तुमचं आमचं सेम असतं…

Written by  on September 29, 2003

वरच्या ओठावरची लव थोडी दाट झाल्यासारखी ,सारखं आरशात बघतांना आपलाच चेहेरा वेगळाच वाटणं, एखादी सुंदर मुलगी दिसली की कांही तरी होणं.. मग अगदी ओझरता स्पर्श साडीचा जरी झाला तरीही त्या मुळे जीव कासावीस होणं….तसं काहीसं वाटणं…. हे सगळं म्हणजे नुकतंच वयात येण्याचं लक्षण ..

आय ऍम टू ओल्ड फॉर बार्बी टु यंग फॉर डीस्को.. नावाची एक अमुल चॉकलेटची जी जाहिरात यायची ती अगदी बरोब्बर याच वयाच्या मुलांच्या बद्दलची आहे.. जस्ट १३ वय झालेलं असतं. शारिरीक  बदल, अस्वस्थ करित असतात. तसेच  अपोझिट सेक्स कडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. आधी ज्या मुलींचा तिरस्कार वाटायचा, आता त्यांच्याच कडे पाहील्यावर छान वाटायला लागतं- इव्हन त्यांच्याशी मैत्री पण करावीशी वाटते..

बरं आपण मुलींशी बोलतो , हे कुठल्याही मित्राला कळू नये असं वाटु लागतं. कारण मित्रांच्या मधे मुलीशी मैत्री करणारा तो ’बायल्या ’ अशी कन्सेप्ट असतेच.आणि या वयात मित्र म्हणजे तर विश्व असतं.त्यांच्यामध्ये कमीपणा आलेला कोणालाच खपत नाही…

. त्या वयात मिशी पण आलेली नसते. पण लवकर यावी अशी मनोमन इच्छा मात्र असते. मग त्यासाठी वेगवेगळे प्रयोग पण केले जाता..दाढी मिशी आलेली नसली तरीही मित्राने सांगितलं की बाबांचं ब्लेड फिरव दाढीवरून, म्हणजे लवकर येईल बघ दाढी  मिशी हा सल्ला…… आणि मग घरी कोणी नसतांना केलेला तो उपद्व्याप.. हनूवटीवर कापून रक्त आल्यावर मग घाबरणं…. हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं का?? मला वाटतं हो.. होत असावं… कारण माझ्या बाबतीत तर झालं होतं असं.

या वयातुन तुम्ही आम्ही सगळेच गेलेलो आहोत. कायम आपलं हदय हातावर ठेऊन दिसेल त्या मुलीवर प्रेम करण्याचा नाठाळपणा ( कारण त्या प्रेमाला प्रेम म्हणवत नाही मला. हवं तर इंग्रजी शब्द क्रश वापरा  पण प्रेम … नाही!)आपण सगळ्यांनीच केलेला असतो.या वयात भावविश्वात खूप बदल झालेला असतो. माझा तर  १३ ते १६ वयात दोन तिन दा तरी नक्कीच प्रेमभंग झाला होता 🙂 तसा तो प्रत्येकाचाच होतो, मग मी तरी त्याला अपवाद कसा काय ठरणार??.

माझा पहिला क्रश माझ्या एक टिचर होत्या… त्या मला खुप आवडायच्या.इतक्या  त्या जो विषय शिकवायच्या त्या विषयाचा पिरीयड आला की मस्त वाटायचं.. सारखं त्यांच्या हालचाली कडे बघत रहावंसं वाटायचं. पण लवकरच म्हणजे सहाच महिन्यात त्यांचं लग्नं झालं आणि बस्स.. झाला की पहिला प्रेम भंग.

आमच्या घराशेजारी एक कन्या शाळा होती. त्यामुळे रोज सकाळी , दुपारी संध्याकाळी बऱ्याचशा सुंदर सुंदर मुली शाळेत जायच्या. तेंव्हा त्यांच्याकडे पण पहात एकतर्फी प्रेम करित दिवस कंठत होतो.असो..

