सिक्रेट मेसेज कसा पाठवायचा?

Written by  on November 15, 2002

बरेचदा तुम्ही एखाद्याला इ मेल पाठवता, तेंव्हा तुमची इच्छा असते की तो मेल त्या समोरच्या माणसाने वाचावा, पण त्याच्या इन बॉक्स मधे शिल्लक राहू नये. अशा वेळेस  काय करायचं??

तर अशी वेळ आल्यास एक साईट आहे- त्या वेबसाईटच्या माध्यमातून मेसेज पाठवायचा. समोरच्या माणसाला फक्त एकदाच तो मेसेज वाचता येईल. एकदा वाचून झाला आणि ब्राउझर बंद केला की मेसेज डिलीट होणार.

तुम्ही एकच करायचं, एक साईट आहे ती उघडायची, पहिल्या पानावर एक विंडो दिसेल ,त्या मधे तुमचा सिक्रेट मेसेज टाइप करायचा, आणि मेसेज सबमीट केला की एक लिंक मिळते. ती मेसेजची लिंक  तुम्ही इ मेलने इच्छित व्यक्तिला पाठवू शकता.  तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्या मेसेजला पासवर्ड पण देऊ शकता. मेसेज ची लिंक इ मेलने पाठवल्यावर त्याचा पासवर्ड फोनवर सांगायचा..ही लिंक फक्त एकदाच उघडली जाउ शकते. दुसऱ्यांदा नाही.

तर चला, ताबडतोब एक सिक्रेट मेसेज बनवून पाठवा… इथे आहे त्या साईटची लिंक ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.thismessagewillselfdestruct.com/).

बलात्काराष्ट्र??

Written by  on November 7, 2002

(महा ) बलात्काराष्ट्र

गेले काही दिवस अशा बातम्या एकिवात येत आहेत की वाचल्यावर रक्त उसळावं. महाराजांच्या काळात , सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात मर्द मराठ्यांच्या नंग्या तलवारी  यवनांपासून आयाबहिणींची अब्रू वाचवण्यासाठी ज्या तळपायच्या, त्याच तलवारी आता  आता  एखाद्या स्त्रीच्या अब्रू चे धिंडवडे काढायला वापरली जातांना पाहून वाईट वाटतं.

महाराष्ट्राचा आम्हाला कधी काळी खूप अभिमान वाटायचा. नेहेमी बिहाराशी तुलना केली की आपण शतपटीने चांगले असे वाटायचे.रात्री अकरा वाजता  पण ’आमच्या मुंबईत’  मुलींना एकट्याने प्रवास करता येतो अशी बढाई मारणारे आम्ही,   पण लवकरच खैर लांजी सारख्या  घटना, दारू पिउन झोपलेल्या नवऱ्या शेजारी भावजयीवर चा्कूच्या जोरावर बलात्कार करणारे – आणि दररोजच पेपरमधे येणाऱ्या बलात्काराच्या घटना वाचल्या की  आमची अभिमानाची वस्त्र गळून पडतात  आणि कोणीतरी आपल्या मराठी अभिमानाचे  कपडे उतरवुन आपल्याला विवस्त्र केले आहे आहेत  असे वाटते.

माझ्या घराशेजारी एक बॅंकेचे रिजनल मॅनेजर ( मूळचे बिहारी) रहायचे. त्यांची वृध्द आई बिहारातून वर्षातले काही दिवस येऊन रहायची.    सौ. बरोबर त्या नेहेमीच गप्पा मारायला यायच्या आणि तासन तास हमरा बिहरवा कैसन अच्छा ह ह्याची महती गात रहायची. थेट बिहारी ( मैथिली) बोली. एकदा त्यांना सौ. म्हणाली, की बिहारमे रातको लडकी अकेली बाहर नही जा सकती, रातमे आदमी को भी लूट लेते है… यावर त्यांनी  काय उत्तर द्याव?? ” त्या म्हणाल्या, अगर लडकी रातमे बाहर घुमने जायेंगी तो कोई भी उठाके ले जायेंगाही ना?? क्यों जानेका रातको बाहर??” आणि रात्री बेरात्री बाहेर पडल्यावर लुटल्या जाणे यावर त्यांचं म्हणणं ’हाथियार लेकर बाहर निकलनेका नां.. क्यॊं बाहर जानेका रातके अकेले बंदूक लिये बगैर?? म्हणजे बाहेर रात्री गेली की तिला उचलून नेणे हे सहाजिक आहे, तुम्ही बंदूक न घेता बाहेर फिरलात तर लुटले जाईलच-  अशी मनोवृत्ती झालेली होती त्यांची. उचलून नेणाऱ्याचा काही दोष नाही.

