ऑर्केस्ट्राचे दिवस

Written by  on June 29, 2020 

गणपती उत्सव म्हणजे काय? त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं?? ते आज इथे लिहितोय.

गणपती उत्सवाचे वेध लागले  म्हणजे वेगवेगळे  ऑर्केस्ट्रा कार्यरत व्हायचे. तेंव्हा काही रिऍलिटी शोज नव्हते, त्यामुळे सगळे छोटे मोठे कलाकार मिळून ऑर्केस्ट्रा बनवायचे . हे सगळे संगीताला कमिटेड लोकं असायचे . इथे पैसे कमावणे हा उद्देश नसायचा ऑर्केस्ट्रा चा, तर एका मोठ्या गृपसमोर आपली कला सादर करता यावी हा उद्देश असायचा या लोकांचा. आपलं कोणीतरी कौतुक करावं बस.. एवढीच अपेक्षा.

या ग्रुपमधले लोकं कुठे ना कुठे तरी नोकरी वगैरे करायचे, आणि उरलेल्या वेळात केवळ हॉबी म्हणून किंवा गाण्यावरचं प्रेम म्हणून एकत्र येउन ऑर्केस्ट्रा मध्ये काम करायचे..यागृपमधे तबला वादक, हार्मोनियम, आणि कॅसीओ वादक असायचे . सोबतच एक ड्रम वाजवणारा तर अगदी मस्ट!!एखाद्या गाण्यामधे जर खूप ड्रम बिट्स असले की मग त्या ड्रम वाजवणाऱ्या ला बघायलाच मजा यायची. त्याची ती डौलदार हालचाल.. मस्त वाटायची पहायला.

गणपतीचे दहा दिवस आणि दुर्गा देवीचे १० दिवस या लोकांना खूप  मागणी असायची.रोज कुठे ना कुठे तरी कार्यक्रम असायचा यांचा. मग जवळपासच्या लहान सहान गावांत तर या लोकांना खूप मान असायचा. नागपूरचा मेलोडी मेकर्स हा खूप  प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा होता.

आजकाल असे हिंदी सिनेमाची गाणी म्हणणारे  ऑर्केस्ट्रा कमी झाले आहेत आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. म्युझीक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं  म्हणणारा आणि कॉम्पेअरिंग करणारा बस्स!! नो म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स.. हा न्वीन ट्रेंड पण पॉप्युलर आहे आजकाल.

गणपतीची आरती झाली की दहा दिवसांपैकी कमीत कमी एक तरी दिवस हा कार्यक्रम व्हायचा. यासाठी मग स्टेज बनवणे , साउंड सिस्टीम भाड्याने आणणे हा खर्च तर असायचाच.लाइटींग साठी एखाद्या पोल वरुन आ्णि ऍथोराइझ्ड कनेक्शन घेतलं जायचं. रात्री आरती नंतर साधारण पणे नऊ च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु व्हायचा. लेटेस्ट   सिनेमाची गाणी , सादर केली जायची.

एखाद्या ऑर्केस्ट्रा मधे तर चक्क डान्सर पण असायची, ती एखाद्या खास गाण्यावर नाच करायची स्टेजवर . पोलीसांचं पण काही ऑब्जेक्शन नसायचं, रात्री एक वाजे पर्यंत कार्यक्रम सुरु राहिला तरीही. तरुण, तरुणी बरेचदा तर अगदी सहकुटुंब हा कार्यक्रम पहायला जायचे.

कदाचित असंही वाटेल तुम्हाला, की काय विशेष आहे त्यात?? पण आजपासून २५-३० वर्षांपूर्वी करमणूकिचे फारच कमी कार्यक्रम असायचे, त्यामुळे अशा कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पहायचो आम्ही.अशा कार्यक्रमाची जाहिरात केली जायची.एकाच दिवशी निरनिराळ्या गणेश मंडळात बरेच कार्यक्रम असायचे. मग आम्हाला पण ऑप्शन असायचा, की आज कुठला ऑर्केस्ट्रा बघायचा ते.