आज हे वर जे कांही लिहिलंय , ते म्हणजे आजच्या विषयाची प्रस्तावना.  मुलांच्या या भावविश्वाची नोंद घेउन कोणी कविता वगैरे लिहित नाहीत. पण मंगेश पाडगांवकरांनी मात्र नवा दिवस म्हणून एक काव्य संग्रह प्रकाशित केला होता . त्या काव्यसंग्रहातील कविता याच वयातल्या मुलांच्या भाव विश्वाशी जवळीक साधणाऱ्या  आहेत..

तो कविता संग्रह  जरी तो १३ते१५ वयोगटातल्या मुलांसाठी जरी लिहिला असला, तरीही आपल्याला जुने दिवस आठवण करुन देतो.. याच काव्य संग्रहातली माझी आवडती कविता आहे ती इथे पोस्ट करतोय..

माझ्या वर्गामधली
मुलगी नटी सारखी दिसते!
वेणिला देउनिया झटका
परीसारखी अल्लड हसते!

मी न कधी बोललॊ तिच्याशी,
मी नाही तसला अगाउ!
शाळेमधे अभ्यासाविण
लक्ष कुठे न देतो जाऊ!

बेल वाजली दरवाजाची,
जाउनिया मी दार उघडले;
ती मुलगी दारात उभी की!
माझे डोळे थक्क जाहले!

मला म्हणाली ,” आत येउ का”?
“अवश्य ये !” मी हसुन म्हंटलं
असेल अडचण गणितामधली ,
म्हणुन आली, मला वाटले!

तोच अचानक बसला माझ्या
पाठीवर जोराचा रट्टा!
“ऊठ!  ऊठ!,” ओरडले बाबा
“सांग किती झोपणार मठ्ठा?”

डोळे चोळीत दचकुन ऊठलो
तोच पाठीवर पुन्हा रट्ट!
आणि सुरु  अधिकच जोराने
बाबांच्या  तोंडाचा पट्ट!

खरं तर आजची पोस्ट टाकायला फारसा वेळ नाही. ताबडतोब निघायचंय साईटवर जायला. म्हणून घाई घाईत एक लहानशी पोस्ट टाकायची म्हणून लिहायला बसलो.

पटोला

Written by  on September 28, 2003

हा जो दोरा दिसतोय ना, हा निरनिराळ्या रंगात रंगवलेला आहे, ठरावीक अंतरावर निरनिराळ्या रंगाने रंगवलेला आहे, नंतर कपडा विणताना………….. तो मला सांगत होता आणि मला मात्र रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ कांक चा  “सुरभी”  नावाचा कार्यक्रम    आठवत होता. एक अप्रतिम कार्यक्रम  होता तो. भारतातल्या वैविध्यपूर्ण गोष्टी, कला,संगीत वगैरे विषयांवरचा हा कार्यक्रम अजूनही लक्षात आहे. चांगल्या कार्यक्रमांना प्रायोजक मिळत नाहीत, आणि   ते गोपी बाऊ किंवा अक्षरा आणि त्या सुहाना सारखे ( ही सगळी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत , जी नेहेमी कानावर पडतात, कार्यक्रमांची नावं माहिती नाहीत ) भिकार कार्यक्रम प्रेक्षकांच्या माथी मारले जातात- असो, विषयांतर होतंय!

चौदा विद्या आणि चौसष्ट कला आहेत असं म्हणतात.  कांही कला तर फक्त वंशपरंपरागत वारसा हक्काने पुढल्या पिढीकडे गेल्या असतात. एका घरातले वडिलधारे लोकं आपल्या पुढच्या पिढीच्या उदरभरणासाठी ह्या कला शिकवीत असत. आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती शिवाय इतर कोणालाही ही कला येऊ नये हा उद्देश असायचा, आणि अशाच तर्‍हेने पिढी तर पिढी कलेचा वारसा जात होता.  हल्ली पुढली पिढी पूर्वापार चालत आलेल्या कलेची जोपासना करेल का याची शाश्वती देता येत नाही.

