चविनं खाणार..इंदौरला

Written by  on July 31, 2003

इंदौर म्हंटलं की पहिले आठवते ते आहिल्या बाई होळकरांची छत्री  – जी सध्या संपुर्ण पणे दुर्लक्षित आहे, अगदी राजवाड्याच्या वाटेवर डाव्या हाताला असलेली ही छ्त्री दिसली की माझे टेस्ट बड्स जागृत होतात. कारण  सराफा बाजारला जातांना ह्या छत्री समोरून वळावं लागतं.इंदौरला राजवाड्या जवळच आहे सराफा बाजार. दिवसभर इथे सोने,चांदी इत्यादींचा व्यवहार होतो. पण संध्याकाळ झाली की मग मात्र रस्त्यावर किंवा सराफा दुकानांच्या पायऱ्यावर लोकं आपले स्टॉल्स लावतात. तसे काही परमनंट स्टॉल्स पण आहेत इथे.  इंदौरचे लोकं खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच चोखंदळ आहेत. इथले आमचे मित्र म्हणतात, इंदौर के लोग चटोरे है..  चटोरे म्हणजे  काय असेल बरं?

56  dukanचांगल्या मोठ्या हॉटेल्स मधे खाण्याचा  फार लवकर कंटाळा येतो आणि मग काही तरी हवं हवंसं वाटायला लागतं. मग अर्थातच पाय वळतात गाडीकडे. गाडीवरच्या पदार्थांची एक निराळीच लज्जत असते.चवदार साबुदाण्याची खिचडी गाडीवर मिळते ती फक्त इंदौरलाच.. आणि टेस्ट पण अगदी अप्रतिम..या खिचडी सारखी खिचडी कधीच खाल्लेली नाही. माझा एक नेहेमीचा गाडीवाला आहे . एका स्टीलच्या भांड्यात साबुदाणा खिचडी बनवलेली, + बटाटा कीस तळलेला + कुठलासा मसाला + लिंबु घालुन चमच्याने मिक्स करुन , एका पेपरच्या द्रोणात घालुन तु्मच्या हातात देतो तो.. सभोवताली बरेच लोकं उभे असतात साबुदाणा खिचडी हा इथला स्पेशल पदार्थ ! एखाद्या गाडी वाल्याकडे एक  दिवस तरी संध्याकाळी चक्कर असतेच प्रत्येक व्हिजीटला.

सध्या इंदौरला आलेलो आहे. म्हणजे दोन दिवस  नुसती चंगळ.. दिवसभर भरपूर कामं करायची आणि रात्री खाद्य यात्रा सुरु करायची .मनसोक्त खायचं.. ठरवून टाकलंय की मुंबईला गेलो की नंतर मग डायटींग सुरु करु. इथे असे पर्यंत नाही. 🙂

आज सकाळी लवकरच उठलो. सकाळी दहा वाजता काम सुरु करायचं.. म्हणून, अंघोळ वगैरे आटोपून बसलो होतो. हॉटेलमधे तोच तो टिपिकल ब्रेकफास्ट बफे स्प्रेड असतो. आणि इंदौरला आल्यावर, आलु पराठा, पुरी भाजी, इडली-दोसा , किंवा कॉर्नफ्लेक्स खाण्यात कसली मजा??

इथे आल्यावर सकाळचा नाश्ता हवा.. पोहा आणि जिलबी. आता दहा वाजेपर्यंत तर सगळी कडला नाश्ता संपुन कचोरी सुरु झालेली असते. पोहे हे फक्त सकाळी ६ते ८ -९ पर्यंतच चांगले मिळतात. नंतर मग काही ठरावीक दुकानातच जावं लागतं.खरं तर हा शब्द जिलबी की जिलेबी हा मला नेहेमीच पडणारा प्रशन.. 🙂 पण कुठलाही असला तरी त्या पदार्थाची चव बदलत नाही.

