उल्लेखनीय…

Written by  on October 23, 2002
^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/02/biker1.jpg)

थोडी पाय टेकवायला जागा आणि हात धरायला बार असेल तर … बरं वाटतं.

सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो- जर चांगला मोकळा रस्ता असेल आणि जड वाहनांची भिती नसेल तर.आजकाल तर अगदी १६ वर्षाचा मुलगा झाला की मोटरबाइक चालवणं सुरु करतो.हल्ली पालकांची क्रय शक्ती वाढल्यामुळे मुलांचे असे लाड पुरवणे अगदी कॉमन झालेलं आहे. मुल १६ चं झालं, की लगेच बाइक किंवा स्कुटीची किल्ली हातात दिली जाते. क्लासेस, कॉलेज वगैरे जर ५-६ किमी अंतरावर असेल तर सायकल ने सहज जाता येऊ शकते. असो..

मला वाट्त की हेच कारण असावं की आजकालची मुलं थोडी जास्त हेल्दी दिसतात- ओव्हर वेट म्हंटलं तर वाईट वाटेल म्हणून हेल्दी शब्द वापरलाय. थोड्या प्रमाणात याला पालक पण जबाबदार आहेत. आपल्या मुलांनी सायकल चालवली तर ते त्यांना कमीपणाचं वाटते, तसेच कॉलेजमधली इतर मुलं जर बाइक आणत असतील तर मग आपण सायकल कशी चालवायची? जर आपण सायकल नेली तर आपण ऑड मॅन आउट होऊ अशी भिती पण असते मुलांना.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/02/bike3.jpg)

सायकल साठी स्पेशल लेन

सायकल्स …अगदी कुल सायकल्स  चांगल्या ७-८ हजाराच्या अव्हेलेबल आहेत भारतामधे. अनिकेतच्या ब्लॉग  ^(http://rangmarathiche.com/goto/http://manatale.wordpress.com/)वर बघा बरीच माहिती मिळेल. सायकलींग चे फायदे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. असंच वाचतांना एक लेख वाचण्यात आला , त्यात त्याने काही युरोपियन देशात आणि अमेरिकेतील काही राज्यात सायकल स्वारांसाठी वेगळॆ लेन सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती दिलेली होती. सायकल चालकांना मुख्य भिती असते ती कारची आणि जड वाहनांची .सेपरेट लेन मुळे  रस्त्यावरून अपघाताची भिती न बाळगता सायकल चालवता येऊ शकते. सायकल चालवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे नक्कीच वाखाणण्यासारखे आहे.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/02/biker2.jpg)जेंव्हा एखाद्या सिग्नलला उभं रहाण्याची वेळ येते तेंव्हा थोडं त्रासदायकच होतं. वाकडं होऊन एका पायावर जोर देऊन उभं रहावं लागतं. याच कारणासाठी डेन्मार्क मधे खास सायकल स्वारांना थॊडी विश्रांती मिळावी म्हणून रस्त्याच्या बाजुला स्टॅंड्स उभे केले आहेत. त्यावर पाय ठेऊन सायकल स्वार कम्फर्टेबली उभा राहू शकतो. त्याच सोबत धरुन उभं रहायला एक बार पण दिलेला आहे- एक लहानशी पाटी पण लक्ष वेधून घेते.. तुम्ही सायकल चालवल्या बद्दल तुमचे आभार.. खूप छान वाटलं वाचल्यावर म्हणून इथे शेअर करायला पोस्ट करतोय… जेंव्हा आपण पर्यावरणाची काळजी करतो  तेंव्हा केवळ विज, पाणी आणि प्लास्टीकचाच विचार न करता इतरही गोष्टींचा विचार करायला हवा 🙂 त्यातलीच एक म्हणजे पेट्रोल बचत…

उत्खननाच्या साईट्वर…२

Written by  on October 8, 2002
ak sharma, arunkumar sharma

अरूण कुमार शर्मा.