काही कला तर काळाच्या ओघात   नामशेष झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या कलांसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, आणि इतके कष्ट घेतल्यावर पण मिळणारा पैसा हा खूप असेल असे नाही- म्हणूनच वडिलोपार्जित कला जोपासण्या पेक्षा ,इतर काही जास्त  पैसे आणि समाजात प्रतिष्ठा देणारे काम करण्याकडे  तरूण पिढीचा कल असतो.

अहमदाबाद जवळ  साधारण १०० किमी वर असलेले एक  पाटण नावाचे  प्राचीन  गांव. जर इथे जवळच ऒएनजीसी ची साईट नसती, तर कदाचित इकडे आलो पण नसतो. या गावाचा उल्लेख पुरातन लेखांमधून बरेचदा येतो. हे गांव मुख्यत्वेकरून प्रसिद्ध आहे ते केवळ ’पटॊला’ या साडीच्या प्रकारासाठी आणि जवळच असलेल्या एका  हेरिटेज ’ रानीकी वाव’ ह्या विहिरी साठी.

गावाच्या वेशीवर अजूनही बुरुज आणि भिंत दिसते. गावात प्रवेश करण्यासाठी असलेला दिंडी दरवाजा  अजूनही शाबूत आहे.जवळपास हजार बाराशे वर्ष जूनी असलेली तटबंदी पण अजूनही गतकाळाच्या वैभवाची साक्ष देते. वेशीच्या आत शिरल्या बरोबर,दोन्ही बाजूला असलेले जुन्या प्रकारचे वाडे, एका निराळ्याच विश्वात   आलोय याची जाणीव होते.

हे गांव प्रसिद्ध आहे ते केवळ इथे विणल्या जाणाऱ्या ’पटॊल” या साडी प्रकारासाठी.  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या लेखनातही या पटोला/पाटण चा उल्लेख आलेला आहे (स्त्रोत – एन्सायक्लोपेडीया म्हणजे  बायको  ). हजारो वर्षांपासून   ही रंगीत वस्त्र विणण्याची कला अस्तित्वात आहे.   पटोला साडी विणणे म्हणजे   खूप कठीण काम!   सिल्क चा दोरा रंगवून त्याची साडी विणणे – हे जर सांगितले तर ते खूप सोपे वाटेल पण तितकं सोपं नाही ते हे जेंव्हा तुम्ही साडी विणताना पहाता तेंव्हाच लक्षात येते

गावात शिरल्यावर पटोला हाऊस कुठे आहे ह्याची चौकशी करत निघालो. वेशी पासून एक किमी अंतरावर एक वाडा दिसला, त्यावर ’पटोला हाऊ” ची पाटी दिमाखात झळकत होती.आम्ही आत शिरलो, तर समोरच एक विणकाम करण्याचा माग लावून ठेवलेला होता. मागावर अर्धवट विणलेली साडी होती. भिंती वर बऱ्याच संस्थांनी दिलेली प्रशस्ती पत्रं,  आणि कॉलीन पॉवेल बरोबरचा फोटो, अमिताभ बच्चन इथे येऊन गेला होता तेंव्हा त्याच्याबरोबर काढलेला मालकाचा फोटो लावलेला होता. प्रशस्ती पत्रं तर अगणित होती- अगदी जर्मनी, जपान, मलेशिया, अमेरीका वगैरे अनेक देशांनी त्यांच्या या कलेची दखल घेऊन दिलेली प्रशस्ती पत्रं त्या मातीच्या भिंतीवर लटकलेली होती. कपाटात बऱ्याच ट्रॉफी ठेवलेल्या होत्या. फेम ऑफ वॉल चा फोटो राहिला काढायचा.

