त्या टुलने  नंतर ठोकुन ठोकुन बारीक बारीक छिद्र पाडून त्या डब्याचे झाकण तोडून काढायचा प्रयत्न केला जायचा. थोडं लहान छिद्र पडलं, की मग स्कृड्रायव्हर वापरला की तो मोठं करणं सोपं व्हायचं.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/tin-of-baked-beans.jpg)
उघडायला सोपा कॅन..

मिल्क मेड पण इतकं घट़्ट असायचं की झाकण पुर्ण तोडल्याशिवाय ते बाहेर निघायचं नांव घेत नसे. सांडशी  घेउन त्या अर्धवट तुटलेल्या झाकणाला , दोन्ही पायात डबा पकडून ओढुन काढायचा प्रयत्न व्हायचा, ( कधीच तुटून बाहेर आले नाही अशा ऒढण्याने, पण अगदी ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी एकदा तरी हा प्रयत्न केला जायचाच).  शेवटी हाताने थोडं बाजुला होतं कां ? म्हणुन प्रयत्न करतांना हाताला कुठेतरी लहानशी जखम होऊन रक्त निघणे सुरु होणे, हे पण नेहेमीचेच. शेवटी बराच वेळ कुस्ती खेळल्यावर तो डबा उघडला जायचा. हुश्श!!!! पण हल्ली नेस्लेने त्या डब्याच्या झाकणाला पण  पुल आउट रिंग टाइप केल्यामुळे फार सोपं झालंय ते उघडणं.  मिलियन थॅंक्स टु नेस्ले.. तो डबा आता उघडणे सोपे केल्याबद्दल!!

आम्ही कधी कधी ते बेक्ड बिन्स पण आणतो विकत (शॉपिंग मॉल मधे  बायकोच्या नकळत सामानात एखादा डबा टाकतो आपल्या सामानाच्या ट्रॉली मधे 🙂 ) तो डबा उघडायला कधी कधी खूप सोपा असतो, ( म्हणजे त्याला वरच्या झाकणावर एक रिंग असते ती ओढायची, की मग ते पुर्ण झाकण निघुन येते.) पण बरेचदा तशी पुल आउट रिंग  नसली की मग पुन्हा वर दिलेल्या नेस्लेच्या डबा उघडतांना जी कसरत करावी लागतेच तिच इथे तिचेच पुनरावर्तन होते.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/aluminium-seals.jpg)

हे असं सिल , आणि त्याखाली रबरी बुच.. डोळ्यांच्या औषधाला

औषधाच्या बाबतित बोलायचं तर , युजवली डोळ्यात टाकायचं आजीचं औषध आणलं की मग त्या  बाटलीचे झाकण काढायचे आणि त्याला ते ड्रॉपर वाले बुच लावायचे हे एक मोठे काम असायचे.  ओरिजिनली त्या बाटलीला एक रबरी बुच असायचं, आणि ते बुच निट जागेवर रहायला त्याला ऍल्युमिनियमच्या सिल ने कव्हर केलेले असायचे. आधी ते ऍल्युमिनियमचे झाकण तोडायचे,   मगच त्या रबरी बुचापर्यंत पोहोचता यायचं. ऍल्युमिनियमचे ते झाकण   तोडुन काढायल काही स्पेशल टुल नसायचे. मग धार नसलेली सुरी  वापरुन ते झाकण उघडायचा प्रयत्न करायचॊ आणि  अर्धवट तुटलेले ते ऍल्युमिनियमचे सिल शेवटी हातानेच तोडून काढावे लागायचे. आणि  ते काढतांना    जखम होऊन रक्त येणे हे नेहेमीचेच !!

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/cough-syrupe.jpg)

झाकण उघडणे- खोकल्याच्या औषधाच्या बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न केला की सिल न तुटता ते पुर्ण पणे फिरते आणि उघडत नाही-  किंवा, नुसता हात सटकून त्याला झाकणामुळे रक्त येणे – हा अनुभव तर अगदी पाचविलाच पुजलेला आहे. मग ज्या ठिकाणी खालची रिंग आणि झाकण जोडल्या गेलंय त्या ठिकाणी  सुरीने कापुन काढायचा प्रयत्न करायचा.

