शिवसेना की मनसे? हा मुद्दा कोण उचलणार?

Written by  on September 26, 2002
vt, victoria terminus, WOrld heritage,

छत्रपती शिवाजी टर्मीनस

मराठी आहात?? मुंबईला रहाता?? मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते आहात?? काय म्हणताय- उत्तर होय असं आहे?? बरं अजून एक प्रश्न कधी छत्रपती शिवाजी टर्मीनसला गेले आहात का? कधी त्या भव्य इमारतीसमोर उभे राहून त्या इमारती कडे डॊळे भरून पाहीले आहे?  मी आजपर्यंत बरेच वेळा त्या इमारतीमध्ये किंवा त्या इमारती समोरून   गेलो आहे पण त्या इमारतीचे सौंदर्य डोळ्यांमधे साठवून घेण्या पुरता पण वेळ नसतो. मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीतही असंच होत असावं, आपण आपल्या कामामध्ये इतके गुंतलेले असतो की बऱ्याचशा सुंदर गोष्टींकडे आपले लक्षच जात नाही..

१९९६ मधे शिवसेनेच्या आग्रहामुळे या व्हीटी स्टेशनचे नामकरण छत्रपती शिवाजी टर्मीनस करण्यात आले . आपल्या गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकायच्या म्हणून  जे काही केलं गेलं त्या मधे काळा घोडा राणीच्या बागेत नेऊन ठेवणे, तसेच इंग्रज अधिकाऱ्यांचे मुंबईभर लावलेले पुतळे काढून टाकणे आणि राणीच्या बागेत नेऊन टाकणे वगैरे तर झालेच पण त्याच बरोबर इंग्रज अधिकाऱ्यांच्या काळातली नावं बदलून त्या जागांना किंवा रस्त्यांना  हिंदुस्थानी नावं देणं  हे पण झालंच..

परवाचीच गोष्ट आहे, एका  मित्राची वाट पहातो रेल्वेच्या मुख्यालयासमोर म्हणजे सीएसटी समोर उभा होतो. तो यायचा होता, म्हणून इकडे इकडे पहात वेळ काढत होतो. मुंबईचे हे बाकी बरे आहे, तुम्ही कुठेही उभे राहिलात तरी तुम्हाला  कंटाळा येऊच शकत नाही. बऱ्याच निरनिराळ्या लोकांची / किंवा ट्रॅफिकची गम्मत पहात वेळ छान जातो.

पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. काही फिरंगी लोकं घेऊन एक बाई आल्या होत्या आणि त्या  सगळ्यांना ही वर्ल्ड हेरीटेज असलेली इमारत दाखवत होत्या. आपसूकच माझी पण  ट्रॅफिककडे पाठ झाली आणि मी  पुन्हा सिएसटी च्या इमारती कडे (खरं सांगायचं तर त्या  फिरंग्यांकडे  🙂 )  पाहू लागलो. समोरच कोळशाच्या इंजिन्स मधे पाणी भरण्याचे दोन पाईप शोभे करता लाऊन ठेवलेले आहेत. नुकतीच ही इमारत स्वच्छ करण्यात आल्याने कमानीवर वापरलेल्या दगडांचे वेगवेगळे रंग उठून दिसत होते. जेवायला बसावं, आणि आकस्मित पणे एखाद्या चिंबोरी मधे एक सुंदर सा मोती निघावा तसे झाले होते माझ्या बाबतीत. ब्रीटीश काळापासून लावलेल्या काचेची रंगीत कलाकुसर केलेली तावदाने सुंदर दिसत होती. तसेच काही दगडाच्या कोरीव  जाळ्या पण लक्ष वेधून घेत होत्या. “द ग्रेट इंडीयन पेनिनसुला “चा लोगो (भारतीय रेल्वेचे ब्रिटीशकालीन नांव होते ते) दिमाखात इमारतीच्या समोरच्या  दर्शनी भागात कोरलेला दिसत होता.

खरं सांगायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे माझे लक्ष गेले  ते केवळ साईटसिइंग करता आलेले फिरंगी ह्या इमारतींचे फोटो काढत होते म्हणून माझं पण कुतुहल चाळवल गेलं, नाहीतर मी सुद्धा इकडे तिकडे  बघत   वेळ काढला असता. गाईड असणारी तरूणी सांगत होती की ही इमारत केवळ दहा वर्षात बांधून झालेली आहे, आणि बांधकाम करतांना सिमेंटचा वापर अजिबात करण्यात आलेला नाही वगैरे वगैरे.

vt station, world heritage

पितळेची पाटी वर्ल्ड हेरीटॆज म्हणुन लावलेली.