जाण्यापूर्वी बराच वेळ गप्पा मारल्या शर्माजींशी ,त्यांनी पण बऱ्याच टीप्स दिल्या की जुनी  स्थळं कशी काय पहायची ते. प्रत्येक दगड काहीना काही तरी बोलत असतो, प्रत्येकाची आपली एक कहाणी असते , ती तुम्हाला वाचता आली पाहिजे  तरच तुम्ही प्रत्येक वस्तू एंजॉय करू शकता. सध्या आम्ही जिथे गप्पा मारत बसलो होतो तिथे एक मंदीर सापडले होते. मंदीर म्हणण्यापेक्षा मंदीराचे अवशेष. जुन्या मंदीरातल्या मुर्त्या , कोरीव खांब वगैरे लोकांनी चोरून विकल्या आहेत तर काही लोकांनी चक्क घराचा पायवा भरताना हे  दगड, किंवा भग्न झालेल्या मुर्त्यांचे तुकडे वगैरे पण  वापरले आहेत. कित्तेक अनमोल वस्तू अशा तर्हेने इतिहास जमा झालेल्या आहेत. जुन्या वस्तूंची किंमत लोकल लोकांना  न समजल्याने असे होते.

भारत सरकारचा कलेच्या बाबतीतला निरुत्साह तर आहेच.   ह्या जागेचा शोध पण एका ब्रिटीश फॉरेस्ट अधिकाऱ्याने  १८७३ मधे लावला.  बेगलर नावाचे एक ब्रिटीश फॉरेस्ट अधिकारी इकडे ( तेंव्हा असलेल्या घनदाट जंगलात- अजूनही जंगल आहे, पण तोडल्या गेलंय बरंचसं) फिरायला आले असता त्यांना एक  मंदीर  संपुर्ण झाडी झुडपांनी वेढलेले सापडले.त्यांनी ताबडतोब या गोष्टीची कल्पना  कंपनी सरकारला दिली .  नंतर  सर अलेक्झॅंडर कनिंघम या ब्रिटीश इतिहास तज्ञाने १९०९ मधे इथल्या जागेकडे जगाचे  लक्ष वेधले आणि उत्खनन सुरु केले. .

नंतरच्या काळात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात या भागाकडे पुर्ण दुर्लक्ष केले गेले.  एमपी आणि छत्तिसगढ एकत्र असतांना एमपी सरकारने या  भागाच्या प्रगतीकडे पुर्ण  दुर्लक्ष केले. पण १९५३ साली पुन्हा पुरातत्त्व विभागाला जाग आली आणि पुढली चार वर्ष  थोडं फार काम झालं. ते पण लवकरच  बंद पडलं – सरकारी यंत्रणाचा   निरुत्साह  खरोखरच संतापजनक आहे.

सरकारने हात उभे केल्यावर  ह्या जागेच्या  उत्खननासाठी अर्थ सहाय्य  बोधिसत्व नागार्जुन शोध संस्था मन्सर, नागपुर,  या संस्थे ने केले.   त्या संस्थेने श्री एके मिश्रा यांना   जवळपास पाच वर्ष स्वतःच्या खर्चाने उत्खनन करण्यास सांगितले- कारण ह्या भागात बौध्द धर्माशी संबंधित काहीतरी सापडेल अशी त्यांना खात्री होती.  अर्थ साहाय्य दिले तो काळ म्हणजे १९९९ ते २००४.

काय झालं? खोटं वाटतंय ? की संताप येतोय  इतकी वर्ष या जागेकडे सरकारने दुर्लक्ष केलं म्हणून? इतकी बहुमूल्य धरोहर असलेल्या या विभागाकडे शासनाच्या नाकर्तेपणामुळे केले गेलेले दुर्लक्ष बघून? माझी पण तीच अवस्था झाली होती.

२००५ पासून  छ.ग.शासनानेच या उत्खननाचा भार उचलला आहे. स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष दुर्लक्षित राहिलेली ही धरोहर… आता पुन्हा सूर्यप्रकाश पहायला बाहेर येते आहे.सरकारने हे उत्खननाचे जे काम आता हाती घेतले आहे ते जर पूर्वी घेतले असते तर बरंच काही वाचलं असतं.

जुन्या विटा, घरांची दारं, वगैरे सगळं  काही चोरून आपली घरं बांधलेली आहेत लोकांनी. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, पण त्या काळच्या म्हणजे इस ६५० च्या विटांचा दर्जा हा आजच्या विटा पेक्षाही चांगला होता.  .प्लास्टर जरी केले नाही तरीही त्या विटांचे फिनिशिंग पिओपी केलेल्या भिंती प्रमाणे दिसते.

लक्ष्मण मंदीराच्या दारावरच्या कमानीवर संपूर्ण दशावतार, आणि कृष्णाचे कंस वध हे शिल्प कोरलेले आहे. विटांवरच्या कोरीव कामाचे हे जगातले एकमेव उदाहरण म्हणता येईल.