सकाळी साधारण दहाच्या सुमारास शर्माजी आले. म्हंटलं..शर्माजी नास्ता कहां कराओगे?? हमे तो स्पेशल इंदौरी नाश्ता करना है.. शर्माजींनी अपेक्षेप्रमाणे उत्तर दिलं.. ५६ दुकान.. कारण आता दहा वाजता इंदौरी नाश्ता मिळण्याचं तेच ठिकाण आहे. युजवली मी मुंबईला परत जातांना ५६ दुकानातून आकाशचे नमकिन आणि मधुरमची मिठाई घेतल्या शिवाय  इंदौर सोडत नाही.

कार पार्क केली ५६दुकानाच्या शेजारी . समोरच बसण्याची व्यवस्था केलेली होती, भर रस्त्यावर प्लॅस्टीकच्या खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. एक दुकानदार गरमागरम जिलबी तळत होता.. शर्माजी म्हणे, सर , वहां चलिये, वो अच्छा बनाता है. आम्ही जिलबी +पोहा ची ऑर्डर दिली. कागदावर पोहे त्यावर आकाशचं किंवा प्रकाशचं थोडंस नमकिन..जिराळू ( हे काय असतं ते माहिती नाही पण एक टेस्टी पावडर मसाला आहे) घालुन त्याने हातात

1poha jalebi

आणुन दिलं.

जगातले सर्वोत्कृष्ट पोहे हे फक्त इंदौरलाच मिळतात. असे पोहे आजपर्यंत कुठेच खाण्यात आले नाहीत. आणि जिलबी पण अगदी मस्त होती शुध्द तुपात

तळलेली , खातांना त्या जिलबीचा क्रिस्पीनेस आणि चांगल्या तुपाची चव प्रत्येक घासागणिक जाणवत होती.. शर्माजी आधी नाही – नको करित होते, पण जिलबी संपवली त्यांनी!

2 dalkachori and jilebi

दुसरा क्या लोगे म्हंट्ल्यावर म्हंटलं भुट्टॆका किस और कचोरी.. म्हणे भुट्टेका किस शामको मिलेगा..इंदौरची आणि सिहोरची कचोरी तसेच भोपाळची पण कचोरी आणि समोसा अगदी मस्त असतात. अशी कचोरी मुंबईला मीळत नाही. उडिद डाळ घालुन, मुग डाळ घालुन, कांद्याची कचोरी, बटाटा कचोरी, हिरव्या मटरची कचोरी असे अनेक प्रकार इथे मिळतात. कचोरी अर्थात जास्त खाल्ली जात नाही. पण दोन चार तर नक्किच संपवु शकता. इथे कचोरी खातांना त्यावर चटणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. जर तुम्ही मुंबई प्रमाणे चटणी वगैरे घालुन खाल, तर ओरिजिनल टेस्ट निघुन जाइल , आणि ती इंदौरची कचोरी गुज्जु कचोरी होऊन जाईल. म्हणून तशीच खा…. सोबत फार तर तळलेली हिरवी मिरची घ्या.सिहोच्या कचोरीत थोडं मिरं जास्त असतं आणि मिऱ्याचा पंजंट पणा आणि तो फ्लेवर मला खुप आवडतो.इंदौरची सपना संगिताच्या समोरची आलु कचोरी पण अप्रतिम असते.

पिथमपुरला पुर्वी एम आय डी सी मधे जाणं व्हायचं. तेंव्हा त्या रस्त्यावर एक समोसा वाल्याच दुकान होतं . इंदौर पासुन थोड्या अंतरावर असेल . तिथला समोसा म्हणजे माझा जिव की प्राण! त्या समोशाची भाजी एकदम वेगळी असायची. टिपिकल पंजाबी समोशाची टेस्ट नाही.. तर किंचित आंबट गोड चव असलेली ती भाजी, आणि त्यात अधुनमधुन दाताखाली येणारे शोपेचे दाणे.यांच्यामुळे अप्रतिम फ्लेवर येतो.पण या वेळेस पिथमपुरला गेलो नाही, त्यामुळे राहुन गेलं! एनी वे , देअर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम…

