कौतुक

Written by  on July 18, 2002

महेन्द्र, mahendraस्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून घेतो.
प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या स्वभावात अगदी सारखी असते ती म्हणजे आपल्याला आपले कौतूक केलेले खूप आवडते.  दोन वर्षाच्या चिंगी पासून तर ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत. चिंगी, “तुझे बुटू किती छान आहेत गं ”  , किंवा “तू किती सुंदर आहेस गं”.. म्हटले की चिंगी खूष होते,तसेच एखाद्या ८०वर्षाच्या आजोबांना तुमची तब्येत खूप छान आहे हो असे म्हंटले की ते  खूश होतात.. थोडक्यात काय तर  प्रत्येकालाच आपले कौतूक केलेले आवडते.

आपले  जे वागतो ते पण बरेचदा केवळ इतरांनी आपले कौतूक करावे , आपल्याला चांगले म्हणावे म्हणूनच असते  . बायकोने स्वयंपाक केल्यावर ” छान झाली आहे भाजी” असे म्ह्टले की तिला भरून पावते, त्या पेक्षा जास्त तिची अपेक्षा  पण नसते.  ऑफिस मधे एखादे काम   केल्यावर बॉस ने दिलेली कौतुकाची थाप नक्कीच सुखावून जाते .जर कोणी कौतुक करणारे नसेल तर काय फायदा हो  कामं करण्याचा?

कौतूक बरेचदा आपल्याला इतरांकडून हवे असते. आपल्या लोकांकडून नाही. नाही पटत?? उदाहरणार्थ घरात कळकट गाऊन घालून दिवसभर बसणाऱ्या  बायका   तयार होतात  ते केवळ बाहेर निघतांना, कौतुकाची नजर हवी असते ती बाहेरच्या लोकांकडून नवऱ्याकडून नाही, आता काही स्त्रिया म्हणतील, की नवऱ्याच्या  कौतुकाच्या नजरेत स्वार्थ दिसतो 🙂 असो.. विषयांतर होतंय.

मी हे लिहितोय म्हणजे मी पण काही वेगळा नाही. मला पण कौतूक खूप आवडते. मग ते अरे बारीक झालास रे थोडा. असे जरी कोणी म्ह्टले तरी मला आनंद होतो.  ब्लॉग वर पण काही तरी लिहिल्यावर कौतूक व्हावे असे वाटत असतेच, किंबहूना मी लिहितो ते पण केवळ माझे कोणी तरी कौतूक  करावे म्हणूनच!   केवळ याच कारणासाठी आपण काही लिहिले की ब्लॉग ची लिंक मी चार – दोन गृप मधे आणि स्वतःच्या भिंतीवर लटकवत, सोबतच ही जाहिरात नाही हे बिरुद चिकटवायला पण कमी करत नाही

जर एखाद्या व्यक्तिने  आपल्या लेखाचे अपेक्षे प्रमाणे कौतूक केले नाही की मग थोडी चाहूल घेतो, की ह्याने लेख वाचला की नाही आपला?  नाही असे वाटले तर लिंक मेल करतो. नंतर तरीही त्याची रिऍक्शन आली नाही तर फोन करून विचारतो , ” की काय रे लेख वाचला की नाही?”  बरेचदा तर मित्रांच्या पोस्ट वर आपल्या लेखाची लिंक पोस्ट करून इतरांच्या फेसबुक भिंती रंगवण्याचे कामही मी कधी कधी करत असतो.

आपण लिहिलेला एखादा जुना लेख आपल्यालाच खूप आवडलेला असतो, पण त्या लेखाचे फारसे कौतूक झालेले नसते, किंवा कोणी “लेख जमलाय बरं का” असेही फारसे म्हटले नसते, तोच लेख पुन्हा पुन्हा फेसबुक मधे मित्रांच्या  भिंतीवर चिकटवून खरंच  लेख जमलाय की नाही याची चाहूल घेण्यासाठी नाही तर कौतूक करून घेण्यासाठी पोस्ट करतो मी बरेचदा.  म्हणजे काय,   कौतूक  व्हावे म्हणून लिहितो मी.