महानदीच्या काठावर वसलेले हे श्रीपूर एके काळी दक्षिण कौसल या राज्याची राजधानी असलेले हे दहा वर्ग किलोमीटर मधे प्रस्थापित झालेले शहर. हे अतिशय महत्त्वाचे  होते. व्यापारपेठ म्हणून सुध्दा खूप नावाजलेले होते.कौसल राज्याची राजधानी असलेले शहर  बहूतेक महानदीला आलेल्या महापुराचे नष्ट झाले असावे. आत्तापर्यंत  इथे जवळपास ४८ साईट्स सापडल्या आहेत . त्यामधे काही बौध्द धर्मियांच्या दॄष्टीने खूप महत्वाचा आहेत.

mahendra kulkarni, kayvatelte.kayvattelte.com,kayvatelte.com,marathi

बुध्दविहार- जो मी पाहु शकलो नाही..अतीशय सुंदर अशा मुर्ती सापडल्या आहेत. सगळ्या मुर्त्यांचे फोटो खाली एकत्र स्लाईड शो मधे पोस्ट करतोय

त्याच काळात या भागात बौध्द धर्माने पण चांगलाच जम बसवला होता. बौध्द विहार, आणि गौतम बुद्धाच्या मुर्त्या तर बऱ्याच सापडल्या आहेत. ज्या काळात नागार्जुनाच्या काळात आंध्र प्रदेशात आताचे नांव नागार्जुन सागर येथे एक बौध्द विद्यापीठ स्थापन झाले होते  त्याच काळात इकडे पण बौध्द धर्माचा चांगलाच जम बसलेला होता.  सुंदर मुर्त्या आहेत आणि बुध्द विहार उत्खननात सापडले आहेत.

कॅमेरा हललाय. पण ही सुबक मुर्ती इथे याच ठिकाणी गेली दोन सहस्त्रक आहे. आता फक्त पार नविन बांधलाय असे समजते. जेंव्हा गौतम बुध्द इथे आले होते तेंव्हा बुध्द गये वरुन आणलेले बोधीवृक्षाचे सॅपलींग चा झालेला मोठा वृक्ष अजूनही आहे असे म्हणतात.

एका शिव मंदीरातल्या वडाच्या झाडाखाली एक मुर्ती सापडली , ती त्याच अवस्थेत ठेवलेली दिसली. अतिशय रेखीव मुर्ती आहे ती. गंडेश्वर शिवमंदीर.

त्यातल्या  त्यात उल्लेखनीय म्हणजे ही मंदीरं आणि धान्य साठवायची जमिनीखालची  गोदामं. इथे कित्येक हजार टन धान्य साठवून ठेवण्याची सोय जमिनीखाली केलेली होती. जरी पुर्ण छत्तीसगढ मधे दुष्काळ पडला तरीही दोन वर्ष धान्य पुरेल इतकं धान्य साठवून ठेवण्याची सोय होती केलेली.ती जागा नुकतीच शोधून काढलेली आहे, पण आम्हाला फार वेळ नव्हता अंधारून येत होतं, म्हणून शर्माजी म्हणाले, की लक्ष्मण मंदीर आणि शिव मंदीर पहायला आधी जा, आणि पुढल्या वेळेस थोडा जास्त वेळ घेउन आलात की मग ती इतर ठिकाणं पण दाखवीन तुम्हाला- तशी ती सगळ्या लोकांसाठी अजून उघडलेली नाहीत- पण तुम्ही या पुन्हा !!

मंदीराचा मागच्या बाजूने काढलेला फोटॊ. हे मंदीर पुर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दडलेले होते.

त्याच शिवमंदीराचा समोरचा भाग. १५०० वर्ष जुनी वास्तु आपण पहातोय ही कल्पनाच खूप आनंद देऊन जाते. वर जाउन जेंव्हा त्या महादेवाच्य पिंडी शेजारी बसलो, तेंव्हा खरंच भरून आलं होतं. अप्रतीम जागा आहे ही. वर उंच जाणाऱ्या पायऱ्या बघा इतकं सुंदर स्ट्रक्चर कधीच पाहिलेले नाही. खूप मोठा उंचवटा आहे आणि नंतर वर मंदीर आहे. खाली समोर सभामंडप पण होता, तो आताशिल्लक नाही.