5 nilkant thaliदुपारचं लंच अगदी लाईट हवं होतं. टुरला असलो की सारखं पंजाबी खाउन कंटाळा येतो. मग वाटतं की साधी तवा रोटी ( म्हणजे पोळी) असलेली थाळी मिळाली तर??? इंदौरला गेल्या कित्येक वर्षापासून माझं एक आवडीचं ठिकाण आहे ते म्हणजे निळकंठ भोजनालय. अगदी बेसिक भोजनालय असतं तसं आहे हे.केवळ ४० रुपयात चांगली थाळी मिळते या हॉटेलमधे. इथे अगदी घरच्या प्रमाणे साधं जेवण मिळतं. मराठी थाळी  म्हंटलं तरीही हरकत नाही. उसळ, बटाटा  भाजी, एक दुसरी भाजी, फुलका आणि साधं वरण भात. तुम्ही जेवायला बसलात, की गरम गरम फुगलेले फुलके आणून वाढतो तो वेटर… !! मस्त आहे ही जागा. 4 nilkanthमला तर आवडते बॉ!इथल्या थाळीला बघुन सारखी गुज्जू थाळीखाणारे कदाचित नाकं मुरडतिल पण टेस्ट एकदम अप्रतिम…ना फरसाण..ना स्विट … साधं घरगुती  जेवण. अशा घरगुती जेवणाची किंमत कांही दिवस दररोज पंजाबी खाल्ल्याशिवाय  कळत नाही..इंदौरला आलो की एकदा इथे व्हिजिट जरुर असते.फक्त लंच टाइममधे थांबावं लागतं, कारण  नेहेमीच वेटींग असते.

रात्री अहिल्याबाइंच्या छत्री वर फिरायला गेलो. तो घाट मला खुप आवडतो. पण ही जागा हल्ली पुर्णपणे दुर्लक्षित झालेली आहे. पुरातन विभागाने वेळीच काळजी घेतली नाही तर मात्र ही जागा नशेडी लोकांचा अड्डा होइल. रात्री जेवायचं नाही हे ठरवलंच होतं, म्हणून सरळ सराफा च्या दिशेने चालायला लागलो.

सराफा म्हणजे इंदौर चा सराफा बाजार. दिवस भर इथे सोने -चांदी दागिन्यांचा व्यापार होतो, आणि रात्री इथे मस्त पैकी खाण्या पिण्याचे स्टॉल्स लागतात. मी आणि माझा मित्र संदिप सोबत होता. आम्ही आधी संपुर्ण बाजार फिरुन आलो.कुठे काय काय मिळतं ते बघितलं आणि नंतर जोशीच्या दुकानासमोर थांबलॊ . प्रसन्न चेहेऱ्याने त्या जोशीबुवाने स्वागत केलं.

पहिली ऑर्डर अर्थातच भुट्टेका कीस.. पहिला घास तोंडात घातला, आणि वाह!! क्या बात है.. म्हणून ऍप्रिशिएट केलं.. जोशी बुवा एकदम खुष झाले, त्यांना कळलं की मी बाहेरचा असावा म्हणून. इथल्या या किसाची चव इतकी छान कां होते ?? मराठीतच पुटपुटलो स्वतःशीच.. तर जोशी बुवा म्हणाले, की आम्ही हा किस शिजवतांना त्यात पाणी न घालतां खुप सारं दुध घालुन खुप वेळ शिजवतो मंद आचेवर.. म्हणुन इतका टेस्टी असतो हा.एखादा लिटर दुध तरी लागतं अर्धा किलो  किस शिजवायला. .  घरी बायकोला सांगायला हवं हे या लोकाचं ट्रेड सिक्रेट.. 🙂

मोठा द्रोण भरुन तो किस रीचवला. तसा भुट्टा हा पचायला जड असतो, इतका किस खाउन पाणी प्यायलं की पोट भरणार. पण तरिही त्या जोशी बुवांची कलाकारी पहात तिथे उभा राहिलो. जोशी बुवा दही वडे बनवत होते.. कसे त्यावर कांही लिहित नाही, तुम्हीच पहा इथे व्हिडीओ पोस्ट करतोय……………… चव मात्र एकदम उत्कृष्ट होती. लक्षात राहिली ती एका चिमटित धरुन  मीठ, जिरं, आणी ओव्याची पावडर त्या दहिवड्यावर घालण्याची हातोटी.एकाच वेळी चिमटीमधे मिठ मिरं आणी ओवा पावडर धरुन क्रमा क्रमाने सोडायची दहिवड्यावर…. सुपर्ब!! व्हिडीओ मधे आहे ती… खाणं झाल्यावर शेवटी सुहास्य मुद्रेने जोशी बुवांनी निरोप घेतला आमचा हात जोडून.. पुन्हा या म्हणाले.

