भ्रष्टाचार

Written by  on March 20, 2003

जर माझ्या पिढीतल्या लोकांना  असंतोषाचे जनक कोण हा प्रश्न विचारला, तर लोकमान्य टिळकांचे नांव सांगेल, पण त्याच प्रमाणे जर आजच्या तरुण पिढीला हाच प्रश्न विचारला तर   निर्विवादपणे अण्णा हजारेंचे नांव घेईल तो!  लोकांमधे विझलेली    असंतोषाची    भावना जागृत करून तिला अत्युच्च पातळीवर पोहोचवण्याचे काम अण्णा हजारे यांनी केलेले आहे.

या सगळ्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सगळेच सहभागी होऊ इच्छितात. एक सांगा , कोणाला हवाय हो भ्रष्टाचार?   कुणालाच नको ! अगदी गरीबात गरीब माणसाला , किंवा श्रीमंत  माणसाला पण नको असतो .  पण तरीही भ्रष्टाचार सगळीकडे फोफावला आहे असे का?  

आज मात्र प्रत्येकच जण हा भ्रष्टाचारा मधे लिप्त आहे. लाच देणं म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखंच आहे. कुठलंही काम असो , हल्ली लाच दिल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही, म्हणून आपण लाच देऊन काम करून घेतो, म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी  घालतो.

मी पाहिलेले बहूतेक स्वच्छ  भ्रष्टाचारी नसलेले लोकं, असे होते की ज्यांना ,  पैसे खाण्याचा चान्सच  नव्हता.  तुम्हाला पैसे खाण्याचा चान्सच नाही, आणि तुम्ही स्वतः  ’मी भ्रष्टाचारी नाही ’ म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असाल तर ते चुकीचे ठरेल.पण  जर एखादा माणूस   पैसे खाण्याचा चान्स असूनही पैसे न खाणारा असेल, तर तो  खरा ग्रेट.

कोण कोण आहे अण्णांच्या पाठीशी? सगळे!! एकजात सगळे लोकं आहेत.नोकरदार वर्ग, मजुर, तळा-गाळातला वर्ग,  डबेवाले, रिक्षावाले, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी , काळा पैसा गाठीशी असलेले राजकीय नेते, (ज्यांनी स्वतःच आपल्याकडे असलेल्या  करोडो रुपयांच्या संपत्तीचा लेखाजोखा निवडणूक लढवताना आयोगाकडे दिलेला आहे असे. इथे असे विचारू नका, की त्यांच्याकडे ही अशी करोडॊ रुपयांची मालमत्ता कशी आणि कुठून आली आहे ते. ) तसेच सिनेमा ऍक्टर्स, जे नेहेमी एका सिनेमात काम करण्यासाठी करोडो रुपये इनकम टॅक्स वाचवण्यासाठी, काळा पैसा म्हणून घेतात ते पण अण्णांच्या लोकपालला सपोर्ट करताना पाहून हसू येतं.

काही दिवसापूर्वी एका सिनेमात  काम केवळ  एक रुपया घेऊन केले होते एका हिरोने,( मला वाटतं सिनियर बच्चन होता)  नंतर त्या सिनेमाच्या प्रोड्य़ुसरने  एक जवळपास  करोड रुपये किमतीची एक कार भेट म्हणून दिली होती. हा असा व्यवहार सरळ सरळ भ्रष्टाचार झालाय ( इनकम टॅक्स वाचवण्यासाठी) हे सांगतो-अगदी ओरडून सांगतो..

भ्रष्टाचारासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न स्वतःलाच विचारा. तुम्ही- आम्ही सगळॆ हेच उत्तर तुम्ही द्याल आणि स्वताडन करून घ्याल.  पण खरंच तसं आहे का? आणि जरी तसं असलं तरी त्याला कारण कोण?

भ्रष्टाचारी लोकांचा पहिला प्रकार म्हणजे वर दिलेले राजनेते, अभि्नेते आणि “क्रिम डे ला क्रिम ” लोकं. ह्या लोकांना भ्रष्टाचाराची सवयच लागलेली असते.  कितीही पैसा असला तरीही अजून पैसा हवा, म्हणून हाव असते. यांच्या कडे इतका पैसा असतो की, ’ किती पैसे आहेत हो तुमच्याकडे ’? असे विचारले ,तर यांना सांगता पण येणार नाही.

दुसरे  म्हणजे आपल्यासारखे मध्यमवर्गीय-जे  प्रत्येकच ठिकाणी  अडवणूक केल्या गेल्यावर आपलं काम, करून घेण्यासाठी  लाच   देणारे,  म्हणजेच  भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे. आपण सगळे अगदी लो लेव्हलचा भ्रष्टाचार करतो. माणूस जितका मोठा , तितका त्याचा भ्रष्टाचार मोठा!

मला वाटतं की लाच द्यायला कोणालाच आवडत नाही. पण आपले ब्रिटीशकालीन कायदे इतके क्लिष्ट आहेत, की ते सामान्य माणसाला समजून घेणे अतिशय कठीण आहेत. नेमका याच गोष्टीचा सरकारी लोक फा्यदा घेतात.मग ते घराचे रजिस्ट्रेशन असो, की  ऍफेडेव्हिट असो.  रजिस्ट्रार कडे कुठलाही पेपरचे  रजिस्ट्रेशन करण्यासाठी लाच द्यावीच लागते. आरटीओ मधे पण तसंच! असे अनेक विभाग आहेत आपल्याकडे, जिथे भ्रष्टाचार हा हाडापर्यंत मुरला आहे -देणाऱ्यांच्या आणि घेणाऱ्यांच्या पण.