समोरची मुंबई महापालिकेची इमारत पण सारखी लक्ष वेधून घेत असते. सीएसटी समोरचे कंपाउंड पण लोखंडी ग्रील चे आणि ब्रिटीशांच्या काळापासून चे आहे, तरीही अद्याप त्याचा डौल काही काही कमी झालेला नाही. त्याच कंपाउंडवर  असलेला एक बोर्डावर युनिस्को ने या इमारतीला संरक्षित स्मारकाचा दर्जा ( वर्ल्ड हेरीटेज ) दिल्याची पितळी पाटी समोर लावलेली दिसत होती.  पाटी व्यवस्थित चकाकत होती, ब्रासो ने पॉलीश केल्यामुळे. त्या पाटीचा फोटो काढण्यात सगळे गुंतलेले पाहून मग मी पण सेल फोनने एक फोटो काढला.

तेवढ्यात दर्शनी भागाकडे लक्ष गेले, आणि तिथली ’एक रिकामी जागा ’ लक्ष वेधून घेत होती. वर  दगडी छत्री, खालती पण एक दगडी बेस असलेली ती रिकामी जागा का सोडली असेल बरं?? त्या गाईडला   विचारावे म्हणून तिला एक्सक्युज मी म्हंटले, तर काय हा काळा माणूस माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय म्हणून किंचित रागाने आणि तुच्छतेने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले तिने, आणि आपल्या बरोबर असलेल्या त्या फिरंगी पाहुण्यांना घेऊन निघून गेली. मी एकदा स्वतःकडे पाहिले, आपण अगदीच काही वाईट दिसत नाही , कारण   मिटींग असल्याने काळी पॅंट पांढरा शर्ट ,हातात सॅमसोनाईटची सॅक. इतका वाईट नव्हता अपीअरन्स! स्वतःशीच हसलो, की अजूनही त्या ब्रिटीश धार्जिणा मनोवृत्तीचे किती गुलाम आहोत आपण नाही? केवळ गोऱ्यांसोबत ती होती म्हणून तिला काळ्यांशी बोलायची पण इच्छा होत नव्हती.. असो!अजून पुढल्या किती पिढया हीच मानसिकता घेऊन जगणार आहेत कोण जाणे!

या फोटो मधे लाल रंगात केलेला चौकोन जो आहे त्याच जागी पुर्वी राणीची मुर्ती होती.

हे सगळं होई पर्यंत १० एक मिनिटं झाली असतील. अजूनही माझा मित्र पोहोचलेला नव्हता. मुद्दाम त्या इमारती कडे निरखून पाहिले, आणि तिचे सौंदर्य एकदम नजरेत भरले. आजपर्यंत इतक्या वेळेस येऊन गेल्यावर पण  न दिसलेले रंगीत लाल आणि काळ्या दगडांनी साधलेली रंगसंगती, आणि मगराचे पुतळे.. सगळं काही नीट पाहिलं. काचेच्या तावदाना वरच्या नक्षी काम बघून वाह ! म्हणून शब्द तोंडातून निघाला.

समोरच  एक रेल्वेचा पोलीस उभा होता. हातामध्ये घेतलेली मशिनगन, खाकी स्मार्ट युनीफॉर्म, आणि त्यावर असलेली शिंदे हया मराठी नावाची पाटी! नमस्कार! शिंदेंशी बोलणे सुरु केले. शिंदे पण तसे कंटाळलेलेच दिसत होते. अहो दिवसभर गेट वर हातात मशिनगन घेऊन उभं रहायचं म्हणजे काय चेष्टा आहे की काय? कंटाळा हा येणारच!

त्या इमारतीवरची ती  रिकामी जागा मात्र  मला खूप अस्वस्थ  करीत होती. शिंदेंना विचारले, तर ते  म्हणाले, की ब्रिटीशांच्या काळात  त्या जागेवर  राणी व्हिक्टॊरीयाचा पुतळा होता पण काढून टाकण्यात आला, आणि त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचे ठरवले होते, पण युनेस्कोच्या नियमा प्रमाणे वर्ल्ड हेरीटॆज असलेल्या इमारतीचा दर्शनी भाग ( एलीव्हेशन) बदलता येत नाही म्हणून तिथे शिवाजी महाराजांचा  पुतळा लावण्याचे कॅन्सल करण्यात आले.  ही गोष्ट ऐकली आणि संताप आला, ठरवले की हा मुद्दा आपण शिवसेनेच्या साईटवर आणि मनसेच्या साईटवर मांडायचा. अर्थात त्यांना माहीती असेलच … तरीही..