म्हंट्लं जोशी बुवा, तुम्हाला टाकतो आता नेटवर.. तर म्हणे मी आधीपासूनच आहे नां.. !!

[youtube=http://www.youtube.com/watch?v=5pMe4sAVviQ]

2 rabadi makingथोडी पेटपुजा झाली होती, पोट पण भरलं होतं.आम्ही रमत गमत सराफ्याला फिरत होतो. समोर कढयांमधे रबडी बनवणे चालू होते.खाली कोळशाची मोठी शेगडी आणि त्यावर एक कढई. समोरच एक माणुस बसलेला , अधून मधून कडेला लागणारी साय मोठ्या उलथण्याने खरडून पुन्हा त्या दुधात टाकत होता. तिथे ही गम्मत पहात पाचेक मिनिटं उभं राहिलो आणि नंतर पुढे चालायला लागलो.

sweet meat shopएका ठिकाणी एक आजोबा समोर तयार झालेली रबडी, काला जामुन, गुलाब जामुन, आणि माझा फेवरेट मुगाचाहलवा घेउन बसले होते. मुगाचा हलवा पुर्णपणे साजुक तुपात एका परातित बुडलेला.. इथे कॉलेस्ट्रॉल चा विचार करायचा नाही. 🙂 कागदी द्रोणात एक  मुगाचा हलवा, आणि नंतर एक काला जामुन +रबडी घेतली . हे इंदौरचं स्पेशल कॉम्बो.. सगळं झालं आणि पैसे द्यायला लागलो तर त्या आजोबांनी समोर एका द्रोणामधे दोन लहानसे गुलाबजाम सदृष्य पदार्थ टाकले आणि द्रोण समोर केला. म्हणे साब ट्राय करो.. एक एक पिस आम्ही उचलला आणि तोंडात घातला.. आणि त्या पिस बरोबर आम्ही पणविरघळलोच…. म्हंटला, ये क्या है? तर म्हणाला की मुगाच्या डाळिचे गुलाबजाम. अप्रतिम पदार्थ आहे हा. इतका सुंदर पदार्थ मुगाच्या डाळिचा असु शकतो ??? मुगाची भजी सदृष्य पिसेस, साजुक तुपात तळुन पाकामधे भिजलेली..  अप्रतिम.. जर कधी इंदौरला याल ना, तर इथे नक्कीच भेट द्या.

[youtube=http://www.youtube.com/watch?v=lB5fqly_htg]

icecreamइथे पार्किंगची प्रॉब्लेम आहे , त्यामुळे रिक्षानेच आलात तर बरं.. सगळं झालं आणि आकंठ तृप्त होऊन आम्ही बाहेर निघालो. तर समोरच मटका कुल्फी वाला दिसला. — समोर पाटी होती.. १९५० से प्रसिध्द.. याच्याकडली मटका कुल्फी घेतली ड्रायफ्रूट वाली. पण अजिबात चांगली नव्हती. हे अग्रवालचं दुकान टाळा. पहिली गोष्ट म्हणजे जरी जाहिरात केली होती मटका कुल्फी ची तरी पण इथे विकली जाणारी कुल्फी मटका कुल्फी नव्हती. आतल्या फ्रिझर मधुन काढुन दिली त्यानी कुल्फी. द्सरं म्हणजे चवीच्या नावानी अगदी चांग भलं…. असो..कुल्फी अक्षरशः फेकुन दिली.  😦

इंदौरच्या अजुन बऱ्याच चांगल्या जागा आहेत खाण्यासाठी.. ऍज युजवल चोखी ढाणी पण बरी आहे … आणि अजुन बरंच काही असेल. पण मी इंदौरचा नसल्यामूळे मला जास्त माहिती नाही. जर तुम्हाला इंदौरच्या काही

डायटींग करताय ???