हे असंच होतं, एकदा लोकलचा मन्थली पास संपलेला होता, आणि वर दोन दिवस होऊन गेले होते. लोकल ने जात असतांना सहज आठवलं म्हणून पास काढला, आणि तारीख पाहिली तर ही गोष्ट लक्षात आली. जो पर्यंत तुम्हाला  तुमचा पास संपलेला आहे हे माहिती नसते, तो पर्यंत तुम्हाला पुर्ण कॉन्फिडन्स असतो, पण एकदा ही गोष्ट माहिती झाली की टीसी समोर तुम्ही उगाच घाबरता, आणि तुम्हाला ३ महिने  तुमचा पास व्हॅलिड असतांना ,एकदाही पास न विचारणारा तो  टीसी ,नेमका तुम्हालाच म्हणतो “पास दिखाओ?” आणि नंतर विना तिकिट प्रवास करणे, फर्स्ट क्लास मधे बसणे असे वेगवेगळे नियम लावून ८०० रुपये दंड मागतो- पूर्वी हा दंड ५० रुपये आणि तिकीटाचे पैसे इतका होता, तेंव्हा लोकं सरळ दंड भरायचे. पण दंडाची रक्कम वाढवल्यावर मात्र मांडवली करण्याकडे लोकांचा कल जास्त वाढला आहे. एखाद्या कडे पैसे नसतील तर   त्याच्या खिशात असतील नसतील तितके पैसे काढून घेऊन मग सोडून देतांना  टीसी दिसतात.

इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम जे आपण करतो ते नाइलाजाने. कोणालाच आवडत नाही भ्रष्टाचारी माणसाला आपले निढळाच्या घामाचे पैसे देणे!

मला एकदा सिग्नल जंपिंग साठी पकडले होते, तेंव्हा त्या पोलिसाने वेगवेगळे आकडे, जसे १८९, ४८३ वगैरे वगैरे ( आकडे काल्पनिक ) कलमान्वये मला किती शिक्षा होऊ शकते ते सांगितले.   फक्त शेवटी मला १८०० रुपये दंड होऊ शकतो असे त्याने सांगितले  . त्या चलान वर त्याने जे आकडे ( कायद्यातल्या कलमांचे ) भरले होते त्याचा अर्थ काय किंवा ते आकडे म्हणजे कुठल्या नियमाला रेफर करतात , हे काही मला  समजले नाही, पोल्युशन अंडर कंट्रोल केलेले नाही?? भरा १२०० रुपये दंड. तुम्ही लेन कटींग केली, द्या तुमचे लायसन्स आणि या कोर्टात उद्या दुपारी १२ वाजता! म्हणजे एक ’कॅज्युअल लिव्ह”वाया घालवा. हे सगळं करण्यापेक्षा मला त्या पोलिसाला १०० रुपये देणं कधीही सोपं वाटलं.

जर दंडाची रक्कम कमी केली , तर जागेवरच तुमच्या कडून पैसे घेऊन पावती दिली, तर तुम्ही कशाला भ्रष्टाचाराला उद्युक्त व्हाल?  पण तुम्हाला जास्तीत जास्त  त्रास कसा होईल? आणि तुम्ही कसे मांडवली करण्यासाठी उद्युक्त व्हाल? या कडे लक्ष देऊन कायदे केलेले आहेत असा संशय नेहेमी येतो मला , ब्युरोक्रसी ऍट ईट्स वर्स्ट!  .  लायसन्स साठी दुसर्‍या दिवशी कोर्टात जायचं म्हणजे सुटी गेली एक !!

मला वाटतं जर  दंडाची रक्कम अशी   अव्वाच्या सव्वा दंड न ठेवता   कमी केली, तर आपोआप भ्रष्टाचार कमी होईल. ही दंडाची रक्कम वेळोवेळी वाढवली जाते ती केवळ  जास्त लाच मिळावी म्हणून!

अधूनमधून सरकार या इनकम टॅक्स चोरून  वाचवणाऱ्या लोकांसाठी एक स्किम काढते, त्या मधे तुम्ही आपलं काळं धन उघड करा, आणि त्यावर टॅक्स भरा. तुम्हाला कोणी विचारणार नाही , की हे काळं धन तुम्ही कुठून आणलं ते.एक प्रकारे सरकारने काळ्या पैशाना गोरं करण्याची सुरु केलेली स्कीम.. इतका मूर्खपणा मी आयुष्यात पाहिलेला नव्हता. हे प्रकार हल्ली बंद करण्यात आलेले आहेत.

तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या जीवनात नेहेमी येणारे प्रसंग आहेत वर दिलेले. रेशन कार्ड, आरटीओ, वगैरे वगैरे कुठलेही डिपार्टमेंट जरी पाहिले तरीही हे असेच असते. दुसरा प्रकार म्हणजे राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचार. स्वतःजवळ करोडो रुपयांची माया असली ,तरीही त्यांचे काही पैशाच्यावरचे प्रेम कमी होत नाही, आणि ते हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करतात.  भस्म्या रोग झालाय आपल्या नेत्यांना. ( भाजपा, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, सगळे आले यात)

भारतीय घटनेनुसार सगळ्या लोकांना सारखेच अधिकार आहेत असे म्हणतात. पण ते खरे आहे का?  नाही! बिलकूल नाही.  खाली काही उदाहरणं दिलेली आहेत.

दिवसातून चारदा टोल टॅक्स पार केला तर तुम्हा-आम्हाला प्रत्येक वेळेस पैसे भरावे लागतात, पण करोडो रुपये खाणारे राजकीय नेत्यांना मात्र  टोल टॅक्स माफ ! का??

एमपी/एमएलए  , लोकांना आयुष्यभर विमान प्रवास फुकट करण्यात आल्याचे पण कुठेतरी वाचले होते. रेल्वे चा प्रवास तर फुकट आहेच!! का? रेल्वे आणि विमान सेवा काय यांच्या तिर्थरुपांची आहे का?