समोरच  पाटण पटॊला हाऊसचे मालक रोहित सालवी  उभे होते. आम्हाला पाहिल्यावर त्यांनी अगत्याने स्वागत केले ,आणि थोडी प्राथमिक माहिती विचारल्यावर , पटोला या साडीच्या प्रकाराबद्दल माहिती देणे सुरु केले. इतर कुठल्याही प्रकारात साडी विणतांना एकाच रंगाचे दोरे वापरले जातात,  आणि नंतर मग त्यावर प्रिंटींग केले जाते. किंवा निरनिराळ्या रंगाचे दोरे वापरून डिझाइन तयार  केली जाते. पण या पटोला प्रकारात तसे नसते.

रोहित ने आम्हाला मागावर लावलेले रेशमी दोरे  आणि  अर्धवट विणलेली साडी  दाखवली. रेशमी दोऱ्यांना आधीपासूनच निरनिराळ्या रंगात रंगवले होते- उभे आणि आडवे दोरे विणण्या पूर्वी रंगवून त्याचे नंतर कापड विणायचे, की आपोआपच त्याचे डिझाइन तयार  होते. प्रत्येक दोरा हा वेगवेगळा रंगवलेला असतो.  कपड्याच्या मागच्या किंवा समोरच्या् बाजूने एक सारखेच डिझाइन दिसते.

मुद्दाम हातमागा जवळ जाऊन निरखून पाहिले तर प्रत्येक दोरा वेगवेगळा रंगवला होता. एकच दोरा आधी पिवळा, नंतर काही अंतरावर हिरवा, मग लाल, मग पुन्हा हिरवा असा काहीसा रंगवला होता. दोरा असा रंगवला होता की , ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी बरोबर डिझाइन विणलं जाईल. पटोला साडी ही प्युअर सिल्कची असते. एक साडी तयार होण्यासाठी कमीतकमी चार महिने वेळ लागतो. या मधे लागणारे कष्ट पहाता याची कमीत कमी  किंमत   दिड लाख रुपये इतकी असते.तर जास्तित जास्त किंमत ही तुम्ही निवडलेल्या डिझाइनवर अवलंबून असते. कुठलीही साडी ही केवळ ऑर्डर नुसार बनवली जाते. ही साडी कशी बनवली जाते हे रोहित सालवी यांनी दाखवले. इथे कामं करणारे सगळे लोकं म्हणजे कुटुंबातली मंडळी आहेत. सगळे भाऊ , आणि इतर स्त्रिया हे काम करतात.

आधी रेशीम आल्यावर , जितक्या लांबीचे कापड विणायचे आहे तितक्या लांबीचे तुकडे एकत्र केले जातात. प्रडिझाइन हे आधी कागदावर काढले जाते, आणि एकदा डिझाइन पक्कं झाल्यावर ज्या ठिकाणी रंग द्यायचाय त्या ठिकाणी बांधणी प्रमाणे दोऱ्यांना बांधले जाते.  जेंव्हा दोरे  रंगात बुडवले जातात, तेंव्हा फक्त उघडा भाग रंगवला जातो, आणि जो भाग बांधलेला  आहे तो  न रंगवलेला रहातो. जितके रंग , तितक्या प्रकारच्या बांधणी- बांधणीच्या साड्या पाहिल्या होत्या, पण बांधणीचे रंगवलेले दोरे म्हणजे अशक्य वाटत होते मला तरी. एका रंगात दोरे बुडवून रंगवून झाल्यावर काही ठिकाणचे बांधलेले सोडले जाते.  ह्या बद्दल जास्त

लिहीणे कठीण आ्हे,  आणि पुन्हा दुसरा रंग दिला जातो. याचे फोटो खाली देतोय. रोहितचे भाऊ स्वतः समोर डिझाइन ठेऊन बांधणीचे काम करीत होते. कुठलेही स्केल किंवा इतर काही साधन नसतांना केवळ नजरेने बघून बांधणीचे काम सुरु होते. इतकं पर्फेक्शन बहुतेक केवळ अनुभवातूनच येऊ शकते.