Written by  on July 29, 2003
imagesहा शब्द ऐकला की पूर्वी मला डाय  + ईटींग म्हणजे  “खाऊन खाऊन मरा”…डायटींग असे वाटायचे  🙂  एखादा माणूस डायटींग करतोय हे ऐकले की   मला फुड व्हर्सेस मॅन चा एपिसोड नजरेसमोर यायचा.माझं वजन हे नेहेमीच यो-यो प्रमाणे खाली वर होत असते. प्रत्येक गोष्टी मधे मी आरंभशूर असल्याने नियमित पणे व्यायाम आणि डायटींग चा आरंभ करायचो.पण नंतर लवकरच  सगळं बंद व्हायचं. काही दिवस – हवं तर महिने म्हणा , रोज सकाळी फिरणे, वगैरे न चुकता व्हायचे, इतके नियमीत की पावसाळ्यात पण छत्री घेऊन फिरायला जायचो मी 🙂कोणीही पहा उठसुठ डायट या विषयावर बोलत असतो.  कधी तरी एखादी पॅंट कंबरेवर घट़्ट व्हायला लागली की मग आपलं वजन वाढलंय आणि आता डायट सुरु करण्याची वेळ आलेली आहे असे समजून स्वतःच काही तरी डायट प्लॅन करायचा , आणि काही गोष्टी खाणं बंद करायचे, अशी टूम आलेली आहे.तुम्ही एकदा डिक्लिअर केलं की मी डायट करणार! की तुमचे सगळे हितशत्रू  आणि मित्र एकत्र येऊन तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये याची यादी देतील. एखादा खास मित्र नक्कीच तुम्हाला जनरल मोटर्स च्या डायट प्लानची कॉपी देईल 🙂 हा डायट प्लान  काय आहे ते नेट वर शोधा- सापडेल !

समजा तुम्ही डायटींग करत नाही, आणि तुमचे हे डायटींग सुरु केलेल मित्र तुम्हाला हमखास एखादी खूप जूनी वगैरे पॅंट घातलेले दिसतील, आणि मग तुम्ही दिसलात, की अरे माझी ही पॅंट पाच वर्ष जूनी आहे बघ, आता होते आहे मला ( म्हणजे मी डाय्टींग सुरु करून वजन कमी केलेले आहे , तेंव्हा तू पण मला म्हण” की तुम्हे वजन कमी झालेले आहे रे म्हणून” ) पण ,  मी मात्र अगदी मख्ख चेहेरा करून   अस्सं होय!  असे म्हणून गप्प बसतो 🙂

आमच्या लहानपणी एखादा छान गुबगुबीत शरीर यष्टीचा मुलगा दिसला, की छान तब्येत आहे असे म्हटले जायचे, आणि एखादा पाप्याचा पित्तर दिसला की ” काय रे ? असा सुदामा का झालाय तुझा? आई बाप खाऊ घालत नाहीत का?” अशी वाक्य हमखास कानी पडायची.  आता आठवलं की बरं वाटतं , की मी पण तेंव्हा अगदीच बारीक होतो- पाप्याचं पित्तर म्हणावं हवं तर! बारीक शरीर यष्टीची मला खूप लाज वाटायची.मी शक्यतो फक्त फुल स्लिव्ह्ज शर्ट्स वापरायचो. टी शर्ट तर कधीच नाही. काय दिवस होते नाही? आता मी पोट दिसतं म्हणून टी शर्ट टाळतो .

हल्ली वजन वाढले म्हणजे आता हार्ट अटॅक येऊन आपण मरणार असे विचार तुमच्या मनात भरवण्याचे काम सफोला, ओट्स, केलॉग्ज ,  वगैरे च्या जाहिराती नियमीत पणे करत असतात. ह्या जाहिराती केवळ तुम्हीच नाही, तर तुमची बायको पण पहात असते, त्यामुळे आपल्या नवऱ्याचे वजन वाढलेले दिसले की तिचा स्वतःचा डायट प्लान  तुमच्या साठी सुरु करते. एक दिवस सकाळी ओट्स किंवा ब्राउन ब्रेड विथ लो कॅल बटर आली की सम्जावे की आपले येते काही दिवस तरी धडगत नाही! मटकी , मुग, शेपू, पालेभाज्या, वगैरे सगळ्या तुमच्या पानात पडणे सुरु होणार याची कल्पना  येते.असो “माझे डायटींग”  हा  ह्या लेखाचा विषय नसल्याने या बाबत फार काही लिहीत नाही.