सुप्रीम कोर्टाचा जज म्हणजे तर साक्षात ब्रह्म देव.. त्याच्यावर कधीच केस केली जाऊ शकत नाही. मध्यंतरी एका  सुप्रीम कोर्टाच्या जजच्या भ्रष्टाचारा बद्दल पण एक केस वाचण्यात आली होती.त्यात दोन जज ची नावं उघड केली गेली होती, तरीही त्यावर काहीच ऍक्शन घेतली गेली नाही. असे का?

– आणि म्हणे सगळे लोक समान आहेत! कायद्याप्रमाणे सगळ्यांना समान अधिकार आहेत!! 

अण्णांचं हे लोकपाल म्हणजे एक समांतर न्याय व्यवस्थ होणार असे वाटते. सध्या अस्तित्त्वात असलेली ज्युडीशिअरी सिस्टीम पण  इतकी पोकळ वासा झालेली आहे, की त्याच कायद्यांचाच जर आधार घेतला , तर लोकपालचा पण बहूतेक काही फायदा होणार नाही. मला वाटतं की आपले कायदे पुन्हा एकदा नवीन लिहिले जाणे आवश्यक आहेत.

कायदे, आणि वकील म्हणजे वेळकाढूपणा . कुठल्याही गोष्टीवर कोर्टा मध्ये निर्णय  कसा होऊ न देता ,  तारखा घेत वर्षानुवर्ष केस चालवत ठेवायची, हे   आपल्या वकिलांकडून शिकावे.

जशी  ज्युरी सिस्टीम बाकी देशात सुरु आहे, तशीच काहीशी सिस्टीम  आपल्याकडे आपण लोकपाल म्हणून आणतोय. कायदे तेच, वकील तेच, कोर्टाच्या  जज च्या ऐवजी लोकपाल!  अहो ,पण जर असे असेल तर मग लोकपाल म्हणजे पण  कोर्टा प्रमाणेच व्यवस्था होईल की नाही? फक्त थोडे जास्त अधिकार असलेली- पंतप्रधानापासून तर एमपी, एमएलए ला पण शिक्षा करू शकणारा ! तसाही, सामान्य माणूस एखाद्या मोठ्या माणसाला शिक्षा झाली की फार  खूश होतो. जसे सलमान खानला काळवीट मारले म्हणून झालेली शिक्षा, आणि त्याला जेल मधे रहावे लागले होते .. तो प्रसंग!

समजा ,एखादा लोकपाल करप्ट असला, आणि त्याने दिलेला निर्णय जर मान्य नसेल तर   त्याच्या निर्णयावर   अपिल करण्याचे प्रावधान असेल की की नाही ? जर तेच नसेल तर लोकपाल  म्हणजे राष्ट्रपती किंवा सुप्रीम कोर्टाच्या जज पेक्षा पण मोठा ठरेल.

लोकपाल मधे पंतप्रधान, एम पी आणि एमएलए यांच्यावर पण कारवाई करण्याचा अधिकार असायला हवा, म्हणून अण्णा हजारेंचे उपोषण सुरु आहे. सध्या मंजुरीला दिलेले लोकपाल बिल मागे घेण्यात यावे असेही अण्णा म्हणतात. हे बिल मागे न घेता, या मधे अमेंडमेंट्स केल्या ( पी एम आणि एमपी एमएलए  यात समाविष्ट करून ) तरीही चालण्यासारखे आहे. कारण एकदा बिल मागे घेतले की मग पुन्हा नवीन बिल  सरकार दफ्तरी रुजू  करायला कमीत कमी वर्ष तरी जाईल, आणि या संघर्षातील सगळी हवा निघून जाईल.

का कोणास ठाऊक, पण मला जयप्रकाश नारायण, महेंद्र सिंह टिकेत  आठवतात , पाच लाखाचा मोर्चा घेऊन राजधानीवर धडकणारे. पण नंतर त्यांचं जसं झालं, तसं अण्णांचं होऊ नये  असे सारखे वाटते. जो काही व्हायचा आहे, तो निर्णय लवकर झाला तरच काही तरी अर्थ आहे, नाहीतर रामदेव बाबा प्रमाणे दवाखान्यात नेऊन सलाइन चढवून  किंवा नाकातून ट्युब घालून अन्न सुरु करेल हे सरकार.

एक विचार मनात आला, की आजही बऱ्याच स्वायत्त संस्था ( शब्द बरोबर असावा)  जसे सीबीआय, ऍंटी करप्शन ब्युरो, निवडणूक आयोग  आणि तत्सम बऱ्याच काही , अस्तित्वात आहेत. ह्या संस्था सगळे ब्युरोक्रॅट्स चालवतात.  आजही कुठल्याही गोष्टीची चौकशी निष्पक्ष पणे करायची म्हटली की सीबीआय कडे तपासणी सोपवला म्हणजे त्यातल्या त्यात निष्पक्ष तपास होईल अशी  ८० टक्के तरी खात्री असते. इतके असूनही सीबीआय किंवा ऍंटीकरप्शन ब्युरोच्या कामगिरीवर ताशेरे ओढणारे आहेतच. ब्युरोक्रसी ही जो पर्यंत अस्तित्त्वात आहे तो पर्यंत, हे असेच चालणारच असे मला वाटते.या  संस्थांचे उदाहरण डोळ्यापुढे असतांना अशाच प्रकारची आणखी एक संस्था म्हणजे लोकपाल सुरु केल्यावर त्या संस्थेचे काय होईल हा प्रश्न आहेच.

हा लेख संपवता संपवता एक प्रश्न मनात येतो,  जर भ्रष्टाचार  खरच बंद झाला तर आपण  केलेल्या लहान लहान चुकांसाठी इतका मोठा दंड  खरच भरू शकू का?