हाराष्ट्रीयन लोकांच्या मनाची पण अशीच जडण घडण  हळू हळू होत चालली आहे कां असा संशय येतोय. नुकतंच कुठेतरी स्टॅटस्टीक वाचलं की  महाराष्ट्रात बलात्काराच्या केसेस मधे बिहारच्या पेक्षा पण जास्त आहेत- तेंव्हाच जाणवलं की  हे असंच वाढत राहिलं तर..महाराष्ट्राचं नाव बलात्काराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही.

कित्तेक वर्ष महाराष्ट्र या अशा प्रवृत्ती पासून दूर राहिला होता म्हणून मराठी असल्याचा अभिमान वाटायचा . मराठ्याचे ( हा जातिवाचक शब्द म्हणून वापरलेला नाही- एक मराठी माणूस तो मराठा ) हे  आजचे असे रूप पाहिले की संताप येतो. कुठे गेला तो मराठा?? जो मरकर भी नहीं हटता वो मराठा, अशी व्याख्या असलेला तो शूर वीर कुठे गेलाय?  आज बलात्काराच्या इतक्या बातम्या ऐकतो आणि मग मन कसं विषण्ण होऊन जातं. आम्ही जो इतिहास शिकलो आहे तो कसा स्फुर्तीदायी होता, शिवाजी महाराज, कल्याणच्या सुभेदाराची सून अशा गोष्टी कशा मनावर बिंबवल्या गेल्या होत्या इतिहास शिकतांना, पण पुढली पिढी इतिहासामधे काय शिकणार आहे- आज जे काही  घडतंय तो उद्याच्या साठी इतिहास आहे हे विसरून चालणार नाही.

बलात्काराचे प्रमाण इतके जास्त वाढले आहे की त्याकडे कानाडॊळा  करुन चालणारच नाही. आपल्या कडे  शंभर बलाक्तार झाले की एक केस नोंदवली जाते. याचं मुख्य कारण म्हणजे आपले कायदे -कानून के हाथ बहूत लंबे होते है, हे नेहेमी ऐकतो सिनेमात, पण त्या हाताची बोटं कुष्ठ रोगाने झडली आहेत ह्या कडे कुणाचेच लक्ष नाही.

त्या स्त्रिला पण कोर्टामधे बलात्कार कसा झाला , आणि ती पोलिसांकडे गेली की आधी तिची हॉस्पिटल पर्यंत धिंड काढणारे  पोलिसच असतात. पोलिस स्टेशनसमोर कॅमेरे घेउन ( बोलावून ठेवलेले- कारण पोलिसांना टिव्ही वर दिसायचं असतं नां) चॅनलचे प्रतिनिधी तर त्या स्त्री चा चेहेरा टीव्ही वर दाखवण्यासाठी जिवाचे रान करतात.  हे  जे मेडीकल चेकिंग आहे ते त्या स्त्रीच्या घरी जाउन केल्यास काय हरकत आहे? तिची धिंड काढणे आवश्यक आहे कां?

कोर्टामधे  बलात्काराच्या क्रियांच्या बद्दल  जे प्रश्न विचारले जातात   त्या प्रशनांची उत्तरं एखादी वेश्या पण द्यायला धजावणार नाही – असे प्रश्न विचारून बलात्कारीत स्त्री ला एका  वेश्येच्या पण पातळी खाली नेउन ठेवतात .  त्या क्रियेचे  तपशिलवार वर्णन विचारून तिला  पुन्हा चारित्र्यहिन म्हणून सिध्ध करण्याचा प्रयत्न पण आरोपीच्या कडून केला जातो. जास्त  दोषी कोण- तो बलात्कार करणारा ? की सगळ्या कोर्टासमोर चित्रविचित्र प्रश्न विचारून    शाब्दिक बलात्कार करणारा?तिच्यावर बलात्कार झाला हा तिचाच गुन्हा आहे का? असे फिलिंग तिला येत असते .

गुन्हा नोंदवल्यावर कोर्टामधे असा गुन्हा सिध्द करणे पण अतिशय कठीण झालेले आहे.  गुन्ह्याचा तपास हाच मुळात लवकर केला जात नाही – त्यामूळे बलात्कारितेला न्याय मिळेल याची खात्री कमी असते. काही वर्ष निघून गेल्यावर आजची घटना जशीच्या तशी लक्षात राहू शकत नाही, आणि आरोपी सुटण्याचे चान्सेस जास्त वाढतात. बलात्कारीत स्त्रीआज झालेल्या बलात्काराची केसच मुळात कोर्टात उभी रहाते तिन चार वर्षा नंतर, तेंव्हा त्या स्त्रिला चार पाच कधी कधी तर जास्तच वर्षापुर्वीच्या घटनेचे तपशिलवार वर्णन करणे कसे शक्य आहे? चार वर्षापुर्वी दिलेली जबानी आणि कोर्टात केस उभी झाल्यावर दिलेली उत्तर यामधे थोडी जरी तफावत आढळली की  वकिल तिला ग्रिल करायला तयार असतातच.  पुढे तारखा, मग समजा आरोपी खालच्या कोर्टात हारला, तर केस हाय कोर्ट, सुप्रिम कोर्ट या मधे पोहोचते .  पैसे वाला किंवा राजकिय पुल असलेला माणूस असेल तर मग तर मुद्दामच   वेळ काढू पणा केला जातो.आणि मग न्याय मिळतो????. आपल्यापैकी   शानभाग हे नांव किती लोकांना आठवतं??