डायटींग करणाऱ्यांच्या मते, गोड यांचा शत्रू नंबर एक.  एखाद्या दिवशी तुम्ही टपरीवर चहा मारायला गेला, आणि तिथे  डायटींग सुरु केलेला तुमचा मित्र सोबत असेल तर तो तुम्हाला   शहाणपणा  नक्कीच शिकवणार. दिवस भरात १० कप चहा म्हणजे २० चमचे साखर , की जवळपास पाव किलो भरते म्हणून बिना साखरेचा चहा घे  वगरे वगैरे.     साखर  चहा मधे घेतली नाही, म्हणून मग आता एखादा वाटी श्रीखंड, किंवा दोन गुलाबजाम किंवा दोन तिन रसगुल्ले  खायला कशी हरकत नाही असे हे   लॉजिक पण पटवून देण्याचा प्रयत्न करतो.   आवरा म्हणायची इच्छा असते पण म्हणता येत नाही मित्र आहे म्हणून . 🙂

डायट वाल्यांचा दुसरा शत्रू म्हणजे तेल ! भाजी मधे तेल दिसले की ह्यांच्या कपाळावर आठ्या! च्यायला कसला देशी कुक आहे यांचा म्हणून त्या हॉटेलचा उद्धार! आता तुम्ही समजा  सावजी किंवा पंजाबी ( ऑथेंटीक म्हणतोय मी, शेट़्टी कडले पंजाबी नाही ) मागवले तर त्या डिश मधे पदार्थ हा तेलात बुडलेलाच असणार ना? . किंबहूना सावजी पाया करी/चिकन करी  वर जर तेलाचा तवंग नसेल तर ती तुम्ही खाऊ शकाल का?  बरे दुसरी गोश्ट म्हणजे तळलेले चकली समोसा वगैरे हातात घेऊन , आपली कोरडी बोटं दाखऊन अरे त्यात तेल अजिबात नाही असे म्हणून बिनधास्त  खाणारे अशी पण एक डायटींग वाल्यांची जमात आहे.

घरी पपई वगैरे पण ऑफिस मधे गेल्यावर मस्त पैकी केक वगैरे चा फडशा पाडणारे, किंवा रुफ टॉप वर जाऊन खादाडी करणारे पण काय डायटर्स असतात  . :)डायटींग वाल्यांपैकी एखादा मित्र असला की तो “सावजी चिकन, तेल कम, तिखा कम ” अशी ऑर्डर देणार हे नक्की. जेवायला बसल्यावर तुमच्या  मस्त टेस्टी डिश कडे बघून – अरे बापरे किती तेल हे.. म्हणून तुमच्या खाण्याच्या आनंदाला ग्रहण लावायला तयार . अशा लोकांकडे सोइस्कर पणे दुर्लक्ष करता आले पाहिजे. माझे वडील वय वर्ष ८७ कित्येक वर्ष सकाळी उठल्यावर अर्धी वाटी साजुक तुपात बुडवून ठेवलेले चार खजूर आणि कप भर दूध रोज घ्यायचे, त्यांच्याकडे पाहिले की मला खूप धीर येतो -आणि मी तूप वगैरे बंद करत नाही.हॉटेल मधे सकाळच्या  ब्रेकफास्ट बफे  च्या वेळेस दो अंडेका ऑमलेट सिर्फ एग व्हाईट का बनाओ, और कम तेल मे .. असे कळकळीने सांगणारा एक तरी हमखास दिसतोच .प्रोटीन्स सगळे एग येल्लो मधे असतात, ते वाईट असा समज  का आहे- हे मला तरी समजलेले  नाही. सलामी ,  सॉसेजेस ला अजिबात हात न लावता एखादा माणूस  ब्रेकफास्ट बफे मधे इडली च्या स्टॉल कडे वळला की हा डायट वाला हे शपथेवर सांगायला मी  तयार आहे. हे सगळे डायट करणारे तुमच्या भरलेल्या डिश कडे पहात स्वतःच्या समोरचे फळं, कॉर्न फ्लेक्स, इडली सारखे नगण्य   पदार्थ कसे बसे संपवत असतात.जेवायला गेल्यावर तुम्ही ओल्ड मंक घेणार, तर तुमचे हे मित्र डायट बिअर घेणार. तुम्ही क्रिस्पि व्हेज, मटन  कबाब वगैरे घेणार तर घे मात्र तुमच्या डिशकडे आशाळभूत पणॆ पहात आपले समोरचे सॅलड आणि चना बॉइल्ड खात बसणार. डायटींग करणॆ म्हणजे स्वताडन करणे हे यांचे प्रिन्सिपल असते. अहो एखादा पिस चिकनचा घेतला, किंवा एखाद दोन पिस क्रिस्पी व्हेज चे घेतले तर काय हरकत नाही?? पण नाही, जेवणातली सगळी मजा घालवायची हा चंगच यांनी बांधलेला असतो.अरे स्वतः नसेल खायचं नको खाऊ, पण आम्हाला का छळतोस रे बाबा?