मी हा लेख लोकपाल विधेयक बरोबर की नाही यावर लिहिलेला नाही. केवळ मला  भ्रष्टाचार या विषयावर काय वाटते हे लिहिण्यासाठी हा उपद्व्याप!! लेख फार मोठा झालाय ह्याची कल्पना आहे , पण मुद्दे इतके जास्त होते, की दोन पानात संपवू शकलो नाही.. क्षमस्व!

मॅड

Written by  on March 20, 2003

एक मॅगझिन आहे मॅड नावाचं. लहानपणी खूप आवडीने वाचायचो हे मासिक. ह्या मधे कार्टुन्स आणि इतर तर असायचेच पण अगदी एकही शब्द नसलेले, लहानसे कार्टून सिक्वेन्स असायचे तिथे कुठे तरी कोपऱ्यात. त्या मधे एकही अक्षर लिहिलेलं नसल्यामुळे ते जोक्स समजावून घ्यायला वेळ लागायचा. अगदी लहान लहान साइझ मधे असे स्प्रेड्स सगळ्या पुस्तक भर असायचे.मॅड चा वाचक होण्यासाठी माझ्या सारखं मॅड व्हावं लागतं. बरेचदा एखादा जोक समजला नाही की मग मेंदूचा भुगा होतो आणि मॅड व्हायची वेळ येते.

मॅड मधल्या इतर काही नाही पण त्या स्क्रिप्ट्स बघायला मला खूप आवडायचं. आणि  शाळेमधे लाइक माइंडेड मुलं असतातंच. त्यामुळे मासिकं एक्सचेंज करणं नेहेमीच सुरु असायचं.कोणी मुंबईला जाणारं असलं की आमची मागणी एकच असायची बाकी काही नको फक्त मॅड चे २-४ अंक आणून द्या म्हणून.!!!

मॅड मधले न कळलेले जोक्स मित्रांसोबत वाचून पुन्हा समजाउन घ्यायला मजा यायची. माझ्या कडे खूप कलेक्शन होतं मॅड चं १९७४ च्य सुमारास. अजुन ही मॅड वाचायला मिळालं तर अगदी सगळं काम सोडून वाचायला बसतो, कारण शेवटी लहानपणाच्या आठवणी निगडित आहेत ना मॅड बरोबर 🙂 .ईथे काही   स्ट्रिप्स देतोय..

या स्ट्रिप्स इथे बऱ्याच मोठ्या साइझ मधे आहेत . मॅगझिन मधे यांचा साइझ जस्ट १० एम एम बाय ४० एम एम असतो  किंवा कधी त्याहूनही लहान असतो.. आणि कुठे तरी कोपऱ्यात असतात असल्या स्क्रिप्ट्स..

haircut_mishap_lg

blindfolded_knife_throwe_sm

eye_exam_sm

samuri_battles_lg

keep_off_lgcart2

वर जे दाखवले आहेत तशा स्ट्रीप्स अगदी कुठे तरी कोपऱ्यात असायच्या बारीक बारीक…या व्यतिरिक्त मॅड फोल्ड इन्स.. अगदी अप्रतिम असायचे. मॅड चा अंक हाती लागला की आधी फोल्ड इन्स बघायचे आणि नंतर इतर सगळं .इथे काही फोल्ड्स  देतोय.. मॅड मधे प्रसिद्ध झालेल्या.

mad_fold_in_text

mad-al-jaffee-fold-in

ईटरनेट मुळे एक फायदा झाला, मॅड चा पहिला इशु  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.stopgeek.com/wp-content/uploads/2006/10/madmagazine.pdf)नेट वर मिळाला. आजच डाउन लोड केलाय. करंट इशु शोधतोय कुठे सापडतात ते..जर इंटरेस्टेड असाल तर इथे क्लिक करा.(पण हा पहिला इशु मी ज्या मॅड ला रेफर करतोय त्या पासून खूप  निराळा आहे,म्हणजे तेवढा चांगला नाही.)

नेट वर बरंच शोधलं फ्री डाउनलोड अव्हेलेबल आहे का मॅड  म्हणून..  .. तुम्हाला माहिती आहे का मॅड कुठुन डाउनलोड करता येइल ते??

चुल ते गॅस..

Written by  on March 18, 2003

राजाभाऊ सकाळी उठले, आणि पेपर मधे  ’वर्षाला फक्त ६ गॅस सिलेंडर्स सवलतीच्या दरात मिळतील’, नंतर मात्र दामदुप्पट पैसे मोजावे लागतील  अशी बातमी वाचली, आणि  त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.  क्षणात त्यांचं बालपण डोळ्यांसमोर तरळलं.   ओली लाकडं आणल्या गेली म्हणून धुराने ओले झालेले डॊळे पुसणारी आई आठवली.

राजा भाऊंच्या घरी ओटा नव्हता, गॅस नव्हता ( त्या काळी कोणाच्याच घरी गॅस नव्हता, श्रीमंत लोकांकडेच असायचा  स्टोव्ह) “-  तर चुलीवर फोडलेली लाकडं वापरून स्वयंपाक केला जायचा. लाकडं आणायचं काम काकांच असायचं. आई पाटावर बसून स्वयंपाक करायची, आणि  आम्ही समोर पाट-पाणी घेऊन जेवायला बसायचो.   हे दृष्य सगळ्यांच्याच घरी लहानमोठ्या प्रमाणात विदर्भात दिसून यायचं. चुलीची पण बरीच उस्तवार करावी लागायची. सकाळी उठल्यावर शेणाचे पोतेरे घेऊन चूल सारवून तयार केली जायची. हळद, कुंकू वाहिल्या शिवाय चूल पेटवली जायची नाही . एखाद्या वेळेस जर लाकडं ओली आली की मग स्वयंपाक करतांना धुराने   खोकून तिचा जीव नकोसा व्हायचा.  हातातल्या फुंकणी ने लाकडावर फुंकर मारतांना आईचा होणारा कासावीस झालेला चेहेरा अजूनही आठवला आणि राजा भाऊंचं मन उगाच भरून आलं.