अगदी हाच अनुभव व्हिस्कीची बाटली उघडतांना पण येतो बरेचदा. पार्टी सुरु करायची, कोणीतरी झाकण उघडायचा प्रयत्न करतो, आणि ते फिरलं की मग झालं!!! म्हणुनच   पट़्टीच्या पिणाऱ्यांची एक पध्दत असते. बाटली  जोरात हलवून नंतर तिच्या बुडावर उलटी करून एक जोरदार थप्पड मारायची, आणि मगच झाकण उघडायचा प्रयत्न करायचा. ९० टक्के तरी उघडतं म्हणतात.. 🙂

जामच्या बाटलीचं झाकण इतकं घट्ट का लागलेलं असतं की उघडतांना पार वाट लागते. यावर पण एक उपाय काढलाय शोधून. त्याला एक लहानसं छिद्र पाडायचं, की मग ते पटकन उघडतं. अशी अनेक  झाकण्ं आहेत की ज्यांनी मला आजपर्यंत खूप छळलंय. लोणच्याच्या बरणीचे झाकण ( फिरकीचे- जे हमखास तिरकं बसलेलं असायचं, आणि मग  उघडतांना वाट लागायची) , किंवा पार्ले  बिक्सिटस चे चौकोनी  लोखंडी डबे , घट्ट बसलेली पितळेच्या जुन्या डब्याची झाकणं काढतांना नखाची वाट लागते! या विषयावर तर इतके अनूभव आहेत की लिहावे तितके थोडेच- म्हणुन थांबतो आता इथेच  !

या ६५ व्या कलेमधे या जन्मी तरी नक्कीच पारंगत व्हायचं अशी अपेक्षा आणि प्रयत्न सुरु असतात माझे !!

५ सेकंद -इन लाइफ ऍंड डेथ.

Written by  on October 8, 2003

हा फोटो पहा. हा माणुस मुंबई लोकल स्टेशन वर प्लॅटफॉर्म चेंज करण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत होता. पण तेवढ्यात लोकल आली .  माणुस प्लॅटफॉर्म आणि ट्रेन च्या मधे       अडकून पडला.  ह्याच्या शेजारून   ट्रेन निघून गेली.लोकांनी त्याला धीर दिला आणि काय करू नको ते… म्हणजे   अजिबात हलू नकोस म्हणून सांगितले.

11

ट्रेनचे १२ डबे ह्या माणसाच्या शेजारून निघून गेल्यावर, हा माणूस बाहेर आला. त्याला  खरचटलं पण नव्हतं.  हा माणूस  रोड (बारीक) होता म्हणून त्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधल्या जागे मधे सामावला गेला – जर हा माणूस थोडा जाड असता तर???

ट्रेन गेल्यावर हा माणुस अन हर्ट बाहेर निघाला. अ मिरॅकल ऑफ द डे…

21

जर तुम्ही स्वतःला ह्या माणसा इतके नशिबवान समजत असाल तर, रेल्वे रुळ जरुर ओलांडा… अन्यथा ब्रिज चा उपयोग करा…. लाइफ इज प्रेशियस.. सेव्ह इट!

मिटिंग

Written by  on October 2, 2003

काल सकाळी घरुन लवकर निघालो पुण्याला जायला. आम्ही सहा लोकं जाणार होतो मिटिंगला म्हणून शेवरले  टवेरा बोलावली होती. त्या गाडीमधे मागच्या सिट्स आडव्या (म्हणजे फेसिंग इच अदर) होत्या !

दहा वेळा त्या टॅक्सीवाल्याला सांगून पण पुन्हा आडव्या सिट्स असलेली टॅक्सी बघून खरं तर टाळकच सटकलं होतं.. शांतपणे त्या  टॅक्सीच्या मालकाला फोन केला, आणि विचारलं  तर तो म्हणाला, दुसरा गाडी ले के जावो.. माटूंगा मे रखा है एक क्वालिस.. म्हंटलं तुमकू पहलेच तो बोला था, तो ये गाडी क्यूं भेजा? तर उगाच हसला आणि सॉरी म्हणाला…त्या मुळे सरळ माटुंग्या राममंदिरा समोर गेलो, आणि गाडी बदलली.लक्षात आलं की मुंबईला आल्यापासून आपणही तसंच हिंदी बोलायला लागलोय बरेचदा.