आपल्या कायद्यामधेच इतक्या पळवाटा आहेत की त्यातून सुटणे किंवा जामिनावर बाहेर निघणे सहज शक्य होते- पंधरा दिवसात बलात्कार करणारा पुरुष जेलच्या बाहेर जामिनावर निघतो.खरं तर अशा  केस मधे अतिशय सोपी केस होऊ शकते ही. जर त्या स्त्रीची मेडीकल केली आणि डीएनए चेक केले तर बलात्कार सिध्द होऊ शकतो. त्यासाठी इतर काही चौकशीचा फार्स करण्याची गरजच नाही.

कुठलाही बलात्कारी  आज अगदी दोनच दिवसात, अगदी फारच हाय प्रोफाइल केस असेल ( शायनी आहूजा) तर महिना भरात बाहेर निघतो. त्याची बायको पण निर्लज्जा सारखी त्याची तरफदारी करते. ती म्हणाली होती की एक स्त्री पण बलात्कार करू शकते पुरुषावर -इतक्या लो लेव्हलला गेलेली ती बाई बघून संताप आला होता. शायनी ने बलात्कार केला होताच, पण तरीही त्याची  केवळ  ’बायको’ म्हणून त्याला वाचवायला एका निर्बल अबलेच्या चारित्र्यावर ज्या त्वेशाने शायनीची बायको  शिंतोडे उडवित होती, आणि त्या बलात्कारितेलाच   बलात्कार करणारी ठरवत होती, ते बघुन खूप चिड आली होती. शायनीच्या बायकोला   ’स्री बलात्कार   करू शकते’ याच्या बद्दल इतकी माहिती कशी  हा प्रश्न माझ्या डोक्यात आला??? इतकं ठामपणे कोणी   अनूभव घेतल्या शिवाय बोलूच शकणार नाही असे वाटते.

आपल्या समाजात बलात्कारिते कडे पहाण्याचा दृष्टीकोन. जिच्यावर बलात्कार झालाय ती एक प्रेक्षणीय वस्तू होते, आणि समाज तिला ताठमानेने जगू देत नाही.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला वाटते की ती आता सार्वजनीक वस्तू झालेली आहे. एकदा बलात्कार तर झाला आहेच, आता माझ्या बरोबर आली तर काय हरकत आहे? किंवा ती एक इझीली असेसेबल वस्तू आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. हे असे    डायलॉग्ज सिनेमात नेहेमीच ऐकालयला मिळतात- ते आपल्या समाजाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे असे समजावे कां?

राजकिय नेते केवळ पेट्रोलचे भाव वाढले म्हणून आंदोलनं करतात, कांदे बटाट्याचे भाव वाढले तरी पण आंदोलनं होतात पण स्त्रियांवरील अत्याचार या विषयावर एकही राजकिय नेता रस्त्यावर उतरलेला पाहिलेला नाही-किंवा एकही राजकिय नेत्याने निषेध केल्याचे पण दिसले नाही.. हल्ली मुंबई किंवा कुठल्याही शहरात बिभित्स कॉमेंट्स ऐकल्या शिवाय कुठल्याही स्त्रीला रस्त्यावरुन चालणे शक्य होत नाही – हे सगळं होतं ते पब्लिक प्लेस मधे . चार दोन गावगुंड टाइप चे लोकं अशा कॉमेंट्स करतात, आणि इतर लोकं अपनेकू क्या करनेका   है म्हणुन दुर्लक्ष करून पुढे जातात.

या बद्दल समाजामधेच जागरूकता निर्माण झाली पाहिजे, आणि मला काय करायचंय ही  प्रवृत्ती दूर करायला हवी नाहीतर हे लोकं तुमच्या घरातही घुसायला कमी करणार नाहीत.आपली निती  मुल्ये आणि त्यांची लक्तरे अशी वेशीवर टांगली जात आहेत , तरीही आपल्या नेत्यांना त्याची लाज वाटत नाही- दुर्दैव आहे.