ज्या दिवशी संध्याकाळच्या फार जास्त काही करायचं नसेल तर त्या  वेळेस कोळशाची शेगडी वापरली जायची. स्वयंपाक घरात आई स्वयंपाक करतांना तिच्या गळ्यात मागून हात घालून झुलतांना तिला त्रास होत असेल, राजा भाऊंना  पोळेल, म्हणून तिला  भीती वाटायची आणि मग ती ’मेल्या पडशील ना, भाजून घेशील स्वतःला’,  म्हणून  त्यांना दूर करायची- आणि जर ऐकलं नाहीच तर हातातल्या फुंकणीने एक फटका पण द्यायची. चुली वर एका बाजूला ’वैलावर” वरणाचं भांडं शिजायला ठेवलेलं असायचं. मुख्य भागात, आधी भाकरी, पोळी किंवा भात शिजवला जायचा.

गेल्या कित्येक वर्षात वरण आणि भात वेगवेगळा शिजवला होता का असं विचारलं तर कदाचित उत्तर देतांना खूप विचार करून उत्तर द्यावं लागेल गृहिणीला. पूर्वीच्या काळी राजा भाऊंच्या घरी एक पितळेचा कुकर  आणला गेला होता. तेंव्हा राजाभाऊंच वय असेल ५-६ वर्ष.  तो कुकर म्हणजे पण नाविण्य़ होतं, एक मोठा डब्या सारखा, आणि त्या मधे पाणी घालून त्यात डाळ, तांदुळाची भांडी  ए्कावर एक  ठेऊन चुलीवर ठेवले की  एकदम दोन्ही  शिजवले जायचे.डाळ तांदुळ एकदम शिजवले जातात याचं आश्चर्य खूप दिवस वाटायचं. घरी  कोणी  आईच्या  ओळखीच्या काकु आल्या की तो कुकर दाखवला जायचा.  त्याला शिटी वगैरे काही नसायची. पण लवकरच प्रेशर कुकर   मिळायला लागला, आणि ह्या कुकर चं नाविण्य़ संपलं. घरोघरी स्वयंपाक घरातून शिट्यांचे आवाज ऐकू येऊ लागले .

दिवस कसे पटकन बदलत जातात. आमच्या पिढीने जितकं यांत्रिकीकरण पाहिलं आणि अनुभवलं तितकं आमच्या आधीच्या पिढीला पहायला मिळालं नाही.  ’वाटणासाठी” पाटा वरवंटा वापरला जायचा, तर कुटायला  खलबत्ता. कोथिंबीर मिरची ची चटणी वाटतांना थोडं मीठ घेतलं की वाटणं सोपं पडतं हे आईनेच सांगितलं होतं राजाभाऊंना. सणाच्या दिवशी आईला बरेचदा  राजाभाऊ  स्वयंपाकात मदत करायचे .

कोणाचा उपवास असला की मग त्या दिवशी दाणे कुटायला  खलबत्त्यात  घेउन कुटताना खाण्याची मजा यायची. अजूनही खलबत्त्यात कुटलेला दाण्याचा लाडू राजाभाऊ मिस करतो. नंतर ते एक दाणे बारीक करायचं यंत्र आलं ,आणि खलबत्ता ओट्याखालच्या कोपऱ्यात दुर्लक्षित होऊन पडला.दाणे कुटणे आणि खोबरं किसणे हा आवडीचा उद्योग होता राजाभाऊंचा. या मिक्सरने खोबरं किसणे इतिहासजमा  झालंय़.

सकाळी पाणी तापवायला एक तर तांब्याचा बंब किंवा जर लाकडं नसतील तर मग भुशाची शेगडी सर्रास वापरली जायची.  भुसा म्हणजे लाकडं कापताना सॉ मिल मधे खाली पडणारा लाकडाचा भुरका..शेगडी  मधला एक लोखंडी पाइप लावून त्या भोवती भुसा दाबून भरला की मग मधला पाईप काढून घ्यायचा, आणि  शेगडी तयार व्हायची. मधल्या भागात निखारा ठेवला , की पटकन पेटायची शेगडी.  हे शेगडी भरायचं काम राजाभाऊंचंच! एकदा पेटवली की सगळ्यांच्या आंघोळीचे पाणी तापवून व्हायचे.

घाई – गर्दी ची वेळ असली, की मग आईची चिडचिड व्हायची. भाज्या चिरण्यासाठी ’चॉपिंग ट्रे आणि सुरी’ नव्हती, तर विळी वर भाजी चिरली जायची .  सुरी फक्त खाटकांनी वापरायची असते (!) असा विचार होता आईचा.कोथिंबीर खूप बारीक चिरण्या  मुळे आईच्या अंगठ्यांना विळीच्या ब्लेड वर दाबल्या जाऊन  नेहेमी चिरे पडलेले असायचे. आता दिवस बदलले,   मिक्सर आलं, अगदी नकळत  प्रत्येक गोष्टीसाठी कुठलं तरी यंत्र वापरणे सुरु झाले. खवणे, कुटणे, दळणे  सगळं काही मिक्सर/ग्राइंडर  मधे केलं जायला लागलं. स्वयंपाक तोच, फक्त पद्धती मधे फरक पडत गेला. प्रत्येक गोष्ट सोपी होत गेली 🙂