उत्खननातून सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी शोधून काढलेलं शिव मंदीर.. पूर्वीच्या काळी म्हणे प्रत्येक ज्ञातीचे लोक वेगवेगळ्या रंगाच्या शिवलिंगाची पूजा करायचे, ब्राह्मण पांढरा, वैश्य पिवळा, आणि लाल व काळं शिवलिंग पण असायचं. जास्त डिटेल्स लक्षात नाहीत . राजाने सगळ्या समाजामधे एकता असावी म्हणून चार रंगांची शिवलिंग एकाच ठिकाणी असलेले हे देखणे मंदीर बांधले. संपुर्ण दगडी मंदीर आहे ते. दगडाचा एक   उंच मोठा चौथरा आहे  जवळपास पाच मजली इमारतीइतका उंच !   आणि त्यावर त्या चार शिवलींगांची स्थापना केल्या गेली आहे.

फोटॊ बिघडलाय पण भुकंपामुळे झालेल्या वाकड्या पायऱ्या ह्यात स्पष्ट दिसतात म्हणून पोस्ट केलाय.

वर चढायला दगडी पायऱ्या आहेत- पण चढतांना फार भिती वाटते . एक ठिकाणी बऱ्याच पायऱ्या वाकड्या झालेल्या दिसल्या. त्या अशा आहेत हे शर्माजींनी  आधिच सांगितले होते. इ.स. १२०० मधे अमरावती इथे एपीसेंटर असलेला एक भुकंप झाला होता. त्या मधे मंदसौर आणि हे ठिकाण त्याच   फॉल्ट लाइनवर येते, त्यामुळे असेच नुकसान  दोन्ही ठिकाणी झालेले  आहे.

पायऱ्या चढून वर गेल्यावर अशा चार रंगाच्या महादेवाच्या पिंडी आहेत.

त्या मंदीराच्या ठिकाणी पूर्वी एक टेकडी होती. त्या टेकडीवर प्रातर्विधी उरकायचे पूर्वीचे लोकं. पण इतक्या सखल जागी अशी टेकडी का? म्हणून उत्खनन केल्यावर ते मंदीर सापडले. ते तुम्ही नंतर पहा, पण त्या आधी इथे बाजूला असलेले ते लक्ष्मण मंदीर तुम्हाला दाखवायला एक माणूस देतो. तो माणूस दाखवेल सगळं. म्हंटलं ते  लक्ष्मण मंदिराचे गेट बंद आहे, तर म्हणाले, उघडू हो तुमच्या साठी.. जा बघून या ते मंदीर- आता माझ्याच्याने फार फिरणे होत नाही, नाहीतर मीच आलो असतो तुमच्या बरोबर दाखवायला. त्यांनी दिलेली सगळी माहिती वर लिहिलेली आहेच म्हणून फोटो पण वर पोस्ट करून टाकले .

कंठीराम आमचा गाईड – खरं तर हा उत्खनन कामगार, पण शर्माजींनी सांगितलं म्हणून आमच्या सोबत आला दाखवायला. ्पार्श्व भुमीवर

शर्माजींनी . कंठीरामाला आमच्या सोबत दिले, आणि सांगितले की आम्हाला सगळं काही दाखव म्हणुन.

लक्ष्मण मंदीर..पुर्ण विटांचे बांधकाम.अतीशय सुंदर कोरीव काम अजूनही दिसून येते . खालची फरशी पण ओरिजिनल होती त्याच अवस्थेत आहे. संपुर्ण मंदिरच छान आहे. फक्त समोरचा सभा मंडप तुटलेला आहे. मंदीरावरच समोरचे छत दगडी फरशी चे आहे

आधी आम्ही लक्ष्मण मंदीरात गेलो. हे मंदीर पुर्णपणे कोरीव आहे, आणि जगातले एकुलते एक विटांचे कोरीव काम केलेले मंदीर आहे. सहाव्या शतकातल्या विटा अजूनही अतिशय उत्तम अवस्थे मधे आहेत. विटा बनवून नंतर त्या विटांच्या वर कोरीव काम करून हे मंदीर बनवलेले आहे. कंठी रामने एक विट दाखवली म्हणाला की ही विट तांदूळाच्या भुशापासून बनवलेली आहे.  वर काही ठिकाणी पांढरा रंग दिलेला दिसत होता. तो रंग पण सहाव्या शतकातला आहे म्हणाला तो.पुर्वीच्या काळी विटांचे मंदीर बनवल्यावर ते टिकावे म्हणून चूना, उडिद डाळ, गूळ आणि अजून काही पदार्थ मिक्स करून बनवलेला तो चुना प्लास्टर साठी वापरलेला आहे. एक ठिकाणी त्याने आम्हाला हे मिक्स करण्यासाठी वापरात येणारी यंत्रणा ( दगडी ) पण दाखवली. या सगळ्या पदार्थांपासून बनवलेला तो चुना अजूनही पक्का दिसला.  अशाच प्रकारचा चुना हा द ग्रेट वॉल ऑफ चायना साठी पण वापरला गेला होता.

