सगळ्यात कृर प्राणी.. मानव?

Written by  on July 1, 2020 

फर कोट, मिंक कोट, किंवा सिल्व्हर फॉक्स कोट हे  सगळ्यात महाग असलेले आणि प्रत्येकाला आपल्या कडे असावेच असे वाटणारे ( अर्थात आपल्या कडे नाही अमेरीकेत) अशा वस्तू  मधे मोडतात. ह्या सगळ्यांसाठी फर लागते. मेलेल्या जनावराची फर काढून जर कोट बनवला, तर त्याला कोणाचीच हरकत नसते, पण जर मुद्दाम जिवंत प्राण्याला सोलून त्याच्या कातडीचे कोट बनवणे आणि ते फॅशन स्टेटमेंट म्हणून वापरणे हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही..

मला आठवतं, माझ्या एका मित्राचं लग्नं ठरलं म्हणून त्याने घरी जेवायला बोलावले होते, त्यांच्याकडे एक पद्धत आहे, की लग्न जुळलं की नवऱ्या मुलाने स्वतःच्या हाताने तलवारिने बोकडाला कापायचे. पहिले तर असे काही पहाणे हेच माझ्या प्रवृत्तित बसत नाही. जरी कधी तरी नॉन व्हेज खात असलो, तरीही आजपर्य़ंत कधीच कुठल्याही प्राण्याला मारतांना पाहिलेलं नाही, आणि पाहू पण शकत नाही.

तर त्या मित्राने बोकडाची पुजा केली , हळद कुंकु , आणि फुलांचा हार घातलेला तो बोकड समोर उभा होता. त्याला काहीच कळत नसावं, पण थोडाफार सिक्स्थ सेन्स मुळे असेल , तो थोडा बावरलेला दिसत होता. तर तो विधी सुरु झाला, तलवार उंच उचलली आणि त्या बोकडाच्या मानेवर वार केला. त्या केलेल्या वारा मधे फारसा जोर नसल्याने असेल पण तो बोकड फक्त घायाळ होऊन खाली ओरडू लागला. त्याचं ओरडणं अगदी एखाद्या लहान मुलासारखं वाटत होतं. तिकडून नजर काढून घेतली आणि उगाच इकडे तिकडे पाहू लागलो.मित्राने तलवारीने त्या बोकडाचे शीर धडावेगळे करायचा प्रयत्न केला. आता पुर्वी प्रमाणे तलवारीने शिरछेद करण्याइतकी ताकत आणि मनगटात जोर नसतो कोणाच्या, त्यामुळे तो बोकड तडफडत खाली पडला होता. शेवटी एका एक्स्पर्टने त्याचे शीर धडा वेगळे केले आणि तो शांत झाला.

मला मळमळून आलं.उलटी होते का असं वाटत होतं. सगळ्या समोरून आपण निघून जाणं म्हणजे मनाचा  कमकुवत पणा दिसेल आणि नंतर इतर मित्र चेष्टा करतील याची पण भिती मनातून वाटतंच होती. तरी पण हलकेच बाजुला झालो, आणि माझ्या बरोबरच इतर मित्रं पण बाजुला निघून गेले. मला वाटतं की सगळ्यांनाच तो प्रसंग पाहून मनातून खूप वाईट वाटलं असावं.

नॉन व्हेज खाणं ही एक पुर्ण वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या प्राण्याला अशा तर्हेने मरताना पहाणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. या प्रसंगापासून मी बोकडाचं मिट खाणं बंद केलंय. ते अजूनही खाऊ शकत नाही.हे इथे लिहितोय, कारण ते अगदी शंभर टक्के खरं आहे. कदाचित तुम्हाला वाटेल  मी खूप कमकुवत मनाचा माणुस आहे म्हणून .. पण मी आहे तो असा आहे..! नजरेपुढे तोच त्या बोकडाचा केविलवाणा चेहेरा आणि डॊळॆ समोर दिसतात.. दे आर हॉंटींग मी टुडे ऑल्सो…

दोन तिन महिन्यांपूर्वी चंद्रपुरला गेलो होतो. पुढे सास्ती माइन्स ला काम होतं . टॅक्सी मधेच बसलेलो होतो. एका ठिकाणी एक डंप ट्रक बंद पडला म्हणून ट्राफिक जॅम झालेला होता. सहज खिडकी बाहेर पाहिलं . तर एक चिकनचं दुकान होतं. दुर्लक्ष करु म्हंटलं तरीही त्या पक्षांच्या आवाजामुळे दुर्लक्ष केलं जात नव्हतं. इथे जरा विचित्रच पद्धत दिसली चिकन कापायची.

एक लहानसं सिमेंटच टाकं बनवलेलं होतं. त्यामधे चिकनची मान अर्धी कापून त्यात टाकुन द्यायचा तो कसाई,ते चिकन त्या टाक्यामधे तडफडत रहायचं जवळपास दोन तिन मिनिटं आणि नंतर शांत व्हायचं.  साधारण दोन मिनिटात ते चिकन पुर्ण शांत झालं की त्याची पिसं उपटून त्याला तो स्वच्छ करायचा. या मागचा काय उद्देश तो मला कळला नाही. म्हणून साईटला पोहोचल्यावर एका इंजिनिअरला विचारले, तर तो म्हणाला, की या मागचं लॉजिक असं आहे, की अर्धवट कापल्या मुळे चिकन मरत नाही आणि हार्ट सगळं रक्त पंप आऊट करतं. नवीन ट्रेंड आहे म्हणे हा… माझ्या तर अंगावर काटा आला होता ते पा्हून..आणि अशा तऱ्हेने कापल्या मुळे म्हणे त्याचं मांस सॉफ्ट होतं..! मानव हा सगळ्यात कृर प्राणी आहे हे पटतंय मला तरी. तुम्हाला काय वाट्त?

आज हे मी काय लिहितोय??माझं मलाच कळत नाही. कदाचित आज सहज म्हणुन नेटवर बघितलेल्या काही क्लिप्स मुळे ह्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एक अतिशय डिस्टर्बिंग व्हिडीओ पाहिला यु ट्य़ुबवर. नरम फर मिळावी म्हणून जिवंतपणे प्राण्याला सोललं जातं होतं.. त्यामधे अगदी सगळे प्राणी होते, कुत्रे, मांजरं, आणि गाई, म्हशी, बकऱ्या.. यु नेम इट दे वेअर देअर.

सिल्व्हर फॉक्सची तर संख्या आता अगदी संपत आलेली आहे. तसेच मिंक या प्राण्याच्या कातड्याची किंमत तर अगदी आकाशाला टेकली आहे. अतिशय मुलायम कातडं असलेला हा लहानसा प्राणी… अगदी संपायच्या मार्गावर आलेला आहे.सापांची  पण कातडी ते जिवंत असतानाच काढली जाते. . कातडी काढून घेतल्यावर त्या स्किनलेस सापाचे किंवा प्राण्यांचं तडफडणं पहावत नव्हतं. मी मुद्दामच ते व्हिडिओज इथे पोस्ट करित नाही. अतिशय डिस्टर्बिंग व्हिडीओज आहेत ते.

मानवाने आपल्या शक्ती आणि चातुर्याच्या जोरावर या इतर प्राण्यांचा जगण्याचा अधिकार संपवून टाकला आहे. लिव्ह ऍंड लेट लिव्ह हे प्रिन्सिपल पुर्ण विसरुन गेलाय  सगळ्यात कृर प्राणी..   मानव!

Category : Marathi Lekh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.