आत्म समाधान किंवा मला वाटतं म्हणून  मी “काय वाटेल ते “लिहिले असते, तर कौतुकाची अपेक्षा केली असती का? एखादा लेख कोणी वाचला नसेल तर ” अरे माझा तो लेख वाचलास की नाही?” असे विचारून त्याने वाचे पर्यंत पाठपुरावा   म्हणजे  माझा लेख वाच आणि माझे कौतूक कर, छान झालाय म्हण” ही आंतरिक इच्छा लपवून …………….!  किती दांभिक पणा नाही का ?

हे आयुष्य आहे ते आपण जगतोय ते केवळ पाठीवरच्या कौतुकाच्या थापे साठी! लहान मुल जेंव्हा स्वतःच्या पायावर पहिल्यांदा उभे रहाते, तेंव्हा आई नजरेतले कौतुक त्याला नक्कीच समजते. शाळेत सरांनी केलेले सुंदर हस्ताक्षरा बद्दलचे कौतूक , एखाद्या मैत्रिणीने अरे वा.. मस्त आफ्टर शेव्ह आहे रे म्हणून केलेले कौतूक, नवीन बाईक घेतल्यावर नाक्यावर बाईक घेऊन गेल्यावर मित्रांनी केलेले बाईकचे कौतूक, लग्न झाल्यावर बायको सोबत बाहेर निघाल्यावर नातेवाईकांनी/ मित्रांनी बायकोचे केलेले कौतूक, मुलीचे इंजिनिअरींग पुर्ण झाल्यावर जसे काही आपणच काही तरी मिळवले आहे असे समजून स्वतःचे करून घेतलेले कौतूक…. असे अनंत प्रकार आहे. शेवटी काय तर ह्या आयुष्याचा सगळा पायाच ह्या कौतुकावर अवलंबून आहे.

लेख लिहिलाय बरेच दिवसापूर्वी पण पण पोस्ट करायची इच्छा होत नव्हती. आज सहज ड्राफ्ट चेक केले तर हा लेख दिसला आणि पोस्ट करतोय आज..

दिल ढुंढता है..

Written by  on July 17, 2002

this is what i wanaa do.हे गाणं कधीही ऐका.. माझं खुप आवडतं गाणं आहे हे. कधीही लावलं तरीही आपले ते “फुर्सत के” दिन आठवतात. ’मी’च नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक माणुस स्वतःला या गाण्याशी कोरिलेट करतो.. मला तर सारखं वाटत असतं की ’ते’ दिवस  … कुठे गेले ? अजूनही ५ डेज alibaghअ विक आहे. पण बहुतेक शनिवारी किंवा रविवारी कांहीतरी काम निघतच- आणि ते पण न टाळता येण्यासारखं..!  😦

कधी प्लान करावा की अगदी कांहीही न करता बसून रहावं, त्या कंटाळा ब्लॉग वरच्या कुत्र्या सारखं.. एक लेख होता त्या ब्लॉग वर.. माणुस बसलाय , हातात सिगारेट आहे पण ओढत नाही, डोळॆ उघडे आहे पण पहात नाही वगैरे वगैरे.. मला ते पोस्ट जरी विनोद म्हणून पोस्ट केलेले असले तरीही अगदी मनापासून आवडले होते.

आता हेच बघा ना, धाकट्या मुलीला उद्या क्लासला सुटी आहे, तर तिच म्हणणं होतं की उद्या एस्सेल वर्ल्ड ला जाउ , पण नेमका आत्ताच एक फोन आला, की सोमवारी सकाळी ८ वाजता एन एस आर वाय कारवार ला एक मिटींग आहे. आता सकाळची ८ ची मिटींग म्हणजे रविवारी संध्याकाळच्या फ्लाइटने जावे लागणार, म्हणजे रविवारची वाट लागली, म्हणजे रात्री डिलरसोबत डिस्कशन्स करुन दुसऱ्या दिवसाच्या मीटिंगची स्ट्रॅटेजी तयार करता येईल. त्याचा पण रिसेंटली ऍक्सिडॆंट झाल्यामुळॆ व्हिल चेअरलाच चिकटून आहे तो, त्यामुळे त्यालाही भेटणं आवश्यकच आहेच.