रंगवून झाल्यावर हे दोरे मागावर सेट केले जातात. उभे दोरे आणि आडवे दोरे हे वेगवेगळे रंगवले जातात. मागावर विणताना डिझाइन बर हुकुम योग्य त्या ठिकाणी योग्य रंग येऊन कपडा विणला जातो, आणि एक सुंदर डिझाइन तयार होते. हे पहातांना नकळत , त्या कलाकाराच्या कामासाठी तोंडून ” वाह” निघाल्याशिवाय रहात नाही. या कामासाठी नैसर्गिक  पक्के  रंग वापरण्याची पद्धत आहे. कशीही धुतली , तरीही त्या साडीचा रंग फिका होत नाही.  दुकानात एक ३०० वर्ष जूनी साडी ठेवलेली आहे एका फ्रेम मधे! की जी फाटली आहे, पण रंग मात्र अजूनही पक्का दिसतो.

ह्या गावातल्या लोकांचा हा पिढीजात व्यवसाय होता. पूर्वी  अशा प्रकारचे कपडे विणण्याचा व्यवसाय करणारी बरीच म्हणजे  जवळपास सातशे च्या  वर  कुटुंब होती, पण गेल्या काही शताब्दी मधे मात्र बहुसंख्य लोकांनी हा धंदा सोडून इतर उद्योगात उडी घेतली आहे. शिक्षण, घेऊन डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनिअर होणारे पण बरेच लोकं आहेत. दुर्दैवाने सध्या फक्त दोन कुटुंबात ही कला जिवंत आहे. आजच्या घडीला फक्त दोनच कुटुंब हा  पिढीजात व्यवसाय करतात किंवा या प्रकारचे कापड विणु शकतात.

आणि जाता जाता एक माहिती, मार्केट मधे मिळणारी पटोला साडी ही खरी पटोला नसतेच.खरी  पटोला साडी  दिड लाखाच्या वर असते. पटोला साडी ही फक्त ऑर्डर प्रमाणेच बनवून मिळते. हवी असेल तर   त्यांची साईट इथे  ^(http://rangmarathiche.com/goto/http://patanpatola.com/)पहाता येईल.(http://patanpatola.com/inside.html ^(http://rangmarathiche.com/goto/http://patanpatola.com/inside.html))

रोहित म्हणाले, जपान, अमेरिका, युरोपियन   देशांनी  त्याला मुद्दाम बोलावले होते प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी साठी. त्यांनी हा माग आणि रेशीम घेऊन त्याने जगभर प्रवास केलेला आहे.   जपान ने असा कपडा पॉवर लुम वर बनवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य  झाले नाही. बऱ्याच देशांनी दिलेली सर्टिफिकेट्स आणि इतर ट्रॉफी पाहिल्यावर त्यांच्या ही कला आपल्या देशात असल्याचा – आणि आपल्याला पहायला मिळाल्याने खूप अभिमान आणि  समाधान वाटले.   ही कला पहाण्यासाठी  अमिताभ बच्चन, मलेशियाचे प्रेसिडेंट ,पहिले राष्ट्रपती,नमो, वगैरे बरेच लोकं  इथे या घरात येऊन गेले होते असे रोहित अभिमानाने सांगतात. 

  आपल्या पुढच्या  किती पिढ्यां पर्यंत ही कला शिल्लक राहील ?  आपल्या पुढच्या पिढीला हा प्रकार पहायला तरी मिळेल का? हा प्रश्न मनात घेऊनच तिथून पाय काढता घेतला.

एका लग्नाची गोष्ट

Written by  on September 2, 2003

पण मला इतक्यात लग्नच करायचं नाही. सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती. गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद/विसंवाद सुरु होता.

अगं पण नाही का म्हणतेस? चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं? तुझ्या वयाची असतांना तुझ्या आईला तु झाली होती, चक्क दोन वर्षाची होती तु.

केलं असतं हो बाबा, पण चांगला मुलगाच मिळत नाही नां, मी तरी काय करु? कुठल्याही मुलाशी लग्न करु का?

मी तसं म्हंटलं आहे का? चांगल्या मुलाशीच कर म्हणतोय ना? एखादा पाहुन ठेवला असेल तर सांग, आमची काही हरकत नाही, आम्ही करुन देऊ तुझे लग्नं.