राजाभाऊंच्या लहानपणीचा काळ ( म्हणजे राजाभाऊ ५-६ वर्षाचे असताना,)युद्धोत्तर काळ होता, नुकतंच चायना युद्ध संपलं होतं .सगळ्या  वस्तूंची टंचाई होती. साखर, तांदूळ वगैरे तर फक्त काळ्या बाजारातच मिळायची. नंतर लवकरच रॉकेल पण शॉर्टेज मधे गेलं आणि रॉकेल मिळणं म्हणजे एक कठीण कर्म होतं. फक्त चूल पेटवण्या पुरतं जरी मिळालं तरी नशीब अशी परिस्थिती होती. ’प्रायमस” कंपनीचा पितळी स्टोव्ह आमच्या घरी होता. त्या स्टोव्हची पण एक वेगळीच उठाठेव करावी लागायची, पेटवण्या पूर्वी गरम करण्यासाठी  म्हणून एक काकडा असायचा, तो रॉकेल मधे बुडवून गळ्यात हार घातल्या सारखा त्या बर्नर वर घातला की  स्टोव्ह कसा पटकन पेटायचा. कधी तरी बर्नर मधे अडकलेला कचरा काढायला म्हणून एक पिन पण असायची. रॉकेल च्या शॉर्टेज मुळे स्टॊव्ह फक्त सकाळी आणि दुपारी चहाला वापरला जायचा. या पितळी स्टोव्ह शिवाय अजून एक म्हणजे ’वातींचा स्टोव्ह’ पण असायचा. त्याचा आवाज नसल्याने शांतपणे जळत रहायचा तो. दुपारचे तीन चार ची चहाची वेळ झाली घरोघरी स्टोव्हचे आवाज ऐकू यायचे.

हळू हळू स्टोव्ह अडगळीत गेला आणि त्याची जागा गॅसच्या शेगडीने घेतली. त्या शेगडीला रबरी ट्युब असते, म्हणून  राजाभाऊंचे तीर्थरूप कित्येक वर्ष सोवळ्याच्या स्वयंपाकासाठी गॅस वापरू देत नसत -खरं म्हणजे ते तर गॅस विकत घेण्याच्या पूर्ण  विरोधात होते, पण नंतर काळाची गरज म्हणून कॉम्प्रोमाईज केले.

हळू हळू दिवस बदलत गेले. जमिनीवर बसून स्वयंपाक करायची पद्धत कधीच इतिहास जमा झाली . ( म्हणूनच अर्थ्रायटीस चा त्रास वाढलाय का आजकालच्या पिढीला?). राजाभाऊंनी उगीच   आठवून की आपण शेवटचं मांडी घालून जमिनीवर कधी बरं बसलो होतो??  नाही आठवत.. ..कदाचित सहा महिने तरी झाले असतील.

स्वयंपाक केला की एकदाची सगळी भांडी समोरच्या खोलीतल्या डायनिंग टेबल वर नेऊन ठेवले, की जेंव्हा ज्याला वाटेल तेंव्हा तो जेवून घेतो. प्रत्येकाच्या वेळा तशा वेगवेगळ्याच असतात जेवण्याच्या. एक म्हण आहे,” द फॅमिली विच डाइन्स टुगेदर स्टेज टुगेदर” पण तरीही ….. स्वयंपाकघरातल्या यंत्रां सोबत घरातली माणसंही यंत्रा प्रमाणे वागू लागली आहेत. आयुष्य इतकं धकाधकीचे झाले आहे, की हल्ली  डायनिंग टेबलवर सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायला बसण्याचे दिवस संपले आहेत. ज्याला जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा तो जेवून घेतो. कुटुंबातले सगळे एकत्र कधी जेवले तर रविवार सोडून इतर दिवस आठवत नाही.

राजाभाऊंना आ्ठवलं , जेंव्हा मनमोहन पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, तेंव्हा मिडीयाने त्यांच्या पत्नीला विचारले की तुम्हाला काय वाटते, तर त्या म्हणाल्या होत्या, की “आता तरी गॅस सिलेंडर भाव वाढवू नये म्हणजे झाले”  पण मनमोहन सिंगनी काही ऐकलेले दिसत नाही. चांगली शिक्षा करणार आहेत त्यांना त्यांची बायको.. 🙂

या पुढे लाकूड मिळणे पण सोपं नाही, रॉकेल तर कधीच मिळत नाही, मायक्रोवेव्ह वापरायचं, तर इलेक्ट्रिसिटीचे पण भाव खूप वाढले आहेत- कारण एमएसईबीची वितरण व्यवस्था  पण तर प्रायव्हेट कंपन्यांना आंदण दिलेली आहे.

आता मनमोहना साठी एकच प्रश्न आहे राजा भाऊंच्या मनात, तुम्ही घरगुती  सिलेंडर्स  कार साठी, हॉटेल साठी वगैरे वापरली जातात, म्हणून भाव वाढवले आहेत असे म्हणता, अहो मग त्या चोरीच्या सिलेंडर विक्रीवर आळा घाला ना , गॅस कंपनी सरकारची, डिस्ट्रिब्युटर्स सरकारचे…. मग प्रॉब्लेम काय आहे? पण हे सगळं  न करता, सामान्य जनतेला वेठीला का धरतो आहेस  रे बाबा?  सगळ्या ऑइल कंपन्या सरकारीच तर आहेत, मग थोडा प्रॉफिट कमी का करत नाहीस रे तू?” गप्प बसलाय मुग गिळून तो मनमोहन.. राजा भाऊंना स्वतःचाच राग आला..

” अरे बाबा, आम्ही सामान्यांनी खायचं तरी काय?? कोळसा?”  …….. पण   लगेच त्यांना आठवलं, छे छे.. तो पण  त्यांनीच तर  खाऊन टाकलाय ना.