हा डिलर माझा अगदी जुना मित्र. जेंव्हा मी नर्मदा प्रोजेक्टवर काम करायचो, तेंव्हा पासून हा मित्र.मुळचा गोव्याचाच! पण तेंव्हा दिल्लिच्या एका कंपनित काम करायचा. नंतर आमचा डिलर झाला गोव्याचा. अतिशय सॉफ्ट स्पोकन आणि  मनमिळाऊ गोंयकर..

तरीही कधी तरी कामाच्या राम रगाड्यातुन थोडा वेळ काढून स्वतःसाठी वेळ काढण्याचा.. किंवा ’ स्व’ बरोबर रहाण्याचा एक प्रयत्न प्रत्येक जण नेहेमीच करित असतो.  मग सुरु होतं लहान लहान गोष्टींच्या मधे आनंद शोधणं.

मुरुड हुन निघालो आणि दिघी ला पोहोचलो. कोंकणातल्या लोकांचा या पोर्ट ला विरोध आहे, कां?? तर म्हणे काम सुरु केल्यापासून धुळ खूप उडते. मला साईटला जायला रीक्षापण मिळत नव्हती. मोठ्या मुश्किलीने एक रिक्षावाला तयार झाला. एखाद्या एरियाची डेव्हलेपमेंट लोकांना कां नको असते हे मला कधीच कळू शकलेलं नाही.?????  ते गॉड फॉरसेकन गांव की जिथे कोणीही जात नाही, त्या ठिकाणी तयार झाल्ल्यावर तिथल्या लोकांना पण रोजगार उपलब्ध होइल.. पण नाही!!!!!!! पोर्ट नको म्हणताहेत गांवकरी. अर्थात त्यांना मॅनेज करुन काम सुरु आहेच पोर्ट चं.

footदिवस पुर्ण साईटवर घालवला. आणि संध्याकाळी मुरुडहून निघालो. मुरुड ते अलिबागचा सुंदर रस्ता.. आणि कार मधे ’स्व’ बरोबर ’मी’ . मस्त वेळ जात होता. आता हे अंतर आहे फार तर १५० किमी  पण रस्त्यामुळे जरा जास्तच वेळ लागतो. अलिबाग पर्यंतचा रस्ता अगदी समुद्राला समांतर. निसर्गाच्या निरनिराळ्या छटांची झालेली उधळण मन वेधून घेत होती.नारळी पोफळीची झाडं.. आणि समुद्र.. !मधेच एखादं चुकार आंब्याचं झाड पण दिसायचं . मुकुट काढलेल्या राजा सारखं.. कारण आंबे संपलेत ना आता!

डाव्या साईडला समुद्राच्या पांढऱ्या शुभ्र रे्तीवर झाडांच्या पानांनी शाकारलेली एक झोपडी (शॅक) होती. तिथे सुंदर पाळणा बांधला होता. त्या मामाला कांदा भजी आणि अंडा भुर्जी बनवायला सांगितलं. दिवस भराचा थकवा आणि रेती पायाला मस्त वाटंत होती. थोडा वेळ समुद्राच्या पाण्यात पाय बुड्वून आलो मला वाटतं कमीत कमी अर्धा पाउण तास तरी गेला असेल-पायाखालची रेती सरकताना मस्त वाटत होतं.. इथे बराच वेळ पाण्यामधे उभा राहिलो..  .