युनेस्को कडून मिळणाऱ्या मेंटेनन्सच्या पैशासठी  तिथे श्री शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवणे  कितपत योग्य वाटते? तो पैसा मिळाला नाही तरीही काही फारसा फरक पडत नाही,पण तिथे पुतळा मात्र बसवायलाच हवा.आपल्याच देशात शिवाजीमहारजांचा पुतळा लावायची पण जर चोरी असेल तर याला आपण स्वातंत्र्य  कसे काय म्हणू शकतो  ?

यावर जास्त काही लिहायची इच्छा नाही, फक्त ती रिकामी जागा मात्र खूप डोळ्यांना खुपत राहील या पुढे  छत्रपती शिवाजी टर्मीनस  च्या समोरून जातांना.इथे  खाली जुना   फोटो देतोय त्या मधे राणीचा पुतळा आहे बघा,निटसा दिसत नाही पण अस्तित्व मात्र जाणवते., कारण  १८९४ चा  फोटॊ आहे तो.

कार्पोरेशन मधे शिवसेनेचे लोकं असूनही हे काम होऊ शकत नाही ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे !

मुली कशा पटवाव्या…

Written by  on September 13, 2002

मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतीत. तशीही प्रत्येकाचीच इच्छा असते  एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं.

प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या   बाबतीत खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात.

प्रत्येकच मुलगा कॉलेज मधे गेला, की हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडणार असं त्याला वाटू लागतं. कधी बरोबर ट्रेक ला गेलो, किंवा कधी एकत्र सिनेमाला गेलो की स्वर्गाला हात पोहोचल्या सारखे वाटतात.

जाउ दे.. वर जे लिहिलंय ते माझे विचार आहेत.. पण …बाळ सामंतांची एक कथा वाचली होती.. की मुली कशा पटवाव्या म्हणून.  हा लेख म्हणजे प्रेम करणाऱ्यासाठी एक रेडी रेकनर होऊ शकतो , असं वाटलं म्हणून थोडक्यात इथे त्यातलेच मुद्दे घेउन लिहितोय.  आरडी मधे जशी कंडेन्स्ड कादंबरी असते तसं.

मागच्या वर्षी अवाज ने ५० वर्षं पुर्ण झाल्याबद्दल एक सिलेक्टिव्ह लेख असलेला अंक काढला होता . त्या मधे दरवर्षीचा उत्कृष्ट लेख  त्यात इन्क्लुड केला होता. त्या अंकामध्ये हा लेख वाचण्यात आला.१९६५ सालच्या आवाज मधे आली होतं हे छापून.मुळ लेख आहे १९६५ चा तेंव्हा कालानुरूप थोडे बदल केले आहेत लिहितांना.

आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मराठी कथा कादंबऱ्यांमध्ये वापरलेल्या आहेत, त्या मुळे कदाचित तुम्हाला असंही वाटेल की हे काय… हे तर सगळं माहितीये आम्हाला….
१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं, आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.

२)ट्रेनमधे भरपूर मराठी वाचनीय साहित्य घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली, तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल, आणि मग ओळख  …. वगैरे….

३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडे बघत रहा. हाउस फुल्ल चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी , ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा.. आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण आला नाही म्हणून….

आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे  मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड तरी असतो,  किंवा एखादी मैत्रीण तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.

४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट ऑफर करा..

५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत असतांना एकदम जोरात पाउस येतो, आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच आडोसा नाही, तेंव्हा प्रवास करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला  काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..

६) एखादी आपल्या घराच्या आसपास रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा. तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्या वेळाचे पण पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.

७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक, साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात जाणं सुरु करा. चेहेऱ्यावर शक्य तेवढे बावळट भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास बसला की तुम्ही इतरांसारखे नाही, तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….

८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप आवडतं.

९) टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते.

१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी. हल्ली चेहेरा ओढणीने  झाकून प्रवास करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते.

