कंटाळा…

Written by  on June 28, 2020 

कंटाळा म्हणजे प्रत्येकालाच नको असलेला पाहुणा!     आज सकाळपासून  माझ्या कडे ठाण मांडून बसलेला आहे हा न बोलावलेला पाहुणा! काही केल्या दूर होत नाही. टिव्ही वर पण एकही आवडीची सिरियल, सिनेमा नाही ज्यामुळे काही वेळ बरा जाईल. वाचायला पुस्तक उचललं तर त्यातही लक्ष लागत नाही. पेपर सगळे वाचून झाले. फेसबुक वर गेल्यावर दहा मिनिटे बरे वाटले, पण नंतर पुढे काय करायचे हा प्रश्न होताच?

हा कंटाळा म्हणजे नेमकं काय? तर बराच वेळेस सगळं जग संथ झालेलं असतं, काहीच घडत नाही, तेंव्हा  आपल्याला प्रकर्षाने  काही तरी व्हावं असं वाटत असतं,   तेंव्हा  येतो तो कंटाळा. तसंही आपण करमणुकी साठी काहीही करायला तयार असतो. वाचन, लेखन, सिनेमा, टिव्ही, फिरायला जाणे, मित्रांबरोबर गप्पा मारणे वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टींची पण इतकी सवय होऊन जाते, की प्रत्येक गोष्ट अगदी ठरवल्याप्रमाणे होत असते, आणि मग कंटाळा येतो. थोड्या जड भाषेत, जीवनात स्वतः पासूनच  एक प्रकारची अलिप्तता, पोकळी  निर्माण झाली की   कंटाळा येतो.

जे काही तरी व्हायला हवं असतं ते नेमकं काय असतं? अर्थात त्याची काही व्याख्या केली जाऊ शकत नाही. मनाला रिफ्रेश करणारी,  उत्तेजित करणारी  कुठलीतरी गोष्ट व्हायला हवी असते. खूप चांगलीच गोष्ट असली पाहिजे असे पण नाही, तर एखादी उत्कंठा वाढवणारी लहानशी गोष्टही कंटाळा दूर करू शकते. तसं म्हटलं तर पूर्वीच्या काळा पेक्षा हल्ली बऱ्याच करमणुकीच्या गोष्टी उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी फक्त सण वार, आणि त्यानुसार येणारे प्रासंगिक कार्यक्रम हेच काय ते करमणुकीचे साधन असायचे. त्या मानाने आज इतकी साधनं उपलब्ध असूनही कंटाळा काही आपली पाठ सोडायला तयार नसतो.

आठवडाभर काम केल्यावर जेंव्हा एखादा मित्र संध्याकाळी कुठेतरी भेटायचं का असे जेंव्हा पिंग करतो, तेंव्हा दिवसभरातला कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो, आणि आपण संध्याकाळची वाट पहात उत्साहाने काम करायला लागतो. हा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी तरी घेतला असेलच.

किंवा, ऑफिसमधे गेल्यावर बॉस  चिडचिड करणार , समोरची ती मुलगी जी तुम्हाला खूप आवडते, जी नेहेमी दुसऱ्या एखाद्या बरोबर लंच ला  जात असते, तुम्ही बोलायला गेलात तर , की दुर्लक्ष करणारी – हे सगळं अपेक्षित असतं, आणि म्हणून ऑफिसला गेल्यावर एकदम कंटाळा येतो. पण जस्ट इमॅजिन करा, की तुम्ही सकाळी ऑफिसला गेला, आणि बॉस एकदम चांगला वागतो, तुमच्या कामावर अजिबात काही कॉमेंट करत नाही, ती समोरच्या टेबलवरची तुमच्याकडे पाहून चक्क हसते, आणि पिंग करून तिच्या टेबलवर  तिच्या काहीतरी प्रॉब्लेम साठी बोलावते आणि नंतर म्हणते, की दुपारी लंचला सोबतच जाऊ, आणि संध्याकाळच्या नाटकाची दोन तिकिटं आहेत येणार का?????, सगळं काही अनपेक्षित , तुमच्या कल्पनेच्या एकदम   विपरीत घडतं, आणि मग कंटाळा  अगदी आसपासही फिरकायला तयार नसतो. तुम्ही  अगदी पूर्ण उत्साहाने कामाला लागता, लंच टाइम कधी होतो याची वाट पहात.

एखादी आवडीची  गोष्ट, की जिचा तुम्हाला कधीच कंटाळा येऊ शकत नाही असे वाटत असते, ती सुद्धा सारखी करत राहिल्यास तोच तो पणा येऊन कंटाळा येतो.  लग्नापूर्वी बायको गर्ल फ्रेंड असतांना तुम्ही तिच्याबरोबर फोन वर तास अन तास बोलू शकता, पण लग्न झाल्यावर काही दिवसातच काय बोलायचं हा प्रश्न पडतो. कारण  एकच, तुम्हाला सहजसाध्य असलेली गोष्ट कंटाळा आणू शकते- मग ती   खाण्याची, वाचन, टिव्ही, सिनेमा, भटकंती – अगदी काहीही असो. जीवन  एकसुरी व्हायला लागले, की  कंटाळा येतो. मला तर नेहेमी वाटतं, की आयुष्यात काहीतरी एन्झायटी असायला हवी.

कंटाळ्याचे अजून एक कारण म्हणजे , एखाद्या गोष्टी बद्दलची आपली कल्पना ही काही तरी वेगळीच असते, पण प्रत्यक्षात जेंव्हा ती गोष्ट अनुभवतो, तेंव्हा किंवा तिच्याबद्दल पुर्ण पणे  माहिती झाल्यावर , आपल्या मनातली “प्रतिमा” आणि “वास्तव” या मधला फरक दिसला की मग  त्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो.  एखादी गोष्ट न आवडणं म्हणजे कंटाळा नाही.कंटाळा म्हणजे अनुत्साह वाटणे. कुठलेतरी थ्रिल अनुभवायला मिळावे असे वाटणे .