मग त्या झोपडीतल्या पाळण्यावर पहूडलॊ किती वेळ गेला ते समजलंच नाही समोर समुद्र -खाली रेती.. !!-

त्या मामा कडली अंडी संपलेली होती, कांदा चिरायचा होता भजी करण्यासाठी, आणि मला पण  नक्की काही आठवत नाही. पण एखादा तास तरी नक्कीच गेला असावा. हा अगदी क्वॉलिटी टाइम स्वतःच्या साठी स्वतः वापरलेला– खूप दिवसांच्या नंतर. म्हणतात ना बिझिनेस विथ प्लेझर..kantala

मला आठवतं , एकदा गोव्याला गेलो होतो कांही कामासाठी , तेंव्हा एक दिवस काम नव्हतं.. म्हणजे सुटी होती. तेंव्हा इर्विंग वॅलेस चं एक पुस्तक ( सेव्हन मिनिट्स) मी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर बसुन पुर्ण वाचून काढलं होतं एका दिवस भरात.. ( ही गोष्ट आहे २२०-२२ वर्ष जुनी) त्या नंतर पुन्हा तसा कधी वेळ मिळाला नाही.

मला हे अगदी मान्य आहे, की बऱ्याच शा गोष्टी फॅमिली मेंबर्स बरोबर पण एंजॉय करु शकतो, पण हा ’दिल ढूंढता है” सिंड्रोम विथ फॅमिली घालवलेल्या वेळानंतरही मला हॉंटींग करित असतो.

बस्स!!  . इथे एक दिवस येउन   एकटं.. एकदा इथे पुन्हा एकटं यायचं आणि दिवसभर अस्संच पाळण्यावर लोळत किंवा समुद्रात डुंबत दिवस काढायचा.. सौ. मुलीसोबत माहेरी गेली की… 🙂

मारिओ

Written by  on July 11, 2002

MARIOमारीओ हा गेम खेळला नाही असा माणुस विरळाच. तुम्ही अगदी कुठल्याही एज ग्रुप मधले असाल तरीही हा गेम तुम्ही निश्चितच कधी ना कधी खेळले असाल .ह्या केवळ ५० केबी च्या गेम ने एके काळी सगळ्यानाच अगदी वेडं करून ठेवलं होतं.

मी अगदी पहिल्यांदा हा गेम खेळलो तेंव्हा हा एका कॅसेटमधे अव्हेलेबल होता. कंप्युटर व्हर्शन नंतर आलं.  (खरी गोष्ट सांगायची तर १९८७ मधे कम्प्युटर इतकं कॉमन झालेलं नव्हतं.कम्प्युटर नसल्यामुळे गेम्स खेळायला कन्सोल निघालं होतं मार्केटला.)माझ्या कडे एक व्हिडीओ गेम    होता -मारिओ, जो कॅसेट्स वर चालायचा.तेंव्हा हा गेम खेळायला जे पॅड्स होते ते  एका वायरने जोडलेले असायचे कन्सोलला.एकंदरीत जरा क्लम्झी होतं सगळं  प्रकरण. .

पिएस२ हल्ली फक्त ५ ते ६ हजारात मिळतं. आणि त्यावरच्या गेम्सच्या सिडी’ज पण अगदी स्वस्त ( अर्थात पायरेटेड) अगदी स्वस्त अव्हेलेबल आहेत. त्या मुळे  पीएस २ हा खुप पॉप्युलर गेम आहे. मी जे कन्सोल रेफर करतोय त्या गेमची किंमत फक्त १००० -१२०० रुपया पर्यंत अजूनही आहे. आता मात्र  एक्स बॉक्स आणि पी एस ३ च्या जगात पण हा गेम कन्सोल किती दिवस  टीकून रहातो हे पहायचं. असं वाटतं की  आता हा गेम कस्नोल इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.

मी जेंव्हा हा गेम विकत घेतला होता, ( १९८७ साली) तेंव्हा हा गेम म्हणजे अगदी मोस्ट सॉट  फॉर गॅजेट होतं. ह्याच्या किमती अगदी २२०० ते ४००० रु पर्यंत होत्या. म्हणजे तुम्हाला जर शुटींग गेम खेळायचा असेल तर लेसर गन साठी वेगळे पैसे द्यावे लागायचे. रेसिंग गेम खेळायला स्टेअरिंग व्हिल वेगळं मिळायचं. पण ते मी घेतलं नव्हतं.सगळॆ गेम्स हे डॉस बेस्ड होते.