तसे नाही हो बाबा. आता पुन्हा ऑन साईटला बहुतेक लॉंग टर्म जावे लागेल, मग आता लग्न केले तर करीअर ची वाट लागेल.

कशी काय वाट लागेल? आम्ही एक मुलगा बघुन ठेवलाय, आपल्या सुमामावशीच्या नणंदेचा मुलगा आहे, कॅलिफोर्नियाला असतो. सध्या आलाय भारतात, कालच सुमा मावशीचा फोन होता, म्हणत होती, एकदा दोघांना भेटू दे . चांगला दोन महिने आहे भारतात तो. तेंव्हा आता जास्त वाव विवाद नको, येत्या शनीवारी त्याला भेट, घरी नको असेल, तर बाहेर भेट कॉफी हाऊस मधे. भेटल्यावर जर आवडला नाही तर नाही म्हण, आम्ही जबरद्स्ती करणार नाही- पण एकदा भेट, नाही तर  मावशीला वाईट वाटेल बघ. आम्ही पण मुलगा पाहिला आहे, सुमामावशीच्या घरी गेलो होतो ना, तेंव्हाच तिथे हा पण आला होता. अगदी निर्व्यसनी आणि व्हेजीटेरिअन आहे मुलगा. अंडही खात नाही तुझ्या अपेक्षेप्रमाणे. अगदी तुला शोभेल असा आहे. एकदा भेट तरी.

सोज्वळ अगदी नावाप्रमाणेच सोज्वळ होती. शाळा, कॉलेज मधे अभ्यास एके अभ्यास एवढंच काय ते माहिती होतं तिला. कॉलेज संपलं आणि कॅम्पस मधेच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली आणि पहिल्याच वर्षा अखेरीस ऑन साईट जायचा चान्स मिळाला. आज पर्यंत मुंबई बाहेर कुठेही एकटी न गेलेली, पण अगदी कॉन्फिडन्स ने मी जाईन एकटी, तुम्ही काळजी करु नका म्हणुन आई बाबांना धिर देणारी, जेंव्हा विमान तळावर डिपार्चर गेट वर पोहोचली, आणी आत जायची वेळ आली, तेंव्हा मात्र डोळ्यात पाणी भरून आलं होतं, मागे वळुन आई बाबांच्या कडे तिने पाहिले, तर तिला दिसले की बाबांचे पण डोळे पाण्याने डबडबले आहेत, पण मन हळवं होऊ न देता ते पाणी परतवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे म्हंटलं तर आज पर्यंत काही मुलं बघुन झाली होती, पण कुठलाच मुलगा आवडला नव्हता, कोणी सिग्रेट ओढतो म्हणुन नको, तर कोणी नॉनव्हेज खातो म्हणुन नको. तर हे असे सुरु होते. पण सुमा मावशीने सुचवलेला मुलगा म्हंटल्यावर तिला पण नाही म्हणवेना, लाडकी मावशी होती ना सुमामावशी. शेवटी एकदाचं कॉम्प्रोमाईज झालं, आणि मुलाला भेटायला तयार झाली एकदाची.

प्रथमेश ! गणेश चतुर्थीला जन्म झाला म्हणुन प्रथमेश नाव ठेवले आजी ने मोठ्या आनंदाने. नाही तर इतक्या वर्षानंतर घरात आनंद घेऊन आला म्हणुन आनंद नाव ठेवायचे ठरले होते आधी, पण आजीपुढे कोणाचे चालते का? तसेही हे नाव पण छानच आहे म्हणा, पण प्रथमेशची आई मात्र अजुनही आनंद म्हणते त्याला. सर्वसाधारण मुला प्रमाणेच , इंजिनिअर झाल्यावर एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीवर लागला. दोन वर्ष भारतात काम केल्यावर नोकरी सोडली आणि एम एस करायला कॅलिफोर्नियाला गेला. एम एस केल्यावर तिकडेच नोकरी मिळाली, आणि आता गेली पाच वर्ष तिकडेच रहातो. शिक्षण सुरु असताना सारखे भारतात येणे परवडत नव्हते म्हणुन आला नाही, नंतर नोकरी नवीन म्हणुन सुटी मिळत नव्हती. पण आता मात्र चांगली दोन महिन्यांची सुटी घेऊन भारतात आला होता तो.