मुलींचे प्रकार  किती तरी   असतात . प्रत्येक प्रकारच्या मुलींशी मैत्री करण्याचे हातखंडे पण वेगवेगळे असतात.

१)स्कॉलर मुली, ज्या केवळ वाचन, अभ्यास यामधेच इंटरेस्ट घेतात त्या.तुम्ही पण शुन्य नंबराचा चष्मा लावून अभ्यासु आहात असा आव आणला, आणि तिला मला ते मेकॅनिक्स फारच जड जातंय हो, किंवा मला सी प्लस जरा समजत नाही, कारण माझं १२वीला व्होकेशनल नव्हतं म्हणून.. वगैरे म्हणावं आणि मदत मागावी.

२)वांड्गमय प्रेमी , अशा मुलींना पुलं , वपु, अशा लेखकांच्या फॅन असतात.यांना गटवायच असेल, तर तुमचं पण त्या विषयातलं ज्ञान भरपूर असायला हवं, जर तुम्हाला पण अशा लेखकांच्या किमान काही पुस्तकांची नावं माहिती असतील तर या प्रकारातल्या मुलींशी गप्पा मारता येतात, आणि तद्नंतर प्रेम पण करता येउ शकतं.

तुम्हाला त्या लेखकांची काही पुस्तकं तरी वाचावीच लागतील, म्हणजे कधीही डिस्कशनचा मुद्दा निघाला की तुम्हाला पण थोडं बोलता येईल त्या विषयावर. आता या मुलींना कसं ….?? तर अगदी सोप्पं आहे,तुम्ही उपरोक्त लेखकाचं एखादं पुस्तक स्वखर्चाने विकत घ्या, आणि नंतर त्याच्या पहिल्या पानावर.. स्नेही.. श्री.. तुमचं नांव.. यांना सप्रेम भेट असं लिहुन खाली त्या लेखकाची सही करा.. ते पुस्तक तिला भेट द्या.. आणि सांगा की हे लेखक माझे चांगले परिचित आहेत.त्यांनी स्वतः भेट दिलेलं हे पुस्तक तिला भेट द्याल, तर तिचा तुमच्यावरचा विश्वास, अन प्रेम नक्कीच सुयोग्य दिशेने वाढू लागेल… . आणि नंतर…….नंतर काय ते सगळं कांही तुमच्याच हातात आहे.

३) कलावंत:- या प्रकारातली जर तुम्हाला आवडणारी मुलगी असेल तर तुम्हाला, कलाकार, नेपथ्यकार, वगैरे प्रकारात प्राविण्य मिळवावे लागेल.एखादा लहानसा रोल पण त्या नाटकातला पदरी पाडुन घेता आला तर ते पण करावं , म्हणजे तालमीच्या वेळेस ऑफिशिअली तिथे जाता येईल.

जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला एखाद्या नाट्य मंडळाचा सभासद होऊन तिथे तालीमीच्या वेळेस जाणं येणं सुरु ठेवावं लागेल. रात्री उशीर झाला ( तालिमीला) की मी सोडतो ना घरी.. माझ्या बाईक वर … असं म्हणून लिफ्ट देणं.. वगैरे वगैरे.. बरेच प्रकार आहेत. सुज्ञास जास्त सांगणे न लगे..

४)खेळाडु:- तुम्ही शंभर पाऊंड वजनाचे किंवा लेंग्याची नाडी न सांभाळता येणारे असाल तर कठिण आहे. ट्रेकिंग , वगैरे प्रकारात इंटरेस्ट असणं आवश्यक आहे . ट्रेक ला गेल्यावर आपण कचरा वगैरे कसा आपल्या बॅगेत भरुन खाली आणतो, आणि मग ड्स्ट बिन मधे फेकतो आणी निसर्ग वाचवण्यास हात भार लावतो हे रंगवून सांगा. आणि लिंगाणा सर केला होता ना…. तेंव्हा अशी सुरुवात करा…. म्हणजे ह्या प्रकारच्या मुली लवकर मैत्री करतील.

५)चित्रपट प्रेमी:- अशा प्रकारच्या मुलींची अजिबात कमतरता नसते. विद्वान ब्राह्मणा प्रमाणे, कुठल्या चित्रपटात कोणी काम केलं कोणाचं संगीत आहे, हिरोच्या लहान भावाचं नाव, किंवा होरोइनच्या बहिणीचा वाढदिवस वगैरे माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रपटातल्या हिरो , हिरोइन्स ची नावं अगदी संध्येतल्या चोविस नावाप्रमाणे पाठ असायला हवित.