तिथे समोरच तंबी अय्यप्पा च रोडसाईड दुकान उघडं होतं.  हे एक फेमस दुकान आहे.इथे अगदी ऑथेंटिक साउथ इंडीयन मिळतं. द बेस्ट क्वॉलिटी. बस्स्स्स्स्स्स! खाण्यावर उगाच जास्त लिहायचं नाही.. ठरवलं तरी पण लिहिलच जातंच.त्या दुकानातून मेदु वडा पॅक करुन घेउन म्हणजे गाडीत बसून खाता येइल असा विचार करुन त्या दुकानात गेलो, तर तंबी म्हणाला, अभी तयार होनेका है .. !!!!!! दिवसच खराब दिसतो आजचा.

मिटींग ९-४५ला सुरु होणार होती. पण तसं असलं तरीही हे नक्की माहिती होतं की मिटींग ही १०-३० च्या आधी सुरू होणार नाही.घाईने निघालो, की आपण वेळेवर पोहोचलेले बरे. पण  एक्सप्रेस हायवे सुरू होतांना एक मॅक डी चं दुकान आहे. चालेल ना त्याला दुकान किंवा हॉटेल म्हंटलं तर? की आउटलेटंच म्हणुं??  🙂 ते दुकान आलं आणि आमच्यातल्या एकाने म्हट्लं की ड्राइव्हथु मधून काहीतरी स्नॅक्स घेउन जाऊ या म्हणजे वेळ वाचेल. पण जशी गाडी थांबली सगळेच खाली उतरले, आणि आम्ही आत शिरलो.

मॅक डी मधे हल्ली सकाळच्या वेळेस ब्रेकफास्ट प्लॅटर मिळते- एक नविन डिश, म्हणुन तिच मागवली. फारशी चांगली नव्हती. 😦  इथे थांबण्यापेक्षा फुडमॉललाच थांबलो असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं.

परफॉर्मन्स रिव्ह्यु मिटींग किती वेळ चालेल ते सांगता येत नाही. पुर्वी आमचे एक मिटींग प्रिय जी एम होते. त्यांच्या काळात तर एकदा मला रात्री १२-३० पर्यंत मिटिंग चालल्याचे आठवते. मिटिंग नंतर कॉकटेल्स होते, पण आम्ही सगळे डिप्लोमॅटच्या टेरेसवर  पोचायलाच  रात्रीचा एक वाजवला. नंतर  सगळ्यांनी अख्खी रात्र जागवली.

प्रितिश नंदी जेंव्हा विकली मधे लिहायचे तेंव्हा त्यांचा एक लेख वाचला होता. त्यात ते म्हणतात, मिटिंग इज अमंग द ग्रुप ऑफ पिपल हु इंडिव्हीज्युअली कॅन नॉट डु एनी थिंग बट, कलेक्टिव्हली , दे कॅन टुगेदर सिट, थिंक ऍंड डिसाईड दॅट नथिंग कॅन बी डन..

अतिशयोक्ती जरी सोडली वरच्या वाक्यातली , तरीही त्यात कांही तरी तर तथ्य असावं..! अगदीच काही टाकाऊ विचार नाहीत ते. मीटिंग्ज मधे दिवसभर बसून खाल्लेली बिस्किट्स आणि रिजवलेले चहाचे कप, संध्याकाळपर्यंत पोटामध्ये गुड गुड करायला लागतात.  बरं स्वतःवर ताबा रहात नाही समोर बिस्किटांची प्लेट असली म्हणजे.