अमेरिकेत एकटे रहाणे म्हणजे खरंच कंटाळवाणे वाटायचे प्रथमेशला. सगळ्यात मोठे कारण म्हणजे खाण्याचे होणारे हाल. फ्रेंच फ्राईज आणि वेजेस किती खायच्या ? केक ला सुद्धा अंड्याचा वास येतो म्हणुन ती पण खात नसे. क्रॉसेंट्स, डॅनिश, वगैरे सगळ्या ब्रेडच्या प्रकारांमधे अंडे असल्याने ते पण खातांना त्रासच व्हायचा, पण बरेचदा नाईलाज म्हणुन काही तरी खायचं आणि दिवस काढायचे सुरु होते. जवळच एक इंडीयन स्टॊअर होतं, आणि जातांना घरुन प्रेशर कुकर नेल्याने, घरीच स्वयंपाक करणे सुरु केले. सकाळी भाजी पोळी, चा डबा सोबत करून घ्यायचा आणि संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा भात वगैरे काही तरी.. पण आता लग्नाला तयार होण्यामागचा सगळ्यात मोठा इन्सेंटीव्ह- जेवायला तरी व्यवस्थित मिळेल हाच .सोज्वळ चा फोटॊ पाहिला होता, आणि त्याला पण आवडला होता. आता भेटण्याची उत्सुकता पण होतीच.

तर शेवटी सुमामावशी बरोबर बोलणं झालं बाबांचं आणि भेटायची वेळ ठरली. सी सी डी मधे! एकतर खुर्च्या कम्फर्टेबल असतात , त्यामुळे एखादा तास अगदी आरामात गप्पा मारता येतात. सोज्वळ केवळ बाबांच्या आग्रहामुळे जायला तयार झाली होती. लवकर त्याला कटवुन परत येऊ घरी आणि मस्त पैकी विकएंड एंजॉय करु असं प्लानिंग करुनच ती घरातुन निघाली.

कॉफी हाऊस ला ठरलेल्या वेळेवर पोहोचली आणि आणि तिला तिथे समोरच एका कोपऱ्यात प्रथमेश बसलेला दिसला. फोटो आधीच पाहिलेला असल्याने पटकन ओळखता आले. एक वार्म हास्य चेहेऱ्यावर होते त्याच्या. त्याने हात दाखवला, आणि सोज्वळ त्याच्या दिशेने चालु लागली आणि समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. लवकर कटवायचा प्लान तयार होताच. तिने आजुबाजुला नजर टाकली.

कधी नव्हे ती आज कॉफी हाऊस मधे खूप गर्दी होती. उजवी कडल्या टेबलवर तीघं बसले होते, त्यांचे काही तरी नविन बिझिनेसच्या बद्दल बोलणे मोठ्या आवाजात सुरु होते, मधेच टाळी देणे, आणि आजुबाजुला लोकं बसले आहेत त्यांनाही काही बोलायचे असेल ह्याची अजिबात जाणिव दिसत नव्हती. तिकडे दुर्लक्ष करुन प्रथमेश बरोबर बोलणे सुरु केले.

शेजारच्या टेबलवरच्या लोकांमुळे अजिबात बोलता येत नव्हते, त्यांचे मोठमोठयाने हसणे, ओरडणे , डीस्कशन्स सुरु होते. विषय बहुतेक नवीन कंपनी सुरु करणार तिचे नाव काय असावे हा होता.

प्रथमेश काउंटरवर गेला आणि ह्या लोकांना आवाज कमी करण्याची विनंती करा म्हणुन मॅनेजरला म्हणाला, म्हणाला गेले तीन तास हे लोकं इथे बसुन डिस्कशन करताहेत, तुम्ही म्हणता म्हणुन मी त्यांना विनंती करायला जातो, पण ते ऐकतिल की नाही ह्याची खात्री देता येत नाही.