केंव्हाही कधीही सिनेमा पहाण्याची तयारी आणि एक्स्ट्रा तिकिट यांचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. एखादा खूप गाजलेला सिनेमा जेंव्हा रिलिझ होतो तेंव्हा दोन तिकिटं रांगेत उभं राहुन ऍडव्हान्स बुक करुन ठेवावी.. आणि तिला पण चलतेस का म्हणून विचारलं, तर ती १०१ टक्के हो म्हणणार याची खात्री देतो मी. अशा तर्हेने ओळख वाढवा…!

६)वर्गभगिनी:- हिच्या कडे वर्गातल्या बऱ्याच बांधवांचं लक्षं असतं. तेंव्हा तुमचा नंबर इथे लागण जरा कठिणच , पण काही झालं तरीही प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. असंही  होऊ शकतं म्हणून प्रयत्न सोडु नये.

७)शेजारीण: – शेजाऱ्यावर प्रम करा हा येशु चा संदेश आहे हे खरं, पण शेजारच्य सुमीची आई पण डोळ्यात तेल घालुन तिच्यावर नजर ठेऊन आहे हे विसरू नका.तसेच इतर शेजारी पण तुमच्यावर नव्हे तर तिच्यावर कायम नजर ठेउन असतात, तेंव्हा तुमची प्रत्येक स्टेप ही कमित कमी दहा लोकं पहाणार आहेत हे लक्षात घेउनच स्टेप्स घ्या.तुम्ही काळजी पूर्वक पणे या प्रश्नाचा ध्यास घेतलात तर हा प्रश्न सुटू शकतो अगदी चुटकी सरशी…

८)कचेरीतली सहकारी:-यावर काही लिहायची गरज आहे असं वाटत नाही.आपण सगळे जाणकार आहातच ,काय?? बरोबर नां?

९) मित्र भगिनी:- हे फारच अवघड  नातं असतं.जर तुम्हाला सुंदर बहीण असेल , तर इतर मुलं तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला सिनेमाचे पास, नाटकाचे पास, वगैरे देतील, तुमच्या घरी येण्यासाठी काहीही करायला तयार असतील. हा प्रकार जरा डेंजरसच असतो. तेंव्हा सांभाळुन..

ओळख कशी वाढवावी??   आजकालच्या तरुणांना याची काहीच गरज नसावी.तरी पण, एकदा ओळख झाली की मग.. थापा मारणे सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्राणा पलिकडे प्रेम आहे, लाडके, तु माझी झाली नाहिस तर जीव देईन, चल आपण पळून जाउन लग्न करु, इत्यादी प्रकारचे डायलॉग्ज वेळोवेळी ्बोलत रहाणं प्रेम बहरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे

भेटण्याच्या जागा? चला प्रेम तर जमलं.. आता भेटायला जागा कुठल्या? या मधे ्खूप जागा असु शकतात. पण ज्या सर्व मान्य जागा आहेत, त्या म्हणजे बागा, आर्ट गॅलरीज, चाळीतली गॅलरी, बस स्टॉप , र्लोकलचा प्लॅटफॉर्म, चाळीचा जीना, बॉक्स.. ( हल्ली हा नसतो, पण पुर्वी बॉक्स हा पण एक क्लास होता सिनेमा चा जिथे केवळ दोघांची बसण्याची सोय असायची) समुद्राचा किनारा, आरे कॉलनी चा छोटा काश्मिर अशा अनेक जागा जाणकार लोकं सांगु शकतील.

मी स्वतःचा अनुभव सांगतो, नागपुरमधला असा एकही बगिचा नाही की जिथुन आम्हाला हाकललेलं नाही.. !!! असो!!! वरचा लेख  तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे.

तर मंडळी आता कामाला लागा लवकर.. !!!