इकडे हे दिवसभर असं खाणं झाल्यावर रात्री कॉकटेल्स मधे परत ते विचित्र स्नॅक्स असतातच.. एक- व्हेज क्रिस्पी आणि दुसरा चिकन टीक्का.. कितीही खाल्ले तरीही समाधान होत नाही. म्हणजे अखखा दिवस नुसतं बसून खाणं आणि खाणं  जे सुरू होतं ते अगदी रात्री पर्यंत होतं.  एक बिअर , भरपूर खाणं आणि ग्रुप्स मधल्या दिवसभराच्या डिस्कशन्स वरच्याच  गप्प.. पुन्हा तेच! दिवस भर मिटिंग केल्यावर पण रात्री पण त्याच विषयांवरच्या गप्पा सुरू असतात कांही ग्रुप्स मधे

मी त्यातल्या त्यात एक सिनेमा प्रेमी ग्रुप पहातो आणि त्यांच्यात जाउन नवीन  काय पाहिलं, किंवा राखी सावंत कसली चिकणी दिसते ( ???हा हा हा….:) )  असल्या गप्पा ऐकत बसतो.

थोड्याच वेळात त्या ग्रुप मधे बोअर झालं की एक जरा सिन्सिअर गृप असतो त्यांच्या मधे जाउन उभा राहातो, त्यातला प्रत्येक जण व्ही.पी, बरोबर कशी जवळीक करता येइल हा विचार करतांना दिसतो, मधेच एखादा एक्स्क्युज मी… म्हणून बाजुला होतो, आणि तुम्ही त्याला नजरेने फॉलो कराल तर लक्षात येतं , की तो बॉसच्या समोर जाउन , उगाचच कुठल्यातरी गोष्टीवर बोलतोय. त्याला हे कळत नाही की बॉस पण मा्णूसच आहे आणि दिवसभराच्या मिटींग मुळे तो पण वैतागलेला आहे.

एक नवीनच जॉइन झालेल्या मुलांचा ( अगदी यंगस्टर्स चा ग्रुप) वेगळा असतो. त्यांच्या जवळुन जरी तुम्ही पास झालात तर त्यांचं बोलणं एकदम थांबतं.. आणि ते कॉशस होतात. अशा मुलांना मी नेहेमी एकटा सोडतो. केवळ स्मित हास्य करुन .. आणि .. एखाद्याच्या हातातला ग्लास संपलेला असेल तर.. व्हेअर इज युवर ड्रिंक?? गो  ऍंड हेल्प युवर सेल्फ.. असं काहीतरी उगाच बोलून पुढे सरकतो.

तेवढ्यात एक जुना मित्र भेटतो. त्याच्याशी नुकतंच झालेलं भांडण आठवतं. त्याने शिवी गाळ करुन लिहिलेला इ मेल आणि व्हीपीला मार्क केलेली कॉपी आठवली आणि कपाळावर आठ्या पडल्या. मनात विचार आला. हॅव टु पे हिम इन हिज ओन कॉइन्स.. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि समोर मोठा बॉस एकटा दिसला.त्याच्याजवळ जाउन त्या इमेलचा विषय काढला, आणि हे पण सांगायला विसरलो नाही, की त्या इ मेलच्याच भाषेत मला पण उत्तर देता आलं असतं पण, केवळ संस्कार आडवे आले , म्हणून तशी भाषा मी वापरली नाही. तेवढ्यात दुसरा एक  माणुस बॉसच्या दिशेने सरकताना दिसला, आणि मी बाजुला झालो.

एकटाच उभा राहिलो बाजुला जाउन.. म्हंटलं जरा पर्सनल स्पेस हवी .. तर आमचा एक इंजिनिअर समोर येउन उभा झाला..आणि जसा मी वर बॉसशी बोललो, तसंच काहीतरी बोलायला लागला. घड्याळाकडे लक्ष गेलं.. रात्रीचे १० वाजलेत. म्हंटलं.. मी जेवून घेतो आता. आणि सुप घ्यायला त्या टेबलकडे गेलो.

इतका चिकन टिक्का आणि फिश टीक्का खाणं झालं होतं की फक्त सुप आणि सॅलड्स घेउन जेवण संपवलं .

आता सकाळ झालेली आहे, आणि पुन्हा  एका मिटींगलाच जायचंय , तेंव्हा तयारी केली पाहिजे.. म्हणून आता थांबवतो. रात्री मुंबईला परत जाइन. उद्या लिहीन व्यवस्थित पोस्ट..