त्या लोकांच्याही लक्षात आले होते की प्रथमेशनेच कम्प्लेंट केली आहे म्हणुन मॅनेजर आलाय ते. पण आवाज कमी न करता, त्यांचे नवीन कंपनी सुरु करायची आहे, वेब साईट तयार आहे, फक्त कंपनीचे नाव काय ठेवावे, या विषयावर अजुन मोठ्याने बोलणे सुरु झाले. प्रथमेश पुन्हा स्वतः त्या टेबलवर जाउन आवाज कमी करा म्हणुन विनंती करायला गेला, पण तिघांनीही त्याची खिल्ली उडवणे सुरु केले, प्रथमेश आपल्या टेबलवर परत आला, कपाळावर आठ्या, डॊळ्यात राग, अरे लोकांना सिव्हिक सेन्स का नसतॊ? दुसरा टेबल पण रिकामा नसल्याने प्रथमेश- सोज्वळला त्याच टेबलवर बसुन गप्पा माराव्या लागत होत्या.

प्रथमेश तसा एक्स्ट्रोव्हर्ट असल्याने विषयाला काही कमतरता नव्हती, शेजारच्या लोकांच्या आवाजाने दुर्लक्ष करुन दोघेही संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. अगदी कॉलेज च्या दिवसापासुन ते आजच्या दिवसापर्यंत म्हणजे कंपनी, कामाचे स्वरुप , सिनेमा, खाण्यापिण्याच्या सवयी, घरचे लोकं, घरी कोण कोण आहे? वगैरे अशा असंख्य गोष्टींबद्दल बोलायचं होतं प्रथमेशला. घरच्या टिव्ही वर कुठले चॅनेल लावायचे या बद्दल उगीच रोजचा वाद नको 🙂 पण शेजारच्या टेबलवरुन दोघांवर केल्याजाणाऱ्या कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करुन गप्पा सुरु थेवणे अवघड होत होते.

शेवटी जवळपास तासाभराने शेजारच्या टेबलवरच्या तिघांचेही त्यांच्या नवीन कंपनीचे नाव काय ठेवायचे या बद्दल एकमत झाले. प्रथमेश ने मोबाइल उचलला, आणि सोज्वळला म्हणाला, मला पाच मिनिटं दे, आणि त्याने मोबाईल उचलला आणि काही तरी करु लागला. सोज्वळला खुप राग आला, अरे मी इथे भेटायला बोलायला आली आहे, आणि तु इथे मोबाईल घेऊन बसला आहेस? तिच्या चेहेऱ्यावर राग दिसत होता. पण तिकडे दुर्लक्ष करुन प्रथमेशने आपले काम सुरु ठेवले. साधारण पाच मिनिटानंतर मोबाईल खाली ठेवला . सोज्वळ चिडली होती, म्हणाली, एवढं काय महत्वाचं काम होतं? तर त्याने मोबाईल समोर ठेवला. आणि सोज्वळ एकदम हसायला लागली, आणि तिच्याबरोबर प्रथमेश पण, एवढ्या मोठ्याने की ते तिघे पण एकदम शांत झाले आणि ह्यांच्याकडे बघु लागले. प्रथमेश ने त्या लोकांनी जे कंपनीचे नाव चार तास डिस्कस करुन ठरवले होते ते डोमेन नेम डॉटकॉम, डॉट्नेट बुक केले होते , म्हणजे त्यांना आता पुन्हा मिटींग करुन नवीन नाव शोधावे लागेल, किंवा प्रथमेश कडुन विकत घ्यावे लागेल. स्मार्ट बॉय.

सोज्वळ ने हात समोर केला, प्रथमेशने हात हातात धरला, आणि दोघेही कॉफी हाउस च्या बाहेर पडले, घरी सांगायला की आम्ही लग्नाला तयार आहोत म्हणुन….