काय चालते आणि काय नाही याचे काही डायटींग करणाऱ्यांचे एक खास तंत्र असते. मी जेंव्हा डायटींग करायचो तेंव्हा माझे डायटींग रुलस होते.. जसे   जेंव्हा तुम्ही  स्वयंपाक घरात जाऊन डबे उघडता आणि तुम्हाला खाताना कोणी पहात नाही, तेंव्हा त्या वस्तू मधे अजिबात कॅलरी नसतात.
किचन ओट्या जवळ बायको भजी वगैरे तळत असतांना त्यातली चार दोन भजी खाल्ली तरी पण त्या मधे कॅलरी नसतात, कारण बायकोच्या  कॉमेंट्स मूळे त्या पदार्थातील  कॅलरीज अंगी लागत नाहीत- आणि त्याने वजनही  वाढत नाही..
तुम्ही जेंव्हा दुसऱ्या माणसासोबत खायला बसता, तेंव्हा जर त्याने तुमच्या पेक्षा जास्त खाल्ले तर , तुमच्या कॅलरी काउंट होत नाहीत.
औषध म्हणून घेतलेल्या गोष्टींमधली कॅलरी अजिबात काउंट होत नाही, जसे वाईन, ब्रॅंडी, किंवा खोकला झाला म्हणून घेतलेले दोन पेग 🙂 .
सिनेमा पहायला गेल्यावर चिझ पॉपकॉर्न  एक टब घेऊन शेजारी बसलेल्या बायकोच्या पुढ्यात  ठेऊन त्यातले आपण खाल्ले तरी पण त्यातल्या कॅलरी काउंट होत नाहीत. 🙂
मुलांच्या ब्रेडला बटर लावण्यासाठी मुद्दाम चमचा ( सुरी  न वापरता , कारण ब्रेडला लावल्यावर सुरीला काहीच चिकटून रहात नाही ना ..) वापरल्याने त्याला चिकटलेले बटर /जाम /लोणचे/सॉस वगैरे गोष्टींमधे अजिबात काही कॅलरी नसतात.

असो.. माझ्या डायटींग वर हा लेख नाही 🙂 माझ्या ओळखी मधले मागच्या वर्षात एक मित्र मरण पावले. वयाच्या ५२ व्या अर्षी स्ट्रोक ने तो गेला. हा अगदी बरोबर वजन असणारा, तेल तूप वगैरे न खाणारा, असा प्राणी होता. मला नेहेमी तू नक्की उलथणार आहेस लेका, हे असेच खात रहाशील तर म्हणून समज देणारा  स्वतःच गेला .  😦  इतकं सगळं पाळलं तरी पण जर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो तर……!! हे पाहिले आणि मी डायटींगचा नाद सोडलाय.

पण जर तुम्ही डायटींग करणार असाल, तर एकच नियम पाळा, कोणालाच सांगू नका डायटींग करतोय म्हणून……. कारण डायटींग हे तुम्ही स्वतः साठी करता असता..