कंटाळ्या पासून दूर पळणे हा माणसाचा स्वभाव आहे. आपण नेहेमीच अशा थ्रिल च्या शोधात असतो, म्हणूनच तर एस्सेल वर्ल्ड मधल्या जिवघेण्या राईड्स मधे पण  मनातून भीती वाटत असतांना पण आपण जीव मुठीत धरुन बसतो, आणि  तो क्षण जपून ठेवायचा प्रयत्न करत असतो. कार रेस, क्रिकेट, मोटरसायकल ड्रायव्हिंग, ट्रेकिंग हे असेच खेळ. पण फक्त ट्रेकिंगच शारीरिक थकवा आणून ताजेतवाने करु शकते. काहीतरी चित्तथरारक अनुभवायला मिळावे ही आपली खास मनापासून इच्छा असते.

एखाद्या गोष्टीचे व्यसन असलेल्या माणसाला ती गोष्ट ठरावीक वेळेस नाही मिळाली तर कंटाळा होतो, बेचैनी वाढते. जर तुमचा एखादा मित्र तंबाखू किंवा सिगरेट ओढणारा असेल, तर तुम्ही त्याला बरेचदा सिगरेट साठी कासावीस होतांना पाहिले असेल. व्यसना मुळे येणारा कंटाळा हा फक्त व्यसनी लोकांनाच समजू शकतो. या कंटाळ्याला उपाय नाही. पण फक्त सिगरेट, तंबाखू नंतर पुढची स्टेज म्हणजे ड्रग्ज वगैरे घेण्यापर्यंत मुलांची झेप जाऊ नये एवढीच इच्छा. मी स्वतः पण सिगरेट , तंबाखू ओढायचो, पण गेल्या कित्येक वर्षापासून बंद केली आहे. जेंव्हा तुम्ही सिगरेट सोडता, तेंव्हा जो कंटाळा येतो तो असह्य असतो, ही गोष्ट मी अनुभवली म्हणून सांगतोय.

कंटाळा हा कधी प्रॉडक्टिव्ह होऊ शकतो का? कदाचित ह्याचं उत्तर होय असे दिले जाऊ शकेल. मनोरंजनाची एक लिमिट असते, तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, की मग पुन्हा पुन्हा त्या पेक्षा वरचढ मनोरंजन हवे असे वाटू लागते, नाहीतर मग त्या मनोरंजनाचा पण कंटाळा येऊ लागतो. मनोरंजनाचा अतिरेक हा टाळण्याची सवय अगदी लहानपणापासूनच लावून ठेवली , तरच पुढल्या आयुष्यात थोडं संथ आयुष्य जगायची सवय लागु शकते. माझ्या एका मित्राच्या चार वर्षाच्या मुलाला दिवसभर कार्टुन नेटवर्क पहाण्याची सवय आहे. रविवारी तर दिवसभर कार्टून पहात असतो. अशी काही न करता करमणुकीची सवय झाली की मग हात पाय हलवायची पण इच्छा होत नाही, मग व्यायाम तर दूरच राहिला. तरुणांसाठी फेस बुक सारख्या सोशल साईट्स कंटाळा आला की वेळ घालवण्याचे साधन म्हणून वापरले जाते, पण खरंच त्याने कंटाळा जातो का? हा प्रश्न आहेच.

जाता जाता एक गोष्ट सहज लक्षात आली, की अंबानीज, गोदरेज, वगैरे मंडळींकडे तर खूप पैसा आहे, आयुष्यभर काही न करता पण ते आयुष्य घालवू शकतात .दररोज काहीतरी चित्तथरारक गोष्टी अनुभवणं त्यांना शक्य होत असेल का? की त्यांना पण कंटाळा येत असेल? माझं मत आहे, की त्यांना पण नक्कीच कंटाळा येत असेल. एकदा तुम्ही मनोरंजनाचा हाय डोझ रात्री घेतला, की मग सकाळी उठल्यावर जी पहाट होते , ती रात्रीच्या तुलनेत नक्कीच कंटाळवाणी होत असेल नाही का? तुमच्या कडे कितीही पैसा असला तरीही, जीवनात दररोज काही तरी थ्रिलिंग घडवून आणणे शक्य नाही हे नक्की!

करमणुकीच्या अतिरेकाने मन आणि शरीर दोन्ही थकून जातं. संवेदना बोथट होतात, म्हणूनच म्हणतोय, कंटाळा आला, तरीही तो एंजॉय करायला शिका, कंटाळ्यातही एक वेगळीच मजा आहे. जर तुम्ही एकसुरी आयुष्यामध्ये येणारा कंटाळा मान्य करण्याची शरीराला आणि मनाला सवय लावाल, तर  आयुष्य एकदम सोपं होऊन जाईल.

कंटाळा आला , की मग सगळे जण काही तर कर , सिनेमा पहा वगैरे सांगून कंटाळ्याला दूर करा असा सल्ला देतात, पण मी म्हणतो,कंटाळा आलाय ना?  ” बी विथ इट”  आणि कंटाळा पण एंजॉय करा.

रसेल चा एक  लेख वाचला होता, तो सारखा आठवत होता लिहितांना.आता तुम्हाला ह्या  कंटाळ्याची कंटाळवाणी  पोस्ट वाचून   जर कंटाळा आला असेल तर जे वाचलं ते विसरून जा! मला पण कंटाळाच आलाय, म्हणून हे पोस्ट लिहिलं  आहे.:)

Category : Marathi kathaMarathi Lekh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.