विटांचे बांधलेले लक्ष्मण मंदीर. कळसापर्य़ंत जमिनिखाली गाडले गेले होते म्हणुनच ते आज आपल्याला पहायला मिळतंय.

हेच ते मंदीर जे इंग्रज अधिकाऱ्याला सापडले होते. जेंव्हा हे मंदीर सापडले, तेंव्हा फक्त कळस आणि तो पण पुर्णपणे झाडा झाडाझुडपांनी वेढलेला  दिसत होता. जेंव्हा हळू हळू बाजूची माती बाजूला केली  तेंव्हा हे जगातले एकुलते एक अद्वितीय  कलाकुसर असलेले विटांचे मंदीर सापडले.   बाकी मंदीर पुर्णपणे जमिनी खाली होते. सारख्या पाऊस, गारपीट आणि निसर्गाच्या तडाख्यात कळस उघडा होता  म्हणून फक्त कळसच भग्न झालेला आहे. बाकीचे मंदीर हे मातीखाली गेल्याने बरीच कलाकुसर ही  अजूनही शाबुत आहे.

लक्ष्मण मंदीराचे दर्शनी दार. त्यावरच्या दशावताराचे उत्कृष्ट चित्रण केलेल दिसते.

अतिशय सुंदर परिस्थितीतले हे मंदीर आहे. प्रत्येक विटेवर ची कलाकुसर पहाण्यासारखी आहे. विष्णूचे दशावतार हे मंदीराच्या दाराच्या चौकटीवर कोरलेले दिसतात. काही ठिकाणी मैथुन चित्र, तर काही ठिकाणी चक्क कृष्णाचे कंस वध आणि कृष्णलीलांचे चित्रण पण केल्या गेलेले आहे. इथे सापडलेल्या शिला लेखावरून हे मंदीर ६२५ -६५० मधे बनवल्या गेल्याचे  समजते

या मंदीरातली मुर्ती पुर्वी एकदा चोरीला गेली होती. मुर्तीची काळ्याबाजारातली किम्मत लाखो रुपये आहे.

मंदीराच्या भिंती कमीत कमी अडीच ते तिन फुट जाडीच्या आहेत.

मंदीर दाखवतांना आमचा गाईड सगळी माहिती देत होता. शर्माजींच्या बरोबर राहिल्याने बरीच माहिती दिसत होती त्याला. अगदी सनावळी पण तोंडपाठ होत्या. ४थ्या शतकात ते ७ व्या शतकात बरीच मंदीरं बांधली गेली, पण विटांचे बांधलेले आणि अजूनही उत्तम स्थितीत असलेले मंदीर हे एकच!

पशूपतीनाथ प्रमाणे चारही दिशेला चेहेरा कोरलेली शिवलिंगाची कोरीव मुर्ती.

हे मंदीर पाहिल्यावर याच्या मागेच एक संग्रहालय आहे. जिथे फक्त उत्खननात सापडलेल्या मुर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती म्हणजे चार चेहेरे असलेले शिवलिंग. पशूपतीनाथाच्या मंदीरात असलेल्या शिवलिंग प्रमाणे असलेले हे शिवलिंग अतिशय सुंदर कोरीव आहे. या व्यतिरिक्त कित्येक मुर्त्या काही पूर्णावस्थेत तर काही भग्नावस्थेत सापडलं.  ते सांगत होते, एक मुर्ती तर म्हणे खाली तोंड करून एका घरासमोर पायरी म्हणून  कित्तेक वर्ष वापरात होती.  जेंव्हा तो पायरीचा दगड सरळ केला तर ती सरस्वतीची मुर्ती आहे म्हणून लक्षात आले.

अशा प्रकारे  उत्खननात सापडलेल्या मुर्त्या एकत्र करून एका संग्रहालयात ठेवल्या आहेत . अशा मुर्त्या चोरीला जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. जितकी जुनी आणि रेखिव  मुर्ती, तितकी जास्त किम्मत! त्या मुर्त्यांचे फोटो   या लेखाच्या शेवटी  पोस्ट करतोय.