ह्या कन्सोल वर खेळायला मिळणाऱ्या कॅसेट्स ची नांव.. १००० इन १ ( म्हणजे हजार गेम्स एका कॅसेट मधे) किंवा तत्सम असायचं . अर्थात खरोखर हजार गेम नसायचे, फक्त एकाच गेम्सचे बरेच व्हेरिएशन्स असायचे त्यात.

सगळ्यात जास्त आवडता गेम म्हणजे मारीऒ.. हा अतिशय ऍडीक्टीव्ह गेम आहे/होता. मी अगदी तासन तास खेळत बसायचे हा गेम.सौ. अक्षरशः चिडायची . पण मी थोडा नादीष्ट्च आहे 🙂 कदाचित म्हणूनच असेल जेंव्हा हा गेम चोरीला गेला तेंव्हा ती मात्र खुश झाली होती. कदाचित माझा छंदिष्ट पणा  हेच कारण असेल की मला ती अजूनही पिएस३ घेउ देत नाही.

आणि या सोबतच माझा दुसरा आवडता गेम म्हणजे ’कॉंट्रा’ ! हा गेम पण मी नेहेमी खेळायचो. टेट्रिज काही फारसे आवडत नव्हते, तरी पण कधी तरी खेळायचो. मारीऒ नंतर सुपर मारिओ ची पण कॅसेट आणली होती पण त्या गेम मधे असलेल्या बग मुळे गेम नेहेमीच हॅंग व्हायचा.

कम्प्युटरवर गेम खेळणं हे पण माझं आवडतं काम.या मधे फ्री डाउन लोडेबल गेम्स बरेच खेळलो, पण सगळ्यात जास्त आवडता गेम म्हणजे “क्लॉ”. हा गेम मी जवळपास ९ महिने खेळत होतो. वन ऑफ द बेस्ट गेम्स ! ह्या गेमची सिडी लावुन मग खेळावं लागायचं. अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचलो होतो. फक्त शेवटचे कांही वर्ल्ड्स बाकी होते.. असो.. पण नंतर सिडी खराब झाली आणि गेम सुटला. सिडी कशी खराब झाली हे मात्र अगदी गौडबंगालच आहे.

मारीओ हा गेम फक्त ५० केबी चा गेम आहे आणि नेटवर अव्हेलेबल आहे. डॉस गेम्स डॉट कॉम ह्या वेब साइटवर बरेच फ्री डाउन लोडेबल गेम्स आहेत. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.dosgames.com/) जर तुम्ही पण डॉस गेम्सचे चाहते असाल तर या साइटला भेट ही दिलीच पाहिजे. चार्ली द डक हा पण गेम याच ठिकाणि आहे. लहान मुलांना हा गेम खूप आवडतो. तसेच सांता , आणि … अहो हे सगळं मी सांगण्या पेक्षा तुम्हीच का भेट देऊन डाउन लोड करित नाही हे गेम्स?

वॉशिंग मशिन दुरुस्ती -एक वर्स्ट नाईटमेअर…

Written by  on July 11, 2002

Samsung_WA85HAGअहो…………… खूप मोठा पॉज. अरे ऐकतोयस नां… त्या वॉशिंग मशिनचं बघ काहीतरी.. आमच्या कडे आजपर्यंत गेल्या १५ वर्षात ३ वॉशिंग मशिन्स बदलून झाल्या . अगदी पुर्वी म्हणजे सुरुवातीला जेंव्हा व्हिडीओकॉन चं युग होतं, तेंव्हा आम्ही एक व्हीडीओकॉन वॉशिंग मशिन घेतली होती ट्विन टब. तिने आपली अगदी इमाने इत बारे ७-८ वर्ष सेवा दिली. नंतर एकदा ती बिघडली !