फोर्ट अग्वादा- गोवा

Written by  on March 10, 2003

गोवा म्हंटलं की समुद्र,मासे, काजू (बाटलीतली आणि पाकिटाला 🙂 ) आणि परदेशी पर्यटक, अंगात शर्ट न   घालता भाड्याने घेतलेल्या बाइक वर फिरतानाचे आठवतात. आपल्याला त्यांच्या गोऱ्या रंगाचे कौतूक तर त्यांना कातडी टॅन करून घेण्याचे डोहाळे.  फेअर ऍंड लव्हली ची जाहीरात पाहताना ह्या  लोकांच्या मनात  काय येत असेल ? हा विचार नकळतच मनात आला आणि एकदम हसू फुटलं . हे लोकं टॅनिंग साठी असे उघडे फिरतात, पण अशा उघड्या फिरण्यामुळे त्यांची त्वचा टॅन होण्याऐवजी अक्षरशः   लाल ला रंगाची दिसायला लागते, आणि त्यांना पाहिलं की   सोलून उलटा टांगलेल्या बोकड किंवा लाल तोंड्या माकडाची आठवण येते मला!

समुद्र हा तर गोव्याचा एक महत्वाचा अट्रॅक्शन फॅक्टर आहेच, पण सोबतच इतरही बऱ्याच जागा आहेत , ज्यांच्याकडे फारसं लक्ष जात नाही-  फोर्ट अग्वदा’   हा पण त्यातलाच एक.  पोर्तुगीज लोकांनी १६व्या शतकात सिंकेरीम बिच ( ताज हॉटेल जवळ) जवळ  बांधलेला  हा एक किल्ला ( मी स्वतः पण हा किल्ला कित्येक वर्ष गोव्याला येत असलो तरीही पाहिला नव्हता म्हणून दुर्लक्षित म्हणतोय).  अग्वादा हा एक पोर्तुगीज शब्द, याचा अर्थ म्हणजे पाणी भरण्याची जागा ( वॉटरींग प्लेस) . जहाजा मधे पाणी भरण्यासाठी इथे जवळपास २४ लाख गॅलन पाणी स्टोअर केले जात असे.  १७ कॉलम वर उभी असलेली ही अंडरग्राउंड टॅंक पूर्वीच्या काळी खूप महत्त्वाची होती.  पोर्तुगल हून येणाऱ्या जहाजांचा हा भारतातला पहिला स्टॉप असायचा, त्यांना  पाणी पुरवठा करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. किल्ल्यावरून पाहिले असता चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येते, त्यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना पुर्ण संरक्षण पुरवता यायचे.

तांबड्या चिऱ्याने बांधलेला हा किल्ला अजूनही दिमाखात वारा पावसाशी टक्कर देत उभा आहे. चिरा म्हणजे एक प्रकारच्या अग्निजन्य खडकातून कापून काढलेला दगडाचा तुकडा. हे असे दगडाचे/खडकाचे तुकडे  तसं म्हंटलं तर  फारच कच्चे असतात , पण या मधे एक जांभा नावाने ओळखला जाणारा चिरा, जेंव्हा उन- पावसाला  जसा एक्स्पोझ होतो तसा तो जास्त पक्का होत जातो .  हा किल्ला पण जांभा चिऱ्यातून बनवलेला आहे.

लहानपणापासूनच चांदोमामा चांदोमामा, रुसलास का? लिंबोणीच्या झाडामागे…. कविता ऐकत मोठे होतो  कवितेतला  मामाचा वाडा चिरेबंदी हे ऐकत मोठं होत  असतो आपण , पण हा चिरा म्हणजे काय ते मात्र कित्त्येक वर्ष माहीत नव्हते. या कच्च्या चिऱ्याचा किल्ला इतका कसा काय टिकला  हा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.  ४०० वर्षाच्या काळात ह्या किल्ल्यावर कधीच कोणाचा हल्ला वगैरे झालेला नाही. सलग शेकडो वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखाली होता. जेंव्हा पोर्तुगीज गेले, तेंव्हा १९६२ च्या सुमारास हा किल्ला आपल्या ताब्यात आला.  किल्ल्याचे कच्चे बांधकाम पाहिले की नकळतच आपण त्याची तुलना शिवाजी महाराजांच्या दगडी किल्ल्यांशी करतो.   महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यापुढे हा किल्ला एकदम तकलादू वाटतो- चार पाच तोफेचे गोळे डागले,तर तटबंदी कोसळून पडेल  पत्त्याच्या बंगल्या सारखी असे वाटते! याच किल्ल्याच्या भरवशावर गोव्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजावर नजर ठेवण्याचे काम पोर्तुगीज करत हो्ते.

तर अशा ह्या चिऱ्यांपासून बांधलेला हा फोर्ट अग्वादा मांडवी नदीच्या मुखावर आहे. इथून पुढे मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते.  या ठिकाणी खरं तर आधी एक लाईट हाऊस बांधले गेले, आणि नंतर मग   पाण्याची टाकी बांधली गेली. लाईट हाऊस वरचा दिवा दर सात मिनिटांनी चालू बंद होऊन   समुद्रातून येणाऱ्या जहाजांना किनाऱ्याची कल्पना द्यायचे, नंतर १८६४ साली ह्या दिव्याची फ्रिक्वेन्सी पण ३ मिनिटे करण्यात आली आणि शेवटी १९७६ साली ह्याचा वापर पुर्ण बंद करण्यात आला.