माझा एक मित्र आहे अविनाश जोशी, तो अगदी हुबेहूब मुलीच्या आवाजात गाणी म्हणायचा. त्याला  वंडरबॉय जोशी म्हंटलं जायचं.मग काय अव्या आमचा मित्र आहे म्हणून आम्ही पण कॉलर टाईट करुन फिरायचो. अव्याचा ऑर्केस्ट्रा असला की आम्ही सगळे तिकडेच जायचो.     अगदी खरं सांगायचं तर रेकॉर्ड डान्स पहायला जास्त आवडायचं.

कधी तरी एखाद्या ठिकाणी जा्दूचे प्रयोग पण अरेंज केले जायचे. हे सगळे कार्यक्रम अगदी ओपन स्टेजवर असायचे. एखादं गणेशोत्सव मंडळ आपल्याच मंडळातल्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. त्या मधे अगदी दोन वर्षांच्या चिमी पासून तर ५० वर्षांच्या देशमुख  काकांपर्यंत सगळे भाग घ्यायचे. ज्या कोणाला थोडं तरी गाण्याचं अंग आहे तो आपलं कसब दाखवायला पुढे यायचा. वय हा काही क्रायटेरिया नसायचा. कधी तरी नाटकं पण बसवली जायची.

सगळ्यात पॉप्युलर म्हणजे हिंदी सिनेमा. हिंदी सिनेमा दाखवला नाही तर गणेशोत्सव पुर्ण झालाच नाही!! सिनेमा शिवाय काय गणेशौत्सव?? रस्त्यावर पडदा लावून रात्री त्यावर सिनेमा दाखवला जायचा. १६ एम एम ची फिल्म आणि ओपन एअर थिएटर. पडद्याशेजारीच मोठे स्पिकर्स असायचे. पडद्याच्या दोन्ही बाजूने लोकं बसायचे सिनेमा पहायला. या  मधे पण एक गम्मत असायची. पडद्याच्या विरुद्ध दिशेने पाहिले की उलटं चित्र दिसायचं – उलटं म्हणजे साडीचा पदर उलटा घेतलेला दिसणं वगैरे वगैरे.. पण तशाही परिस्थितीत लोकं सिनेमा एंजॉय करायचे. अमिताभ बच्चनचा दीवार तर नेहेमीच दाखवला जायचा. तसेच आराधना हा ऑल टाइम फेवरेट होता.

रात्री ७ वाजताच सगळे मित्र मिळून गणपती बघायला म्हणून जायचो. आणि रात्री दिड ते दोन नंतर घरी परत जायचो. नंतर काही वर्षांनी पुण्याला आल्यावर गणपती पहाणे हा एक महत्वाचा उद्योग रहायचा. मी रहायचॊ सदाशीवात कॉट बेसिसवर.. त्यामुळे तिथुन रोज रात्री जवळपासचे गणपती पहायला जाणे सोपे व्हायचे. पुण्याचे गणपती म्हणजे आरास .. सुंदर आरास केली जायची. (अजूनही केली जाते) पण हल्ली पुण्याला गणपती पहायला म्हणून जात नाही.

आता इतकी वर्षं झालीत, मुंबईला लालबागचा राजा पहायला जायचे म्हणजे कमीत कमी तिन चार तासांची निचंती. इतका वेळ नसतो, त्यामुळे इतर ठिकाणी जाउन पहातो शक्य होईल तितके गणपती. मुंबईला गणपतीच्या पेंडॉलमधे जाण्यासाठी रांगेतच जावं लागतं. पुण्याप्रमाणे, गणपतीची मुर्ती बाहेरून येता जातांना दिसत नाही. कारण मुर्ती समोर चक्क पडदा लावून बंद केलेला असतो. कदाचित पोल्युशन मुळे मुर्ती खराब होऊ नये म्हणून असे असावे..

असो… सिध्दीविनायकाला एकदा तरी जाउन यायचं असतं गणपती मधे. त्यामुळे एखाद्या वर्किंग डे ला दुपारी चक्कर मारली तर चांगलं दर्शन होतं.गणपती बाप्पा मोरया..!!

Category : Marathi Lekh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.