आणि नेमकं त्याच दिवशी व्हर्लपुलची जाहिरात होती.. हाथो जैसी धुलाईके लिए.. व्हर्लपुल व्हर्लपुल… अशी जाहिरात  बघून सौ.च्या मनावर खूपच परिणाम झालेला होता. आणि आपण आता तीच घेउन टाकू या, कारण ही असलेली मशिन पुन्हा दुरुस्त करण्यात पैसे खर्च करण्यापेक्षा नवीन घेतली तर बरं असं आमचं दोघांचही (कधी नव्हे ते) एक  मत झालं.

तर मग व्हर्ल पुल ची मशिन घरी आली. अगदी काही दिवसातच ( म्हणजे दिड वर्षानंतर) तिचे वरचे झाकण तुटले .तो पर्यंत आम्ही मुंबईला आलो होतो. इथे आल्यावर कपडे वाळत ( की सुकत??) घालायला बाल्कनी आहे पण त्या बाल्कनीत पण पावसाचं पाणी येतं आणि सुकलेले कपडे ओले होतात,आणि कामवाली बाई व्यवस्थित कपडे पिळत नाही म्हणून कपडे रोज सुकत नाहीत, हा शोध लागल्या मुळे आता पुन्हा मशिन (दुरुस्त) ऑपरेटीव्ह करावी  लागणार म्हणजेच बदलावी लागणार  हे लक्षात आलं .

वॉशिंग मशिन मधे कपडे स्वच्छ धुतले जरी जात नसले तरी चांगले पिळले जातात हे मात्र अगदी खरं.त्यामूळे मुंबईला हे यंत्र अतिशय उपयोगाचं आहे .कपडे धूणारी बाई बरोबर कपडे पिळत नाही त्यामुळे कपडे निट सुकत नाहीत … सो , द मशिन इज मस्ट!!!हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकुन पाठ   झालं होतं माझं.

वॉशिंग मशिन मधे धुतलेले कपडे कधीच चांगले निघत नाहीत. कपड्यावरचा सगळा  मळ ( कफ्स ऍंड कॉलर्स वरचा) सगळीकडे समप्रमाणात पसरवला जातो  (मला वाटतं ही गोष्ट तुम्ही सगळेच मान्य कराल.) म्हणून कपडे धुवायला बाई, आणि पिळायला मशिन हे कॉंबीनेशन आम्ही गेली कित्येक वर्ष वापरतोय. . हाताने आपटून  धुतल्यावर जे कपडे स्वच्छ होतात तसे कशानेच होत नाहीत..

असो.. तर आता पुन्हा मशिन बदलायची वेळ झाली.व्हर्लपुलची मशिन खूपच खराब क्वॉलिटीची होती. ती बदलणे भाग होते.   आत कुठली मशिन घ्यायची बरं? सॅमसंगचा फ्रिझ ३१० लिटरचा घेतला होता ४ वर्षा पूर्वी, आणि मायक्रोवेव्ह पण सॅमसंगचाच, तो पण बरा चालला, म्हणून सॅमसंगचीच मशिन घ्यायची असं ठरलं.

विजय सेल्स मधे जाउन एकदाची फुल्ल ली ऍटोमॅटिक मशिन घेतली. ती पण मशिन ४-५ वर्ष बरी चालली, पण नंतर दैवाला आमचं सुख पहावलं नाही. आणि एक दिवस त्या मशीनने राम म्हंटलं. त्याचा इलेक्ट्रॉनिक पॅनल बंद पडला , म्हणजे प्लग लाउन बटन सुरु केलं तरीही मशीनवरचा दिवा लागत नव्हता. सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरला फोन केला, आणि सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे ते. त्यांनी कर्टली सांगितलं की आमचा माणुस येइल बघायला त्याचे चार्जेस ३५० रुपये द्यावे लागतील. म्हंटलं.. ठीक आहे.. तर तो माणुस आला एक दिवस रात्री ८ वाजता..