कालभैरवाय नमः

Written by  on September 9, 2002

6 monkeyएके दिवशी संध्याकाळी सगळीकडे गॉसिपिंग सुरु झालं की गणपती दूध पितो.. आणि मग काय सगळे लोकं निघाले हातातली कामं सोडून गणपतीला दुध पाजायला. टिव्ही चॅनल्स ला तर एक नवीन ब्रेकिंग न्यूज मिळाली होती. आपले मुख्य मंत्री पण टिव्ही वर दाखवले आणि त्यांनी पण सांगितलं की त्यांच्या पण गणपतीने दुध प्यायलं !!!हा चमत्कार पहायला मी पण गेलो होतो दुधाची वाटी घेउन. पण गणपती काही दुध प्यायला नाही माझ्या हातून. पण काल दारु मात्र प्यायला कालभैरव माझ्या हातून,

उज्जैन ला पण कांही कामासाठी जाणं झालं. काम झाल्यावर परतीच्या वाटेवर महांकाल  मंदिर आहे  . महाकाल म्हणजे  महादेवाचं.. इथे या महादेवाला रोज सकाळी ४ वाजता भस्मारती होते. दररोज नवीन चिता भस्म लागतं महादेवाला. आमचा मित्र शर्मा म्हणाला, उज्जैनला हा एक वरदान आहे की रोज एक तरी माणुस मरेल आणि त्याचं चिता भस्म महांकाल देवाला मिळेल असा आशीर्वाद आहे उज्जैनला. म्हंटलं शर्मा जी हे वरदान आहे की शाप?

ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात अजिबात गर्दी नव्हती अगदी दहा मिनिटात आम्ही दर्शन घेउन परत बाहेर आलो. बाहेर आल्यावर म्हंटलं शर्माजी  चला आपण कालभैरवाला पण जाउन येऊ.प्रत्येक वेळेस उज्जैनला आलं की फक्त महाकालाचं दर्शन घेतलं जातं आणि काल भैरवाचं दर्शन घ्यायचं राहुन जातं. तसं काही फार दुर नाही ते कालभैरवाचं मंदिर. जास्तीत जास्त ३ किमी असेल..इथे जाण्याचं मुख्य कारण म्हणजे इथला काल भैरवाची मुर्ती दारु पिते …. खरंच!॒

स्कंध पुराणातील गोष्टी नुसार हे काल भैरवाचं मंदिर अर्वाचीन काळा पासून आहे. वेळोवेळी केलेल्या जीर्णोध्दारामुळे याची स्थिती फारच चांगली आहे.

पूर्वीच्या काळी उज्जैन हे अवंतिका नगरी म्हणुन ओळखलं जायचं. ब्रह्म देवाने चार वेद निर्माण केले, सृष्टी निर्माण केली आणि नंतर त्याला काहीच काम नव्हतं, म्हणून त्याने पाचव्या वेदाचं  लिखाण सुरु केलं. सगळ्या देवांनी त्याला सांगून पाहिलं की अरे ब्रह्मा, पाचव्या वेदाची काहीच गरज नाही , तेंव्हा तु हे काम थांबव.. पण ब्रह्म देव काही ऐकायला तयार नव्हते.

शेवटी सगळे देव भगवान महादेवाकडे गेले. महादेवाला त्यांनी सगळी गोष्ट सांगितली , आणि विनंती केली की ब्रह्माला थांबवा म्हणून. महादेवाने पण सांगितल्यावर ब्रह्मदेवाने पाचवा वेद लिहिणं थांबवलं नाही.

महादेवाला राग आला..आणि त्याने तिसरा नेत्र उघडला.. त्यातुन निर्माण झाला हा कालभैरव. कालभैरवाने ब्रह्माचे पाचवे मस्तक कापून काढले आणि ब्रह्माला थांबवले पाचवा वेद लिहिण्या पासुन.

नंतर मग ब्रह्म हत्येचं पातक  जावं म्हणून इथे क्षीप्रा नदीच्या किनारी येउन त्याने शिवाची आराधना केली , आणि मुक्ती मिळवली..पुरातन काळापासुन कालभैरवाची पुजा ही “पंच मकार” म्हणजे मद्य , मांस, मैथुन (आणि इतर दोन मला माहीत नाहीत )ने केली जाते. पण आजकाल फक्त मद्यच चढवलं जाते कालभैरवाला.

कालभैरवाच्या मंदिराच्या जवळ आम्ही पोहोचलो.सगळे फुलवाले मागे लागले, चप्पल काढुन ठेवा, कार इथेच पार्क करा म्हणुन. एका ठिकाणी कार पार्क करुन फुलं घ्यायला गेलो.फुलवाला अगदी फुल टू टुन्नं दिसत होता.म्हणाला, २० रुपयात फुलं घ्या.. आणि दारुचे .. ४० रुपये.   कालभैरवाची ्पूजाकरतांना त्यासाठी दारु लागते.