इथे पाण्याचा खूप मोठा साठा पण करून ठेवण्यासाठी एक मोठी टॅंक बांधलेली आहे-( पाणी इथल्या झऱ्यांचेच जमा केले जाते. )खरं तर ह्या किल्ल्याचा मूळ उद्देश हा पाण्याचा साठा करण्यासाठी आणि दारूगोळा  साठा करण्यासाठीच केला जायचा. दारू गोळ्याची कोठारं वगैरे आता बरीचशी तुटलेली आहेत- पण अवशेष पहायला मिळतात.  किल्ल्याची तटबंदी अजूनही अभेद्य आहे. या किल्ल्यावर एकही तोफ आढळली नाही , आणि ती का नाही हे पण  काही लक्षात आले नाही. पाण्याच्या टाकीच्या निर्मिती साठी  डोंगराला पोखरताना जो दगड निघाला, तोच या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला गेला असावा असे वाटते.

एक मह्त्वाची साईट, पण टूरिस्ट अट्रॅक्शन म्हणाल, तर अजिबात नाही अशी म्हणजे ही साईट. मी जेंव्हा या ठिकाणी अर्धा तास होतो तेंव्हा  इथे फक्त काही गोरे टुरीस्ट दिसले, आपले भारतीय टुरिस्ट्स फारच कमी प्रमाणात होते.  या किल्ल्याच्या पायथ्यापासून कित्येकदा जाणे झाले होते, पण इथे वर चढून कधी पहायला गेलो नव्हतो.   ड्रायव्हर म्हणाला, अगर देखना है तो २०-२५ मिनिट बहूत है.. म्हणून तिथे थांबलो आणि नुकतेच जेवण झाले असल्याने थोडा पाय मोकळे केल्यासारखे होईल म्हणून किल्ल्यावर जायचे ठरवले. अगदी किल्ल्याच्या जवळ पर्यंत कार नेली जाऊ शकते- आणि अजिबात चढण वगैरे नसल्याने फार तर ५ मिनिटात तुम्ही तटबंदी जवळ पोहोचता.

किल्ल्याच्या सभोवताली असलेला खंदक जो आता रिकामा आहे तो  ओलांडून आत पोहोचल्यावर   एक विस्तीर्ण पठार , मध्यभागी टाकीचा भाग, आणि चारही बाजूला तटबंदी  दिसते. एका बाजूला अगदी मुख्या दिंडी दरवाजाजवळ दिमाखात उभा असलेला १६व्या शतकातला लाईट हाऊस चा टॉवर लक्ष वेधून घेतो. या टॉवरवर चढण्याची परवानगी नाही.किल्ल्याच्या चारही बाजूंनी एक खंदक खणलेला आहे. पूर्वी इथे पाणी वगैरे भरत असावेत, पण सध्या मात्र अगदी कोरडा पडलाय तो खंदक. किल्ल्याचा विस्तार उगीच समुद्राच्या आतपर्यंत गेल्यासारखा वाटतो.

एकीकडे मांडवीचे पात्र, तर दुसरीकडे उफाळणारा अरबी समुद्र. एक सुंदर कॉंबो ऑफर. किल्ल्याच्या उजव्या बाजूला पाहिले, तर समुद्राच्या पाण्याने झिज झालेला किनारा, आणि सिक्वेरीम बिच दिसतो. किल्ल्याच्या तटबंदीला समांतर  असलेली दुसरी तटबंदी ही मुद्दाम  दोन्हीच्या मधे पाणी भरुन किल्ला सुरक्षित करण्यासाठी बनवलेली आहे. किल्ल्याच्या आतल्या भागात मध्य भागी एक अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आहे. जमिनीवर पण जांभा चिरे बसवलेले असल्याने कुठेही उघडी जमीन दिसत नाही आणि किल्ला एकदम स्वच्छ वाटतो.

किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राकडे लक्ष देता यावे म्हणून तटबंदीला आतल्या अंगाने सैनिकांना चालण्यासाठी  काही ठिकाणी तिन -चार फुट रुंद तर काही ठिकाणी सहा फूटा पेक्षा जास्त अशी जागा बनवलेली आहे.  बऱ्याच ठिकाणी तोफांची पण जागा दिसून येते, पण एकही  तोफ इथे दिसत नाही. या फुटपाथवर उभे राहिले की मागे अरबी समुद्राचे विराट रुप पहायला मिळते.समुद्रावरून  येणारा सुसाट वारा उन्हाची काहीली अजिबात जाणवू देत नाही, आणि फेसाळणारा अरबी समुद्र नजरेला शांत करतो- पण दमटपणा मुळे घाम मात्र खूप येतो. पुर्ण किल्ल्याच्या तटबंदी भोवती चक्कर मारायला साधारण ३० मिनिटे पुरतात.

किल्ल्याच्य पार्श्वभूमीवर एक रेखीव गाव दिसते, ते म्हणजे ताज व्हिलेज रिसॉर्ट! लोकेशन तर खूप छान आहे, पण रुमचे दर वगैरे परवडण्या पलीकडे आहेत.  याच किल्ल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इथे गाईड  नाहीत , त्यामुळे पुर्वी दारूखाना कुठे होता, आणि इतर जागाबद्दलची माहीती अजिबात मिळत नाही- आणि बहूतेक जागा अंदाजानेच  समजावून घ्याव्या लागतात. पण जरी गाईड नसला तरीही किल्ला  पहायला मस्त वाटते  . पोर्तुगीज सत्तेच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे हा किल्ला. एकदा अवश्य भेट द्या गोव्याला गेल्यावर.

तळटीप:- या किल्ल्याच्या समोर पाण्याची बाटली, सोडा वगैरे विकत मिळतो, पण त्याचे भाव मार्केट रेटच्या तिप्पट -चौपट किंवा त्या दुकानदाराला वाटतील तेवढे असतात , आणि दुकानदार पण उद्धट आहेत. तेंव्हा आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू शक्यतो सोबत घेऊन जावे.