हे  सगळं पाहू झाल्यावर महानदीच्या शेजारी असणारे  गंडेश्वर महादेवाचे मंदीर पहायला गेलो. पण तिथे गेल्यावर मात्र पुर्ण निराशा झाली. मंदीराचा जिर्णॊध्दार करण्यात आलेला आहे, आणि तो करतांना सरळ सिमेंट प्लास्टरने सगळा जुना भाग झाकुन टाकण्यात आलेला आहे. हे मंदीर पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येत नाही. या मंदीराशेजारी पण बऱ्याच मुर्त्या पडलेल्या आहेत.

गंडेश्वर महादेव मंदीर – जिर्णोध्धार केलेले

मंदीराच्या मागे महानदी वाहते. अतिशय सुंदर दृष्य दिसते तिथुन. मागचा भाग पुर्णपणे बांधलेला  आहे. खाली  नदीवर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे. पण पायऱ्या इतक्या स्टीफ  आणि फक्त चार इंच विड्थ असलेल्या आहेत की तिकडून खाली जाण्यासाठी खूप सराव असायला हवा असे  वाटले म्हणून हिंम्मत केली नाही.

मंदिराचा मागचा भाग आणि खाली पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या. असे म्हणतात की ह्या पायऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्याने बांधून दिल्या आहेत..

्पायऱ्यांचा अ‍ॅंगल हा जवळपास ८० डीग्री आहे. खूप अवघड आहेत पायऱ्या.  मंदीराच्या मागे एक नविनच बांधलेले देवीचे पण मंदीर आहे, पण  माझे लक्ष दुसऱ्या एका दगडी मंदीराकडे गेले. हे दगडी मंदीर पण साधारण त्याच काळातले. खूप दणकट मंदीर आहे. त्या कृष्ण मंदीरात गेलो , तिथे बहूतेक पुजा अर्चा होत नसावी असे वाटते. मंदीर अतीशय उत्तम अवस्थेतआहे. मंदीरामागे गर्भगृहखाली एक गुहा पण आहे. त्या गुहेत पुर्वी वाघ रहायचे असे म्हंट्ले जाते.

कृष्ण्मंदिर.. पुर्ण दगडाचे बांधकाम असलेले.

इतकं सगळं पाही पर्यंत अंधार पडलेला होता, आम्ही परत  निघालो. हे शहर महानदीच्या का्ठावर वसलेले आहे. अजूनही नदी फार सुंदर दिसते संध्याकाळी. काढलेला एक फोटो पोस्ट करतोय खाली. शर्माजी म्हणाले की जर इथे पुर्ण उत्खनन केलं तर कदाचित मोहंजोदडॊ प्रमाणे  एखादी पुर्ण संस्कृती सापडेल आ्णि ही साईट जागतिक हेरीटेज साईट होण्याच्या क्षमतेची आहे.

महानदी….

निघतांना  पुन्हा मनःपुर्वक आभार मानले शर्माजींचे . अरूण कुमार शर्मा यांच्या बद्दल पण थोडक्यात माहिती देतो.  नेटवरून घेतलेली माहिती आहे  ही..

Sh. AK SHARMA is an archaeologist of repute. He is internationally known for his original contributions in the field of archaeology and anthropology. During thirty three years of his hectic career, in different capacities in the Archaeological Survey of India he explored and excavated a number of sites throughout the length and breadth of the country, particularly in remote and inaccessible areas of North-East India, Jammu-Kashmir and Lakshadweep. For the First time, through his field works he brought Sikkim and Lakshadweep Islands in the Archaeological map of the country. To his credit goes the discovery and excavation of the biggest Stone age site Anangpur (near Delhi), the biggest prehistoric cave of kachagad in Maharashtra, the sprawling nucleus megalithic site in chhattisgarh, unique Neolithic site of Gufkral in Kashmir valley, early historic sites of Sekta in Manipur and Vadagokugiri in Garo Hills of Meghalaya. He is also known for the discovery of horse bones of domesticated horse bones of domesticated horse in Harappan context which have been internationally acknowledged and has changed the whole theory about Aryan Migrations. He has to his credit more than 50 published research papers on anthropology, archaeology, prehistory and other aspects of archaeology. Presently he is working as senior fellow of Indian council of Historical Research on his project “Megaliths of Chhattisgarh including Bastar”. His recent book on History of Tansa valley is being published by ‘Gurudeva Siddha Peeth Ganeshpuri’, Mumbai. Presently he is the Director of Excavation Art Mansar in Maharashtra.

उत्खननाच्या साईटवर पहिला भाग … १ ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/07/24/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/) इथे क्लिक करा.