दारुचे दुकान ,अगदी आपलं फुलांचं असतं नां तस्संच आहे इथे.. सगळ्या बाटल्या रांगेने मांडून ठेवल्या होत्या.इथे सगळे ब्रॅंड्स अव्हेलेबल होते. आम्ही एक माहित नसलेला कुठला तरी एक ब्रॅंड घेतला. आणि मंदिरत शिरलो.तिथे सेल फोन आणि कॅमेरा अलाउड नाही म्हणून पाटी दिसली. मुकाटयाने आपला सेल फोन बंद केला.

मंदिर नेहेमीच्याच मंदिरा प्रमाणे आहे. मंदिराबाहेर, जसा महादेवा समोर नंदी असतो तसाच इथे एक कोल्हा, की लांडगा असतो. त्या लांडग्याला पण झुल चढवलेली होती.मंदिराच्या गर्भागरात गेलो. दोन माणसं .. ती दोघंही  बेवडेच दिसत होते.. त्यांना पुजारी म्हणणं म्हणजे पुजारी शब्दाचा अपमान म्हणावा लागेल. आम्ही ती फुलांची परडी आणि दारुची बाटली त्या पुजाऱ्याच्या हातात दिली. पुजाऱ्याने तिथलीच एक थाळी ( ६ इंच व्यासाची) घेतली आणि त्यामधे आम्ही दिलेली दारु ओतली. आणि बशीत ओतून ज्या प्रमाणे चहा पितात तशा प्रकारे त्या मुर्तीच्या तोंडाला लावली. सगळी दारु त्या मुर्तिच्या तोंडात गेली, आणि ती प्लेट रिकामी झाली. चमत्कार झाल्याप्रमाणे मी पहात होतो. व्हिडीओ घ्यायची खुप इच्छा होती पण परमिशन नाही.. म्हणून राहुन गेलं..

समोरच एक तिर्थाचा तांब्या होता. त्या तांब्यात पण त्याने थोडीशी दारु ओतुन घेतली आणि उरलेली दारुची बाटली आमच्या हातात दिली..

समोर जे कांही सुरु होतं ते एक अतर्क्य आणि अगम्य होतं. गुढ कथेप्रमाणे तिथलं कुंद वातावरण होतं आम्ही बाहेर आलो.. आणि दिपमाळेशेजारी बसलॊ. हातामधे  ती प्रसादाची देशी  दारुची अर्धी बाटली आमच्या हातात होती. समोरचं देवाला वाहिलेली फुलं पडलेली होती. त्यावर एक खारुताई मजेत बागडत होती. एक माकडीण आपल्या पिल्लाला घेउन बसलेली होती.तिच्या समोर एका भक्ताने टाकलेले प्रसादाचे दाणे खाण्यात मग्न होती.

बाजुला बरेच भिकारी बसले होते, साधूच्या वेशात. मला नेमकी ह्याच गोष्टीची चीड आहे. भिक मागायची तर भिकाऱ्याच्या वेशात मागा नां.. पण हे लोकं साधू प्रमाणे रहातात आणि भिक मागतात. एक गोरी मड्डम पण तिथे होती. तिला आणि तिच्या साथिदाराला सगळ्या भिकाऱ्यांनी घेउन ठेवलं होतं.. तीचे कपडे दोन बोटात पकडून ओढून तिचं लक्षं आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करित होती. हे सगळ पाहिलं आणि खुप संताप आला . शर्माजी अरे साहब.. क्या कर रहे हो… म्हणे पर्यंत मी रागाने समोर पोहोचलो, आणि त्या भिकाऱ्यांवर जोरात ओरडलॊ , म्हंटलं ये लोक मेरा गेस्ट है.बदतमिजी करोगे तो पुलिस बुलाउंगा…. आणि त्या दोघांना पण बाहेर घेउन गेलॊ, अगदी कृतज्ञतेने पहात आणि थॅंक्स म्हणुन ते निघुन गेले. आमची गाडी पण त्यांच्या पाठोपाठ काढली आणि आम्ही पण इंदौरला निघालो..

त्या दारुड्या फुलवाल्याचा व्हिडीओ पण काढलाय.. पण तो इथे नंतर म्हणजे शनिवारी पोस्ट करीन.

Video Uploaded