त्याने आपल्या हाताने प्लग काढून पुन्हा बसवला, पण मशिन काही सुरु होत नव्हती. तेंव्हा त्याने डिक्लिअर केलं की याचं पॅनल खराब झालंय आणि बदलायला ३ हजार रुपये लागतील. तो हळूच असंही म्हणाला, की जर कंपनीला सांगणार नसाल तर मात्र मी इथेच दुरुस्त करुन देईन, मला तुम्ही १ हजार रुपये द्या.. मी त्याला म्हंटलं की अरे बाबा, हे हार्डवेअर ठीक आहे , फक्त सॉफ्ट वेअर अपडेट कर, झालं… पण त्यावरचं त्याचं उत्तर होतं, की कंपनी सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी अलाउ करत नाही.. मग माझं वर्स्ट नाइटमेअर सुरु झालं.

मी स्वतः कस्टमर सर्व्हिस मधे आहे आणि आज मला चान्स मिळाला होता कस्टमर म्हणून कोणा कडून तरी काम करून घ्यायचा. नेट वर सर्च मारला, तर सॅमसंगच्या साइटवर एकाचेही नांव नाही,किंवा फोन नंबर पण नाही . एकच फोन नंबर जो दिलाय तो आहे कॉल सेंटरचा. मोठ्या मुश्किलने त्यांच्या एम डी चं नांव शोधुन काढलं, आणि त्याला इ मेल केला, नक्की इमेल आयडी माहित नव्हता, त्यामुळे रविन्दर.झुत्सी @सॅमसंग.कॉम, आर.झुत्सी @सॅमसंग.कॉम, आरजे @सॅमसंग.कॉम असे वेगवेगळे कॉंबीनेशन्स वापरले. यापैकी पहिला लीहिलेलाच आय्डी बरोबर आहे हे नंतर कळलं)  अगदी सगळा एपिसोड लिहिला त्यांना पण नो रिस्पॉन्स!

अहो भाग्यम!! त्यांच्या इंजिनिअरचा फोन आला, आणि मला त्याने हजार रुपये डिस्काउंट देतो असं सांगितलं . मशिन आउट ऑफ वॉरंटी म्हणुन मान्य करावं कां? असा विचार आला, पण त्याला म्हंटलं की जर तुझा टेक्निशिअन जर हजार रुपयात काम करु शकतो तर तु का नाही? त्यांच्या एम डी ला पुन्हा एक इ मेल टाकला, त्यात लिहिलं की तुमचे टेक्निशिअन हजार रुपयात मशिन दुरुस्त कशी करायची यात एक्सपर्ट आहेत तेंव्हा तुम्ही तुमचे इंजिनिअर्स त्या टेक्निशिअन कडे पाठवा ट्रेनिंग करता… आणि पुन्हा दररोज दहा रिमाइंडर्स.. त्यांच्या एम डी ला सुरु ठेवले. या सगळ्या प्रकरणात जवळपास चार दिवस गेले. सौ. चा पेशन्स संपत आला होता. काहीही करा पण लवकर सुरु करुन द्या मशिन.. असा घोष सुरु केला.

दुसऱ्या दिवशी ठरवलं, की जर त्यांच्या एम्डी ला पुन्हा एक मेल केला, विथ फायनल वॉर्निंग, की जर त्याने लवकर काही ऍक्शन घेतली नाही तर माझ्या घरी असलेली वॉशिंग मशिन आमच्या कॉम्प्लेक्स मधे कॉमन प्लेस मधे आणून पेटुवून देइन.. आणि सगळ्या न्युज चॅनल्सला पण ही बातमी येइल अशी व्यवस्था करिन.. तेंव्हा कुठे हे लोकं जागे झाले आणि माझी मशिन दुरुस्त  करून देउ ( १ हजारात) असा मेल आला, आणि अगदी सेम डे ला रात्री दुरुस्त करुन दिली त्यांनी..

तर मंडळी भांडत रहा. बस्स… आणि हॅव पेशन्स.. एव्हरिथिंग विल गो इन युवर वे..